मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

नेत्रहीन असूनही 'श्रीकांत बोल्ला' ने स्थापन केली ५० कोटींची कंपनी...

 

नेत्रहीन असूनही 'श्रीकांत बोल्ला' ने स्थापन केली ५० कोटींची कंपनी


२३ वर्षांचा श्रीकांत बोल्ला जेव्हा जन्मले तेंव्हा काही नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या मातापित्यांना सल्ला दिला की, त्यांनी गळा दाबून त्यांना मारावे. कारण होते श्रीकांतचे नेत्रहीन होणे. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत श्रीकांत ने लोकांच्या अशा बोलण्याचा सामना केला. पण अशा नकारात्मक गोष्टींनी प्रभावित होण्याऐवजी ते आपल्या लक्ष्याच्या दिशेने पुढे जात राहिले.
आज ते केवळ हैदराबाद स्थित ५० करोडच्या कंपनीचे सीईओ आहेत असे नव्हे, तर आपल्याविषयी नकारात्मक बोलणाऱ्या लोकांना त्यांनी चुकीचे ठरविले आहे. यशाच्या मुक्कामावर आपली वेगळी ओळख बनविणाऱ्या श्रीकांतने लहानपणीच मनात ठरविले होते कि जर लोकांना असे वाटत असेल की, एक नेत्रहीन व्यक्ती काही करू शकत नाही. तर ते जगाला दाखवून देतील जर मनात काही करण्याचा ठाम निश्चय असेल तर कोणासाठीही यश मिळविणे अवघड नाही. श्रीकांत स्वतःला खूप भाग्यवान मानतात की लोकांच्या नकारात्मक गोष्टी ऐकूनही त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या नेत्रहीन होण्याला शाप ना मानता आणि आर्थिक स्थिती विशेष चांगली नसतानासुद्धा त्यांना एका सर्वसामान्य मुलाप्रमाणे वाढवले आणि शिकवले.
श्रीकांत सांगतात की नेत्रहीन असल्यामुळे त्यांना शाळेतसुद्धा नेहमी मागच्या बेंचवर बसवले जात असे. मैदानातसुद्धा त्यांना खेळण्याची परवानगी दिली जात नसे. दहावीनंतर जेव्हा त्यांनी विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेंव्हा त्यांना हे सांगून प्रवेश नाकारण्यात आला की ते विकलांग आहेत. त्यावेळी श्रीकांतने व्यवस्थेशी लढाई करून आपला हक्क मिळविला. बारावीमध्ये ९८ टक्के मार्क मिळवले. त्यानंतर त्यांनी आयआयटी, बिट्स पिलानी यांच्यासह देशातील सर्व टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये अर्ज केला, परंतु त्यांना परीक्षेसाठी हॉल तिकीट मिळाले नाही. त्याऐवजी त्यांना या संस्थांकडून पत्र मिळाले कि, ते नेत्रहीन आहेत म्हणून ते स्पर्धा परीक्षा देऊ शकत नाहीत. सगळीकडून नकार मिळाल्यानंतर श्रीकांतने इंटरनेटवर बेस्ट इंजिनिअरिंग प्रोग्राम विषयी सर्च करणे सुरु केले. जे विशेष करून नि:शक्तांसाठी तयार केलेले असतील. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील अनेक संस्थांमध्ये अर्ज केला, आणि एमआयटी मध्ये स्कॉलरशिप घेऊन शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण घेत असतानाच श्रीकांतने अशी कंपनी स्थापन करण्याचा विचार केला की, जी त्यांच्यासारख्याइतर लोकांना पुढे जाण्यासाठी संधी निर्माण करेल. यादरम्यान श्रीकांतने एका लहानश्या टिनचे छप्पर असलेल्या खोलीतून आपल्या कंपनीचे काम सुरु केले. त्यावेळेस त्यांच्याकडे तीन मशिन्स आणि ८ कामगार होते. याच दरम्यान श्रीकांतची ओळख रवी मंथा यांच्याशी झाली, रवी श्रीकांतच्या कंपनीचे मॉडेल आणि त्याच्या विचारांनी प्रभावित झाले, की त्यांनी मेंटॉरच्या रूपातच नाही तर, इन्व्हेस्टर म्हणूनही श्रीकांतच्या कंपनीत सहभागी होण्याचे ठरविले.
श्रीकांतची कंपनी बोलांट इंडस्ट्रीजअशिक्षित आणि नि:शक्त लोकांना रोजगार देते. हि कंपनी इको-फ्रेंडली आणि डिस्पोजबल कन्झ्युमर पॅकेजिंग सोल्युशन्स चे उत्पादन करते. आज श्रीकांतकडे हुबळी, निजामाबाद , हैदराबाद येथे चार प्लांट आहेत. हे प्लांट १०० टक्के सोलर ऑपरेटेड आहेत. लवकरच त्यांचा एक प्लांट आंध्रप्रदेशाच्या श्री सिटी मध्ये देखील सुरु होणार आहे. श्रीकांत आपल्या व्यवसायाचा आणखी विस्तार करण्याची तयारी करत आहे.
अशाप्रकारे श्रीकांत यांनी आपल्या नेत्रहीनतेला प्रगतीमध्ये अडसर होऊ दिले नाही.
सौजन्य - संध्यानंद
Thanks - Atul Rajoli Sir

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल