देहयष्टी सडसडीत. उंची सर्वसाधारण. डोळ्यांना चष्मा. मनुष्य एरवी कुठल्याही बँकेत कारकून म्हणून शोभला असता. पण आपल्या याच सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वाच्या बळावर त्यांनी मराठी मध्यमवर्गावर, येथील लुंपेन तरु णाईवर राज्य केले. देहयष्टी किरकोळ असली, तरी दंडशक्तीला, राजसत्तेला आव्हाने दिली. उंची बेताची असली, तरी महाराष्ट्राच्या राजकीय पठारावर एक शिखर बनून ते राहिले. डोळ्यांना चष्मा असला, तरी फार दूरचे पाहिले! प्रश्न असा आहे, की बाळासाहेबांनी ही किमया साधली कशी? अतिशयोक्ती हा मराठी माणसांचा फारच आवडता अलंकार. पण यात मात्र काडीचीही अतिशयोक्ती नाही की बाळासाहेब लक्षावधी शिवसैनिकांचे परमेश्वर होते. त्यांच्या एका शब्दावर प्राणांची कुरवंडी करायला ते तयार असत. बाळासाहेबांचे शब्द आणि शिव्या त्यांच्यासाठी वेदांहून वंद्य असत. यातसुद्धा काडीचीही अतिशयोक्ती नाही, की शब्दश: शून्यातून त्यांनी साम्राज्य उभे केले. साधा मध्यमवर्गीय नोकरदार माणूस तो! त्यांच्याकडे ना धन होते, ना तीरकमान. तेव्हा त्यांनी अखबार काढले! आणि आपला कुंचला आणि शब्द यांच्या जोरावर माणसे उभी केली आणि प्रस्थापित सत्तेचे अनेक जंजिरे जमीनदोस्त केले. पुढे जाऊन स्वत:चे गड बांधले. सवाल असा आहे, की बाळासाहेबांनी हे चमत्कार केले कसे? खरे तर हा सवाल असा आहे, की बाळ केशव ठाकरे यांचे मा. श्री. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे झाले कसे? प्रश्न मोठा अवघड आहे. अशा प्रश्नांची उत्तरे तयार ‘एकवीस अपेक्षितं’ नसतात. त्यात पुन्हा हत्तीचे वर्णन करणाऱ्या आंधळ्यांसारखी गत होण्याचीच शक्यता अधिक असते. किंबहुना बाळासाहेबांसारखे ‘लार्जर दॅन लाइफ’ व्यक्तिमत्त्व समजावून घेताना, अनेकांची तीच अवस्था होत असते. कोणाला ते ‘महाराष्ट्राचे मुसोलिनी’ वाटतात, तर कोणाला त्यांच्यात शिवकल्याण राजा दिसतो. कोणाला त्यांच्यात प्रेमळ बाप दिसतो, तर कुणाला धृतराष्ट्र. कोणी ‘लाख माणूस’ म्हणून त्यांचे पोवाडे गातो, कोणाला त्यांच्यात दिलदार शत्रू दिसतो, तर कोणाला ती ‘स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकिल अँड मि. हाइड’ वाटते. पण बाळासाहेब नावाचा करिश्मा समजावून घ्यायचा असेल, तर त्यांच्याकडे अशा एकारलेल्या नजरेने पाहता येणार नाही. बाळासाहेब या सगळ्यांचे मिळून बनलेले एक संहत, कढत रसायन होते. त्यातले एकच एक मूलद्रव्य परीक्षानळीत घेऊन त्याचे विश्लेषण करू गेले, तर चुकीचेच निष्कर्ष येण्याची दाट शक्यता असते. तेव्हा त्यापासून जपले पाहिजे.सगळ्यांनाच हे माहीत आहे की बाळासाहेबांचा करिश्मा, त्यांची प्रत्यक्षाहून उन्नत प्रतिमा निर्माण होण्यामागे त्यांच्या भाषेचा मोठा हात होता. छान शिवराळ, रोखठोक आणि प्रचंड मराठमोळी अशी त्यांची बोलभाषा होती. आता ही भाषा काही महाराष्ट्राला नवी नव्हती. इ. स. ७७८ मध्ये उद्योतनसुरी नामक साहित्यिक होऊन गेला. त्याने कुवलयमाला हा ग्रंथ लिहिला. त्यात मराठय़ांचे वर्णन करताना त्याने ते अहिमाण, कलहसील म्हणजे अभिमानी, भांडखोर आणि दिण्णले (दिले), गहिल्ले (घेतले) असे बोलणारे असल्याचे म्हटले आहे. म्हणजे तेव्हापासून शिवराळपणा आणि रोखठोक, भांडखोरपणा हे मराठी भाषेला अलंकारभूतच होते! नजिकच्या भूतकाळाबद्दल बोलायचे, तर ज्या आचार्य अत्र्यांच्या वाढदिवशी ‘मार्मिक’चे प्रकाशन झाले, त्या अत्र्यांनी हा कलहसील शिवराळपणा केव्हाच महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रसिद्ध केलेला होता. बाळासाहेबांचे वडील, प्रबोधनकार ठाकरे यांनाही शिव्यांचे वावडे नव्हते. (आपल्याला शिव्या वडिलोपार्जित मिळाल्या आहेत, असे स्वत: बाळासाहेबांनीच अलीकडे एका मुलाखतीत सांगितले होते.) असे असले, तरी सार्वजनिक व्यासपीठांवरील ग्राम्यता महाराष्ट्रीय पांढरपेशी सांस्कृतिक कल्पनांच्या पलीकडची होती. तिला मध्यमवर्गात प्रतिष्ठा नव्हती. आचार्य अत्र्यांवरही त्यावरून टीका झालेली आहे. बाळासाहेबांनी मात्र त्या शिवराळपणाचीच एक स्वतंत्र बोली तयार केली. पुढे तर असे झाले, की महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गालाही त्या शिव्यांमध्ये ओव्या दिसू लागल्या. हे असे घडले, त्याची कारणे येथील परिस्थितीतही होती. तो काळ पाहा. साधारणत: १९५५ पासून येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोर धरू लागली होती. ४२च्या ‘करेंगे या मरेंगे’नंतर प्रथमच महाराष्ट्रात येवढी मोठी धामधूम आकारास येत होती. ६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पण तोवर, महाराष्ट्राने ज्या पक्षाकडे मोठय़ा अपेक्षेने पाहिले होते, ती संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली होती. यानंतर तीनच महिन्यांत ‘मार्मिक’चा जन्म झाला. महाराष्ट्रीय प्रादेशिक अस्मितेला उभारी देण्याचा मार्मिकचा प्रयत्न सुरूच होता, तोच पुढे ६२ मध्ये भारत-चीन युद्ध झाले. त्यात तर भारतीय अस्मिताच जखमी झाली. एका उद्विग्न मनस्थितीत संपूर्ण देश होता. युद्धोत्तर महागाई, बेरोजगारी याने मराठी मध्यमवर्गही हैराण होता. बाळासाहेबांनी त्या अस्वस्थतेला आपल्या साप्ताहिकातून चित्र आणि शब्दरूप दिले. तशातच ६४ मध्ये नेहरू गेले. ६५ मध्ये पुन्हा युद्ध. त्यातून भारतीय अस्मिता सुखावली, पण युद्धाने महागाई, बेरोजगारी असे प्रश्न सुटत नसतात. उलट ते वाढतच असतात. या प्रश्नांची खदखद वाढलेली असतानाच ६६ मध्ये शिवसेना स्थापन झाली. आपल्या गावात बाहेरून आलेल्या कामकऱ्यांमुळे आपल्या हाताला काम मिळत नाही, अशी सोपी अर्थनीती सांगणाऱ्या, ‘मराठी माणसांनी एकमेकां साह्य करून उत्कर्ष साधावा’ असा बाळबोध सांगणाऱ्या शिवसेनेभोवती आपोआपच अर्धशिक्षित बेरोजगारांचे ताफे जमा होऊ लागले होते. त्यांच्यापुढे लंबीचौडी विद्वत्तापूर्ण भाषणे देऊन उपयोग नव्हता, हे बाळासाहेबांनी ओळखले. त्यांनी त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत संवाद साधायला सुरुवात केली. अत्रे अन् प्रबोधनकारांची परंपरा होतीच. थोडासा शिवराळपणा, थोडासा चावटपणा, एखादा कमरेखालचा जोक असा एक साचाच मग ठरून गेला. शिवाय तरुणाईच्या बंडखोरीची फोडणीही त्याला असेच. म्हणजे समोर साक्षात बृह:स्पती आला, तरी त्याला काय कळतंय, असे तारु ण्याच्या अडाणी मस्तीतून येणारे प्रश्न सगळ्याच तरुणांच्या जिभेवर सदा तडतडत असतात. या सगळ्यातून बाळासाहेबांची एक वेगळीच ठाकरी बोलभाषा तयार झाली. बाळासाहेबांच्या शिव्यांमागे मराठी माणसाच्या हिताची तळमळ आहे, गांधी-नेहरूंपासून गल्लीतल्या नेत्यापर्यंत सर्वाना एकाच, अरे-तुरेच्या मापाने मोजण्यामागे व्यवस्थेविरोधातील संताप आहे, हे शिवसेनेमागे गेलेल्या मराठी मध्यमवर्गाला जेव्हा काळजातून पटलं, तेव्हा मग येडझव्या ही शिवी राहिली नाही. तो अस्मितेचा हुंकार ठरला! ‘कानाखाली आवाज काढणे’ हा विकासाचा कार्यक्रम ठरला!बाळासाहेबांचे भाषण ऐकाल, तर त्यात फारशी सूत्रबद्धता सापडणार नाही. किंबहुना तशी ती नसतेच. ते भाषण म्हणजे समोर बसलेल्या शिवसैनिकांशी मारलेल्या ऐसपैस गप्पाच असत. व्यासपीठावरून गप्पा मारण्याची छान हातोटी बाळासाहेबांकडे होती. ते श्रोत्यांशी संवाद साधत असत. बोलता बोलता मधूनच व्यासपीठावरच्या कोणाला काही तरी विचारत असत, मधूनच कोणा घोषणा देणाऱ्याला चापत असत. मध्येच सभेतल्या पत्रकारांना इशारे वगैरे देत असत. असे ते सगळे चाललेले असे. मुख्यत: त्यात कसलाही आडपडदा नसे. बीअर पिणे, तंबाखू ओढणे या पांढरपेशी नागर संस्कृतीनुसार चारचौघांपासून लपवण्याच्या गोष्टी असतात. बाळासाहेब मात्र ते बिनधास्त सांगत असत. बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर, भाजपचे सुंदरलाल भंडारी जेव्हा म्हणाले, ‘‘की हे आमचे नव्हे, शिवसेनेचे काम. तेव्हा माझ्या शिवसैनिकांनी हे काम केले असेल तर त्यांचा मला गर्व वाटतो, असे सांगण्याची निडरताही त्यांच्यात होती. बोलताना परिणामांची पर्वा ते करतच नसत. त्यांच्या प्रतिक्रिया या मेंदूतून नव्हे, काळजातून येत असत. आपल्या भाषणांत वडिलकीच्या नात्याने श्रोत्यांना चार गोष्टी सुनावतानाच, यारदोस्ताप्रमाणे मधूनच एखादा ग्राम्य विनोदही ते करत असत. दसरा मेळाव्यातील त्यांचे भाषण ऐकण्यास जाणे म्हणजे विचारांचे सोने लुटण्यास जाणे असे शिवसैनिकांत मानले जाते, हा भाग वेगळा; पण त्यांचे बोलणे हे मूलत: प्रतिक्रिया देणे असे असे. अलीकडच्या घटना-घडामोडींवरचे चटपटीत भाष्य असा तो सगळा मामला असे. हे असे भाष्य हा मराठी मध्यमवर्गाचा आवडता छंद आहे. कचेरीतल्या ताळेबंदात न चुकता चुका करून आपण साहेबाचे मेमो खातो आणि त्याच वेळी लोकलच्या चौथ्या सीटवर बसून मनमोहनसिंगांना कशी अक्कल नाही हे तावातावाने म्हणतो यात काही अंतर्विरोध आहे, याची समजूतच नसलेल्यांना या अशा टीका-टिपण्णीत भलतीच मौज वाटणे स्वाभाविक असते. बाळासाहेबांमधल्या व्यंगचित्रकाराने हे बरोबर ताडलेले होते. बाळासाहेबांच्या ठाकरी भाषेच्या विकासात त्यांच्यातील व्यंगचित्रकलेचा फार मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. घटनांमधील, व्यक्तींमधील विसंगती टिपून त्यातला विनोद बाहेर काढण्याची मोठीच ताकद त्यांच्यात होती. मैद्याचे पोते, लखोबा लोखंडे, कोंबडीचोर, वाकडय़ा तोंडाचा गांधी, पोटावळे, दांडेकर या त्यांच्या भाषिक विरूपिका वा व्यंग-शब्दचित्रं ही याची काही उदाहरणे म्हणून सांगता येतील. बाळासाहेबांचे भाषण म्हणजे हशा आणि टाळ्या हे समीकरण जमण्यामागे त्यांच्यातील या व्यंगचित्रकाराचा मोठाच हात होता. अनेकांना असा प्रश्न पडतो, की समाजातील विसंगती टिपणाऱ्या बाळासाहेबांना कधी आपल्या विचारांतील, भूमिकांतील विसंगती, अंतर्विरोध दिसले नसतील काय? हा प्रश्नच मुळी म्रू्खपणाचा आहे. बाळासाहेबांसारख्या महानेत्याला खचितच याचे भान असणार. तरीही त्यांच्या भूमिकात अंतर्विरोध असत, कारण प्रतिक्रियांतून उमटणाऱ्या भूमिकांना सहसा भूतकाळ नसतो. त्यामुळे काल मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर मुंबई पालिकेत सत्ता मिळवणारी शिवसेना आज लीगविरोधी असते. काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांच्या अध्र्या चड्डय़ांवरून चिडवणारी शिवसेना आज संघ आणि भाजपसोबत असते. काँग्रेसविरोध हा एकमेव कार्यक्रम असूनही प्रणवदांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देते. बाळासाहेबांचा करिश्मा असा, की त्यांच्या अनुयायांनाही यात काही विस्मयकारक आहे असे वाटत नसे. बाळासाहेबांवरील श्रद्धा त्यांना सगळ्या प्रश्नांच्या भोवऱ्यातून अलगद तारून नेत असे! बाळासाहेबांचे वागणे हे प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या अगदी विपरीत तर असेच, पण त्यात काही गिमिक्सही असत. हातातला पाइप, अंगावरील शाल, रु द्राक्षाच्या माळा, भगवी वस्त्रे, डोळ्यांवरचे निरनिराळे गॉगल यांतून त्यांची एक वेगळीच आकर्षक प्रतिमा तयार होत गेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे ते एकाच वेळी गर्दीपासून लांब असत आणि त्याच वेळी शिवसैनिकांच्या जवळही असत. कार्यकर्त्यांशी नाते जोडण्यातले महत्त्व जेवढे शरद पवार यांनी जाणले होते, तेवढेच ते बाळासाहेबांनाही माहीत होते. पुन्हा केवळ शिवसैनिकांशीच त्यांचे नाते असे, असे नाही. राजकीय मैदानावर शरद पवारांची यथेच्छ टिंगलटवाळी करणारे बाळासाहेब खासगीत पवारांचे मित्र असत. सर्वच क्षेत्रात बाळासाहेबांचा मित्रपरिवार होता आणि अनेक सेलेब्रिटींचे ते ‘गॉडफादर’ होते. त्यांच्या शान, रु तबा आणि दराऱ्यात भर घालणाऱ्याच या गोष्टी होत्या. या अशाच गोष्टींतून बाळासाहेबांचा करिश्मा निर्माण होत गेला होता. बाळासाहेबांचे राजकारण, समाजकारण याची चर्चा, अभ्यास, विश्लेषण आता होतच राहील. त्यांच्या करिश्म्याचा वेध घेण्याचे असे प्रयत्नही होतील. त्यांचे ते लाखोंच्या गर्दीसमोर दो बाहू उभारून केलेले आवाहन, ती तर्जनी रोखून दिलेले कडक इशारे, त्यांची ती सडपातळ देहाला आभाळाएवढी करणारी शाल, त्यांचा पाइप, त्यांच्या माळा, त्यांची भाषा, त्यांच्या शिव्या, त्यांचे ते शिवसैनिकांसमोर नतमस्तक होणे, त्यांना आणाभाका देणे अशा अनेक गोष्टींतून त्यांच्या करिश्म्याचा शोध घेण्याचे प्रयत्न होतील. पण करिश्मा केवळ अशा गोष्टींतूनच तयार होत नसतो. तसे असते तर त्याची नक्कल करणे किती सोपे झाले असते! करिश्मा जगण्याच्या धारणेत असावा लागतो. तो आयुष्यातूनच उगवावा लागतो. बाळासाहेबांचे अवघे जीवन हे त्याचे केवढे मोठे उदाहरण आहे!
- रवि आमले (Loksatta) |
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा