गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

साठवण माहितीची...

आत्ताच्या काळात हवेनंतर जगभर सर्व जागा व्यापून राहिलेली एखादी गोष्ट कोणती असेल तर ती आहे माहिती. माहितीचा विस्फोट तर सर्वानाच आता अंगवळणी पडलाय. कारण ही अशी गोष्ट आहे की जिच्यावाचून आपल्याला गत्यंतर नसतं आणि ती जवळ ठेवणं आवश्यकही असतं. त्यामुळे आपल्याला हवी असणारी माहिती विविध स्वरूपात साठवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाने कितीतरी पर्याय दिले आहेत.
USBआधुनिक तंत्रविज्ञानाने आपलं जगणं, दैनंदिन नित्यनियमाच्या गोष्टी खूपच सुकर करून टाकल्या आहेत. आज परदेशात असलेल्या तरुणाला आपल्या आई-वडिलांना भारतात निमिषार्धात पैसे पाठवता येतात तर उच्च तंत्रज्ञान वापरून एखाद्या घरातली गृहिणी ढिगभर कपडे फार कष्ट न घेता धुऊ शकते. अशा प्रकारे गोष्टी सोप्या तर झाल्याच आहेत शिवाय आपल्यावरली जबाबदारीही तेवढीच वाढली आहे. जेवढं कौशल्याने आपण एखादं तंत्रज्ञान आत्मसात करतो आहोत, त्याचा वापर करतो आहोत तेवढाच त्याचा सांभाळ करण्याचीही जबाबदारीही आपली वाढते आहे.
यामुळे कित्येक समस्याही निर्माण होत आहेत. संगणकाच्या वापराला काही दशकांपूर्वी सुरुवात झाली पण बिघडलेल्या संगणकांपासून इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे ई-कचरा निर्माण झाला. हा ई-कचरा वाढवण्याचं तसंच कमी करण्याचं काम केलं ते माहिती तंत्रज्ञानाने. माहिती तंत्रज्ञानामुळे अफाट शोध लागले आणि त्याचबरोबर माहितीचा साठाही वाढत गेला. अक्षरश: चुटकीसरशी लोकांना हवी ती माहिती बसल्या जागी उपलब्ध होऊ लागली.
संगणक व इंटरनेटच्या वापरामुळे माहितीचा ओघ दिवसेंदिवस वाढत गेला. त्यात मोबाईल, टॅब्लेट अशा काही उपकरणांनी भर टाकली. तंत्रज्ञानाचा परिस स्पर्श लाभलेल्या आपल्या जगण्यात एक शाप निर्माण झाला तो म्हणजे ही दिवसरात्र मिळणाऱ्या माहितीची साठवणूक कशी करायची हा प्रश्न समोर उभा राहिला. कारण संगणक किंवा मोबाईल अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये माहिती साठवण्याची एक सीमित क्षमता असते.
ती खूप जास्त वाढवली जाऊ शकत नाही. परंतु माहितीची गरज आणि तिचा वापर, तिचा ओघ हा काही थांबण्यातला नाही. कारण आपणच कित्येकदा अनेक स्वरूपात माहिती निर्माण करत असतो. बाहेरच्या जगात माहिती म्हणजे इन्फम्रेशन तशीच आपल्या वैयक्तिक जगातली माहिती म्हणजे डेटाबेस.
इंटरनेटवरून मिळणा-या माहितीसोबतच आपण स्वत: खूप सारी माहिती, डेटाबेस रोजच्या रोज निर्माण करत असतो. वैयक्तिक स्तरावर याचं प्रमाण तुलनेनं कमी असलं तरी व्यावसायिक स्तरावर कोटय़वधी बाईट्स जागा व्यापणारी माहिती दर दिवशी निर्माण होत असते. एखादी विमान कंपनी व विमानतळाचं उदाहरण घेतलं तरी हे आपण समजू शकतो, रोज हजारो प्रवासी एखाद्या मोठय़ा शहरातील प्रमुख विमानतळावरून प्रवास करत असतात. तेव्हा या सर्व प्रवाशांची व विमानसेवेशी निगडित अशी कितीतरी माहिती निर्माण होत असते.
वैयक्तिक स्तरावर विचार केला तर आपले फोटोज, ईमेल्स, आरेखनं, संगीत, लिखाण, ध्वनिमुद्रण अशा असंख्य प्रकारचा डेटाबेस आपल्या गरजेचा असतो. तसाच तो व्यावसायिक स्तरावरही खूप असतो व महत्त्वाचाही असतो. ही सर्व माहिती साठवणं अत्यंत आवश्यक असतं. पण उपकरणांच्या मर्यादित क्षमतेमुळे ही सर्व माहिती कुठे साठवायची हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा वर म्हटल्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केलेला प्रश्न याच तंत्रज्ञानाने सोपाही केला.
अनेक उपकरणांच्या माध्यमातून आपल्यासमोर माहिती साठवण्याचे विविध पर्याय आपल्याला मिळाले. मात्र त्यातही आपल्याला सुरक्षित अशा पर्यायांचा शोध नेहमीच असतो, ज्यातून माहिती चोरीला जाऊ शकणार नाही, वापरली जाऊ शकणार नाही, पुसली जाऊ शकणार नाही अशा विविध प्रकारे सुरक्षित असलेलं माहिती साठवणारं उपकरणं आपल्याला हवं असतं. शिवाय अनेकदा आपल्याला मूळ स्थानी माहिती साठवून तिचा बॅकअप घेण्याची देखील गरज भासते. अशा वेळी अत्यंत सुरक्षित तसंच वापरण्यासाठी सोप्या असणा-या उपकरणांचा विचार केला जातो. यात गेल्या काही वर्षापासून अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध झाले आहेत.
फ्लॅश मेमरी थंब ड्राईव्ह-
सतत फिरत्या व्यवसायात असणाऱ्यांसाठी हे ड्राईव्हज् म्हणजे माहिती साठय़ाचं उपकरण खूप उपयोगी असते. यालाच यूएसबी किंवा पेन ड्राईव्ह असंही म्हणतात. तोशिबा कंपनीने १९८४ साली इलेक्ट्रॉनिकली इरेजेबल प्रोग्रॅमेबल रिड ओन्ली मेमरी प्रकारातला ड्राईव्ह प्रथम बाजारात आणला. त्यानंतर आजतागायत यूएसबी ड्राईव्हची असंख्य रूपं आपल्याला दिसत आहेत. ज्यात एचडी व्हर्जनही मिळतं. एसएसडी कार्ड, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, मेमरी स्टिक, एमपीथ्री असे विविध प्रकारचे स्टोअरेज यात मिळतात. माहिती साठवणं हेच याचं काम असतं. या सर्व प्रकारांमध्ये दोन ते दहा र्वष माहिती व्यवस्थित राहू शकते.
सीडी व डीव्हीडी
पूर्वीच्या काळात सीडीचं काम फ्लॉपी करत असे, आता सीडीच्या जोडीला डीव्हीडी देखील आली आहे. यात देखील तुमची माहिती साठवता येते, विशेषत: चित्रपट, गाणी, ग्राफिक्ससाठी हे फायदेशीर असतात. मात्र याच्या मर्यादित क्षमतेमुळे याच्यावर बंधन येतं. सीडीआरमध्ये ७०० एमबी डेटा राहू शकतो तर डीव्हीडीमध्ये ४.७ जीबीपर्यंत डेटा साठवता येतो. त्यामुळे तुमची माहिती याहून कमी असेल तर तुम्ही सीडी व डीव्हीडीचा वापर करू शकता. यातही रिड ओन्ली, राईट ओन्ली, रिड अँड राईट, ऑप्टिकल, ब्ल्यू रे असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.
एक्स्टर्नल हार्ड ड्राईव्ह-
हा संगणकाला बाहेरून जोडता येणारा ड्राईव्ह असतो. ज्यात पेन ड्राईव्हपेक्षा जास्त प्रमाणात माहिती साठवता येणं शक्य असतं. शिवाय यूएसबीप्रमाणेच हा ड्राईव्ह देखील पोर्टेबल असतो, जो कुठेही घेऊन जाता येतो. मात्र यूएसबीपेक्षा याची किंमत जास्त असते. तेवढीच माहिती सुरक्षित राहण्याची खात्रीही जास्त असते. हे ड्राईव्ह दोन ते आठ र्वष टिकतात.
एनएएस -
नेटवर्क अटॅच्ड स्टोअरेज ड्राईव्ह म्हणजे नॅस, हे ईएचडीचं अत्याधुनिक स्वरूप आहे. तीन-चार ईएचडी घेण्यापेक्षा एक एनएएस घेणं किफायतशीर पडतं. हे वायफायवर देखील चालतं. याला स्वत:ची ओएस, प्रोसेसर, मेमरी असते, जे आपण आपल्या संगणकाला जोडू शकतो. ज्यांना एक्स्टर्नल हार्ड ड्राईव्हपेक्षा जास्त जागा साठवण्यासाठी हवी असेल, त्यांनी एनएएसचा वापर करावा. व्यावसायिक स्तरावर याचा वापर अधिक योग्य ठरतो.
ऑनलाईन अर्काईव्ह -
याचा बॅकअप स्पीड कधीकधी मंद असू शकतो, मात्र ऑनलाईन स्टोअरेज हा देखील एक उत्तम पर्याय आहे. आज गुगल, याहू व अनेक कंपन्यांनी ऑनलाईन स्टोअरेजचे कितीतरी मार्ग ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. यात तुम्हाला कोणतंही उपकरण खरेदी करावं लागत नाही. फक्त इंटरनेटची सुविधा असली की तुमच्या संगणक, टॅब्लेट किंवा मोबाईलवर ही माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी साठवणुकीच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर ग्राहकांकडून शुल्क आकारले जाते. तुमचा इंटरनेट स्पीड जेवढा जलद असेल तेवढय़ा अधिक जलद ही माहिती तुम्हाला उपलब्ध होते.
क्लाऊड :
हा देखील माहिती साठवण्यासाठी निर्माण झालेला एक नवा आभासी साठय़ाचा पर्याय आहे. पाश्चात्य जगात याचा वापर अधिक होतो आहे. ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राईव्ह, मायक्रोसॉफ्ट, आयक्लाऊड, अशा अनेक कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना क्लाऊड म्हणजे सोप्या भाषेत माहितीचे ढगच निर्माण करण्याची सुविधा दिलेली आहे. ज्यात तुमची माहिती सुरक्षित राहते. यासाठी देखील शुल्क आकारणी असते. शिवाय इंटरनेट जिथे उपलब्ध असेल तिथेच याचा वापर होऊ शकतो.
आपण वरील माहितीच्या साठवणुकीशी संबंधित जे पर्याय पाहिले ते सर्व तांत्रिक पर्याय होते. मोठय़ा कंपन्यांचे क्लाऊड सोडल्यास इतर कोणत्याही पर्यायाची कार्यक्षमता व सुरक्षितता याची जोखीम आपली आपल्यालाच उचलावी लागते.
शिवाय त्याचं व्यवस्थापनही आपल्यालाच पाहावं लागतं. शिवाय व्हायरस शिरून माहिती नष्ट होणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार आज माहितीचा साठा करण्यासाठी विविध मार्ग बाजारात उपलब्ध आहेत. यात नवनवीन भर पडते आहे. साठवणूक करण्याच्या क्षमता देखील वाढत आहेत. ज्यामुळे माहितीची साठवणूक अधिकाधिक सोपी होत आहे.



दै. प्रहार -  September 15, 2015 01:40:32 AM | Author विशाखा शिर्के

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल