नागार्जुन’ वनौषधी उद्यान
अकोल्याचं हे नागार्जुन वनौषधी उद्यान. दुर्मिळ वनौषधींचं जतन करणारं उद्यान म्हणून नागार्जुन उद्यानाची ओळख आहे. १९७६ साली अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या उद्यानाची सुरुवात झाली. आयुर्वेदात मोठं योगदान देणाऱ्या नागार्जुन ऋषीचं नाव या उद्यानाला देण्यात आलं. गेली ३५ वर्षे हे उद्यानं दुर्मिळ अशा वनौषधी वनस्पतींचं जतन करत आहे.
देशातल्या वेगवेगळ्या भागातून गोळा केलेल्या दुर्मिळ वनस्पतींचं या उद्यानात जतन केलं आहे. १९९४ हे वर्ष या उद्यानासाठी सुवर्ण वर्ष ठरलं. १९९४ रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने म्हणजेचं आयसीएआरने (I.C.A.R) केलेल्या मदतीनंतर या उद्यानाने खऱ्या अर्थाने कात टाकली.
आय.सी.ए.आर.च्या औषधी आणि सुगंधी वनस्पती या अखिल भारतीय समन्वयक प्रकल्प प्रकल्पांतर्गत उद्यानाची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर नागार्जुन उद्यानाने कधी माग वळून पाहीलच नाही.
नागार्जुन उद्यानात शतावरी, काळमेघ, अश्वगंध, सफेद मुसळी, इसबगोल, सताब, खडसिंग यांसारख्या दुर्मिळ वनौषधी वनस्पतींचाही समावेश आहे. यातील बऱ्याचशा वनस्पतींचा संग्रह मेळघाट, विंध्य आणि पूर्वोत्तर भागातूनही केलाय़. नागार्जुन उद्यानात केंद्र सरकारनं घोषित केलेल्या यादीतील अनेक दुर्मिळ वनस्पतींचं जतन केलं आहे.
नागार्जुन हे उद्यान आता फक्त वनौषधी संवर्धनापुरतंच मर्यादित नाहीए, तर या उद्यानाच्या माध्यमातून विद्यापीठाने आता वनौषधी शेतीचा प्रसारही सुरु केला आहे. एखाद्या शेतकऱ्याला वनौषधी शेती करायची असेल तर त्यांना तंत्रज्ञान, बीज आणि कलमं पुरवण्याची सोयही इथे आहे. नागार्जुन उद्यानातून कलमं घेऊन अनेक शेतकऱ्यांनी वनौषधी शेतीची सुरुवात केली आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या वनौषधी विभागाच्या मुख्यालयाचा दर्जा या उद्यानाला देण्यात आला आहे. नागार्जुन हे वनौषधी उद्यान म्हणजे देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं केंद्र आहे. अनेक शेतकरी आणि विद्यार्थी या उद्यानाला भेट देतात.
आज वनौषधी उत्पादनात चीनचा मोठा दबदबा आहे. त्या तुलनेत आपल्या देशाला या क्षेत्रात फार मोठी मजल मारायची आहे. सध्या आपल्या देशात १०हजारांवर आयुर्वेदिक औषधांचे कारखाने आहेत. त्यासाठी लागणाऱ्या ९५ टक्के वनस्पती जंगलातून आणल्या जातात. ७० टक्के वनस्पती चुकीच्यापद्धतीमुळे समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या आपल्या देशातील ४० मौल्यवान वनस्पती नष्ट होण्याच्या वाटेवर आहेत.
First Published: Thursday, 12 May 2011 1:14 AM--- ABPMajha
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा