मंगळवार, २९ मार्च, २०१६

योग्य व्यवस्थापनामुळे वाढते शेळ्यांची उत्पादनक्षमता .


goa1

चांगल्या उत्पादनासाठी शेळ्यांचे उत्तम संगोपन होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेळ्यांचा गोठा, त्यांचा आहार, लसीकरण इत्यादी बाबींचे काटेकोरपणे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
शेळ्यांच्या उत्पादनक्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी चांगल्या गोठ्याची गरज असते. गोठ्यातील अस्वच्छ, कोंदट वातावरण, ओलसरपणामुळे शेळ्यांमध्ये रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो. करडांची वजनवाढ खुंटते. शेळ्यांच्या पैदाशीवर विपरीत परिणाम होतो. अति गरम आणि अति थंड हवा व पाऊस यापासून संरक्षण होईल, असा गोठा तयार करावा.
शेळ्यांचा गोठा
– शेळ्यांच्या गोठ्यासाठी शक्यतो उंचावरील उत्तम उतार असलेली मुरमाड जमीन निवडावी.
– गोठ्यातील जमीन मुरमाची, उत्तम निचऱ्याची असावी.
– गोठ्याचे बांधकाम पूर्व-पश्चिम असावे, जेणेकरून गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश येईल व हवा खेळती राहील.
– गोठ्याच्या बाजूने कुंपण म्हणून शेवरी, सुबाभुळीची झाडे लावावीत ज्याचा शेळ्यांना चारा म्हणूनही उपयोग होईल.
– गोठ्याचे छत इंग्रजी A आकाराचे असावे. छताची उंची १० ते १५ फूट असावी. गोठ्याच्या कडेला जवळपास ९ फुटांपर्यंत मोकळी जागा असावी.
– गोठ्यात दीड ते दोन फूट लांबीची गव्हाण ठेवावी.
– गोठ्याची लांबी शेळ्यांच्या संख्येनुसार वाढवावी मात्र रुंदी ३५ ते ४० फुटांपेक्षा जास्त नसावी.
शेळ्यांच्या वयोगटानुसार जमिनीचे आवश्यक क्षेत्रफळ (चौ.मी.):
१. प्रौढ शेळ्या – १.२५ ते १.५०
२. गाभण व दुभत्या शेळ्या – २.०
३. नर – २.०
४. करडे
अ) तीन महिन्यांपर्यंत – ०.५ ते ०.६
ब) तीन ते सहा महिने – ०.७ ते ०.९
क) सहा ते बारा महिने – १.०
gotcare
शेळ्यांचे आहार व्यवस्थापन:
– पूर्वीपासून चालत आलेल्या पद्धतीने शेळीपालन करताना आहारासाठी काहीही खर्च होत नाही; परंतु आता शेळीपालन व्यवसाय बंदिस्त किंवा अंशतः बंदिस्त पद्धतीने करणे अधिक किफायतशीर ठरणार आहे. यामध्ये शेळ्यांना गोठ्यात आहार पुरवणे आवश्यक आहे.
– शेळ्यांच्या उत्तम वाढीकरिता व पैदाशीकरिता शेळ्यांच्या आहाराचे सुरवातीपासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
शेळ्यांच्या आहारात दशरथ घास, संकरित नेपिअर गवत, फुले जयवंत, बरसीम, शेवरी
इ. चारा पिकांचा समावेश करणे फायद्याचे ठरते.
– वरील चारापिकांपैकी दशरथ घास हे अत्यंत उपयुक्त चारापीक असून, ते बहुवार्षिक आहे. दशरथ घास प्रथिनयुक्त, लुसलुशीत असल्यामुळे शेळ्या आवडीने खातात. त्याचबरोबर फुले जयवंत हे चारापीकही वर्षभर हिरवा चारा पुरविते.
– शेळीला वजनाच्या ४ टक्के एवढ्या शुष्क पदार्थांची गरज असते. सर्वसाधारणपणे ३० ते ४० किलो वजनाच्या शेळीला ३ ते ४ किलो हिरवाचारा, ५०० ते ७५० ग्रॅम वाळलेला चारा व २५० ते ३५० ग्रॅम पशुखाद्य द्यावे.
– गर्भधारणेच्या शेवटच्या दोन महिन्यांत ४०० ते ५०० ग्रॅम पशुखाद्य द्यावे. त्यामुळे जोमदार वाढीची जास्त वजनाची करडे मिळतात.
शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन:
– शेळी रोगाला फारशी बळी पडत नाही; परंतु विशेषतः पावसाळ्यात शेळीची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याकरिता वेळेवर लसीकरण करणे नियमित जंत निर्मूलन करणे, गोठ्याची स्वच्छता करणे या बाबी महत्त्वाच्या आहेत.
– पचनसंस्था सुरळीत करण्यासाठी व सुदृढ आरोग्यासाठी शेळ्यांचे जंत निर्मूलन करणे आवश्यक आहे. करडांच्या वयाच्या २० ते ३० दिवसांपासून जंतनाशकांची मात्रा देता येते.
शेळ्यांचे अाजार:
१)लाळ्या खुरकूत –
– शेळ्यांमध्ये मुख्यत्वे करून लाळ्या खुरकूत हा विषाणूजन्य आजार दिसून येतो. शेळ्यांच्या जिभेवर, तोंडात, पायावर व कासेवर फोड येणे ही या अाजाराची लक्षणे अाहेत.
– प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वर्षातून एकदा एफएमडी लस टोचून घ्यावी.
२. घटसर्प –
– हा जीवाणूजन्य अाजार ताण व हवामानातील बदलामुळे होतो. यामध्ये शेळीला श्वास घेण्यास त्रास होतो. गळ्याखाली सूज येणे, नाकातून स्राव येणे, भरपूर ताप येणे अशी लक्षणे दिसून येतात.
– करडांना ६ महिन्यानंतर व प्रौढ शेळ्यांना दर वर्षी पावसाळ्यापूर्वी एकदा प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.


 by Krushi Rahashya
  डॉ. नरेंद्र देशमुख, ७५८८५०१४८९
(कृषी विज्ञान केंद्र, मुमराबाद फार्म जि. जळगाव)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल