उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सुवर्णकाळ येईल - मनोहर जोशी, ज्येष्ठ शिवसेना नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक आगळावेगळा माणूस. नेतृत्व, वक्तृत्व आणि स्वभाव हे सर्वसामान्यांपेक्षा वेगळेच. त्यांना गेली ४५ वर्षे जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यांचा स्वभाव अतिशय विनोदी होता आणि गप्पा मारताना किती वेळ निघून गेला, हे कधी कळायचे नाही. ते खळखळून हसताना नेहमी टाळी मागायचे. पक्षाचे प्रमुख असले तरी त्यांनी मित्रत्वाचे संबंध ठेवले होते. पण मी कधी पायरी सोडली नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव थोडा गंभीर वाटला तरी तेही विनोदी आहेत. उद्धव आणि राज यांचा स्वभाव, कामाची पद्धत त्यांच्या अगदी लहानपणापासून मी जवळून पाहिली आहे. त्यांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे ते दोघेही मोठय़ा माणसांचा आदर ठेवतात. त्यांनी कधी अपमान केला आहे, असा प्रसंग एकदाही घडला नाही. बाळासाहेब हे अतिशय मोकळ्या मनाचे आणि बिनधास्त बोलून जात. पण उद्धवजींना ओळखणे थोडे कठीण आहे. त्यांचा स्वभाव गंभीर आणि बोलणे तोलूनमापून आहे. बाळासाहेबांप्रमाणेच उद्धवजींचा स्वभावही धाडसी व संकटाला तोंड देण्याचा आहे. शिवसेनाप्रमुखांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे, असे मी म्हणणार नाही. कारण जेव्हा मोकळी जागा असते, तेव्हा पोकळी निर्माण झाली, असे आपण म्हणतो. बाळासाहेबांनी उद्धवजींच्या रूपाने समर्थ नेतृत्व पक्षाला आधीच दिले आहे. प्रबोधनकार, बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य यांच्यात एक समान धागा म्हणजे सर्वानाच राजकारणापेक्षा समाजसेवा करणे अधिक आवडते. शिवसेनाप्रमुखांनी जातीव्यवस्थेविरुद्ध काम केले. त्यांनी शिवसेनेत कधी जातीला महत्त्व दिले नाही. त्यामुळे समाजकारणाच्या भक्कम पायावर ठाकरेंचे नेतृत्व उभे असून त्याच जोरावर उद्धव ठाकरेही पक्षाला बळ देतील. बाळासाहेबांनी जसे नेतृत्व आणि ध्येयवाद दिला, तसे होण्यासाठी वेळ लागतो, हे लक्षात घ्यायला हवे. नैराश्य येऊ देता कामा नये. सतत विद्यार्थ्यांच्या भूमिकेत राहून शिकले पाहिजे. त्यासाठी सर्वावर एक विश्वास लागतो. उद्धवजी सर्वाना सांभाळून पक्षाला खंबीर नेतृत्व देतील, अशी माझी खात्री आहे. त्यामुळे पुढील काळात एकदाच नाही, तर सलग तीनदा शिवसेनेला सत्ता मिळेल, असा मला आत्मविश्वास आहे. बाळासाहेबही तसे म्हणत. हे कशाच्या जोरावर म्हणता, असे मी विचारल्यावर बाळासाहेब म्हणाले होते, आत्मविश्वास आणि जिद्द याच्या जोरावर माणूस काहीही जिंकू शकतो. त्यांचा कृतीवर विश्वास होता. उद्धवजींना काही गोष्टींवर भर द्यावा लागेल. वेळ पाळणे, शिस्त, कोणत्या कामासाठी किती वेळ द्यायचा, याचा विचार करावा लागेल. पण पुढील काही वर्षांत उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सुवर्णकाळ येईल, याविषयी माझ्या मनात शंका नाही.
उद्धव व राजने एकत्र यावे हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली - गोपीनाथ मुंडे, भाजपचे लोकसभेतील उपनेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे नुसतेच शिवसेनेचे नव्हे तर युतीचे नुकसान झाले आहे. भाजप-शिवसेना युतीचे बाळासाहेब शिल्पकार होते. युतीत अनेकदा कटुता निर्माण व्हायची, पण बाळासाहेबांचा शब्द आम्हा सर्वासाठी अंतिम असायचा. शिवसैनिकांकरिता बाळासाहेब म्हणजे आधारवडच. बाळासाहेब आणि शिवसैनिक यांचे नातेच आगळेवेगळे होते. बाळासाहेबांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बाळासाहेबांच्या निधनाने शिवसैनिकांना अतिव दु:ख झाले असले तरी शिवसैनिक खचून जाणार नाही. उलट शिवसैनिक मोठय़ा जोमाने कामाला लागेल. आज बाळासाहेब हयात नसले तरी त्यांच्यावरील निष्ठा तसूभरही कमी होणार नाही. शिवसेनेची ताकद कायम राहील. शिवसेना कमकुवत होईल, असे आपल्याला तरी वाटत नाही. सध्या दोन वेगवेगळ्या सेना आहेत. पण उद्धव आणि राज या दोघांनी एकत्र यावे हीच सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे. ही भूमिका मी सातत्याने मांडत आलो आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिवसेनाप्रमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल. शिवसेनेचा भगवा दिमाखाने फडकत राहील. मला तरी शिवसेनेचे भवितव्य उज्ज्वल वाटते.
शिवसेनेचे भवितव्य काळच ठरवेल - माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तरीही शिवसेनेच्या वाटचालीवर लगेचच काही परिणाम होईल, असे वाटत नाही. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे भवितव्य काय? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. शिवसेना आणि मनसे या दोन सेना सध्या आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेनेला यापूर्वीच आव्हान दिले आहे. यामुळे बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेचे नक्की काय होईल हा अंदाज वर्तविणे कठीण आहे. शिवसेनेचे भवितव्य काळच ठरवेल.
उद्धवजींचे नेतृत्व शिवसेनेला पुढे नेईल - सुधीर जोशी, ज्येष्ठ शिवसेना नेते बाळासाहेबांचे नेतृत्व हे एक खंबीर व मजबूत नेतृत्व होते. त्यांचे विचार जहाल आणि ज्वलंत होते. उद्धव ठाकरेंचा स्वभाव थोडा सौम्य आहे. पण वेळ पडली तर तेही आक्रमक होतील, असा मला विश्वास आहे. बाळासाहेब सर्वाना विश्वासात घेऊन त्यांची मते विचारत होते. त्यानंतर ते स्वत: निर्णय घेत असत. उद्धवजीही सर्वाना विश्वासात घेऊन काम करतील. बाळासाहेबांसारखा नेता पुन्हा होणे शक्य नसते. पण उद्धवजींचे नेतृत्व शिवसेनेला पुढे नेईल, अशी मला खात्री आहे.
शिवसेना संपणार नाही - छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यातून निघून गेले असले तरी, शिवसेना राहील. कोणताही राजकीय पक्ष, कोणतीही संघटना, अशी सहजासहजी किंवा नेत्याच्या निधनामुळे अशी ताबडतोब संपत नसते. शिवसेनाही संपणार नाही, असे मला वाटते.निश्चयाचा महामेरू असे बाळासाहेबांचे नेतृत्व होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मी २५ वर्षे शिवसेनेत काम केले. तडजोड हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. त्यांचे सडेतोड बोलणेच भावणारे असायचे. त्यांनी विधानसभेवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला आणि तो खरा करून दाखविला. महाराष्ट्रात त्यांनी आपल्या पक्षाचे राज्य आणले. लोकसभेतही शिवसेनेचे खासदार निवडून गेले, मंत्री झाले. मंडल आयोगाच्या प्रश्नावर मी शिवसेना सोडली, त्याचा पश्चात्ताप नाही, परंतु एक कुटुंबप्रमुख म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली वाढलो, त्या बाळासाहेबांच्या प्रेमाला मुकलो त्याची खंत वाटते. बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना कशी असेल, यावर लगेच काही बोलणे बरोबर होणार नाही. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येतील का, असा एक प्रश्न विचारला जात आहे. राज यांनी स्वतंत्र पक्ष काढला आहे. कदाचित निवडणुकांसाठी दोघेजण एकत्र येऊ शकतात, परंतु पुन्हा एका संघटनेत एकत्र येणे कठीण वाटते. बाळासाहेबांसारखे नेतृत्व नसताना शिवसेनेची पुढील वाटचाल कशी असेल यावर आजच काही बोलणे बरोबर होणार नाही, थोडी वाट पाहावी लागेल.
सच्चा शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या मागे उभा राहील - रामदास आठवले, अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. बाळासाहेब हे तमाम शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत होते. ती पोकळी आता भरून निघणार नाही. परंतु सच्चा शिवसैनिक बाळासाहेबांचे खरे वारसदार उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील, याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव व आदित्य यांच्या मागे उभे राहण्याचे शिवसैनिकांना आवाहन केले होते. बाळासाहेबांवर प्रेम करणारा शिवसैनिक त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देईल. विधानसभेवर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचा भगवा व निळा झेंडा फडकविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न साकार करण्यासाठी शिवसैनिक व शिनसेनेचा चाहता वर्ग उद्धव ठाकरेंना मनापासून साथ देतील. बाळासाहेबांपेक्षा उद्धव यांची नेतृत्वशैली वेगळी आहे. प्रत्येक नेत्याची शैली निराळीच असते. या पुढच्या काळात शिवसेनेला बाळासाहेबांची कमतरता जाणवणार आहे. उद्धव ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करतील. बाळासाहेब आजारी असल्यापासून त्यांनीच पक्षाची सारी धुरा संभाळली आहे. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची, महायुतीची पुढील वाटचालही मजबूत राहील, यात शंका नाही.
उद्धव-राज एकत्र येणे कठीण, पण.. - विनोद तावडे, विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषदशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत, पंडित जवाहरलाल नेहरू असोत वा इंदिरा गांधी या नेत्यांनी त्यांच्या आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्या त्या काळात त्यांच्या पक्षाला जी उंची प्राप्त करून दिली, जे नेतृत्व दिले ते त्यांच्या पश्चात कोणीही देऊ शकलेले नाही. त्यामुळे हे पक्षही तसे राहू शकलेले नाहीत. या नेत्यांसारखी व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्वही समाजात तशी विरळ आणि अपवादात्मकच असतात. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख हे राजकीय क्षितिजावरील आगळेवेगळे नेतृत्व होते. बाळासाहेबांचे शिवेसेनेतील अढळ स्थान विचारात घेता त्यांच्या जाण्याने पक्षात निर्माण झालेली पोकळी कोणीच भरून काढू शकणार नाही. मात्र बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले, जन्मापासूनच त्यांची कार्यशैली आणि अनुभवाची शिदोरी जवळ बाळगणारे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ही धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे काय होणार असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. मात्र बाळासाहेबांच्या नंतरही शिवसेना तितक्यात मजबूतपणे कार्यरत राहील. ठाकरे यांनी संघटनेची ज्या पद्धतीने बांधणी केली, तिचा विचार केला तर हा पक्ष त्यांच्या पश्चातही अधिक मजबूतपणे काम करीत राहील, तिला कोणीही तडा देऊ शकणार नाही याची काळजी जाण्यापूर्वीच बाळासाहेबांनी घेतलेली आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र यावीत अशी सर्वाची इच्छा असून बाळासाहेबांनंतर पुन्हा एकदा हाच मुद्दा चर्चेत आला आहे. मला मात्र तशी शक्यता वाटत नाही. उद्धव आणि राज यांनी एकत्र येऊन राज्यावर पुन्हा भगवा फडकविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न साकारावे अशी सर्वाचीच इच्छा आहे. मलाही तसेच वाटते, जेणेकरून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पूर्ण निप्पात करता येईल. मात्र आजच्या राजकीय परिस्थितीत हे स्वप्न सत्यात उतरेल आणि दोन्ही भाऊ एकत्र येतील असे वाटत नाही. तशी शक्यताही दिसत नाही. कौटुंबिक जिव्हाळा म्हणून गेल्या काही दिवसांत दोन्ही भाऊ एकत्र आले पुढेही येत राहतील, मात्र राजकारण हे त्या पलीकडील असल्याने आणि दोघांचेही राजकीय मुद्दे वेगळे असल्याने सद्यस्थितीत हे दोन्ही बंधू एकत्र येतील असे मला तरी वाटत नाही. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेचा फायदा उठविण्याचा प्रयत्न काँग्रेस विशेषत: राष्ट्रवादीकडून होऊ शकतो. ठाकरे यांच्यानंतर शिवसेना कमकुवत झाल्याचे चित्र निर्माण करून खासदार, आमदार यांना तोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र त्यांच्या आमिषाला कोणी बळी पडलेच तर तो त्यांचा आत्मघात ठरू शकतो आणि साहेबांवर जिवापाड प्रेम करणारे त्यांचे शिलेदार असा वाईट विचार करतील असेही वाटत नाही. शिवसेनेची बांधणी ही मुळापासून घट्ट असून बाळासाहेबांचे आचार आणि विचार प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात घट्ट रुजलेले असल्याने त्यांच्या पश्चात शिवसेनेचे काय होईल असा सवाल केला जात असला तरी याच विचारांची घट्ट वीण शिवसेनेला कायम एकत्र ठेवील, त्यामुळे शिवेसेनेला हादरवणे सोपे नाही याचे भान सर्वानीच ठेवायला हवे. बाळासाहेबांचा दूरदृष्टीपणा, मनाचा मोकळेपणा, विचारांची स्पष्टता आणि बेधडक वृत्ती ही सगळीच वैशिष्टय़ सध्याच्या नेतृत्वात दिसत नसली तरीही शिवसेनेचा रथ ओढणारे आजचे शिलेदार ही पोकळी जाणवू देणार नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांनंतरही शिवसेना नव्या जोमाने कार्यरत राहील असा विश्वास वाटतो.
-शब्दांकन : संतोष प्रधान, मधू कांबळे, उमाकांत देशपांडे, संजय बापट
response.lokprabha@expressindia.com
|
|
|
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा