शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

फॅशन पॅशन- परफ्यूम कुठला वापरू?...

मला नुकताच एका कॉपरेरेट कंपनीमध्ये जॉब लागला आहे. आमच्याकडे परफ्यूम्स वापरणे हा ऑफिस कल्चरचा एक भाग आहे; पण मला परफ्यूम्सबद्दल फारसे कळत नाही. अशा वेळी ऑफिसला जाताना, पार्टीसाठी कोणता परफ्यूम वापरावा? आणि त्याची निवड कशी करावी याबद्दल सांगू शकाल का? – विशाल, वय २५, मुंबई 4

उत्तर : विशाल, प्रत्येक ओकेजनसाठी योग्य परफ्यूमची निवड करणे हे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे तुझी काळजी स्वाभाविक आहे, कारण कित्येकदा तुमच्या ‘बॉडी स्मेल’वरून तुमचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व याबद्दल अंदाज बांधले जातात. आपल्याकडे कित्येकदा परफ्यूम लगेच हवेत विरतो, त्यामुळे भरपूर फवारावा असा एक समज आहे. तो खरे तर साफ चुकीचा आहे. खरे तर परफ्यूमचा मंद सुगंध फवारल्यानंतर खूप वेळ कायम राहतो आणि तुमच्याही नकळत तो समोरच्याला जाणवत राहतो. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी पर्फ्यूम लावणे गरजेचे असते. पुरुषांसाठी परफ्यूमपेक्षा ‘कोलॉन’ (cologne)चा पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहे. जर्मन पद्धतीच्या या पर्फ्यूम्समध्ये ‘मस्क्युलिन फ्रेग्रन्स’ असतो. आपल्या नेहमीच्या परफ्यूम्समध्ये कित्येकदा ‘फेमिनीन फ्रेग्रन्स’ मिळतात. परफ्यूम्स किंवा कोलॉन्समध्ये कोणत्या सुगंधी तेलाचा वापर केलाय, यावरून त्याचे फुलांचे फ्लोरल सेंट्स, फ्रेश फ्रेग्रन्स असलेले फ्रेश सेंट्स, लाकूड आणि फुलांचा मेळ असलेले वूडी सेंट्स आणि स्पाइसेसच्या सुगंधाचे ओरिएन्टल सेंट्स असे प्रकार आहेत. सकाळी ऑफिसला जाताना किंवा मीटिंगसाठी मंद सुवासाच्या कोलॉनची निवड करावी. या वेळी ‘फ्रेश, स्रिटस किंवा प्लांट’ फ्रेग्रन्सची निवड तुम्ही करू शकता. तर संध्याकाळी पार्टीसाठी स्ट्राँग कोलॉन वापरावीत. वूडी, ओरिएन्टल, मोसी प्रकारातील कोलॉन्स वापरायला हरकत नाही. अर्थात परफ्यूमची निवड तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. त्यामुळे त्यानुसार योग्य परफ्यूमची निवड करावी. माझ्या मैत्रिणीचा तिसावा वाढदिवस आहे. नेहमीच्या पुस्तके, चॉकलेट्स, शो पिसेस यापलीकडे जाऊन मला तिला असे काही द्यायचे आहे, ज्याचा तिला वापरही करता येईल आणि माझ्या खिशालाही जास्त फटका बसणार नाही. – निशा उत्तर : कोणाच्याही बर्थडेला काय गिफ्ट द्यायचे हा युनिव्हर्सल प्रश्न आहे. कित्येकदा आपल्याकडे याच गोंधळातून आलेली शो पिसेस, चॉकलेट्स अशा कित्येक गोष्टींचा खच पडलेला असतो. मग त्यातल्याच काही गोष्टी परत पॅक करून इतरांच्या माथी मारायचा प्रयत्नसुद्धा आपण करतो, त्यामुळे निशा, तू जर तुझ्या मैत्रिणीला तिच्या उपयोगात येणारी गोष्ट देणार असशील तर ही खरेच उत्तम कल्पना आहे. मुलींच्या बाबतीत मेकअप किट ही नेहमीच हवीहवीशी गोष्ट असते. त्यामुळे वाढदिवसाला मेकअप किट गिफ्ट करणे हा उत्तम पर्याय असतो. अर्थात प्रत्येकीकडे तिच्या गरजेची मेकअप किट असतेच, त्यामुळे अजून एका मेकअप किटची भर करण्याऐवजी तिच्या आवडत्या किंवा तिच्या ‘विश लिस्ट’मध्ये असलेल्या एखाद्या ब्रॅन्डची लिपस्टिक, कॉम्पॅक्ट, ग्लॉस, आय मेकअप किट तू तिला गिफ्ट करू शकतेस. याशिवाय बाथ प्रॉडक्ट्ससुद्धा तू तिला गिफ्ट करू शकतेस. सध्या हर्बल किंवा नॅचरल बाथ प्रॉडक्ट्सची मोठी व्हरायटी बाजारात पाहायला दिसते. यामध्ये बॉडी वॉश, बॉडी ऑइल, स्क्रब, बॉडी बाम, बॉडी पॉलिश असे विविध प्रॉडक्ट्स पाहायला मिळतात. यांचे एखादे किट गिफ्ट करायला काहीच हरकत नाही. पर्फ्यूम्ससुद्धा गिफ्ट म्हणून उत्तम पर्याय आहेत; परंतु पर्फ्यूमऐवजी डिओडरंट किंवा बॉडी स्प्लॅश गिफ्ट केल्यास ते आगाऊपणाचे लक्षण वाटू शकते. त्यामुळे ही काळजी नक्की घे.


३. मी नुकतेच माझे शिक्षण पूर्ण केले असून आता जॉब शोधत आहे. इंटरव्हय़ूला जाताना फॉर्मल कपडे घालायचे असतात, इतकेच मला ठाऊक आहे; पण त्याशिवाय आपल्या पेहरावातील इतर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? – सिद्धार्थ, वय २२, पुणे उत्तर : पहिला इंटरव्हय़ूू आणि पहिला जॉब हा प्रत्येकासाठी फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्या दिवसासाठी आपण जय्यत तयारी करत असतो. पहिल्या इंटरव्हय़ूला जाताना आपण आपल्या दृष्टीने सगळे परफेक्ट असण्याकडे भर देण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. इंटरव्हय़ूला जाताना फॉर्मल कपडे घालणे जितके आवश्यक असते, तितकेच गरजेचे असते इतरही छोटय़ाछोटय़ा, पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे शूज पॉलिश असणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे घरातून निघतानाच तुमचे शूज साफ आहेत की नाही याची खात्री नक्की करा. हेअरस्टाइल नीटनेटकी असणेसुद्धा गरजेचे असते. यशिवाय नीट कापलेली नखे, योग्य बॅगेची निवडसुद्धा महत्त्वाची असते. सध्या आपल्या सर्वाकडे स्मार्टफोन्स असतात आणि कॉलेजमध्ये असताना त्यांना फॅन्सी कव्हर्स लावायला सर्वानाच आवडते; पण इंटरव्हय़ूला जाताना हे फॅन्सी कव्हर्स काढून त्याऐवजी सिंपल कव्हर लावायला विसरू नका किंवा कव्हर नाही लावले तरी चालू शकते. इंटरव्हय़ूला जाताना या छोटय़ाछोटय़ा गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. त्यावरून तुमच्या स्वभावातील व्यवस्थितपणा लक्षात येतो. त्यामुळे या गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका.



४. कित्येकदा पार्टीमध्ये जाताना सिलेटोज किंवा हाय हिल्सचे शूज घालणे गरजेचे ठरते; पण माझ्या पायांचे तळवे मोठे असल्याने मला फार वेळ हाय हिल्स घालता येत नाही आणि कित्येकदा तर ते मला घालायला आवडतही नाहीत. मग अशा वेळी काय करावे? नेहमीच्या हिल्सना इतर कोणते पर्याय आहेत का? – अपूर्वा, वय २६ उत्तर : पार्टीचे नाव काढले की हाय हिल्स घालणे बंधनकारक असते, असा काहीसा समाज आपल्या मनामध्ये करून दिलेला असतो. त्यामुळे पार्टीसाठी का होईनात, पण चांगले हिलचे शूज आपल्याकडे असलेच पाहिजेत, असा प्रत्येक मुलीचा समज असतो; पण खरे पाहिले तर अपूर्वा, असे काही नसते. पार्टी असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम, सगळीकडे तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल आहात याचा विचार प्रथम करावा. बरेचदा पार्टीला जाताना तुम्हाला घर ते व्हेन्यू असा बराच प्रवास करावा लागतो. अशा वेळी हिल्स घातलेले असतील, तर पाय दुखणे स्वाभाविक असते. त्यामुळे सध्या बाजारात ‘कन्व्हर्टेबल हिल्स’चे शूज पाहायला मिळतात. या शूजच्या हिल्सची रचना अशा प्रकारे केलेली असते, की ज्यामुळे हिल्स बाजूला काढल्यास शूजचे रूपांतर फ्लॅट्समध्ये होते. त्यामुळे प्रवासाच्या वेळेस फ्लॅट्स घालून पार्टीला पोहोचल्यावर हिल्स लावून घेऊ शकता; पण जर तुला हिल्स घालणे आवडतच नसेल तर बॅलरीनाजचा पर्याय कधीही उत्तम. सध्या क्रिस्टल किंवा ग्लिटर बॅलरीनाज बाजारामध्ये पाहायला मिळतात. ते तू नक्कीच वापरू शकतेस किंवा पार्टीसाठी अशा बॅलरीनावर स्वत: घरच्या घरी स्टड्स लावणेसुद्धा कठीण नसते. त्यामुळे प्लेन बॅलरीना आणून त्यावर तुमच्या पसंतीची नक्षी करून पर्सनल टचसुद्धा देऊ शकतेस.


५. सध्या किती तरी बॉलीवूड सेलेब्रिटीज शिअर किंवा पारदर्शक फॅब्रिकचे शर्ट्स, ड्रेसेस घालताना दिसतात. मलाही असे ड्रेस घालायची इच्छा आहे; पण ते ‘ओव्हर एक्पोझिव्ह’ दिसणार नाहीत यासाठी कोणती काळजी घेता येईल? ऑफिस ते पार्टी अशा प्रकारचे कपडे कधी आणि कसे घालावेत? – आरती, वय २४
उत्तर : आरती तुझ्या म्हणण्याप्रमाणे सध्या ‘शिअर ड्रेसिंग’ सध्या खूप लोकप्रिय आहे आणि फक्त सेलेब्रिटीजमध्ये नाही, तर तरुणींमध्येसुद्धा हा ट्रेंड बराच गाजतोय. अर्थात शिअर फॅब्रिकचे कपडे घालताना बरीच काळजी घ्यावी लागते, कारण जर तुमचे इनर योग्य नसेल, तर तो ड्रेस व्हल्गर दिसण्याच्या शक्यता अधिक असतात. त्यामुळे शिअर ड्रेस घालताना कोणते इनर घालता आहात हे पाहणे सर्वात महत्त्वाचे असते. इनरचा विषय निघताच काळा आणि सफेद असे दोन रंग डोळ्यांसमोर येतात. आपल्यातील कित्येक जण अजूनही या दोन रंगांवरच अवलंबून असतात; पण पेस्टल शेडच्या शिअर ड्रेसच्या आत सफेद इनर घातल्यास किंवा डार्क शेडसाठी काळा इनर वापरल्यास ड्रेसमधून तो स्पष्ट दिसून येतो आणि दिसायलाही चांगला दिसत नाही. त्यामुळे शक्यतो ज्या रंगाचा ड्रेस आहे, त्याच रंगाचे किंवा स्किन कलरचे इनर वापरावे. इनर बॉडी फिटेड असणे उत्तम, नाही तर त्याला पडलेल्या सुरकुत्या ड्रेसमधून स्पष्ट दिसतात. अर्थात शिअर ड्रेसमधून इनर दिसणार हे स्वाभाविकच असल्याने इनरमध्ये विविध पर्याय वापरून पाहायला हरकत नाही. पेस्टल शेडच्या ड्रेससोबत डार्क किंवा कॉन्ट्रास शेडचे इनर घालू शकता. नेहमीचे इनर घालण्याऐवजी सिक्वेन्स टय़ूब टॉपसुद्धा घालू शकता. पांढऱ्या ड्रेसवर वेगवेगळ्या रंगांचे इनर्स किंवा बेज शेडसोबत ब्राऊन इनर छान दिसते. मल्टिकलर इनरसुद्धा वापरून बघ. थोडक्यात सांगायचे झाल्यास शिअर ड्रेस तुम्हाला तुमचा सेन्स ऑफ स्टाइल आणि ड्रेसिंग दाखवायची संधी देतात, ती कधीच गमावू नकोस.


६. मी नुकताच माझा व्यवसाय सुरू केलाय आणि माझ्या क्लायंट्सना कित्येकदा कॉन्फरन्सेस, मीटिंग्जसाठी हॉटेल्समध्ये जावे लागते; पण अशा मीटिंग्जसाठी नक्की कोणत्या प्रकारच्या हॉटेल्सची निवड करावी हे मला ठाऊक नाही. त्याबद्दल मार्गदर्शन करू शकता का? – निखिल, वय ३०
 उत्तर : हाय निखिल, कित्येक कॉपरेरेट ऑफिसेसनी सध्या मीटिंग्ज किंवा कॉन्फरन्सेस एखाद्या छानशा हॉटेल किंवा लाऊंजमध्ये घेणे सुरू केले आहे. त्यामुळे ऑफिसमधल्या इतर कर्मचाऱ्यांचा वेळ जात नाही आणि इतर कामे विस्कळीत होत नाहीत. त्याचबरोबर मीटिंग्जसाठी आवश्यक एकांतसुद्धा मिळतो. तसेच क्लायंट आणि तुमच्यात कामाव्यतिरिक्त एक हेल्दी वातावरण कायम राहण्यासाठीही हे अशा मीटिंग्ज मदत करतात; पण अर्थात जसं तू सांगतोस, योग्य हॉटेलची निवड करणे महत्त्वाचे असते. सुरुवातीला तुझी मीटिंग कोणासोबत आहे, किती माणसे येणार आहेत याचा अंदाज असणे उत्तम. त्यानुसार तुला एखाद्या हॉटेलचा कॉन्फरन्स हॉल बुक करायचा आहे की लाऊंज हे ठरते. ५-१० लोकांची छोटी मीटिंग असेल, तर लाऊंजमधील छोटीशी जागा पुरेशी असते; पण लोकांची संख्या जास्त असेल, तर मात्र एखादा कॉन्फरन्स हॉल बुक करणे उत्तम. लाऊंज निवडताना तिथली बसण्याची व्यवस्था, टेबल जोडून घेण्याची गरज असल्यास त्याची व्यवस्था, मीटिंगसाठी योग्य कोपरा, तिथे वाजवले जाणारे संगीत याबद्दल आधीच माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे मीटिंगच्या आधी लाऊंजला एक भेट नक्कीच द्यावी. तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याशी बोलून तुमच्या मीटिंगचा गंभीरपणा, तुम्हाला गरजेच्या गोष्टी याबद्दल कल्पना देऊन ठेवा. आगाऊ सीट बुक करून ठेवा, नाही तर ऐन वेळी जागा नाही मिळाली तर पंचाईत होऊ शकते. तसेच लाऊंज किंवा कॉन्फरन्स हॉल तुमच्या आणि त्यांच्या ऑफिसपासून सोयीच्या अंतरावर असेल याची काळजी घ्या. त्याचा पत्ताही आटोपशीर हवा, जेणेकरून त्यांना शोधायला त्रास होणार नाही. जेवणाची चव ठाऊक असली पाहिजे आणि जेवण आगाऊ बुक करणार असाल, तर मेनू नीटनेटका असावा. हॉटेल निवडताना तुमच्या क्लायंटच्या कल्चरची माहिती असणे गरजेचे आहे. खास करून परदेशी क्लायंट असतील तर त्यांच्या संस्कृतीशी मिळतेजुळते हॉटेल निवडण्याची दक्षता घ्या.



 ७. आम्ही गोवा ट्रिपला जाणार आहोत. बीच ट्रिप लक्षात घेता बॅग भरताना कोणत्या प्रकारचे कपडे, अॅक्सेसरीज घेणे आवश्यक आहे? – रिया, वय २०
 उत्तर : ट्रिपसाठी गोवा हे अल्टिमेट डेस्टिनेशन आहे. मस्ती, खाबुगिरी आणि बीचेस यांचा संगम म्हणजे गोवा. त्यामुळे तिथे जाताना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य अगदी तुमच्या लुकमध्येसुद्धा दिसता कामा नये. त्यामुळे नेहमीच्या रटाळ डेनिम्स, स्ट्रेट स्कर्ट्सना सुट्टी दे. छान समर ड्रेसेस तुझ्या बॅगेत असू देत. फ्लोरल, पोल्का डॉट्स, क्रेझी प्रिंट्सचे ड्रेसेस असतील तर उत्तम. अर्थात ड्रेसेसची लेन्थ किती हवी हे पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. शॉर्ट्स इज मस्ट. मस्त डेनिम शॉर्ट्स, त्यावर लूज टी-शर्ट आणि हॅट म्हणजे अस्सल गोवन मूड. तुला बिकिनीज घालायला आवडत असतील तर सर्वात आधी त्या बॅगेत टाक. नाही तर कॉटन किंवा डेनिमच्या शॉर्ट्स आणि टी-शर्ट्स तू पाण्यात जाताना वापरू शकतेस. शक्यतो ओव्हरलॅप होतील असे ड्रेसेस तुझ्या बॅगेत असू देत. म्हणजे रॅप अराऊंड स्कर्टच्या खाली शॉर्ट घातली, तर संध्याकाळी फक्त स्कर्ट काढून ठेवला, की दुसरा लुक मिळतो किंवा ओव्हर साइझ टी-शर्टसोबत गंजी असेल तरी, नंतर फक्त गंजी घालता येतो. सोबत भरपूर मॉइश्चराइझर असणे गरजेचे आहे. तसेच सनक्रीमसुद्धा, कारण बीचवर स्किन टॅन आणि ड्राय होऊ शकते. चंकी ज्वेलरीसुद्धा असू देत सोबत. चप्पल्स, बॅलरीनाज हे बीच ट्रिपसाठी बेस्ट. स्निकर्सचासुद्धा एक जोड बरोबर असू देत.





- See more at: http://www.loksatta.com/lokprabha/tips-about-perfume-1057195/#sthash.Dm7fdBhF.dpuf

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल