शुक्रवार, १८ मार्च, २०१६

जलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा!

जलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा!

'पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती' ही बाब आज सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवी. पाणी म्हणजे जीवन असल्याकारणानं ते सर्वांनाच हवंय. पण याच पाण्याची उधळपट्टी न करता, पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी आज प्रत्येकानंच जलसाक्षर होण्याची गरज आहे. यापुढची युद्धं पाण्यावरून होतील असं भाकीत केलं जातंय. त्यामुळं या समस्येकडं गांभीर्यानं बघायला पाहिजे. जागतिक जलदिनानिमित्त जलसाक्षरतेमुळं कशी प्रगती होते, याचाच घेतलेला एक आढावा.
 

image'पाणी-प्रत्येक थेंब महत्वाचा'
जागतिक तज्ज्ञांच्या मते भारताची लोकसंख्या २०२५ सालापर्यंत १५० कोटी होणार आहे. माणसाच्या दैनंदिन गरजेसाठी माणशी १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापरलं जातं. नागपूर, पुणे-मुंबईसारख्या शहरात तर हेच वापरायचं प्रमाण २०० प्रति लिटरपर्यंत जातं. पाण्याचा असाच वापर होत राहिला तर येत्या दहा-पंधरा वर्षात पाणी समस्या उग्र रूप धारण करील असं भाकीत केलं जात आहे.

पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती
आपल्या देशात सर्वाधिक पाण्याचा वापर शेतीसाठी होतो. मात्र शेतीसाठी आता पारंपरिक पद्धती सोडून ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केल्यास उपलब्ध पाण्यात चारपट पीक घेता येऊ शकतं, हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झालंय. मात्र अजूनही या नव्या पद्धतींचा स्वीकार शेतकर्‍यांनी म्हणावा तितका केला नाही.


दूषित पाण्याचा पुनर्वापर- औद्योगिक क्षेत्रानं घ्यावा पुढाकार
शेतीपाठोपाठ उद्योगधंद्यासाठीही पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या उद्योगधंद्यासाठी वापरात आणलेलं पाणी बहुतांश ठिकाणी पुन्हा नदीच्या पात्रातच सोडलं जातं. त्यामुळं रासायनिक प्रक्रियेनं दूषित झालेल्या पाण्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होऊन ते धोक्यात येतं. त्यानं आपलंच नुकसान होत आहे. अशा दूषित पाण्यानं महाराष्ट्रासह नदीकाठी वसलेल्या शहरांमधील नागरिकही पार बेजार झाले आहेत. हेच पाणी जर प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी उपयोगात आणलं तर त्याचा चांगलाच लाभ होणार आहे. शेतीसाठीही या पाण्याचा वापर होऊ शकतो. यासाठी कारखान्यांनी प्रक्रिया यंत्रणा बसविण्याची गरज आहे.

यंदा उन्हाळ्यापूर्वीच राज्यात पाणीटंचाई उद्भवली असून अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. यावर उपाय करण्यासाठी नद्यांवर धरण बांधणं, नद्याजोड प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प साकारायला हवेत. पाणी योजनांवर गुंतवलेला पैसा पाणीपट्टीच्या रूपानं गोळा व्हायला हवा. जलसंधारणासाठी विशेष उपाय योजना करायला हव्यात. यासगळ्यांचा वापर ज्यांनी केला त्यांच्या गावात, शेतात या दुष्काळी परिस्थितीतही पाणी आहे आणि त्यांची पिकं चांगली डुलतायेत.

गरज जलसाक्षर होण्याची

playहिवरे बाजार-
अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे. राज्यातली बरीच गावं टॅंकरवर अवलंबून आहेत, काही ठिकाणी पाण्याशिवाय जगणं अशक्य झाल्यामुळं लोक स्थलांतर करतायत. तर चाऱ्यापाण्याची आबाळ झाल्यानं पोराबाळाप्रमाणं जपलेली जनावरं लोकांनी विक्रीला काढलीत. पण दूरदृष्टी असलेला नेता गावाला मिळाला तर नक्कीच बदल घडतो... काटेकोर नियोजन करून गाव पाण्यानं स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच लोकसहभागातून गावाचा विकास साधण्याची किमया केलीय अहमदनगर जिल्ह्यातल्या पोपटराव पवारांच्या आदर्श हिवरे बाजारनं. शिवाय इथल्या जिल्हा परिषद शाळेनं आपल्या विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्याचा वसा हाती घेतला असून इथल्या शाळेत सौर ऊर्जेच्या मदतीनं चक्क मोटरनं बोअरमधून पाणी उचललं जातं आणि आपसूक पाण्याच्या टाकीत भरलं जातं पाणी.

playकडवंची, जालना-
सगळ्यात जास्त दुष्काळाचा फटका बसलेल्या जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावानं जलसाक्षरतेचं एक उदाहरण सर्वांपुढं ठेवलंय. कडवंची गावानं पाण्याचा योग्य ताळेबंद मांडून, पिकांचं व्यवस्थापन करून आणि पाणी वापराचं काटेकोर नियंत्रण करून सर्वांपुढं दुष्काळाच्या भस्मासुरालाही योग्य नियोजनानं यशस्वी तोंड देता येतं हे आपल्या आदर्शानं दाखवून दिलंय.

playपैठण, औरंगाबाद -
मराठवाड्यात पसरलेल्या दुष्काळाची झळ आता राज्यभरात चांगलीच जाणवायला लागलीय. दुष्काळामुळं मोसंबीचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फळबागांना कुऱ्हाड लावण्याची वेळ आली. पण जिद्द असेल तर काय होऊ शकतं हे औरंगाबादच्या पैठणमधील एका शेतकऱ्यानं आपल्या उदाहरणानं दाखवून दिलंय.

playकमळगंगा नदी, मूर्तिजापूर-
नदी म्हणजे जीवन. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीकाठानं हिरवीगार शिवारं डुलतात. समृद्धी, सुख, समाधानाची टवटवी सर्वत्र दिसते. पण हीच नदी उन्हाळ्यात आटते आणि शेताशिवारांवर दिसू लागते, दुष्काळाची काळी छाया. याचं कारण गाळानं भरलेल्या नद्या. अरुंद झालेली नदीपात्रं. गाळामुळं नदीत पाणी साचत नाही. सगळं काही रूक्ष होऊन जातं... यावर उपाय शोधलाय, अकोल्यातल्या मूर्तिजापूर गावानं. त्यांनी गावच्या कमळगंगा नदीचंच चक्क पुनर्भरण केलंय. त्यामुळं इतरत्र दुष्काळ असतानाही नदी भरलेली आहे. सारा परिसर हिरवागार आहे.

playवरूड, अमरावती-
अमरावती जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके म्हणजे संत्र्यांचं आगार! संत्रा बागांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीला इतकी भोकं पाडून ठेवली, की बेसुमार पाणीउपशामुळं हा भाग ड्रायझोन म्हणून जाहीर झाला. आता राष्ट्रीय पेय जल सुरक्षा अभियानांतर्गत या दोन्ही तालुक्यांतील १९० गावांमधील गावकरी आर्थिक अंदाजपत्रकाप्रमाणं पाण्याचं अंदाजपत्रक तयार करतायत. पाण्याचं पुरतं महत्त्व कळल्यानं थेंबाथेंबाचं नियोजन करण्यात ते सध्या गुंग आहेत.

playमेळघाट, अमरावती -
मेळघाटाच्या भाळी कुपोषण पाचविला पुजलंय. दारिद्र्य, शिक्षण याबरोबरच पायाभूत सुविधांचा अभाव त्याला कारणीभूत आहे. वीज नाही म्हणून इथल्या आदिवासी पाड्यांना शुद्ध पाणीपुरवठा करता येत नाही. त्यावर आता प्रशासनानं सौरऊर्जेची मात्रा लागू केलीय. यामुळं जवळपास पन्नासहून अधिक पाड्यांना नळानं शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागलाय. दारात पाणी आल्यानं आदिवासींच्या जगण्याचे संदर्भच बदलले असून, महिलांना मुलाबाळांकडं लक्ष द्यायला वेळ मिळतोय.

playपुसेगाव, सातारा-
दुष्काळी भागातील यात्रा म्हणजे पुसेगाव इथला सेवागिरी महाराजांचा रथोत्सव. इथल्या रथोत्सवात येणारे भाविक मोठ्या प्रमाणात दहा, शंभर, पाचशे रुपयांचे हार अर्पण करत असतात. लोकांनी सढळ हातानं दिलेल्या या पैशांचा काळजीपूर्वक वापर करून इथल्या देवस्थान ट्रस्टनं जलसंधारणाच्या विविध योजना राबवल्यात. याचा फायदा इथल्या भागातील लोकांना होतोय.

playजुन्नर, पुणे- 
शिवनेरी गडावरील टाक्यांना पाणी आहे, तर जवळच सह्याद्रीच्या रांगेत राहणाऱ्या आदिवासींची पाण्यासाठी परवड का, या प्रश्नाचा ध्यास तहसीलदारांनी घेतला. राबून प्रामाणिकपणं काम केलं. त्यांनी कातळात खोदलेली 10 टाकं आज पाण्यानं भरल्यानं इथल्या आदिवासींचं जीवनही भरून पावलंय. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर खडकालासुद्धा पाझर फुटून पाणी उपलब्ध होऊ शकतं, याचं हे उदाहरण.

एकूणच काय तर आपण जलसाक्षर झालो तर पाण्याच्या योग्य नियोजनातून दुष्काळावर मात करता येऊ शकते, हेच या उदाहणांवरून स्पष्ट होतं.

जाता जाता पाण्याचं महत्त्व सांगताना कवी बा.भ. बोरकरांची ही कविता...

तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी
पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी
कवी- बा. भ. बोरकर











सौजन्य : भारत फॉर इंडिया.क्वाम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल