बुधवार, २५ जानेवारी, २०१७

मैत्र जीवांचे!

मैत्र जीवांचे!
राजकारणाच्या पलीकडच्या क्षेत्रातल्या कलावंतांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांना असलेला जिव्हाळा हा एक वेगळाच विषय आहे. सोबतच्या छायाचित्रांमधून त्यांच्या या मैत्रीचे प्रत्यंतर येते.










 
 

‘आडवं’ करणाऱ्यांनी सत्कारही केला


गिर्यारोहकांचा विरोध डावलून रायगडावर रोप वे बांधणारे बाळासाहेब.. आणि तेच गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करून आल्यावर त्यांचा मोठा सत्कार करणारे बाळासाहेब..
व्यंगचित्रकार, राजकारणी, वक्ते, मित्र.. वेगवेगळ्या लोकांच्या बोलण्यामधून, लिहिण्यामधून बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेकविध पैलूंचे, आठवणींचे दर्शन सध्या होते आहे. त्यातून दिसणारे या एकाच माणसाचे इतके पैलू, त्याच्या स्वभावाचे इतके बारकावे थक्क करायला लावणारे आहेत. आम्हाला गिर्यारोहणाच्या क्षेत्रात असणाऱ्यांनाही त्यांचे असे टोकाचे दोन पैलू पाहायला मिळाले की हाच का तो माणूस असावा का याचे आश्चर्य वाटावे. बाळासाहेब ठाकरे त्यांना न पटलेल्या एखाद्या मुद्दय़ावरून विरोध करायचे तेव्हा तो विरोध टोकाचा असायचा. पण हा विरोध तात्कालिक मुद्दय़ासाठी असायचा व्यक्तीसाठी नाही. त्यानंतर ते विरोध केलेल्या व्यक्तीचंदेखील कौतुक करायचे. प्रसंग होता ‘रायगड रोप वे’च्या बांधणीच्या वेळचा. बाळासाहेबांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पुढे आला होता. आम्हा गिर्यारोहकांचा त्याला विरोध होता. शिवप्रतिष्ठानचादेखील विरोध होता. आमचे म्हणणे असे होते की रोप वे झाला तर कोणीही गडावर जाईल, िधगाणा होईल, पिकनिक स्पॉट बनेल. गड पाहायचा तर तो डोंगर चढूनच जायला हवे, तेव्हा खरा किल्ला कळेल. किल्ले हे चढायला कष्टप्रदच असावेत, तरच इतिहास नीट समजू शकतो. पिकनिक स्पॉट होण्याइतका कोणताही किल्ला वर जायला सोपा होऊ नये, अशी आमची भूमिका होती. साबीरभाई शेख तेव्हा महासंघाचे अध्यक्ष होते. ते कट्टर शिवसनिक व सेनेतले पदाधिकारीदेखील होते. त्यांची खरे तर दोन्ही बाजूंनी अडचण होत होती. त्यांची बाळासाहेबांनी कदाचित कानउघाडणीदेखील केली असावी. गिर्यारोहकांच्या या सर्व हालचाली बाळासाहेबांना कळत होत्या. बाळासाहेब याबाबत आम्हाला थेट कधीच बोलले नाहीत पण ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. अपंग, वृद्धांना गड पाहता यावा, शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेता यावे या उद्देशाने रोप वे झालाच पाहिजे असे त्यांचे मत होते. उद्या माझ्यासारख्या कोणाला जर गडावर जायचे असेल तर त्याने काय कोणाच्या खांद्यावर बसून जायचे का, असे ते म्हणत. शेवटी त्यांनी रोप वे बांधलाच. पुढे गिर्यारोहकांचा विरोधदेखील कमी झाला. प्रसंग तसा विस्मृतीत गेलेला. १९९८ साली आम्ही महासंघाच्या माध्यमातून एव्हरेस्ट मोहिमेची तयारी सुरू होती. मी तेव्हा मोहिमेच्या मदतीसाठी त्यांना भेटायला गेलो. त्यांची हृदय शस्त्रक्रिया नुकतीच झाली होती. मला पाहून बाळासाहेब सोबतच्या लोकांना म्हणाले, ‘‘आम्ही अपंग, वृद्धांची सोय म्हणून रोप वे बांधत होतो. हे लोक विरोध करत होते. यांना आडवा करून मी रोप वे बांधलाच.’’ इतरही बोलणं झालं आणि एव्हरेस्टविषयी बघतो असे त्यांनी आम्हाला सांगितले आणि ती भेट संपली. पण बाळासाहेब असे भेटणाऱ्यांना विसरत नसत.
मे १९९८ मध्ये आम्ही एव्हरेस्ट सर केला. भारतातून यशस्वी झालेली ती पहिलीच नागरी मोहीम होती. तेव्हा युतीचे सरकार होते. बाळासाहेबांनी नवलकरांना आदेश दिला, या पोरांचा उभ्या भारतात कोणी केला नाही असा सत्कार झाला पाहिजे. मग संपूर्ण शासन हलले. रंगभवनमध्ये प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी भव्य सेट उभा केला. स्टेजला लागूनच त्यांनी चक्क एव्हरेस्टची प्रतिकृतीच उभी केली. त्यावर छोटे स्टेज बनवले. तेथे आम्ही बसलो होतो. त्या एव्हरेस्टवर बाळासाहेब आम्हा सर्वाचा सत्कार करणार होते. राज्याचे सारे मंत्रिमंडळ पहिल्या रांगेत होते, आयत्या वेळी बाळासाहेब येऊ शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. हा केवळ हारतुऱ्यांचा सत्कार नव्हता. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी आधी आश्वासन दिलेली पंचवीस लाखांची मदतदेखील त्याच कार्यक्रमात देण्यात आली. हे सारे बाळासाहेबांच्या आदेशामुळे झाले होते. आम्हाला आडवे करायला निघाले होते तेच बाळासाहेब आमचा सत्कार करायलादेखील तितकेच उत्साही कसे, हे कोडे मला अजूनही सुटलेले नाही.
ते सोडवण्यापेक्षा त्यांचा विरोध आणि त्यांचं प्रेम या दोन्हीच्या ऋणातच राहावं हे उत्तम.














ऋषिकेश यादवresponse.lokprabha@expressindia.com

माझी पहिली मुलाखत..


बाळासाहेब ठाकरेंना भेटणं हा पत्रकारांसाठी वेगळा अनुभव असायचा. ‘सांज लोकसत्ता’ या लोकसत्ता परिवारातील सायं दैनिकाच्या तत्कालीन बातमीदाराचा हा अनुभव
तेव्हा मी ‘सांज लोकसत्ता’मध्ये होतो. १९९५ च्या निवडणुकीचा काळ होता तो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात सर्वत्र जोशात होता. मी राजकीय बातमीदारी करीत नसतानाही माझ्यावर बाळासाहेबांची मुलाखत घेण्याची जबाबदारी टाकण्यात आली. सकाळची पाळी असताना मातोश्रीवर संपर्क साधून चार ते पाच वेळा बाळासाहेबांशी बोललो होतो. नुसता फोन केला तरी तेव्हा बाळासाहेबांना तो दिला जात होता. ‘सांज लोकसत्ता’तून फोन आहे म्हटल्यावर बाळासाहेब तो घ्यायचे आणि आम्हाला हमखास मथळा द्यायचे. त्याचप्रमाणे मी मुलाखतीसाठी वेळ मिळावा म्हणून बाळासाहेबांना फोन केला. ते लगेचच म्हणाले, ये रात्री आठ वाजता. मला तो सुखद धक्का होता. जानेवारीचा शेवटचा आठवडा होता. जुन्या मातोश्रीच्या तळमजल्यावरील खोलीत मी गेलो. बरोबर आठ वाजता मला बाळासाहेबांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. मनात धाकधूक होती. बस.. असे बाळासाहेबांनीच म्हटले. समोर ‘आफ्टरनून’चे संपादक व दिग्गज पत्रकार बेहराम कॉन्ट्रक्टर होते. त्यांच्याकडे पाहून बाळासाहेब म्हणाले, ‘तुला चालेल ना, हा असला तर..’
मी क्षणभर गोंधळलो आणि म्हणालो.. हो.. नक्कीच! (मी कोण नाही म्हणणारा.. पण बाळासाहेबांचा हा एक वेगळाच मूड मी अनुभवला.)
मुलाखतीची तयारी म्हणून मी माझ्याकडील टेपरेकॉर्डर बाहेर काढला. बेहरामजी एक नोटपॅड घेऊन सरसावले होते.. आणि मी नव्या पिढीतला पत्रकार मात्र इलेक्ट्रॉनिक साधनांवर अवलंबून होतो..
बेहरामजींनी मला विचारले की, तू रेकॉर्ड करून घेणार आहेस का? मी ‘हो’ म्हटले .. पर्सनल युझसाठी.. असे शब्द उच्चारताच बाळासाहेब ताडकन् म्हणाले, पर्सनल-बिर्सनल काही नसतं. पर्सनल असेल तर तो टेप बंद कर..
मी म्हणालो, नाही साहेब.. तुमची पहिल्यांदाच मुलाखत घेत आहे ना.. त्यामुळे कुठलीही चूक होऊ नये यासाठी काळजी घेतोय.. असे जरा घाबरतच म्हणालो.
‘ठीक आहे..’ असे म्हणत बाळासाहेबांच्या मुलाखतीला सुरुवात झाली. मी प्रश्नावलीच घेऊन बसलो होतो.. बेहरामजींनी मला इशारा केला की, मुलाखत सुरू कर..
तब्बल दोन तास बाळासाहेब विविध विषयांवर बोलत होते. रात्री आठ वाजता सुरूझालेली मुलाखत रंगत चालली होती. बेहरामजी मध्येच हळुवारपणे प्रश्न विचारीत होते.. मी विचारलेल्या प्रश्नांना जोडप्रश्नही विचारत होते.. एका दिग्गज पत्रकाराच्या उपस्थितीमुळे मला टेन्शनच आले होते.. माझा कुठला संदर्भ चुकला तर तो दुरुस्त करण्याचे काम बेहरामजी आवर्जून करीत होते.. मुलाखत संपली.. मला सहज खोकला आला.. बाळासाहेबांनी लगेचच त्यांच्याकडे असलेली ‘खो-गो’ची डबी मला दिली.. ही ठेव.. असे सांगितले. बाळासाहेबांनी दिलेली ती भेट कोण नाकारणार..
‘विधानभवनावर भगवा फडकणारच,’ अशी गर्जना करणारी घोषणा तेव्हा बाळासाहेबांनी केली होती. मला मथळा मिळाला होता. ४ फेब्रुवारी १९९५ च्या ‘सांज लोकसत्ता’मध्ये ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली. ‘राज्य आमचेच येणार’, या मथळ्याने.. आणि काय आश्चर्य त्याच वेळी शिवसेना-भाजप युती सत्तेवर आली.. बाळासाहेबांचा दुर्दम्य आत्मविश्वास मी स्वत: अनुभवला होता..
विशेष म्हणजे या मुलाखतीमुळे मी बेहरामजींच्या ‘बीझीबी’मध्येही झळकलो होतो.. त्यांनी माझी खूप स्तुती केली. नाव टाकले नसले तरी माझ्यासाठी तो सुखद धक्का होता.. परंतु मी त्यांना नीटपणे ओळखलेले असतानाही त्यांनी खोचकपणे मी त्यांना ओळखले नाही म्हणून ते दु:खी झाल्याचे का लिहिले, हे मात्र मला शेवटपर्यंत कळू शकले नाही













निशांत सरवणकर
nishant.sarvankar@expressindia.com.

खूप शिकायचे राहून गेले..


श्रद्धांजली

‘मार्मिक’ या बाळासाहेब ठाकरे यांच्या साप्ताहिकाचे मुखपृष्ठ करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या, त्यानिमित्त त्यांना नियमित भेटणाऱ्या एका व्यंगचित्रकाराने रेखाटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे भावचित्र
बाळासाहेबांनी मराठी माणसाला व्यंगचित्र पाहायला, वाचायला शिकवले. चित्रकला पाहणे, अनुभवणे हेच जिथे आपले दिवास्वप्न होते, तिथे बाळासाहेबांनी व्यंगचित्राचे साप्ताहिक सुरू करून एक क्रांतिकारी पाऊलच टाकले होते.
बाळासाहेब नक्की कोण? राजकारणी की व्यंगचित्रकार? मला वाटते, व्यंगचित्रकला ही बाळासाहेबांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होती. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे या कलेची प्रेरणा होती.
बाळासाहेबांना एक व्यंगचित्रकार म्हणून जवळून पाहण्याचा योग गेल्या काही वर्षांत आला. नेमकं सांगायचं तर, ‘मनसे’ची स्थापना व माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊन नंतर पाठीवर थाप मारून स्वागत करण्याच्या बाळासाहेबांच्या रिवाजाची सुरुवात एकाच वर्षांत झाली. राज ठाकरे (शिवसेना सोडण्यापूर्वी) ‘मार्मिक’ दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ करीत होते. त्यांनी शिवसेना सोडल्यावर ती जबाबदारी बाळासाहेबांनी माझ्यावर सोपवली. गेली सहा वर्षे मुखपृष्ठ करण्याच्या निमित्ताने एका पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला. अचूक मार्गदर्शक आणि व्यंगचित्रकला ज्याच्या हाडामांसात भिनलेली आहे, असं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्त्व मलाही दिसू लागलं.
अगदी या ऑक्टोबरातच त्यांच्याशी तीनदा चर्चा करण्याचा योग आला. मार्मिक दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासंदर्भातच ही चर्चा होती. थरथरत्या हाताने जमेल तसे ड्रॉइंग काढून दाखवत, स्वत:ची कल्पना सांगत, एवढेच नाही तर त्या व्यंगचित्राखालची कॅप्शनही अचूक सांगत.
तिसऱ्यांदा गेलो ते रंगीत, फायनल व्यंगचित्र त्यांच्यासमोर पसंतीला ठेवण्यासाठी. हा एका मुखपृष्ठासाठी तीन भेटींचा शिरस्ताही नेहमीचा. प्रत्येक वेळी ते चित्र निरखून पाहणार, त्यात जराही चूक त्यांना चालत नसे. कधी कधी वाटायचे की इतक्या वेळा जायचे एका कव्हरसाठी, मग मला कशाला नेमले. पण नंतर लक्षात येऊ लागले, मी जितक्या वेळा जात राहिलो तितका माझा जास्त फायदाच होत होता. एक तर मला बाळासाहेबांचा सहवास लाभतोय, त्याचबरोबर व्यंगचित्रातले खूप काही शिकायलादेखील मिळायचे. मागून देखील मिळाले नसते ते या सहा वर्षांत मार्मिकच्या या कामामुळे मिळाले होते. गेल्या महिन्यात, बाळासाहेबांनी स्वत: चितारलेल्या व्यंगचित्रांचे भांडार माझ्यापुढे ठेवले. त्यांनी मला दाखवली असतील अवघी २० ते २५ चित्रे. तरीही ते भांडारच, कारण एवढय़ा वर्षांत मी कधीही त्यांची ‘ओरिजिनल’ चित्रे पाहिली नव्हती. एकेक चित्र दाखवताना प्रत्येकाचे मर्म ते सांगत होते. बारीक व जाड फटकाऱ्यांतून त्यांनी साधलेला पर्स्पेक्टिव्ह, कलर बॅलन्स हे सारे त्यांच्या तोंडून ऐकणे हा अनुभव म्हणजे, उत्खनन करता करता सुंदर ऐतिहासिक शिल्प सापडावे, तसा होता!
हे सारे सांगतानाही त्यांच्या खुर्चीच्या बाजूला त्यांची पाठराखण करणारे मोठय़ा आकारातील (साधारण १५ बाय १२ इंच) व्यंगचित्रकलेत बाळासाहेबांनी गुरू मानलेल्या डेव्हिड लो यांचे भारताच्या संरक्षणाची दुर्दशा दाखवणारे ‘ओरिजिनल’ व्यंगचित्र होते. व्यंगचित्रे मोठय़ाच आकारात काढणे बरे वाटते, असे बाळासाहेब म्हणत पण मी पाहत होतो ती व्यंगचित्रे साधारण तीन वा चार कॉलमचीच होती. म्हणजे आकाराने लहानच, तरीही त्यामध्ये पाच-सहा मनुष्याकृती.. प्रत्येक व्यक्तीचे चित्रण अगदी पक्के. फटकारे अगदी तोलून-मापून मारलेले. कंट्रोल्ड. एखादा फटकारा आपल्याला हवा तसा जमला नाही म्हणून तेवढय़ापुरता पांढरा रंग सर्वच व्यंगचित्रकार लावत असतील, पण बाळासाहेबांच्या तेवढय़ा चित्रांमध्ये फक्त एकदाच मला तसा पांढरा केलेला एकच चुकार फटकारा दिसला. माझ्या दृष्टीने हा चमत्कारच- बाळासाहेबांचा रियाज, चित्रकलेची जबरदस्त ओढ आणि हातामध्ये असलेले कौशल्य यांच्या संगमातून घडलेला. बाळासाहेबांनी ही कला स्वत:च्याच निरीक्षणाने, चित्रकलेच्या ध्यासाने, रियाजाने अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवली. दादा नेहमी बाळासाहेबांना इंग्लिश नियतकालिके आणून देत आणि त्यातील व्यंगचित्रांचे निरीक्षण आणि आवडलेल्या व्यंगचित्रांची कॉपी या प्रकारे बाळासाहेबांची ‘प्रॅक्टिस’ सुरू झाली. या शिकण्यादरम्यान त्यांना प्रख्यात ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रकारांनी वेड लावले. लो यांच्या व्यंगचित्रांतील मार्मिकता, त्यांची रचना, बॅलन्स, अ‍ॅनाटॉमी (हो, व्यंगचित्रांतल्या शरीरांच्या रचनेचेही शास्त्र- अ‍ॅनाटॉमी- असते. फक्त हे शास्त्र पुस्तकी नसते, तर प्रत्येक व्यंगचित्रकार ती अ‍ॅनाटॉमी आपापल्या स्टाइलप्रमाणे ठरवतो-) तसेच लो यांनी वापरलेल्या कॅप्शन्स वा कॉमेंट्स या सर्व गुणांनी बाळासाहेब राजकीय व्यंगचित्रांकडे अधिक डोळसपणे पाहू लागले. इतर व्यंगचित्रकारांनीही बाळासाहेबांवर दुरूनच प्रभाव पाडला, त्यात ब्रिटिश व्यंगचित्रकार बेन बेनरी व स्ट्रॅव्ब यांची नावे वरची. परंतु बाळासाहेबांचा देव एकच, डेव्हिड लो!
ते नेहमीच इतर कलाकारांचा सन्मान करत. आपल्यापेक्षा लहान आहे, मग त्याने केलेल्या कामाला दाद का द्यावी असा विचार (जो काही महान चित्रकारही करतात) बाळासाहेबांच्या मनाला शिवत नसे. बाळासाहेब भेटलेल्या माणसाची कायम आठवण ठेवायचे. त्यातही तो कलाकार असेल तर तो त्याच्या गुणदोषांसकट लक्षात राहायचा. त्यांच्या संपर्कात येण्यापूर्वी त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त मी एक शुभेच्छापत्र पाठवले होते. ८० या आकडय़ात त्यांचा चेहरा चितारला होता. जानेवारीत पाठवलेल्या या शुभेच्छापत्राची आठवण त्यांनी मी ऑगस्टमध्ये भेटल्यावर आवर्जून करून दिली होती. खरे तर त्यांनी लक्षात ठेवावे असे काय होते माझ्यात.. पण हे बाळासाहेबांचे कलाकृतीच्या आणि ओघानेच कलाकाराच्या प्रती असणाऱ्या स्नेहभावाचे प्रतीक होते. मी तर तसा त्यांच्या सहवासात नवखाच, पण मार्मिकच्या निमित्ताने मी खूप वेळ त्यांच्या सहवासात राहू शकलो. अनेक जुन्या सैनिकांनादेखील असा लाभ झाला नसेल, पण मला झाला. कारण बाळासाहेबांचे कलाप्रेम.
एकदा मार्मिकच्या दिवाळी अंकाचे कव्हर करताना त्यांनी मला त्यांची कल्पना चितारून दाखवली. परंतु ते समाधानी दिसत नव्हते. थोडय़ा वेळाने मी जरा धैर्य एकवटून त्यांना विचारले, ‘साहेब, मीही दोन-तीन कल्पना चितारल्या होत्या, दाखवू का?’ तर माझी ती स्क्रिबल्स बाळासाहेबांनी पाहिली व म्हणाले, ‘ही तुझी कल्पना आपण कव्हरसाठी वापरू या आणि मी केलेली आतल्या पेजवर वापरू या.’ मी अवाक् झालो. 
व्यंगचित्रकलेत बाळासाहेबांचा आवडता विषय आहे ‘कॅरिकेचर’. या अर्कचित्रांमध्ये ‘लाइकनेस’ महत्त्वाचा, त्यात जराही तडजोड त्यांना खपत नसे. हा आग्रह त्यांची कॅरिकेचर पाहतानाही जाणवतो. त्यांची अनेक कॅरिकेचर ‘मास्टरपीस’ ठरतील, त्यापैकी मला आवडते ते नेहरूंचे- तोंडात रबरी निपल असलेले दुडदुडणाऱ्या बालकाचे रूप त्या नेहरूंना बाळासाहेबांनी दिले आहे. विषयावर अगदी अचूक बोट ठेवणारे हे परिणामकारक कॅरिकेचर आहे. कॅरिकेचरिस्ट म्हणून त्यांचे अनेक आवडते व्यंगचित्रकार होते, पण त्यामध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख अगदी नेहमीचा.‘राजा कॅरिकेचर छान काढतो,’ असे ते नेहमी म्हणत.
बाळासाहेब हे शिक्षकच! व्यंगचित्रासंदर्भात चर्चा करताना ते व्यंगचित्र कसे असावे, कसे असू नये, त्याची रचना आणि त्याचे मर्मस्थळ, यासंबंधी सारे काही समजून सांगावेसे त्यांना वाटे. चित्रात डिटेल्स भरपूर हव्यात. कोणत्या व्यक्तीचे व्यंगचित्र आहे ते नुसते पाहूनच समोरच्याला ओळखता आले पाहिजे. तुम्हाला त्याखाली नाव लिहायची गरज भासली नाही पाहिजे. बाळासाहेब सांगत, ‘तुमचे व्हिजुअल, थॉट एकदम स्ट्राँग हवे आणि त्याला चांगल्या ड्रॉइंगची जोड हवी. अशा वेळी त्यांच्या ‘खजिन्या’तील अनेक परदेशी व्यंगचित्रकारांची पुस्तकेही ते आवर्जून समोर ठेवत. त्यातली नेमकी चित्रे दाखवत.
बाळासाहेबांच्या प्रत्येक चित्राला एक वेगळीच खोली असायची. त्याची पाश्र्वभूमी सुस्पष्ट असायची. सुपर फिनिश असायचे. चित्राइतकीच त्याची कॅप्शनदेखील टोकदार, बोचरी अशी असायची. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रात तुम्हाला अगदी सूक्ष्म असे पॉज दिसतील. असे पॉज घेण्यासाठी त्या कलेवर तुमची हुकुमत असावी लागते. ती बाळासाहेबांच्यात होती. अलीकडेच संगणकाचा जमाना आला. एकदा उद्धवनी त्यांना आयपॅडवर स्केचसंबधी काही गोष्टी करून दाखविल्या, बाळासाहेब अतिशय उत्सुकतेने पाहत होते. बाळासाहेबांचा हात थरथरायच्या आधी जर त्यांना संगणक मिळाला असता तर कदाचित आपणास आणखीन काही नवीन पाहता आले असते.
बाळासाहेबांना लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे खूप आवडे. त्यांनी एकदा त्यांचे फोटो-बायोग्राफी पुस्तक मला भेट दिले, वर सांगितले यावर मला आठ दिवसांत तुझी प्रतिक्रिया हवी आहे. बाळासाहेबांनी राजकीय व्यंगचित्र ही संकल्पना मराठीत चांगलीच रुजवली. बाळासाहेब अनेक राजकारण्यांना आपल्या कुंचल्याचे फटकारे द्यायचे. मला तर असे वाटते की, आपले व्यंगचित्र बाळासाहेबांनी एकदा तरी काढावे अशीच प्रत्येक राजकारण्याची इच्छा असावी.
या ‘मार्मिक’च्या सफरीत त्यांची अनेक रूपे पाहिली- बाप, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, खटय़ाळ मित्र, घरगुती साधा माणूस, विनोदकार, नकलाकार, अजातशत्रू..
ही रूपे आता कोरली गेली आहेत. कधी कधी वाटते की मला बाळासाहेबांकडे जायला उशीरच झाला. त्यांच्याकडून खूप काही शिकायचे राहूनच गेले.












प्रभाकर वाईरकर
response.lokprabha@expressindia.com
 

आता आवाज कुणाचा?


शिवसेनेत निर्विवादपणे बाळासाहेब ठाकरे यांचाच रिमोट कंट्रोल असतानाही जी काही पडझड व्हायची ती झालीच. त्यांच्या मृत्यूनंतर आता शिवसेनेत काय होणार?
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पाश्र्वभूमीवर १९६६ साली शिवसेनेची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र मिळाला. मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. या चळवळीत मराठी माणसाच्या तरारलेल्या अपेक्षांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने मात्र फारशी पावले पडत नव्हती. महाराष्ट्रात मराठी माणसाला त्याचे अपेक्षित स्थान मिळत नव्हते. राज्याच्या आíथक नाडय़ा अजूनही अमराठी भांडवलदारांच्या हाती होत्या आणि त्यांच्या तालावर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी कोणताही भावनिक संबंध नसलेले राज्यकत्रे नाचत होते. या परिस्थितीत ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’ हा अमराठी तोराही मराठी माणसाला विद्ध करीत होता. मुंबई-ठाणे परिसरातील कारखान्यातून मराठी माणसाला नोकरी व्यवसायात वंचित ठेवण्याचे काम तसेच सुरू होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या या दुखऱ्या जखमेवर नेमके बोट ठेवून आणि ‘मार्मिक’मधून मराठी माणसाच्या हृदयाला साद घालून शिवसेनेचे संघटन निर्माण केले. महाराष्ट्रातल्या बेकारीने गांजलेल्या तरुणांना त्यांनी संघटनेच्या निमित्ताने आशेचा किरण दाखविला. कारखाने कचेऱ्यातून असलेल्या कामगारांच्या संघटना मराठी बेकार तरुणांच्या समस्येला न्याय देऊ शकत नाहीत, असा हाकारा देत प्रस्थापित कामगार संघटनांच्या विरोधात या तरुणाला उभे करण्याचे काम केले. महाराष्ट्रातल्या राजकारणावर असलेला पुरोगामी पगडा दूर करण्याच्या दृष्टीने ‘राजकारण म्हणजे गजकरण’ असली अताíकक आणि असंबद्ध घोषणा करून बाळासाहेबांनी महाराष्ट्राचं राजकारण शिस्तबद्ध रीतीने अराजकीय करण्याचे काम केले. एवढेच नव्हे, तर शिवसेनेला मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी इतिहास याबद्दल प्रेम आहे असे भासविण्याकरिता अनेक प्रथा परंपरांचे पुनरुज्जीवन विविध उत्सवांच्या निमित्ताने करण्यात आले. ही सर्व पुराणमतवादी पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू असतानाच ठाणे महापालिकेची निवडणूक आली. शिवसेना राजकारणात उतरणार नाही अशी गर्जना संघटना स्थापनेच्या वेळेला करणाऱ्या बाळासाहेबांनी निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय सत्ता मिळू शकते असा अंदाज आल्यावर १९६७ साली ठाणे महापालिकेत बहुमत मिळवून सत्ता काबीज केली. हे करीत असताना शिवसेना ‘२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण’ या आपल्या ब्रीदापासून ढळणार नाही असेही वचन दिले. ठाणे महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर शिवसेनेची आगेकूच हळूहळू समृद्धीकडेही सुरू झाली. १९६८ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. शिवसेनेने आपल्या कार्यक्रमाशी सहानुभूती असलेल्या त्या वेळच्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबर युती करून या निवडणुका लढविल्या आणि पहिल्याच फेरीत मुंबई महापालिकेत ४० नगरसेवक निवडून आणून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थानही मिळविले. त्यात स्व. दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, सुधीर जोशी, डॉ. हेमचंद्र गुप्ते आदींचा समावेश होता. मुंबई महापालिकेतील स्थायी समिती, सुधार समिती, बीईएसटी समिती या माध्यमांतून समृद्ध मुंबई शहराच्या विविध योजना, त्यांचे अर्थसंकल्प यांच्याशी शिवसेनेचा संबंध आला. त्यामधून मुंबईतील धनिक, कंत्राटदार, बिल्डर या वर्गाशी जवळीक निर्माण झाली.
अमराठी काँग्रेसजनांच्या संपर्कात आल्यामुळे मराठीचा आग्रह हळूहळू पातळ होऊ लागला. गंमत म्हणजे, ज्या मराठीच्या नावाने शिवसेनेने मराठी जनांना साद घातली होती, त्या मराठी भाषेतून महापालिकेचा कारभार झाला पाहिजे याकरिता आग्रही, प्रसंगी दुराग्रही कोणी राहिले असतील, तर ते म्हणजे मंगलोरी जॉर्ज फर्नाडिस, यूपीवाले शोभनाथ सिंह आणि गोरेगावच्या पाणीवाल्या बाई मृणाल गोरे. या सर्वानी त्या वेळची महापौरांची निवडणूक आपल्या आग्रही मागणीमुळे पुढे ढकलण्यास प्रशासनाला भाग पाडले. शिवसेनेने महापालिकेच्या प्रांगणात पाऊल ठेवल्यानंतर अशा प्रकारचे आग्रह नंतर धरले गेले नाहीत. मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकांत त्या काळात काँग्रेस उमेदवाराविरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या सुधीर जोशी, मनोहर जोशी व डॉ. हेमचंद्र गुप्ते यांना पाठिंबा देऊन महापौर बनविले. परंतु ज्या वेळी सरदार सोहनसिंह कोहली यांना महापौर बनविण्याची वेळ आली, तेव्हा मात्र शिवसेनेने काँग्रेसच्या मुरली देवरा यांना पाठिंबा देऊन महापौर बनविले आणि वर सोहनसिंह कोहली यांच्या गरिबीची थट्टा करत ‘ज्यांच्या झोपडीची लांबी महापौराच्या मोटारीइतकी नाही, ते कसले महापौर होतात?’ असे कुत्सितपणे हिणविले. हेही बाळासाहेबांच्या एकूणच गरीब माणसाबद्दलच्या सहानुभूतीचे द्योतक आहे.
शिवसेना जसजशी मुंबई-ठाणे आणि मुंबईच्या परिसरात वाढू लागली, तसतसे एकूणच तात्त्विकता आणि शिवसेना यांच्यातलं अंतर अधिकच स्पष्ट होऊ लागलं, किंबहुना राजकारणाचा तात्त्विकतेशी काय संबंध असाही सवाल ठाकरी अभिनिवेशाने विचारला जाऊ लागला. संघटित कामगार वर्गाचे लढे मोडण्यासाठी शिवसेना आपल्या मराठी तरुणांना मोठय़ा प्रमाणावर उद्युक्त करू लागली आणि त्याचे समर्थन स्व. बाळासाहेब ठाकरे अभिनिवेशाने व ठाकरी बाण्याने करीत असत. त्यामुळेच १९६७ सालच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून महाराष्ट्रद्वेषी स. का. पाटील यांना पाठिंबा व कामगारांच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांना कडवा विरोध, त्याचप्रमाणे १९७१ सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील धनिक वर्गाचे उमेदवार नवल टाटा यांना पाठिंबा आणि त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांना मनगटशाहीने कडाडून विरोध अशा अनेक परस्परविरोधी भूमिका स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी खुबीने निभावून नेल्या. परत या परस्परविरोधी भूमिका घेत असताना सदसद्विवेकबुद्धीला कुठेही स्थान नाही आणि आपल्या अनुयायांनाही याबद्दल अपराधीपणाची जाण नाही. स्व. इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर देशातील सर्व राजकीय पक्षांवर बंधने आणली, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर मर्यादा घातल्या आणि तरीही शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील आणीबाणी हा काळिमा लावणारा प्रकार ठरला तरी शिवसेनेला मात्र त्याबद्दल कधीही वैषम्य वाटले नाही. शिवसेनेने घेतलेल्या कोणत्याही राजकीय, सामाजिक भूमिकेबद्दल कोणतीही विसंगती हीच कशी सुसंगती आहे याबाबत मात्र स्व. बाळासाहेब ठाकरे आवर्जून बोलत राहिले. ‘ठरवीन ते धोरण आणि बांधीन ते तोरण’ अशा आविर्भावात या सर्व विसंगत भूमिकांचे ते समर्थन करीत राहिले.
राजकारणात सामाजिक धोरणांचा आधार घेताना समाजातील दीनदुबळे, मागासलेले वर्ग यांच्याबद्दल नेहमीच शिवसेनेची भूमिका उपेक्षेची राहिली आहे. महापौरपदी असताना छगन भुजबळ यांनी भारताचे त्या वेळचे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या मंडल आयोगाच्या धोरणाला कडाडून विरोध केला होता. एवढेच नव्हे महापालिका सभागृहात निवडून गेलेल्या शिवसेना नगरसेवकात ८० टक्क्यांहून अधिक ओबीसींचा भरणा असूनही व्ही. पी. सिंह यांचा याबद्दल अभिनंदन करणारा प्रस्ताव त्यांनी संमत होऊ दिला नाही. अर्थात आता भुजबळ तात्त्विकतेचा आव आणून ‘मी ओबीसींच्या प्रश्नावर शिवसेना सोडली’ असे कितीही वेळा म्हणत असले, तरी हा इतिहास विसरून चालणार नाही, आणि त्यासाठी शिवसेनेची याबाबतची जातीनीती जबाबदार आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. दलित जनतेचा मोर्चा रिडल्सच्या प्रश्नावर निघाल्यावर हुतात्मा चौक गोमूत्र िशपडून शुद्ध करण्याचे काम करणाऱ्या भुजबळांचा निषेध करण्याऐवजी व दलित जनतेची दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन करण्याऐवजी प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनाप्रमुखांनी भुजबळांच्या त्या कृतीचेही समर्थन केले होते हा इतिहास कसा विसरता येईल ?
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबद्दल झालेल्या चळवळीची ‘ज्यांच्या घरी नाही पीठ, ते आता मागतायत विद्यापीठ’ अशी शेलक्या शब्दांत टिंगलटवाळी करणारे बाळासाहेब, आम्ही महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या परंपरेचे द्योतक असलेली भगवी पताका खांद्यावर टाकून त्यांचा वारसा चालवीत आहोत, असे महाराष्ट्राला ठासून सांगत असत. शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत असताना त्यांच्या सर्वधर्मसमभाव या तत्त्वाला िहदुत्वाच्या कपडय़ात गुंडाळत आपण शिवाजी महाराजांच्या भूमिकेशी द्रोह करीत आहोत याचेही भान दुर्दैवाने शिवसेनेला आणि त्यांना कंट्रोल करणाऱ्या स्व. बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोललाही उरले नव्हते.
१९८५ पासून मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेवर आहे. या सत्तास्थानाचा उत्तम रीतीने वापर करत शिवसेनेने मुंबई परिसरातील महापालिकांत जम बसविला. याबाबत महाराष्ट्रात सरकार असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यांना शक्य तितकी मदत केली. मुंबई महापालिकेचे अधिकारक्षेत्र विविध प्रकारचे कायदे करून संकुचित करण्याचे काम मंत्रालयातून होत असताना शिवसेनेने त्याविरोधात आणि मुंबई आणि महापालिकेच्या अस्मितेसाठी कधीही संघर्ष केल्याचे ऐकिवात नाही. आज ७४व्या घटनादुरुस्तीने मुंबई महापालिकेला स्थानिक प्राधिकरणाचा दर्जा देऊन अनेक प्रकारचे अधिकार प्रदान केले आहेत. परंतु राज्य सरकारने जवळजवळ २९ प्राधिकरणांची निर्मिती करून मुंबई महापालिकेच्या अधिकारकक्षेचा खुळखुळा करून ठेवला आहे. राज्य सरकारचे हस्तक्षेप महापालिकेच्या कारभारात आता दैनंदिन स्वरूपात होत आहेत, तरीही सत्तेवर असलेल्या शिवसेनेने त्याबाबत कधीची मुंबई महापालिकेच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई लढण्याची भूमिका घेतलेली नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अशा प्रकारच्या होणाऱ्या कुचंबणेची कधीच पर्वा केली नाही. महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराबद्दल प्रसिद्धी माध्यमातून टीकाटिप्पणी झाल्यावर बाळासाहेबांची प्रतिक्रिया नेहमीच ‘निवडणुका लढण्यासाठी पसे लागतात आणि पशाला रंग नसतो. दरिद्री माणसांनी निवडणुका लढू नयेत,’ अशा उद्दाम स्वरूपाची राहिली आहे. याच कृतीचे प्रसिद्धी माध्यमातील काही पत्रकार ‘बिनधास्त आणि बेधडक बाळासाहेब’ असे वर्णन करतात.
सत्तेची मक्तेदारी मोडत असताना ती तळागाळातील गुंडापुंडांकडे सोपविणे आणि त्यांना शिवसेनेत आणून पावन करणे बाळासाहेबांना कधीही वावगे वाटले नाही. भाजपबरोबर युती करण्यापूर्वी शिवसेना िहदुत्वाचा पुरस्कार करू लागली होती. ‘गर्वसे कहो, हम िहदू है’ ही घोषणा बाळासाहेबांनी विलेपाल्र्याच्या पोटनिवडणुकीत डॉ. रमेश प्रभूंच्या प्रचाराच्या वेळी दिली होती. त्या वेळी भाजप पुरेसा िहदुत्ववादी नव्हता, तर जनता दलाच्या आघाडीत डॉ. रमेश प्रभू यांना विरोध करीत होता. याच निवडणुकीनंतर बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार ६ वर्षांसाठी निवडणूक आयोगाने तहकूब केला होता. या ठिकाणी शिवसेनेने मराठी बाण्याचा आग्रह सोडून िहदुत्वाची कास धरली आणि चलाख स्व. प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांना आणि शिवसेनेला िहदुत्वाच्या घोडय़ावर आरूढ केले. तोपर्यंत देशात लालकृष्ण अडवाणींची राम-जन्मभूमी आंदोलनाची रथयात्रा दौडत होती. शिवसेनेने महाराष्ट्रात विशेषत: या आंदोलनाला पायदळ पुरविण्याचे काम केले.
१९९२ साली बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर संघ परिवारातील बजरंग दलासकट सर्व आक्रमक मंडळी पतली गली पकडून, हे आम्ही केले नाही तर शिवसनिकांच्या अतिउत्साहातून ते झाले आहे, असा पवित्रा घेऊ लागली. त्या वेळी बाळासाहेबांनी बेडरपणे ‘बाबरी मशीद पाडण्याचे काम जर शिवसनिकांनी केले असेल, तर मला त्याचा अभिमान वाटतो’ अशी भूमिका घेतली. शिवसेना-भाजपच्या हनिमूनची सुरुवात प्रमोद महाजनांच्या पुढाकाराने झाली. गेल्या २ दशकांच्या मतभेदांच्या खाच-खळग्यांच्या वाटेतूनसुद्धा ती शाबूत राहिली. याला कारण मुख्यत्वेकरून बाळासाहेब ठाकरे यांना दिल्लीची सत्ता आटोक्यात येत असल्याचे जाणवले असावे हे होते. महाराष्ट्रात १९९५ सालानंतर सत्ता परिवर्तन झाले आणि महाराष्ट्रात सेना-भाजपची सत्ता आली. त्यानंतर स्वत:वर कोणतीही पदाची जबाबदारी न घेता, ‘मी रिमोट कंट्रोल आहे आणि त्यामुळे कायद्याच्या चौकटी पाळण्याचे बंधन माझ्यावर नाही. आमच्या मंत्र्यांवर माझ्या इच्छेचाच कंट्रोल चालणार,’ असे बाळासाहेब जाहीरपणे बिनदिक्कतपणे सांगू लागले. मोफत घरांचे आश्वासन गरिबांना देऊन सत्ता तर मिळविली, पण घरांचा हिशेब न जुळल्यामुळे मुंबईतील गरिबांच्या नशिबी बाळासाहेबांनी दिलेले फक्त आश्वासनच आले. त्याचे परिवर्तन वस्तुस्थितीत मात्र झाले नाही. महाराष्ट्रातील काही शिवसनिक त्यानंतर दिल्लीच्या वाटेवर केंद्रीय मंत्री झाले, सभापती झाले. परंतु सर्वाना धाक मात्र रिमोट कंट्रोलचा. ‘एन्रॉन कंपनीचा दाभोळचा वीजप्रकल्प होऊ देणार नाही, तो समुद्रात बुडवू. परंतु हर्णे दाभोळच्या शेतकऱ्यांच्या हिरव्यागार बागा आम्ही सुरक्षित ठेवू’ म्हणून जाहीरपणे आश्वासन देणाऱ्या सेना-भाजप युतीने एन्रॉनच्या प्रमुख रिबेका मार्क यांची मातोश्रीवर भेट झाल्यावर आश्चर्यकारक मतपरिवर्तन होऊन या प्रकल्पाला हळूच हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
जीवनात, राजकारणात आणि कलासाहित्यक्षेत्रात अशा अनेक प्रकारच्या उलटसुलट भूमिका घेणाऱ्या बाळासाहेबांची मानसिकता ‘आधी केले, मग सांगितले’ अशा थाटाची अविचाराच्या काठावरची होती. ज्या त्वरेने महाराष्ट्रात आणि दिल्लीत सेना-भाजपच्या हाती सत्ता आली, त्याचे पोकळपण जाणवल्यामुळे जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसच्याच दावणीला बांधून घेतले, हा बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोलचा देशाच्या पातळीवरचा पराभव होता. सुरेश प्रभूंसारख्या बुद्धिमान ऊर्जामंत्र्याला कोणतेही सयुक्तिक कारण न देता पदच्युत करणे आणि त्यांना राजकीय अडगळीत टाकणे ही गोष्ट अत्यंत निर्वकिारपणे बाळासाहेबांनी रिमोट कंट्रोल तत्त्वाने केली. त्यात कुठेही मानवी संवेदनशीलतेचा लवलेशही नव्हता. एखादी गोष्ट आपल्या मनाजोगी घडली नाही, तर ती कठोरपणाने चिरडून टाकणे यात कोणतीही खंत त्यांना नसे. सत्तेच्या पदाची आसक्ती नव्हती असे जाहीरपणे सांगत असतानाच रिमोट कंट्रोल मात्र तो माझ्याच हाती असेल याची आग्रही भूमिकाही ते घेत असत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख हे एकच पद आणि त्यानंतर बाकी कितीही पदे असली, तरी त्या पदांची त्यांनी कधी तमा बाळगली नाही. 
इतक्या निर्वविादपणे रिमोट कंट्रोल हाती असूनही या एकछत्री साम्राज्याला बाळासाहेबांच्या वयोमानानुसार तसेच त्यांच्या शिष्यगणांत अचानक लाभलेल्या समृद्धीने तडे जाऊ लागले. शिलेदार सरदार झाल्यावर मग रिमोट कंट्रोलची पावरही कमी होऊ लागली. प्रथम छगन भुजबळांनी तात्त्विकतेचा बुरखा वापरून परंतु प्रत्यक्षात सेनेतील नंबर २ च्या पदाचा लाभ न झाल्यामुळे शिवसेनेला पहिला धक्का दिला. सुमारे पाऊण महिना नागपुरात भूमिगत राहून त्यांनी आपल्या निष्ठा शरद पवारांच्या चरणी वाहिल्या आणि नंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात प्रवेश घेऊन शिवसेनेवर कारवाईला सुरुवात केली. त्यापाठोपाठ नव्या मुंबईचे गणेश नाईक, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि आताशा दुरावलेले राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असतानाच शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता हा इतिहास ताजा आहे. याचाच अर्थ रिमोट कंट्रोलमधला सेल आता क्षीण झाला होता आणि केवळ बाळासाहेबांचे अस्तित्व आता शिवसनिकांना आपल्या मनाप्रमाणे वागण्यापासून परावृत्त करू शकत नव्हते.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पटलावर गेलं जवळजवळ र्अध शतक निरंकुशपणे राज्य केलेला हा योद्धा आता पडद्याआड गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल संभवण्याची अपेक्षा आहे. विकलांग शिवसेना आता भाजपलाही सत्तास्थानी पोहोचविण्यासाठी उपयोगी पडणारी नाही. बाळासाहेबांसारखा नेता आता न उरल्यामुळे शिवसेनेचे वारू चौखूर उधळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या निमित्ताने विरोधी पक्षाची असलेली सक्षम जागा आता रिकामी झाल्यामुळे काँग्रेस व एनसीपी यांनाच आलटून-पालटून सत्ताधारी व विरोधी अशा भूमिका वठवाव्या लागणार आहेत. राज ठाकरेंची मनसे अजून महाराष्ट्रात बाळसं धरायची आहे. परंतु तीदेखील शिवसेनेची महाराष्ट्रातल्या राजकारणातली नंबर दोनची भूमिका बजावू शकेल याबद्दल अद्याप साशंकता आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांना बाळासाहेब ठाकरे या मिथकाने अध्रे शतक जे वेडे केले होते, त्यातला फोलपणा, पोकळपणा आणि वास्तव आता जनतेपुढे या २-३ वर्षांत यायला हरकत नाही. पण तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण जातीपातीत आणि पशाअडक्यात गुंडाळलं जाणार नाही याबाबतही दक्ष राहण्याची गरज आहे.









रमेश जोशी
response.lokprabha@expressindia.com


 

राजा कलावंतांचा !



जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकला शिकत असताना आमचा मित्रांचा एक गट होता. या संपूर्ण गटाचे तेव्हाचे आकर्षण होते, मार्मिक ! बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेले व्यंगचित्र त्याच्या मुखपृष्ठावर असायचे आणि आतमध्ये सेंटरस्प्रेडवरही बाळासाहेबांचीच व्यंगचित्रे असायची. आमच्यापैकी प्रत्येकाला ती खूप आवडायची. त्यावेळेस आर. के. लक्ष्मण हेदेखील तेवढेच प्रसिद्ध होते. पण आरकेंची व्यंगचित्रे लहान आकाराची होती, अर्थात ती पॉकेट कार्टुन्स असायची. आणि बाळासाहेबांची मात्र मोठय़ा आकारात. त्या मोठय़ा आकारातील व्यंगचित्रांचे एक वेगळे आकर्षण होते. बाळासाहेब त्या व्यंगचित्रामध्ये त्या संबंधितांचे व्यक्तित्त्व नेमके कसे पकडतात, ते पाहणे हा आमच्यासाठी त्यावेळेस अभ्यासाचा विषय होता. खरेतर त्या वेळेस माझा शिवसेनेशी तसा काहीच संबंध नव्हता. पण बाळासाहेबांना आम्ही सर्वजण एक चांगले कलावंत मानायचो. मानवी शरीररचनाशास्त्राचा अर्थात अ‍ॅनाटॉमीचा बाळासाहेबांचा अभ्यास अतिशय दांडगा होता, हे त्यांची व्यंगचित्रे पाहून जाणवायचे आणि त्याचे प्रचंड कौतुकही वाटायचे. कुदळीच्या पात्याप्रमाणे नाक असलेले इंदिरा गांधीचे त्यांनी चितारलेले व्यंगचित्र तर त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावी तेवढी थोडी; असेच होते. त्यानंतर अनेक वर्षे मी त्या व्यंगचित्रावर विचार करत होतो. आजही ते व्यंगचित्र मला स्पष्ट आठवते आहे.बाळासाहेबांच्या व्यंगचित्रात त्यांनी कधीच ओढून ताणून व्यंग त्यात आणलेले मी पाहिलेले नाही. किंबहुना त्यामुळेच त्यांची व्यंगचित्रे पाहताना एक वेगळीच धमाल त्या वयात वाटायची. हे सारे मी कॉलेजमध्ये असतानाचे म्हणजे १९७४ ते ७७ या कालखंडातील आहे. ज्यांना व्यंगचित्रांची आवड होती, अशी सर्वच मंडळी त्यावेळेस मार्मिक विकत घ्यायची. त्यात शिवसैनिक नसणाऱ्यांचाही समावेश होताच. त्यानंतरही बाळासाहेबांची व्यंगचित्रे पाहण्यात होतीच. पण प्रत्यक्ष संबंध यायला बराच अवधी जावा लागला. १९९७ साली मला म्हाडाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे चित्र चितारण्यासाठी पाचारण करण्यात आले. दिलीप नेरूरकर यांनी माझेनाव सुचवले होते. म्हाडाच्या मुख्यालयाच्या इमारतीची रचनाही मंत्रालयाच्याच इमारतीप्रमाणेच आहे. महाराज गडावरून उतरत असल्याचे प्रसिद्ध चित्रकार कांबळी यांनी केलेले चित्र मंत्रालयात आहे. तसेच चित्र या म्हाडाच्या मुख्यालयातही असावे, अशी एक कल्पना त्यावेळेस पुढे आली होती. मला पाचारण करण्यात आले त्यावेळेस मी म्हटले की, इमारती वेगवेगळ्या आहेत त्यातून चालणारा कारभारही वेगळाच आहे. तर मग चित्र तेच कशासाठी? आतले चित्र वेगळे असावे. त्यावेळेस डोक्यात एक कल्पना घोळत होती. आजपर्यंत आपण शिवाजी महाराजांची पाहिलेली सर्व चित्रे ही प्रोफाइल पद्धतीची एका बाजूने महाराज दिसतील, अशा पद्धतीने चितारलेली आहेत. त्यात एका बाजूस इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करत असल्याचे गाजलेले चित्रही आहे. ..पण राज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपतींच्या चेहऱ्यावरचे भाव समोरच्या बाजूने दाखवता आले तर? महाराज मेघडंबरीमध्ये विराजमान आहेत, त्याचे चित्र मला चितारायचे होते.विषय निश्चित केला. विषयासाठी आवश्यक त्या संदर्भाचा अभ्यासही केला. त्यावेळेस असे लक्षात आले की, तेव्हा खूर्ची नव्हती. त्यामुळे खाली पाय सोडून बसण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे मग खूरमांडी घालून बसलेले शिवराय असे वेगळे स्केच तयार केले. ते रेखाचित्र बाळासाहेबांना दाखवायचे आणि त्यांनी ‘हो’ म्हटले तर विषय पुढे सरकणार, असे सांगण्यात आले होते. पहिल्यांदा एकदा सुभाष देसाई यांच्यासमवेत मातोश्रीवर गेलो होतो. पण त्यावेळेस बाळासाहेबांची भेट झालीच नाही. निराशेने परतलो. नंतर दुसऱ्यांदा गेलो त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई दोघेही तिथेच होते. बाळासाहेबांसमोर मॉडेल ठेवले त्याचवेळेस ते खुश झाले आणि सुभाष देसाईंकडे पाहून म्हणाले. ही खरी भारतीय बैठक. याला खुरमांडी म्हणतात. हे केले आहेस ते अगदी बरोबर आहे ! ती बाळासाहेबांची झालेली पहिली थेट भेट होती !
त्यांच्या कौतुकाने उत्साह दुणावलेला होता. नंतर परत एकदा बाळासाहेबांची भेट झाली त्यावेळेस मी माझे चित्रांचे आल्बम घेऊन गेलो होतो. त्यांनी आल्बम व्यवस्थित पाहिले त्यातील चित्रांवर त्यामधल्या बारकाव्यांवर चर्चाही केली. मग त्यांच्या संग्रहामध्ये असलेली काही चित्रेही दाखवली. त्यात प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांनी चितारलेल्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या चित्राचाही समावेश होता.

त्या आणि नंतर झालेल्या भेटींमध्येही मला जाणवलं होतं की, बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला कलाकार-कलावंत यांच्याबद्दल विशेष आपुलकीची भावना होती. ‘म्हाडा’साठी केलेले ते चित्र पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सजावटीचे काम प्रसिद्ध नेपथ्यकार रघुवीर तळाशीलकर यांनी केले होते. त्याचे उद्घाटन बाळासाहेबांच्याच हस्ते व्हायचे होते. कार्यक्रमापूर्वी तळाशीलकर मला म्हणाले, ‘ आपली राजकीय मते काहीही असोत. कलाकारांबद्दल बाळासाहेबांच्या मनात आपुलकी व प्रेम कसे असते, याचा प्रत्यय तुला येईलच.’ ते असे का म्हणाले ते मला तेव्हा कळले नव्हते. पण नंतरच्या कार्यक्रमात मला त्याचा प्रत्यय आला. त्या कार्यक्रमात बाळासाहेबांच्या हस्ते अनेकांचा सत्कार झाला. पण आमच्या दोघांच्या सत्काराच्या वेळी बाळासाहेब खुर्ची मागे करून व्यासपीठाच्या एका बाजूला चालत जात टेबलांच्या पुढच्या बाजूस आले आणि त्यांनी मी व तळाशीलकर यांचा सत्कार केला. ते त्या वेळेस म्हणालेही की, कलावंतांचा मान वेगळा असतो. तो त्यांना द्यायलाच हवा!
त्यानंतर बाळासाहेबांचा संबंध आला तो बोरिवली येथे प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाची निर्मिती झाली त्या वेळेस. प्रबोधनकारांचे व्यक्तिचित्र साकारण्याची संधी मला मिळाली होती. चित्रकलेच्या बाबतीत बाळासाहेब अतिशय काटेकोर होते. शिवाय त्यांच्यासमोरचा माणूस कितीही मोठा असला तरी त्यांना एखादी गोष्ट पटली नाही तर ते कुणालाही ऐकवायला कमी करीत नाहीत. शिवाय बाळासाहेबांचे शब्द म्हणजे धारदार. या सर्व गोष्टींचे टेन्शन होतेच. पण माझ्या अभ्यासाविषयीदेखील मला खात्री होती. मी आवश्यक ते सर्व संदर्भ गोळा केले. प्रबोधनकारांचे फारसे फोटो उपलब्ध नव्हते. पण प्रबोधनकारांची पाहिलेली चित्रे 
आणि बाळासाहेबांचे फोटो यावरून त्यांच्यातील अनेक साम्यभेद लक्षात आले होते. अखेरीस माझ्या अभ्यासानुरूप मी व्यक्तिचित्र साकारले. उद्घाटनाच्या वेळेस सुभाष देसाई म्हणाले की, उद्घाटनाच्या वेळेस सोबत राहा.
बाळासाहेब म्हणजे उत्स्फूर्तपणा आणि त्याचबरोबर बेधडकपणाही. त्यामुळे ते काय व कशी दाद देतात याकडे माझेही लक्ष लागून राहिले होते.. उद्घाटनाच्या वेळेस चित्रावरचा पडदा दूर झाला आणि बाळासाहेब खूश झालेले दिसले. बाळासाहेबांना प्रबोधनकारांचे व्यक्तिचित्र आवडले होते. स्वत: चित्रकार असलेल्या बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांचे व्यक्तिचित्र आवडणे हीच माझ्यासाठी मोठी पावती होती. पाठीवर बाळासाहेबांची शाबासकीची थाप होती. ते म्हणाले, उत्तम झालंय पोर्ट्रेट. एका क्षणात मला माझी छाती अभिमानाने फुलल्याचा प्रत्यय आला.
या उद्घाटन सोहळ्यातही पुन्हा एकदा तोच प्रत्यय आला. सुमारे ३० जणांचा सत्कार होता. पहिल्या १५ जणांचा सत्कार बाळासाहेबांच्या हस्ते पार पडला. त्यानंतरचा सत्कार तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि स्थानिक खासदार राम नाईक यांच्या हस्ते होता. माझे नाव पुकारताच बाळासाहेबांनी राम नाईक यांना खुर्चीतून न उठण्याविषयी खुणावले व ‘हा सत्कार मी केला तर चालेल ना..’ असे विचारले, अर्थात रामभाऊंनी होकारच दिला. आणि मग पुन्हा एकदा बाळासाहेब सर्व समोरची टेबलांची रांग ओलांडून पुढे आले आणि माझा सत्कार केला. त्याही वेळेस ते राम नाईक आणि माझ्याकडे पाहून म्हणाले.. कलाकाराला द्यायचा सन्मान वेगळा असतो. त्यांचा मान त्यांना मिळायलाच हवा. 
मला जी व्यक्तिमत्त्वे आवडतात त्यांची व्यक्तिचित्रे अर्थात पोर्ट्रेट्स करण्याची संधी मी मागून घेतो. बाळासाहेबांचे असेच व्यक्तिचित्र करण्याची संधी मिळावी, ही अनेक दिवसांची इच्छा होती. त्याचा योग जुळून आला तो सुभाष देसाई यांच्या वाढदिवसाच्या दिवशी २००८ साली. बाळासाहेबांनी होकार दिला. खरे तर त्या वेळेस त्यांची तब्येत तेवढी चांगली नव्हती. पण तरीही त्यांनी वेळ दिला. तब्बल दीड तास ते व्यक्तिचित्रणासाठी न हलता बसून होते. अर्थात ते बाळासाहेबच, त्यामुळे चित्रण करतानाही त्यांच्या गप्पा सुरूच होत्या. कधी वाढलेल्या त्यांच्या दाढीवर तेच टिप्पणी करीत होते तर कधी अलीकडच्या चित्रकलेवर. पण तब्येत बरी नसलेल्या अवस्थेतही त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे होते. तैलरंगात केलेले ते बाळासाहेबांचे पहिले व्यक्तिचित्र होते. त्याच वेळेस त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणजे मी चित्र काढत असताना त्यांना पाहायचे होते मागे बसून. मी त्यांना म्हटले की, मलाही आवडेल की, मी चित्र काढतो आहे आणि एक महान कलावंत मागे बसून ते पाहतो आहे. यापेक्षा एका कलावंतांच्या आयुष्यात दुसरा दुर्मिळ योग काय असू शकतो?
हा योग नंतर जुळून आला तो २००९ साली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मी चितारलेले व्यक्तिचित्र त्यांना भेट द्यावे असे बाळासाहेबांना वाटले आणि मग त्यांनी मला मातोश्रीवर बोलावून घेतले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याचे व्यक्तिचित्र करायचे त्याच्याशी उत्तम संवाद साधावा लागतो. माझा बाबासाहेबांचा फारसा परिचय नव्हता. पण मी मातोश्रीवर पोहोचलो त्या वेळेस लक्षात आले की, मी तिथे पोहोचण्यापूर्वी बाळासाहेबांनीच बाबासाहेबांना माझी पुस्तके, माझे काम, माझे आल्बम दाखवून मी चांगला कलावंत असल्याचा विश्वास दिला होता. त्यामुळे मी माझ्या कामाविषयीची खात्री त्या बोलण्यातूनच बाबासाहेबांना आली होती. बाळासाहेब कुणाचीही खोटी स्तुती करीत नाहीत, याचा माझ्यापेक्षा बाबासाहेबांनाच अधिक अनुभव असावा. मग बाळासाहेबांनी त्यांच्यासमोर बसवून माझ्याकडून बाबासाहेबांचे व्यक्तिचित्र करवून घेतले. पुन्हा एकदा मी त्याच तणावाखालून जात होते. मागे बाळासाहेबांसारखा जाणता कलावंत बसलेला त्याच्यासमोर काम करायचे. पण बाळासाहेबच ताण हलका करीत होते. बाळासाहेब म्हणजे अनेक विषयांमधील किश्शांचा ओघवता धबधबाच होता. व्यक्तिचित्रण सुरू असताना ते सतत बोलतच होते. कधी चित्रांबद्दल, कधी चित्रांच्या वैशिष्टय़ांबद्दल, तर कधी त्यांना जाणवलेल्या चित्रांच्या गुणविशेषांबद्दल. त्यामुळे हास्यविनोदामध्ये काम करणे फारसे अवघड गेले नाही. ते व्यक्तिचित्रही बाळासाहेबांना खूप आवडले. ते त्यांनी बाबासाहेबांना भेट दिले.
त्यानंतर पुन्हा एकदा बाळासाहेबांकडून बोलावणे आले ते लीलावतीच्या विजयभाई मेहता यांच्या व्यक्तिचित्रणासाठी. विजयभाईंना त्यांचे व्यक्तिचित्र भेट देऊन बाळासाहेबांना कृतज्ञता व्यक्त करायची होती आणि ते व्यक्तिचित्र मीच करावे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. बाळासाहेबांची इच्छा हीदेखील मी माझ्या कामाला मिळालेली पावती म्हणूनच घेत होतो.
विजयभाईंचे चित्र करण्यासाठी घेतले. टर्पेंटाइनची बाटली उघडली आणि त्याच्या उग्र वासाने बाळासाहेबांना खोकला आला. डॉक्टरांनी त्यांना तिथे बसून राहण्यास मनाई केली. त्यावर ते म्हणाले, काम बंद करू नका, सुरूच ठेवा आणि आतमध्ये त्यांच्यासाठी खास केलेल्या आयसीयूमध्ये गेले. पण बाहेर चित्रण सुरू आहे आणि आपल्याला ते पाहायला मिळत नाही, त्याचा आनंद लुटता येत नाही, याची खंत त्यांच्या मनात होती आणि म्हणून ते त्याही अवस्थेत तब्बल तीन ते चार वेळा बाहेर काम पाहण्यासाठी आले. थोडा वेळ थांबायचे, काम पाहायचे आणि मग आतमध्ये परत जायचे.
कलावंताला काम करताना पाहण्याची हौस ही पट्टीच्या कलावंतांना असतेच. बाळासाहेब हे स्वत: उत्तम दर्जाचे कलावंत होते आणि त्यांची ती आस, ओढ, हौस त्यांच्या त्या अस्वस्थतेतून आणि परत परत बाहेर येऊन चित्र पाहण्यातून त्या दिवशीपुरती जाणवली. फार कमी राजकारण्यांना चित्रकलेविषयी आवड किंवा आस्था असते आणि त्यांना त्यातील ज्ञानही असते. बाळासाहेब हे असे विरळा अपवादात्मक राजकारणी होते. महत्त्वाचे म्हणजे आजवरच्या सर्व भेटींमध्ये कधीही आमच्या चर्चेत राजकारण हा विषय बाळासाहेबांनी कटाक्षाने बाजूला ठेवला होता. विजयभाईंच्या व्यक्तिचित्रणाच्या वेळेसही बाळासाहेबांनी मी पोहोचण्यापूर्वीच माझ्या पुस्तके आणि आल्बममधून त्यांना माझा परिचय करून दिला होता आणि चित्रणाबद्दल विश्वासही जागवला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेबांनी पाचारण करून केलेल्या प्रत्येक चित्राचा मोबदला त्यांनी मला न मागता दिला. कलावंताला कधीही दु:खी करायचे नाही आणि त्याच्याकडून फुकटही काही करून घ्यायचे नाही, हा त्यांचा खाक्या होता. राजकारणी मंडळी फार कमी वेळा स्वत:च्या खिशात हात घालतात, असे म्हटले जाते. माझ्यासाठी बाळासाहेब हे अपवाद होते.
बाळासाहेबांशी झालेल्या गप्पांमघ्ये जलरंग, प्रसिद्ध चित्रकार वॉल्टर लँगहॅमर, व्यंगचित्रे असेच विषय असायचे. २००८ मध्ये केलेल्या पहिल्या व्यक्तिचित्राच्या वेळेस बाळासाहेबांची तब्येत चांगली नव्हती. पण नंतर ते बरे झाले आणि मग पुन्हा एकदा ताजेतवाने झालेल्या बाळासाहेबांचे व्यक्तिचित्र साकारले. यात बाळासाहेबांचे तेज अधिक जाणवते. (‘लोकप्रभा’च्या याच अंकाच्या मुखपृष्ठावर ते व्यक्तिचित्र वापरण्यात आले आहे) उद्धव ठाकरे यांनीही त्या वेळेस बरेच फोटो काढून घेतले. उद्धवजी मला म्हणाले, ‘एरवी मीही खास फोटोग्राफीसाठी बाळासाहेबांच्या मागे लागलो होतो. पण एवढा वेळ त्यांनी दिला नाही. त्यामुळे मीही संधी साधून घेतली.’ त्या वेळच्या गप्पांमध्ये जाणवलेला एक विशेष म्हणजे बाळासाहेब स्वत:वरही विनोद करायचे. हे सर्वानाच जमत नाही. पहिल्या व्यक्तिचित्राच्या वेळेस त्यांच्या कपाळावर एक चामखीळ होती. नंतर मात्र ती नव्हती, त्यावरून ते म्हणाले होते, कामत पूर्वीच्या चित्रात असलेला कपाळावरचा तिसरा डोळा आता नाही. कारण सारे काही स्पष्ट दिसतेय, त्यामुळे त्याची गरज नाही !
त्यानंतर बाळासाहेबांची पुन्हा भेट झाली ती, १४ फेब्रुवारी २०१० रोजी ज्योत्स्ना प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘पोर्ट्रेट्स’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस. मातोश्रीवरच बाळासाहेबांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळेस त्यांनी पुस्तकातील जवळपास प्रत्येक चित्रातील बारकावे पाहिले एवढेच नव्हे तर त्यावर चर्चाही केली. ती चर्चाही अशी होती की, त्यातून त्यांच्यातील कलासमीक्षक कुणालाही लक्षात यावा. अखेरीस म्हणाले, काय देऊ? मी म्हटले आशीर्वाद लिहून द्या. त्यांनी त्यांच्या साहाय्यकाला पाचारण केले आणि सांगितले.. ‘एका महान कलावंतास..’ मग पुन्हा थांबले व म्हणाले.. हे सारे कमीच आहे. ते खोडून टाका आणि लिहा ‘एका महान कलामहर्षीस.. ’ त्यांनी मला कलामहर्षी म्हणणे ही माझ्यासाठीची आजवरची सर्वात मोठी बिदागी होती !
राजकारणी व्यक्तींवर राजकारणाचे एवढे रंग चढलेले असतात की, त्यांना बाकी काहीच दिसत नाही. बाळासाहेबांच्या बाबतीत असे कधीच झाले नाही. ते उत्तम वक्ता, कलारसिक तर होतेच पण ते खूप चांगला माणूस होते. म्हणूनच २६ जुलै रोजी आलेल्या महापुराच्या वेळेस जेव्हा शेजारच्या बंगल्यातील ज्येष्ठ चित्रकार माधवराव सातवळेकर यांच्या घरातील चित्रे भिजली तेव्हा मदतीला माणसे सर्वप्रथम पाठवणारे बाळासाहेबच होते. बाका प्रसंग आला की, प्रथम आपण आपली वस्तू जपतो. बाळासाहेबांनी माणसे जपली आणि त्यांची कला जिवापाड जपण्यासाठी प्रयत्न केले.
असेच त्यांना एकदा विचारले तुला काय देऊ? नंतर त्यांचे छायाचित्रकार बाळ मुणगेकर यांना बोलावले आणि माझ्या खांद्यावर हात टाकून फोटो काढून दिला. त्यावर बाळ मुणगेकर नंतर बाहेर आल्यावर म्हणाले की, यापूर्वी बाळासाहेबांनी खांद्यावर हात टाकून काढलेला कलावंत म्हणजे मायकेल जॅक्सन आणि आता तुम्ही! बाळासाहेबांनी अशा अनेक क्षणांनी मला वेळोवेळी श्रीमंतच केले!
यंदाच्या वर्षी तर त्यांनी मला आणखी एक सुखद धक्का दिला. २७ एप्रिल रोजी सकाळीच बाळासाहेबांचा फोन आला. शुभेच्छा देण्यासाठी.. त्या दिवशी वाढदिवस होता माझा. बाळासाहेबांची ही आपुलकी हीच माझी खरी श्रीमंती होती.
आज बाळासाहेब आपल्यात नाहीत, हे मनाने स्वीकारणे खूपच जड जाते आहे. असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही! खरे तर हे विधान आजवर अनेकदा ऐकलेले आहे. पण हे विधान कुणाला तंतोतंत लागू होत असेल तर ते बाळासाहेबांनाच. फार पूर्वी कलावंतांना राजाश्रय मिळायचा. प्रसिद्ध चित्रकार आबालाल रहेमान यांनी शाहू महाराज गेल्यानंतर प्रचंड हळहळ व्यक्त केली होती. ती हळहळ शब्दांत सांगता येणार नाही, असे ते म्हणाले होते. त्या वेळेस रहेमान यांना नेमके काय वाटले होते ते मला आज बाळासाहेब गेल्यानंतर जाणवते आहे! त्याच भावना आज माझ्याही आहेत. कलावंतांना आपलंसं करून घेणारं दुसरं कुणी व्यक्तिमत्त्व आज आहे, असे वाटत नाही. तमाम कलावंतांसाठी त्यांचा राजाच आज काळाच्या पडद्याआड गेला आहे!
जेजेबाबत मात्र अढी!
एकदा मातोश्रीवर जाणे झाले. त्या वेळेस बाळासाहेबांनी खूप व्यक्तिगत माहिती विचारली. मी माझे आल्बम घेऊन गेलो होतो. ते आस्थेने पाहिले. त्यातील चित्रांविषयीदेखील त्यांनी चर्चा केली. कुठे शिकलात, मार्गदर्शन कुणाचे घेतले, असे अनेक प्रश्न विचारले. मी जे जेमध्ये शिकलो. असे म्हटल्यानंतर मात्र काहीसे चिडलेल्या स्वरात ते म्हणाले की, जे जे वगैरे काही नाही. ही चित्रकला हे तुमच्या तपश्चर्येचे फळ आहे.. जे जे विषयी मात्र बाळासाहेबांच्या मनात नेहमीच एक अढी होती. कदाचित त्याचे मूळ त्यांच्या पूर्वानुभवात आणि त्यांच्या बालपणीच्या एका घटनेमध्ये दडलेले असावे. हा किस्सा मला खुद्द बाळासाहेबांनीच सांगितला होता. ते म्हणाले होते की, बाबुराव पेंटर प्रबोधनकार ठाकरेंचे चांगले मित्र होते. ते घरी आले त्या वेळेस त्यांनी पाहिले की, लहानगे बाळासाहेब चित्र काढत होते. त्यांचे चांगले चित्र पाहून त्यांनी प्रबोधनकारांना सांगितले की, याची चित्रकला चांगली आहे. मोठा चांगला चित्रकार होईल. फक्त जे जेला घालू नका, नाही तर चित्रकला बिघडेल.


























वासुदेव कामत
(शब्दांकन - विनायक परब)

response.lokprabha@expressindia.com
 

मथितार्थ : ब्रॅण्ड आणि ग्रॅण्ड; बाळासाहेब !

मथितार्थ : ब्रॅण्ड आणि ग्रॅण्ड; बाळासाहेब !
विलेपाल्र्यामध्येच लहानाचा मोठा झालेला कॅप्टन विनायक गोरे हा युवक काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाला. केवळ विलेपार्लेच नव्हे तर अवघा महाराष्ट्र त्याची शौर्यगाथा ऐकून सुन्न आणि त्याच वेळेस शोकाकुलही झाला. एरवी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली ऑपरेशन्स याचे काही फारसे नावीन्य सामान्य माणसाला नव्हते. मात्र कॅप्टन विनायक गोरे हा आपला होता, अशी भावना सामान्यांमध्ये होती आणि म्हणूनच त्याआधी त्याचे नाव फारसे चर्चेत नसतानाही त्याच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी होती. त्याच सुमारास विलेपाल्र्याच्या प्रसिद्ध पार्ले ग्लुकोज कंपनीजवळ रेल्वेमार्गावरून जाणारा पूल तयार होत होता. या पूर्ण होत आलेल्या पुलाला कॅप्टन विनायक गोरे यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव समोर आला आणि तसेच व्हायचेही होते. पण त्याच वेळेस माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यानंतर परिस्थिती वेगात पालटली. त्यानंतर लगेचच विलेपाल्र्यात शिवसेनेचे फलक लागले. त्यावर लिहिलेले होते की, त्या पुलाला आता माँसाहेबांचेच नाव दिले जाणार. खरे तर पार्लेकरांच्या मनातील इच्छेविरोधात हे सारे होत होते. पण बोलणार कोण, हा प्रश्न होता. कारण शिवसेनेला आणि शिवसैनिकांना अंगावर घेण्याची ताकद कुणातच नव्हती. शिवसेनेचा दरारा आड येत होता. अखेरीस थेट बाळासाहेबांशीच संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळासाहेब फोनवर आले.. शहीद कॅप्टन विनायक गोरे यांची माहिती देण्यास सुरुवात करताच बाळासाहेब म्हणाले, बातम्या मी वाचल्या आहेत पुढे बोला.. समस्त पार्लेकरांची इच्छा त्यांच्या कानावर घालण्यात आली. त्यावर ते म्हणाले, मग अडचण काय आहे? त्यांना कौशल्याने सांगण्यात आले की, माँसाहेबांचे नावच त्या पुलाला देणार असे शिवसेनेचे फलक लागले आहेत आणि कुणी मध्ये आले तर खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले जात आहे. दुसऱ्या क्षणाला बाळासाहेब म्हणाले, लिहून घ्या.. ‘विलेपार्ले येथील पुलाला शहीद कॅप्टन विनायक गोरे याचे नाव वगळता इतर कोणतेही नाव देण्याचा प्रयत्न झाल्यास तिथे येऊन मी स्वत: ती नावाची पाटी उखडून फेकून देईन- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’! अर्थात दुसऱ्या दिवशीच्या ‘लोकसत्ता’मध्ये पहिल्या पानावर हे वृत्त अर्थात बाळासाहेबांचे विधान प्रसिद्ध झाले.. आणि त्या पुलाला कॅप्टन विनायक गोरे यांचेच नाव मिळाले!
हे बाळासाहेब होते. लोकभावना समजून घेणारे आणि मागचा पुढचा विचार न करता देधडक-बेधडक वागणारे! शिवसैनिकांना थोपविण्याची ताकद फक्त आणि फक्त बाळासाहेबांमध्येच होती. म्हणूनच तर बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर १९६९ साली तत्कालीन काँग्रेस सरकारवर नामुष्की आली आणि त्यांनाच बाळासाहेबांना विनंती करावी लागली की, त्यांनी तुरुंगातूनच शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन करावे.. कारण मुंबई पेटण्यास सुरुवात झाली होती आणि शिवसैनिकांना रोखण्याची ताकद कुणाकडेच नव्हती. पोलिसी बळाचा वापर करून प्रश्न चिघळला असता याची जाणीव काँग्रेसी राज्यकर्त्यांना होती.
एवढेच नव्हे तर अगदी बाळासाहेब गेल्यानंतरही त्यांची ताकद दिसली ती लाखोंच्या संख्येने जमलेल्या त्यांच्या चाहत्यांमध्ये. आणि लोकमान्य टिळकांनंतर झालेला हा दुसरा सार्वजनिक अंत्यविधी. त्याला परवानगी देतानाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता टाळण्यासाठी असे कारण देऊन अपवाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष मृत्यूनंतरही ती ताकद कायम होती !
ही ताकद बाळासाहेबांकडे आली ती त्यांच्यातील गुणवैशिष्टय़ांमुळे. अमोघ वक्तृत्व, धारदार शैली, थेट काळजाला भिडणारे भाषण आणि नसानसांत भरलेला बेधडकपणा यामुळे. अगदी आधुनिक चष्म्यातून पाहायचे तर बाळासाहेब हे स्वत:च एक उत्तम ब्रॅण्ड होते. त्यांचे ते ब्रॅण्ड असणे त्यांच्या चालण्यावागण्या आणि बोलण्यातूनही जाणवायचे. त्यांनी स्वत:ला तसे सादर केले. एका उत्तम ब्रॅण्डमध्ये जी सर्व गुणवैशिष्टय़े असावी लागतात ती सर्व बाळासाहेबांमध्ये होती. त्यामुळेच केस विस्कटलेले, गचाळ अवस्थेतील बाळासाहेब कधीच पाहायला मिळाले नाहीत. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र प्रसिद्ध झालेली छायाचित्रे पाहिली तर हे अगदी सहज लक्षात येईल.
सुरुवातीच्या काळात जोधपुरी कोट हा त्यांचा पेहराव होता. त्यानंतर सदरा, पायजमा, अंगावर शाल समोरून गळ्यात दिसणाऱ्या रुद्राक्षांच्या माळा आणि हाताच्या बोटांमध्येही ती रुद्राक्षाची माळ अडकलेली ! बाळासाहेब हे सर्वोत्तम ब्रॅण्ड असल्याचीच ही सारी लक्षणे होती.
‘ठाकरी शैली’ आणि ‘ठाकरी बाणा’ हे तर केवळ त्यांच्या वक्तृत्व आणि भाषेसाठी खास वापरण्यात आलेले शब्दप्रयोग यामध्येही त्यांचे नाव आहेच. ही ठाकरी शैलीच सामान्यांना सर्वाधिक भावली. त्या सर्व गोष्टींच्या मुळाशी होती ती उत्स्फूर्तता आणि बेधडकपणा. जाऊन थेट धडकायचे नंतर काय होणार याचा फारसा विचार त्या मागे नसायचा. खरे तर तारुण्यामध्ये प्रत्येक माणूस कमी-अधिक फरकाने हा गुण मिरवत असतो. बाळासाहेबांनी तो आयुष्यभर मिरवला, ते आयुष्यभर तरुणच राहिले. त्यांची भाषणे ही प्रामुख्याने तरुण सळसळत्या रक्ताच्या तरुणांना आवाहन करणारी असायची. त्यात आवाहन कमी आणि आव्हानच अधिक असायचे. ती भाषणे अंगार फुलवणारी आणि चेतवणारी होती. म्हणूनच त्यांच्यावर दाखल झालेले सर्व गुन्हे हे चिथावणीखोरीचे होते! सर्व गुन्ह्य़ांमध्ये चिथावणीखोरीचे कलम समान दिसेल. हाच त्यांचा बेधडकपणा, अंगावर घेण्याची वृत्ती प्रकर्षांने जाणवली ती ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर. त्याची जबाबदारी घेण्यासाठी रास्वसंघ किंवा मग भाजपा, विश्व हिंदूू परिषद कुणीच तयार नव्हते. त्यावेळेस ते शिवसैनिक होते, अशी आवई आली. दुसऱ्या क्षणाला बाळासाहेबांचे विधान आले.. ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे!
त्यांचा हा दरारा काही केवळ जनसामान्यांपुरताच मर्यादित नव्हता. तर थेट न्यायालयांपर्यंत होता. बाळसाहेबांचे अभय अनेकांना मोठा मदतीचा हात देऊन गेले. बोफोर्स प्रकरणात वादग्रस्त ठरलेला अमिताभ बच्चन असो किंवा मग बॉम्बस्फोटांच्या आरोपाखाली पकडला गेलेला संजय दत्त असो. संजय दत्तच्या सुटकेसाठी तर मग बाळासाहेबांनी थेट टाडा न्यायालयाच्या न्यायमूर्तीनाच लक्ष्य केले. किणी प्रकरणात राज ठाकरे अडकले होते तेव्हाही त्यांनी थेट दसरा मेळाव्यात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवरच आरोप केले! एवढे सारे होऊनही बाळासाहेबांवर या दोन्ही प्रकरणांत कोणतीही कारवाई झाली नाही. हा दरारा की, सरकारची निष्क्रियता यावर वाद होऊ शकतो!
कोणताही ब्रॅण्ड वर्षांनुवर्षे तसाच राहिला तर तो कालगतीत नामशेष होण्याचा धोका असतो. बाळासाहेबांनी कालगतीनुसार बदलही केला. हिंदुत्वाच्या मुद्दय़ाचा स्वीकारही त्यांनी असाच केला. मग तो अखेपर्यंत कायम होता. त्यानंतर बदललेले बाळासाहेब नंतर केवळ भगव्या वेशातच दिसले. त्यांची शालही भगवी होती. अंत्यसंस्काराच्या वेळेसही त्यांच्या अंगावर भगवी वस्त्रेच होती. फक्त पेहेराव नाही तर बाळासाहेबांच्या सवयीदेखील त्यांच्या ब्रॅण्डच होत्या. सुरुवातीस त्यांच्या तोंडातील चिरूट हा त्यांचा परिचय होता. कधी हातात सिगार असायचा. नंतर हाताच्या बोटांमध्ये रुद्राक्षांची माळ विसावली. त्यांचा मोठय़ा फ्रेमचा चष्मा हादेखील तसाच. यातील प्रत्येक गोष्ट ही बाळासाहेबांचा परिचय होती.
पण या सर्वाना दशांगुळे उरणारी गोष्ट होती ती त्यांचे धारदार नेतृत्व. त्यांचे वागणे, बोलणे, भूमिका यांत अनेकदा विरोधाभास असायचा. त्यामागे त्यांचे स्वत:चे असे वेगळे तर्कशास्त्र होते. पण सामान्य माणसाचा मात्र गोंधळ व्हायचा. पाकिस्तानी संघाला विरोध करणाऱ्या बाळासाहेबांच्याच घरात जाऊन जावेद मियांदाद मेजवानी कशी काय घेऊ शकतो, असा प्रश्न सामान्यांच्या मनात यायचा. पण हा विरोधाभास हेदेखील बाळासाहेबांचेच पेटंट असावे.
मनात येईल ते बोलायचे हे त्यांचे तत्त्व होते म्हणून त्यांना कदाचित रूढार्थाने राजकारणी म्हणताना थोडा विचार करावा लागतो. कारण राजकारणी व्यक्ती अनेकदा केवळ मतलबाचेच बोलतात. बाळासाहेब हे एक अजब रसायन होते. म्हणूनच ते या ब्रॅण्डच्याही पलीकडे जाऊन ‘ग्रॅण्ड’ ठरले. भव्यदिव्यता हे त्यांचे आकर्षण होते, असे त्यांनी स्वत: एका मुलाखतीत म्हटले होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर चिरकूट गोष्टींपेक्षा भव्यतेची आस धरावी, तर माणूस मोठा होतो!
त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा हा ब्रॅण्ड स्वत:सोबत वागवला. पण हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नोहे! म्हणूनच सर्वाना आता प्रश्न सतावतो आहे, बाळासाहेबांनंतर काय? शिवसेनेचे काय होणार? खरे तर हा प्रश्न कदाचित बाळासाहेबांच्याही मनात होताच म्हणूनच तर त्यांनी उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले. बाळासाहेबांचा हा ब्रॅण्ड पुढे नेणे सोपे काम तर निश्चितच नाही आणि आताच्या परिस्थितीत तर ते अधिकच कठीण असणार आहे. त्यांचा वारसा 
सांगणाऱ्या प्रत्येकाला हाच विचार करावा लागेल की, बाळासाहेब ठाकरे नावाच्या ग्रॅण्ड अशा ब्रॅण्डचे शिवधनुष्य पेलण्याची ताकद आपल्यात आहे काय?











vinayak.parab@expressindia.com
 
 

शिवसेना बाळासाहेबांनंतरची..


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही शिवसेनेची खरीखुरी ताकद होती. ऊर्जा होती. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर आता शिवसेनेचे काय होणार, हा प्रश्न महाराष्ट्रात सगळ्यांनाच अस्वस्थ करतो आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हापासून या मुद्दय़ावर चर्चा सुरू आहेच. पण बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचे अंत्यसंस्कार झाले आणि सामान्य माणसापासून टीव्ही वाहिन्यांपर्यंत सगळ्यांनीच या विषयावर बोलायला सुरुवात केली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधील प्रमुख नेत्यांना शिवसेनेच्या भवितव्याबाबत काय वाटतं याचा आढावा-

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सुवर्णकाळ येईल - मनोहर जोशी, ज्येष्ठ शिवसेना नेते
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक आगळावेगळा माणूस. नेतृत्व, वक्तृत्व आणि स्वभाव हे सर्वसामान्यांपेक्षा वेगळेच. त्यांना गेली ४५ वर्षे जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यांचा स्वभाव अतिशय विनोदी होता आणि गप्पा मारताना किती वेळ निघून गेला, हे कधी कळायचे नाही. ते खळखळून हसताना नेहमी टाळी मागायचे. पक्षाचे प्रमुख असले तरी त्यांनी मित्रत्वाचे संबंध ठेवले होते. पण मी कधी पायरी सोडली नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव थोडा गंभीर वाटला तरी तेही विनोदी आहेत. उद्धव आणि राज यांचा स्वभाव, कामाची पद्धत त्यांच्या अगदी लहानपणापासून मी जवळून पाहिली आहे. त्यांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे ते दोघेही मोठय़ा माणसांचा आदर ठेवतात. त्यांनी कधी अपमान केला आहे, असा प्रसंग एकदाही घडला नाही. बाळासाहेब हे अतिशय मोकळ्या मनाचे आणि बिनधास्त बोलून जात. पण उद्धवजींना ओळखणे थोडे कठीण आहे. त्यांचा स्वभाव गंभीर आणि बोलणे तोलूनमापून आहे.
बाळासाहेबांप्रमाणेच उद्धवजींचा स्वभावही धाडसी व संकटाला तोंड देण्याचा आहे. शिवसेनाप्रमुखांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे, असे मी म्हणणार नाही. कारण जेव्हा मोकळी जागा असते, तेव्हा पोकळी निर्माण झाली, असे आपण म्हणतो. बाळासाहेबांनी उद्धवजींच्या रूपाने समर्थ नेतृत्व पक्षाला आधीच दिले आहे. प्रबोधनकार, बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य यांच्यात एक समान धागा म्हणजे सर्वानाच राजकारणापेक्षा समाजसेवा करणे अधिक आवडते. शिवसेनाप्रमुखांनी जातीव्यवस्थेविरुद्ध काम केले. त्यांनी शिवसेनेत कधी जातीला महत्त्व दिले नाही. त्यामुळे समाजकारणाच्या भक्कम पायावर ठाकरेंचे नेतृत्व उभे असून त्याच जोरावर उद्धव ठाकरेही पक्षाला बळ देतील. बाळासाहेबांनी जसे नेतृत्व आणि ध्येयवाद दिला, तसे होण्यासाठी वेळ लागतो, हे लक्षात घ्यायला हवे. नैराश्य येऊ देता कामा नये. सतत विद्यार्थ्यांच्या भूमिकेत राहून शिकले पाहिजे. त्यासाठी सर्वावर एक विश्वास लागतो. 
उद्धवजी सर्वाना सांभाळून पक्षाला खंबीर नेतृत्व देतील, अशी माझी खात्री आहे. त्यामुळे पुढील काळात एकदाच नाही, तर सलग तीनदा शिवसेनेला सत्ता मिळेल, असा मला आत्मविश्वास आहे. बाळासाहेबही तसे म्हणत. हे कशाच्या जोरावर म्हणता, असे मी विचारल्यावर बाळासाहेब म्हणाले होते, आत्मविश्वास आणि जिद्द याच्या जोरावर माणूस काहीही जिंकू शकतो. त्यांचा कृतीवर विश्वास होता.
उद्धवजींना काही गोष्टींवर भर द्यावा लागेल. वेळ पाळणे, शिस्त, कोणत्या कामासाठी किती वेळ द्यायचा, याचा विचार करावा लागेल. पण पुढील काही वर्षांत उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सुवर्णकाळ येईल, याविषयी माझ्या मनात शंका नाही.

उद्धव व राजने एकत्र यावे हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली
- गोपीनाथ मुंडे, भाजपचे लोकसभेतील उपनेते

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे नुसतेच शिवसेनेचे नव्हे तर युतीचे नुकसान झाले आहे. भाजप-शिवसेना युतीचे बाळासाहेब शिल्पकार होते. युतीत अनेकदा कटुता निर्माण व्हायची, पण बाळासाहेबांचा शब्द आम्हा सर्वासाठी अंतिम असायचा. शिवसैनिकांकरिता बाळासाहेब म्हणजे आधारवडच. बाळासाहेब आणि शिवसैनिक यांचे नातेच आगळेवेगळे होते. बाळासाहेबांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बाळासाहेबांच्या निधनाने शिवसैनिकांना अतिव दु:ख झाले असले तरी शिवसैनिक खचून जाणार नाही. उलट शिवसैनिक मोठय़ा जोमाने कामाला लागेल. आज बाळासाहेब हयात नसले तरी त्यांच्यावरील निष्ठा तसूभरही कमी होणार नाही. शिवसेनेची ताकद कायम राहील. शिवसेना कमकुवत होईल, असे आपल्याला तरी वाटत नाही. सध्या दोन वेगवेगळ्या सेना आहेत. पण उद्धव आणि राज या दोघांनी एकत्र यावे हीच सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे. ही भूमिका मी सातत्याने मांडत आलो आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिवसेनाप्रमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल. शिवसेनेचा भगवा दिमाखाने फडकत राहील. मला तरी शिवसेनेचे भवितव्य उज्ज्वल वाटते.
शिवसेनेचे भवितव्य काळच ठरवेल
- माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तरीही शिवसेनेच्या वाटचालीवर लगेचच काही परिणाम होईल, असे वाटत नाही. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे भवितव्य काय? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. शिवसेना आणि मनसे या दोन सेना सध्या आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेनेला यापूर्वीच आव्हान दिले आहे. यामुळे बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेचे नक्की काय होईल हा अंदाज वर्तविणे कठीण आहे. शिवसेनेचे भवितव्य काळच ठरवेल.
उद्धवजींचे नेतृत्व शिवसेनेला पुढे नेईल
- सुधीर जोशी, ज्येष्ठ शिवसेना नेते 
बाळासाहेबांचे नेतृत्व हे एक खंबीर व मजबूत नेतृत्व होते. त्यांचे विचार जहाल आणि ज्वलंत होते. उद्धव ठाकरेंचा स्वभाव थोडा सौम्य आहे. पण वेळ पडली तर तेही आक्रमक होतील, असा मला विश्वास आहे. बाळासाहेब सर्वाना विश्वासात घेऊन त्यांची मते विचारत होते. त्यानंतर ते स्वत: निर्णय घेत असत. उद्धवजीही सर्वाना विश्वासात घेऊन काम करतील. बाळासाहेबांसारखा नेता पुन्हा होणे शक्य नसते. पण उद्धवजींचे नेतृत्व शिवसेनेला पुढे नेईल, अशी मला खात्री आहे.
शिवसेना संपणार नाही - छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यातून निघून गेले असले तरी, शिवसेना राहील. कोणताही राजकीय पक्ष, कोणतीही संघटना, अशी सहजासहजी किंवा नेत्याच्या निधनामुळे अशी ताबडतोब संपत नसते. शिवसेनाही संपणार नाही, असे मला वाटते.
निश्चयाचा महामेरू असे बाळासाहेबांचे नेतृत्व होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मी २५ वर्षे शिवसेनेत काम केले. तडजोड हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. त्यांचे सडेतोड बोलणेच भावणारे असायचे. त्यांनी विधानसभेवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला आणि तो खरा करून दाखविला. महाराष्ट्रात त्यांनी आपल्या पक्षाचे राज्य आणले. लोकसभेतही शिवसेनेचे खासदार निवडून गेले, मंत्री झाले. मंडल आयोगाच्या प्रश्नावर मी शिवसेना सोडली, त्याचा पश्चात्ताप नाही, परंतु एक कुटुंबप्रमुख म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली वाढलो, त्या बाळासाहेबांच्या प्रेमाला मुकलो त्याची खंत वाटते. बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना कशी असेल, यावर लगेच काही बोलणे बरोबर होणार नाही. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येतील का, असा एक प्रश्न विचारला जात आहे. राज यांनी स्वतंत्र पक्ष काढला आहे. कदाचित निवडणुकांसाठी दोघेजण एकत्र येऊ शकतात, परंतु पुन्हा एका संघटनेत एकत्र येणे कठीण वाटते. बाळासाहेबांसारखे नेतृत्व नसताना शिवसेनेची पुढील वाटचाल कशी असेल यावर आजच काही बोलणे बरोबर होणार नाही, थोडी वाट पाहावी लागेल.
सच्चा शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या मागे उभा राहील
- रामदास आठवले, अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. बाळासाहेब हे तमाम शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत होते. ती पोकळी आता भरून निघणार नाही. परंतु सच्चा शिवसैनिक बाळासाहेबांचे खरे वारसदार उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील, याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव व आदित्य यांच्या मागे उभे राहण्याचे शिवसैनिकांना आवाहन केले होते. बाळासाहेबांवर प्रेम करणारा शिवसैनिक त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देईल. विधानसभेवर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचा भगवा व निळा झेंडा फडकविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न साकार करण्यासाठी शिवसैनिक व शिनसेनेचा चाहता वर्ग उद्धव ठाकरेंना मनापासून साथ देतील.
बाळासाहेबांपेक्षा उद्धव यांची नेतृत्वशैली वेगळी आहे. प्रत्येक नेत्याची शैली निराळीच असते. या पुढच्या काळात शिवसेनेला बाळासाहेबांची कमतरता जाणवणार आहे. उद्धव ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करतील. बाळासाहेब आजारी असल्यापासून त्यांनीच पक्षाची सारी धुरा संभाळली आहे. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची, महायुतीची पुढील वाटचालही मजबूत राहील, यात शंका नाही.

उद्धव-राज एकत्र येणे कठीण, पण..
- विनोद तावडे, विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत, पंडित जवाहरलाल नेहरू असोत वा इंदिरा गांधी या नेत्यांनी त्यांच्या आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्या त्या काळात त्यांच्या पक्षाला जी उंची प्राप्त करून दिली, जे नेतृत्व दिले ते त्यांच्या पश्चात कोणीही देऊ शकलेले नाही. त्यामुळे हे पक्षही तसे राहू शकलेले नाहीत. या नेत्यांसारखी व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्वही समाजात तशी विरळ आणि अपवादात्मकच असतात. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख हे राजकीय क्षितिजावरील आगळेवेगळे नेतृत्व होते. बाळासाहेबांचे शिवेसेनेतील अढळ स्थान विचारात घेता त्यांच्या जाण्याने पक्षात निर्माण झालेली पोकळी कोणीच भरून काढू शकणार नाही. मात्र बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले, जन्मापासूनच त्यांची कार्यशैली आणि अनुभवाची शिदोरी जवळ बाळगणारे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ही धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.
बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे काय होणार असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. मात्र बाळासाहेबांच्या नंतरही शिवसेना तितक्यात मजबूतपणे कार्यरत राहील. ठाकरे यांनी संघटनेची ज्या पद्धतीने बांधणी केली, तिचा विचार केला तर हा पक्ष त्यांच्या पश्चातही अधिक मजबूतपणे काम करीत राहील, तिला कोणीही तडा देऊ शकणार नाही याची काळजी जाण्यापूर्वीच बाळासाहेबांनी घेतलेली आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र यावीत अशी सर्वाची इच्छा असून बाळासाहेबांनंतर पुन्हा एकदा हाच मुद्दा चर्चेत आला आहे. मला मात्र तशी शक्यता वाटत नाही. उद्धव आणि राज यांनी एकत्र येऊन राज्यावर पुन्हा भगवा फडकविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न साकारावे अशी सर्वाचीच इच्छा आहे. मलाही तसेच वाटते, जेणेकरून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पूर्ण निप्पात करता येईल. मात्र आजच्या राजकीय परिस्थितीत हे स्वप्न सत्यात उतरेल आणि दोन्ही भाऊ एकत्र येतील असे वाटत नाही. तशी शक्यताही दिसत नाही. कौटुंबिक जिव्हाळा म्हणून गेल्या काही दिवसांत दोन्ही भाऊ एकत्र आले पुढेही येत राहतील, मात्र राजकारण हे त्या पलीकडील असल्याने आणि दोघांचेही राजकीय मुद्दे वेगळे असल्याने सद्यस्थितीत हे दोन्ही बंधू एकत्र येतील असे मला तरी वाटत नाही.
बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेचा फायदा उठविण्याचा प्रयत्न काँग्रेस विशेषत: राष्ट्रवादीकडून होऊ शकतो. ठाकरे यांच्यानंतर शिवसेना कमकुवत झाल्याचे चित्र निर्माण करून खासदार, आमदार यांना तोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र त्यांच्या आमिषाला कोणी बळी पडलेच तर तो त्यांचा आत्मघात ठरू शकतो आणि साहेबांवर जिवापाड प्रेम करणारे त्यांचे शिलेदार असा वाईट विचार करतील असेही वाटत नाही.
शिवसेनेची बांधणी ही मुळापासून घट्ट असून बाळासाहेबांचे आचार आणि विचार प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात घट्ट रुजलेले असल्याने त्यांच्या पश्चात शिवसेनेचे काय होईल असा सवाल केला जात असला तरी याच विचारांची घट्ट वीण शिवसेनेला कायम एकत्र ठेवील, त्यामुळे शिवेसेनेला हादरवणे सोपे नाही याचे भान सर्वानीच ठेवायला हवे.
बाळासाहेबांचा दूरदृष्टीपणा, मनाचा मोकळेपणा, विचारांची स्पष्टता आणि बेधडक वृत्ती ही सगळीच वैशिष्टय़ सध्याच्या नेतृत्वात दिसत नसली तरीही शिवसेनेचा रथ ओढणारे आजचे शिलेदार ही पोकळी जाणवू देणार नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांनंतरही शिवसेना नव्या जोमाने कार्यरत राहील असा विश्वास वाटतो.











-शब्दांकन : संतोष प्रधान, मधू कांबळे, उमाकांत देशपांडे, संजय बापट 

response.lokprabha@expressindia.com
 

बाळासाहेब, मार्मिक आणि मी


एकीकडे ‘मार्मिक’ दुसरीकडे शिवसेना.. बाळासाहेब ठाकरे यांचा झांझावाती प्रवास सुरू झाला होता. त्या काळात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहिलेली ही शब्दांजली
‘मार्मिक’ हे बाळासाहेबांचे पहिले प्रेम होते. १३ ऑगस्ट १९६० साली बाळासाहेबांनी मार्मिक सुरू केले तेव्हा ते व्यंगचित्रकार म्हणून खूप मोठे झाले होते. तरीही त्या काळात साप्ताहिक सुरू करणे हेच खूप धाडसाचे होते. कारण इतर साप्ताहिके बंद पडत होती. व्यंगचित्र साप्ताहिक ही संकल्पनाच खूप दुर्मिळ होती. देशात केवळ ‘शंकर्स विकली’ हे एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक होते. मराठीत व्यंगचित्राची परंपरा होती, पण ती कौटुंबिक स्वरूपाची. अशा वातावरणात बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून उदयाला आले होते. राजकीय व्यंगचित्र ही संकल्पना मराठीमध्ये रुजवली, विकसित केली ती बाळासाहेबांनी. नुसतेच व्यंगचित्र पाहून त्यातून दोन घटका करमणूक अशी त्यांची भूमिका अजिबात नव्हती. त्यातून लोकांना काहीतरी विचारप्रवर्तक, उद्बोधक मिळावे असे त्यांना वाटे. हे सारे ‘मार्मिक’मध्ये होते. ‘मार्मिक’ची बीजे बाळासाहेबांच्या मनात ‘फ्री प्रेस’मध्ये असतानाच रुजली होती. मराठी माणसाला डावलण्याची दाक्षिणात्यांची वृत्ती त्यांच्या मनाला चरे पाडत होती. किंबहुना फ्री प्रेसमध्येदेखील त्यांना असा अनुभव आला होता. या अशा छोटय़ा- मोठय़ा घटना बाळासाहेबांच्या मनावर परिणाम करत होत्या. मराठी माणसाबद्दल होत असणाऱ्या दुजाभावावर तत्कालीन वृत्तपत्रेदेखील बोलत नसत. आपली बाजू मांडणारे कोणीतरी हवे ही मराठी माणसाची भावना बाळासाहेबांना ‘मार्मिक’च्या दिशेने घेऊन गेली असे म्हणावे लागेल.
अशा वातावरणात ‘मार्मिक’ सुरू झाले. मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडणं ही त्यांची प्रेरणा होती. बाळासाहेबांची व्यंगचित्रे हे मार्मिकचे आकर्षण तर होतेच, पण त्याचबरोबर श्रीकांतजीचे सिने फिक्शन, अंधेरनगरी या सदरांमु़ळे ‘मार्मिक’चा इतर साप्ताहिकांपेक्षा वेगळा प्रभाव पडला. ‘मार्मिक’कडे पत्रांचा ओघ सुरू झाला. मार्मिक लोकप्रिय होत होते. कारण बाळासाहेब सामन्यांची भाषा मांडत होते. तेदेखील व्यंगचित्रांच्या माध्यमातून. मराठी मनाची सारी खदखद त्यातून व्यक्त होत होती. दाक्षिणात्य अधिकाऱ्यांच्या याद्या ‘वाचा आणि स्वस्थ बसा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढे त्याचे रूपांतर ‘वाचा आणि उठा’ असे झाले. जनमानस तयार होत होते, आता या साऱ्याला संघटनेचे स्वरूप देणे गरजेचे होते. दादा म्हणजेच प्रबोधनकारांनी आम्हा सर्वाना एकत्र बसवले. त्यांनी बाळासाहेबांना सांगितले, ‘आता याला योग्य ते वळण द्या. संघटना स्थापन करा.’ बाळासाहेब म्हणाले, ‘‘करू या, पण नाव काय द्यायचं?’’ समोरच शिवरायांचा पुतळा होता. दादा म्हणाले, ‘‘महाराष्ट्र शिवाजीचा, तुझी संघटना शिवाजीची हे सारे त्याचे सनिक, त्यांची ही सेना, तेव्हा नाव शिवसेना असू दे.’’ शिवसेनेची स्थापना ही अशी झाली.
लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ‘मार्मिक’ होताच. ‘मार्मिक’मध्ये आम्ही छोटी चौकट द्यायचो. अमुक अमुक ठिकाणी मीटिंग आहे. त्यातून लोकांना माहिती मिळायची. त्या माहितीतीतून त्यांचा प्रतिसाद वाढत गेला. सेना आणि ‘मार्मिक’ एकमेकांच्या हातात हात घालूनच वाढत होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात ‘मार्मिक’चे ४६०० एजंट होते, इतके मार्मिक लोकप्रिय झाले होते. ‘मार्मिक’ हे बाळासाहेबांचे पहिले प्रेम होते, त्यांची व्यंगचित्रे हे ‘मार्मिक’चे बलस्थान होते. पुढे आंदोलने होत गेली. ७० सालच्या आंदोलनात बाळासाहेब तुरुंगातून बाहेर आल्यावर दुसऱ्या दिवशी परळ, लालबाग विभागांत सर्वाची विचारपूस करत पायी फिरले. त्यानंतर ते परळमध्ये सर्वाबरोबर एकत्र बसले होते तेथेच त्यांनी कागद मागवून ‘रविवारची जत्रा’ तयार करून दिली. सार्वजनिक अलिप्तपणा हा बाळासाहेबांचा खूप मोठा गुण होता. मार्मिकच्या व्यंगचित्रांबाबत बाळासाहेब खूपच वक्तशीर आणि आग्रही असायचे. कधी कधी मला बस पकडून बंगल्यावर पोहचायला उशीर व्हायचा, पण बाळासाहेब दर सोमवारी संध्याकाळी ‘मार्मिक’च्या कव्हरचे व्यंगचित्र तयार करून त्याची रबर लावलेली गुंडाळी घेऊन खिडकीत उभे असायचे. मंगळवारी संध्याकाळी ‘रविवारची जत्रा’ तयार करून पुन्हा असेच तयार असायचे. त्यावेळी आम्ही ‘सांज मार्मिक,’ ‘शिवगर्जना,’ ‘मार्मिक’ असे तीन अंक काढायचो. बाळासाहेब या तिन्ही अंकांमध्ये सक्रिय होते. त्यांचे त्या काळात खूप दौरे होत. पण दौऱ्यावर असताना ते निश्चिंत असत. त्यांना माहीत असायचे की ‘मार्मिक’ची चिंता करायची गरज नाही. आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल इतका नििश्चत असलेला असा हा एकमेव संपादक होता असे म्हणावे लागेल.मी मुंबईत ५५-५६ च्या दरम्यान आलो, रेडिओ लॅम्पमध्ये वर्कर म्हणून काम करायचो. तेथील दाक्षिण्यात्य व गुजर मारवाडी आम्हाला जेवताना जाणूनबुजून डिवचायचे ‘अरे, हम आया करके तुमको रोटी मिलता है..’ म्हणायचे. आम्ही सगळेच खूप अगतिक होतो. याच काळात मी बाळासाहेबांच्या संपर्कात आलो. प्रबोधनकारांनी माझे अक्षर चांगले म्हणून मला लेखनिकाचे काम दिले होते. त्यांच्या तालमीत मी तयार होत होतो. सुरुवातीला माझी लिखाणाची भाषा खूप प्रौढ होती. दादांनी मला सोप्या भाषेत कसे लिहायचे ते शिकवले. त्यासाठी आपला वाचक कोण हे जाणून सोपे, लहान वाक्ये लिहा, असे ते सांगत. दादा असे पत्रकारितेचे धडे देत असत.
‘मार्मिक’मध्ये माझी कारकीर्द सुरू झाली. मुळात हे दुहेरी नाते होते. मी मुळातच शिवसनिक असल्यामुळे माझ्या कामातल्या निष्ठेबाबत बाळासाहेबांना खात्री होती. पुढे मी प्रबोधनकारांच्या सांगण्यावरून ‘मार्मिक’ सोडून गेलो. पुन्हा ९१ मध्ये ‘मार्मिक’मध्ये परत आलो. मी मध्यंतरी ‘मार्मिक’मध्ये नव्हतो याचा कसलाही किंतु, दुजाभाव बाळासाहेबांनी कधीच बाळगला नाही. किंबहुना ते प्रेमाने हक्काने सर्वाना सांगत, ‘‘पंढरी पत्रकार -लेखक म्हणून आमच्या घरचे प्रॉडक्ट आहे.’’ हा जो बाळासाहेबांचा आपलेपणा होता तो अन्य कोणत्याच नेत्यात आढळत नाही.
‘मार्मिक’मध्ये मी नवशिक्या पत्रकार होतो. कधी कधी चुका व्हायच्या. कधी कधी एखादा लेख जमायचा नाही. पण बाळासाहेब कधी टोचून बोलायचे नाहीत. त्यांची सांगण्याची पद्धतच वेगळी होती. ते सांगायचे, ‘‘हे बघ. मागे एकदा तू कसा ट्विस्ट दिला 
होतास, तसा आता काही आला नाही.’’ मला ते बोलवायचे आणि माझा लेख वाचायचे. म्हणजे तो आधी त्यांनी वाचलेला असायचा, पण माझ्यासमोर पुन्हा वाचायचे. ते वाचता वाचता त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू फुलत जायचे, कोणाची फजिती कशी झाली आहे, कोणाला कसा चिमटा बसला आहे हे त्यांच्या बदलत्या चेहऱ्यावर दिसत असे. असे झाले की ओळखायचे साहेबांना आवडले.
चुकांचा विषय आलाच आहे तर एक किस्सा आवर्जून सांगावा लागेल. ‘मार्मिक’मध्ये एकदा जितेंद्र अभिषेकींनी लता मंगेशकरांवर एक लेख लिहिला होता. प्रोसेसिंगच्या दरम्यान त्यातला एक शब्द त्रास देत होता. त्याकाळी छपाईचे जे तंत्र होते त्यामध्ये पहिली वेलांटी जुळवणे अवघड होते. मी तो शब्द बदलला. अंक प्रकाशित झाल्यावर अभिषेकींना खूप राग आला. त्यांनी श्रीकांतजीकडे तक्रार केली. मला ‘मार्मिक’ सोडून जाण्यास सांगण्यात आले. निरोपासाठी मी दादांकडे गेलो. दादांनी मग सर्वाना एकत्र बसवले, मूळ लेख, छापून आलेले सर्व समोर ठेवले. शब्द बदलला नसता तर त्यातून कसा वेगळाच अर्थ प्रतीत झाला असता ते सांगितले. आता बाळासाहेबांना निर्णय घ्यायचा होता. बाळासाहेबांनी मग अभिषेकींनांच समजावून सांगितले, ‘‘अरे, आमच्या पण काही तांत्रिक अडचणी असतात. असे काही बदल करावे लागतात,’’ असे सांगत शब्द बदलणे कसे गरजेचे होते ते पटवून दिले. अभिषेकींना ते पटले आणि मी मार्मिकमध्येच राहिलो. असे होते बाळासाहेब..
मी ‘मार्मिक’ मध्ये लिखाण करायचो तेव्हा प्रबोधनकार मला समजावून सांगायचे, ‘‘हा अग्रलेख कोणाचा आहे, तर बाळचा. मग तो कसा पाहतो एखाद्या घटनेकडे, तर तो व्यंगचित्रातून पाहतो. मग तुलादेखील तसेच पाहावे लागेल. त्याच्या व्यक्तिमत्त्वात शिरावे लागेल.’’
‘मार्मिक’ची भूमिका सांगताना बाळासाहेब म्हणायचे, ‘‘अरे ताíकक युक्तिवाद लोकांच्या डोक्यावरून जातात. रविवारच्या दुपारी मासिक वाचताना लोकांचे डोके आपल्याला दुखवायचे नाही. हे लक्षात ठेव.’’ त्यातून मार्मिकची एक जडणघडण तयार झाली असे 
वाटते. ठाकरी भाषा हादेखील असाच विषय. त्याबद्दल बोलायचे तर आपणास ‘मार्मिक-सेना-मार्मिक’ असे पाहावे लागेल. ‘मार्मिक’मधून सेना उभी राहिली, पुढे ते सेनेचे पत्र बनले. एकदा का एखादे पत्र चळवळीचे-संघटनेचे झाले की मग त्याची भाषादेखील संघटनेचीच असणे गरजेचे असते. बाळासाहेबांची भाषा ‘मार्मिक’मध्ये आली आणि पुढे ती संघटनेची झाली आणि मग संघटनेची भाषा पत्रात आली अशी ती सांगड आहे.
एकदा मी अत्रे व डांगे यांचे व्यंगचित्र काढले. बाळासाहेबांनी ते स्वत: दुरुस्त करून ‘मार्मिक’मध्ये वापरण्यास सांगितले. १९८५ नंतर बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढणे बंद केले. बाळासाहेबांचा हात थरथरत असे. बाळासाहेब म्हणायचे देखील, ‘‘अरे ज्या हातावर मुंबई थरथरायची तेच हात आता थरथरत आहेत.’’ मी पुन्हा ‘मार्मिक’मध्ये आल्यावर बाळासाहेबांची जुनी व्यंगचित्रे पुन्हा छापायची का असा विचार करत होतो. बाळासाहेब म्हणाले, ‘‘संदर्भ जुने असले तरी परिस्थिती तशीच आहे.’’
बाळासाहेबांनी शिवसनिकांना भरभरून दिले. मला लोक विचारतात, ‘‘तुम्हाला काय मिळाले?’’ खरं म्हणजे काय काय सांगू.. वयोमानानुसार माझ्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मी केईएममध्ये दाखल झालो होतो. बाळासाहेबांना हे कळले, त्यांनी मला तेथून बाहेर काढले. थेट नीतू मांडकेना बोलवून घेतले आणि माझ्यावर शस्त्रक्रिया करायला लावली. दुसरा प्रसंग मला पेसमेकर बसवायचा होता. तेव्हा तर माझी व्यवस्था थेट लीलावतीमध्ये केली होती. पुढे तोच पेसमेकर बदलायचा होता. आयुष्यभर टिकणारा पेसमेकर मला बसवायला त्यांनी लीलावतीमध्ये सांगितले. हे जे घरगुती अगत्य, जिव्हाळा होता तो माझा ठेवा आहे. इतकेच नाही तर माझी धर्मपत्नी निवर्तण्यापूर्वी तिला बाळासाहेबांना भेटायचे होते. बाळासाहेब बाहेर होते, पण ते १५ मिनिटे सलग फोनवरून तिच्याशी बोलले. हे दुसरे कोण करू शकेल का? बाळासाहेब हे असे तुमच्या-आमच्या सर्वच शिवसनिकांच्या सुख-दु:खाशी एकरूप झालेले होते
















पंढरीनाथ सावंत

response.lokprabha@expressindia.com.
 

माझ्याबद्दल