शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

रुबाबदार सुपरस्टार!


रुबाबदार सुपरस्टार!

नायकासाठी आवश्यक असलेला प्रसन्न चेहरारुबाबदार व्यक्तिमत्त्व,अभिनयाची उत्तम जाण आणि संवादफेकीचे कौशल्य हा सुपरस्टारबनण्यासाठीचा सगळाच मालमसाला विनोद खन्नांकडे ठासून भरलेलाहोताउमेदीच्या काळात विनोद खन्ना तरुणींच्या स्वप्नातील जणूराजकुमारच होतात्यामुळेच कुठेही गेला तरी त्याच्याभोवती तरुणींचागराडाच पडायचाहाच देखणा आणि रुबाबदार विनोद खन्ना आतास्वर्गस्थ झाला आहेतेथील अप्सराही आता सुपरस्टार विनोद खन्नाचीवाटच बघत असतील!
बॉलीवूडचा देखणा आणि प्रसन्न अभिनेता हरपला. सुपरस्टार विनोद खन्ना यांची गेले काही दिवस मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. काळ बनून आलेल्या कॅन्सरसारख्या असाध्य आजाराने विनोद खन्ना यांच्याभोवती आपला पाश टाकला आणि या स्टायलिश हीरोला आयुष्याच्या बहुरंगी पडद्यावरून काळाच्या पडद्याआड जावे लागले. विनोद खन्ना म्हणजे जणू हिंदी चित्रपटसृष्टीतील मदनाचा पुतळाच! दिसण्यापासून ते अभिनयापर्यंत परमेश्वराने त्यांना सारे काही भरभरून दिले होते. विनोद खन्नांचे नाव उच्चारल्याबरोबर डोळय़ासमोर येते ती त्यांची  मजबूत शरीरयष्टी.  गौरवर्णीय सतेज कांती, सदैव क्लीन शेव्हड चेहरा, त्यावर उठून दिसणारे धारदार नाक, गोऱया गालांवर विसावलेले काळय़ाशार केसांचे लांब आणि रुंद कल्ले, सत्तरच्या दशकातील कान झाकणारी स्टेप कट आणि विशाल भालप्रदेशावरून भुवयांपर्यंत रेंगाळणारे झुबकेदार केस असे एकंदर हे देखणे रूप होते. अलीकडे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची जी छबी जगासमोर आली तो हा विनोद खन्ना नव्हताच मुळी! तरणाबांड, आकर्षक विनोद खन्नास बघण्याची सवय लागलेल्या डोळय़ांना हॉस्पिटलच्या पोशाखातील कॅन्सरने खंगवलेला कृश आणि थकलेला विनोद खन्ना कसा बघवेल? विनोद खन्नाच्या अस्सल चाहत्यांनी ते खिन्न छायाचित्र तत्काळ डिलिट करून त्याचे तेच जुने देखणे रूप आपल्या मनःपटलावर कायमचे कोरून ठेवले. विनोद खन्नाचे जीवन आणि एकूणच करीअर हिंदी चित्रपटाच्या कथेला साजेसेच होते, असे म्हणावे लागेल. आता पाकिस्तानात असलेल्या पेशावरमध्ये
सधन व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या
विनोद खन्ना यांना खरे तर इंजिनीअर व्हायचे होते. फाळणीनंतर खन्ना
कुटुंबीयांनी पाकिस्तानातील गाशा गुंडाळून थेट मुंबई गाठली. कॉमर्स गॅज्युएट होऊन विनोदने आपला टेक्स्टाईलचा व्यवसाय सांभाळावा असे त्याच्या वडिलांचे मत होते. मात्र विनोद खन्ना यांची एका पार्टीत सुनील दत्त यांच्याशी भेट झाली आणि अभियंता होता होता ते अभिनेता बनले. आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि उंचापुरा बांधा बघून सुनील दत्त यांनी विनोद खन्ना यांना ‘मन का मीत’ या चित्रपटात आपल्या भावाची भूमिका देऊ केली. विनोदने ही ऑफर स्वीकारल्याचे कळताच वडिलांचे पित्त खवळले. दोन वर्षांत इंडस्ट्रीत जम बसला नाही तर निमूटपणे व्यवसाय सांभाळावा लागेल, असे वडिलांनी बजावले आणि त्या अटीवर विनोद खन्ना यांची बॉलीवुडमध्ये एण्ट्री झाली. प्रारंभिक काळात काही चित्रपटांत खलनायकाच्या भूमिका केल्यानंतर विनोद खन्ना ‘हीरो’ म्हणून उदयास आले ते १९७१ साली. सुनील दत्त आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘रेश्मा और शेरा’ हा चित्रपट त्यांनी केला. या चित्रपटातील अभिनयाबद्दल विनोद खन्नांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. याच वर्षात त्यांना नवीन दहा चित्रपट मिळाले आणि त्यांचे आयुष्यच बदलून गेले. नायकासाठी आवश्यक असलेला प्रसन्न चेहरा, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, अभिनयाची उत्तम जाण आणि संवादफेकीचे कौशल्य हा सुपरस्टार बनण्यासाठीचा सगळाच मालमसाला विनोद खन्नांकडे ठासून भरलेला होता. त्यामुळेच निर्मात्यांच्या दारात त्यांना कधी जावे लागले नाही. किंबहुना निर्मातेच त्यांच्या घरी चित्रपट ‘साईन’ करण्यासाठी रांग लावत असत. एकदा तर एकाच आठवडय़ात त्यांनी तब्बल १५ चित्रपट ‘साईन’ केले. एकाहून अधिक अभिनेते, नायक घेऊन चित्रपट काढण्याच्या त्या जमान्यात विनोद खन्ना हे एक
सर्वोत्तम चलनी नाणे
होते. अमिताभ बच्चन, सुनील दत्त, राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी
अनेक चित्रपट केले. खास करून महानायक अमिताभ बच्चनबरोबर त्यांची जोडी अधिकच गाजली. ‘अमर अकबर ऍन्थोनी’, ‘हेराफेरी’, ‘खून पसिना’, ‘मुकद्दर का सिकंदर’ या सुपरहिट चित्रपटांतील अमिताभ-विनोदच्या जोडगोळीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. फिल्म इंडस्ट्रीतील करीअर असे ऐन भरात असतानाच विनोद खन्ना आध्यात्मिक गुरू ओशो रजनीश यांच्या कच्छपी लागले. ओशोंच्या पुण्यातील आश्रमात भांडी घासण्याचे आणि माळी म्हणूनही त्यांनी काम केले. ओशोंच्या अतिनादामुळे त्यांचा संसारही मोडला. पत्नी गीतांजलीने घटस्फोट दिला आणि दोन मुलांसह ती वेगळी झाली. पाच वर्षांनंतर ओशोंच्या संमोहनातून बाहेर पडल्यानंतर विनोद खन्ना यांनी पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीत पाय रोवले. दुसरा संसार थाटला. ‘दयावान’सारखा सुपरहिट चित्रपट दिला. चित्रपटातील दुसरी इनिंग गाजवत असतानाच विनोद खन्ना राजकारणात उतरले. पंजाबातल्या गुरदासपूरमधून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले. वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. एवढय़ा सगळय़ा घडामोडी एकाच आयुष्यात घडाव्यात, हे विनोद खन्नांचे विधीलिखितच असावे. उमेदीच्या काळात विनोद खन्ना तरुणींच्या स्वप्नातील जणू राजकुमारच होता. त्यामुळेच कुठेही गेला तरी त्याच्याभोवती तरुणींचा गराडाच पडायचा. हाच देखणा आणि रुबाबदार विनोद खन्ना आता स्वर्गस्थ झाला आहे. तेथील अप्सराही आता सुपरस्टार विनोद खन्नाची वाटच बघत असतील!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल