बुधवार, २५ जानेवारी, २०१७

१९५२ - पहिल्या निवडणुकीची गोष्ट!


स्वतंत्र भारतात १९५२ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळी मतदान केलेली तसेच या सर्व उत्साही वातावरणाची साक्षीदार असणारी पिढी आता वयाच्या पंचाहत्तरीत आहे. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून उलगडलेली पहिल्या निवडणुकीची ही
 
गोष्ट.. 

सन १९५२. देशाला अलीकडेच स्वातंत्र्य मिळाल्यामुळे भारतवासी आनंदात होते. तशात १९५२ मध्ये लोकसभेच्या पहिल्या निवडणुकांची घोषणा झालेली. त्यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण पसरलेले. ठिकठिकाणी मोठमोठय़ा नेत्यांची भाषणे होत होती आणि ती ऐकण्यासाठी मतदारांची गर्दी फुलत होती. प्रचारफे ऱ्यांतून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत होते. आपल्या स्वतंत्र देशाचे पहिले सरकार आपल्याला निवडायचे आहे, या भावनेने सगळे मतदार भारावलेले होते. मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरांतच नव्हे, तर ग्रामीण भागातही हेच चित्र होते. अभूतपूर्व जल्लोषात पार पडलेल्या या निवडणुकीत मतदान केलेली आणि त्यानंतरच्या सर्व निवडणुकीचे साक्षीदार असलेल्या पिढीने आता पंचाहत्तरी पार केली आहे. या पिढीनं जुन्या आठवणींना दिलेला हा उजाळा..


ब्रिटिश गुलामगिरीच्या जोखडातून देश नुकताच स्वतंत्र झाला होता. नागरिकांमध्ये एक विलक्षण उत्साह होता. अशात १९५२ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. स्वतंत्र भारतातील ही पहिलीच निवडणूक. त्यावेळी काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष होता. खेडय़ापाडय़ांत काँग्रेसशिवाय दुसऱ्या पक्षांची साधी तोंडओळखही नव्हती. ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करणारे अनेक नेते १९५२ मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. देशाला प्रगतीची दिशा देण्याचं आश्वासन देत नेते मंडळी मतदारांपर्यंत पोहोचत होती. त्या काळात प्रादेशिक पक्षांचे पेव न फुटल्यामुळे एका मतदारसंघात चार ते पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असायचे. अभ्यासू, समाजसेवेची तळमळ असलेल्या उमेदवाराच्या पारडय़ातच मतदार आपले मत टाकत. त्याकाळी निवडणूक प्रचारासाठी बाजार मांडला जात नव्हता. ठिकठिकाणी मैदानात, चौकांमध्ये नेत्यांच्या सभा होत. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी दूर दूरवरून येत. त्याशिवाय पोस्टर्सच्या माध्यमातून उमेदवार आपला प्रचार करीत. घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागण्याची पद्धत त्यावेळी नव्हती. मतदारही कोणत्याही आमिषाला भुलून मतदान करीत नसत. देशहिताच्या दृष्टीने योग्य वाटेल अशाच उमेदवाराला मत देत.


प्रा. वि. चिं. फडके. वय वर्षे ७८. १९५२ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे हे एक साक्षीदार. त्या वेळी फडके २० वर्षांचे होते. पण तेव्हा मतदानासाठी २१ वर्षे पूर्ण होणे आवश्यक होते. तेव्हा वयोमर्यादा पूर्ण नसल्याने मतदान करता आले नसले तरीही फडके यांनी त्या निवडणुकीत पोलिंग ऑफिसर म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर १९५७, १९६२, १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकांतही त्यांनी प्रीसायडिंग ऑफिसर म्हणून काम पाहिले. पहिल्या निवडणुकीच्या वेळी ते एस.टी.त कनिष्ठ सहाय्यक म्हणून नोकरीत होते. पुढे एम.ए. झाल्यानंतर १९६५ साली त्यांनी एस.टी.च्या सेवेचा राजीनामा दिला आणि ते उमरगा येथे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे सोलापूर आणि नंतर भिवंडीतील कॉलेजमध्ये ते प्राध्यापक पदावर कार्यरत होते. वयपरत्वे शरीर थकले असले तरीही आजही त्यांच्या नजरेसमोर तो काळ जसाच्या तसा उभा राहतो. त्या आठवणींना उजाळा देताना प्रा. फडके म्हणाले, त्यावेळी मी सोलापूर जिल्ह्यात अक्कोलकोट तालुक्यातील एका गावात होतो. १९५२ च्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. जनतेला देशातील पहिले सरकार निवडायचे होते. त्यामुळे देशवासींमध्ये एक अभूतपूर्व असा उत्साह संचारला होता. मी एस.टी.त असल्यामुळे इतरांप्रमाणे माझ्यावरही निवडणुकीच्या कामाची जबाबदारी येऊन पडली होती. निवडणुकीचे काम करणारे अधिकारी म्हणून आमची गावचे पोलीस पाटील आणि तलाठी यांनी चांगली बडदास्त ठेवली होती. आमच्या अंघोळीपासून भोजनापर्यंतची सर्व व्यवस्था ते जातीने पाहत होते. 


त्याकाळी आम्हाला निवडणुकीचे साहित्य सोबत घेऊन मतदान केंद्रावर जावे लागे. एकाच दिवशी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत. मात्र, लोकसभा आणि विधानसभेसाठी दोन वेगवेगळ्या रंगांच्या मतपेटय़ा असायच्या. पहिल्या निवडणुकीत तर ट्रंकांसारख्या मतपेटय़ा होत्या. त्यांना कुलूप लावलेले असायचे. मतदान झाले की मतपेटीवरील कुलूप सील केले जायचे आणि मग त्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या जात, असे सांगून ते पुढे म्हणाले की, अक्कलकोट तालुक्यातील एका खेडय़ात असल्यामुळे आम्हाला भाषेचा प्रश्न भेडसावत होता. तिथे कानडी बोलणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्याकरता आम्ही कानडी भाषेतील चार वाक्ये शिकलो. मतदानासाठी येणाऱ्या मतदाराला ‘निंन्न हेसरूयेनु’ म्हणजे तुझे नाव काय, ‘आप्पांन हेसरूयेनु’ - वडिलांचे नाव काय, असे विचारायचो. तो प्रदेश मातृसत्ताक असल्यामुळे मतदाराला आईचे नाव विचारावे लागे. आम्ही ‘अव्वानु हेसरूयेनु’ असे विचारून मतदाराच्या आईचे नाव जाणून घ्यायचो. एखादी विवाहित स्त्री आली की ‘गंडनी हेसरूयेनु’ म्हणजे पतीचे नाव काय, असे विचारताच ती लाजायची. लाजत लाजतच पतीचे नाव सांगायची. 


त्याकाळी बोगस मतदान हा प्रकार अस्तित्वात नव्हता. मतदानात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नसे, असे सांगून फडके म्हणाले की, आता पक्ष खूप वाढलेत, मतदारांची संख्या वाढलीय. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची पद्धत आहे. तेव्हा आम्हाला निवडणुकीचे काम फक्त समजावून दिले जायचे आणि आम्ही ते करायचो.


गेली अनेक वर्षे पॉवरलूम क्षेत्रात असलेले भिवंडीतील दत्ता कर्वे यांनी आज वयाची ८० वर्षे पूर्ण केली आहेत. १९५२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी ते २२ वर्षांचे होते. त्यावेळी मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांत ते एक होते. जुन्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, १९५२ मध्ये निवडणुका जाहीर झाल्या आणि मी माझे नाव मतदारयादीत समाविष्ट करून घेतले. जाहीर सभांनी तो काळ गाजत होता. मोठमोठय़ा नेत्यांच्या भाषणांनी सारेचजण भारावून जात होते. त्याकाळी निवडणुकांत एक प्रकारची शिस्त होती. मारामाऱ्या, हेवेदावे असले प्रकार नव्हते. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्याही कमी होती. इतकेच नव्हे तर पहिल्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर बोटाला शाई लावण्याचा प्रकारही नव्हता. बोगस मतदान हा प्रकारच नव्हता. परप्रांतीय महाराष्ट्रात आले आणि झोपडपट्टय़ा अस्तित्वात आल्या. तेव्हापासून बोगस मतदानाचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे मतदारांनी मतदान केल्याची खूण म्हणून शाई लावण्याचा प्रकार सुरू झाला. 


पूर्वी कार्यकर्ते नि:स्वार्थीपणे पक्षाचे काम करीत असत. उमेदवाराच्या प्रचाराला ते पायी किंवा सायकलवरून जात असत. त्यावेळी काँग्रेसने उमेदवारी दिली की तो उमेदवार हमखास निवडून येणारच, असे गृहीत धरले जाई. पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली आणि महाराष्ट्रात काँग्रेसची पडझड सुरू झाली. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील तोफा गरजू लागल्या आणि त्याच दरम्यान झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची महाराष्ट्रात वाताहात झाली. १९६५ मध्ये भारत-पाक युद्धानंतर देशात महागाई भडकली. त्यामुळे पुढे १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस बहुमताने निवडून आली तरी पूर्वीइतके बहुमत मिळाले नव्हते. १९७१ मध्ये लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका झाल्या. त्यावेळी ‘गरिबी हटाव’चा नारा देणाऱ्या इंदिरा गांधी यांनी निवडणूक जिंकली आणि सरकार बनविले. मात्र, १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर झाली आणि त्यानंतर मात्र १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. 


पूर्वी सध्यासारखी परिस्थिती नव्हती. उमेदवार देशसेवेचे व्रत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरत. मतदारही सुजाण होते. आपला मतदानाचा हक्क बजावत होते. पण आता काळ बदलतोय. मतदारांना मतदानासाठी वेळ नाही. मतदान केंद्रांवर दिसणारी तुरळक गर्दी याचेच द्योतक म्हणावे लागेल.
पंडित दिगंबर पवार. वय वर्षे ७५. अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले पंडित पवार देशात पहिली लोकसभा-विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी १८ वर्षांचे होते. पंढरपूर तालुक्यातील एका खेडेगावातील शाळेत ते शिक्षक म्हणून तेव्हा नोकरी करीत होते. पुढे ते मामलेदार झाले. पहिल्या निवडणुकीत (१९५२) मतदानासाठी वयोमर्यादेची अट पूर्ण नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही, तरीही त्यांनी निवडणुकीचे काम केले होते. तो काळ आठवून ते सांगू लागले- ते दिवसच वेगळे होते. सर्वजण स्वातंत्र्याने भारावलेले होते. आजच्यासारखे लोक बेफिकीर नव्हते. जागरूक होते. मतदानाचा हक्क बजावायला हवा, याची त्यांना जाणीव होती. आजच्यासारखे राजकारणही तेव्हा नव्हते. आज नेते मंडळी निरनिराळ्या पक्षांच्या वाऱ्या करत असतात. परंतु त्याकाळी एखाद्या उमेदवाराने पक्षांतर केले तर मतदार त्याला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहायचे नाहीत. 


१९५२ च्या निवडणुकीच्या वेळी खेडेगावांतही उत्साहाचे वातावरण होते. खेडय़ांतही अगदी सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागायच्या. त्यात महिलाही मागे नसत, असे सांगून पवार म्हणाले की, मतदान पूर्ण झाल्यावर आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून आम्ही निघालो. मतपेटय़ा घेऊन जाणारा ट्रक फारच उशिरा आल्याने आमच्या जेवणाची पंचाईत झाली. तेवढय़ात पोलीस पाटील धावत आले आणि त्यांनी आम्हाला चक्क पुरणपोळीचे जेवण दिले. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. मतदानाच्या दिवसाकडे सार्वजनिक सुट्टी म्हणून मतदार पाहू लागले आहेत. हे बेजबाबदार नागरिकाचे लक्षण आहे.


१९५२ च्या निवडणुकीत साध्या ट्रंकाप्रमाणे चौकोनी आकाराची मतदानपेटी होती. प्रत्येक उमेदवाराच्या नावाने एक मतपेटी मतदान केंद्रावर ठेवलेली असायची. मतपेटीच्या चारही बाजूला उमेदवाराचे निवडणूक चिन्ह चिकटवलेले असे. मतदारांना तिकिटाच्या आकाराची मतपत्रिका दिली जायची. त्यावर कोणत्याही उमेदवाराचे नाव नसायचे. मतपत्रिकेवर पेनाने फुल्ली मारून ती आपल्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह असलेल्या मतपेटीत टाकायची. मतदार कोणाला मत देतोय, हे कळू नये यासाठी मतपेटय़ा पडद्याआड ठेवण्यात येत. त्यामुळे मतदानातील गोपनीयता कायम राहत असे. मतदान पूर्ण झाल्यावर मतपेटीला कुलूप लावून त्या सील केल्या जात. १९५७ च्या निवडणुकीत गोदरेजचे बॅलेट बॉक्स आले आणि मतदारांना सर्वच उमेदवारांचे मत एकाच मतपेटीत टाकण्याची पद्धत सुरू झाली. तसेच मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर मारण्यात येणारा शिक्काही आला. हल्ली तर मतदानासाठी मशिनचा वापर केला जातो. आज वयाची ८० वर्षे पूर्ण करणाऱ्या आशा कृष्णा केळकर याही १९५२ च्या निवडणुकीच्या साक्षीदार आहेत. आशा केळकर यांचे पती कृष्णा केळकर हे मूळचे नाशिकचे, पण त्यावेळी कामानिमित्त ते गुजरातला होते. आशाबाई गरोदर असल्याने माहेरी पंढरपूरला गेल्या होत्या. त्याचवेळी निवडणुकांची धामधूम सुरू झाली. गरोदरपणामुळे त्या मतदानाला जाऊ शकल्या नाहीत. त्यांची आईही तेव्हा आजारी होती. पण तिला मतदान करता यावे यासाठी तेथील उमेदवाराने घरी टांगा पाठवला आणि त्यांची आई मतदान करून आली. देशातील पहिल्या निवडणुकीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, पंढरपूर हे तेव्हा एक खेडेगाव होते. परंतु तरीही अनेक मोठे नेते प्रचारसभांसाठी पंढरपुरात येऊन गेले. या नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी महिलांची गर्दी व्हायची. काही उमेदवार मतदारांना साडी-खण, धोतरांचे वाटप करून आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करतानाही दिसायचे. पण त्याकाळचा मतदार सजग होता. तो योग्य व्यक्तीलाच आपले मत द्यायचा.























-प्रसाद रावकर
(लोकसत्ता)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल