सामना ऑनलाईन, मुंबई
विनोद खन्ना यांचा जन्म एका व्यापारी कुटुंबात ६ ऑक्टोबर १९४६ रोजी पेशावरमध्ये झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईत आले. शाळेत असताना शिक्षिकेने जबरदस्ती त्यांना नाटकात भाग घेण्यास भाग पाडले आणि तिथूनच त्यांच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली. बॉलीवूडचा हॅण्डसम हीरो अशी त्यांची ओळख असली तरी त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात खलनायक म्हणून केली होती. १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या चित्रपटात त्यांनी वठवलेली खलनायकाची भूमिका आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. विशेष म्हणजे सुनील दत्त यांनी आपल्या भावाला हीरो म्हणून लाँच करण्यासाठी हा चित्रपट तयार केला होता. पण विनोद खन्ना यांनी बाजी मारली. पहिल्या चित्रपटापासूनच विनोद खन्ना यांना चांगला प्रतिसाद मिळाला. खलनायकाच्या भूमिकेतही ते नायकापेक्षा जास्त भाव खाऊन जायचे. ‘मेरा गाव मेरा देस’मधील त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेवरही अनेक तरुणी फिदा झाल्या होत्या.
१९७१ मध्ये ‘हम तुम और को’ हा त्यांचा पहिला सोलो चित्रपट आला. त्याच वर्षी त्यांनी गीतांजलीशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर त्यांना राहुल व अक्षय अशी दोन मुले झाली. एकेकाळी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना तोडीला तोड देणारा अभिनेता म्हणून विनोद खन्ना यांची ओळख होती. अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्या पडद्यावरील जोडीला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली होती. ‘हेराफेरी’, ‘खून पसीना’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटांत ही जोडी एकत्र झळकली होती. आपल्या कारकीर्दीत विनोद खन्ना यांनी ‘द बर्निंग ट्रेन’, ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘रेश्मा और शेरा’, ‘दयावान’, ‘हेराफेरी’ असे अनेक हिट चित्रपट दिले. अगदी अलीकडच्या ‘दबंग’ या चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘एक थी रानी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
राजकारणातही सक्रिय
अभिनयासोबत विनोद खन्ना हे राजकारणातही यशस्वी झाले होते. १९९७ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रकेश केला. पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून ते चार वेळा खासदार म्हणून निवडून आले. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्रीपदही त्यांनी भूषवले होते.
ओशोंमुळे झाले होते प्रभावित
१९७५ मध्ये विनोद खन्ना ओशो रजनीश यांच्या संपर्कात आले. १९८० मध्ये त्यांनी बॉलीवूडमधून संन्यास घेतला आणि अमेरिकेच्या ओशो आश्रमात गेले. त्यांनी संन्यासी बनण्याची घोषणा केली. विनोद खन्ना यांच्या संन्यासानंतर पत्नी गीतांजली एकटी पडली आणि तिने त्यांच्याशी घटस्फोट घेतला. पाच वर्षांनंतर आश्रमच्या जीवनाला कंटाळून ते पुन्हा अमेरिकेहून मुंबईत परतले आणि पुन्हा बॉलीवूडमध्ये दमदार कमबॅक केले. बॉलीवूडमध्ये परतल्यावर त्यांनी ‘इन्साफ’ आणि ‘सत्यमेव जयते’ हे हिट सिनेमेही दिले. त्यानंतर १९९० मध्ये त्यांनी कविताशी लग्न केले.
बाहुबली २ चे भव्य प्रिमियर रद्द !
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनामुळे चाहत्यांना प्रतिक्षा लागलेल्या बाहुबली २ चित्रपटाचा भव्यदिव्य प्रीमिअर रद्द करण्यात आला आहे. करण जोहर याने ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते विनोद खन्ना यांच्या सन्मानार्थ बाहुबलीच्या संपूर्ण टीमने प्रीमिअर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे’. असे ट्विट करणने केले आहे.
…अन् बिग बींनी अर्ध्यातच सोडली मुलाखत
‘अमर अकबर अँथनी’ मधील ‘अमर’ म्हणजेच अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाची बातमी महानायक अमिताभ बच्चन यांना कळली त्यावेळी ते ‘सरकार ३’ या सिनेमाच्या निमित्ताने पत्रकारांना मुलाखत देत होते. ही बातमी कळताच विनोद यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी अमिताभ यांनी ही मुलाखत अर्ध्यावर सोडली.
- विनोद खन्ना यांनी खलनायक, नायक, सहअभिनेता ते चरित्र अभिनेता अशा भूमिका साकारत बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यात मोठे योगदान देणारे आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे महान क्यक्तिमत्त्क आज गमावले आहे अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहीली
- मिस यू अमर ! तुझ्यासोबत घालवलेले क्षण कधीही विसरता येणार नाही असं ट्विट करत ऋषी कपूर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहीली
- तर संजय दत्तने म्हटलंय की विनोद खन्ना यांची एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. बॉलीवूडमधल्या महान अभिनेत्यांपैकी ते एक आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
- विनोद खन्ना यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या हेमा मालिनी यांनी म्हटलं की एका महान कलाकाराला आणि तितक्याच प्रेमळ स्वभावाच्या व्यक्तीला आज बॉलीवूडने गमावले आहे. ते उत्कृष्ट सहकलाकारदेखील होते. ‘एक थी राणी’ हा आम्ही एकत्र काम केलेला शेवटचा चित्रपट होता.
- विनोद खन्ना यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याची शक्ती देवो असं अक्षय कुमारने म्हटलं आहे.
by - samana
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा