गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

पावसाळ्यातील रानभाज्या...

पावसाळ्यातील रानभाज्या..

मेघवृष्टयनिलैः शीतैः शान्ततापे महीतले| स्निग्धोशेहाम्ललवणमधुरा बलिनो रसः॥ सूर्याचे दक्षिणायन चालू असताना त्याची शक्ती कमी होत जाते. तर पावसाळ्यात गार वारा व पाऊस यामुळे पृथ्वीवरील उष्णता कमी होऊन आम्ल, लवण आणि मधुरस पुष्ट होतात. उन्हाळ्यात शरीरामध्ये पित्ताचा संचय झालेला असतो. पावसाळ्यातील वातावरण बदलाचा परिणाम म्हणून झालेल्या आम्लविपाकामुळे अग्निमांद्य (भूक मंदावते) आलेले असते. या सर्वांमुळे वातादि त्रिदोष वाढतात. म्हणूनच पावसाळ्यात वमनविरेचनादि पंचकर्मे करून शरीरशुद्धी करावी असे ऋतुचर्येत सांगितलेले आहे. पावसाळ्यात पचायला हलका असा आहार घ्यावा व पाणीही उकळून प्यावे, असा सल्ला दिलेला आहे. पाणी उकळल्याने पचायला लघू होते आणि त्यातील जंतूही मरतात. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने या तीन-चार महिन्यात आंबट, खारट व मधूर पदार्थांचे सेवन करावे. गंमत बघा, निसर्ग नेमका या काळापुरताच अशा काही भाज्या उपलब्ध करून देतो की हे रस आपल्या पोटात सहज जाऊ शकतील. अशी निसर्गाची व्यवस्था अर्थात प्रत्येक ऋतुसाठी असते. त्या त्या ऋतुत ज्या नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात, त्या भाज्या व फळे जरूर सेवन करावीत. त्यासाठीच निसर्गराजा आपली सेवा करत असतो. आपणही आपला आहार निसर्गानुसार ठेवला तर आपल्याला आरोग्याची वेगळी काळजी घ्यायला नको. दुधी भोपळा, गाजर, कारले, चुका यासारख्या भाज्या पावसाळ्यात जास्त प्रमाणात मिळतात. श्रावणात आपण बाजारात फेरफटका मारला तर कितीतरी नवनव्या भाज्याही बघायला मिळतात. या भाज्या एखाद्याच महिन्यात, तेवढ्याच दिवसात दिसतात व नंतर ज्या गायब होतात, त्या एकदम पुढल्या पावसाळ्यात दर्शन देण्यासाठीच! वर्षभरात कुठे शोधू म्हटले तरी त्या दिसणार नाहीत. म्हणून पावसाळ्यात त्यांची ओळख करून घ्यावी, चव चाखावी आणि त्यांचा आस्वादही जरूर घ्यावा. अळंबी – आजकाल बारा महिने मिळणारी पावसाळी भाजी म्हणजे अळंबी. पावसाळ्यात अळंबीच्या छत्र्या जागोजागी उगवलेल्या दिसतात. त्यात विषारी आणि गोड असे दोन प्रकार आहेत. अळंबी थंड व गोड आहेत. यालाच आपण मशरूम असे म्हणतो. ते शक्तीवर्धक असून पचनास थोडे जड, पौष्टिक आहेत. यात भरपूर प्रथिने असल्याने आहारात सावधगिरी बाळगणार्‍यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्यात पोटॅशियम, फॉस्फरस व सोडियमचे प्रमाणही लक्षात घेण्यासारखे आहे. यात ‘‘ब’’ जीवनसत्त्वाचे उपघटक ५ ते ३० % पर्यंत आहेत. त्यामुळे मशरूम ही भाजी आपल्या आहारात आलटून पालटून असावीच. निरनिराळ्या भाज्यांबरोबर अळंबीचा वापर केला जातो. मशरूमची भाजी करण्यासाठी त्याचे पात्तळ काप करावेत. पातेलीत तेल तापवून फोडणीला बारीक चिरलेली लसूण व कांदा घालावा. मीठ घालून परतून घ्यावे. बारीक चिरलेला टोमॅटो व लाल तिखट घालून ढवळावे. आता त्यावर अळंबीचे काप टाकून थोडे पाणी घालून भाजी शिजवावी. अधूनमधून ढवळावी. ही मूळ भाजी. आता यात ब्रोकोली, बेबीकॉर्न, फ्लॉवर, बटाटा अशा आपल्या आवडीच्या भाज्या घालून त्यात मसाल्यांचा वापर करून स्वाद बदलावा. टाकळा – तखटा वा टाकळा या नावांनी ही भाजी प्रसिद्ध आहे. या भाजीची पाने लांबट गोल असतात. भाजी पचायला हलकी, उष्ण, तिखट व तुरट असते. ती पित्तकर, मलसारक आहे. म्हणूनच जेव्हा शौचास घट्ट होते वा मलावष्टंभ होतो त्यावेळी ही भाजी जरूर खावी. याच्या कोवळ्या पानांची व शेंगांची भाजी केली जाते. टाकळ्याच्या पानांचे रायते करण्यासाठी चिंच, गूळ, मीठ, मिरची घालून मिक्सरमध्ये वा पाट्यावर पाने वाटावीत. मोहरीची डाळ फेसून त्यास लावावी. कर्टोली – या वेलीची हिरवीगार, मऊ काटेरी फळ भाजीत वापरतात. कर्टोली ही वातकफघ्न, तिखट रसाची, अग्नि प्रदिप्त करणारी अशी भाजी आहे. खोकला, दमा, कफविकार, त्वचाविकार यावर उपयुक्त. ज्यांना हृदयविकार वा मधुमेह असेल त्यांनी ही भाजी जरूर खावी. कर्टोलीची भाजी करण्यासाठी काचर्‍या चिराव्यात. त्यातील जुन बिया काढून टाकाव्यात. तेलावर कांदा परतून त्यावर या भाजीचे काप घालावेत. तिखट व ओले खोबरे घालून भाजी शिजवावी व नंतर मीठ घालून एक वाफ द्यावी. कमलकंद – ही पाण्यात उगवणारी अशी पाणभाजी आहे. हे कमळाचे देठ आहे. हे देठ लांब असून काहीसे पोकळ, स्पंजसारखे आतून छिद्र असलेले, जाळीदार असते. कमलकंद हे मधूर, तिखट, काहीसे तुरट, दाह कमी करणारे आहे. ते पौष्टिक असून उष्णता कमी करणारे असल्याने रक्तपित्त, उलटी होणे, उचकी लागणे वा रक्तस्त्राव होणे यावर वापरले जाते. कमलकंदाचे तुकडे तेलात तळून मीठ लावून खातात. कमलकंदाच्या आतील बिया-मखाणे फोडून त्यातील गर खातात. मखाण्याच्या लाह्या फोडूनही खातात. त्या पचायला हलक्या होतात आणि रूचकर लागतात. त्या शक्तीवर्धकही आहेत. कमलकंद वाळवून पीठ करतात व ते निरनिराळ्या भाज्यांना घालतात. कमलकंदाचे लोणचेही चविष्ट लागते. यासाठी कमलकंद स्वच्छ धुवून त्यांचे बारीक बारीक तुकडे करावेत. पातेलीत पाणी उकळायला ठेवावे. पाण्याला उकळी आली की त्यात हे तुकडे सुकवावेत. आता धणे, जिरे, मिरे व कढीपत्ता यांची भरड करावी व तो सर्व खडा मसाला एकत्र करावा. आता हा मसाला (खडा वा भरड) तेलात परतावा. गार झाल्यावर मीठ व हा मसाला देठांच्या तुकड्यांवर टाकून चांगल घोळावे. उरलेले तेल कडकडीत गरम करावे व गार करावे. सर्व मिश्रण चांगले गार झाले की लिंबाचा रस व गार तेल मिसळून लोणचे बंद करून ठेवावे. दुसर्‍या दिवशी खाण्यास उघडावे. कवळा – श्रावणी सोमवारी खास केलेली भाजी म्हणजे कवळ्याची! कवळ्याची पाने कडू, उष्ण, कफपित्ताचा नाश करणारी व मलावष्टंभ दूर करणारी आहेत. कवळ्याची भाजी करण्याकरिता फक्त त्याची पाने घ्यावीत. पातेलीत कांदा बारीक चिरून तो परतावा. त्यावर ओले खोबरे घालावे. त्यावर चिरलेल्या भाजीची पाने घालून ढवळावे. एक वाफ द्यावी व नंतर त्यात शिजवलेले, मोड आलेले मूग घालावेत. पाने शिजल्यावर मीठ व तिखट घालून एक वाफ द्यावी व नंतर भाजी खाली उतरवावी






सौजन्य :- नवशक्ती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल