मंगळवार, २९ मार्च, २०१६

शेळी करेल तुम्हाला मालामाल


शेळी करेल तुम्हाला मालामाल

बाजारात बोकडाच्या मटणाला मिळणारी किंमत शेतकरीवर्गाला आकर्षित करत आहे. सध्याच्या परिस्थितीचा साधारणपणे विचार केला असता शेळीपालन हा व्यवसाय इतर पशुपालन व्यवसायापेक्षा अधिक फायदेशीर आहे. 
Sheli mendhiबाजारात बोकडाच्या मटणाला मिळणारी किंमत शेतकरीवर्गाला आकर्षित करत आहे. सध्याच्या परिस्थितीचा साधारणपणे विचार केला असता शेळीपालन हा व्यवसाय इतर पशुपालन व्यवसायापेक्षा अधिक फायदेशीर आहे. शेतकरीवर्गाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पादनांत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे शेतकरी जोडधंदा करण्यास प्रवृत्त झालेला आहे.
शेळीपालन या व्यवसायास शास्त्रीय ज्ञानाची जोड दिल्यास हा व्यवसाय अधिक फायदेशीर होईल. त्यासाठी बंदिस्त जागेत शेळीपालन करणे महत्त्वाचे आहे. तसेच संकरित जाती पाळणे हे व्यापारी दृष्टिकोनातून अधिक फायदेशीर होईल.
बंदिस्त शेळीपालनाचे फायदे
शेळी आकाराने लहान असल्यामुळे जागा कमी लागते. त्यामुळे जागेचा व बांधकामास खर्च कमी येतो. शेळी हा प्राणी कळपात राहत असल्यामुळे कळपाची वाढ झपाटय़ाने होते व लहान कळप घरातील स्त्रिया व मुले सहजपणे हाताळू शकतात. त्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो, शेळी हा प्राणी अत्यंत काटक प्राणी आहे व बंदिस्त जागेत शास्त्रीय पद्धतीने त्याचे संगोपन केल्यास रोगराईचे प्रमाण कमी होते.
औषधोपचारावरील खर्च कमी होतो. मरतुक कमी होते व त्याचमुळे फायद्यात वाढ होते. शेळय़ांसाठी कुठल्याही प्रकारचे किमती खाद्य लागत नाही. शेतातीलच काही टाकाऊ पदार्थापासून शेळीचे खाद्य तयार करता येते. त्यामुळे खाद्याचा खर्च कमी होतो, शेळय़ा चरायला सोडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. तसेच जंगलातील झाडेझुडूपे यांचे नुकसान होते. शेळीला जखमा व्हायची शक्यता वाढते. हे नुकसान शेळय़ा बंदिस्त जागेत ठेवल्यामुळे टाळता येते.
आपल्या देशामध्ये वेगवेगळय़ा भागात वेगवेगळय़ा प्रकारचे हवामान असल्यामुळे गोठा बांधण्याच्या ठिकाणी त्या त्या भागातील हवामानाला व गोठय़ातील वायू विसर्जनाचा विचार करून बांधकामाचे साहित्य निवडावे. बांधकाम करताना वापरासाठी स्थानिक व सर्वसाधारण उपलब्ध असलेल्या साहित्याची निवड करावी. शेतातील टाकाऊ पदार्थ, गव्हाचे किंवा भाताचे कांड, ज्वारी बाजरीचे कांड, सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे यांचा वापर करावा.
सर्वसाधारणपणे सूर्यप्रकाश व पावसापासून संरक्षण होईल अशा प्रकारचे छप्पर निवडावे. गोठा हा पूर्व-पश्चिम दिशेत बांधावा. गोठय़ामध्ये शुद्ध हवा सतत खेळती राहावी. त्यामुळे गोठय़ातील उष्णता, कार्बन वायू, धूळ, आद्र्रता, गोठय़ाबाहेर पडण्यास मदत होते. म्हणूनच गोठा बांधताना त्यांच्या मध्यावर उंची जितकी जास्त ठेवता येईल तितकी ठेवावी. सर्वसाधारणपणे १५ ते १८ फूट उंची ठेवावी. शेळय़ांना सतत कोरडी जमीन उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच मलमूत्र स्वच्छ करता येण्याजोगी जमीन ठेवावी.
व्यायामासाठी शेळय़ांना सर्वसाधारणपणे तेवढय़ाच जागेची आवश्यकता असते. ही जागा गोठय़ाच्या एका बाहेरच्या बाजूला ठेवावी, त्यावर छप्पर बांधण्याची गरज नाही. सावलीसाठी मोठी झाडे लावावीत. खाद्य देण्यासाठी एका बाजूला लाकडी फळय़ांचा वापर करून गव्हाण तयार करावे. गव्हाणामध्ये शेळय़ा आत जाऊन खाद्याची नासाडी करू नये म्हणून आडव्या बांबूचा उपयोग करावा. दुस-या बाजूला जवळपास तीन फूट उंचीवर हिरवा चारा बांधावा. अशी व्यवस्था केल्यास शेळय़ांच्या नैसर्गिक सवयीप्रमाणे त्यांना
हिरवा चारा खायला मिळून त्यांना मानसिक समाधान लाभेल. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शक्यतो बाहेरील मोकळय़ा व्यायामाच्या जागेतच करावी. शक्यतो बोकड व करडे यांसाठी वेगळा गोठा बांधावा. बोकडाचा गोठा मुख्य गोठय़ापासून लांब अंतरावर बांधावा. त्यामुळे शेळीच्या दुधास येणारा विशिष्ट वास थांबवता येईल.
हिरवा चारा देण्यासाठी दुस-या पद्धतीनुसार जमिनीपासून तीन फुटांवर लाकडाचा उपयोग करून रॅक्स तयार कराव्यात. ओला चारा टाकण्यात यावा. त्या दोन इंचांमधून आतील चारा बाहेर डोकावेल व शेळय़ा दोन पायांवर उभ्या राहून चारा खातील अशा प्रकारचे लाकडी पिंजरे लावल्यानंतर शेळय़ांना त्यांच्या नैसर्गिक सवयीप्रमाणे खाद्य खाण्यास पोषक वातावरण निर्माण होईल.
जेथे मोकळी व कोरडी जमीन नसेल व हवेत आद्र्रता जास्त प्रमाणात असेल अशा ठिकाणी रेंज्ड प्लॅटफॉर्म पद्धती स्वीकारण्यात यावी. यामध्ये बंदिस्त जागेत जमिनीपासून तीन ते चार फूट उंचावर लाकडी प्लॅटफॉर्म तयार करावेत. हे लाकडी प्लॅटफॉर्म तयार करण्याकरता लाकडी पद्धतीची जोडणी करून माळा तयार करावा. दोन पट्टय़ांमध्ये एक ते दोन सेंटीमीटर अंतर ठेवावे. अशा माळय़ावर शेळय़ांचे संगोपन केल्यास लाकडी पट्टय़ांमधून मलमूत्र खाली पडेल व माळा कोरडा राहील.
या पद्धतीमुळे शेळय़ांच्या लेंडय़ा गोळा करून त्यांचा खतासाठी मोठय़ा प्रमाणात उपयोग करता येईल व त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळेल. बंदिस्त जागेमध्ये शेळय़ांची वेगवेगळय़ा प्रकारात ज्यामुळे शेळय़ांना वयोमानाप्रमाणे खाद्य देता येईल व खाद्याची नासाडी होणार नाही. शेळय़ा एकत्र ठेवल्यास लहान शेळय़ांना मोठय़ा शेळय़ा खाद्य खाऊ देत नाहीत, त्यामुळे त्यांची वाढ खुंटते व आपणास आर्थिक तोटा होतो. हा तोटा टाळला जाऊ शकतो.
सुधारित शास्त्रीय ज्ञानाने शेळीपालन केल्यास दुर्बल घटकांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल व त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल.ज्या मादी धष्टपुष्ट करडे देत असेल अशा माद्या निवडून बाजूला ठेवाव्यात. अशा माद्यांपासून जास्तीत जास्त करडे घेण्याचा प्रयत्न करावा. जी करडे धष्टपुष्ट असतील त्यांची वाढ जास्त होते व त्याचा फायदा होऊ शकतो. यातील करडे वेगळी ठेवावीत व प्रजननासाठी वापरावीत.
ज्या शेळय़ांनी अगोदरच्या वेतात दोन किंवा दोनपेक्षा जास्त करडे दिली आहेत त्यांनाच शेळीपालनासाठी निवड करून पैदास करावी. बोकडांची मागणी ‘होळी’ व ‘बकरी ईद’ या सणांमध्ये जास्त असते. त्यावेळी बकरा जेवढा आकर्षक, धष्टपुष्ट व सुंदर असतो तेवढी मागणी व किंमत जास्त असते. शेळय़ा ७ ते १० महिन्यांच्या असताना माजावर येतात. परंतु मादीचे वय १४ ते १८ महिने व वजन २५ ते ३० किलो असताना पैदाशीसाठी वापर करावा. मार्च ते जून या काळात माद्या मुका माज दाखवतात. परंतु नर बरोबर असल्यास माज नीटपणे ओळखता येतो.

मोबाईल क्रमांक ९३२३६९९८८७.
Daily - Prahar 

बंदिस्त शेळीपालन जोड नव्हे, मुख्य व्यवसाय!

शेळीपालन सर्वच करतात, पण त्यांना पौष्टिक खाद्य म्हणून पुरवण्यात येणा-या चा-याचे काय? अश्विन सावंत या तरुण शेतक-याने याचे उत्तर अत्याधुनिक ‘हायड्रोफोनिक फॉडर सिस्टीम’मध्ये शोधले आहे. दुष्काळाची कायम चिंता भेडसावणा-या भागात गुरांसाठी चा-याची (वैरण) समस्या हायड्रोफोनिक फॉडर तंत्र चुटकीसरशी सोडवू शकते. यातूनच जोड नव्हे, तर मुख्य व्यवसाय म्हणून शेळीपालन अर्थात गोट फार्मिगचा व्यवसाय सावंत यांनी उभा केला आहे.
goat 

मुंबई- शेतीला जोडव्यवसाय म्हणून गोट फार्मिग अर्थात शेळीपालनाचा पर्याय आहे. मात्र गोटफार्मिगकडे जोडव्यवसाय नाहीतर मुख्य व्यवसाय म्हणूनच पाहिले पाहिजे, असे आवाहन पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील हापूस बाग येथील अश्विन रमेश सावंत या तरुण शेतक-याने केले आहे.
अफ्रिकन बोअर, बोअर क्रॉस, सीरोही, जमुनापारी, तोतापरी, सोजात, बारबेरी या देशीविदेशी जातीच्या बंदिस्त शेळीपालनातून त्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तमाम शेतक-यांपुढे रोजगारासाठी सक्षम पर्याय उभा केला आहे. शेळीपालन सर्वच करतात, पण त्यांना पौष्टिक खाद्य म्हणून पुरवण्यात येणा-या चा-याचे काय? हा प्रश्न या व्यवसायात पडलेल्या प्रत्येकाला भेडसावतो. याचे उत्तर अत्याधुनिक ‘हायड्रोफोनिक फॉडर सिस्टीम’ने (पाण्यावर तयार होणारा चारा) दिला आहे. हा चारा तयार करण्यासाठी लागणारे तंत्र अवगत करून ‘हायड्रोफोनिक’चा मळा फुलवण्यात अश्विनने यश मिळवले आहे.
दुष्काळाची कायम चिंता भेडसावणा-या महाष्ट्रात गुरांसाठी चारा (वैरण) हा कायमच भेडसावणारा प्रश्न. हा प्रश्न हायड्रोफोनिक फॉडर तंत्र चुटकीसरशी सोडवू शकते, हे अश्विन सावंत या तरुणाने प्रत्यक्षात करून दाखवले आहे. आगामी काळात याच ‘हायड्रोफोनिक सिस्टीम’वर काकडी, टोमॅटो, कांदा इतकेच काय सर्वच भाजीपाला पिकवणारी ‘कृषिक्रांती’ निर्माण करण्याचा संकल्प त्याने सोडला आहे.
अस्सल मुंबईकर अश्विन सावंत हा सँडहर्स्ट रोड, डोंगरी, बीआयटी चाळीतील सर्वसामान्य कुटुंबातील एक सदस्य आहे. वडील गोदी कामगार, आई गृहिणी, पत्नी, मुलगी असे त्याचे कुटुंब. बीई (मॅकेनिकल)पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी त्याने दुबई गाठली. तेथे दीड लाख रुपये पगारावर जवळपास दोन वर्षे तो नोकरी करत होता. मात्र या नोकरीत त्याचे मन रमत नव्हते.
दोन वर्षानंतर नोकरीचे कंत्राटही वाढवणार होते. पण या कंत्राटावर स्वाक्षरी न करता सरळ मायदेशी परतण्याचा निर्णय अश्विनने घेतला. दुबईतील एका प्लांटवर हायड्रोफोनिक फॉडर सिस्टीम (पाण्यावर तरंगणारा चारा) हे तंत्र त्याने पाहिले होते. कोणत्याही प्रशिक्षणाविना त्याने हे तंत्र महाराष्ट्रात राबवण्याचा निश्चय केला.
आपल्याकडील हवामानात हा चारा पिकवण्यासाठी त्याच्यापुढे मोठे आव्हान होते. मात्र इच्छाशक्तीच्या बळावर त्याने हे यश मिळवल्याचे तो सांगतो. हे सर्व शक्य होण्यामागे कुटुंबाची साथही महत्त्वाची ठरल्याचे अश्विन सांगतो. काहीतरी वेगळे करण्याची उमेदच नवे आपल्यातील खरी ऊर्जा असल्याचे अश्विन तरुण शेतक-यांना सांगत आहे.
बंदिस्त शेळीपालनाकडे वळणा-यांसाठी!
‘पायाने चालणारी माणसं अंतर कापतात. डोक्याने चालणारी माणसं धेय्य गाठतात’. ही उक्ती सार्थ ठरवत परदेशातील आधुनिक तंत्र आणि मंत्रातून आपल्या देशात कृषिक्रांती घडवण्यासाठी अश्विन सावंत हा तरुण शेतकरी सज्ज झाला आहे. त्याने केलेली ही क्रांती प्रत्यक्षात पाहण्यासाठी व बंदिस्त शेळीपालनातील नफ्या-तोटयाचे गणित समजावून घेण्यासाठी अश्विनने उभारलेल्या पुणे जिल्हा, मु. हापूस बाग, जुन्नर गोट फार्मला एकदा तरी भेट द्यायला हवी.
संपर्क : अश्विन सावंत : ९७७३५६७९०४, ९८५०९८०३१७.
काय आहे हायड्रोफोनिक चारा?
गहू, बार्ली, जव, मका, बाजरीपासून तयार झालेला प्रोटिनयुक्त चारा शेळीच्या वाढीसाठी पौष्टिक खाद्य आहे. अगदी मुळापासून वाढ झालेला हा चारा जनावरांसाठी पोषक ठरून वजन वाढण्यासही मोठी मदत होते.
हायड्रोफोनिक चा-यासाठी यंत्रणा कशी उभारायची, त्यासाठी आवश्यक तापमान कसे राखायचे आदी अनेक गोष्टी अश्विन सावंत यांच्या ‘जुन्नर गोट फार्मिग’मध्ये प्रात्यक्षिकांसह पाहायला मिळतात. पारंपरिक पद्धतीने प्रत्येक ऋतुचक्रात वर्षाचे ३६५ दिवस हिरवा आणि पौष्टिक चारा निर्माण करता येऊ शकतो, ही किमया अश्विन सावंत या तरुण शेतक-याने साधली आहे.
शेळीपालनापेक्षा चारा हाच सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न आहे. त्याला ‘हायड्रोफोनिक’ चारा हेच येत्या काळातील प्रभावी उत्तर अश्विन सावंत या तरुण शेतक-याच्या रूपाने मिळाले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
मागणी आहे, पण पुरवठा नाही!
धष्टपुष्ट शेळीला महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोप-यातून प्रचंड मागणी आहे. मात्र ‘मागणी अधिक आणि पुरवठा कमी’ अशी परिस्थिती आहे. ईद हेच शेळीपालन करणा-यांसाठी मुख्य मार्केट आहे. ईदीच्या काळात राजस्थानमधून ट्रकच्या ट्रक मुंबईत दाखल होत असतात.
अगदी ५० ते ६० हजार आणि त्याहीपुढे लाखांपर्यंत शेळी व बोकडांसाठी बोली लागते. महाराष्ट्र, गुजरात, हैदराबाद, कर्नाटक आदी राज्यांत शेळी खरेदीसाठी मोठी बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी दोन वर्षे विनानफा आणि मेहनत हाच पर्याय असल्याचे अश्विन सावंत सांगतो.
आर्थिक गणिताची जुळवाजुळव ही अनेकांसाठी अडचण असली तरी सुरुवातीला कमीत कमी २५ ते ३० आणि उत्तम नफा मिळवण्यासाठी १००च्या जवळपास शेळीपालन करण्याची गरज आहे, हे अनुभवातून अश्विन सांगतो.
शेतीकडे वळणा-या तरुणांनी शेळीपालन हा जोड नव्हे, तर मुख्य व्यवसाय म्हणूनच त्याकडे गांभीर्याने बघावे, हे महाराष्ट्रातील तमाम शेतक-यांना अश्विन सावंत हा तरुण शेतकरी मोठया तळमळीने सांगत आहे.


Daily - Prahar 


शेळी पालनाचे तीन प्रकार

goat
शेळी पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. परंपरागत पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना, कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मग दुसर्‍या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही. अशाच पद्धतीने आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जात आहेत. परंतु या पद्धतीत काही ङ्गायदे आहेत आणि काही दोषही आहेत. ङ्गायदा असा की, या पद्धतीत चारा-पाण्यावर काही खर्च होत नाही. त्यामुळे नफ्या-तोट्याचा काही प्रश्‍नच नसतो. मात्र या पद्धतीने ङ्गार मोठ्या प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत. एखाद्या सुशिक्षित शेतकर्‍याला शेळी पालनाचा उद्योग ङ्गार मोठ्या प्रमाणावर करून तीन-चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाची नाही. त्यामुळे बंदिस्त शेळीपालन ही पद्धत आता पुढे आली आहे. जसे आपण कोंबड्या पाळतो आणि त्यांना एका पिंजर्‍यामध्ये कायम कोंडून ठेवून तिथे त्यांना चारा-पाणी देतो. तशाच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचा गोठा तयार करून त्यात शेळ्या कायमच्या ठाणबंद ठेवल्या जातात. त्याला बंदिस्त किंवा बंदगोठा शेळीपालन असे म्हटले जाते.
त्याशिवाय ज्या शेतकर्‍यांना पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन शक्य नाही आणि पूर्णपणे मोकाट शेळीपालनही शक्य नाही अशा शेतकर्‍यांना अर्धबंदिस्त शेळीपालन उपयुक्त ठरते. त्यामध्ये थोडा वेळ शेळ्या ठाणबंद केल्या जातात आणि थोडा वेळ चरायला सोडल्या जातात. या पद्धतीला अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतात. मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळी पालनासाठी कुरणांची गरज असते. परंतु सध्या कुरणे कमी होत चालली आहेत. त्यामुळे पुढच्या काळात बंदगोठा शेळीपालन हा प्रकारच अधिक व्यवहार्य ठरणार आहे. मोकाट शेळी पालनामध्ये आंतरप्रजनन होत असते. त्यामुळे शेळीचा दर्जा घसरतो. पण बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण प्रजनानवर नियंत्रण ठेवू शकतो. बंदिस्त पालनात शेळ्यांच्या चार्‍यावर आणि आहारावर खर्च होतो ही गोष्ट खरी आहे. परंतु आपण व्यवस्थित चारा आणि आहार देत असल्यामुळे या पद्धतीतील शेळ्यांचे वजन भराभर वाढत जाते. जी गोष्ट मोकाट शेळी पालनात शक्य नाही. बंदिस्त शेळी पालनाचा आणखी एक ङ्गायदा म्हणजे आपण या पद्धतीत शेळ्यांच्या रोगराईवर नियंत्रण आणि लक्ष ठेवू शकतो. बंदिस्त शेळीपालन करणार्‍यांनी आपल्या पारंपरिक पद्धतीनेच गोठा तयार करावा. या गोठ्यामध्ये दोन भाग करावेत. निम्म्या भागावर छप्पर असावे तर निम्मा भाग छपराविना परंतु आजूबाजूने कुंपण असलेले असावे. म्हणजे काही काळ शेळ्या छपराच्या गोठ्यात राहतील आणि काही काळ मोकळ्या हवेला छप्पर नसलेल्या गोठ्यात येतील.
कोंबड्याप्रमाणे त्यांना चोवीस तासात छपराच्या गोठ्यात बांधण्याची गरज नाही. गोठा थोडा उंचावर बांधावा. त्यात हवा खेळावी यासाठी आजूबाजूला जाळी असावी. तसेच पावसाचे पाणी गोठ्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. सिमेंट पाईपचे दोन अर्ध गोलाकार तुकडे करून त्यांच्या गव्हाणी बनवाव्यात. त्या गव्हाणीमध्ये चारा आणि खुराक टाकता यावा. अशाच पाईपाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठीही करता येईल. हा गोठा बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, गोठा बांधण्यासाठी ङ्गार खर्च करू नये. क्रॉंक्रिटच्या भिंती, सिमेंटचे पत्रे यांची काहीही आवश्यकता नाही. मात्र कोणाला हौस म्हणून पॉश गोठा बांधायचा असेल तर त्यांना कोण अडवणार ? परंतु अशा गोठ्यावर होणारा खर्च हा अनुत्पादक खर्च असतो आणि तो शेळ्यांच्या व्यवसायातून वसूल होणे अवघड जाते. मग नफ्या-तोट्याचे गणित बिघडते. शेळी पालन उद्योगामध्ये शेळीचे आरोग्य हा विषय सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे शेळीचा गोठा तयार करताना आरोग्याचा विचार करावा लागतो. विशेषत: शेळ्यांचे मलमूत्र त्या गोठ्यात साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.
अजूनही बर्‍याच शेतकर्‍यांमध्ये शेळ्यांच्या मरण्याविषयी काही गैरसमज आहेत. शेळ्यांना रोग होऊन त्या पटापट मरतात असे बर्‍याच लोकांना वाटते. मात्र असे शेळ्या मरण्याचे प्रकार ङ्गार अपवादात्मक असतात. परंतु असा एखादा प्रकार घडला की, त्याच्या बातम्या वृत्तपत्रात मोठ्या प्रमाणावर छापून येतात आणि आधीच असलेला गैरसमज अधिक दृढ होतो. याचा अर्थ शेळ्या मरत नाहीत असा नाही, तर असे प्रकार ङ्गार कमी असतात आणि शेळ्यांच्या विविध रोगांसाठी द्यावयाच्या लसी वेळेवर दिल्या तसेच अधूनमधून आवश्यक असलेले औषध त्यांना देत गेलो तर शेळ्या मरण्याची शक्यता नसते. शेळ्यांच्या अंगावर गोचीड, पिसवा, उवा, लिखा यांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना अधूनमधून गोचीडनाशक पाण्याची आंघोळ घालावी. शेळ्यांना जंतनाशक औषध सुद्धा पाजावे लागते. ते वर्षातून दोनदा पाजले जाते. अशा औषधांची माहिती आणि उपचार यासंबंधी आपल्या नजिकच्या जनावरांच्या दवाखान्यात जाऊन चौकशी करावी. त्यातल्या काही लसी या दवाखान्यात मिळत असतात. त्यांचा वापर करावा.
शेळ्यांवर असा इलाज करूनही शेळी काही अनामिक कारणाने मरू शकते. तिच्या अशा मृत्यूनंतर तिची भरपाई मिळण्यासाठी शेळीचा विमा उतरवावा. मध्येच शेळी अचानक मेली तर विमा कंपनीकडून भरपाई मिळू शकते. महाराष्ट्रामध्ये शेळी पालनाच्या व्यवसायाला चांगला वाव आहे आणि शेतकर्‍यांची या व्यवसायामुळे आर्थिक अरिष्टातून सुटका होऊ शकते हेही लक्षात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन सुद्धा या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अशा उद्योगांचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था शेळी पालनाचे प्रशिक्षण देणारे वर्ग आयोजित करीत आहेत. ज्या शेतकर्‍यांना बंदगोठा शेळी पालन करण्यामध्ये रूची असेल आणि या व्यवसायात काही करण्याची इच्छा असेल त्या शेतकर्‍यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. या दोन संस्थांच्या मार्ङ्गत काही माङ्गक ङ्गी घेऊन भरवल्या जाणार्‍या १२ दिवसांच्या शेळीपालन वर्गात सहभागी व्हावे. त्यातून शेळी पालनाविषयीच्या सर्व अंगोपांगांची माहिती त्रोटक स्वरुपात का होईना पण मिळू शकते.
सांघिक शेळीपालन
शेळी हा असा एक प्राणी आहे की, ज्या प्राण्याचे पूर्ण शरीरच उपयोगाचे असते. आपण ङ्गक्त मटणाचा विचार करतो. पण शेळीची कातडी, शिंग, खूड, हाडे आणि केस यांचे किती उपयोग होतात याचा आपण कधी विचारच करत नाही. हा प्रत्येक अवयव उपयोगाचा असतो. शेळीच्या कातडीचा उपयोग तर कसा होतो असतो हे आपल्याला माहीतच आहे. पर्स, बॅगा तयार करण्यासाठी ही कातडी वापरली जाते. त्यानंतर हाडे. बर्‍याच जणांना हाडांचा एक उपयोग माहीत आहे, तो म्हणजे खत म्हणून. कोणत्याही जनावरांच्या हाडांची भुकटी शेतामध्ये खत म्हणून उपयुक्त असते. परंतु शेळीच्या हाडांची पावडर टूथ पेस्टमध्ये मिसळली जाते. म्हणजे आपण ज्या टुथपेस्टने दात घासतो तिच्यात शेळीच्या हाडांची पावडर मिसळलेली असते. हाडांमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे टुथपेस्टमध्ये ती मिसळली की, त्या टुथपेस्टमुळे दात मजबूत होतात, हा त्यामागचा विचार असतो. बरेच शाकाहारी लोक शाकाहाराची कडक पथ्ये पाळत असतात. त्यातल्या ज्या लोकांना टुथपेस्टमध्ये हाडे असतात हे माहीत असते ते लोक टुथपेस्टने दात घासत नाहीत ते यामुळेच. शेळीच्या शिंगापासून हस्तकलेद्वारा काही आकर्षक शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. अशा वस्तू परदेशात पाठविल्या तर त्यांना चांगली किंमत येते.
आपण एखादी शेळी किंवा बोकड दोन किंवा तीन हजाराला विकून टाकतो, परंतु शिंगांचा योग्य वापर करणारा मासूण नुसत्या शिंगापासून दोन हजार रुपये कमवू शकतो. तशीच अवस्था खुरांची सुद्धा असते. शेळीच्या आणि बोकडांच्या खुरापासून शर्टाच्या गुंड्या (बटन) बनवल्या जातात. मेंढ्यांच्या केसापासून लोकर तयार होते हे तर सर्वांना माहीतच आहे. परंतु शेळीचे केस सुद्धा उपयुक्त असतात. या केसापासून पश्मिना नावाचा कपडा तयार होतो. हा कपडा ङ्गार महाग असतो. विशेषत: कोटांच्या आतल्या बाजूला अस्तर म्हणून पश्मिना कापड वापरले जाते. पश्मिना कापडाच्या शाली आणि गरम कपडे ङ्गार महाग असतात. पश्मिनाचे एखादे स्वेटर साधारणत: हजार रुपयांना विकले जाते. शेळीच्या केसापासून हा कपडा तयार करण्याचे कसब काश्मीर आणि तिबेटमधल्या काही विशिष्ट कलाकारांनाच अवगत आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी आपल्या शेळ्या निव्वळ विकून न टाकता सामूहिकरित्या कत्तलखाने उभे केले तर शेळीचे केस, खूर, शिंग, हाडे आणि चामडी या सर्वांचे पैसे शेतकर्‍यांच्याच पदरात पडू शकतील. म्हणून शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आपले स्वत:चेच कत्तलखाने उभे करणे ङ्गायद्याचे ठरणार आहे.

by - 


शेळी पालनाचे शास्त्र जाणा

goat1
शेळ्या आणि बोकड यांचे एक वेगळे अर्थशास्त्र तर आहेच, पण त्याचे जीवशास्त्रही विचारात घेणे आवश्यक आहे. बर्‍याच शेतकर्‍यांना आपल्याजवळची शेळी कोणत्या जातीची आहे हे माहीत नसते. चौकशी केली तर आमची शेळी आपली साधी गावरान शेळी आहे, असे मोघम उत्तर दिले जाते. शेळींच्या जातींचा आणि प्रजननाचा विचार केल्याशिवाय शेळी पालन कधीही यशस्वी आणि ङ्गायदेशीर होणार नाही. चार-पाच किंवा ङ्गार तर दहा-बारा शेळ्या पाळणार्‍यांना ङ्गायद्या-तोट्याचा विचार ङ्गारसा करावा लागत नाही. कारण त्यांच्या शेळ्या बिनखर्ची पाळल्या जात असतात. काही शेतमजूर आपल्या सोबत चार-दोन शेळ्या घेऊन कामावर जातात. त्या शेळ्या दिवसभर इकडे तिकडे चरतात. त्यामुळे त्यांच्या चार्‍यावर वेगळा खर्चच करावा लागत नाही. त्यामुळे जे काही उत्पन्न मिळते तो ङ्गायदाच असतो. अशा लोकांना शेळ्यांची प्रजनन क्षमता, त्यांच्या क्षमतेत होणारी वाढ वगैरे मुद्यांचा विचार करण्याची गरजच पडत नाही. परंतु अशा चार-दोन किंवा दहा-बारा शेळ्या पाळणारे लोक आपल्या शेळ्यांना किती पिली होत आहेत आणि किती व्हायला पाहिजेत याचा कधी विचारच करत नाहीत. मग हळु हळु त्यांच्या शेळ्यांना होणार्‍या पाटींना एकेकच पिलू व्हायला लागते. त्याचे वजनही म्हणावे तसे भरत नाही.
हा सगळा त्या शेळीच्या वंशाचा होणारा र्‍हास असतो. त्याचे कारण काय ? थोडे समजून घेतले पाहिजे. आपल्या शेळ्यांच्या छोट्याशा खांडामध्ये सात-आठ शेळ्या आणि दोन-तीन बोकड असतात. त्या शेळ्यांच्या पोटी बोकड जन्माला आले की, आपण जुनी बोकडे विकून टाकतो आणि पुढे आपल्याकडे असलेले बोकड मोठे झाले की, त्यांचा त्याच खांडातल्या शेळ्या आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या शेळ्या यांच्याशी संबंध येतो. थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते बोकड त्या शेळीचे मूल आहे आणि त्यातल्या काही शेळ्यांचा भाऊ आहे. शरीर संबंधाच्या बाबतीत माणूस जसा विचार करतो तसा शेळ्या करत नाहीत. परंतु आपण त्यांच्या बाबतीत तसा विचार केला पाहिजे आणि आपल्याच खांडातल्या बोकडांचा आपल्याच खांडातल्या शेळ्यांशी म्हणजे एकाच कुटुंबातल्या शेळ्यांशी संबंध येऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे. तशी न घेतल्यामुळे त्या शेळ्यांचा वंश दर्जेदार होत नाही. पुढे पुढे त्यांची क्षमता कमी कमी होते. यावर उपाय काय ? आपल्याच गावामध्ये आपल्यासारखे कोणी शेळीपालक असतील तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हे शास्त्र पटवून दिले पाहिजे आणि बोकडांची आपापसात अदलाबदल केली पाहिजे. तर शेळी पालन ङ्गायदेशीर ठरू शकते.
महाराष्ट्रात सध्या मटणासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबादी शेळींची पैदास करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे डॉ. वसंतराव मुंडे, उस्मानाबाद (ङ्गोन ९४२२५६५३६५) हे नेहमी शेळ्या पाळणार्‍यांना एक आव्हान देत असतात. ‘२५ शेळ्या पाळा आणि मारुती कार पळवा’ अशी त्यांची घोषणा आहे. मात्र या २५ शेळ्या अभ्यासपूर्ण रितीने पाळल्या पाहिजेत, असा त्यांचा कटाक्ष आहे. आपण आता केलेला बोकडांच्या अदलाबदलीचा विचार याच दृष्टीने महत्वाचा आहे. शेळी पालनाच्या शास्त्राची माहिती असणे हा व्यवसाय ङ्गायद्यात चालण्यासाठी आवश्यक असते. कारण शेळी हा सजीव प्राणी आहे. अनमानधपक्याने किंवा अंदाजपंचे हा व्यवसाय केला तर तो कसाबसा चालू शकेल. पण त्यात ङ्गारसा ङ्गायदा होणार नाही. तो शास्त्रीय पद्धतीने केला तर मात्र तो शेतकर्‍यांच्या जीवनाचा मोठा आधार बनू शकतो. काही शेतकरी अक्कलहुशारीने हा व्यवसाय करत असतात. काही लोकांनी या संबंधात माहिती दिलेली आहे. मुस्लीम समाजाच्या बकरी ईद या सणामध्ये प्रत्येक कुटुंबात एक तरी बळी देवाला दिला जात असतो. तो साधारणत: बकर्‍याचा असतो. त्यामुळे बकरी ईद दिवशी बोकडांची मोठी टंचाई जाणवत असते. अक्षरश: बोकडासाठी तू मी तू मी सुरू असते आणि या चढाओढीमध्ये बकर्‍याला जास्त पैसे मिळतात.
त्याचा ङ्गायदा घेऊन काही शेळी पालक शेतकरी वर्षभरात आवश्यक तेव्हाच बोकड विकतात आणि काही बोकड केवळ बकरी ईद साठी राखून ठेवतात. अगदी ग्रामीण भागात सुद्धा या बोकडांना त्या दिवशी प्रचंड मागणी असते. वेळ प्रसंगी चार पैसे जास्त देऊन बोकूड खरेदी करण्याची मुस्लीम भाविकांची तयारी असते. धार्मिक भावना तीव्र असल्यामुळे असे भाविक लोक पैसे देण्यासाठी बिलकूल मागे-पुढे पहात नाहीत. ती शेतकर्‍यांसाठी पर्वणीच असते. याचा विचार करून काही हुशार शेतकरी केवळ बकरी ईद साठी म्हणून खास बोकड सांभाळतात. विशेष करून मुंबईमध्ये त्या दिवशी बोकडांना ङ्गारच पैसे मिळतात. कित्येक शेतकर्‍यांच्या बोकडांना मुंबईत वीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत किंमत आलेली आहे. एरवी हेच बोकड गावच्या आठवड्याच्या बाजारात पाच-सहा हजाराला सुद्धा जात नाही. विशेषत: बोकूड जन्माला आल्यानंतर त्याच्या कपाळावर चंद्राच्या आकाराचा किंवा चंद्राच्या कोरीच्या आकाराचा पांढरा ठिपका असेल तर अशा बोकडाच्या मालकाचे उखळ पांढरे झालेच समजा. दर बकरी ईद सणाला असे पांढरे ठिपके असलेले बकरे केवढ्याला विकली जात असते याची चर्चा होत असते आणि दर वर्षी अशा बोकडाच्या किंमतीनी खळबळ निर्माण केलेली आपल्याला दिसते.
या वर्षी तर असे पांढरे ठिपकेवाली बोकडे लाखाच्या पुढे आणि दीड-दीड लाखापर्यंत गेलेली आहेत. तेव्हा शेळी पालकांनी जमेल तशी बकरी बकरी ईदसाठी राखून ठेवली पाहिजेत आणि पांढरा चॉंदवाला बोकड तर जीवापाड जपून त्याला मुंबईला नेऊन विकले पाहिजे. सोलापूर, नगर या भागामध्ये काही शेळी पालक हा व्यवसाय करतात आणि टेंपो भरून बकरे बकरी ईदला मुंबईत घेऊन जातात. हा एक अभ्यासाचा आणि निरीक्षणाचा मुद्दा आहे. शेळी पाळणार्‍या शेतकर्‍यांना दरवर्षीच बकरी ईदच्या बोकडांच्या किंमतीची चर्चा ऐकायला मिळत असते. परंतु ती ऐकून त्यापासून ते काही बोध घेत नाहीत. तसा तो घेतला पाहिजे आणि व्यापारी बुद्धीचा वापर करून चार पैसे जास्त मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच तर अभ्यास आहे.



गरिबांची गाय : शेळी

goat
महात्मा गांधी शेळीला गरिबांची गाय म्हणत असत. कारण शेळीही गायीप्रमाणेच दूध देते पण गाय महाग असते. गोपालन करायला मोठी गुंतवणूक करावी लागते. जर्सी गायी तर हजारो रुपयांना विकल्या जात आहेत आणि म्हशींचे तर विचारूच नका. त्यामुळे अगदी गरीब शेतकर्‍यांना आणि शेतमजुरांना तेवढाले पैसे गुंतवून गाय किंवा म्हैस खरेदी करणे परवडत नाही. अशा लोकांना करता येणारा सर्वात सोपा आणि कमी भांडवलाचा धंदा म्हणजे शेळी पालन. हा धंदा किरकोळ भांडवलात करता येतो. काही तरुण हा व्यवसाय करण्याची योजना आखतात पण त्यांच्या धंद्याच्या काही विशिष्ट कल्पना असतात. धंदा करणे म्हणजे बॅँकेत जाणे, लोन काढणे आणि दणक्यात उद्घाटन करून धंदा सुरू करणे अशी त्यांची कल्पना असते. ते त्यासाठी र्बँकांकडे चकरा मारायला लागतात पण बँका काही त्यांना लोन देत नाहीत. मग हे तरुण वैतागतात. यामागे कारण काय आहे ? पूर्वीपासून शेळीबाबत काही प्रचार झालेला आहे. शेळी ही झाडांचे आणि पिकांचे शेंडे खाते. त्यामुळे शेळी हा पिकांचा आणि झाडांचा शत्रू आहे असे समजले जात आहे. तो जर शत्रू आहे तर त्यासाठी कर्ज कशाला द्यायचे अशी अनेक बँक अधिकार्‍यांची मन:स्थिती आहे. वास्तविक शेळी पालनाच्या तंत्रात अनेक बदल झाले आहेत.
शेळी हा पिकांचा शत्रू वगैरे काही राहिलेला नाही.शेतीचे नुकसान न करता शेळी पाळता येते. पण, ही गोष्ट बँकांच्या अधिकार्‍यांपर्यंत अजून पोचलेली नाही. त्यामुळे परंपरेने चालत आल्याप्रमाणे शेळीला कर्ज नाकारले जाते. शेळीला कर्ज देण्यातली आणखी एक अडचण म्हणजे शेळ्यांना होणारे आजार. शेळ्यांना काही आजार झाला की त्या पटापट मरायला लागतात असा प्रवाद आहे. ही काही वस्तुस्थिती नाही. ङ्गार कमी वेळा असे प्रकार घडतात.तेही शेळ्यांना योग्य त्या लसी टोचल्या नसतील तर. पण, अशा काही शेळ्या मेल्या की वृत्तपत्रात मोठ्या बातम्या छापून येतात. एखाद्या जिल्ह्यात हजारो शेळ्या असतात पण त्यातल्या पाच पन्नास शेळ्या मेल्या तरी शेळ्या आता संपत चालल्या की काय अशी अतिशयोक्ती करून चर्चा व्हायला लागते. बँकांचे अधिकारी काही शेळ्या मोजायला जात नाहीत की मरणार्‍या शेळ्यांची मोजदाद करायला जात नाहीत. वृत्तपत्रातल्या बातम्या वाचून त्यांच्याही मनावर परिणाम होतो आणि ते शेळ्या पाळण्यासाठी लोन न दिलेले बरे अशा निष्कर्षाप्रत येतात. शेळ्यांच्या बाबतीत येणारी आणखी एक अडचण म्हणजे जिच्यावर कर्ज घेतले आहे ती शेळी विकता कामा नये यावर बँकांना लक्ष ठेवता येत नाही. शेतकरी कोणत्याही क्षणी उठतो की बाजारात जाऊन शेळी विकून टाकू शकतो. मग कर्ज वसूल कसे करायचे असा बँकांचा प्रश्‍न असतो.
या उपरही काही लोकांना शेळी पालनासाठी लोन मिळते. सर्वांनाच असे लोन मिळणे अवघड आहेे. एका तरुणाने एकदा मला अशाच शेळी पालनासाठी कर्ज मिळण्यात येणार्‍या अडचणी सांगायला सुरूवात केली. तो दोन वर्षांपासून लोन साठी प्रयत्न करीत होता. त्यासाठी त्याने तालुक्याच्या गावी, जिल्हा उद्योग केन्द्रात आणि बँकेच्या हेड ऑङ्गिसमध्ये चकरा मारण्यात किमान दोन तीन हजार रुपये तरी खर्च केला होता. खरे तर त्याने दोन वर्षाखाली तेच दोन हजार रुपये गुंंतवून दोन चार शेळ्या विकत घेतल्या असत्या तर त्यापासून या दोन वर्षात खंडीभर शेळ्यांचे खांड तयार झाले असते. लोन मिळत नसेल तर त्याच्या मागे न लागता अगदी थोडया पैशात हा धंदा सुरू करता येतो. वर्ष दोन वर्षात पिलांची संख्या वाढायला लागते. उगाच लोन लोन करीत बसण्याची गरजच काय ?
या व्यवसायात गुंतवणूक कमी आणि उत्पन्न जास्त आहे. जमा-खर्च, नङ्गा-तोटा याचा ङ्गारसा उपद्व्याप या व्यवसायात नाही. त्यामुळे दारात चार-पाच शेळ्या आणि पाच-सहा बोकड असले की, ती एक शेतकर्‍यांची बचत बँकच होऊन जाते. शेतकर्‍याला दैनंदिन अडचणींमध्ये पटकन् पैसा उपलब्ध होऊ शकत नसतो. मात्र घरात काही शेळ्या आणि बोकड असले की, या अडचणीवर मात करता येते. पटकन् एखादी शेळी किंवा एखादा बोकड बाजारात नेऊन विकून टाकला की, छोटी-मोठी गरज भागून जाते. म्हणजे शेळ्या ही एक बचत बँकच होऊन गेलेली आहे. बँकेतल्या बचत खात्यात पैसे ठेवावेत आणि लागेल तसे काढावेत, तसे शेळीच्या विक्रीतून पैसे काढता येतात आणि पैसे काढले तरी पुन्हा हाती असलेल्या शेळ्यांची पैदास वाढवून शेळ्यांची संख्या वाढतच जाते. सध्या मटणाला भाव ङ्गार आलेला आहे. मटण खाणार्‍यांची संख्याही वाढत चालली आहे. परंपरेने शाकाहारी असलेले अनेक लोक मांसाहार करायला लागले आहेत आणि परंपरेने मांसाहारी असलेले लोक नेहमीपेक्षा अधिक मांसाहार करायला लागले आहेत. त्यामुळे मटणाचे भाव वाढलेले आहेत. शक्यतो मांसाहार करणार्‍यांमध्ये बोकडांचे मांस म्हणजे मटण जास्त खाल्ले जाते.
सध्या मांसाहारी लोकांच्या थाळीमध्ये कोंबडी, काही प्रमाणात अन्य प्राणी यांचे मांस दिसायला लागले आहे. परंतु कोंबडी आणि शेळी यांच्या मांसाचे सेवन ९० टक्के इतके असते. त्यामुळे शेळीची मागणी वाढत चालली आहे. मटणाच्या मागणीचे प्रमाण केवळ भारतातच नव्हे तर सार्‍या जगातच वाढत चाललेले आहे. त्याला काही कारणे आहेत. यूरोप आणि अमेरिकेमध्ये गायीचे आणि डुकराचेही मांस खाल्ले जाते. परंतु डुकराचे मांस नेहमी खाल्ले जात नाही. ते ङ्गार कमी वेळा आणि अधूनमधून खाल्ले जाते. कारण डुकराच्या मांसामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. गोमांस खाल्ले जाते, परंतु काही कारणांनी गोमांसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. कोंबडी हा एक त्याला पर्याय आहे. परंतु अलिकडच्या पाच-सहा वर्षात कोंबडीला सुद्धा बर्ड फ्ल्यू या विकाराने ग्रासलेले आहे. अशी कोंबडी खाल्ल्यास माणसालाही फ्ल्यू होतो आणि तो जीवघेणा असतो. बर्ड फ्ल्यूची लागण वाढली की, लक्षावधी कोंबड्या मुंड्या मुरगळून मारून उकिरड्यावर टाकल्या जातात आणि त्या पुरल्या जातात.
अशा सार्‍या परिस्थितीमध्ये शेळीचे मांस म्हणजेच मटण हा एक सर्वात चांगला पर्याय राहिलेला आहे, आणि त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर सार्‍या जगामध्ये मटणाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. मटणासाठी शेळ्या पाळणे हा व्यवसाय त्यामुळेच अधिक प्राप्तीचा झालेला आहे. कधी जनावराच्या बाजारात चक्कर मारली तर शेळ्या आणि बोकडांसाठी ग्राहकांमध्ये तू मी तू मी चाललेले दिसते. इतकी शेळ्यांची टंचाई जाणवायला लागली आहे. शेळी हा प्राणी बहुतेक सर्व प्रकारच्या हवामानात पाळला जातो. परंतु जगभरातल्या शेळ्यांच्या जवळपास शंभर जातींपैकी २२ जातींचे पालन करणे भारतात शक्य होते. त्यामुळे मटणाची मागणी करणार्‍या सार्‍या देशांचे लक्ष मटणासाठी भारताकडे लागलेले आहेत. शेळी किंवा बोकड हा केवळ मांसासाठी पाळण्याचा प्राणी नाही. शेळीचे दूध हा एक मोठा मार्केटिंगचा विषय आहे. साधारणत: शेळीचे दूध काढून ते विकून पैसा कमावला जात नाही. तसा विचार ङ्गार कोणी केलेला नाही. मात्र त्याचा व्यवसायच करायचा झाल्यास ङ्गार मोठा व्यवसाय होऊ शकतो. परंतु शेळीच्या दुधाला उग्र वास असतो, अशी अडचण नेहमी सांगितली जाते. दुभत्या शेळीपासून बोकूड शक्यतो लांब बांधला तर हा वास टाळता येतो आणि शेळीच्या दुधाचे चांगले मार्केटिंग करता येते.
शेळीच्या दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. कोणत्याही प्राण्याच्या खाद्याचा परिणाम त्याच्या दुधावर प्राधान्याने होत असतो. शेळीला चरायला सोडल्यास आपल्याला असे लक्षात येईल की, ती कोणत्याही एका झाडाचा पाला पोटभर खात नाही. ती चरून येताना कमीत कमी २५-३० वनस्पतींची पाने तिच्या पोटात गेलेली असतात. आपल्या सभोवताली अशा अनेक वनस्पती आहेत की, ज्यांचा औषधी उपयोग आपल्याला ठाऊक नाही आणि ठाऊक असला तरी तो विशिष्ट झाडपाला आपण आरोग्यासाठी खाऊ शकत नाही. त्यातल्या अनेक वनस्पतींची पाने शेळीने खाल्लेली असतात आणि त्या सर्व वनस्पतींचा औषधी गुणधर्म तिच्या दुधात उतरलेला असतो. शेळीचे दूध गायीपेक्षा पातळ असते आणि त्यामुळे ते पचायलाही सोपे असते आणि अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असते. याचा व्यापारी उपयोग ङ्गारसा कोणी केलेला नाही. आपण जर त्याचा तसा उपयोग करून घ्यायचा ठरवला तर आपल्याला दुधाचे चांगले मार्केटिंग करता येईल
भारतामध्ये शेळीच्या एकंदर २५ जाती पाळता येतात. त्यातील जमनापारी, बिटल, सुरती, मारवाडी, सिरोही आणि बारबेरी या जातींच्या शेळ्या चांगले दूध देणार्‍या असतात. तेव्हा कोणाला प्रयत्न करून शेळीच्या दुधाचे मार्केटिंग करण्याची इच्छाच असेल तर त्यांनी यापैकी एका जातीची शेळी विकत आणून ती पाळावी. परदेशांमध्ये विशेषत: अमेरिकेमध्ये शेळीचे दूध विपूलपणे वापरले जाते. एवढेच नव्हे तर शेळीची दुधासाठी पैदास करणार्‍या शेळी पालकांच्या संघटना सुद्धा तिथे आहेत आणि या संघटना शेळीच्या दुधावर अनेक प्रकारचे प्रयोग करीत असतात. आपल्या देशामध्ये या संबंधात ङ्गारसे काही झालेले नाही. मात्र त्यामुळे शेळी आणि बोकूड हे केवळ मांसासाठी पाळायचे असतात, असा समज रूढ झालेला आहे आणि शेळीचे दूध चांगले पैसे मिळवून देण्याच्या योग्यतेचे असताना सुद्धा त्याची ही क्षमता वाया जात आहे.





main got

शेळी पालन एक उत्कृष्ट व्यवसाय

अलीकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे हा व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या मोठया प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहेत शासनही या व्यवसायाला आर्थिक सहाय देत आहे त्याचप्रमाणे शेळीच्या मांसाची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे काही ठराविक जातीच्या शेळया दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.
शेळी पालनाचे फायदे-
अल्प गुंतवणुकीने हा व्यवसाय केल्या जाऊ शकतो
शेळया या शेतक-यांसाठी बचत बॅकेचे कार्य करीत असतात आवश्यकता पडल्यास त्वरीत काही शेळया विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.
शेतक-यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीचा दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठया प्रमाणावर आढळतात.
शेळया काटक असून विपरीत हवामानाशी जुळवून घेतात.
शेळया निकृष्ट प्रतिच्या चा-याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.
शेळयांचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
त्यांना जागा कमी लागते यामुळे निवा-याकरिता खर्च कमी होतो.
काही जातीच्या शेळयापासून लोकर (मोहोर) मिळते.
शेळयांचे खत उत्तम असते.
आपल्या देशात गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.
शेळयांच्या शिंगापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.
शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा लायसिन, मिथिओन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मासांत अधिक असते.
शेळीपालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केल्या जावू शकतो.
भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123दशलक्ष शेळया भारतात आहे शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते. भारतात शेळयांचे 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते भारतात शेळयांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58 लिटर आहे व शेळीच्या दुधाला मागणी नाही खरं तर शेळीचा विकास दुध उत्पादनाकरीता झालाच नाही आपल्या कडील निवडक जातीच्या शेळया एका वेतात 200 ते 250 लिटर दुध देतात तर विदेशी जातीच्या शेळया 1200 ते 1700लिटर दुध देतात. आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2.2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.
शेळयांच्या जाती भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल,उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी,सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन 20 किलो होते या उलट विदेषी जातीच्या शेळया उदा सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100किलो असते आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.
goa1
बंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता –
शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज आहे व तो काही प्रमाणात खराही आहे जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.
बंदीस्त शेळीचे व्यवस्थापन –
शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया प-हाटया यांच्या सहायाने करावे
प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा
गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी
करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी
दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून पशुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत.
शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी
उत्ताम जातीच्यान शेळ्यांव
मांसासाठी व दूधासाठी उत्तंम जातीच्या् शेळ्या खालीलप्रमाणे
उस्मासनाबादी- अर्धबंदीस्त् शेळीपालनासाठी उपयुक्तम[मांसासाठी] संगमनेरी – अर्धबंदीस्तश शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी व दूधासाठी] सिरोही – अर्धबंदीस्तश शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी व दूधासाठी] बोएर – बंदीस्तध शेळीपालनासाठी उपयुक्तप[मांसासाठी] सानेन- बंदीस्तध शेळीपालनासाठी उपयुक्तप[दूधासाठी] कोकण कन्यावळ: अर्धबंदीस्तस शेळीपालनासाठी उपयुक्तम[मांसासाठी कोकणामध्येव] उस्मानाबादी
शेळया मूखेड[नांदेड],रेणापूर[लातूर],कोण[कल्यााण],लोणंद[सातारा],म्हतसवड[सातारा],च्या[आठवडी बाजारात या शेळया विकत मिळू शकतात.
दुर्लक्ष नको शेळ्यांच्या आरोग्याकडे…
शेळ्यांचे कमी खर्चात चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. शेळी व्यवस्थापन करताना सकस चारा, गाभण शेळ्यांची – करडांची काळजी घ्यावी. आरोग्याच्यादृष्टीने वेळच्या वेळी लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होऊन अपेक्षित फायदा शेळीपालकाला मिळू शकतो.
साधारणपणे शेळ्यांना ………..दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यिक आहे. यामध्ये मुख्यतः शेवरी, बोर, बाभूळ, आंबा, चिंच, तुती, केळीच्या पानांचा समावेश होतो. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यचकता असते. शेळ्यांचे ऊन – पावसापासून संरक्षण करता येईल, अशा पद्धतीने गोठा बांधावा. शेळ्यांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत. मल-मूत्राची रोजच्या रोज विल्हेवाट लावावी. गोठ्यात स्वच्छ पाणी उपलब्ध असावे. गोठ्यात हवा खेळती असावी. …………मुक्त गोठा पद्धतीने शेळीपालनात शेळ्या दिवसभर चरण्यासाठी सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्य कता भासत नाही; मात्र बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्यआक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी. त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुश्याय चा वापर करावा.
gotcare
शेळ्यांची जोपासना
गाभण शेळीची जोपासना –
गाभण शेळीची व्यवस्था स्वतंत्ररीत्या करावी. तिला ओला व सुका चारा आणि मुबलक स्वच्छ पाणी यांची योग्य प्रमाणात व्यवस्था करावी. शेवटच्या दोन – तीन महिन्यांत 200 ते 250 ग्रॅम पोषण आहार द्यावा. शेळी नैसर्गिकपणे विते; मात्र काही घटनांमध्ये वैद्यकीय मदत आवश्य क असते.
दुभत्या शेळीची जोपासना –
दुभत्या शेळ्यांना शारीरिक गरजेसाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा अतिरिक्त ऊर्जेची आवश्ययकता भासते. म्हणून त्यांना ओल्या व सुक्याे चाऱ्यासोबतच 100 ग्रॅम खुराक प्रति लिटर दुधामागे जास्त द्यावा. चारा देताना त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ व खनिजद्रव्ये मिसळून द्यावीत.
करडांची जोपासना –
करडाच्या जन्मानंतर शेळी त्या पिल्लाला चाटू लागते; मात्र असे न घडल्यास कपड्याने करडास स्वच्छ पुसून घ्यावे. नाका-तोंडातील चिकट द्रव स्वच्छ करून घ्यावा. नाळ स्वच्छ ब्लेडने कापून टिंक्च र आयोडीन लावावे. करडास एक – दोन तासांतच शेळीचा चीक पाजावा. करडाने नैसर्गिकरीत्या चीक न प्यायल्यास त्याला तो काढून पाजावा. दोन – तीन आठवड्यांनंतर त्याला कोवळा पाला द्यावा. पहिले तीन – चार महिने दूध पाजावे. त्यानंतर मात्र त्याला शेळीपासून तोडून चरण्यास सोडावे.
पैदाशीच्या बोकडाची जोपासना
पैदाशीकरिता योग्य शारीरिक व वांशिक गुण असणाऱ्या निरोगी बोकडाची निवड करावी. निवड करताना त्याचे वय एक वर्षापेक्षा जास्त असावे, तो मारका नसावा. अशा बोकडास योग्य प्रमाणात हिरवा, वाळलेला चारा, खुराक व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.
शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते.
घटसर्प
– हा अतिशय वेगाने पसरणारा साथीचा रोग आहे. सांसर्गिक प्राण्याची विष्ठा, लाळ, चारा, पाणी यांच्याशी संपर्कात आल्याने या रोगाची लागण होते. या रोगात जनावराचे तापमान अचानक खूप वाढते. शेळी चारा खाणे बंद करते. रवंथ न करता नाक व तोंडातून स्राव बाहेर पडतो.
संसर्गजन्य फुफ्फुसदाह –
हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचे लक्षण म्हणजे कोरडा खोकला, नाकातून पाण्यासारखा द्रव येतो.
फऱ्या –
हा रोग तीव्रपणे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगामध्ये खूप ताप येतो, पाय व सांधे यांना सूज येते, या सुजेवर दाबले असता दुखते व गरम लागते. या रोगामुळे जनावरास नीट चालवतही नाही, त्यामुळे ते लंगडते, म्हणूनच या रोगास “एकटांग्या’ असेही म्हणतात.
लाळ्या खुरकूत –
हा एक झपाट्याने वाढणारा संसर्गजन्य रोग आहे. याचा प्रसार हवा, पाणी व रोगी प्राण्याच्या संपर्कात आलेला चारा यामुळे होतो. यामध्ये शेळ्यांची भूक मंदावून त्या अशक्त बनतात. दुभत्या शेळ्यांचे दूध कमी होते, खूप ताप येतो व तोंडातून स्राव वाहतो. तोंडात पांढऱ्या रंगाचे फोड येतात, खुरांतही फोड येऊन जखमा होतात, त्यामुळे खाणे आणि चालणे अशक्यय होते. शेळ्या दगावण्याचीही शक्यशता असते.
धनुर्वात –
या रोगामुळे शेळ्यांचे स्नायू ताठरतात, सर्वांगाला कंप सुटतो, शेळ्यांना चालताना त्रास होतो. त्यासाठी वेळेवर लसीकरण, वैद्यकीय सल्ला व निदान करून घ्यावे.
शेळ्या आणि बोकडांची निवड शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते. तिची आई जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते. दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे. दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी, टवटवीत व चपळ असावी. शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे, म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी. शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे. केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. भरपूर छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल. शेळीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत. शक्यशतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी. दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावीत.
बोकडाची निवड कळपात जन्मणाऱ्या शेळ्यांचे 50 टक्के गुणधर्म बोकडांवर अवलंबून असतात, म्हणून कळपाची सुधारणा बऱ्याच प्रमाणात पैदाशीच्या बोकडांवर अवलंबून असते. शुद्ध जातीचाच बोकड शक्यपतो विकत घ्यावा. ते न जमल्यास निदान सुधारित जातीचा बोकड घ्यावा. विकायला आलेल्या बोकडांपैकी सर्वांत मोठा डौलदार व निरोगी बोकड निवडावा. त्याची छाती भरदार असावी व पायांत भरपूर अंतर असावे. शरीराचा मागील भाग जास्त मोठा व उंच असावा. पाय मजबूत व खूर उंच असावेत. बोकड मारका नसावा. तो चपळ व माजावर आलेल्या शेळीकडे चटकन आकर्षित होणारा असावा. डोके व खांद्याचा भाग दणकट, थोराड व नराची लक्षणे दाखवणारा असावा. या लक्षणांवरून पुढील पिढीत चांगले गुणधर्म संक्रमित होण्याची शक्य ता कळते.
शेळ्या, मेंढ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या..
आंत्रविषार : प्रामुख्याने हा आजार चांगल्या पोषित, पौष्टिक चाऱ्यावर चरणाऱ्या, मांसाने भरीव असणाऱ्या मेंढ्यांना व शेळ्यांना बाधित करतो. कोकरांनी आजारास बळी पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त प्रमाणात प्यायलेले दूध होय. प्रादुर्भाव झालेली नवजात कोकरे हवेमध्ये उडी घेऊन जमिनीवर कोसळतात, थरथर कापतात व काही मिनिटांतच गतप्राण होतात.
उपाययोजना – शेळ्या, मेंढ्यांना पावसाळ्याच्या सुरवातीला लस टोचून घ्यावी. कोकरांना लस दिल्यानंतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा. लस टोचल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्याकरिता 21 दिवसांचा कालावधी लागतो. प्रादुर्भावादरम्यान दीर्घक्रियाशील प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत.
फाशी :
हवामानातील अचानक बदल, मुसळधार पाऊस व दुष्काळ परिस्थितीमुळे फाशीचा रोग पसरतो. यात खूप ताप येतो, जनावर थरथरते, तोल जातो, नाकातोंडातून काळपट रक्तस्राव होतो. श्वाोस घेण्यास त्रास होतो व शेळी-मेंढी ताबडतोब मरते. उपाययोजना – पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधक लसीकरण करावे. मेलेल्या शेळ्या-मेंढ्या वर-खाली चुनखडी (चुना) टाकून खोल खड्ड्यात पुराव्यात. त्यांची कातडी विकू नये. शवचिकित्सा करून नये.
जरबा :
याचा प्रसार चावणाऱ्या चिलटांपासून म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या होतो. जास्त पाऊस व ढगाळ वातावरणामध्ये चिलटांची उत्पत्ती डबक्याजत पाणी साठल्यामुळे अधिक प्रमाणात होते. याची लक्षणे म्हणजे तोंडाला गरे पडतात, तोंडातील आतील भाग लालसर पडतो, काही वेळा लाळ येते, शेळ्या-मेंढ्या कुचंबतात, डोळे लाल होतात, जनावर लंगडू लागते, छातीला व जबड्याखाली जखमा होतात.
उपाययोजना – पावसाळ्यात सायंकाळी वाडग्यात करंज, कडुनिंब, निरगुडीच्या पाल्याची धुरी करावी. डबकी व साचलेल्या पाण्यावर रॉकेल फवारणी करावी. असे केल्याने चिलटांचे प्रजनन कमी होऊन संख्या वाढत नाही. बाधित मेंढीस पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत. कोमट पाण्यात मीठ टाकून तोंड धुवावे.
बुळकांडी :
या आजारात शेळ्या-मेंढ्यांमध्ये ताप येणे, नाकातून पाणी येणे, चिकट व रक्तमिश्रित जुलाब होणे इत्यादी प्रमुख लक्षणे दिसून येतात.
उपाययोजना – पशुतज्ज्ञांकडून नियमित पी.पी.आर. लस टोचून घेणे. वाडग्यात स्वच्छता पाळावी. आजारी शेळ्या, मेंढ्यांना वेगळे ठेवावे.
दुष्काळी परिस्थितीत शेळ्या- मेंढ्यांची घ्यावयाची काळजी
वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष अशा दुहेरी संकटात सध्या शेळी- मेंढी पालक आहेत. या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
या वर्षी दुष्काळजन्य स्थिती फारच गंभीर असून, सतत दोन वर्षे कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची झळ शेळ्या- मेंढ्यांनाही बसत आहे. कधी नव्हे ते शेळ्या- मेंढ्यांसाठीही छावण्यांची मागणी होत आहे. दुष्काळ आणि त्याचबरोबर वाढते तापमान यामुळे उद्‌भवणाऱ्या आरोग्य समस्यांचा व त्यावर करावयाच्या उपचाराचा आढावा सदर लेखात घेत आहोत. या परिस्थितीत उद्‌भवणाऱ्या आरोग्याच्या प्रमुख समस्या खालीलप्रमाणे आहेत.
उष्माघात –
शेळ्या जर जास्त काळापर्यंत तीव्र उन्हात राहिल्या किंवा बाहेर सोडल्या, तर ही समस्या उद्‌भवण्याची शक्य्ता अधिक असते. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्या मलूल दिसतात. चारा- पाणी घेण्याचे थांबते अथवा शरीराचे तापमान सामान्य तापमानाच्याही वर साधारणतः 105-106 फॅ.पर्यंत पोचते. कधीकधी शेळ्या मूर्च्छित होऊन पडतात. उपचाराला प्रतिसाद देण्याच्या आधी दगावतात.
उन्हाळी हगवण –
एकंदरीत अशा हगवणीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. जसे उष्माघात, गरम व दूषित पाणी, साचलेल्या दूषित पाण्याद्वारे जंतबाधा, जिवाणूबाधा किंवा अपचन अशा अनेक घटकांचा समावेश करता येईल. हगवणीची बाधा झाल्यास जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण व इलेक्ट्रो लाइटचे प्रमाण फार कमी होते, त्यामुळे शेळ्या अगदी अशक्त होतात व जमिनीवर पडून राहतात. जंतबाधेची हगवण असल्यास शेणाला विशिष्ट वास येतो.
आम्लीय अपचन –
उन्हाळ्यात जनावरांची पचनशक्ती मंदावलेली असते. बाह्य तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी शेळ्या पाणी जास्त पितात. शेळ्यांच्या खाद्यामध्ये जर कोरडा चारा जास्त प्रमाणात असला, तर पचनशक्तीवर परिणाम होतो. उन्हाच्या तीव्रतेने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन रक्तामध्ये आम्ल वाढते व आम्लीय अपचन होते. कधीकधी समारंभातील उरलेले तेलकट, पिष्टमय, दूषित अन्न खाल्ल्यामुळेसुद्धा असे अपचन होते.
जंतबाधेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम –
खरे तर उन्हाळ्यामध्ये जंतांची वाढीची अवस्था म्हणजे अंडी, अंड्यांपासून विषारी अवस्था व वयस्क अवस्था ही थांबलेली असते; परंतु शरीराच्या आत असलेले जंत जसे यकृत, आतडी व पोटाचे कप्पे यांतील जंत क्रियाशील असतात. सामान्यतः यकृतातील जंत जास्त क्रियाशील असतात. अशा जंतांची शरीरातील संख्या वाढली, की शेळ्यांमध्ये रक्ताल्पता वाढते व शेळ्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. शेळ्यांची हाडे व बरगड्या दिसायला लागतात. केस राठ झालेले व चकाकी नसलेले, तसेच कातडी निस्तेज झालेली दिसते. डोळ्यांची श्ले ष्मा निस्तेज, फिकट दिसते आणि यकृतावर व पचनक्रियेवर परिणाम झालेले दिसतात. काही प्रसंगी शेवटी शेळ्यांना हगवणीचा तीव्र त्रास होऊन शेळ्या अगदी अशक्त होतात व उपचाराला प्रतिसाद न देता दगावतात.
उपचार व प्रतिबंध –
उष्माघाताचा त्रास होऊ नये, म्हणून शेळ्यांना दिवसातील थंड काळ जसे सकाळी लवकर (सहा ते दहा वाजेपर्यंत) आणि संध्याकाळी उशिरा (तीन ते सात वाजेपर्यंत) या काळातच चरावयास सोडावे. स्वच्छ, ताजे व थंड पाणी शेळ्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.
हगवणीला कारणीभूत घटकांचा योग्य तो उपचार अथवा प्रतिबंध करावा. जसे की हगवण थांबविणाऱ्या औषधांचा उपयोग, प्रतिजैविक गोळ्या (पेसुलिन, फॅजाल, पॅबाडीन इ.) सोबत इलेक्ट्रो लाइटची पावडर हे सर्व एकत्र करून स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा पाजावे.
तीव्र हगवणीच्या प्रकारात शिरेतून इलेक्ट्रो लाइट व ऊर्जेचे द्रावण द्यावे.
जास्त पिष्टमय खाल्ल्याने आम्लीय अपचन होऊन तीव्र हगवण लागते. शेळ्या दूषित, टाकलेले, उरलेले अन्न खाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अचानक अशी समस्या आली तर पाण्यातून खाण्याचा सोडा पाजावा अथवा तीव्रता जास्त असल्यास शिरेद्वारे सोडाबायाकार्बचे द्रावण द्यावे, सोबत जीवनसत्त्वे व कोणतेही एक प्रतिजैविक द्यावे.
जंतबाधा ही शेळ्यांमधील प्रमुख समस्या आहे. उन्हाळ्यात जंतांची अंडी सुप्तावस्थेत असतात, अशा काळात गोठ्यातील जंतयुक्ती माती काढून घ्यावी व त्याठिकाणी जंतरहित माती टाकावी. या मातीमध्ये चुना व कॉस्टिक सोडा मिसळल्यास जमीन निर्जंतुक होण्यास मदत होईल, याशिवाय शरीरातील क्रियाशील जंत मारणे अति आवश्यनक असते, त्यासाठी सर्व प्रकारच्या जंतांवर प्रभावी असलेले जंतुनाशक जसे फेनबेन्डॅझाल, डिस्टोडीन, बॅनमिन्थसारखी जंतुनाशक औषधे वापरून जंतनिर्मूलन करून घ्यावे, जेणेकरून उत्पादनक्षम काळात शेळ्यांचे आरोग्य चांगले राहील व गर्भाची योग्य वाढ होईल.
शरीरावर वाढणारे परोपजीवीसुद्धा या काळात सुप्तावस्थेत असतात. मात्र, त्याआधी योग्य ते औषध फवारणी करून शरीरावरील परोपजीवींचा बंदोबस्त करावा. अशाप्रकारे उन्हाळ्यात घेतलेली आरोग्याची काळजी पुढील काळात विशेषतः पावसाळ्यातील संक्रमण काळात प्रतिबंधक म्हणून आणि उद्‌भवणाऱ्या समस्येवर उपाय ठरते.
नवजात करडांचे संगोपन
नवजात करडास शेळी स्वतः चाटून स्वच्छ करते, त्याचे दोन फायदे असतात. त्यामुळे करडांचे रक्ताभिसरण वाढत असते; शेळीने चाटून स्वच्छ न केल्यास पिल्लांचे अंग स्वच्छ, खरखरीत कापडाने स्वच्छ करावे. नाकातील व तोंडातील चिकट स्राव काढावा, त्यामुळे करडांना श्वांस घेण्यास सोपे जाते. खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा, जेणेकरून करडांना ताठ उभे राहता येईल.
करडांना उभे राहण्यास मदत करावी. करडे उभे राहिल्यानंतर शेळीच्या सडाला तोंड लावून दूध पिण्याचे प्रयत्न करते की नाही ते पाहावे. नाही तर दूध पिण्यास शिकवावे. पिल्लू जन्मल्यानंतर अर्धा तासाच्या आत शेळीचे दूध म्हणजे चीक पाजणे आवश्याक असते, यामुळे करडांची रोगप्रतिकारक्षमता वाढत असते आणि करडांची पचनसंस्था व पचनमार्ग साफ होतो.
पहिल्या आठवड्यात करडाच्या वजनाच्या दहा टक्के एवढे दूध चार- पाच वेळेस विभागून पाजावे. आवश्य्कतेपेक्षा जास्त दूध पाजू नये, नाही तर अपचन होऊन हगवण वाढते. करडे जन्मल्यानंतर त्याचे वजन करून नोंद करून घ्यावी.
जन्मल्यानंतर पाच- सात दिवस शेळी व करडे एकत्र ठेवावीत व रोज त्यांना वजनाच्या दहा टक्के दूध तीन- चार वेळा विभागून पाजावे. शेळीच्या पाण्याची व्यवस्था/ भांडे उंचीवर असावे, जेणेकरून करडे पाण्यात पडणार नाहीत, याची काळजी घेता येते.
जन्मल्यानंतर पाच- सात दिवस शेळी व करडे एकत्र ठेवावीत व रोज त्यांना वजनाच्या दहा टक्के दूध तीन- चार वेळा विभागून पाजावे. शेळीच्या पाण्याची व्यवस्था/ भांडे उंचीवर असावे, जेणेकरून करडे पाण्यात पडणार नाहीत, याची काळजी घेता येते.
साधारणपणे 65- 70 दिवसांपासून करडांचे दूध कमी करत 90 दिवसांपर्यंत पूर्णपणे बंद करावे आणि शेळीपासून पूर्णपणे वेगळे करावे. करडांना वयाच्या 30 ते 40 दिवसांपासून मऊ, लुसलुशीत चारा देण्यास सुरवात करावी, जेणेकरून चारा खाण्याची सवय होऊ लागते.
करडांची निरोगी व झपाट्याने वाढ करण्यासाठी त्यांना आवश्यहक औषधी, सकस आहार इ.कडे बारकाईने लक्ष देण्यात यावे. खनिज क्षारांचा पुरवठा करण्यासाठी खनिज विटा टांगून ठेवाव्यात.
करडे पाच महिन्यांच्या नंतरच विक्रीसाठी काढावीत, कारण या वयानंतर करडांची वाढ झपाट्याने होते व जास्त नफा मिळतो.
तीन महिन्यांनंतर करडांना आंत्रविषार, लाळ्या खुरकूत व घटसर्प आणि फर रोगांविरुद्धचे लसीकरण करून घेणे आवश्यतक आहे.




४ टिप्पण्या:

  1. छान माहिती अशीच एक माहिती हवी आहे माझी शेळी चार महिन्याची गाभण आहे तीची कास कडक झाली आहे आणि तीला खुप त्रास होतो आहे स्मृती नाहीशी झाल्यासारखे करतेय उपाय सुचवा मोबाइल नंबर 9850902368

    उत्तर द्याहटवा
  2. atishay changali mahiti bryach post wachlya parantu hi mahiti farch nemaki aani fayadeshir dhanyawad

    उत्तर द्याहटवा

माझ्याबद्दल