मंगळवार, २९ मार्च, २०१६

शेती व्यवसाय व उपयुक्त व्यवसाय माहीती

 शेळीपालन

कोकण कन्याळ शेळीबद्दल माहीती

वसंत जाधव, कर्जत, जि. रायगड
कोकण कन्याळ ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो आणि मादीचे 21 किलो वजन भरते. करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन 14 ते 15 किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी 50 किलो, तर शेळीचे वजन 32 किलोपर्यंत भरते. ही शेळी 11 व्या महिन्यांत प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17 व्या महिन्यांत पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण 40 टक्के आहे. दोन वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. प्रत्येक वेतामध्ये साठ लिटर दूध देते. दुधाचा कालावधी 97 दिवसांचा आहे. भाकड काळ हा 84 दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.
संपर्क –
02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

******************************************************************

शेळीपालन यशोगाथा5

वालेवाडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील उद्धव सिरसाठ यांनी सरकारी नोकरीच्या बरोबरीने शेती तसेच शेळीपालनाकडे लक्ष दिले आहे. अर्धबंदिस्त पद्धतीने बोअर शेळीपालन त्यांना फायदेशीर दिसून आले आहे. शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन आणि चाऱ्याचे योग्य नियोजन असेल, तर कमी व्यवस्थापन खर्चात शेळीपालनातून चांगला नफा मिळतो असा त्यांचा अनुभव आहे.
रमेश चिल्ले
वालेवाडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील उद्धव ज्ञानोबा सिरसाठ यांची घरची तीन एकर कोरडवाहू शेती. लहानपणापासूनच शेतीतील धडे गिरवत, तसेच वेळप्रसंगी नोकरी करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. नव्वदच्या दरम्यान त्यांनी तलाठी पदासाठी परीक्षा दिली. त्यात त्यांची लातूर जिल्ह्यात तलाठी म्हणून पुढे निवडही झाली. सध्या ते चाकूर येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नोकरी करतानाच त्यांच्या डोक्‍यामध्ये सुधारित पद्धतीने शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे नियोजन होते, त्यानुसार त्यांनी घरच्या तीन एकर शेतीमध्ये पीक नियोजनाची आखणी केली. भाऊ मजुरी करणारा. शेतीला पाणी पुरवण्यासाठी विहीर आणि कूपनलिका खणली. परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत भाजीपाला, द्राक्ष, ऊस लागवड केली. भाजीपाल्यातून पैसा हाती शिल्लक राहिला. हा पैसा शेतीतच गुंतवला. पुढे टप्प्याटप्प्याने जमीन विकत घेतली. सध्या सिरसाठ कुटुंबीयांकडे अडीच एकर डाळिंब, एक एकर शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, 10 गुंठे टोमॅटो आणि उर्वरित भागात रोपवाटिका आहे. तीन एकर शेवगा आणि तीन एकर ऊस लागवड आहे. जनावरे आणि शेळ्यांना वर्षभर चारा उपलब्ध होण्यासाठी अर्धा एकर मेथी गवत, अर्धा एकर यशवंत गवत, दोन एकरांवर शेवरी आणि सुबाभूळ लागवड आहे. शेतातून एक नाला जातो, त्या नाल्याचे खोलीकरण करून लहान बंधारा बांधून त्यात साठलेले पाणी कूपनलिका पुनर्भरणासाठी वापरले जाते. शेतीच्याबरोबरीने त्यांनी कमी खर्चाच्या आणि कमी व्यवस्थापनाच्या; परंतु शेतीला पूरक अशा शेळीपालन व्यवसायाची सन 2009 मध्ये सुरवात केली.
असे केले अर्धबंदिस्त शेळीपालन
शेळीपालन व्यवसायाबाबत माहिती देताना सिरसाठ म्हणाले, की शेतीमधील सुधारणेसाठी मी राज्यातील विविध कृषी प्रदर्शने, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देत असतो. या भेटीदरम्यान मला शेळीपालनाची माहिती मिळाली, त्याचे अर्थशास्त्र समजावून घेतले. त्यानुसार सन 2009 मध्ये दोन गाभण उस्मानाबादी शेळ्या घेऊन शेळीपालनाला सुरवात केली. या शेळ्यांना जुळी करडे झाली. पुन्हा चार महिन्यांनी दोन गाभण उस्मानाबादी शेळ्या खरेदी केल्या, त्यांनादेखील जुळी करडे झाली. टप्प्याप्प्याने सहा महिन्यांत दहा करडे गोठ्यात तयार झाली. बाजारात या करडांना चांगला दर मिळाला. नर करडे विकून माद्या गोठ्यात ठेवल्या. याच वेळी बोअर जातीच्या शेळीची माहिती शेतकरी मित्रांकडून मिळाली. या जातीचे वजन चांगले मिळते. चारा, कडबा कुट्टीवरही ही जात चांगल्या प्रकारे वाढते. यांची रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रजनन क्षमता चांगली आहे. मटणाची चव चांगली असल्याने बाजारपेठेत या जातीला चांगली मागणी असते. हा अभ्यास करून मी दोन वर्षांचा बोअर बोकड 15 हजारांना खरेदी खरेदी केला; तसेच वाशीम बाजारपेठेतून दोन बोअर जातीची नर करडे 12 हजारांना विकत आणली. गोठ्यातील शेळ्यांचा बोअर बोकडाशी संकर करून पहिल्यांदा 50 टक्के बोअर करडे तयार झाली. पुढे टप्प्याटप्प्याने 75 ते 90 टक्के बोअर जातीची करडे गोठ्याच तयार होत आहेत.
गोठ्यामध्ये केले बदल…
शेळ्यांची संख्या वाढू लागल्याने साध्या गोठ्यात लेंड्या- मूत्रामुळे माश्‍या, गोमाश्‍या वाढल्या. वास- दुर्गंधीमुळे करडांचे आरोग्य बिघडू लागले. हे लक्षात घेऊन शेळ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने सुधारित पद्धतीचा गोठा सिरसाठ यांनी बांधला. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, की शेळ्यांसाठी फलाट पद्धतीने गोठा बांधताना 35 × 27 फुटांची जागा निश्‍चित केली. स्वतःची कल्पना आणि इतर शेतकऱ्यांशी चर्चा करून या जागेवर तीन फूट उंचीवर पाइप फाउंडेशन (फलाट) तयार केले. त्यावर चार इंच रुंद, एक इंच जाडीच्या फळ्या खालच्या अँगलला नटबोल्टने फिट केल्या. दोन फळ्यांत अर्धा इंच जागा ठेवली. अशा पद्धतीने लाकडी पट्ट्यांचा फलाट तयार केला. फळ्यांच्या फटीतून शेळ्यांच्या लेंड्या, मूत्र खाली जमिनीवर पडते. लेंड्या दररोज गोळा केल्या जातात. या गोठ्याच्या भिंती करताना खालच्या निम्म्या भागात पत्रे आणि वरच्या भागात चारही बाजूने जाळी लावली, त्यामुळे गोठा हवेशीर झाला. छपरावर पत्रे लावले आहेत. जाळ्यांतून जास्तीची हवा आणि पाऊस आत येऊ नये म्हणून झडपा बसवल्या. शेळ्यांना फलाटाच्या शेडमध्ये जाणे सोपे होण्यासाठी दोन्ही दरवाजांसमोर लाकडी फळ्यांच्या उतरत्या पायऱ्या बसवल्या. 27 फूट रुंदीच्या गोठ्यामध्ये समांतर तीन कप्पे केले. लोखंडी पिंप उभे कापून त्याला पाय जोडून कमी खर्चात गव्हाणी तयार केल्या. या गोठ्यामुळे लेंड्या आणि मूत्राची दुर्गंधी कमी झाली. शेळ्यांचे आरोग्य चांगले राहिले. या गोठ्याची क्षमता 100 शेळ्यांची आहे. सध्या गोठ्यामध्ये 70 शेळ्या आहेत. त्यामध्ये 27 नर करडे 13 मादी करडे आहेत. 30 शेळ्या गाभण आहेत. शेळ्यांची सर्व जबाबदारी पुतण्या अनिरुद्धकडे दिलेली आहे. तो लसीकरण, शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापनात पारंगत झाला आहे.
शेणखत निर्मिती सिरसाट यांच्याकडे दोन बैल, दोन म्हशी आहेत. उपलब्ध शेण आणि लेंड्यांपासून कंपोस्ट खत तयार केले जाते. खतनिर्मितीसाठी चार टाक्‍या बांधल्या आहेत. दरवर्षी किमान 16 ट्रॉली खत तयार होते. सरासरी एक ट्रॉली खताचा दर दोन हजार रुपये असा आहे. सिरसाठ सर्व खत स्वतःच्या 11 एकर शेतीला वापरतात. शेळ्यांचे व्यवस्थापन
1) शेळ्यांना विविध प्रकारचा चारा लागतो, हे लक्षात घेऊन सिरसाट यांनी अर्धा एकर मेथी गवत, अर्धा एकर यशवंत गवत, दोन एकरांवर शेवरी आणि सुबाभूळ लागवड केली आहे.
2) एका शेळीला दररोज चार किलो कोरडा चारा, एक किलो वाळलेला चारा कुट्टी करून दिला जातो. रोज 70 शेळ्यांना 300 किलो चारा लागतो.
3) जून ते जानेवारी या काळात शेतात पीक असल्याने शेळ्यांना गोठ्यातच चारा दिला जातो. जानेवारी ते मे या काळात चाऱ्याची उपलब्धता कमी होत जाते, त्यामुळे शेळ्या शेतात चराईला सोडल्या जातात, त्यासाठी दोन मजूर ठेवले आहेत.
4) गरजेनुसार गाभण शेळ्या आणि करडांच्या वाढीसाठी खुराक दिला जातो. पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार खुराकात शेंगदाणा पेंड, मका, भात कोंडा वापरला जातो.
5) शेळ्यांना स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी गोठ्याजवळच टाकी बांधली आहे.
6) दररोज सकाळी तीन ते चार तास गोठ्याच्या परिसरातील शेतात शेळ्या चारण्यासाठी व पाय मोकळे होण्यासाठी बाहेर सोडल्या जातात. शेळ्यांना व्यायाम झाल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहिले आहे.
7) पशुवैद्यकांकडून शेळ्यांचे लसीकरण, जंतनिर्मूलन याबाबत शास्त्रीय माहिती घेऊन शेळ्यांचे चांगले व्यवस्थापन ठेवले जाते.
8) सहा महिन्यांच्या करडांचे वजन 30 किलोपेक्षा जास्त भरते.
9) दररोजचा चारा, खुराक, पाणी, मजूर आणि इतर व्यवस्थापनाचा खर्च 600 ते 700 रुपये होतो. चारा घरचाच आहे, त्यामुळे शेळ्यांना पुरेसा चारा दिला जातो.
वजनावरच विकतो शेळ्या
शेळ्यांच्या विक्रीबाबत सिरसाठ म्हणाले, की मी बाजारपेठेचा अभ्यास करत असतो. शेळ्या आणि बोकडांचे चांगले आरोग्य ठेवले असल्याने त्यांची वाढ चांगली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. मला शेळ्यांची संख्या वाढवायची असल्याने मी शेळ्या विकत नाही. पुढील टप्प्यात शेळ्यांची संख्या वाढल्यावर महिन्याला सरासरी 15 करडांची विक्री होईल असे नियोजन केले आहे. गेल्या सहा महिन्यांत मी 20 नर करडे विकली आहेत. विक्री मी वजनावर करतो, त्यामुळे स्थानिक बाजारपेठेपेक्षा चांगला दर मिळतो. सहा महिने वयाचा 50 टक्के संकरित बोकड 250 रुपये प्रति किलो या दराने विकला; मात्र 90 टक्के बोअर जातीचा बोकड 450 रुपये प्रति किलो या दराने विकला जातो. सरासरी 11 महिने वयाचा बोकड मी विकतो. सात महिने वयाच्या शेळीला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. वजनावरच शेळी विकतो. माझ्याकडे शेतकरी येतात आणि शेळ्या, बोकडांची नोंद करून जातात, त्यामुळे सध्यातरी विक्रीची समस्या नाही. इतर जनावरांपेक्षा शेळ्यांच्या व्यवस्थापनाचा खर्च कमी आहे. बाजारपेठेतील शेळी आणि बोकडांचे दर स्थिर आहेत, त्यामुळे शेळीपालन मला शाश्‍वत व्यवसाय वाटतो.
संपर्क – उद्धव सिरसाठ – 7588612821
(लेखक लातूर येथे कृषी विभागात कार्यरत आहेत.)
माहिती संदर्भ : अॅग्रोवन

******************************************************************

शेळीपालन यशोगाथा 4

मित्राने दिलेला शेळीपालनाचा सल्ला लातूर येथील मोहसीन शेख यांनी अभ्यासातून अंमलात आणला. आधुनिक शेड व्यवस्थापन, खाद्य, पोषण, स्वच्छता, लसीकरण आदी विविध घटकांवर काटेकोर लक्ष देऊन शेळीपालन व्यवसाय वाढवला. त्यातून आर्थिक विकास शक्‍य करून दाखवला. व्यवसायाच्या मार्केटिंगसाठीही त्यांनी कुशलता दाखवली. आज परराज्यातील ग्राहक त्यांच्याकडे शेळ्यांची मागणी करण्यासाठी येऊ लागले आहेत.
मोहसीन युनुसमियॉं शेख हे लातूरचे. त्यांची काही शेती नव्हती. मात्र आपले मित्र सय्यद जमिल यांनी त्यांना शेळीपालनाची वेगळी वाट दाखवली. या व्यवसायाचा अभ्यास व अर्थशास्त्र तपासून सन 2008 च्या सुमारास शेख यांनी उस्मानाबादी शेळीपालन व्यवसायाला सुरवात केली. यासाठी लातूरपासून काही किलोमीटरवरील नांदगाव शिवारात चार गुंठे जमीन मुबारक चाऊस यांच्याकडून कराराने भाडेतत्त्वावर घेतली, तर सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे शिवाजी शेंडगे यांच्याकडून चार गुंठे जमीन वार्षिक 20 हजार रुपयांने भाडेतत्त्वावर घेतली. सुरवातीला 50 शेळ्या व तीन बोकडांची खरेदी केली. लातूर येथे 20 तर वैराग येथे 30 शेळ्यांचे संगोपन सुरू केले. आज नांदगाव येथे 50 तर वैराग येथे 250 शेळ्यांचे पालन केले जात आहे. त्यासाठी आधुनिक पद्धतीच्या शेडची उभारणी केली आहे.
शेळ्यांचे व्यवस्थापन
शेडची रचना
आधुनिक व शास्त्रीय पद्धतीच्या आदर्श शेडवर शेळ्याचे आरोग्य अवलंबून असते. यासाठी आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेड बांधला आहे. जमिनीवर 15 बाय 35 फुटांच्या अंतरावर फरशीचे बेड तयार केले आहेत. त्यावर साडेतीन फुटांवर लोखंडी अँगलचा वापर करून शेडची उभारणी केली. त्यामध्ये पंचिंग जाळी बसवून मजला तयार केला. यामुळे शेळ्यांना हवेशीर वातावरण, त्यांची विष्ठा व मूत्र खाली फरशीवर पडून शेड स्वच्छ राहते, तसेच शेळ्या व त्यांचे विष्ठा-मूत्र एकमेकांच्या संपर्कात येत नाहीत. यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ राहते.
शेडच्या आतील भागात चारा खाण्यासाठी मोठ्या शेळ्या व पिलांसाठी स्वतंत्र गव्हाणी केल्या आहेत. त्यांची विष्ठा व मूत्र वाहून जाण्यासाठी शेडला जाळीचा वापर केल्यामुळे शेडमध्ये स्वच्छता राहून शेळ्यांचे आरोग्य उत्तम राहते. शेडमधील दुर्गंधी जाण्यासाठी “व्हेन्टिलेशन’ची सोय करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य संपन्न राहून शेळ्यांचे पोषण उत्तम होते.
शेडच्या तिन्ही बाजूंनी जाळीचा वापर केल्यामुळे शेडमध्ये हवा मोठ्या प्रमाणात खेळती राहते. पावसाळा, हिवाळा अथवा उन्हाळ्यात आवश्‍यकतेनुसार शेड झाकण्याची सोय केली असल्यामुळे शेळ्याचे संरक्षण उत्तम प्रकारे करता येते.
व्यवसायाचे स्वरूप व विस्तार –
खाद्य व्यवस्थापन – शेळ्यांसाठी सकस आहारावर भर दिला जातो. नांदगाव येथील शेतीत एक एकरात मेथी घास, मका आदींची लागवड केली आहे. शेळ्यांना दिवसातून तीन वेळा खाद्य दिले जाते. पौष्टिक खाद्यात भरडलेला मका, शेंगदाण्याची पेंड, हरभरा व तुरीचा भुस्सा व खनिज मिश्रण दिवसातून एक वेळ दिला जातो. सकाळी हिरवा चारा, दुपारी विविध पौष्टिक खाद्य, सायंकाळी वाळलेला चारा तर रात्री हिरवा चारा असे खाद्य दिले जाते. हिरवा चारा व वाळलेल्या चाऱ्याचे तुकडे करण्यासाठी कडबाकुट्टी यंत्राचा वापर केला जातो. यामुळे चाऱ्याची 50 टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते.
स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. शेडच्या बाहेरील बाजूला शेडनेटचा वापर करून सावली तयार केली आहे. पाणी पिण्यासाठी स्वतंत्र गव्हाणीची बांधणी केली आहे. शेळ्यांना हव्या त्या वेळी पाणी पिता येते.
2) पीपीआर, आंर्त्रविषार, लाळ्या खुरकूत, फऱ्या व घटसर्प या रोगांसाठी वर्षातून एक वेळ लसीकरण केले जाते. 3) पोटातील जंतुनाशक औषध वर्षातून दोन वेळा पाजले जाते.
4) तीन महिन्यांपर्यंत पिलांचे काळजीपूर्वक संगोपन केले जाते. थंडी, पावसाळा यांच्यापासून विशेषतः त्यांचे संरक्षण केले जाते.
मार्केट, विपणन व विक्री
शेख यांनी उस्मानाबादी गोट डॉट कॉम हे संकेतस्थळ 2012 मध्ये सुरू केले. यामुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश व केरळ या राज्यांत ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला. सध्या ग्राहकवर्ग 80 टक्के परराज्यातील असून, तिकडे शेळीची ही जात उपलब्ध नसल्याने दरही चांगले मिळतात. सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या “सोशल मीडिया’चाही वापर केल्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक व बाजारपेठ शोधणे व ग्राहकवर्ग तयार करणे सोपे गेले.
सहा लाख रुपये गुंतवणूक करून 50 शेळ्यांपासून सुरू केलेल्या व्यवसायात आज शेळ्यांची संख्या तीनशेपर्यंत पोचली आहे. 130 पिले आहेत. महिन्याला सरासरी 30 ते 35 शेळ्यांची विक्री राज्यातील व परराज्यातील ग्राहकांना केली जाते. विक्री वजनानुसार होते. मोठी शेळी (35 ते 65 किलो वजन) 200 रुपये प्रति किलो तर बोकड 250 रुपये किलो दराने विक्री केली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार पिलांची विक्रीही महिन्याला सुमारे 30 च्या आसपास होते. जमीन भाडे, खाद्य, लसीकरण, औषधे असा सुमारे साडे 55 हजार रुपये खर्च होतो. सहा कर्मचारी असून त्यांचा वेगळा पगार असतो. लेंडी खताचा वापर चारा पिकांच्या शेतीत केला जातो. पिले मोठी झाल्यानंतर विक्री होत असल्यामुळे त्यांनाही चांगला भाव मिळत आहे.
पुरस्काराने सन्मान
जिल्हास्तरीय आदर्श शेळीपालक पुरस्कार फेब्रुवारी 2014 मध्ये शेख यांना प्राप्त झाला. त्यांच्या उत्कृष्ट उस्मानाबादी शेळी व्यवसायाची दखल घेत राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले यांनी त्यांच्या फार्मला भेट देऊन कौतुक केले आहे व आपल्या अधिकाऱ्यांनाही त्याबाबत सांगितले आहे.
जोखीम काय आहे?
शेख म्हणतात, की पिलांच्या मरतुकीचा मोठा धोका असतो. हिवाळा, पावसाळ्यात त्यांची फार काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आरोग्य, खाद्य, पाणी, शेड व्यवस्थापन व स्वच्छता या गोष्टींवर मी काटेकोर भर देत असल्याने माझ्याकडे मरतुकीचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
संपर्क : मोहसीन शेख- 9890856194
लेखक : दीपक क्षीरसागर
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
******************************************************************

शेळीपालन यशोगाथा3

पोषण व वजनवाढीवर लक्ष ठेवून बंदिस्त शेळीपालन केले यशस्वी
प्रस्तावना
शेळीपालनात शेळ्यांची संख्या किती त्यापेक्षाही आहार, संगोपनाद्वारा त्यांचे वजन किती वाढवले, हे महत्त्वाचे असते. किती देऊन, किती मिळवले याचे अर्थशास्त्र ज्याला जमले त्याला शेळीपालन व्यवसायातील इंगीत कळले. सातारा जिल्ह्यातील कवठे येथील युवा शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी हीच संकल्पना प्रमाण मानून सुयोग्य व शास्त्रीय व्यवस्थापनातून बंदिस्त शेळीपालन व्यवसाय केला. आज त्यांची या व्यवसायात चांगली ओळख तयार झाली आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा जिल्ह्यात कवठे गाव (ता. वाई) लागते. गावाची ओळख सांगायची तर तीन पिढ्यांपासून येथील उत्पादित पेढ्यांचे गोडवे महाराष्ट्र व त्याबाहेर पसरले आहेत. दुसरी ओळख म्हणजे देशभक्त किसन वीर यांचे हे जन्मगाव. आणि तिसरी ओळख म्हणजे 26-11 च्या मुंबईत अतिरेक्‍यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या अंबादास पवार यांचे गाव. ऊस, आले व हळद ही गावची प्रमुख पिके. याच गावच्या आधिपत्याखाली जवळच 50 उंबऱ्यांची विठ्ठलवाडी आहे. तेथील पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन वर्षांपूर्वी पारंपरिक शेती पद्धतीला बगल देऊन शेळीपालन व्यवसाय सुरू केला.
बी.एस्सी. ऍग्री, त्यानंतर कृषी व्यवस्थापनातील एमबीए पदवी त्यांनी बंगळूर येथील संस्थेतून मिळवली. संस्थेतील “कॅम्पस इंटरव्ह्यू’च्या माध्यमातून भारतातील एका कंपनीत सांगली येथे मार्केटिंग विभागात काही काळ नोकरी केली. खरे तर उच्च शिक्षणाची पदवी हाती असल्याने चांगल्या पगाराच्या नोकरीत रमणे पृथ्वीराज यांना शक्‍य होते. घरच्यांचाही मुलाने नोकरी करावी असाच आग्रह होता. परंतु पृथ्वीराज यांनी वर्षभरात नोकरी सोडली. घरची शेती व त्याची आवड असल्याने फेब्रुवारी 2012 मध्ये शेतीपूरक बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केला.
त्यांच्या जिद्दी स्वभावापुढे घरच्यांना पाठबळ देण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. व्यवसायाच्या सुरवातीला बंदिस्त शेळीपालन अडचणीत येऊ शकते, याबाबत अनेकांनी त्यांच्यापुढे शंका निर्माण केल्या. परंतु पृथ्वीराज यांनी आपले काम निमूटपणे चालू ठेवले.
पृथ्वीराज यांच्या शेळीपावन व्यवसायातील टप्पे –
1) ज्याप्रमाणे पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांना ठराविक कालावधीत दिले जाणारे खाद्य, त्यानुसार वाढणारे त्यांचे वजन यांचे गणित केले जाते. तसा विचार पारंपरिक शेळीपालनात फारसा होत नसल्याचे पृथ्वीराज यांना जाणवले. आपण शेळ्यांचे संगोपन कसे करतो, त्या बदल्यात “आऊटपुट’ काय घेतो, याचा विचार त्यांनी केला. त्या दृष्टीने करावयाच्या बाबी प्राधान्याने अंगीकारल्या.
2)आफ्रिकन बोअर जातीचा छोटा नर व स्थानिक जातीच्या पाच शेळ्या विकत घेऊन व्यवसायाला सुरवात केली.
सुरवातीला नोकरीच्या उत्पन्नातील काही वाटा गुंतवला. टप्प्याटप्प्याने स्थानिक पतपेढीतून अर्थसाह्य घेतले. आता विक्री व मिळणाऱ्या उत्पन्नानुसार नियोजनबद्ध वाटचाल सुरू आहे. सुरवातीला कळपांची संख्या मर्यादित ठेवली. अनुभव वाढत गेल्यानंतर शेळ्यांची संख्या वाढवली.
3) मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून तीन दिवसांचे शेळीपालन प्रशिक्षण घेतले. राज्यातील, परराज्यांतील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यातून शेड व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे समजले. अन्य प्रकल्पांत जाणवणाऱ्या त्रुटी आपल्या प्रकल्पामध्ये कमी केल्या. उदाहरण सांगायचे तर बऱ्याचदा बंदिस्त पद्धतीत शेळ्यांना 24 तास एकाच जागेवर ठेवले जाते. परिणामी, सातत्याने गोठा ओला व दुर्गंधीयुक्त राहतो. असे वातावरण गोचीड, पिसवांसारख्या बाह्यपरोपजीवींसाठी पोषक असते. पृथ्वीराज यांच्या प्रकल्पात खाद्याची जागा व मुक्कामाची जागा वेगवेगळी असल्यामुळे शेड स्वच्छ व कोरडी राहते. यामुळे रोगराईचे प्रमाण अत्यल्प आहे.पृथ्वीराज याचा शेळीपालन व्यवसाय दृष्टिक्षेपात
उद्दिष्ट- – जातिवंत नर-मादी यांची विक्री
– बकरी ईदसाठी जातिवंत व धष्टपुष्ट नर तयार करणे.
– आफ्रिकन बोअर, स्थानिक व सिरोही (राजस्थान) या जातींचे पालन.-विठ्ठलवाडी (कवठे) परिसर महाबळेश्‍वर व पाचगणीच्या पायथ्याशी असल्याने भौगोलिक दृष्टीने पर्जन्यछायेचा आहे. या टापूतील शेळ्यांमध्ये येथील हवामानाशी जुळवून घेण्याचे गुणधर्म विकसित झाले आहेत. परिणामी, तीनही ऋतूंत तग धरणाऱ्या स्थानिक जाती निवडून वाढवल्या.
वजनवाढीचा वेग स्थानिक जातींमध्ये अत्यल्प असतो. परिणामी, व्यवसायातील अर्थशास्त्र कोलमडू शकते. त्यामुळे आफ्रिकन बोअर जातीच्या नरासोबत “क्रॉस’ (संकर) केल्यास त्या शेळ्यांपासून 40 ते 45 किलोचे नर मिळू शकतात. त्यामुळे अर्थशास्त्राची घडी बसू शकते, हे ओळखून बोअर जातीचे नर कळपात वापरले.
-अन्य ठिकाणी जनावरांच्या वजनवाढीचा दर जिथे 50 ते 100 ग्रॅम प्रतिदिन असा असतो, त्या तुलनेत पृथ्वीराज यांच्याकडील जनावरांच्या वजनवाढीचा दर 200 ते 250 ग्रॅम प्रतिदिनी आहे. त्यामुळे वर्षात सुमारे 65 ते 70 किलोचे विक्रीयोग्य नर तयार होतात.
-18 बाय 35 फूट आकाराचे दोन निवासी, तर 12 बाय 70 फूट आकाराच्या खाद्यासाठी दोन शेड. पाण्यासाठी दोन हजार लिटरची टाकी.
– वडिलोपार्जित विहीर. बागायत एक एकर 20 गुंठे शेती. यातील 20 गुंठ्यांत चारा लागवड.शेळ्यांना दिला जाणारा आहार (प्रति शेळी, प्रति दिन)
1) सकाळी 100 ग्रॅम गोळी पेंड. एका तासानंतर सुक्‍या वैरणीची एक किलो कुट्टी. दोन तासांनंतर सुका चारा दीड ते दोन किलो. (सकाळी सुका चारा दिल्याने भुकेल्या पोटी तो मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो.) दुपारी बारानंतर दोन वेळा एकूण दोन ते अडीच किलो हिरवा चारा कुट्टीद्वारा.
2) हिरव्या चाऱ्यामध्ये मेथी घास, दशरथ घास, डीएचएन-6, सीओएसएस-27 आदी बहुवार्षिक पिकांचा चारा.
3) सकाळी मुक्कामाच्या शेडमधून शेळ्यांना बाहेर सोडल्यानंतर मुक्कामाची जागा व सायंकाळी शेळ्या मुक्कामाच्या ठिकाणी आत घेतल्यानंतर दिवसभर वापराची व खाद्याची जागा स्वच्छ केली जाते.
आरोग्य –
नवजात करडांना 21 दिवसांनी आंत्रविषाद व पंधरा दिवसांनी बुस्टरचा डोस. दोन महिन्यांनंतर लाळ्या खुरकूत व घटसर्प, तर तिसऱ्या महिन्यात पीपीआरचे लसीकरण. दर सहा महिन्यांनी औषधांद्वारे जंतनिर्मूलन.
सेंद्रिय बोकड?
पृथ्वीराज यांच्या म्हणण्यानुसार, बाजारात बकरी ईदच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धिप्पाड, धष्टपुष्ट बोकड पाहण्यास मिळतात. त्यांना वाढवण्यासाठी रासायनिक औषधे व उत्तेजक द्रव्यांचा वापर केला जातो. परंतु पृथ्वीराज यांच्याकडे बोकडांना पूर्णतः सेंद्रिय व पौष्टिक आहार देऊन वाढवले जाते. त्यांना तणावमुक्त वातावरणात ठेवले जाते. अशा पद्धतीचे सुमारे 25 सेंद्रिय बोकड विक्रीस उपलब्ध असतात.
– वर्षभरात शेळ्यांमध्ये सुमारे 30 नर व 15 ते 20 माद्यांची विक्री केली जाते.
– बकरी इदसाठी दीड वर्ष वाढवलेल्या सुमारे 70 ते 80 किलो वजनाच्या बोकडाची विक्री होते.
– शुद्ध नर असल्यास प्रति किलो 1500 रुपये दराने विकला जातो. मादीची विक्री दोन हजार रुपये दराने होते.
जाती व जातीच्या शुद्धतेनुसार दरात फरक राहतो.
– प्रकल्पात वार्षिक सुमारे दोन लाख रुपये खर्च होतो. उपलब्ध लेंडी खताचा वापर स्वतःच्या शेतातील पिकांसाठी केला जातो. हे खत या वर्षीपासून विक्रीसही उपलब्ध केले आहे.
फायदेशीर व्यवसायासाठी वापरलेल्या बाबी
* वजनवाढीचा वेग कायम ठेवला.
* सिरोहीसारख्या जातीत जुळे देण्याचे प्रमाण 60 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवले.
(योग्य प्रकारच्या पोषणातून)
– जन्मलेल्या करडांमधील मृत्यूचे प्रमाणही शून्य टक्के ठेवले आहे.
– संगोपनगृहामध्ये स्वकल्पनेतून गव्हाणीत नावीन्यपूर्ण बदल केले. त्यामुळे खाद्य जास्त प्रमाणात तेथे बसून नासाडी कमी होते. कमी जागेत जास्त शेळ्यांना मनसोक्त खाद्य खाता येते.
* संगोपनगृहात मुरुमाच्या भुईऐवजी लादीचा वापर. त्यातही वेगवेगळे प्रयोग.
– शेळ्यांच्या आई-वडिलांचा डाटा ठेवला.
पृथ्वीराज यांनी आपल्या शेडमध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक जनावराच्या आई-वडिलांचा शास्त्रीय “डाटा’ ठेवला आहे. जातीची दूध देण्याची क्षमता, वेतक्षमता, आनुवंशिक गुणधर्म आदी सर्व नोंदी असल्याने जातीची शुद्धता तपासणे व तशा जाती विकसित करणे शक्‍य होते. नोंदीच्या दृष्टीने प्रत्येक शेळीच्या कानात क्रमांकाचे बिल्ले लावण्यात आले आहेत.
भविष्यात जनावरांचा वजनवाढीचा वेग 250 ते 300 ग्रॅम प्रतिदिनी ठेवणे, दोन वर्षांत चार वेत घेणे, असे नियोजन आहे. जातीची योग्य निवड, निवडीचे ठिकाण हे मुख्य बंदिस्त शेळीपालनात महत्त्वाचे आहेत. याकरिता बंदिस्त शेळीपालन प्रकल्पातील शेळ्या घेऊनच संगोपन करणे महत्त्वाचे ठरते, असे पृथ्वीराज म्हणतात.
पृथ्वीराज यांना फलटण येथील निंबकर कृषी संशोधन केंद्रातील चंदा निंबकर, शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. अविनाश देव व डॉ. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन, तर आजोबा नथू चव्हाण, आजी सौ. गजराबाई यांची मोलाची साथ मिळते.
प्रत्येक भारतीयाला भारतीय वैद्यकीय संशोधन संशोधन संस्था, नवी दिल्ली या संस्थेच्या शिफारशीनुसार दरडोई प्रति वर्षी अकरा किलो मांस मिळायला हवे; परंतु उपलब्धता पाच किलोपेक्षाही कमी आहे. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीनुसार शेळीपालन ही काळाची गरज आहे. पृथ्वीराज यांचा व्यवसाय त्या दृष्टीने आदर्श आहे. अशा प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मांसाची उपलब्धता वाढेल आणि तरुणांना व्यवसायातून रोजगार उपलब्ध होईल.
– डॉ. अविनाश देव, कार्यक्रम समन्वयक, बीएआयएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, वारजे (पुणे).
पृथ्वीराज चव्हाण- 9960548005
.******************************************************************

प्रजोत्पादन व लसिकरण

प्रजोत्पादन प्रबंधन
लाभदायक शेळी पालनासाठी 2 वर्षांमध्ये शेळीने 3 वेळा व्यायला (किडिंग) हवे.
तीव्र वाढीच्या व मोठ्या आकाराच्या शेळ्यांचा वापर प्रजोत्पादनासाठी करावा.
प्रजोत्पादनासाठी एक वर्ष वयाच्या मादीचा उपयोग करावा.
मादींनी एका किडिंग नंतर 3 महिन्यांतच पुन्हां गर्भ धारण केल्यासच 2 वर्षांत 3 वेळा प्रजोत्पादन होऊ शकते.
शेळ्या सुमारे 18 ते 21 दिवसांच्या अंतराने माजावर येतात आणि ही अवस्था 24-72 तास टिकते.
माद्या माजावर आल्यावर काहीतरी दुखत असल्यासारखे जोराने ओरडतात. माजावर आल्याचे आणखी एक लक्षण म्हणजे शेपटी जोर-जोराने इकडे-तिकडे हलविणे. त्याच्या जोडीला, त्यांचे बाह्य जननेंद्रिय थोडे-से सुजल्यासारखे आणि योनिमार्गातील स्त्रावामुळे ओले व घाणेरडे दिसते. त्यांची भूक मंदावते आणि मूत्रत्यागाची वारंवारता वाढते. माजावर आलेली मादी स्वत: नर असल्यासारखी इतर मादीच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करते किंवा इतर मादीस अंगावर चढू देते.
माजावर येण्याची लक्षणे सुरू झाल्यावर 12 ते 18 तासांच्या काळांत मादीचा समागम घडविण्यात येतो.
काही माद्यांमध्ये माज 2-3 दिवस टिकतो. त्यामुळे त्यांचा समागम पुन्हां दुसऱ्या दिवशी घडवायला हवा.
गर्भावस्था काळ सुमारे 145 ते 150 दिवसांचा असतो, पण एक आठवडा पुढे-मागे होऊ शकतो. आधीच तयार राहिलेले बरे.
कृमि नष्ट करणे (पोटातील जंत नष्ट करणे)
समागमाच्या आधी माद्यांचे डीवर्मिंग करून पोटातील कृमि नष्ट करायला पाहिजे. ज्या शेळ्यांना जंत असतील त्या कमकुवत आणि संथ असतात.
करड्यांचे डीवर्मिंग ते एक महिन्याचे झाल्यावर करावे. कृमि किंवा जंतांचे जीवनचक्र तीन आठवड्यांचे असते, म्हणून करडी दोन महिन्यांची झाल्यावर पुन्हा एकदा डीवर्मिंग करण्याची शिफारस केलेली आहे.
विण्यापूर्वी 2 ते 3 आठवडे गाभण माद्यांचे डीवर्मिंग करण्यात यायला हवे.
गर्भारपणाच्या आरंभिक काळात (2 ते 3 महिने) गर्भपात होवू नये म्हणून माद्यांचे डीवर्मिंग करू नये.
*लसीकरण
करड्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा प्रथम डोज 8 महिन्यांच्या वयात आणि पुन्हां 12 आठवड्याची झाल्यावर द्यावा.
माद्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज समागम काळाच्या 4 ते 6 आठवडे आधी आणि विण्याच्या 4 ते 6 आठवडे आधी द्यावा.
नरांना वर्षातून एकदा एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज द्यावा.
******************************************************************

शेळीपालन यशोगाथा 2

उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पाचे यश
फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्प सातारा, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साकत (ता. जामखेड, जि. नगर) गावातील अशोक मुरूमकर यांच्याकडे आता जातिवंत उस्मानाबादी शेळ्यांचा कळप तयार झाला आहे. करडांच्या विक्रीतून त्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ लागली आहे.
नगर, बीड जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील गावांच्या परिसरातील शेती ही पूर्णतः पावसावर अवलंबून. मागील दोन वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे येथील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहेत. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये उत्पन्नाचे साधन हाताशी असावे म्हणून येथील शेतकरी किमान चार ते पाच उस्मानाबादी शेळ्या सांभाळत आहेत. अशाच शेतकऱ्यांपैकी एक आहेत साकत (ता. जामखेड, जि. नगर) येथील शेतकरी अशोक मुरूमकर. साकत गावामध्ये फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या (नारी), पशुसंवर्धन विभागामार्फत भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्प ऑगस्ट 2011 पासून राबविला जात आहे. उस्मानाबादी शेळ्यांच्या गुणवत्तेमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन अशोक मुरूमकर या प्रकल्पात सामील झाले.
शेळीपालनाबाबत मुरूमकर म्हणाले, की माझी दोन कोरडवाहू शेती. पावसावर केवळ ज्वारी पिकते. परंतु अपुऱ्या पावसामुळे शेतीतून किफायतशीर उत्पन्न मिळेनासे झाले. त्यामुळे मी कमी व्यवस्थापन खर्च असणारा शेळीपालन हा व्यवसाय गेल्या पाच वर्षांपासून करीत आहे. शेळीपालनाला सुरवात करताना गावातूनच दोन उस्मानाबादी शेळ्या खरेदी केल्या. हळूहळू शेळ्या आणि करडांची संख्या वाढत होती. गावातच उपलब्ध असलेल्या बोकडाकडून शेळ्यांचे रेतन करीत होतो. मात्र त्यामुळे कमी वजनाची करडे जन्माला यायची होती. तांबडी, काळी व लालसर रंगाची पिल्ले जन्माला यायची. त्यांची वजने कमी असायची. अशी पिल्ले आजारपणात लगेच मरायची. त्यामुळे काहीवेळा उपचाराचा खर्चही वाढायचा. करडांची विक्री करताना त्यांचे नेमके वजन माहीत नसल्यामुळे खरेदी करणारे व्यापारी अगदी कमी भावाने करडे खरेदी करायचे. त्यामुळे म्हणावा तसा नफा मला शेळीपालनामधून मिळत नव्हता. याचदरम्यान 2011 मध्ये “नारी’ संस्थेतर्फे आमच्या गावात शेळी सुधार प्रकल्पाला सुरवात झाली. नारी संस्थेचे विस्तार अधिकारी के. एन. चव्हाण आणि प्रकल्प कार्यकर्त्या सुरेखा मुरूमकर यांनी शेतकऱ्यांना शेळीपालनात होणाऱ्या चुका सांगितल्या. याचबरोबरीने चांगल्या वंशावळीच्या शेळ्या आणि बोकड पालनातून या व्यवसायातला नफा वाढविता येणे शक्‍य आहे हे समजावून सांगितले.
सुरू झाले सुधारित पद्धतीने शेळीपालन
“नारी’च्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून श्री. मुरूमकर उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पात सहभागी झाले. तज्ज्ञांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर मुरूमकर यांनी कळपातील बारकाळ, दुधाला कमी असणाऱ्या, लवकर गाभ न जाणाऱ्या शेळ्या विकल्या. नेहमी जुळी पिल्ले देणाऱ्या, दुधाला चांगल्या, लवकर गाभ जाणाऱ्या आणि शरीरयष्टीने चांगल्या शेळ्या कळपात ठेवल्या. याच दरम्यान या प्रकल्पांतर्गत उच्च गुणवत्तेचे म्हणजेच ज्या नरांचा वाढीचा दर लहान वयात चांगला होता आणि ज्याच्या आईने दिवसाला दीड ते दोन लिटरपेक्षा जास्त दूध दिले असे पैदाशीचे तीन उस्मानाबादी नर गावातील शेळी कळपांसाठी देण्यात आले. मुरूमकर यांनादेखील पैदाशीचा नर (टॅग क्रमांक – 15895) देण्यात आला. जातिवंत नर कळपात आल्याने शेळ्यांच्या रेतनातून चांगल्या वजनाची करडे जन्मू लागली. मुरूमकर शेळ्यांना दिवसभर गावपरिसरात चरायला नेतात. हिरवे गवत उपलब्ध झाले तर संध्याकाळी शेळ्यांना दिले जाते. आवश्‍यकतेप्रमाणे करडे व शेळ्यांना खुराक (शेंगदाणा पेंड/मका पेंड/ गहू) सुरू केला. शेळ्यांना विण्यापूर्वी एक महिना आणि व्यायल्यानंतर 20 दिवस खुराक दिला जातो. याचबरोबरीने करडे खायला लागल्यापासून अडीच ते तीन महिन्यांपर्यंत खुराक दिला जातो. सरासरी व्यायलेल्या शेळ्यांना दररोज 200 ग्रॅम आणि पिल्लांना 100 ग्रॅम खुराक दिला जातो. शेतकरी स्वतः खुराकाचा खर्च करतात. शेळ्यांना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पावसाळ्यापूर्वी आणि थंडीच्यापूर्वी लसीकरण केले जाते. लेंडी तपासूनच जंत निर्मूलन केले जाते. कळपातील जातिवंत नर, शेळ्यांचे योग्य पोषण आणि व्यवस्थापनामुळे जन्मणारी करडे पूर्ण काळी आणि चांगल्या वजनाची जन्मू लागली आहेत. वेळेत लसीकरण केल्यामुळे ही करडे आता आजारी पडत नाहीत. मरतुकीचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. सध्या मुरूमकर यांच्याकडे सात शेळ्या, एक नर आणि नऊ करडे आहेत. त्यातील काही शेळ्या प्रति दिन दीड लिटर दूध देतात.
प्रकल्प सुरू होण्याअगोदर सहा महिने वय आणि 20 ते 22 किलो वजनाचे करडू सरासरी 2000 रुपयांना विकले जायचे. परंतु प्रकल्पाच्या माध्यमातून वजनानुसार करडांची विक्री केल्यावर काय फायदे होतात हे मुरूमकरांना समजले. त्यामुळे आता करडांची विक्री ही वजनावर केली जाते. त्यामुळे 20 ते 22 किलो वजनाचे करडू आता सरासरी चार हजार रुपयांना विकले जाते. जामखेड आणि पाटोदा येथील व्यापारी गावात येऊन करडांची खरेदी करू लागले आहेत.
…असा झाला आर्थिक नफा
प्रकल्पात सहभागी होण्यापूर्वी मुरूमकर यांच्याकडे एकूण नऊ शेळ्या होत्या. या शेळ्यांपासून वर्षाला 13 करडे मिळायची. साधारणपणे 1500 रुपये प्रति करडू याप्रमाणे 19,500 रुपये मिळायचे. यातून उपचार आणि व्यवस्थापनाचा खर्च वजा करता 16,000 रुपये शिल्लक राहायचे. परंतु प्रकल्पात सामील झाल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत (20/7/2011 ते 23/7/2012) मुरूमकर यांच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून आली.
1) कळपातील एकूण प्रौढ शेळ्या – आठ (यातील दोन शेळ्या एका वर्षात दोनदा (जानेवारी, जुलै) व्यायल्या.)
2) एकूण करडे – 18
3) विक्री झालेली करडे (सात नर आणि 11 माद्या) – सर्व करडे विकली.
4) करडे विक्रीतून उत्पन्न – 57,500 (एक करडू 3,194 रुपये)
5) व्यवस्थापन आणि खाद्य खर्च – 4400 रुपये
6) निव्वळ नफा – 53,100 (एका शेळीमागे वर्षाला 6,638 रुपये नफा)
ही आकडेवारी पाहता वर्षभराचा विचार केल्यास मुरूमकर यांना दिवसाची 146 रुपये अशी मजुरी शेळीपालनातून मिळाली. सध्या साकत परिसरात पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांकडेही नियमित शेतीकाम मिळत नाही. अशा परिस्थितीत शेळीपालनातून मिळणारे उत्पन्न आणि काही अंशी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मुरूमकर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे. सध्या मटणाच्या दरात झालेल्या वाढीमुळे नफ्यातही वाढ होत आहे.
उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पाचे फायदे
साकत गावात सध्या 44 शेतकऱ्यांकडे 275 उस्मानाबादी शेळ्या, तीन नर आणि 450 कोकरे.
दर महिन्याला गावात प्रशिक्षण कार्यक्रमातून शेळी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन.
शिफारशीनुसार लसीकरण, खाद्य व्यवस्थापनाचे नियोजन.
गावातील सर्व गोठ्यांत एकाच दिवशी गोचीड निर्मूलन मोहीम.
शेळ्यांच्या दूध नोंदी घेऊन चांगले दूध देणाऱ्या माद्या आणि त्यांना होणाऱ्या करडांचे पैदाशीसाठी संवर्धन.
शेतकऱ्यांकडे दोन वर्षांमध्ये तीन वेत देणाऱ्या आणि जुळी करडे देणाऱ्या शेळ्यांची चांगली पैदास.
वजनावर करडांची विक्री. त्यामुळे नफा वाढला.
शेळ्यांतील आनुवंशिक सुधारणा महत्त्वाची
“अखिल भारतीय समन्वित उस्मानाबादी शेळी सुधार प्रकल्पा’त सहभागी शेळीपालकांच्या करडांचा जन्म, वजने, मृत्यू, वयोगटानुसार वजने, शेळ्यांनी दिलेले दूध, करडांची विक्री इ. महत्त्वाच्या नोंदी घेतल्या जातात. आनुवंशिक गुणवत्तेची नर करडे निवडण्यासाठी या नोंदीचा उपयोग होतो. चांगली पैदास तयार व्हावी या हेतूने आनुवंशिकदृष्ट्या उच्च प्रतीचे उस्मानाबादी नर शेतकऱ्यांना पुरविले आहेत. शेळ्या व करडांच्या कानात बिल्ले मारून वैयक्तिक नोंदी घेतल्या जातात. कळपातील आजारी शेळ्यांवर तातडीने उपचार केले जातात. आता चांगल्या आनुवंशिक गुणवत्तेच्या शेळ्या, करडे जन्माला येत आहेत. शेतकऱ्यांचा या प्रकल्पात चांगला सहभाग आहे.
– डॉ. चंदा निंबकर,
संचालिका,
पशुसंवर्धन विभाग, निंबकर कृषी संशोधन संस्था

संपर्क –
1) के. एन. चव्हाण – 9970330297
2) सुरेखा मुरूमकर – 9764208862

******************************************************************

यशोगाथा-1 शेळापालन शेतकरी

चंडकापूर (ता. राहुरी, जि. नगर) येथील भास्कर मुरलीधर पंडित यांनी शेतीला जोड म्हणून शेळीपालनास सुरवात केली. उस्मानाबादी शेळ्यांची निवड, योग्य खाद्य व्यवस्थापन, वेळेवर लसीकरण आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार करडे आणि लेंडी खताच्या विक्रीतून त्यांना चांगला आर्थिक नफा होत आहे. शेळीपालनाच्या नफ्यातून त्यांनी शेतीमध्येही सुधारणा केली आहे. चंडकापूर (ता. राहुरी, जि. नगर) येथील भास्कर पंडित यांची अडीच एकर बागायती शेती आहे. कपाशी, ऊस आणि गहू ही मुख्य पिके. आठ वर्षांपूर्वी दुष्काळामुळे पीक लागवडीतून उत्पन्न मिळाले नाही. पुढे विहीरही आटली. रोजगारासाठी पंडित यांनी परिसरातील शेतकरी नामदेव वढणे यांच्याकडे रोजाने काम सुरू केले. या दरम्यान अतिश्रमांमुळे पाठदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शेतीमध्ये पूर्ण वेळ राबणे अवघड झाले. अशा वेळी उत्पन्नासाठी काय करता येईल, याचा विचार करत असताना कमी खर्चाचा शेळीपालन व्यवसाय त्यांच्या डोळ्यासमोर आला. 1) परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून पंडित यांनी शेळीपालनास सन 2004 मध्ये सुरवात केली. पंडित यांनी गावातील शेतकऱ्यांच्याकडून दोन शेळ्या आणि चार करडे विकत घेतली. यासाठी पाच हजार आठशे रुपये खर्च आला. सुरवातीला शेताच्या बांधावरील चारा, नदीकाठी शेळ्यांना चारून संगोपन सुरू केले. शेळीपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी कळपात बोकड असला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले. याच काळात त्यांनी नगरजवळील डॉन बास्को ग्रामीण विकास केंद्रामध्ये शेळी व्यवस्थापनासंबंधी प्रशिक्षण घेतले. तेथूनच त्यांनी बोअर जातीचा बोकड दहा हजार रुपयांना खरेदी केला. 3) बोकड कळपात आल्याने शेळ्या वेळेवर गाभण राहू लागल्या. जातिवंत बोकडामुळे पहिल्या टप्प्यात चांगल्या वजनाची करडे जन्माला येऊ लागली. आर्थिक उत्पनातही वाढ होऊ लागली. 4) याच दरम्यान शेळीपालन आणि करडांच्या व्यवस्थापनासाठी त्यांना ब्राह्मणी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. संपत तांबे यांचे मार्गदर्शन मिळाले. मार्च 2012 मध्ये पंडित यांची शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेत लॉटरी पद्धतीने शेळीपालन व्यवसायासाठी निवड झाली. या योजनेतून त्यांना पंचायत समितीकडून दहा उस्मानबादी शेळ्या व एक उस्मानबादी बोकड असा 87 हजार 857 रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला. गेवराई येथील बाजारपेठेतून त्यांनी उस्मानाबादी शेळ्यांची खरेदी केली. पंडित हे अनुसूचित जातीचे लाभार्थी असल्याने त्यांना 75 टक्के अनुदान मिळाल
असे आहे शेळ्यांचे व्यवस्थापन 1) शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी वीस फूट बाय चाळीस फुटांचा पूर्व-पश्‍चिम गोठा बांधलेला आहे. गोठ्यास तारेचे कुंपण घातले. 2) गोठ्यात शेळ्यांना पुरेसे पाणी पिण्यास मिळावे, यासाठी मोठ्या आकाराची भांडी पाणी भरून ठेवली जातात. शेळ्या त्यांच्या गरजेप्रमाणे पाणी पितात. दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने भांडी भरली जातात. 2) पंडित दररोज सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास शेळ्या नदीकाठी चरावयास नेतात. शेळ्यांचे व्यवस्थापन स्वतःच करतात. 3) शेळ्यांना पुरेसा चारा मिळावा यासाठी त्यांनी 15 गुंठे क्षेत्रावर घासाची लागवड केली आहे. त्यातून वीस शेळ्यांची दररोजची खाद्याची गरज भागते. प्रत्येक शेळीस दररोज गरजेप्रमाणे दोन किलो हिरवा चारा दिला जातो. 4) पशुसंवर्धन विभागाच्या तज्ज्ञांच्याकडून शिफारशीनुसार लसीकरण केले जाते, तसेच जंतनिर्मूलन केले जाते. करडांना पुरेसे दूध पाजले जाते. 5) शेळ्यांमध्ये कोणत्याही रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवली जाते. दोन महिन्यांतून एकदा शेळ्या धुतल्या जातात. 6) गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये शेळ्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे पहिल्या टप्प्यात 15 आणि पुढील सहा महिन्यांत पंधरा करडे गोठ्यात जन्मली. 7) शेळी व्यवस्थापनामध्ये पशुसंवर्धन विभागातील डॉ. शिवाजी क्षीरसागर, डॉ. संपत तांबे, डॉ. बाजीराव टेमकर यांचे मार्गदर्शन मिळते. 8) शेळीपालन व्यवसायासाठी पहिल्यांदा शेळ्यांची खरेदी, विमा, गोठा, खाद्य, पाण्याची भांडी, आरोग्य सुविधा, औषधोपचार अशी 87,000 रुपयांची गुंतवणूक झाली. शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून त्यांना शेळीपालन व्यवसायासाठी 75 टक्के अनुदान मिळाले होते.
शेळीपालन ठरले आर्थिकदृष्ट्या फायद्याचे… गेल्या दीड वर्षातील शेळीपालनातील आर्थिक उत्पन्नाबाबत पंडित म्हणाले, की शेळीपालनाच्या पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर महिन्यात पाच बोकडांच्या विक्रीतून 15 हजार आणि दहा पाटींची विक्रीतून 25 हजार मिळाले. 15 करडे आणि 15 शेळ्यांचा पाच महिन्यांचा चारा, खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनाचा खर्च अधिक स्वतःची मजुरी असा एकूण 27 हजार खर्च झाला. यातून खर्च वजा जाता 13 हजार निव्वळ नफा झाला. दुसऱ्या टप्प्यात जूनमध्ये सहा बोकडांच्या विक्रीतून 18 हजार आणि नऊ पाटींच्या विक्रीतून 22,500 रुपये मिळाले. या दुसऱ्या टप्प्यात शेळ्या आणि करडांचे व्यवस्थापन आणि स्वतःची मजुरी धरून 25 हजार रुपये इतका खर्च आला. खर्च वजा जाता 15,500 रुपये नफा झाला. आता चारा स्वतःच्या शेतातील असल्याने व्यवस्थापन खर्च कमी होणार आहे. साधारणपणे सहा महिन्यांची करडे वजनावर विकली जातात. व्यापारी स्वतः गोठ्यावर येऊन करडांची खरेदी करतात. पंडित यांना दीड वर्षात खर्च वजा जाता करडांच्या विक्रीतून 28,500 रुपये आणि लेंडीखत विक्रीतून 30 हजार रुपये निव्वळ नफा झाला आहे. लेंडी खताला चांगली मागणी पंडित हे दीपस्तंभ शेतकरी गटाचे सदस्य आहेत. या गटाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय वने आणि कृषी अधिकारी जयवंत भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी लेंडीखत प्रकल्प केला आहे. सात रुपये किलो दराने लेंडी खत परिसरातील शेतकऱ्यांना विकले जाते. शेतकरी गटातील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सुधारित पद्धतीने ऊस लागवडीला सुरवात केली. सध्या दोन एकरांवर ऊस लागवड, 15 गुंठे क्षेत्रावर घास लागवड आहे. सुधारित तंत्रामुळे उसाचे उत्पादन एकरी 40 टनांवरून 60 टनांवर गेले आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून लेंडी खताचा वापर त्यांनी वाढविला आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार त्यांनी भाजीपाला लागवडीचेही यंदा नियोजन केले आहे. शेळीपालन करताना…
1) जातिवंत उस्मानाबादी शेळी आणि बोकडाची निवड महत्त्वाची.
2) शेळ्यांना वेळेवर लसीकरण, जंतनिर्मूलन आवश्‍यक.
3) शेळ्यांना पुरेसा चारा आणि खाद्य व्यवस्थापनावर लक्ष हवे.
4) दर तीन वर्षांनी बोकड बदलणे आवश्‍यक.
5) गाभणकाळात शेळ्यांची काळजी घ्यावी. करडांना पुरेसे दूध पाजावे.
6) गोठ्याची स्वच्छता महत्त्वाची.
संपर्क ः
भास्कर पंडित ः 9763073921
डॉ. संपत तांबे ः 9850297024
लेखक : अनिल देशपांडे

******************************************************************

शेळीपालन विषयक उपयुक्त माहीती

शेली पालन करण्या पूर्वी या बाबत ची सर्व माहिती घ्यावी, या विषयावर प्रशिक्षणे उपलब्ध आहेत,त्या प्रशिक्षणात सहभागी व्हावे काही सुरु असलेल्या शेळी फार्म ला भेट द्यावी आणि नंतरच सुरु करावे !!! शंका करिता श्री वसंत कोरडे फोन ९४२३७८६४१८ या वर संपर्क करावा.
शेळ्यांच्या जाती-उस्मानिबादी-हि जात मात्नासाठी चांगली आहे, संगमनेरी- हि जात दुध व मांस या दोन्हीसाठी चांगली आहे
निवारा-आडोश्यासाठी ४ फुटाची भिंत, चाऱ्यासाठी गव्हाण, पाण्याचा हौद ए. सोय असलेला गोठा असावा.
खाद्य- १ लिटर पेक्षा जादा दुध देणाऱ्या शेळ्यांना ३-४ किलो हिरवा चार/दिवस, वाळलेला चारा १ किलो, १००-२०० ग्राम खुराक देणे. सेवरी, अंजन, हदगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वाद, पिंपळ ए. झाडांचा पाला शेळ्या आवडीने खातात.
करडांची जोपासना-निरोगी करडे जन्मण्यासाठी शेवटच्या गाभण काळात विशेष काळजी घ्यावी, करडे जन्मल्यानंतर नळ कापावी, नख्या कापणे, १ तासाच्या आत पहिले दुध पाजणे महत्वाचे असते. करडे जन्मानंतर दुध पुरेसे नसल्यास दुसऱ्या शेळीचे दुध पाजावे.
प्रशिक्षणसाठी आपण जिल्हा उप आयुक्त पशुसवर्धन यांच्याशी संपर्क साधावा
शेळ्यांच्या नोंदी कशा प्रकारे ठेवता येतील यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करावे
http://mr.vikaspedia.in/agriculture/animal-husbandry/92c915930940-92a93e932928/93694793394092a93e93292893e924940932-92894b90292693593994091a947-90592892894d92f93893e92793e930923-92e93992494d92494d935
शेळी पालन व्यवसाया संबधी योजना बाबत अहिल्याबाई होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ गोखलोनगर पुणे ४११०५३ महात्माफुले विकास महामंडळ जिल्हा उद्योग केंद्र यांचेशी संपर्क साधावा.
शेळया मिळण्याससाठी संपर्क-
१. अहिल्यादेवी होळकर, शेळी, मेंढी विकास महामंडळ, गोखलेनगर पुणे- ४११०५३, फोन – 020-25667895
२. निमकर सीड्स प्रायवेट लिमिटेड -http://www.indiaboer.com/index.php , Phone: 02166 – 222298, 221375
******************************************************************

शेळींचा गोठा व इतर माहीती

शेळ्यांसाठी गोठा (मेषगृहे)
1.डीप लिटर सिस्टम (जनावरांसाठी तृण शय्या)
image
लहानसा कळप ठेवण्यासाठी पुरेशा आकाराचे शेड ज्यांमध्ये चांगले वातायन (Cross ventilation) असावे.
लिटरची (गवताच्या गादीची) उंची कमीत कमी 6 सें.मी. असावी.
लिटर तयार करण्यासाठी लाकडाचा भुगा, धान्याचा भुसा आणि शेंगांच्या सालपटांचा वापर करावा.
लिटरला थोड्या दिवसांनी वरखाली आलट-पालट करीत राहावे ज्याने घाण वास येत नाही.
दर दोन आठवड्यांनी लिटर सामग्री बदलावी.
प्रत्येक शेळीला सुमारे 15 चौरस फुट जागा हवी असते.
बाह्य-परान्नपुष्ट उपद्रव कमी होईल ह्याबाबत काळजी घेण्यात यायला हवी.
एक प्रौढ शेळी एका वर्षांत सुमारे एक टन खत टाकते.
2. रेझ्ड प्लॅटफॉर्म सिस्टम (उंचीवर असलेला मंच)
image
जमिनीपासून 3 ते 4 फुटांवर लाकडी तख्त किंवा तारांची जाळी यांचा वापर ह्या पध्दतीत केला जातो.
ह्या पध्दतीत बाह्य-परान्नपुष्ट उपद्रव पुष्कळ कमी होण्याची शक्यता असते.
*संगोपनाच्या पध्दती
सेमी इंटेन्सिव्ह सिस्टम (अर्ध-गहन पध्दती)
कमी कुरणे असतील अशा जागा, शेळ्यांना मुबलक हिरवा चारा देणे शक्य असेल आणि चरल्या नंतर घन आहार देता येईल.
इंटेन्सिव्ह सिस्टम
शेडमध्ये शेळ्यांना हिरवा चारा आणि घन आहार देण्यात येतो.
कुरणात चारणे नाही.
शेळ्यांसाठी गोठा (किंवा आश्रयस्थाने) डीप लिटर किंवा रेझ्ड प्लॅटफॉर्म सिस्टमची असावीत.
*शेळ्यांचा विमा
4 महिने वयापासून शेळ्यांचा विमा जनरल इन्शुअरन्स कंपनीज् मार्फत काढला जाऊ शकतो.
अपघात किंवा रोगामुळे शेळीला मरण आल्यास विम्याचा दावा केला जाऊ शकतो.
*भारतामध्ये शेळ्यांचे फार्म
नादूर शेळी फार्म
शिवाजी पार्क शेळी फार्म
******************************************************************

शेळी -आहार प्रबंधन

आहार प्रबंधन
चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो
प्रोटीनयुक्त हिरवा चारा जसे अकेसिया, ल्यूसर्न आणि कसावा तसेच आहारात नायट्रोजन स्त्रोत असणे महत्वपूर्ण आहे.
शेतकरी शेताच्या कडेने अगाथी, सबाबुल आणि ग्लॅरिसिडियाची झाडे लावू शकतात आणि हिरवा चारा म्हणून देऊ शकतात.
एक एकराच्या जमिनीच्या क्षेत्रात उगविलेली झाडे आणि चारा 15 ते 30 शेळ्यांना पोसण्यासाठी पुरेसा आहे.
घन आहार खाली दिल्याप्रमाणे तयार करता येऊ शकतो:
क.आ- करडांचा आहार
वृ.आ.- वृद्धी आहार
स्तन आ – स्तनपान करणार्या शेळी
गर्भार – गर्भार शेळीचा आहार
_________________________________
घटक । क.आ.   वृ.आ.     स्तन.आ     गर्भा
ज्वारी     37      15          52           35
डाळी     15       37            _              _
तेलवड्या 25     10           8            20
गवताचा  20        35          37           42
भुसा   
खनिज   2.5         2              2              2
मिश्रण
सामान्य 0.5          1               1                 1
मिठ
एकुण-  100    100         100            100
*करड्यांना पहिल्या 10 आठवड्यांत 50-100 ग्राम घन/सांद्रित आहार द्यायला पाहिजे.
*वाढत्या वयाच्या करड्यांना 3-10 महिन्यांपर्यंत दररोज 100-150 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
*गाभण असलेल्या शेळीला दररोज 200 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
1 लिटर दूध देणाऱ्या दुधारू शेळ्यांना दररोज 300 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
*शेळ्यांच्या स्टॉलमध्ये उत्तम प्रकारच्या तांब्याने युक्त (950-1250 पीपीएम) असलेले मिनरल ब्लॉक्स पुरविण्यात यायला हवे.
image
******************************************************************

शेळी -उपयुक्त प्रजाती

शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणायांसाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. किरकोळ किंवा चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनी ह्या गाय किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या नसतील, पण शेळी हा उत्तम पर्याय आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा किरकोळ आणि लहान शेतकÚयांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो.
हे कोण सुरू करू शकते?
लघु आणि मध्यम शेतकरी
ज्यांच्याकडे जमीन नाही असे श्रमिक
सामान्य कुरणांची उपलब्धता
सुरू करण्याची कारणे
कमी भांडवल निवेश आणि लवकर प्राप्ती होणे
साधे आणि लहान शेड पुरेसे आहे
स्टॉल (एका जनावरास बांधण्याची जागा) फेड स्थितीत ठेवल्यास नफा देणारे
शेळ्यांचा उच्च प्रजोत्पादन दर
वर्षभराचे काम
चर्बी नसलेले मांस आणि कमी वसा असलेले व सर्व लोकांना आवडणारे
केव्हां ही विकून पैसे मिळविता येतात
*तुमच्यासाठी कोणती प्रजाति चांगली आहे?
1)जमनापरी
image
चांगली उंची असलेले जनावर
प्रौढ जमनापरीमध्ये चांगले सुबक बाकदार रोमन नाक आणि किमान 12 इंच लांबीचे हेलकावे घेणारे कान
बोकडाचे वजन सुमारे 65 ते 85 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 45 ते 60 किलोग्राम असते
प्रत्येक विण्याच्या वेळी एकच करडू
सहा महिन्यांच्या करड्याचे वजन सुमारे 15 किलोग्राम असते
दर रोज किमान 2-2.5 लिटर दुधाचे उत्पादन
2)तेलीचेरी
image
शेळ्यांचा रंग पांढरा, भुरा किंवा काळा असतो
एका विण्यात 2-3 करडी
बोकडाचे वजन सुमारे 40 ते 50 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 30 किलोग्राम असते
3)बोअर
image
संपूर्ण विश्वभरात मांसाकरीता पाळतात
वाढीचा दर तीव्र आहे
बोकडाचे वजन सुमारे 110 ते 135 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 90 ते 100 किलोग्राम असते
90 दिवसांच्या करड्याचे वजन 20-30 किलोग्राम असते



****************************************************************

पशुधन शासकीय योजना व धोरण



****************************************************************

शासकीय योजना

शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या काही महत्वपूर्ण योजना .
केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात पण त्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत, शेतकर्यापर्यंत पोहचत नाहीत …योजना सर्वसामान्य शेतकऱ्यास माहिती व्हाव्यात या उद्देषांतून खास चावडी तर्फे काही निवडक योजनांची माहिती जनहितार्थ प्रकाशित. कोणत्याही योजेनेच्या अधिक माहिती साठी आपल्या चावडी कॉल सेंटर 9595044044 या क्रं. वर कॉल करा.
1. गाई-म्हशी विकत घेणे –
प्रकल्प खर्च – ६ लाख – १० जनावरे
(शासकीय योजना – २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस सी/एस टी साठी )
2. शेळीपालन –
प्रकल्प खर्च ४.५ लाख – ५० शेळ्या २ बोकड
(शासकीय योजना – २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी)
3. कुक्कुटपालन –
प्रकल्प खर्च – ८ लाख -५००० पक्षी
(शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी)
4. शेडनेट हाऊस –
प्रकल्प खर्च – ३.५ लाख – १० गुंठे
(शासकीय योजना – ५० % )
5. पॉलीहाउस –
प्रकल्प खर्च -११ लाख – १० गुंठे
(शासकीय योजना – ५० % )
6. मिनी डाळ मिल –
  प्रकल्प खर्च -१.८८ लाख
  (शासकीय योजना – ५० % )
7. मिनी ओईल मिल –
  प्रकल्प खर्च -५ लाख
(शासकीय योजना – ५० % )
8. पॅकिंग व ग्रेडिंग सेटर-
३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी.
9. ट्रॅक्टर व अवजारे –
प्रकार १- (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये १ लाख अनुदान /३५ % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-२० ते ७० PTOHP रुपये ७५ हजार अनुदान /२५  % -इतर लाभधारकांसाठी )
10. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या कमी
प्रकार १- (शासकीय योजना-५००००/- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-४० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )
11. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या जास्त
प्रकार १- (शासकीय योजना-७५ हजार /- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-६० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )
12. काढणी व बांधणी यंत्र –
शासकीय योजना –रुपये १.२५ लाख ( ५० % )
13. रोटाव्हेटर-२० बीएचपी खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-३५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-२८ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
रोटाव्हेटर-२० बीएचपी वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-४४ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-३५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
14. कडबा कुट्टी यंत्र/ पेरणी यंत्र-
२० बीएचपी खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-१२ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
२० बीएचपी वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१९ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-१५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
15. उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका –( किमान २ ते ४ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ४०% भांडवलाच्या निगडीत २५ लाख प्रती हेक्टर
16. छोट्या रोपवाटिका साठी -–( १ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ५०  भांडवलाच्या निगडीत १५ लाख प्रती हेक्टर
17. गोडाऊन(वेअर हाउस)-
  प्रकल्प खर्च-३५ लाख -१००० मे. टन
  (शासकीय योजना-२५ %)
18. शीत गृह –५००० मेट्रिक टन साठी
(शासकीय योजना-३५ % अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी /५०% आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी )
२८०० प्रती मे .टन प्रकार १ साठी
३५०० प्रती मे .टन प्रकार २ साठी.
19. गांडूळ खत प्रकल्प –
प्रकल्प खर्च-६०० घनफूट प्रोरीत धरतीवरती
(शासकीय योजना-५००००/- प्रती उत्पादन प्रकल्प
20. उसाच गुऱ्हाळ –
प्रकल्प खर्च- १४ लाख
(शासकीय योजना- ५० %)
21. फळ प्रक्रिया उद्योग –
प्रकल्प खर्च- २४ लाख
(शासकीय योजना – ४० %)
22. फळबाग लागवड (एन.एच.बी.)-
  प्रकल्प खर्च- २० लाख – १० एकर
  (शासकीय योजना- ४० %)
23. स्पिरुलीना (शेवाळ शेती)-
   प्रकल्प खर्च- ४.५ लाख
    (शासकीय योजना – ५० % )
24. भाजीपाला सुकवणे-
   प्रकल्प खर्च-२४ लाख
   (शासकीय योजना-४० %)
25. कृषि सल्ला व सेवा केंद्र –
   प्रकल्प खर्च-५ लाख
   (शासकीय योजना-४०%)
26. सोयाबीन मिल्क व उत्पादने-
     प्रकल्प खर्च- ८ लाख
     (शासकीय योजना- ४० %)
27. कृषी पर्यटन (अॅग्रो टूरीझम)-  प्रकल्प खर्च-१० लाख
वरील माहिती थोडक्यात दिली असून या आणि यासारख्या किमान २०० पेक्षा अधिक योजना दर वर्षी राबविल्या जातात या बाबत अधिक माहिती तुम्हाला 9595044044 या क्रं वर किंवा http://www.chawadi.co.in वेबसाईट वर मिळेल.
जर ही पोस्ट तुमच्या उपयोगी नसेल तरी आपल्या किमान १० शेतकरी बांधवाना जरूर पाठवा.
 *******************************************

शेतीविषक शासकीय योजना

शेतीविषयक योजनांसाठी खालील संकेत स्थळांना भेट द्या.
:// http://www.mahaagri.gov.in/Schemes/guidelinem.aspx?topicid=1
2)http:// http://www.mahaagri.gov.in/Schemes/guidelinetopic.aspx?topicid=0

********************************************************



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल