मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

अपयशी लघुउद्योगांमागील ७ प्रमुख कारणे...

अपयशी लघुउद्योगांमागील ७ प्रमुख कारणे




अपयशी लघुउद्योगांमागील ७ प्रमुख कारणे
नमस्कार, भारतामध्ये सध्या व्यवसाय सुरु करणे हे कधी नव्हे एवढं सोपं झालं आहे. आज कोणतीही व्यक्ती त्याला वाटेल त्या क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरु करू शकतो. व्यवसाय सुरु करणं हे पूर्वीसारखं फार काही अवघड राहिलेलं नाही आहे. परंतु व्यवसाय सुरु करणे, तो टिकवून ठेवणे, तो वाढवणे व यशस्वी करणे या वेगवेगळ्या बाबी आहेत. आज भारतात दरवर्षी लाखो लघुउद्योग सुरु होतात. मग ते व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्विस इंडस्ट्रीचे असोत, ट्रेडिंग किंवा एक्सपोर्टशी संबंधीत असोत, शेती किंवा सामाजिक क्षेत्रातील असोत. व्यवसाय सुरु मोठ्या प्रमाणात होतात. परंतु रिसर्च असं की, सांगतो बहुतांश लघुउद्योग प्रदीर्घ काळ टिकत नाहीत. अल्पावधीतच बरेच लघुउद्योग ठप्प पडतात. काही वर्षांपूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एस.एम.ई. (BSE-SME) विभागाने सुक्ष्म, लघु व मध्यम व्यवसायांबद्दल एक रिसर्च मांडला. त्या रिसर्च नुसार भारतामध्ये ७०% लघुउद्योग पहिल्या १० वर्षातच ठप्प पडतात. उरलेल्या व्यवसायांपैकी बहुतांश व्यवसाय पुढील ५ ते १० वर्षात ठप्प पडतात. त्या नंतर व्यवसाय आहेत त्याच परिस्थितीत राहतात अथवा उत्तुंग यश मिळवतात. लघुउद्योगांचे सतत प्रगती करणाऱ्या यशस्वी व्यवसायांमध्ये रुपांतर फार कमी प्रमाणामध्ये होते. प्रश्न असा पडतो की संधींनी नटलेल्या या युगामध्ये, झपाट्याने विकास होत असलेल्या भारतासारख्या या देशामध्ये, लघुउद्योगांनी आपले पंख पसरून उत्तुंग भरारी ग्यायला हवी, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लघुउद्योग अपयशी का ठरत आहेत?
मित्रांनो, हजारो लघुउद्योजकांशी माझा संपर्क येतो. बऱ्याच अंशी आपल्या अपयशाचं खापर लघुउद्योजक बाह्य बाबींवर फोडताना मला आढळतात. अपयशाला सामोरे गेलेल्या काही उद्योजकांची वाक्य खालिल प्रमाणे असतात,
" सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आमचं नुकसान झालं. "
" चायनाच्या उत्पादनांमुळे आमचं मार्केट बरबाद झालं. "
" नोटबंदीमुळे आमचा धंदा ठप्प पडला "
" बँकांनी आम्हाला योग्य त्या वेळी मदत केली नाही "
" अयोग्य कर प्रणालीमुळे (GST) आमच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला "
" नशीबाने मला साथ दिली नाही. "
" आमच्या उत्पादनांची मागणीच हळूहळू कमी होत गेली "
" तंत्रज्ञानामुळे आम्ही मागे पडलो "
" आमच्या इंडस्ट्रीमध्ये सर्वांचीच वाट लागली "
" इ - कॉमर्समुळे आमचे धाबे दणाणले "
" कुटुंबीयांनी गरज असताना सहाय्य केलं नाही "
अशी कित्येक कारणं मी ऐकली आहेत. स्पष्टपणे सांगायचं तर मला ही कारणं फारच वरवरची आणि पोकळ वाटतात. माझं असं ठाम मत आहे व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि अधोगतीसाठी एकच व्यक्ती जबाबदार असतो, तो म्हणजे व्यवसायाचा कर्ताधर्ता... व्यवसायाचा जनक... व्यवसायाचा 'उद्योजक' ! कोणत्याही बाह्य कारणांमुळे पुर्णपणे व्यवसाय कधीच ठप्प पडू शकत नाही. बाह्य बाबींमुळे थोड्या-बहुत प्रमाणात धोके नक्कीच उदभवू शकतात परंतु व्यवसाय सपशेल अपयशी ठरण्यासाठी बाह्यबाबींपेक्षा व्यवसाया अंतर्गत काही गोष्टींमुळे व्यवसायाची पडझड होते. 
या लेखामध्ये मी लघुउद्योगांच्या अपयशामागील ७ प्रमुख कारणांबद्दल माझे विचार मांडणार आहे. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार ही ७ प्रमुख कारणं व्यवसायाच्या अधोगतीसाठी कारणीभूत असतात आणि व्यवसाय बाह्य धोकादायक घटना किंवा बाबी निमित्तमात्र ठरतात. आपण प्रत्येक कारण थोडक्यात समजून घेऊया.
१. व्हिजनचा अभाव:
जगविख्यात व्यवसाय तज्ञ पीटर ड्रकर यांनी म्हटलं होतं "९०% व्यवसाय व्हिजनच्या अभावामुळे अपयशी होतात!" माझ्या मते हे वाक्य १००% बरोबर आहे. कित्येक लघुउद्योजकांच्या बाबतीत हे वाक्य अगदी तंतोतंत खरं ठरतं. बरेच लघुउद्योजक व्यवसाय सुरु करतात कारण त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायच असतं, स्वातंत्र्य हवं असतं, पैसा कमवायचा असतो, यशस्वी व्हायचं असतं, स्वतःचं वेगळं अस्तित्त्व निर्माण करायचं असतं. काहीतरी प्राथमिक कारणामुळे उद्योजक व्यवसाय सुरु करतात परंतु व्यवसाय सुरु केल्यानंतर व्यवसायाला भविष्यात नेमकं कोणत्या पातळीवर नेलं पाहिजे, याबद्दल त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता नसते. भविष्याबद्दल पूर्णपणे ते अनभिज्ञ असतात. फक्त वर्तमानावरच त्यांची संपूर्ण उर्जा गुंतली गेलेली असते. आजचं कामकाज, आजचं व्यवस्थापन, आजचा नफा, आजची देणी देणं, फक्त 'आज' वर भर. कित्येक लघुउद्योजक त्यांची वार्षिक व्यावसायिक ध्येय सुद्धा ठरवत नाहीत. जो व्यवसाय सुरु आहे तोच टिकवून ठेवण्यावर त्यांचा भर असतो. भविष्यामध्ये काहितरी असाधारण व्यावसायिक स्वप्नं साकार करण्याची इच्छा सुध्दा त्यांना नसते. त्यामुळे असे उद्योजक जोखिम घेण्यास सुध्दा असमर्थ ठरतात. आजच्या या झपाट्याने बदलणाऱ्या युगामध्ये भविष्यातील होणारे बदल हेरून वर्तमानात लघुउद्योजक आपल्या व्यवसायामध्ये परिवर्तन धडवून आणण्यास पुढाकार घेत नाहीत. परंतु जगात होणारे बदल कोणासाठी थांबत नाहीत. ह्या जागतिक बदलाची झळ कधीनाकधी उद्योगांना भेडसावतेच! जे व्यवसाय कात टाकतात, परिवर्तन घडवून आणतात, ते व्यवसाय तग धरून राहतात. जे व्यवसाय बदलत नाहीत ते या भयानक बदलाचे बळी पडतात.
२. एक खांबी तंबू:
बहुतांश पहिल्या पिढीचे उद्योजक व्यवसाय सरु करतात कारण एका कोणत्यातरी क्षेत्रामध्ये त्यांचे नेपुण्य असते. त्यांचे ज्ञान, कौशल्य व अनुभवाच्या जोरावर ते एका विशिष्ट क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरु करतात. या गोष्टींमुळे होतं असं कि संपूर्ण व्यवसाय हा त्यांच्यावरच अवलंबून राहतो. उद्योजक स्वतः सर्व गोष्टी करत असतो. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात असं असणं स्वाभाविक आहे. परंतु जसा व्यवसाय वाढतो, तसा उद्योजकाने स्वतःच सगळी कामं करण्यापेक्षा संघटनाबांधणीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्यावसायिक संघटना निर्मिती करण्यासाठी उद्योजकाने व्यवसायामध्ये नवीन माणसांची नेमणूक केली पाहिजे. जी माणसे व्यवसायातील विविध विभागांची जबाबदारी घेतील आणि कामे चोखपणे करतील. त्याच प्रमाणे व्यवसाय एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहण्यासाठी व्यवसायातील कामकाजांचे यांत्रिकीकरण केले गेले पाहीजे. परंतु हे सगळं करणं उद्योजकाला त्रासदायक वाटते. व्यावसायिक संघटना उभारण्यासाठी बरेच लघुउद्योजक पुढाकार घेत नाहीत. फक्त एका व्यक्तीवर व्यवसाय अवलंबून राहिल्यामुळे, जर व्यक्ती ढासळली तर व्यवसाय आपोआपच कोलमोडतो. त्यामुळे बरेच व्यवसाय उद्योजकाच्या शारिरीक क्षमतेनुसार किंवा वयोमानानुसार ढेपाळतात व कालांतराने बंद पडतात.
३. ढिसाळ आर्थिक नियोजन:
उत्पादन कितीही उत्कृष्ट असले, उद्योजकाचा हेतू कितीही प्रामाणिक असला, व्यवसायाची पत कितीही विश्वसनिय असली, कर्मचारी कितीही प्रेरित असले तरी व्यवसायिक यश मिळण्यासाठी व्यवसायाने आर्थिक यश मिळवणे तेवढेच महत्वाचे असते. कोणत्याही उद्योजकाला व्यवसायामध्ये काही वर्षे काम केल्यानंतर हे कळून चुकते की, आर्थिक नियोजन जर काटेकोरपणे केलं नाही तर व्यवसाय कधीही डबघाईला येईल. परंतु बरेच लघुउद्योजक आर्थिक नियोजनाबद्दल उदासिन असतात. त्यांना आपल्या व्यवसायाची बॅलेन्स शीट सुद्धा वाचता येत नाही. त्यांना आपला व्यवसाय नक्की नफ्यामध्ये आहे की तोट्यामध्ये हे सुद्धा जोपर्यंत सी.ए. सांगत नाही तो पर्यंत कळत नाही. वर्षातुन एकदा, (ते सुद्धा इनकम टॅक्स फाइल करायचा असतो म्हणुन) बरेच लघुउद्योजक पर्याय नसतो त्यामुळे सी.ए. च्या मदतीने बॅलेन्स शीट बनवतात. आपल्या व्यवसायाचं कॉस्टींग, बजेटींग, नफा, आणि सर्वात महत्वाचं 'कॅश-फ्लो' मॅनेजमेन्ट याकडे दुर्लक्षित करतात. माझ्या मते, व्यवसायाला जीवंत ठेवण्यासाठी 'पैसा' खुप महत्वाचे 'माध्यम' आहे. परंतु बरेच उद्योजक व्यवसायातील पैश्यांचा वापर वाट्टेल त्या पद्धतीने करतात. चुकीच्या ठिकाणी भरमसाठ पैसा गुंतवतात. बेहिशोबी पैसे खर्च करतात. बऱ्याच वेळा अयोग्य आर्थिक निर्णय घेतात. त्याचा परिणाम असा होतो, की व्यवसाय जीवंत ठेवण्यासाठी आवश्यक 'श्वास' म्हणजेच पैशांची कमतरता भासू लागते. कालांतराने व्यवसाय कोलमडतो.
४. अनैतिक कारभार:
उद्योग म्हंटला की त्याचे कायदे आलेच, मग ते टॅक्स संबधीतले असतील, ऊत्पादन व सेवांच्या परवान्याबद्दल असतील, कर्मचाऱ्यांच्या संबधीतले असतील किंवा ग्राहकांच्या हिताशी संबंधीत असतील. बऱ्याच वेळा व्यवसाय वाढवण्याच्या शर्यतीमध्ये उद्योजक व्यवसाय करण्याच्या नियमांना धाब्यावर बसवतात. व्यवसाय करताना काही 'नैतिक मूल्य' पाळावी लागतात. हि मूल्य व्यवसायाच्या दूरगामी कामगिरीवर प्रभाव पाडतात. काही उद्योजक व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ नये व जास्त नफा मिळावा म्हणून अनैतिक कारभार करतात. उदाहणार्थ, टॅक्स न भरणे, उत्पादनाच्या कच्च्या मालामध्ये स्वस्त व घातक पदार्थांचा वापर करणे, ग्राहकांना खोटी वचने देणे, अयोग्य पद्धतीने विदेशी मालाची आयात करणे, असं सगळं करून काही काळासाठी यश मिळवता येते. तात्पुरता नफा कमावता येतो. परंतु याचा परिणाम व्यवसायाच्या दूरगामी कामगिरीवर होते. आजच्या युगात व्यवसायात केलेले अनैतिक व्यवहार जास्त काळ लपून राहत नाहीत. कधी ना कधी हे गैरव्यवहार निदर्शनास येतातच. अश्या वेळी त्या व्यवसायावर गुन्हा दाखल होऊन व्यवसाय बंद देखील होऊ शकतो.
५. नसते उद्योग:बरेच उद्योजक सुरुवातीच्या काळात प्रचंड जोश मध्ये काम करतात, परिश्रम करतात आणि व्यवसायाला एका विशिष्ट पातळीवर घेऊन जातात. त्यांना सुरुवातीच्या पाच ते दहा वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळते. व्यवसायाला प्राथमिक यश मिळते. त्याचबरोबर उद्योजकाला पैसा आणि प्रसिध्दी सुध्दा मिळते. मिळालेलं यश काही उद्योजकांच्या डोक्यात जातं. यशामुळे ते भुरळून जातात. त्यांना समाजामध्ये मान-सन्मान व आदर मिळू लागतो. त्यांचा सत्कार केला जातो. व्यवसायाचं दूरगामी स्वप्नं अजुन लांबच असतं परंतु मिळत असलेला आदर व सन्मान त्यांना कळत नकळत लोभी बनवतो. त्यांना वैयक्तिक प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य जास्त महत्वाचे वाटू लागते. कळत नकळत 'अहंकार' त्यांच्या वागणुकीमध्ये प्रवेश करतो. अशा वेळी व्यवसायावरून त्यांच लक्ष पूर्णपणे विचलित होतं आणि उद्योजक सामाजिक कार्यक्रमांमध्ये जीथे मान-सन्मान मिळेल अश्या ठिकाणी रमू लागतो. व्यवसायाला प्रगतीशील ठेवण्यासाठी उद्योजकाचं संपूर्ण लक्ष आपल्या व्यवसायावर ठेवावं लागतं. परंतु व्यवसायाच्या कर्ताधर्त्याचं लक्षच व्यवसायावरून उडून गेलं तर व्यवसाय हवालदिल होतो. अश्यावेळी व्यवसायाअंतर्गत, बाजारपेठेत काय चालू आहे? याबद्दल उद्योजकाला काहीच कल्पना नसते. अहंकाराने त्याला आंधळा बनवलेले असते. अश्या परिस्थितीत एखादी धोकादायक घटना व्यवसायाला मारक ठरण्यासाठी पुरेशी ठरते.
६. सेल्स आणि मार्केटिंग असमर्थता:
माझ्या संपर्कात येणाऱ्या कित्येक व्यवसायांच्या बाबतीमध्ये मला प्रकर्षाने असं जाणवतं की त्यांचे उत्पादन व सेवा उत्कृष्ट दर्जाचे असते. परंतु त्यांना त्याची विक्री करता येत नाही. प्रभावी मार्केटिंग तंत्राचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचण्यामध्ये कमी पडतात. उत्पादन व सेवा जरी चांगले असले तरी व्यवसायाला यशस्वी होण्यासाठी ग्राहकाने पैसे देऊन त्याचा उपभोग घेणं गरजेचं आहे. जर व्यवसायाला पुरेसे ग्राहक लाभलेच नाहीत तर व्यवसाय तग धरून उभा राहू शकेल का? निश्चितच नाही! कित्येक उद्योजकांना मार्केटिंग व विक्री करायला लाज वाटते किंवा भीती वाटते. मार्केटिंग व विक्री कौशल्य ते शिकत नाहीत. बहुतांश व्यवसाय हा 'वर्ड ऑफ माऊथ' वरच चालू असतो. म्हणजेच ज्यांना व्यवसायाबद्दल माहीत आहे ते समोरून उत्पादन व सेवेची मागणी करतात. नवीन ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी उद्योजक स्वतःहून प्रयत्न करत नाहीत. आजचे युग स्पर्धात्मक आहे. आपल्या बाजारपेठेमध्ये आपल्या सारखेच इतर व्यवसाय सुध्दा आहेत. जर आपल्या व्यवसायाबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचतच नसेल तर व्यवसायाबद्दल जागरूकता कशी निर्माण होईल? बरेच उद्योग ठप्प पडतात कारण, हवे तेवढे ग्राहक ते मिळवू शकत नाहीत.
७. बॅक-अप प्लॅन नाही:प्रत्येक चार चाकी वाहनाला एक 'स्टेपनी' असते. एक अतिरीक्त टायर जे गरज पडेल तेव्हा वापरात येऊ शकतं. प्रवासाला निघालो असताना अचानक एक टायर पंक्चर झालं, तर 'स्टेपनी' चा वापर आपण करू शकतो जेणे करून प्रवास खंड न पडता सुखदपणे होईल. त्याच प्रमाणे आपल्या व्यवसायिक प्रवासामध्ये कधीही काहीही होऊ शकते. एखादे संकट अचानक उद्भवू शकते. पेच प्रसंग हे सांगून येत नाहीत. उद्योजकाने अंदाज बांधून काही संभाव्य धोक्यांबद्दल आधी पासूनच तयारी करून ठेवलेली बरी. व्यवसायात अचानक आर्थिक आणीबाणी निर्माण होऊ शकते, ज्याला 'कॅश-फ्लो क्रंच' असं म्हणतात. कधीतरी महत्वाचे कर्मचारी अचानक सोडून जातात. व्यवसायाच्या तांत्रिक यंत्रणेमध्ये किंवा उपकरणांमध्ये बिघाड होऊ शकतो. व्यवसायाची महत्वाची माहिती गहाळ होऊ शकते. एखादा मोठा ग्राहक अचानक विकत घेणं थांबवू शकतो. सरकारी नियम कधीही बदलू शकतात. नैसर्गिक आपत्ती मुळे व्यवसायाच्या मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं. या सारखे संभाव्य धोके कधी उद्भवतील सांगता येत नाही. यातील एखादं संकट जरी आलं तरी व्यवसाय कायमचा उध्वस्त होऊ शकतो. खरं तर हि बाब दुर्दैवी असते परंतु अपयशी होणाऱ्या व्यवसायांमध्ये हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. 
हा लेख लिहिण्यामागचा माझा उद्देश नकारात्मक मुळीच नाही. मला असं वाटलं की, व्यवसाय यशस्वी करण्याबद्दल मार्गदर्शन करणारे लेख मी या आधी बरेच लिहिले आहेत. प्रेरणादायी लेख सुद्धा बरेच आहेत. परंतु जे व्यवसाय अपयशी होतात, त्यांची कारणमीमांसा सुद्धा केली पाहिजे. जेणेकरून त्यामधून इतर उद्योजकांना धडा शिकता येईल. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' अशी म्हण सुद्धा आहे. त्याप्रमाणे आपण अपयशी झालेल्या व्यवसायांमधून शिकलं पाहिजे व आपल्या व्यवसायात योग्य ते निर्णय घेतले पाहिजेत. आशा करतो कि या लेखामधून आपल्याला काही महत्वाचे ज्ञान प्राप्त झाले. आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

- अतुल अरुण राजोळी 
व्यवस्थापकीय संचालक,
लक्ष्यवेध इन्स्टिटयूट 
7666426654

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल