गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

विज्ञानवार्ता - "माहितीचा विस्फोट' हे नेहमी ऐकू येणारे शब्द

"माहितीचा विस्फोट' हे नेहमी ऐकू येणारे शब्द; पण ही माहिती साठवायची ठरविली, तर किती "स्पेस' लागेल? या प्रश्‍नावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे आणि त्याला प्रथमच मान्यता मिळाली आहे. सध्या उपलब्ध असलेली सर्व माहिती सर्वसाधारण अंदाजानुसार 1.2 अब्ज हार्डडिस्कमध्ये साठवता येऊ शकेल.
किती माहिती साठवलीय जगभरात?

सध्याचे युग हे माहितीच्या विस्फोटाचे युग आहे, असे म्हटले जाते. इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील घडामोड आपल्याला क्षणार्धात कळू शकते; परंतु, या माहितीच्या युगात आपण किती माहिती साठवून ठेवू शकतो? काही अंदाज बांधता येईल? अवघड गोष्ट आहे. अर्थात "डिजिटल' साठवून ठेवता येऊ शकेल अशा माहितीची मोजणी करण्याचे काम संशोधकांनी केले आहे.

"सायन्स एक्‍सप्रेस' आणि "सायन्स' या विज्ञानविषयक नियतकालिकांत या बाबतची माहिती देण्यात आली आहे. सध्या उपलब्ध असलेली सर्व माहिती सर्वसाधारण अंदाजानुसार 1.2 अब्ज हार्डडिस्कमध्ये साठवता येऊ शकेल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपल्याकडे असलेली माहिती पुस्तकात साठवायची म्हटल्यास अमेरिका किंवा चीनच्या पृष्ठभागावर पुस्तकांचे तीन थर करावे लागतील. हीच माहिती सीडींमध्ये साठवायची झाली तर त्याचा थर चंद्राच्याही पुढे जाईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. याआधीही अशा प्रकारे माहिती गोळा करण्याचे प्रयत्न झाले आहेत; मात्र, अशा प्रकारच्या संशोधनाला प्रथमच मान्यता मिळाली आहे.

दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. मार्टिन बिलबर्ट या प्रकल्पात कार्यरत आहेत. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहितीचे युग सुरू झाल्यापासून म्हणजे 1986 ते 2007 या कालावधीतील माहितीची मोजणी केली. ऍनालॉग आणि डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सर्व यंत्रणांत समाविष्ट करण्यात आलेल्या माहितीचा आढावा घेण्यात आला. फ्लॉपी ड्राईव्ह पासून मायक्रोचिपपर्यंत सर्व उपलब्ध साधनांचा यासाठी विचार केला गेला. 2000 वर्षापर्यंत 75 टक्के माहिती ही "ऍनालॉग' फॉरमॅटमध्ये (उदा. व्हिडिओ कॅसेट) साठविली गेली होती. तर 2007मध्ये 94 टक्के माहिती डिजिटल स्वरूपात साठविली गेली.

संगणकात साठवलेली माहिती सुरवातीला किलोबाईटमध्ये, नंतर मेगाबाईटमध्ये मोजली जाऊ लागली. माहिती वाढली, तशी ती गिगाबाईटमध्ये मोजण्यास सुरवात झाली. त्यानंतर टेराबाईट, पेटाबाईट आणि आता एक्‍झाबाईट ही परिमाणे आली. एक एक्‍झाबाईट म्हणजे एक अब्ज गिगाबाईट. सध्या आपण साठवून ठेवू शकतो, अशी माहिती 295 एक्‍झाबाईट (म्हणजेच 295 वर वीस शून्य) एवढी आहे. विविध माध्यमांतून दररोज प्रसारित (ब्रॉडकास्ट) होणारी माहिती दोन झेटाबाईट एवढी आहे. (एक झेटाबाईट म्हणजे एक हजार एक्‍झाबाईट). म्हणजेच दररोज माणशी 175 वर्तमानपत्रे एवढी. नव्या तंत्रज्ञानाबरोबर संगणन करण्याची क्षमताही वाढत आहे. या अभ्यासानुसार दरवर्षी 58 टक्‍क्‍यांनी संगणन क्षमता वाढते आहे.

माहितीचे हे आकडे महाकाय वाटत असले, तरी निसर्गाच्या क्षमतेशी त्याची तुलना होऊ शकत नाही. उदाहरणच द्यायचे झाले, तर माणसाच्या "डीएनए'चे देता येईल. सध्या उपलब्ध असलेल्या जगभरातील सर्व साधनांत जेवढी माहिती साठविली जाते त्याच्या 300 पट अधिक माहिती एका माणसाच्या "डीएनए"मध्ये साठविली जाऊ शकते.

माहितीचा विस्फोट
- 295 एक्‍झाबाईट माहिती डिजिटल स्वरूपात
- संगणन क्षमता दरवर्षी वाढते 58 टक्‍क्‍यांनी
- आपल्याकडील माहिती पुस्तक रूपात साठविल्यास अमेरिका अथवा चीनवर त्याचे तीन थर होऊ शकतील.


मानवी जीवाश्‍म 32 लाख वर्षांपूर्वीचे
इथिओपियातील हादार येथे मानवाच्या पायाच्या हाडाचे जीवाश्‍म मिळाले आहेत. त्यावरून 32 लाख वर्षांपूर्वी मानवाचे पूर्वज दोन पायांवर चालत असल्याची माहिती पुढे आली आहे.

"ऑस्ट्रालोपिथकस अफारेन्सिस' मानव त्याकाळात अस्तित्वात होता. त्याच्या पावलाचे एक हाड सापडले आहे. त्याचा तळपाय सध्याच्या मानवाप्रमाणेच थोडा वक्राकार असलेला आहे. "ऑस्ट्रालोपिथकस अफारेन्सिस' हे सध्याच्या मानवाप्रमाणे चालू शकत होते, का नाही याबाबत गेल्या काही वर्षांपासून तज्ज्ञांत वाद आहेत; मात्र आता नव्या संशोधनामुळे या वादावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.

हादार हा भाग "फर्स्ट फॅमिली साईट" म्हणून ओळखला जातो. या भागात "ऑस्ट्रालोपिथकस अफारेन्सिस' प्रकारच्या मानवाचे आतापर्यंत 250हून अधिक नमुने मिळाले आहेत. मिसौरी विद्यापीठातील कारोल वॉर्ड आणि अरिझोना विद्यापीठातील विल्यम किंबेल आणि डोनाल्ड जॉन्सन यांनी हे संशोधन केले आहे. हादार येथे उत्खननातून मानवी शरीरातील आणखी काही हाडे मिळाली आहेत. 32 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेला हा मानव कसा उत्क्रांत झाला, याची माहिती या अवशेषांपासून मिळू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे. "सायन्स' या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मानवाच्या तळपायाला जसा वक्राकार असतो. तशा प्रकाराचा वक्राकार "एप' माकडांना नसतो. मात्र या माकडांचे पाय अधिक लवचिक असतात. झाडांवर चढण्यासाठी या लवचिक पायांचा उपयोग एप करतात. "ऑस्ट्रालोपिथकस अफारेन्सिस' मानवाचे पाय मात्र एप प्रमाणे नसल्याचे दिसून आले आहे. "लुसी' नावाने संबोधला जाणारा मानव आफ्रिकेत 30 ते 38 लाख वर्षांपूर्वी म्हणजे "ऑस्ट्रालोपिथकस अफारेन्सिस' मानवाच्या पूर्वी अस्तित्वात होता.
हादार येथे 1973पासून म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून उत्खननाचा प्रकल्प सुरू आहे.30 ते 34 लाख वर्षांपूर्वीचे 370हून अधिक जीवाश्‍मे आतापर्यंत मिळाली आहेत. मानवनिर्मित सर्वांत जुनी हत्यारेही येथे मिळाली आहेत.

"बेलो मॉंटे' प्रकल्प रुळावर
निसर्गसंपन्न अशा ब्राझीलमध्ये लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या धरणाचे काम सुरू होईल. ब्राझील सरकारने बेलो मॉंटे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर व गेल्या वर्षभराच्या स्थानिक नागरिकांच्या आंदोलनानंतरही झिंगू नदीवरील या प्रकल्पाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता 238 हेक्‍टर क्षेत्रफळावरील जंगल तोडण्याचे काम सुरू करण्यात येईल.

ब्राझीलच्या पर्यावरण मंत्रालयाने सुरवातीला या प्रकल्पाला मंजुरी दिली नव्हती. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पर्यावरण मंत्रालयाचे प्रमुख अबेलार्डो बायमा यांनी अखेर राजीनामा दिला. त्यानंतर या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. प्रकल्पाच्या मंजुरीसाठी त्यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव असल्यानेच त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. पारा या राज्यात होणाऱ्या या प्रकल्पाला आधीही विरोध झाला होता. 1990मध्ये जगभरातील विरोधामुळे प्रकल्पाचा प्रस्ताव सोडून द्यावा लागला होता.
चीनमधील थ्री जॉर्जेस आणि पॅराग्वेमधील इटैपू या धरणांनंतरचे हे सर्वांत मोठे धरण ठरेल.

धरण व आक्षेप
- धरणाची लांबी सहा किलोमीटर
- 500 चौरस किलोमीटर जमीन पाण्याखाली जाणार
- 11 हजार मेगावॉट ऊर्जानिर्मिती होणार
- प्रस्तावित खर्च 17 अब्ज अमेरिकी डॉलर
- यासाठी जंगले नष्ट झाल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचा आक्षेप
- या भागात राहणाऱ्या आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न
- किमान 50 हजार लोक उघड्यावर येणार


- साप्ताहिक सकाळ
सुरेंद्र पाटसकर
Saturday, February 19, 2011 AT 06:00 AM (IST)
Tags: विज्ञानवार्ता
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल