सोमवार, २१ मार्च, २०१६

"जंगल' उभारणारा ध्येयवेडा अवलिया माणूस

"जंगल' उभारणारा ध्येयवेडा अवलिया माणूस



लातूर - एखादं रोपटं लावून त्याची प्रसिद्धी घेणाऱ्यांची संख्या समाजात लक्षणीय आहे. परंतु प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहत गेली 36 वर्षे अव्यह्यातपणे झाडे लावत आसाममधील ब्रह्मपुत्रे वालुकामय प्रदेशाला जंगलाचे रूप देण्याचे काम एका आदिवासी व्यक्तीने केले आहे. या व्यक्तीच्या कामाची देशानेच नव्हे तर जगानेदेखील आता दखल घेतली आहे. जादव पायेंग असे या अवलिया व्यक्तीचे नाव आहे. "ग्रीन इंडिया‘चे ते स्वप्न पाहत आहेत. 

येथील "वेध‘च्या व्यावसायिक प्रबोधन परिषदेच्या निमित्ताने श्री. पायेंग येथे आले होते. त्यांनी "सकाळ‘ गप्पा मारत करत असलेल्या कामाची माहिती दिली. पायेंग दहावीत शिकत असताना एका वर्षी उष्माघातामुळे ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर शंभर ते दीडशे साप मरण पावल्याचे त्यांना दिसून आले. साप कशाने मृत्युमुखी पडले?, साप वाचविण्यासाठी काय केले पाहिजे? हे ते शोधत असताना गावातील कृषी तज्ज्ञ येदूनाथ बेसबुरवा यांनी साप वाचविण्यासाठी झाडे लावण्याचा त्यांना सल्ला दिला. तेथूनच त्यांनी झाडे लावण्याच्या कामाला सुरवात केली. 

ब्रह्मपुत्रेच्या वालुकामय प्रदेशात दररोज झाडे लावण्याचा पायेंग यांचा उपक्रम सुरू आहे. केवळ झाडे लावायचेच नाही तर ते जगली पाहिजेत, या करिता ते प्रयत्न करीत आहेत. हे काम करीत असताना लोकांनी त्यांना वेडंही ठरवलं. पण एक ध्येय घेऊन ते काम करीत आहेत. झाडे लावणे हे त्यांचे जीवनकार्य समजून 36 वर्षांत 25 किलोमीटर अंतरात एक हजार 370 हेक्‍टर क्षेत्रात जंगल उभारले आहे. 

आदिवासी समाजात लग्नही लवकर केली जातात. पण जादव पायेंग यांच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. झाडे लावण्याचा इतका छंद त्यांना जडला गेला की ते लग्नही करायलाही वेळ लागला. वयाच्या 38 व्या वर्षी त्यांनी लग्न केलं. त्यांचे कुटुंब आज त्यांच्या कामात आहे. 

पायेंग यांनी उभारलेल्या या जंगलात बांबू तसेच अनेक वनौषधी आहेत. सर्व खाण्याच्या वस्तू त्यांना जंगलातूनच मिळतात. त्यांच्या या जंगलाचा मोह प्राण्यांनाही पडला. यातूनच आज या जंगलात 150 हत्ती, पाच वाघ , शंभर पेक्षा जास्त हरीण आहेत. 

काही वर्षांपूर्वी हत्तींनी परिसरातील पीक नष्ट केलं होतं. त्यातून ग्रामस्थ त्यांना मारण्यासाठीही उठले होते. त्यावेळी पायेंग यांनी अगोदर मला मारून टाका नंतर हत्तीला मारा, अशी भूमिका घेतल्याने ग्रामस्थांना व प्रशासनालाही नरमाईची भूमिका घ्यावी लागली. एक माणूस जंगल उभारू शकतो हे कोणालाही खरे वाटत नाही. पण ते काम पायेंग यांनी केले आहे. देशानेच नव्हे तर जगाने त्यांची दखल घेतली आहे. आजपर्यंत त्यांच्या या जंगलाला अमेरिका, जर्मनी, स्वित्झर्लंड, इस्त्राईल, थायलंड, चीन, बेल्झीयम, कॅनडा , दक्षिण कोरिया, अशा अनेक देशाच्या प्रतिनिधींनी भेट दिली आहे. 

राष्ट्रपतींच्या अखत्यारित "जंगल‘ असावे 
जंगल ही आपली संस्कृती आहे. वाढत्या लोकसंख्येत ती नष्ट केली जात आहे. भविष्यात आणखी वृक्ष तोड होण्याची भीती आहे. राजकीय हस्तक्षेप वाढत चालल्याने जंगलतोड होत आहे. त्यामुळे देशातील सर्वच जंगल राष्ट्रपतींच्या अखत्यारित देण्याची गरज आहे. "झाडे लावा झाडे जगवा‘ हे केवळ पुस्तकात सांगून किंवा पर्यावरण दिन साजरा करून चालणार नाही तर दहावीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या ऑक्‍सिजनसाठी किमान दोन झाडे लावून ती जगवली पाहिजेत 
- जादव पायेंग, फॉरेस्ट मॅन, आसाम 






- हरी तुगावकर - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2016 - 10:15 AM IST

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल