मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

लोक भूत समजत होते, मी भिकाऱ्यासारखा दिसत होतो, लोक पुरुषत्वावर संशय घेत होते...


लोक भूत समजत होते, मी भिकाऱ्यासारखा दिसत होतो, लोक पुरुषत्वावर संशय घेत होते


दिव्य मराठी |

तामिळनाडूचे मुरुगनाथम सोशल आंत्रप्रेन्योर आहेत. मासिक पाळीच्या समस्यांबद्दल जागरूकता करतात. स्वस्त सॅनिटरी नॅपकिन बनवणार









पत्नीनेही साथ सोडल्याची वेळ मुरुगनाथम यांच्या आयुष्यात आली होती.





तामिळनाडूचे मुरुगनाथम सोशल आंत्रप्रेन्योर आहेत. मासिक पाळीच्या समस्यांबद्दल जागरूकता करतात. स्वस्त सॅनिटरी नॅपकिन बनवणारे यंत्र बनवले आहे. पद्मश्रीने सन्मानित मुरुगनाथम यांनी जे. सी. शिबू यांच्याशी चर्चा केली आणि हादरवून सोडणाऱ्या गोष्टी सांगितल्या.






मला भुताने झपाटल्याचा ग्रामस्थांचा होता समज, ते काळ्या जादूच्या तयारीत होते

माझे लग्न १९९८ मध्ये झाले होते. पत्नीला मासिक पाळीत अत्यंत अस्वच्छ कपड्यांचा वापर करताना पाहिल्याने धक्का बसला. पत्नी आणि माझी बहीण त्या काळात त्यासाठी कचऱ्यातून वृत्तपत्रे आणि घाण कपडे शोधत असत. त्या याचा उल्लेख कोणाकडेही करत नसत. त्याच वेळी स्वस्त सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा विचार माझ्या मनात आला. संशोधनादरम्यान मी वापरलेले नॅपकिनही जमा करत होतो. मी वेडा झालो आहे, भूत आहे, असा लोकांचा समज झाला होता. मी तर प्रयोग करत होते. कोणी बोलत नसत, भेटत नसत. मला भुताने झपाटले आहे आणि काळ्या जादूने ते ठीक करता येईल, असे ग्रामस्थांना वाटत होते. त्यांनी तसे काही करण्याआधीच मी गाव सोडले.



पॅड वापरल्यास तुम्हाला वेडा कुत्रा चावेल अशी भीती लोक मुलींना दाखवत असत

ही २००४-०५ ची गोष्ट. जेव्हा मी या विषयावर काम करत होतो तेव्हा उत्तर प्रदेशात गेलो होतो. तेथे एका गावात अविवाहित मुलीने पॅड वापरले होते. ती रस्त्याने जात होती तेव्हा तिला सांगण्यात आले की, पॅडचा वापर केल्यास तुला वेडा कुत्रा चावेल. एवढेच नाही, तर वापरलेले सॅनिटरी पॅड कुत्र्याने खाल्ले तर तुझ्याशी कोणी लग्न करणार नाही, अशी भीती दाखवण्यात आली. मध्य प्रदेशात एक घटना समोर आली. तू हे वापरणे सोडले नाही तर तुझ्या सासूचा मृत्यू होईल, अशी भीती एका सुनेला दाखवण्यात आली. गावातील जवळपास सर्वच सुनांना असे सांगण्यात आले होते.



अनेक दिवस उपाशी राहावे लागत होते, यंत्र बनवण्यास लागली साडेआठ वर्षे

पुरुषही मला वेडा समजत असत. मी पुरुष आहे की महिला, असा संशय तेव्हा अनेक पुरुषही घेत असत. मी पॅडची चाचणी घेण्यासाठी कोइम्बतूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींची मदत घेतली. पण मला त्यांच्याकडून योग्य फीडबॅक मिळत नव्हता. मी या बहाण्याने मुलींच्या जवळ जाऊ इच्छितो, असे पत्नीलाही वाटत होते. गोष्ट एवढी वाढली की, एक दिवस तिने मला सोडूनही दिले. नोकरी सुरूच होती, प्रयोगही सुरू होते. रात्रपाळीत काम केले, दिवसा प्रयोग सुरू होते. अनेकदा अनेक रात्री झोपण्यासही वेळ मिळाला नाही. जेवायलाही मिळत नव्हते. मी भिकाऱ्यासारखा दिसत होतो. लोक खिल्ली उडवत होते. यंत्र बनवण्यासाठी मला साडेआठ वर्षे लागली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल