शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

विनोद खन्ना संन्याशाप्रमाणे राहत होते ओशो आश्रमात




  • ऑनलाइन लोकमत
    पुणे, दि. 27 - ऐन बहरात असलेली कारकिर्द सोडून विनोद खन्ना ओशो रजनीश यांचे भक्त झाले. पुण्यातील आश्रमात १९७५ ते १९८१ पर्यंत ते अगदी सामान्य संन्याशाप्रमाणे राहत होते. माळीकामही करत होते.
    ओशो आश्रमातील विनोद खन्ना यांच्या सहकारी आणि ओशो टाईम्सच्या संपादक मा अमृत साधना आठवणी सांगताना म्हणाल्या , ओशोंनी विनोद खन्ना यांना आश्रमातील खासगी उद्यानामध्ये माळीकाम करण्यास सांगितले. एका स्टारचा सारा अहंकार विसर्जित व्हावा असा ओशोंचा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला. एका लहानशा खोलीमध्ये त्यांना राहण्यासाठी जागा देण्यात आली. त्या खोलीमध्ये या आधी दोन संन्याशांचा मृत्यु झाला आहे, असे अन्य संन्यासी विनोद यांना सांगत. ओशोंची मृत्युविषयी जी शिकवण आहे, ती विनोद जगले. नंतर मृत्यु हा शब्द ऐकल्यावर विनोद खळखळून हसत असत.
    त्या म्हणाल्या,   विनोद खन्ना ( स्वामी विनोद भारती) ओशो यांचे परम भक्त होते. त्यांना ध्यानधारणेत खूप रस होता. खूप प्रेमळ माणूस होता.सर्वांशी खेळीमेळीने राहत. त्यांना आश्रमातील लाईफ स्टाईल आवडत असे. ते आश्रम सोडून गेल्यानंतर परत आले नाहीत, मात्र अंतर्मनातून ते ओशोंच्या कायमच सान्निध्यात राहिले. १९७५ ते १९८१ दरम्यान विनोद खन्ना ओशो आश्रमात होते. विजय आनंद, महेश भट, सुभाष घई हेही त्याच वेळी आश्रमात येत असत. चित्रपटांची कामे आटोपून ही मंडळी आश्रमात राहण्यासाठी येत. ओशोंच्या माऊंट अबू येथील शिबिरामध्ये सहभागी झाल्यानंतर विनोद खन्ना यांनी पूर्णवेळ ओशोंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. ओशोंनी त्यांना संमती दिली.
    मा अमृत साधना म्हणाल्या,  विनोद खन्ना यांना ओशो यांच्या शब्दांनी आयुष्यातील ज्वलंत वास्तवाचा परिचय करवून दिला. वयाच्या आठव्या वर्षापासूनच साधू, संन्यासी यांच्याविषयी विनोद यांना आकर्षण होते. पुढे ते ओशोंची प्रवचने ऐकू लागले. त्यांचे करिअर यशाच्या शिखरावर असताना, वयाच्या २६/२७ व्या वर्षी त्यांच्या घरात आई, बहिण यांचा लागोपाठ मृत्यु झाला. विनोद यांनाही मृत्युचे भय वाटू लागले.ओशोंच्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी या विभुतीशी आपली अनेक जन्मांची ओळख आहे, असे त्यांना वाटले.लार्जर दॅन लाईफचा अनुभव आला. आपल्या स्वत:च्या घरी परतल्यासारखे वाटले. 
    मा अमृत साधना म्हणाल्या, वेगवेगळ्या ध्यानपध्दतींमध्ये विनोद खन्ना सहभागी होत. आश्रमातील सामान्य संन्याशासारखीच त्यांची राहणी होती. त्यांना ध्यानधारणेत खूप रस होता.१९८१ मध्ये ओशो अमेरिकेत गेले, तेव्हा विनोद खन्ना त्यांच्यासोबत तिकडे गेले. दोन वर्षे तेथील आश्रमात ते होते. १९८४ मध्ये ओशोंच्या तेथील आश्रमाबाबत वाद उत्पन्न झाला. ओशो वलर््ड टुरवर निघून गेले. त्यानंतर विनोद खन्ना पुन्हा मुंबईत परतले. त्यानंतर ते चित्रपटसृष्टीत व्यग्र झाले. राजकारणात गेले. नंतर ते ओशो आश्रमात आले नाहीत. मात्र आतून ते ओशोंच्या कायमच सान्निध्यात राहिले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल