आपल्या शरीरात विविध प्रकारच्या रंगांचे रेणू असतात. त्यापैकी मेलॅनिन या रंगद्रव्याने काळा अगर लाल रंग येतो. हे मेलॅनिन निरोगी त्वचेत, केसात, शरीराच्या आतील भागातील आवरणे- अस्तरे यात किंवा नखात असते. ते पुरेशा प्रमाणात नसले, अजिबात नसले किंवा झपाट्याने नष्ट पावले तर त्या भागातील रंगद्रव्याचा अभाव जाणवतो. असा अभाव जन्मजात अथवा आयुष्यात नंतर केव्हाही उत्पन्न झालेला असू शकतो. अनेकदा अशा भागामुळे व्यक्तीला कोणताही फरक जाणवत नाही, परंतु काही वेळा रुग्णाला तो भाग निरामय नसल्याचे जाणवते. आनुवंशिकतूेन आलेल्या जनुकीय दोषांमुळे असे होणे शक्य आहे. आहारातील त्रुटींचादेखील असा परिणाम होणे शक्य आहे. काही रसायने किंवा औषधांचे हे दुष्परिणाम असू शकतात. एखाद्या भागावर दाह होण्यानेदेखील असा अभाव होतो. जंतू, जीवाणू अथवा बुरशीच्या संसर्गाचा हा परिणाम असू शकतो. शारीरिक इजा किंवा जखमेमुळेदेखील असे डाग होऊ शकतात. थोडक्यात, पांढरे डाग येण्याची बरीच कारणे असू शकतात. त्वचेवर पांढरे डाग येण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे "कोड‘ येणे. सुरवातीला एखाद्या भागावर त्वचेचा रंग बदलतो. एक ते 20 सेंटिमीटर्स चौरस भागावर हा डाग असतो. या भागाच्या कडा अनेकदा अधीन गडद सावळ्या किंवा काळ्या वर्णाच्या असतात. बहुतेक वेळा शरीराच्या दोन्ही बाजूंना (उजव्या आणि डाव्या) एकसारख्या ठिकाणीच हे डाग उठू लागतात. सहसा शरीराच्या उघड्या भागावर आधी येतात. ज्या भागात त्वचेची घडी पडते तेथे येण्याचे प्रमाण जास्त असते. डोळे, नाक, तोंड, पार्श्वभागातील घडी येथे प्रमाण जास्त असते. शरीरातील हाडे जेथे सहज हाताला लागतात त्या भागावरही असे डाग आधी येतात. हे डाग वाढत जातात व एकमेकांत मिसळतात. ते शरीरभर पसरतात व केसांच्या मुळांवर परिणाम होऊन केसही पांढरे होतात. भुवया व पापण्यांचे केसही असे रंगहीन बनू शकतात. या सर्व भागात आपोआप रंगद्रव्याची निर्मितीदेखील होऊ शकते. चंद्राला खळे पडते त्याप्रमाणे कधी कधी काळ्या किंवा लाल तिळाच्या बाजूने गोलाकार कोडाची सुरवात होऊ शकते. कोड ही रंगाच्या रेणूच्या अभावाची एक स्थिती आहे. या स्थितीमुळे कोणत्याही शरीरक्रियेत बिघाड निर्माण होत नाही. कोडाप्रमाणे दिसणारे, परंतु न वाढणारे डाग त्वचेवर येऊ शकतात, यांना "इडियोपॅथिक गट्टे‘ म्हणतात. असे गोल किंवा लांबट गोल पांढरे डाग सहसा हातावर किवा पायावर येतात. हे डाग वाढत नाहीत आणि हा कोडाचा प्रकार नव्हे. संपूर्ण शरीरावर जन्मापासून असणाऱ्या "कोडा‘ला "आल्बिनिझम्‘ म्हणतात. हा विकार रंगगुणसूत्रांतील दोषामुळे आनुवंशिकतेतून आलेला असतो. त्वचा, केस आणि डोळे येथे कोठेही मेलॅनिन नसते. अगदी पांढऱ्या रंगापासून ते किंचित सावळ्या रंगाकडे झुकणाऱ्या वर्णापर्यंत त्वचेचा रंग असू शकतो. परंतु डोळ्यातील बाहुलीला मात्र रंग नसतो. हे डोळे स्थिर राहू शकत नाहीत. नजर तीक्ष्ण नसते. किंचित तिरळेपण आढळते. नेत्रपटलासदेखील रंग नसतो. मेलॅनिन रंगाच्या अभावामुळे त्वचेला सूर्यकिरणांचा अपाय होणे संभवते. ही काळजी आजन्म घ्यावी लागते. अशा व्यक्तींना कायम सनक्लॉथ वापरावे लागतात. त्वचा आच्छादलेली ठेवावी लागते. डोळ्यांना काळा चष्मा वापरावा लागतो. डोक्यावर टोपी ठेवावी लागते. त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता मोठी असते. त्वचा मानली तर तेथील मेलॅनोन्साईट पेशी अकार्यक्षम होतात. काही काळ अथवा कायम पांढरा डाग पडतो. आपल्या प्रतिकारशक्तीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे परकीय रेणूंना नष्ट करण्याकरिता त्या रेणूंविरुद्ध प्रथिने (प्रतिपिडे) निर्माण करणे. या कार्यात बिघाड झाल्याने दुर्दैवाने स्वतःच्या शरीरातील पेशींच्या विरुद्ध प्रतिपिडे तयार होऊ लागतात. अशा प्रकारच्या आजारांना (ऑटो- इम्यून डिस्ऑर्डर्स) म्हणतात. या आजारांपैकी काहींचा परिणाम त्वचेवर होतो. डिस्कॉईड व्यूपस एरिथिमॅटॉलस) हा असाच आजार होय. त्वचेवर दाह होऊन पुरळ उठते व तेथील त्वचेचा रंग बदलतो. त्वचेवर डाग व चट्टे उठू लागतात. हे चट्टे गुलाबी किंवा जांभळट रंगाचे असतात. त्यावर पिवळ्या किंवा राखी रंगाची खपली येते. त्वचेवर खपल्या दिसू लागतात. नाक व शेजारचा गालांचा भाग येथे बहुतेक रुग्णांना आजार होतोच. आजार बरा झाला तरी त्वचेवर व्रण दिसतात. डोक्यावरच्या त्वचेत झालेल्या आजारामुळे तिथे केस गळून पडतात (टक्कल पडते).
त्वचेवर कोणत्याही कारणाने दाह झाला तरी मागे राहणाऱ्या व्रणामुळे तेथे पांढरा डाग कायम राहतो. अनेक विषाणूंमुळे असे डाग चेहऱ्यावर राहतात. अशा त्वचेच्या आजारांपैकी बुरशीमुळे होणारा आजार नेहमी आढळतो. त्याला "शिबे‘ म्हणतात. त्वचेवर लहान लहान खपल्या आल्यासारखी त्वचा होते. छातीच्या वरच्या भागात, मानेवर, दंडावर हा आजार अनेकांना होतो. त्वचेचा रंग हलका अथवा गडद होतो. सहसा गौरवर्णाच्या व्यक्तींमध्ये त्वचा काळवंडते. आता भारतातून महारोग या आजाराचे उच्चाटन होत आले आहे. महारोग एका जीवाणूपासून होतो ः मायकोबॅक्टेरियम लेप्री. त्वचेवर पांढरे चट्टे उठतात. तेथील वेदनेची संवेदना बधिर होते. आता या विकारावर प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत. योग्य वेळी उपचार झाल्यास तो पूर्ण बरा होऊ शकतो. काही औषधांमुळे केस व त्वचेच्या रंगावर परिणाम होतो. मलेरियासाठी क्लोरोक्वीन हे औषध वापरले जात असे. त्यामुळे भुवया व पापण्यांच्या केसांचा रंग भुरा होणे संभवते. त्याचप्रमाणे प्लॅस्टिक आणि विविध चिकटवणाऱ्या औषधांत वापरलेल्या रसायनांमुळे त्वचेचा रंग जाणे शक्य असते.
- डॉ. ह. वि. सरदेसाई
"Sakal"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा