मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

२० रुपये खिशात नसणार्‍या कोट्याधिशाची कहाणी...

 

२० रुपये खिशात नसणार्‍या कोट्याधिशाची कहाणी

त्याच्या वडिलांचा आगप्रतिबंधक उपकरण तयार करण्याचा कारखाना होता. वयाच्या आठव्या वर्षांपासून तो वडिलांसोबत कारखान्यात जाई. त्याला कारखान्याविषयी चांगली माहिती होती. कामगार, उत्पादन, ग्राहक यांच्याबरोबर त्याचं एक वेगळंच नातं तयार झालं होतं. शाळेत असताना शाळा आणि कॉलेजच्या सुट्ट्यांदरम्यान कारखान्यात जाण्याचं त्याने वेळापत्रकंच तयार केलं होतं. मात्र लहान भाऊ असल्यामुळे कारखान्याची जबाबदारी वंशपरंपरागत पद्धतीने मोठ्या भावाकडे आली. काहीसा मनात खट्टू झालेल्या त्याने स्वत:ची वेगळी कंपनी सुरु करण्याचे ठरविले. त्यावेळेस खिशात २० रुपये सुद्धा नव्हते. पण स्वप्न मात्र मोठं होतं. एका मित्राकडून ५०० रुपये कर्ज घेऊन त्याने आपल्या व्यवसायास सुरुवात केली. १९८४ मधली ही घटना आहे. अवघ्या ३० वर्षांत त्याची कंपनी १ हजार कोटी रुपयांची उलाढाल करु लागली. ही रोमांचक कथा आहे नितीन फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नितीन शाह यांची.

कोणत्याही एकत्र कुटुंबपद्धतीत जी वंशपरंपरागत पद्धत असते त्यालाच अनुसरुन नितीनच्या वडिलांनी आपली कंपनी झेनिथ फायर सर्व्हिसेसची सूत्रे मोठ्या मुलाकडे सोपविली. आता आपण आपलं स्वत:चं काहीतरी अस्तित्व निर्माण करुन दाखवूया असं नितीनला वाटू लागलं. पण करणार काय हा यक्षप्रश्न होताच. पण त्यापेक्षा सुद्धा महत्वाचा प्रश्न होता तो पैशाचा. एखादा व्यवसाय सुरु करायचा म्हटला तर पैसा लागणारंच. आपल्या खिशात २० रुपयेसुद्धा नाही. कोण का म्हणून आपल्याला पैसे देईल असे त्याला वाटू लागले. मात्र जिथे पैसा काम करत नाही तिथे जोडलेली नाती काम करतात. नितीनच्या एका मित्राने जानेवारी १९८४ मध्ये ५०० रुपये कर्जाऊ दिले. नितीन मित्राच्या गॅरेज मध्ये काम करु लागला. त्यानंतर त्याने मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा डिप्लोमा मिळविला.
नितीन वडिलांसोबत व्यवसाय सांभाळत असताना त्याने काही चांगले संबंध तयार केले होते. यापैकी एक अणुऊर्जा विभागात जेष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मदतीने नितीनला अणुऊर्जा विभागातील आगीशी संबंधित असणार्‍या उपकरणांची निगा राखण्याचे कंत्राट मिळाले. आगप्रतिबंधक सिलेंडरच्या दुरुस्ती आणि निगा राखण्याचं हे कंत्राट होतं. अणुऊर्जा विभाग हे सिलेंडर्स नितीन काम करत असलेल्या गॅरेज मध्ये पाठवत. नितीनने ३ कर्मचार्‍यांना नियुक्त केले होते. त्या तिघांच्या सहाय्याने नितीन सिलेंडर्स दुरुस्त करायचा. अणुऊर्जा विभाग ते दुरुस्त झालेले सिलेंडर्स परत घेऊन जात. काम सुरु केलं त्यावेळेस ट्रॉली, पुली, कन्व्हेयर सारखी उपकरणं नितीनकडे नव्हती. किंबहुना ती घेण्यासाठी पैसे नव्हते. पण हातात उपलब्ध असलेल्या साहित्याच्या जोरावर तो काम करत राहिला. रोलिंग मशीनसाठी तो जुन्या गाडीचा भाग वापरायचा. याचा खर्च होता अवघा हजार रुपये. नवीन मशिन किंमत होती सुमारे ४५ हजार रुपये. अशाप्रकारे विविध क्लृप्ता काढून नितीन कमी खर्चात कंपनी चालवित होता.

साधारण ६-७ महिन्यांनी घाटकोपर मध्ये २० लाख रुपये बाजार मूल्य असलेली १२०० चौरस फूटाची एक जागा खरेदी केली. जमविलेले सारे पैसे या जागेत गुंतविले. अणुऊर्जा विभागाचं काम करत असतानाचं ओळखीने ओएनजीसीचं काम देखील मिळालं. हळूहळू कामाचा वेग वाढला. १९८६ मध्ये नितीनच्या कंपनीने ७ कोटींचा टप्पा गाठला. ही तर सुरुवात होती. अवघ्या २ वर्षांच्या अथक मेहनतीचं हे फळ होतं. १९८७ मध्ये कंपनी विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १ कोटी रुपये खर्चून गुजरातला ५० हजार चौरस फूटाची जागा खरेदी करुन आगप्रतिबंधक उपकरण निर्मितीचा कारखाना तिथे सुरु केला. दरम्यान आगीशी संबंधित सर्व घटक एकाच छताखाली देण्याचा निर्णय नितीनने घेतला. आगप्रतिबंधक उपकरणांचं डिझाईन, निर्मिती, निगा राखणे हे सर्व कंपनी पुरवू लागली. १९८८ मध्ये गोवा आणि मुंबईच्या अग्निशमन दलाचे कंत्राट कंपनीला मिळाले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासोबतच मुळात ही आग शोधून काढणारं यंत्र बनविणार्‍या इंग्लंडमधील अपोलो फायर डिटेक्टर कंपनीसोबत नितीनच्या कंपनीने हातमिळवणी केली. त्यांची उत्पादने नितीनची कंपनी भारतात विकू लागली. उत्पादन निर्मिती ते उत्पादन विपणन व विक्री असा नवीन प्रवास सुरु झाला. २०१० मध्ये नितीन शाह यांनी संयुक्त अरब अमिरातीतील न्यू एज कंपनी ४० कोटी रुपयांना विकत घेतली. न्यू एज कंपनीचे अबुधाबी, दुबई, शारजाह येथे कार्यालये आहेत. युरोपियन बाजारपेठेसाठी फायरटेक सिस्टम नावाची कंपनी सुरु केली आहे. नितीन शाह यांची जगातील एकमेव अशी कंपनी आहे जी आगप्रतिबंधक उत्पादनांसोबतच जड वायू, रासायनिक वायू आणि पाण्याची निर्मिती करते. ओझोन फ्रेंडली फायर प्रोटेक्शन सिस्टम हे तंत्र भारतात वापरणारी ही पहिली कंपनी होय. कंपनीचा सध्याचा एकत्रित महसूल १००० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

२० रुपये सुद्धा खिशात नसताना नितीन शाह यांनी विजिगीषु वृत्ती कायम ठेवत १००० कोटी रुपयांची कंपनी उभारली. जिथे पैसा नसतो तिथे तुमचे ‘रिलेशन्स’ कामाला येतात. म्हणूनच तुमचे रिलेशन्स जपा. तुमच्यात देखील नितीन शाह दडलाय. त्याला ओळखा. स्वत:चं औद्योगिक साम्राज्य उभारा.
- प्रमोद सावंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल