शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

किलोला २५०० रुपये दराने देशी तुपाची विक्री...


-
३० देशी गायींचे संगोपन गोमूत्र, गांडूळखत, नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती 
वेदशास्त्राच्या अभ्यासातून मिळालेले ज्ञान व गायींप्रति जिव्हाळा या गोष्टींच्या आधारे वाटेगाव (जि. सांगली) येथील भिडे कुटुंबाने देशी गोपालन सुरू केले. आरोग्यदायी तुपाचे मार्केट अोळखून त्याच्या उत्पादनावर भर दिला. गेल्या १२ वर्षांत त्याला २५०० रुपये प्रतिकिलो दराने राज्याच्या बाहेरही चांगले मार्केट तयार केले. तेवढ्यावर न थांबता गोमूत्र, शेण, जीवामृत, सौंदर्यप्रसाधने आदींच्या उत्पादननिर्मितीतून व्यवसायाचा विस्तारही केला. आज या उत्पादनांना चांगली मागणी येत असल्याचे भिडे सांगतात.
अभिजित डाके 

सांगली जिल्ह्यातील वाटेगाव (ता. वाळवा) परिसरात उसाची मोठी शेती आहे. साखर कारखानाही आहे. याच गावात भिडे कुटूंब राहते. मूळचे रत्नागिरी जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या भिडे कुटुंबांची सुमारे सातवी पिढी आज वाटेगाव येथे राहते. त्यांची एक गुंठाही शेती नाही. कुटुंबातील सध्याच्या पिढीचे प्रतिनिधित्व प्रतीक करतात. त्यांच्या वडिलांचा पूर्वी ट्रक व्यवसाय होता. त्यांनी प्रतीक यांना त्यांच्या नवव्या वर्षांपासून केरळ येथे वेदशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पाठविले होते. सन २००४ पर्यंत प्रतीक यांनी वेदशास्त्राचे धडे घेतले. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच वडिलांनी ट्रक व्यवसाय बंद केला. खिलार देशी गायीचे संगोपन करण्यास सुरवात केली. प्रतीक यांनीही केरळमध्ये ज्या वेदशाळेत शिक्षण घेत होते तेथे गोसंगोपनाचे धडे गिरवले होते. साहजिकच गायींप्रति लळा लागला होता. त्यामुळे दुसऱ्या कोणत्या व्यवसायाचा न करता गोसंगोपनच करण्याचा निर्णय घेतला. आज एका खिलार गायीपासून त्यांच्या गोठ्यात २५ ते ३० गायी मुक्तपणे वावरू लागल्या आहेत. पैकी कांकरेज ६ व उर्वरित गीर आहेत. ‘मोरया गोसंवर्धन’ असे या गोठ्याला नाव दिले आहे. सर्व गायी व पैदासासाठी वळू गुजरातमधून आणले आहेत. शुद्ध वंश असल्याने पुढील पिढीही त्याच गुणवत्तेची घडत आहे.

गोसंगोपनाचा प्रसार अाणि विस्तार 
देशी गायी या शेतकऱ्यांसाठी वरदानच आहेत. त्यांच्यापासून मिळणारी प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याला आर्थिक उन्नती देणारी आहे अशी भिडे यांची विचारसरणी आहे. हे विचार केवळ आपल्यापुरते न ठेवता त्यांचा शेतकऱ्यांत प्रसारदेखील त्यांनी केला आहे. आज १२ वर्षांचा गोसंगोपनातील त्यांचा अनुभव तयार झाला आहे.

देशी तूपनिर्मिती हा मुख्य व्यवसाय 
सन २००७ च्या सुमारास देशी तूपनिर्मिती सुरू केली. आज याच उत्पादनावर सर्वाधिक भर असतो. हे काम चुलीवर मातीच्या भांड्यांमध्ये किंवा दगडी भांड्यांत पारंपरिक पद्धतीनेच केले जाते. त्यामुळेच तुपात सर्व सत्वे उतरतात व त्याची वेगळी चव मिळते असे भिडे म्हणतात. पुणे येथील एम.डी. आयुर्वेद असलेल्या डॉ. रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुपातील आरोग्यदायी घटकांची तपासणी करून घेतली.

तुपाचे मार्केटिंग 
वास्तविक आपणच उत्पादीत मालाचे मार्केटिंग करणे ही कला खूप अवघड आहे. भिडे यांनी त्यात हातखंडा मिळवला आहे. त्यांनी मार्केटिंगसाठी गावातूनच सुरवात केली. गावात अनेकजण "मॉर्निंग वॉक' म्हणजे सकाळी फिरायला जातात. हीच वेळ गाठून चौकात स्टॉल उभा केला. तेथून येणाऱ्या- जाणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधत तुपाचा नमुना दाखवण्यास सुरवात केली. 

अनेक वर्षांपासून गोशाळा सांभाळत असल्याने राज्याबरोबरच परराज्यातूनही अनेक अभ्यास सहली येथे येतात. त्यातील प्रत्येकाला नमुन्यापुरते तूप काही शुल्क आकारून दिले जायचे. पुढे हेच लोक भिडे यांच्या तुपाला आॅर्डर देऊ लागले. तुपाची ‘माउथ पब्लिसिटी’ होऊ लागली. हळूहळू ग्राहकांची संख्या वाढू लागली. आज मुंबई, पुणे, हैद्रराबाद, दिल्ली आदी ठिकाणी भिडे यांच्या देशी गायीच्या तुपाला मागणी आहे. मागणी फोनद्वारे केली जाते. त्यानंतर कुरिअरद्वारे ते पाठविले जाते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तुपाच्या दरात वाढ झाली आहे. सुरवातीला १२०० रुपयांपासून विक्रीला सुरवात केली. आज २५०० रुपये प्रतिकिलो दराने ग्राहक ते विकत घेतात. प्रत्येक गाय दर दिवसा सात लिटर दूध देते. सुमारे २२ ते २५ लिटर दुधापासून एक किलो तूप बनते. महिनाकाठी सुमारे ५० ते ७० किलो तुपाची विक्री होते. सध्या तुपाला मागणी जास्त आहेत. उत्पादन अपुरे पडते आहे. हे लक्षात घेऊन येत्या काळात गायींची पैदास वाढवण्याचा विचार आहे.

अन्य उत्पादनांतून व्यवसाय विस्तार 
केवळ तुपावर अवलंबून राहून व्यवसायवृद्धी होणार नाही हे समजले. त्‍यानंतर गेल्या वर्षापासून नैसर्गिक स्त्रोतांवर आधारित साबण, शाम्पू, दंत मंजन ,धुपकांडी, तेल आदी रासायनिक विरहीत उत्पादनांची निर्मिती व विक्री सुरू केली आहे. या व्यतिरिक्त गोमूत्र अर्क २५० रुपये प्रति लिटर दराने, दशपर्णी अर्क लिटरला ५० रु, गांडूळखत किलोला ३० रुपये, शेण किलोला १० रुपये तसेच जीवामृत पावडर आदींची विक्रीही सुरू केली आहे. शेतकऱ्यांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्षभरात या उत्पादनांची विक्री सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत गेली आहे. काही उत्पादनांना ‘फूड सेफ्टी’ विषयातील केंद्रीय संस्थेचा परवाना घेतला आहे. अन्य उत्पादनांसाठीही संबंधित प्रमाणपत्रे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गोशाळेची जागा 
भिडे यांच्या घरासमोर धर्मनाथ महाराज या नाथ संप्रदायातील महान योगींची समाधी अाहे. येथील ८ एकर जमीन देवस्थानासाठी आहे. यातील ४ एकर जमीन भिडे यांना देशी गोसंगोपन या हेतूसाठी कमी शुल्कात भाडेतत्त्वावर दिली आहे. गायींसाठी लागणारी वैरण, खाद्य आज विकत घ्यावी लागते. मात्र देवस्थानच्या मिळालेल्या जागेत काही गुंठ्यात यंदा यशवंत गवताची लागवड केली आहे. त्यामुळे पुढील काळात ताजी वैरण गायींसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे वैरणीवरील खर्च कमी होईल. एकूण काय आज या ठिकाणी गोशाळेच्या रूपाने नंदनवन उभे राहिले आहे हे मात्र नक्की.

कुटुंबाची साथ 
प्रतीक यांचे वडील उमेश, आई प्रियांका, बहीण प्रतिज्ञा असे भिडे कुटुंबातील सर्व सदस्य गोशाळेची सर्व कामे अत्यंत आनंदाने सांभाळतात.

संपर्क : प्रतीक भिडे - ९४०३७७९९०१








by- agrowon 

Friday, December 23, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: agro special

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल