शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

परफ्यूम वापरा... पण जपून



केवळ ‘फस्र्ट इम्प्रेशन’ वर प्रचंड भर देणा-या नव्या पिढीला परफ्यूम्स वापरणं ही चैनीची नव्हे तर गरजेचीच वस्तू वाटते, यात शंका नाही. आपण कोणत्या ब्रँडचे कपडे, शूज, मोबाईल वापरतो, याबरोबरच आपण किती ‘भारी’ परफ्यूम्स विकत आणतो यावरही लोकांचे स्टेटस ठरत असते! समोरच्या व्यक्तीला आपण समोर येताच आपली दखल घ्यायला लावायची असेल तर परफ्यूम महत्त्वाचाच. म्हणूनच अगदी दर महिन्याला परफ्यूम्सचे ब्रँड बदलणारे महाभागही आपल्या अवतीभोवती आहेतच. अगदी रस्त्यावर, चौकाचौकांत, रेल्वे स्टेशनच्या बाहेर बाटल्यांमध्ये सुगंधी परफ्यूम्स विकणा-यांचीही आपल्याकडे अजिबात कमतरता नाही. परफ्यूम्स, डिओड्रन्टस् घेण्यासाठी आपल्याकडच्या कडक उन्हाळ्याचा, दमट हवामानाचा, कुबट, घामेजलेल्या वासांचा दाखला तर नेहमीचाच. त्यामुळे असा स्प्रे आपण वापरत नसू, तर आजच्या जमान्यात आपण ‘आऊटडेटेड’ होण्याचीच शक्यता जास्त.
परफ्यूम्स्, डिओड्रंट, अँटी परस्पिरंट रूम फ्रेशनर्स यांचा मानवी शरीरावर काय व कसा परिणाम होऊ शकतो याचेच भान आपल्याला नसेल तर या तमाम केमिकल्सचा निसर्गावर, पर्यावरणावर काय ताण पडत असेल, हा विचार तर दूरच राहिला. आपण अगदी सहजच ‘चेंज’ म्हणून विकत आणलेला शे-दीडशे रुपयांचा परफ्यूम निसर्गासाठी घातक ठरू शकतो व तुमच्यासाठीही. सर्व परफ्यूम्समधल्या ‘स्प्रे’ साठी एक विशिष्ट प्रोपेलंट वापरलेले असते. त्यामुळे परफ्यूम वापरल्यावर विशिष्ट फवा-याच्या रूपाने हा सुगंध आपण ठराविक ठिकाणी मारू शकतो. हा प्रोपेलंट म्हणजेच क्लोरोफ्लोरो-कार्बन अर्थातच सीएफसी. या सीएफसीचे आणि पृथ्वीवरील संरक्षक ओझोनच्या छत्रीचे थेट नाते आहे. पृथ्वीवर विशिष्ट उंचीवर ओझोन (०३) वायूचे संरक्षक आवरण आहे. या ओझोनच्या छत्रीतून सूर्याची अतिनील सूर्यकिरणे गाळली जातात. ही सूर्याची अतिनील किरणे जर पृथ्वीवर आली तर त्वचाविकार, त्वचेचा कॅन्सर, डोळ्यांचे विकार, पिकांची उत्पादन क्षमता कमी होणे हे व असे असंख्य दुष्परिणाम उद्भवू शकतात. म्हणूनच ही ओझोनची संरक्षक छत्री पृथ्वीसाठी वरदान आहे. या ओझोनच्या छत्रीला विरळ करत त्यात छिद्र पाडण्याचे काम परफ्यूम्स, फ्रिज, ए.सी.मधून निघणारा सी.एफ.सी. करतो.सी.एफ.सी.चा एक रेणू या ओझोनच्या छत्रीतील एक लाख रेणूंशी रासायनिक प्रक्रिया करून ते नष्ट करू शकतो आणि म्हणूनच आपण वापरत असलेला साधासा परफ्यूमही निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला कोणता परफ्यूम सूट होतो, तो ‘सी.एफ.सी. मुक्त’ आहे का, त्यामुळे अ‍ॅलर्जी-रॅश तर येणार नाही ना हे ठरवूनच परफ्यूम्स निवडावेत. परफ्यूम्सचा पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेऊन ‘सी.एफ.सी.फ्री’ किंवा ‘ओझोन फ्रेंडली’ असे लेबल असलेलेच परफ्यूम्स विकत घ्यावेत. त्याहीपेक्षा साधी अत्तराची डबी जवळ बाळगणे हे उत्तम. त्याहूनही अधिक निसर्गानेही पर्याय म्हणजे सुगंधी फुलांची चक्क झाडंच घरात ठेवणे आणि हीच फुलं जवळ बाळगणे तेच खरे नैसर्गिक रूम फ्रेशनर्स आणि परफ्यूम्ससुद्धा!चला तर मग आपण वापरत असलेल्या रूम फ्रेशनर्स, परफ्यूम्सवरील लेबलं नीट वाचूयात... ओझोन फ्रेंडली उत्पादनेच विकत घेऊयात... शक्य असेल तर ही उत्पादनं चक्क टाळूयात!
परफ्यूम्स विकत घेतानाची काळजी
१) परफ्यूम्स विकत घेताना ‘सीएफसी फ्री’ , ‘ओझोन फ्रेंडली’ चा शिक्का असलेलेच परफ्यूम्स निवडावेत.. काही परफ्यूम्सवर ’ ऊेशी पेीं लेपींरळप लहश्रेपे-षश्रेीे लरीलेप’ अशी लेबल्सही असतात. ती जरूर तपासावी.
२) परफ्यूम्स्चे घटक हे ज्वालाग्राही असतात. त्यामुळे, आगीपासून अथवा संभाव्य धोक्यापासून ते लांब ठेवावेत. ३) परफ्यूम्समधील ‘कंटेन्ट’ उच्च दाबाखाली कंटेनरमध्ये भरलेले असते. त्यामुळे ते रिफिल करण्याच्या, कंटेनर फोडण्याच्या भानगडीत पडू नये. ४) साधारण त्वचेपासून दहा ते पंधरा सें.मी. अंतरावरून स्प्रे करावा. त्वचेच्या, जखमा, इन्फेक्शन्स आणि डोळ्यांवर हा स्प्रे उडू देऊ नये. ५) हेही सर्व टाळून परफ्यूमऐवजी लहानशी, आपल्याला सूट होणारी अत्तराची बाटलीच जवळ बाळगणे जास्त श्रेयस्कर. ६) विशेष म्हणजे आपण जो परफ्यूम वापरणार आहोत, तो केवळ आपल्या स्वत:च्या आनंदासाठीच असतो असे नाही. कदाचित आपल्या भोवताली वावरणा-या इतर मंडळींना त्याच्या वासाची अ‍ॅलर्जी असू शकते. याचेही भान ठेवण्याची गरज आहे. ७) इतरांना त्रास होईल अशाच हळुवार वासाचा परफ्यूम निवडणे कधीही चांगले. ८) अनेकांचा समज असा असतो की परफ्यूम लावल्यावर त्याचा वास सर्वांना यायला पाहिजे, म्हणून अनेक वेळा जास्त प्रमाणावर स्प्रे मारला जातो. हेही चुकीचे आहे. आवश्यक तेवढाच तो वापरावा.








- सूर्यकांत पाठक
कार्याध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल