शेतकरी राबवणार वनौषधी संवर्धन प्रकल्प
मालवण तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून वनौषधींचे जतन व्हावे तसेच दुर्मीळ होणा-या वनौषधींची लागवड होऊन संवर्धन करता यावे, यासाठी वनौषधी प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
मालवण- मालवण तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून वनौषधींचे जतन व्हावे तसेच दुर्मीळ होणा-या वनौषधींची लागवड होऊन संवर्धन करता यावे, यासाठी वनौषधी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. तालुक्यातील सात गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार असून सुमारे १०० शेतक-यांना याचा फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
मालवणमध्ये मोठय़ा प्रमाणात वनौषधी उपलब्ध आहे. तसेच वनौषधी उपचार करून घेणा-या रुग्णांचीही संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. तालुका कृषी विभागाने ‘आत्मा’अंतर्गत २०१०-११मध्ये तालुक्यातील वैदूंची कार्यशाळा सुरू केली होती. या कार्यशाळेला मोठय़ा संख्येने स्त्री-पुरुष वैदूंनी हजेरी लावली होती. यानंतर या वैदूंना प्रमाणपत्र देण्यात आले. तालुक्याचे हवामान वनौषधी लागवडीला पोषक आहे. तसेच येथील वैदूंना औषधी वनस्पतींबाबत पारंपरिक चांगले ज्ञान आहे. आयुर्वेदाकडे लोकांचा कल वाढत आहे. स्थानिकरीत्या वनौषधीही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे मालवण तालुक्यात औषधी वनस्पती लागवड प्रकल्प राबवण्यात यावा, असा अधिका-यांचा मानस आहे. त्याप्रमाणे प्रस्ताव तयार करत राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे पाठवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या प्रधान सचिवांसमोर हा प्रकल्प सादर करण्यात आला असून त्याला सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
१० हेक्टर क्षेत्रफळात हा प्रकल्प करण्यात येणार असून आंबडोस, साळेल, आंबेरी, वडाचापाट, हिवाळे, तळगांव, सुकळवाड या गावांत प्रकल्पाला प्रस्थापित करण्यात आले आहे. या माध्यमातून सुमारे १०० शेतकरी वनौषधी शेती करणार आहेत. नामशेष होणारी वनौषधी लागवड केली जाणार असून जास्तीत जास्त पडीक जमीन या शेतीच्या लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योगासाठीही मोठा वाव असून प्रकल्प यशस्वी झाल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
प्रकल्प अंमलबजावणीनंतर वैद्यांना नवीन तंत्रज्ञान मार्गदर्शन, गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पतीची ओळख, काढणीपश्चात तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने वनौषधी विक्रीला मोठा वाव आहे. त्यामुळे वनौषधी आधारित छोटे उद्योग उभे करण्यास संधी राहणार आहे. वनस्पतींचे संवर्धन करून अर्क व आयुर्वेदिक गोळय़ांच्या विक्रीसही चालणार मिळणार आहे. शेती शाळा, शेतकरी सहल, प्रात्यक्षिके, पल्पराइझर असे उपक्रम सरकार राबवणार आहे. पॅकिंग युनिट, साठवणी व वळवणी केंद्र उभारला जाणार आहेत.
या वनौषधींची होणार लागवड
प्रस्तावित औषधी लागवड प्रकल्पांतर्गत शतावरी, अश्वगंधा, सर्पगंधा, अडुळसा, कळलावी, सफेद मुसळी, वेखंड, ब्राह्मी, गुळवेल, गुंज, वावाडिंग, रक्तचंदन, बिवळा, बिबा, हिरडा, बेहडा, आवळा, बेल, ऐन, सीताअशोक, अर्जुन, केवडा या वनौषधी लागवडींवर भर राहणार आहे.
केंद्राकडून राज्यासाठी ९ कोटींचा निधी प्राप्त
औषधी वनस्पती लागवड सहकारी तत्त्वावर अधिक फायदेशीर ठरते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियानांतर्गत औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन कार्यक्रमासाठी ९ कोटी १३ लाख २१ हजार रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. मंजूर आराखडय़ानुसार ८० प्रकारच्या वनौषधी वनस्पतींची राज्यात लागवड केली जाणार असून यासाठी ६५ लाख ७६ हजार रुपये उपलब्ध निधीत तरतूद करण्यात आलेली आहे. ६९५ हेक्टरवर वनौषधी लागवड केली जाणार आहे.
केंद्राकडून राज्यासाठी ९ कोटींचा निधी प्राप्त
औषधी वनस्पती लागवड सहकारी तत्त्वावर अधिक फायदेशीर ठरते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियानांतर्गत औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन कार्यक्रमासाठी ९ कोटी १३ लाख २१ हजार रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. मंजूर आराखडय़ानुसार ८० प्रकारच्या वनौषधी वनस्पतींची राज्यात लागवड केली जाणार असून यासाठी ६५ लाख ७६ हजार रुपये उपलब्ध निधीत तरतूद करण्यात आलेली आहे. ६९५ हेक्टरवर वनौषधी लागवड केली जाणार आहे.
सौजन्य - दै. प्रहार ६.१.१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा