सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

एकवीस पत्री म्हणजे एकवीस वनौषधी आहेत,

डॉ. सचिन गुरव
दुर्वा आणि जास्वंदीच्या फुलाबरोबरच गणपतीच्या पूजेतील आणखी एक अविभाज्य घटक म्हणजे एकवीस पत्री. केवळ गणेशाला वाहिल्या जाणाऱ्या म्हणूनच नव्हे तर या एकवीस पत्री म्हणजे एकवीस वनौषधी आहेत, त्यांचे वेगवेगळे औषधी उपयोग आहेत.
१) मधुमालती - या वनस्पतीला मालतीपत्र असेही म्हणतात. वनस्पती शास्त्रात हिला ‘हिपटेज बेंघालेन्सीसकुर्झ’ म्हणतात. फुफुसाचे विकार, त्वचारोग, जाडी कमी करण्यासाठी ही गुणकारी आहे. स्त्रीरोगातील श्वेतपदर, गर्भाशयाचे विकारांत तसेच नेत्ररोगातही या वनस्पतीचा खात्रीशीर उपयोग होतो.
२) माका - हिचे शास्त्रीय नाव ‘इक्लिप्टा प्रोस्ट्रेटा’ म्हणतात. मूत्रपिंडाचे आजार, केसांचे विकार यासाठी माक्याच्या पानाचा रस वापरतात. कावीळ, त्वचारोग, मूळव्याध, विंचुदंश, आमवात यासाठी माका गुणकारी आहे. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे औषध. माक्याचा रस सर्वागास चोळून जिरवल्याने शरीरातील मेदाच्या गाठी विरघळतात.
३) बेलपत्र - हिचे वनस्पती शास्त्रातील नाव ‘ऐजल मार्मेलस’ असे आहे. पोटातील जंत, पोटाचे विकार यावर बेलपत्राचा उपयोग होतो. आमांशाच्या विकारात बेलफळ गुणकारी आहे. बेलाच्या पानांचा रस ४ चमचे व मध २ चमचे घेतल्याने सात दिवसांत कावीळ बरी होते. बेलाच्या पानांचा २ चमचे रस, १ कप दुधातून घेतल्याने स्वप्नदोष कमी होतो.
४) दूर्वा - वनस्पती शास्त्रात हिला सायनोडॉन डॅक्टीलॉन म्हणतात. ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. हिच्या दोन जाती आहेत, पांढरी व निळी पैकी गणेशाला पांढऱ्या दूर्वा प्रिय आहेत. या जातीला हिल हराळी असेही म्हणतात. दूर्वाना प्रजोत्पादक व आयुष्यवर्धक मानले जाते. म्हणून गर्भदानविधीत स्त्रीच्या नाकपुडीत दूर्वाचा रस पिळतात. अंगातील उष्णता, दाह कमी करण्यासाठी, त्वचारोगनाशक म्हणून, वंध्यत्व नाहीसे करण्यासाठी दूर्वाच्या रसाचा खूप उपयोग होतो. मूत्रविकारासाठी दूर्वा परमौषधी आहेत. पांढऱ्या दूर्वा भीमाशंकर या प्रसिद्ध ठिकाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.
५) धोतरा - याचे शास्त्रीय नाव ‘टोब्रानॅपल स्ट्रॅमोनियम’ आहे. ही क्षुद्रवर्गीय वनस्पती आहे. तिच्या काळा, पांढरा व राजधोत्रा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून ‘अॅफ्रोपिन’ नावाचे औषध बनवतात. वेदनाशामक म्हणून याचा उपयोग होतो. दमा व श्वास विकारांवर कनकासव हे धोत्र्यापासून तयार होणारे औषध प्रसिद्ध आहे. हत्तीपायरोगात धोत्र्याच्या पानांचा रस इतर औषधांसोबत लेप म्हणून वापरतात. ही वनस्पती नऊ उपविषात गणली जाते. त्यामुळे हिचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
६) तुळस - तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसीमम सॅन्टम आहे. तुळस गणपतीला निषिद्ध असली तरी फक्त गणेश चतुर्थीस तुळस वापरतात. मात्र वाहून झाल्यावर त्वरीत बाजूला काढावी. विष्णू, कर्पूर, हिरवी व कृष्ण(रान) अशा तीन जाती आहेत. हवा शुद्ध करणे हा तुळशीचा मुख्य गुणधर्म आहे. दमा, खोकला, सर्दी या विकारात ही श्रेष्ठ ठरते. कॅन्सरसारख्या विकारात तुळशीची पाने मंजिऱ्या याचा रस रोज ४ चमचे असा एक महिना घेतल्यास परिणामकारक ठरू शकतो.
७) शमी - शास्त्रीय नाव ‘प्रोस्पोपिस सिनेरिऐंजल’ आहे. शमीत सुप्त अग्निदेवता असते असे म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची राख ठेवतात. त्वचारोग, दमा, मूत्रविकार, सूज या विकारांत शमी गुणकारी ठरते.
८)आघाडा - आघाडय़ाचे शास्त्रीय नाव ‘अक्र्याराधस अस्पेरा’ आहे. हिचा उपयोग बायका, ऋषीपंचमीचे दिवशी स्नानाचे वेळी तोंड धुण्यासाठी करतात. कारण मुखरोग, दंतरोगात हे श्रेष्ठ औषध आहे. कफविकार, सूज, भगंदर-मूळव्याध, मूतखडा, शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी मेदविकार, मलेरिया अशा अनेक आजारात आघाडा उपयोगी ठरतो.
९) डोरली - शास्त्रीय नाव ‘सोलॅनम इंडिकम’ आहे. डोरलीची मुळे गुणकारी असतात. त्वचारोग, पोटाचे विकार, वातनाशक, मूत्ररोगातसुद्धा वापरतात.
१०) कण्हेर - शास्त्रीय नाव ‘नेरीयम इंडिकम’ आहे. तिला करवीर, हयारी, कणगिले असेही म्हणतात. कण्हेरीची पाने व मुळाची साल औषधी आहे. महाविषगर्भ या वेदनाशामक तेलात त्याची साल वापरलेली असते. मूळव्याधीच्या कोंबास कण्हेरीचे मूळ पाण्यात उगाळून लावल्यास कोंब गळून पडू शकतात. कण्हेरीच्या मुळाची हृदयावर ‘डिजिटॅलीस’ सारखी क्रिया होते. नऊ उपविषात हिचा समावेश होतो. घोडय़ांना मारणारी म्हणून हिचे नाव हयारी असे आहे. डोक्यातील खवडे, त्वचारोग यात वापरतात.
११) मंदार - शास्त्रीय नाव ‘कॅलोट्रॅपीस गायगँटी’ आहे. मराठीत रुई या नावाने प्रसिद्घ आहे. मारुतीच्या गळ्यात हिच्या पानाची माळ घालतात. हनुमानपत्नी म्हणूनही हिला ओळखतात. तिच्या चंड, गंध व श्वेत अशा तीन जाती आहेत. हिची पाने, फुले, मुळे औषधी आहेत. तसेच चीकसुद्धा औषधी आहे पण अंगावर उततो त्यामुळे सावधपणे वापरावा. रुईच्या चिकामुळे शौचासही साफ होते. शरीरावरील गाठीत या चिकाचा इतर औषधांसोबत लेप देतात. पोटाचे विकार, वातरोग, अर्धशिशी, त्वचारोग, दमा, चामखीळ, कुरूप, कावीळ, अंडवृद्धी, कॅन्सरच्या गाठी, मूळव्याध अशा विकारांत मंदार हे चांगले औषध आहे.
१२) अर्जुन - शास्त्रीय नाव ‘टर्मेनॅलिया अर्जुना’. हाडे जोडण्यासाठी श्रेष्ठ वनस्पती. हृदयरोगात खूप उपयोगी आहे. या वनस्पतीत कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे मूतखडय़ासारख्या विकारात जपून वापरावी. नाकातोंडातून रक्त पडणे, शौचातून रक्त पडणे, त्याचप्रमाणे रक्त व लघवीतील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयोगी येते. भाजलेल्या जखमांवरही वापरतात.
१३) विष्णुकांत - शास्त्रीय नाव ‘इवॉलवुलस अल्सिनॉयडस’ आहे. शंखपुष्पीच्या नावाने या वनस्पतीला ओळखतात. बुद्घिवर्धक आणि ब्रेनटॉनिक म्हणून उत्तम. लठ्ठपणा, मानसिक विकारांत वापरली जाऊ शकते.
१४) डाळिंब - शास्त्रीय नाव ‘पुनिका ग्रॅनॅटम’ आहे. आरक्ता, गणेश अशा जाती आहेत. पित्तात खूप गुणकारी आहेत. गालावरील वांग जाण्यास डाळिंबाची साल वापरतात. अतिसार, पचन, कावीळ, स्वरदोष, पोटातील जंत, अशक्तपणा, तोंड येणे अशा रोगोपचारात श्रेष्ठ आहे.
१५) देवदार - शास्त्रीय नाव ‘स्रिडस देवदार’. हिमालय तसेच प. घाटावर आढळणारा वृक्ष. संधिवात, जुनाट सर्दी, ताप, अपचन, उचकी अशा रोगात उपयोगी. गर्भाची वाढ खुंटल्यास देवदाव्र्यादी काढा हे अप्रतिम औषध या वनस्पतीपासून करतात.
१६) मरवा - शास्त्रीय नाव ‘ओरिगोनॉन हॉर्टेनिस’ आहे. ही अत्यंत सुवासिक वनस्पती आहे. जखमांमुळे, भाजल्याने किंवा कोणत्याही कारणांमुळे त्वचेवर पडलेल्या डागांवर श्रेष्ठ.
१७) पिंपळ - शास्त्रीय नाव ‘फिकस रेलीजिओसा’. पिंपळपानांना अश्वत्थपत्र असेही म्हणतात. हवा शुद्धीकरणासाठी श्रेष्ठ आहे. पिंपळपानातून पदार्थ खायला दिल्याने मुलांची वाणी स्वच्छ होते असे मानतात. िपपळाची लाख खडीसाखरेबरोबर दिल्यास खूप छान झोप लागते. त्याशिवाय तिचा उपयोग लहान मुलांना आकडी येण्यावरही प्रतिबंधात्मक म्हणून होतो.
१८) जाई - शास्त्रीय नाव ‘जास्मिनम ग्रँडीफ्लोरम’. तोंड आल्यावर जाईचा पाला उपयोगी पडतो. जुनाट जखमांवरही पाल्याचा उपयोग होतो. केशवृद्घिसाठीही जाईचे तेल वापरतात.
१९) केवडा - शास्त्रीय नाव ‘पँडय़ानस ओडोरॅडिसमिया’. स्त्रीरोग, गर्भपाताच्या विकारात वापरतात. ‘चंद्रकला’ या आयुर्वेदिक औषधात केवडय़ाचा समावेश असतो. दीर्घकाळ असलेला ताप, चक्कर, रक्तदाब, मानेचे वेदनारोग, मधुमेह, घटसर्प या रोगांमध्ये उपयोगी आहे.
२०) हादगा - शास्त्रीय नाव ‘सेसबॅनिया ग्रँडीफ्लोरा’. या पानांना अगस्तिपत्र म्हणतात. फुलांची भाजी करतात. फुलांत अनेक जीवनसत्त्वे असतात. मल्टीव्हिटॅमिनच्या खुराकापेक्षा ही फुले केव्हाही श्रेष्ठ.
२१) बोर - शास्त्रीय नाव ‘झिझिपस मौरीटीआना’. तापामुळे होणारा दाह कमी करण्यासाठी बोराचा काढा देतात. मुरमांवर बोराच्या बियांचे चूर्ण वापरल्याने चेहऱ्यांवरील पुटकुळ्या, काळे डाग जाऊन चेहरा तजेलदार दिसतो. घसा बसल्यावर बोरपत्रे भाजून गोळ्या करून चघळल्यास उपयुक्त.










सौजन्य : सा. लोकप्रभा 

गुणकारी नारळपाणी

2014_9image_11_38_325056000coconut-water-splash-e14102-ll

श्रीफळाचा उपयोग हा फक्त पुजेपुरता मर्यादित नसून, आरोग्यासाठीदेखील नारळ बहुपयोगी आहे. नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायी असून, नारळाचे औषधी गुणही समोर येत आहेत.
याचे सेवन केल्याने शरीर सदृढ राहण्यास मदत होते. यात ए, बी आणि सी व्हिटॅमीनचा समावेश असतो. शरीरात पाण्याची कमतरता असल्याने नारळपाणी ती कमी भरून काढते. पोटाच्या सर्व आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी नारळपाणी उपयोगी ठरते.
नारळपाण्यामुळे चेहऱयाची त्वचा चमकदार राहते. तसेच त्वचेच्या रोगासाठीदेखील उपयुक्त असते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी नारळ पाणी आरोग्यदायी असते. याचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
नारळ पाण्याचे सेवन केल्याने किडनी स्टोनपासून मुक्तता मिळू शकते. नारळ पाणी रोज प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. नारळ पाणी चेहऱयावर लावल्याने सुरकुत्यांपासून सुटका मिळू शकते. नारळ पाण्यातील अँटी ऑक्सीडेंट कॅन्सर सारख्या रोगाशी लढण्याची प्रतिकार शक्ती वाढवते.












सौजन्य : दै- तरुण भारत 

बहुगुणी नारळ

बहुगुणी नारळ

नारळातील ओल्या आणि सुक्या गराला खोबरं असं म्हणतात. शास्त्रीय नाव ‘कोकोस नुसिकेरा’ असं आहे. ताड कुळातील वृक्ष असून फळाला ‘नारळ’ म्हणतात.
coconutनारळातील ओल्या आणि सुक्या गराला खोबरं असं म्हणतात. शास्त्रीय नाव ‘कोकोस नुसिकेरा’ असं आहे. ताड कुळातील वृक्ष असून फळाला ‘नारळ’ म्हणतात. ३० मीटर उंचीचं झाड असतं. हे खोबरं भाजी, चटणी आणि आमटीत तसंच काही गोड पदार्थात वापरतात. भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनापरट्टीवर मोठया प्रमाणात लागवड होते. तसंच हिंदी आणि पॅसिफिक महासागरातील बेटांत मोठया प्रमाणात लागवड होते. कोवळा नारळ ‘शहाळं’ म्हणून ओळखला जातो. तसंच त्यातील पाणी स्वादिष्ट, क्षारयुक्त आणि पचण्यास हलकं आहे. साधारणत: एक वर्षानंतर नारळ पक्व व्हायला सुरुवात होते. दर महिन्याला फुलांचा तुरा लागतो. त्यातल्या मादी फुलांना लागलेली फळं अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. उत्तम प्रतीचं खोबरं मिळवण्यासाठी त्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. खोब-यापासून तेलदेखील काढतात. धार्मिक कार्यातही त्याचा वापर केला जातो. शहाळं तसंच ओलं आणि सुक्या खोब-याचे अनेक उपयोग आहेत. ते पुढीलप्रमाणे -
»  अति घामाने शरीर थंड पडत असेल तर सुकं खोबरं, लसूण आणि ओवा एकत्र वाटून त्याच्या गोळ्या करून घ्याव्यात. घाम यायचा थांबतो.
»  आजारी व्यक्तीला पाणी प्यायला दिल्यास त्याला त्वरित तरतरी येते.
»  शहाळ्याचं पाणी जुलाब, उलटी, उच्च रक्तदाब, अॅसिडिटी, अल्सर, पायात गोळे येणं, लघवीला कमी होणं, मूतखडा आदी तक्रारींवर गुणकारी आहे.
»  चहा, कॉफी, सिगारेट, दारू यांच्या व्यसानामुळे बिघडलेला रक्तातील पी एच घटक नारळाच्या पाण्याने पूर्ववत आणला जातो.
»  ओलं खोबरं हे पौष्टिक आणि श्रमहारक आहे. तसंच ओल्या खोब-यात स्निग्धता असून बाळंतिणी, वयात येणारी मुलं, कृश व्यक्ती, खेळाडू नर्तन आणि दिवसभर श्रम करणा-यांच्या आहारात खोब-याचा समावेश असावा.
»  सुकं खोबरं हे वेट गेन म्हणून ओळखलं जातं. म्हणून शरीर कमावणा-या व्यक्तींनी व्यायामाबरोबर सुक्या खोब-याचा आहारात समावेश करावा.
»  लहान मुलांचे दात बळकट होण्यासाठी त्यांना सुक्या खोब-याचे तुकडे चावायला द्यावेत.
»  केसांसाठी अत्यंत गुणकारी असून ओल्या खोब-याचं दूध किंवा सुक्या खोब-याच ताजं तेल विशेष उपयुक्त ठरेल.







सौजन्य : दै- प्रहार 

बहुपयोगी नारळ

 बहुपयोगी नारळ
 

नारळ दूध व नारळ क्रीम ः
यासाठी प्रथम नारळ सोलले जातात. सोललेले नारळ फोडून किंवा त्याचे दोन तुकडे करून, करवंटी, खोबरे व पाणी वेगळे केले जाते. खोबऱ्यावरील तपकिरी रंगाचा पापुद्रा किंवा आवरण धारदार चाकूने वेगळे केले जाते. हे खोबरे स्वच्छ पाण्याने धुऊन गरम पाण्याने निर्जंतुक केले जाते. निर्जंतुक केलेले खोबरे मिक्‍सरच्या साह्याने बारीक केले जाते. प्रेस यंत्राच्या साहाय्याने पिळून, त्यापासून दूध बाजूला केले जाते. दूध चांगले गाळून पिण्यासाठी वापरले जाते. या दुधाची टिकवणक्षमता कमी असल्याने स्प्रे ड्रायरच्या साहाय्याने त्याची पावडर बनविली जाते, त्यामुळे ते लवकर खराब होत नाही व पाहिजे त्या वेळी पाणी घालून वापरता येते. अशा प्रकराच्या दुधाचा वापर महाराष्ट्रामध्ये सोलकढी करण्यासाठी केला जातो.नारळापासून क्रीम तयार करण्यासाठी प्रथम नारळाचे दूध काढले जाते व सेन्ट्रिफ्युज तंत्रज्ञानाने नारळाच्या दुधातून क्रीम काढले जाते. हे क्रीम पाण्यात विरघळून किंवा जसेच्या तसे विविध पदार्थांत वापरतात. नारळाच्या दुधाऐवजी आयत्या वेळेला ते वापरता येते. याचा वापर सोलकढी, मिठाई किंवा बेकरी व्यवसायामध्ये करतात.

नारळाचे पाणी ः
सात ते आठ महिन्यांच्या नारळामध्ये भरपूर पाणी असते. नारळाचे पाणी पौष्टिकही असते. नारळाच्या पाण्याचा उपयोग पेय म्हणून करतात. या पाण्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. विशेषतः गॅस्ट्रो झालेल्या लोकांना हगवण, उलटी, जुलाब, पोटाचे विकार इत्यादींसाठी फार चांगला उपयोग होतो. 100 ग्रॅम शहाळ्याच्या पाण्यापासून सर्वसाधारण 17.4 कॅलरी उष्णता मिळते, तसेच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअमही आहे. शहाळ्याचे पाणी परिरक्षक वापरून साठविता येते. इतर फळांच्या रसाबरोबर एकत्र करून किंवा बाटलीबंद करून इतर पेयांसारखाही त्याचा आस्वाद घेता येतो. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या फळांचे सिरप पाणी घालून केव्हाही बनविता येते, तसेच नारळ पाण्याचा अर्क, पाण्यात घालून केव्हाही बनविता येतो.पक्व, तसेच अपरिपक्व नारळाच्या पाण्याचा उपयोग व्हिनेगर बनविण्यासाठीही केला जातो. जगातील अनेक भागांत शहाळ्याच्या पाण्याचा अधिकाधिक वापर ताजे पेय म्हणूनच केला जातो. हवेच्या संपर्कात आणि थोड्या गरम वातावरणात ते लगेचच खराब होण्यास सुरवात होते. उच्च तापमान व पाश्‍चरायझेशन करून हे पाणी निर्जंतुक करणे शक्‍य आहे; परंतु त्यामुळे त्यातील पोषणद्रव्ये व स्वाद यांचा नाश होतो. यासाठी शीत प्रक्रिया तंत्राचा अवलंब केल्यास पेयाचा नैसर्गिक स्वाद टिकून राहण्यास मदत होते.

खोबरे ः
नारळापासून मिळणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे खोबरे. पुरातन काळापासून नारळ हा वनस्पती तेलाचा महत्त्वाचा स्रोत असून ते खाण्यासाठी आणि इतर कारणासाठीही वापरले जाते. नारळाच्या ताज्या खोबऱ्यात 50 ते 55 टक्के पाणी असते. त्यात कर्बोदके 20 टक्के, मेद 36 टक्के, प्रथिने 4 टक्के असतात. वाळलेल्या खोबऱ्यामध्ये 5 ते 6 टक्के पाणी असते. एका नारळापासून सरासरी 160 ते 180 ग्रॅम सुके खोबरे मिळते. तुकडे केलेले नारळ वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून सुकवितात. सुकविण्याच्या पद्धतीमध्ये सूर्याच्या उष्णतेचा वापर केल्यास आपल्याला हवी असलेली प्रत राखता येत नाही. खोबऱ्याची प्रत चांगली राखण्यासाठी आधुनिक वाळविण्याच्या पद्धतींचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामध्ये विद्युत्‌चलित वाळवणी यंत्र, सूर्याच्या उष्णतेवर चालणारे वाळवणी यंत्राचा वापर करून नारळ सुकविले जातात. नारळ वाळविताना नारळातील पाण्याचे प्रमाण 50 ते 55 वरून 5 ते 6 टक्‍क्‍यापर्यंत आणले जाते. नारळ वाळविताना एक काळजी घेणे आवश्‍यक आहे. ती म्हणजे नारळाचे तुकडे केल्यानंतर चार तासांच्या आत वाळविण्यासाठी गेले पाहिजेत.









सौजन्य : अग्रोवोन 

नारळ पाण्याचे ज्ञात नसलेले काही फायदे



नितळ त्वचेसाठी
नारळाचे पाणी पिण्याने आपली त्वचा नितळ बनण्यास मदत मिळते.  पुरळ आणि डागांसारख्या त्वचा समस्यांपासून सुटका मिळवण्यास मदत करते आणि आपली त्वचा चमकदार बनवते. याच्या सेवनाशिवाय नारळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने उत्तम परिणाम मिळू शकतात. हे मॉइश्चर म्हणून कार्य करते आणि एक टोनर म्हणून सम प्रभावी आहे.

हँगओव्हरसाठी मदत करते
नारळाचे पाणी प्यायल्याने हँगओव्हर नष्ट होण्यास मदत होते. आपण काल रात्रीच्या पार्टीमध्ये दोन पेग अतिरिक्त घेतले आहे तर, पुढील सकाळी थोड्या नारळाचे पाणी सेवन करा. आपले पोट व्यवस्थित कार्य करते व दारू प्यायल्याने शरीरातील कमी झालेले इलेक्ट्रोलाइट्स पुनर्स्थित करते.

स्नायुंच्या पेटक्यांना प्रतिबंधित करते
नारळ पाणी आपल्याला फिट ठेवते आणि स्नायुंचे पेटके प्रतिबंधित करण्यात मदत करते. पोटॅशियम कमतरतेमुळे स्नायुंमध्ये पेटके येतात आणि नारळ पाणी पोटॅशियम समृध्द आहे. त्यामुळे याचा नियमितपणे वापर केल्याने स्नायुंच्या पेटके प्रतिबंधित करतात.

केस कंडिशनर म्हणून
त्याच्या असंख्य फायद्यांच्या यादीत, नारळाचे पाणी आपल्या केसांसाठीही चांगले आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने आणि केस धुतल्यानेही आपल्या केसांना उत्तम कंडिशन होते. आणखी काय आहे? हे एक विशिष्ट प्रमाणात केस गळण्यापासून देखील प्रतिबंधित करते आणि आपले केस गुळगुळीत ठेवते.

त्यामुळे, नारळाचे पाणी आजच सेवन करण्यास सुरूवात करा आणि परिणाम पहा.






सौजन्य : आपली मराठी 

सौंदर्य खुलविणारा नारळ

सौंदर्य खुलविणारा नारळ

टिव्ही आणि इतर प्रसारमाध्यमांद्वारे होणार्‍या विविध प्रकारच्या तेलांच्या जाहिराती सर्वज्ञात आहेत. तेलाला एवढे महत्त्व का असा प्रश्नही आपल्याला पडतो. पण सौंदर्याच्या दृष्टीकोनातून नारळाचे तेल फार उपयुक्त आहे.
Coconut
NDND
नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा खोवलेला कीस, नारळाचे दूध, सुके खोबरे, नारळाचे तेल, नारळाची कवटी हे सारे सौंदर्यवृद्धीसाठी फार महत्त्वाचे आहेत. त्याचा उपयोग करून अनेक नामांकित तारकाही आपली त्वचा तजेलदार ठेवतात.

नारळात आहे तरी काय ?
नारळामध्ये विविध एन्झाइम्स असतात. यात प्रामुख्याने एन्झाईम इन्व्हेस्टीन, ऑक्सिडेज आणि कॅटॅलेज यांचा समावेश करता येईल. या शिवाय ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही इनऑर्गेनिक तत्व असतात.
नारळाच्या दूधामध्ये मॅनिटॉल नावाची साखर, डिंक, अल्ब्युमिन नावाची प्रथिने, टार्टारिक एसिड आणि पाणी असते.
नारळाच्या तेलामधे कॅप्रॉलिक एसिडशिवाय लॉरिक, मायरिस्टीक, पामिटिक, आणि स्टीयरिक आम्लाचे ग्लिसराईड्‍स असतात.

नारळाचे पाण
नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित ‍प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाच रंग उजळतो. ओले तसेच सुखे खोबरे शांती देणारे, कामशक्ती वाढवणारे, पोट साफ होण्यास मदत करणारे, अर्थात बद्धकोष्ठाचा नाश करणारे आहे. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे. त्वचेचे आरोग्य त्यामुळे सुधारते.

केसांसाठी नार
Coconut
NDND
केस तसेच सौंदर्यवर्धनासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळून लावावे. यामुळे केस मुलायम तर होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होते आणि केसांची वाढ व्हायला लागते.

याशिवाय, त्वचा निर्मळ आणि नितळ राखण्यासाठीही नारळाच्या पाण्याचा उपयोग करता येतो. नारळाचे पाणी अतिशय पोषक आहे व ते त्वचेत शोषले गेल्यामुळे त्वचेला टवटवीतपणा येतो. याचसाठी निस्तेज आणि कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामधे दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा.
याशिवाय नारळाचे पा‍णी व दूध त्वचेच्या क्लिझिंगसाठीही उपयुक्त ठरतात.

नारळाचे दू
कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळाचे दूध सर्वोत्तम ठरते. कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दूधाने चेहर्‍याला मसाज केला तर, त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत आणि आभायुक्त दिसायला लागते. खरे पाहता त्वचेसाठी नारळाचे दूध म्हणजे एक वरदानच आहे.
या व्यतिरिक्त फेशियल मसाज करताना देखील नारळाचे दूध क्रीममध्ये मिसळून वापरावे. असे केल्याने त्वचेवरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

त्वचेप्रमाणे डोक्यावरील केसांसाठीही नारळाचे दूध अतिशय पोषक आणि गुणकारी ठरते. टाळूची त्वचा आणि केस वाढत नसल्यास नारळाच्या दुधाचा उपयोग उपकारक ठरेल. नारळाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन ई ची गोळी फोडून घालावी व मिश्रणाने टाळूला हलक्या हाताने मसाज करावा. असे आठवड्यातून किमान दोनदा करावे. या प्रयोगाने निश्चितच केसांचे आणि टाळूच्या त्वचेचे आरोग्य सुधारेल.

नारळाचे ते
Coconut
NDND
आयुर्वेदानुसार नारळाचे तेल 'केश्य', अर्थात केसांचे आरोग्य वाढवणारे, केस गळणे थांबवणारे आणि केसांची वाढ करणारे आहे. बाजारात उपलब्ध असलेले नारळाचे तेल सुक्या खोबर्‍यापासून काढले जाते. मात्र अयुर्वेदात नारळाचे तेल तयार करण्याची कृती पूर्णपणे वेगळी आहे. नारळाचे तेल ओल्या खोबर्‍यापासून तयार केले जाते. असे तेल तयार करण्यासाठी ओला नारळ बारीक वाटून घ्यावा आणि त्यापासून दूध काढून घ्यावे. हे दूध मंद आचेवर उकळत ठेवावे. यामुळे यातील पाण्याचा अंश उडून जाईल आणि निव्वळ तेल मागे उरेल. हे तेल गाळून घ्यावे. अशा पद्धतीने तयार केलेले तेल वापरल्यामुळे केस गळायचे थांबतात व केसांची वाढ व्हायला लागते.

केसांबरोबरच नारळाचे तेल त्वचेसाठीही उपयुक्त आहे. कोरड्या पडलेल्या अंगाला नारळाच्या तेलाने मसाज करावा. नारळाच्या तेलाचा वास उग्र वाटत असल्यास त्यात लव्हेंडर ऑईल आणि जिरेनियम ऑईलचे 4-5 थेंब मिसळून घ्यावेत.






 सौजन्य : वेब-दुनिया

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

नारळ पाणी पिण्याचे पाच फायदे

आपण सर्वजण जाणतो नारळ पाणी पिणे हे तहान भागविण्याचा गोड पर्याय. मात्र, याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पाणी पूर्णत: नैसर्गिक आहे. हे स्वादीष्ट पाणी आरोग्याला खूप फायदेशीर आहे.
१. वजन कमी करण्यासाठी लाभदायक
- नारळ पाण्यात कमी प्रमाणात फॅट असतात. तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हा पर्यात तुमच्यासाठी चांगला आहे. यातील पोषक घटकामुळे तुमच्या भूकेवर नियंत्रण राहते. त्यामुळे तुमचे जेवण नियंत्रित राहते.
२. त्वचा उजळण्यासाठी फायदेशीर
- तुमची त्वजा उजळण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर आहे. कोणत्याही औषधापेक्षा ते कमी नाही. चेहऱ्यावरील डाग घालविण्यासाठी हे पाणी काम करते. नारळपाणी त्वचेला हायड्रेटेड आणि  मॉश्चराईज्ड करते.

३. हॅंगओव्हर कमी करण्यास मदत
- तुम्ही ज्यावेळी हॅंगओव्हर होतात. त्यावेळी नारळ पाणी पिणे योग्य. कारण हॅंगओव्हरपासून नारळ पाणी वाचविते. तसेच शरीरात नविन ऊर्जा निर्माण करण्यास मदत होते. जर तुमचे डोके दुखत असेल तर नारळ पाणी प्या.
४. पचन क्रियेसाठी लाभदायक
- तुमची पचनाबाबत तक्रार असेल तर नारळ पाणी पिण्यानंतर दूर होते. नारळ पाण्यापासून शरीराला पोषक घटक मिळतात. तसेच काही अनावश्यक घटक रोखण्यास  पाणी मदत करते.
५. पोषक घटक भरपूर
- बाजार मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री (बॉटल) होते. या पाण्यापेक्षा १०० टक्के नारळ पाणी केव्हाही चांगले. नारळ पाण्यात शरीराला आवश्यक असणारी पोषक घटक भरपूर असतात. यात कॅल्शिअम, मॅग्नशिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, सोडिअम यांची मात्रा सर्वाधिक आहेत.


100 आजारांवर एकच उपाय, प्या नारळ पाणी

 

कडाक्याचं ऊन आणि उकाडा यापासून सुटका होण्यासाठी नारळ पाणी बेस्ट. (Coconut Water) नारळ पाण्यात व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असते. 100 आजारांवर नारळ पाणी एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदात नारळ पाण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य अधिक चांगले आणि उत्तम ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी पिणे केव्हाही चांगले.
आपले शरीर अधिक चांगले ठेवण्यासाठी नारळ पाणी महत्वाचे काम बजावते. गरोदर महिला जर नियमित नारळ पाणी प्राशन करत असतील तर त्यांच्यासाठी ते चांगले शिवाय गर्भअवस्थेतील शिशु सुंदर, त्याचे चांगले आरोग्य राहण्याबरोबच शिशु गोरा होतो. त्यामुळे नारळ पाणी पिणे बाळाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते. नारळाला एक धार्मिक महत्व आहे. तसेच आैषधी गुणधर्म नारळात आहेत. त्यामुळे त्याला जास्त महत्व आहे. नारळात व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नीशिअम, व्हिटॅमिन आणि खनिज युक्त अधिक मात्रा असते. नारळ पाणी अनेक आजार पळवून लावते. फॅक्ट आणि कॉलेस्ट्रॉल रोखण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही जाड होत नाहीत. जाडी रोखण्यास ते मदत करते.
गर्मीमध्ये नारळ पाणी प्राशन केल्याने आनंद आणि उत्साहाचे वातावरण शरीरात राहते. केवळ उत्साह नाही तर आरोग्यवर्धक पाणी असल्याने त्याचे चांगले लाभ होतात. नारळ पाण्यात व्हिटॅमिन, मिनरल, इलेक्ट्रोलाईट्स, एमिनो अॅसिड, सायकोकाईन अधिक प्रमाणात असते. नारळ पाणी महिलांच्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. जुलाब आणि आग होत असेल किंवा त्वचा कोरडी होत असेल तर नारळ पाणी पिणे केव्हाही चांगले.
उष्णता कमी करण्यास नारळ पाणी मदत करते. वीर्यवर्धक आहे. लघवी साफ होण्यासाठी नारळ पाणी उत्तम आहे. नारळ पाण्यात आरोग्य पुरक घटक असल्याने ते चांगले आहे. यामुळे नारळ पाणी जगात महत्वाचे आरोग्यवर्धक औषध ठरत आहे.
तुम्ही व्यायाम करत असाल तर व्यायामानंतर नारळ पाणी पिणे चांगले. शरीरातील मेटाबोलिस्म रेट वाढविण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत करते. तसेच शरीरातील अन्य रोगांचा मुकाबला करण्यासाठी नारळ पाणी मदत करते. त्यामुळे अनेक आजारांवर गुणकारी ठरणारे नारळ पाणी पिणे आवश्यक आहे.







सौजन्य :- झी २४ तास 

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

उपयुक्त माहिती UPDATE महाराष्ट्रातील जिल्ह्यांची शासकीय माहिती येथे क्लिक करा . जिल्ह्याच्या माहितीसाठी नकाशावरील जिल्ह्यावर क्लिक करा


मिठाबद्दल उपयुक्त माहिती ....

मिठाबद्दल उपयुक्त माहिती
* उपयोग -
 मिठाचा जर योग्य प्रमाणात वापर केला, तर अनेक आजारांवर ते उपयुक्त ठरते. १. ओवा, मीठ व जिरे वाटून त्याची बारीक पूड घेतल्याने अपचनातून निर्माण झालेली पोटदुखी कमी होते. २. लहान मुलांना जर कृमी झाले असतील, तर मिठाचे पाणी सकाळीच पिण्यास दिल्यास कृमी संडासावाटे बाहेर पडतात. ३. हात किंवा पाय मुरगळल्यास त्यावर हळद व मिठाचा लेप लावावा. सूज लगेचच कमी होते. ४. घसा किंवा दाढ दुखत असेल, तर मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

* दुष्परिणाम - 
१. मिठाचा वापर जर अतिरिक्त प्रमाणात केला, तर आमाशय व आतडय़ातील श्लष्मिक कफाचे नुकसान होऊन दाह निर्मिती होते. २. मिठाचे अतिरिक्त सेवन केल्याने त्वचाविकार, रक्तदाब, सर्वाग सूज, मूत्रविकार, संधिवात, वंध्यत्व हे विकार उद्भवतात. मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते आतडय़ामधून कॅल्शिअमचे शोषण करण्यास अडथळा आणते. त्याचबरोबर निर्माण झालेले कॅल्शियम शरीरातून बाहेर काढते. यामुळे हाडांची झीज हा विकार जडतो.







सौजन्य :-  फेसबुक 

पावसाळ्यातील रानभाज्या...

पावसाळ्यातील रानभाज्या..

मेघवृष्टयनिलैः शीतैः शान्ततापे महीतले| स्निग्धोशेहाम्ललवणमधुरा बलिनो रसः॥ सूर्याचे दक्षिणायन चालू असताना त्याची शक्ती कमी होत जाते. तर पावसाळ्यात गार वारा व पाऊस यामुळे पृथ्वीवरील उष्णता कमी होऊन आम्ल, लवण आणि मधुरस पुष्ट होतात. उन्हाळ्यात शरीरामध्ये पित्ताचा संचय झालेला असतो. पावसाळ्यातील वातावरण बदलाचा परिणाम म्हणून झालेल्या आम्लविपाकामुळे अग्निमांद्य (भूक मंदावते) आलेले असते. या सर्वांमुळे वातादि त्रिदोष वाढतात. म्हणूनच पावसाळ्यात वमनविरेचनादि पंचकर्मे करून शरीरशुद्धी करावी असे ऋतुचर्येत सांगितलेले आहे. पावसाळ्यात पचायला हलका असा आहार घ्यावा व पाणीही उकळून प्यावे, असा सल्ला दिलेला आहे. पाणी उकळल्याने पचायला लघू होते आणि त्यातील जंतूही मरतात. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने या तीन-चार महिन्यात आंबट, खारट व मधूर पदार्थांचे सेवन करावे. गंमत बघा, निसर्ग नेमका या काळापुरताच अशा काही भाज्या उपलब्ध करून देतो की हे रस आपल्या पोटात सहज जाऊ शकतील. अशी निसर्गाची व्यवस्था अर्थात प्रत्येक ऋतुसाठी असते. त्या त्या ऋतुत ज्या नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात, त्या भाज्या व फळे जरूर सेवन करावीत. त्यासाठीच निसर्गराजा आपली सेवा करत असतो. आपणही आपला आहार निसर्गानुसार ठेवला तर आपल्याला आरोग्याची वेगळी काळजी घ्यायला नको. दुधी भोपळा, गाजर, कारले, चुका यासारख्या भाज्या पावसाळ्यात जास्त प्रमाणात मिळतात. श्रावणात आपण बाजारात फेरफटका मारला तर कितीतरी नवनव्या भाज्याही बघायला मिळतात. या भाज्या एखाद्याच महिन्यात, तेवढ्याच दिवसात दिसतात व नंतर ज्या गायब होतात, त्या एकदम पुढल्या पावसाळ्यात दर्शन देण्यासाठीच! वर्षभरात कुठे शोधू म्हटले तरी त्या दिसणार नाहीत. म्हणून पावसाळ्यात त्यांची ओळख करून घ्यावी, चव चाखावी आणि त्यांचा आस्वादही जरूर घ्यावा. अळंबी – आजकाल बारा महिने मिळणारी पावसाळी भाजी म्हणजे अळंबी. पावसाळ्यात अळंबीच्या छत्र्या जागोजागी उगवलेल्या दिसतात. त्यात विषारी आणि गोड असे दोन प्रकार आहेत. अळंबी थंड व गोड आहेत. यालाच आपण मशरूम असे म्हणतो. ते शक्तीवर्धक असून पचनास थोडे जड, पौष्टिक आहेत. यात भरपूर प्रथिने असल्याने आहारात सावधगिरी बाळगणार्‍यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्यात पोटॅशियम, फॉस्फरस व सोडियमचे प्रमाणही लक्षात घेण्यासारखे आहे. यात ‘‘ब’’ जीवनसत्त्वाचे उपघटक ५ ते ३० % पर्यंत आहेत. त्यामुळे मशरूम ही भाजी आपल्या आहारात आलटून पालटून असावीच. निरनिराळ्या भाज्यांबरोबर अळंबीचा वापर केला जातो. मशरूमची भाजी करण्यासाठी त्याचे पात्तळ काप करावेत. पातेलीत तेल तापवून फोडणीला बारीक चिरलेली लसूण व कांदा घालावा. मीठ घालून परतून घ्यावे. बारीक चिरलेला टोमॅटो व लाल तिखट घालून ढवळावे. आता त्यावर अळंबीचे काप टाकून थोडे पाणी घालून भाजी शिजवावी. अधूनमधून ढवळावी. ही मूळ भाजी. आता यात ब्रोकोली, बेबीकॉर्न, फ्लॉवर, बटाटा अशा आपल्या आवडीच्या भाज्या घालून त्यात मसाल्यांचा वापर करून स्वाद बदलावा. टाकळा – तखटा वा टाकळा या नावांनी ही भाजी प्रसिद्ध आहे. या भाजीची पाने लांबट गोल असतात. भाजी पचायला हलकी, उष्ण, तिखट व तुरट असते. ती पित्तकर, मलसारक आहे. म्हणूनच जेव्हा शौचास घट्ट होते वा मलावष्टंभ होतो त्यावेळी ही भाजी जरूर खावी. याच्या कोवळ्या पानांची व शेंगांची भाजी केली जाते. टाकळ्याच्या पानांचे रायते करण्यासाठी चिंच, गूळ, मीठ, मिरची घालून मिक्सरमध्ये वा पाट्यावर पाने वाटावीत. मोहरीची डाळ फेसून त्यास लावावी. कर्टोली – या वेलीची हिरवीगार, मऊ काटेरी फळ भाजीत वापरतात. कर्टोली ही वातकफघ्न, तिखट रसाची, अग्नि प्रदिप्त करणारी अशी भाजी आहे. खोकला, दमा, कफविकार, त्वचाविकार यावर उपयुक्त. ज्यांना हृदयविकार वा मधुमेह असेल त्यांनी ही भाजी जरूर खावी. कर्टोलीची भाजी करण्यासाठी काचर्‍या चिराव्यात. त्यातील जुन बिया काढून टाकाव्यात. तेलावर कांदा परतून त्यावर या भाजीचे काप घालावेत. तिखट व ओले खोबरे घालून भाजी शिजवावी व नंतर मीठ घालून एक वाफ द्यावी. कमलकंद – ही पाण्यात उगवणारी अशी पाणभाजी आहे. हे कमळाचे देठ आहे. हे देठ लांब असून काहीसे पोकळ, स्पंजसारखे आतून छिद्र असलेले, जाळीदार असते. कमलकंद हे मधूर, तिखट, काहीसे तुरट, दाह कमी करणारे आहे. ते पौष्टिक असून उष्णता कमी करणारे असल्याने रक्तपित्त, उलटी होणे, उचकी लागणे वा रक्तस्त्राव होणे यावर वापरले जाते. कमलकंदाचे तुकडे तेलात तळून मीठ लावून खातात. कमलकंदाच्या आतील बिया-मखाणे फोडून त्यातील गर खातात. मखाण्याच्या लाह्या फोडूनही खातात. त्या पचायला हलक्या होतात आणि रूचकर लागतात. त्या शक्तीवर्धकही आहेत. कमलकंद वाळवून पीठ करतात व ते निरनिराळ्या भाज्यांना घालतात. कमलकंदाचे लोणचेही चविष्ट लागते. यासाठी कमलकंद स्वच्छ धुवून त्यांचे बारीक बारीक तुकडे करावेत. पातेलीत पाणी उकळायला ठेवावे. पाण्याला उकळी आली की त्यात हे तुकडे सुकवावेत. आता धणे, जिरे, मिरे व कढीपत्ता यांची भरड करावी व तो सर्व खडा मसाला एकत्र करावा. आता हा मसाला (खडा वा भरड) तेलात परतावा. गार झाल्यावर मीठ व हा मसाला देठांच्या तुकड्यांवर टाकून चांगल घोळावे. उरलेले तेल कडकडीत गरम करावे व गार करावे. सर्व मिश्रण चांगले गार झाले की लिंबाचा रस व गार तेल मिसळून लोणचे बंद करून ठेवावे. दुसर्‍या दिवशी खाण्यास उघडावे. कवळा – श्रावणी सोमवारी खास केलेली भाजी म्हणजे कवळ्याची! कवळ्याची पाने कडू, उष्ण, कफपित्ताचा नाश करणारी व मलावष्टंभ दूर करणारी आहेत. कवळ्याची भाजी करण्याकरिता फक्त त्याची पाने घ्यावीत. पातेलीत कांदा बारीक चिरून तो परतावा. त्यावर ओले खोबरे घालावे. त्यावर चिरलेल्या भाजीची पाने घालून ढवळावे. एक वाफ द्यावी व नंतर त्यात शिजवलेले, मोड आलेले मूग घालावेत. पाने शिजल्यावर मीठ व तिखट घालून एक वाफ द्यावी व नंतर भाजी खाली उतरवावी






सौजन्य :- नवशक्ती 

||गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया||

आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।। नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।
सर्वांग सुंदर उटी शेंदुराची ।। कंठी झळके माळ मुक्ता फळाची।।
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।।
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।। चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरे जडीत मुकुट शोभतो बरा ।। रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ।।
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। २ ।।
लंबोदर पितांबर फणिवर वंधना ।। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ।।
जयदेव जयदेव जय श्री मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। ३ ।।
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
(¯*•๑۩۞۩:♥♥ ||गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया||♥♥ :۩۞۩๑•*¯)
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ

21 अंक व गणपती संबध

गणपती ला अग्रपूजेचा मान असतो. ते विद्येचे दैवत आहे. तो रंगभूमीवर अधिराज्य गाजवतो. नटेश्वरही आहे आणि शूर योद्धाही आहे. तो चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती आहे. विघ्नहरण आणि बुद्धिदान हे गणेशाचे गुण आहेत.
21 गणपतींचा मार्गदर्शक तो गणेश.
21 गणेशांचा मार्गदर्शक तो गणनायक.
21 गणनायकांचा मार्गदर्शक तो महागणपती. ओंकारामधील अकार चरण-युगुल, उकार उदर-विशाल, मकार, महामंडल-मस्तकाकारे, या मात्रांमध्ये सर्व वेद सामावले आहेत. ओंकार नादातून ब्रह्मविश्व निर्माण झाले आहे. हे विश्व निर्मितीचे महाबीज आहे. तो गणेश आहे.
गणपती ला  अभिषेक हा अथर्व शीर्षाच्या 21 आवर्तनाणी पूर्ण केला जातो.
21 दूर्वांची जुडी गणपती ला  वाहतात.







21 मोदकांचा नैवेद्य गणेशाला दाखवतात.
21 वनस्पती  गणपती ला  वाहतात : बेल,  तुळस, शमी, विष्णुकांत, देवदार, मोरवा, मधुमालती, धोतरा, डोलरी, अर्जुन, जाई, मका, पिंपळ, बोर, आघाडा, कण्हेर, रुई, डाळिंब, केवडा, अगस्ती.
21   फुले
21 फुले गणपती ला  वाहतात -जास्वंद, मधुमालती, बकुल, नागकेशर, कण्हेरी, मादुरकी, शतपत्र, श्वेत कमळ, सोनचाफा, उडी, मोगरा, प्राजक्त, गोविंद, रक्त कमळ, केवडा, सुपारी, धोतरा, चसई, मोहोर, जाई आदी.
21 पुराणे – गणेश पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, पद्मपुराण, उत्तर, लिंगपुराण, उत्तरार्ध, शिवपुराण, ब्रह्मांडपुराण, ब्रह्माखंड, मुद्गलपुराण, अग्निपुराण, नारद पुराण, वराह पुराण, मत्स्य पुराण, भविष्य पुराण, अवंती खंड, ब्रह्म पुराण, वामन पुराण, गरुड पुराण, स्कंद पुराण, प्रभासखंड.
21 राक्षसांचा  संहार गणेशाने  केला:  नरातंक, कैटभ, व्योमासुर, मदासुर, मत्सरासुर, क्रोधासुर, मेणासुर, देवांतक, त्रिपुरासुर, लोभासुर, कमलासुर, दंभासुर, मायासुर, गजासुर, मधु, सिंदुरासुर, मोहासुर, विघ्नासुर, अनलासुर, कामासुर, कमलासुर.
भारतात असेतू हिमाचल गणेशाचे नुसते पूजन होत नसून विदेशातही गणेशाचे मोठय़ा भक्तिभावात पूजन केले जाते. सिंहली-पाषाण प्रतिमा, कंबोडियन पंचरसी, इंडोचायना-चतुर्मुखी, दक्षिण बाली, चिनीमूर्ती, दिआंगच्या पठारावरील जावा गणेशमूर्ती, मुलाधारी- बंगाल, जंडी- सिंगासरी कापलीक, बारा कापलीक कामेर- पंचरसी, उदयगिरी गुहेतील नेपाळ- षड्भुज, भेडाघाट-गणेशानी, बोर्नीओ- प्रस्तर, शाम- हनोई, शाम- विरुन, कामेर-पूर्वकालीन, ब्रह्मदेश- गवांपती, जपान- कांगितेन, नेपाळ- हेरंभ, स्विचिंग- नृत्यमूर्ती, वेरूळ- सप्तमातृका, तिबेट- हेरंभ, कुमरा-शक्तीसह गणेश या विदेशात आहेत. व्यासांचा लेखक म्हणूनही श्री गणेशाचा उल्लेख केला जातो.










https://palajganapati.wordpress.com

विज्ञानवार्ता - "माहितीचा विस्फोट' हे नेहमी ऐकू येणारे शब्द

"माहितीचा विस्फोट' हे नेहमी ऐकू येणारे शब्द; पण ही माहिती साठवायची ठरविली, तर किती "स्पेस' लागेल? या प्रश्‍नावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे आणि त्याला प्रथमच मान्यता मिळाली आहे. सध्या उपलब्ध असलेली सर्व माहिती सर्वसाधारण अंदाजानुसार 1.2 अब्ज हार्डडिस्कमध्ये साठवता येऊ शकेल.
किती माहिती साठवलीय जगभरात?

सध्याचे युग हे माहितीच्या विस्फोटाचे युग आहे, असे म्हटले जाते. इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील घडामोड आपल्याला क्षणार्धात कळू शकते; परंतु, या माहितीच्या युगात आपण किती माहिती साठवून ठेवू शकतो? काही अंदाज बांधता येईल? अवघड गोष्ट आहे. अर्थात "डिजिटल' साठवून ठेवता येऊ शकेल अशा माहितीची मोजणी करण्याचे काम संशोधकांनी केले आहे.

"सायन्स एक्‍सप्रेस' आणि "सायन्स' या विज्ञानविषयक नियतकालिकांत या बाबतची माहिती देण्यात आली आहे. सध्या उपलब्ध असलेली सर्व माहिती सर्वसाधारण अंदाजानुसार 1.2 अब्ज हार्डडिस्कमध्ये साठवता येऊ शकेल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपल्याकडे असलेली माहिती पुस्तकात साठवायची म्हटल्यास अमेरिका किंवा चीनच्या पृष्ठभागावर पुस्तकांचे तीन थर करावे लागतील. हीच माहिती सीडींमध्ये साठवायची झाली तर त्याचा थर चंद्राच्याही पुढे जाईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. याआधीही अशा प्रकारे माहिती गोळा करण्याचे प्रयत्न झाले आहेत; मात्र, अशा प्रकारच्या संशोधनाला प्रथमच मान्यता मिळाली आहे.

दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. मार्टिन बिलबर्ट या प्रकल्पात कार्यरत आहेत. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहितीचे युग सुरू झाल्यापासून म्हणजे 1986 ते 2007 या कालावधीतील माहितीची मोजणी केली. ऍनालॉग आणि डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सर्व यंत्रणांत समाविष्ट करण्यात आलेल्या माहितीचा आढावा घेण्यात आला. फ्लॉपी ड्राईव्ह पासून मायक्रोचिपपर्यंत सर्व उपलब्ध साधनांचा यासाठी विचार केला गेला. 2000 वर्षापर्यंत 75 टक्के माहिती ही "ऍनालॉग' फॉरमॅटमध्ये (उदा. व्हिडिओ कॅसेट) साठविली गेली होती. तर 2007मध्ये 94 टक्के माहिती डिजिटल स्वरूपात साठविली गेली.

संगणकात साठवलेली माहिती सुरवातीला किलोबाईटमध्ये, नंतर मेगाबाईटमध्ये मोजली जाऊ लागली. माहिती वाढली, तशी ती गिगाबाईटमध्ये मोजण्यास सुरवात झाली. त्यानंतर टेराबाईट, पेटाबाईट आणि आता एक्‍झाबाईट ही परिमाणे आली. एक एक्‍झाबाईट म्हणजे एक अब्ज गिगाबाईट. सध्या आपण साठवून ठेवू शकतो, अशी माहिती 295 एक्‍झाबाईट (म्हणजेच 295 वर वीस शून्य) एवढी आहे. विविध माध्यमांतून दररोज प्रसारित (ब्रॉडकास्ट) होणारी माहिती दोन झेटाबाईट एवढी आहे. (एक झेटाबाईट म्हणजे एक हजार एक्‍झाबाईट). म्हणजेच दररोज माणशी 175 वर्तमानपत्रे एवढी. नव्या तंत्रज्ञानाबरोबर संगणन करण्याची क्षमताही वाढत आहे. या अभ्यासानुसार दरवर्षी 58 टक्‍क्‍यांनी संगणन क्षमता वाढते आहे.

माहितीचे हे आकडे महाकाय वाटत असले, तरी निसर्गाच्या क्षमतेशी त्याची तुलना होऊ शकत नाही. उदाहरणच द्यायचे झाले, तर माणसाच्या "डीएनए'चे देता येईल. सध्या उपलब्ध असलेल्या जगभरातील सर्व साधनांत जेवढी माहिती साठविली जाते त्याच्या 300 पट अधिक माहिती एका माणसाच्या "डीएनए"मध्ये साठविली जाऊ शकते.

माहितीचा विस्फोट
- 295 एक्‍झाबाईट माहिती डिजिटल स्वरूपात
- संगणन क्षमता दरवर्षी वाढते 58 टक्‍क्‍यांनी
- आपल्याकडील माहिती पुस्तक रूपात साठविल्यास अमेरिका अथवा चीनवर त्याचे तीन थर होऊ शकतील.


मानवी जीवाश्‍म 32 लाख वर्षांपूर्वीचे
इथिओपियातील हादार येथे मानवाच्या पायाच्या हाडाचे जीवाश्‍म मिळाले आहेत. त्यावरून 32 लाख वर्षांपूर्वी मानवाचे पूर्वज दोन पायांवर चालत असल्याची माहिती पुढे आली आहे.

"ऑस्ट्रालोपिथकस अफारेन्सिस' मानव त्याकाळात अस्तित्वात होता. त्याच्या पावलाचे एक हाड सापडले आहे. त्याचा तळपाय सध्याच्या मानवाप्रमाणेच थोडा वक्राकार असलेला आहे. "ऑस्ट्रालोपिथकस अफारेन्सिस' हे सध्याच्या मानवाप्रमाणे चालू शकत होते, का नाही याबाबत गेल्या काही वर्षांपासून तज्ज्ञांत वाद आहेत; मात्र आता नव्या संशोधनामुळे या वादावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.

हादार हा भाग "फर्स्ट फॅमिली साईट" म्हणून ओळखला जातो. या भागात "ऑस्ट्रालोपिथकस अफारेन्सिस' प्रकारच्या मानवाचे आतापर्यंत 250हून अधिक नमुने मिळाले आहेत. मिसौरी विद्यापीठातील कारोल वॉर्ड आणि अरिझोना विद्यापीठातील विल्यम किंबेल आणि डोनाल्ड जॉन्सन यांनी हे संशोधन केले आहे. हादार येथे उत्खननातून मानवी शरीरातील आणखी काही हाडे मिळाली आहेत. 32 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेला हा मानव कसा उत्क्रांत झाला, याची माहिती या अवशेषांपासून मिळू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे. "सायन्स' या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मानवाच्या तळपायाला जसा वक्राकार असतो. तशा प्रकाराचा वक्राकार "एप' माकडांना नसतो. मात्र या माकडांचे पाय अधिक लवचिक असतात. झाडांवर चढण्यासाठी या लवचिक पायांचा उपयोग एप करतात. "ऑस्ट्रालोपिथकस अफारेन्सिस' मानवाचे पाय मात्र एप प्रमाणे नसल्याचे दिसून आले आहे. "लुसी' नावाने संबोधला जाणारा मानव आफ्रिकेत 30 ते 38 लाख वर्षांपूर्वी म्हणजे "ऑस्ट्रालोपिथकस अफारेन्सिस' मानवाच्या पूर्वी अस्तित्वात होता.
हादार येथे 1973पासून म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून उत्खननाचा प्रकल्प सुरू आहे.30 ते 34 लाख वर्षांपूर्वीचे 370हून अधिक जीवाश्‍मे आतापर्यंत मिळाली आहेत. मानवनिर्मित सर्वांत जुनी हत्यारेही येथे मिळाली आहेत.

"बेलो मॉंटे' प्रकल्प रुळावर
निसर्गसंपन्न अशा ब्राझीलमध्ये लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या धरणाचे काम सुरू होईल. ब्राझील सरकारने बेलो मॉंटे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर व गेल्या वर्षभराच्या स्थानिक नागरिकांच्या आंदोलनानंतरही झिंगू नदीवरील या प्रकल्पाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता 238 हेक्‍टर क्षेत्रफळावरील जंगल तोडण्याचे काम सुरू करण्यात येईल.

ब्राझीलच्या पर्यावरण मंत्रालयाने सुरवातीला या प्रकल्पाला मंजुरी दिली नव्हती. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पर्यावरण मंत्रालयाचे प्रमुख अबेलार्डो बायमा यांनी अखेर राजीनामा दिला. त्यानंतर या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. प्रकल्पाच्या मंजुरीसाठी त्यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव असल्यानेच त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. पारा या राज्यात होणाऱ्या या प्रकल्पाला आधीही विरोध झाला होता. 1990मध्ये जगभरातील विरोधामुळे प्रकल्पाचा प्रस्ताव सोडून द्यावा लागला होता.
चीनमधील थ्री जॉर्जेस आणि पॅराग्वेमधील इटैपू या धरणांनंतरचे हे सर्वांत मोठे धरण ठरेल.

धरण व आक्षेप
- धरणाची लांबी सहा किलोमीटर
- 500 चौरस किलोमीटर जमीन पाण्याखाली जाणार
- 11 हजार मेगावॉट ऊर्जानिर्मिती होणार
- प्रस्तावित खर्च 17 अब्ज अमेरिकी डॉलर
- यासाठी जंगले नष्ट झाल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचा आक्षेप
- या भागात राहणाऱ्या आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न
- किमान 50 हजार लोक उघड्यावर येणार


- साप्ताहिक सकाळ
सुरेंद्र पाटसकर
Saturday, February 19, 2011 AT 06:00 AM (IST)
Tags: विज्ञानवार्ता
 

साठवण माहितीची...

आत्ताच्या काळात हवेनंतर जगभर सर्व जागा व्यापून राहिलेली एखादी गोष्ट कोणती असेल तर ती आहे माहिती. माहितीचा विस्फोट तर सर्वानाच आता अंगवळणी पडलाय. कारण ही अशी गोष्ट आहे की जिच्यावाचून आपल्याला गत्यंतर नसतं आणि ती जवळ ठेवणं आवश्यकही असतं. त्यामुळे आपल्याला हवी असणारी माहिती विविध स्वरूपात साठवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाने कितीतरी पर्याय दिले आहेत.
USBआधुनिक तंत्रविज्ञानाने आपलं जगणं, दैनंदिन नित्यनियमाच्या गोष्टी खूपच सुकर करून टाकल्या आहेत. आज परदेशात असलेल्या तरुणाला आपल्या आई-वडिलांना भारतात निमिषार्धात पैसे पाठवता येतात तर उच्च तंत्रज्ञान वापरून एखाद्या घरातली गृहिणी ढिगभर कपडे फार कष्ट न घेता धुऊ शकते. अशा प्रकारे गोष्टी सोप्या तर झाल्याच आहेत शिवाय आपल्यावरली जबाबदारीही तेवढीच वाढली आहे. जेवढं कौशल्याने आपण एखादं तंत्रज्ञान आत्मसात करतो आहोत, त्याचा वापर करतो आहोत तेवढाच त्याचा सांभाळ करण्याचीही जबाबदारीही आपली वाढते आहे.
यामुळे कित्येक समस्याही निर्माण होत आहेत. संगणकाच्या वापराला काही दशकांपूर्वी सुरुवात झाली पण बिघडलेल्या संगणकांपासून इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे ई-कचरा निर्माण झाला. हा ई-कचरा वाढवण्याचं तसंच कमी करण्याचं काम केलं ते माहिती तंत्रज्ञानाने. माहिती तंत्रज्ञानामुळे अफाट शोध लागले आणि त्याचबरोबर माहितीचा साठाही वाढत गेला. अक्षरश: चुटकीसरशी लोकांना हवी ती माहिती बसल्या जागी उपलब्ध होऊ लागली.
संगणक व इंटरनेटच्या वापरामुळे माहितीचा ओघ दिवसेंदिवस वाढत गेला. त्यात मोबाईल, टॅब्लेट अशा काही उपकरणांनी भर टाकली. तंत्रज्ञानाचा परिस स्पर्श लाभलेल्या आपल्या जगण्यात एक शाप निर्माण झाला तो म्हणजे ही दिवसरात्र मिळणाऱ्या माहितीची साठवणूक कशी करायची हा प्रश्न समोर उभा राहिला. कारण संगणक किंवा मोबाईल अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये माहिती साठवण्याची एक सीमित क्षमता असते.
ती खूप जास्त वाढवली जाऊ शकत नाही. परंतु माहितीची गरज आणि तिचा वापर, तिचा ओघ हा काही थांबण्यातला नाही. कारण आपणच कित्येकदा अनेक स्वरूपात माहिती निर्माण करत असतो. बाहेरच्या जगात माहिती म्हणजे इन्फम्रेशन तशीच आपल्या वैयक्तिक जगातली माहिती म्हणजे डेटाबेस.
इंटरनेटवरून मिळणा-या माहितीसोबतच आपण स्वत: खूप सारी माहिती, डेटाबेस रोजच्या रोज निर्माण करत असतो. वैयक्तिक स्तरावर याचं प्रमाण तुलनेनं कमी असलं तरी व्यावसायिक स्तरावर कोटय़वधी बाईट्स जागा व्यापणारी माहिती दर दिवशी निर्माण होत असते. एखादी विमान कंपनी व विमानतळाचं उदाहरण घेतलं तरी हे आपण समजू शकतो, रोज हजारो प्रवासी एखाद्या मोठय़ा शहरातील प्रमुख विमानतळावरून प्रवास करत असतात. तेव्हा या सर्व प्रवाशांची व विमानसेवेशी निगडित अशी कितीतरी माहिती निर्माण होत असते.
वैयक्तिक स्तरावर विचार केला तर आपले फोटोज, ईमेल्स, आरेखनं, संगीत, लिखाण, ध्वनिमुद्रण अशा असंख्य प्रकारचा डेटाबेस आपल्या गरजेचा असतो. तसाच तो व्यावसायिक स्तरावरही खूप असतो व महत्त्वाचाही असतो. ही सर्व माहिती साठवणं अत्यंत आवश्यक असतं. पण उपकरणांच्या मर्यादित क्षमतेमुळे ही सर्व माहिती कुठे साठवायची हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा वर म्हटल्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केलेला प्रश्न याच तंत्रज्ञानाने सोपाही केला.
अनेक उपकरणांच्या माध्यमातून आपल्यासमोर माहिती साठवण्याचे विविध पर्याय आपल्याला मिळाले. मात्र त्यातही आपल्याला सुरक्षित अशा पर्यायांचा शोध नेहमीच असतो, ज्यातून माहिती चोरीला जाऊ शकणार नाही, वापरली जाऊ शकणार नाही, पुसली जाऊ शकणार नाही अशा विविध प्रकारे सुरक्षित असलेलं माहिती साठवणारं उपकरणं आपल्याला हवं असतं. शिवाय अनेकदा आपल्याला मूळ स्थानी माहिती साठवून तिचा बॅकअप घेण्याची देखील गरज भासते. अशा वेळी अत्यंत सुरक्षित तसंच वापरण्यासाठी सोप्या असणा-या उपकरणांचा विचार केला जातो. यात गेल्या काही वर्षापासून अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध झाले आहेत.
फ्लॅश मेमरी थंब ड्राईव्ह-
सतत फिरत्या व्यवसायात असणाऱ्यांसाठी हे ड्राईव्हज् म्हणजे माहिती साठय़ाचं उपकरण खूप उपयोगी असते. यालाच यूएसबी किंवा पेन ड्राईव्ह असंही म्हणतात. तोशिबा कंपनीने १९८४ साली इलेक्ट्रॉनिकली इरेजेबल प्रोग्रॅमेबल रिड ओन्ली मेमरी प्रकारातला ड्राईव्ह प्रथम बाजारात आणला. त्यानंतर आजतागायत यूएसबी ड्राईव्हची असंख्य रूपं आपल्याला दिसत आहेत. ज्यात एचडी व्हर्जनही मिळतं. एसएसडी कार्ड, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, मेमरी स्टिक, एमपीथ्री असे विविध प्रकारचे स्टोअरेज यात मिळतात. माहिती साठवणं हेच याचं काम असतं. या सर्व प्रकारांमध्ये दोन ते दहा र्वष माहिती व्यवस्थित राहू शकते.
सीडी व डीव्हीडी
पूर्वीच्या काळात सीडीचं काम फ्लॉपी करत असे, आता सीडीच्या जोडीला डीव्हीडी देखील आली आहे. यात देखील तुमची माहिती साठवता येते, विशेषत: चित्रपट, गाणी, ग्राफिक्ससाठी हे फायदेशीर असतात. मात्र याच्या मर्यादित क्षमतेमुळे याच्यावर बंधन येतं. सीडीआरमध्ये ७०० एमबी डेटा राहू शकतो तर डीव्हीडीमध्ये ४.७ जीबीपर्यंत डेटा साठवता येतो. त्यामुळे तुमची माहिती याहून कमी असेल तर तुम्ही सीडी व डीव्हीडीचा वापर करू शकता. यातही रिड ओन्ली, राईट ओन्ली, रिड अँड राईट, ऑप्टिकल, ब्ल्यू रे असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.
एक्स्टर्नल हार्ड ड्राईव्ह-
हा संगणकाला बाहेरून जोडता येणारा ड्राईव्ह असतो. ज्यात पेन ड्राईव्हपेक्षा जास्त प्रमाणात माहिती साठवता येणं शक्य असतं. शिवाय यूएसबीप्रमाणेच हा ड्राईव्ह देखील पोर्टेबल असतो, जो कुठेही घेऊन जाता येतो. मात्र यूएसबीपेक्षा याची किंमत जास्त असते. तेवढीच माहिती सुरक्षित राहण्याची खात्रीही जास्त असते. हे ड्राईव्ह दोन ते आठ र्वष टिकतात.
एनएएस -
नेटवर्क अटॅच्ड स्टोअरेज ड्राईव्ह म्हणजे नॅस, हे ईएचडीचं अत्याधुनिक स्वरूप आहे. तीन-चार ईएचडी घेण्यापेक्षा एक एनएएस घेणं किफायतशीर पडतं. हे वायफायवर देखील चालतं. याला स्वत:ची ओएस, प्रोसेसर, मेमरी असते, जे आपण आपल्या संगणकाला जोडू शकतो. ज्यांना एक्स्टर्नल हार्ड ड्राईव्हपेक्षा जास्त जागा साठवण्यासाठी हवी असेल, त्यांनी एनएएसचा वापर करावा. व्यावसायिक स्तरावर याचा वापर अधिक योग्य ठरतो.
ऑनलाईन अर्काईव्ह -
याचा बॅकअप स्पीड कधीकधी मंद असू शकतो, मात्र ऑनलाईन स्टोअरेज हा देखील एक उत्तम पर्याय आहे. आज गुगल, याहू व अनेक कंपन्यांनी ऑनलाईन स्टोअरेजचे कितीतरी मार्ग ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. यात तुम्हाला कोणतंही उपकरण खरेदी करावं लागत नाही. फक्त इंटरनेटची सुविधा असली की तुमच्या संगणक, टॅब्लेट किंवा मोबाईलवर ही माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी साठवणुकीच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर ग्राहकांकडून शुल्क आकारले जाते. तुमचा इंटरनेट स्पीड जेवढा जलद असेल तेवढय़ा अधिक जलद ही माहिती तुम्हाला उपलब्ध होते.
क्लाऊड :
हा देखील माहिती साठवण्यासाठी निर्माण झालेला एक नवा आभासी साठय़ाचा पर्याय आहे. पाश्चात्य जगात याचा वापर अधिक होतो आहे. ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राईव्ह, मायक्रोसॉफ्ट, आयक्लाऊड, अशा अनेक कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना क्लाऊड म्हणजे सोप्या भाषेत माहितीचे ढगच निर्माण करण्याची सुविधा दिलेली आहे. ज्यात तुमची माहिती सुरक्षित राहते. यासाठी देखील शुल्क आकारणी असते. शिवाय इंटरनेट जिथे उपलब्ध असेल तिथेच याचा वापर होऊ शकतो.
आपण वरील माहितीच्या साठवणुकीशी संबंधित जे पर्याय पाहिले ते सर्व तांत्रिक पर्याय होते. मोठय़ा कंपन्यांचे क्लाऊड सोडल्यास इतर कोणत्याही पर्यायाची कार्यक्षमता व सुरक्षितता याची जोखीम आपली आपल्यालाच उचलावी लागते.
शिवाय त्याचं व्यवस्थापनही आपल्यालाच पाहावं लागतं. शिवाय व्हायरस शिरून माहिती नष्ट होणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार आज माहितीचा साठा करण्यासाठी विविध मार्ग बाजारात उपलब्ध आहेत. यात नवनवीन भर पडते आहे. साठवणूक करण्याच्या क्षमता देखील वाढत आहेत. ज्यामुळे माहितीची साठवणूक अधिकाधिक सोपी होत आहे.



दै. प्रहार -  September 15, 2015 01:40:32 AM | Author विशाखा शिर्के

माझ्याबद्दल