सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

बहुपयोगी नारळ

 बहुपयोगी नारळ
 

नारळ दूध व नारळ क्रीम ः
यासाठी प्रथम नारळ सोलले जातात. सोललेले नारळ फोडून किंवा त्याचे दोन तुकडे करून, करवंटी, खोबरे व पाणी वेगळे केले जाते. खोबऱ्यावरील तपकिरी रंगाचा पापुद्रा किंवा आवरण धारदार चाकूने वेगळे केले जाते. हे खोबरे स्वच्छ पाण्याने धुऊन गरम पाण्याने निर्जंतुक केले जाते. निर्जंतुक केलेले खोबरे मिक्‍सरच्या साह्याने बारीक केले जाते. प्रेस यंत्राच्या साहाय्याने पिळून, त्यापासून दूध बाजूला केले जाते. दूध चांगले गाळून पिण्यासाठी वापरले जाते. या दुधाची टिकवणक्षमता कमी असल्याने स्प्रे ड्रायरच्या साहाय्याने त्याची पावडर बनविली जाते, त्यामुळे ते लवकर खराब होत नाही व पाहिजे त्या वेळी पाणी घालून वापरता येते. अशा प्रकराच्या दुधाचा वापर महाराष्ट्रामध्ये सोलकढी करण्यासाठी केला जातो.नारळापासून क्रीम तयार करण्यासाठी प्रथम नारळाचे दूध काढले जाते व सेन्ट्रिफ्युज तंत्रज्ञानाने नारळाच्या दुधातून क्रीम काढले जाते. हे क्रीम पाण्यात विरघळून किंवा जसेच्या तसे विविध पदार्थांत वापरतात. नारळाच्या दुधाऐवजी आयत्या वेळेला ते वापरता येते. याचा वापर सोलकढी, मिठाई किंवा बेकरी व्यवसायामध्ये करतात.

नारळाचे पाणी ः
सात ते आठ महिन्यांच्या नारळामध्ये भरपूर पाणी असते. नारळाचे पाणी पौष्टिकही असते. नारळाच्या पाण्याचा उपयोग पेय म्हणून करतात. या पाण्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. विशेषतः गॅस्ट्रो झालेल्या लोकांना हगवण, उलटी, जुलाब, पोटाचे विकार इत्यादींसाठी फार चांगला उपयोग होतो. 100 ग्रॅम शहाळ्याच्या पाण्यापासून सर्वसाधारण 17.4 कॅलरी उष्णता मिळते, तसेच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअमही आहे. शहाळ्याचे पाणी परिरक्षक वापरून साठविता येते. इतर फळांच्या रसाबरोबर एकत्र करून किंवा बाटलीबंद करून इतर पेयांसारखाही त्याचा आस्वाद घेता येतो. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या फळांचे सिरप पाणी घालून केव्हाही बनविता येते, तसेच नारळ पाण्याचा अर्क, पाण्यात घालून केव्हाही बनविता येतो.पक्व, तसेच अपरिपक्व नारळाच्या पाण्याचा उपयोग व्हिनेगर बनविण्यासाठीही केला जातो. जगातील अनेक भागांत शहाळ्याच्या पाण्याचा अधिकाधिक वापर ताजे पेय म्हणूनच केला जातो. हवेच्या संपर्कात आणि थोड्या गरम वातावरणात ते लगेचच खराब होण्यास सुरवात होते. उच्च तापमान व पाश्‍चरायझेशन करून हे पाणी निर्जंतुक करणे शक्‍य आहे; परंतु त्यामुळे त्यातील पोषणद्रव्ये व स्वाद यांचा नाश होतो. यासाठी शीत प्रक्रिया तंत्राचा अवलंब केल्यास पेयाचा नैसर्गिक स्वाद टिकून राहण्यास मदत होते.

खोबरे ः
नारळापासून मिळणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे खोबरे. पुरातन काळापासून नारळ हा वनस्पती तेलाचा महत्त्वाचा स्रोत असून ते खाण्यासाठी आणि इतर कारणासाठीही वापरले जाते. नारळाच्या ताज्या खोबऱ्यात 50 ते 55 टक्के पाणी असते. त्यात कर्बोदके 20 टक्के, मेद 36 टक्के, प्रथिने 4 टक्के असतात. वाळलेल्या खोबऱ्यामध्ये 5 ते 6 टक्के पाणी असते. एका नारळापासून सरासरी 160 ते 180 ग्रॅम सुके खोबरे मिळते. तुकडे केलेले नारळ वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून सुकवितात. सुकविण्याच्या पद्धतीमध्ये सूर्याच्या उष्णतेचा वापर केल्यास आपल्याला हवी असलेली प्रत राखता येत नाही. खोबऱ्याची प्रत चांगली राखण्यासाठी आधुनिक वाळविण्याच्या पद्धतींचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामध्ये विद्युत्‌चलित वाळवणी यंत्र, सूर्याच्या उष्णतेवर चालणारे वाळवणी यंत्राचा वापर करून नारळ सुकविले जातात. नारळ वाळविताना नारळातील पाण्याचे प्रमाण 50 ते 55 वरून 5 ते 6 टक्‍क्‍यापर्यंत आणले जाते. नारळ वाळविताना एक काळजी घेणे आवश्‍यक आहे. ती म्हणजे नारळाचे तुकडे केल्यानंतर चार तासांच्या आत वाळविण्यासाठी गेले पाहिजेत.









सौजन्य : अग्रोवोन 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल