सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

समभागांची खरेदी; श्रीमंतीची गुरुकिल्ली...

समभागांची खरेदी; श्रीमंतीची गुरुकिल्ली

इक्विटीमध्ये (शेअर बाजारातील समभाग) गुंतवणूक करण्याबाबत परस्परविरोधी मतं दिसून येतात. काहींना ही गुंतवणूक म्हणजे निव्वळ जुगार वाटतो. तर, इक्विटी म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे, असा काहींचा समज असतो. मात्र हे दोन्ही समज टोकाचे आहेत.

समभागांची खरेदी; श्रीमंतीची गुरुकिल्ली
इक्विटीमध्ये (शेअर बाजारातील समभाग) गुंतवणूक करण्याबाबत परस्परविरोधी मतं दिसून येतात. काहींना ही गुंतवणूक म्हणजे निव्वळ जुगार वाटतो. तर, इक्विटी म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे, असा काहींचा समज असतो. मात्र हे दोन्ही समज टोकाचे आहेत. इक्विटी गुंतवणुकीची माहिती घेतल्याशिवाय त्यात पैसे ठेवणे चुकीचे ठरू शकते. आपल्याला यातील ज्ञान नसल्यास अर्थनियोजकांच्या साह्याने यात उडी मारणे योग्य ठरते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना खालील गोष्टींचा विचार करणे अत्यावश्यक असते.

एखाद्या इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे संबंधित उद्योग-व्यवसायाच्या भवितव्यात पैसे ठेवणे होय. शेअर बाजारातील गुंतवणुकीत कोणी कितीही तज्ज्ञ असला तरी कोणती कंपनी भविष्यात चांगली वा वाईट कामगिरी करेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे अशी गुंतवणूक करताना जोखमीचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक असते.

अतिशय क्षुल्लक किंमतीत घेतलेल्या स्टॉकने मला कालांतराने कोट्यधीश केले वगैरे... अशा गोष्टी तुमच्या कानावर पडत असतील. यामध्ये तथ्य असेलही. मात्र एखाद्या स्टॉकच्या वाढलेल्या मूल्यावर भाळण्यापूर्वी त्या स्टॉकचा मागील अनेक वर्षांतील प्रवासही पहाणे गरजेचे ठरते. त्या स्टॉकनेही अनेक चढउतार पाहिलेले असू शकतात. यात अनेकांना फटकाही बसलेला असतो. त्यामुळे काहीच झळ न बसता भरमसाट परतावा मिळत नाही हे लक्षात ठेवा.

कोणताही स्टॉक निवडणे, स्टॉकचे विश्लेषण करणे ही सोपी बाब नाही. सूचिबद्ध कंपन्यांपैकी कोणता स्टॉक विकत घ्यावा हा कठीण निर्णय असतो. एखादा स्टॉक विशिष्ट कालावधीत किती वधारेल हे कोणीही सांगू शकत नाही. आपण अमूक स्टॉक का विकत घेतला हे अनेक गुंतवणूकदार लिहून ठेवतात. ही फार चांगली सवय आहे. यामुळे आपली अपेक्षा व त्या स्टॉकची कामगिरी वेळोवेळी पडताळून पहाता येते. समभाग खरेदी करणे हा शिस्तीचाही भाग आहे.

सर्वसामान्य गुंतवणूकदार समभागांची तांत्रिक माहिती, त्यांचा आलेख, प्रवास याबाबत अनभिज्ञ असतो. हा गुंतवणूकदार समभागांच्या प्रगतीचे विश्लेषण करू शकत नाही. त्यासाठी त्याला विश्लेषक, सल्लागार वा ब्रोकिंग संस्थांवर अवलंबून रहावे लागते. मात्र केवळ या संस्थांवर अवलंबून राहाण्यापेक्षा शेअर बाजारात दीर्घकाळ सक्रिय राहू इच्छिणाऱ्यांनी आपले ज्ञानही वाढवणे इष्ट ठरते.

एखादा समभाग भविष्यात कशी कामगिरी नोंदवेल याचा अंदाज न घेता केवळ वर्तमान स्थितीच्या आधारे त्यात पैसे गुंतवणे घातक ठरू शकते. त्या समभागाने कालांतराने चांगली कामगिरी नोंदवली नाही, उलटपक्षी त्याच्या मूल्यात सतत घसरणच होऊ लागली तर तुम्ही तुमची चूक मान्य करायला हवी व वाढीव तोटा टाळण्यासाठी तो समभाग विकून टाकला पाहिजे.

आधी म्हटल्याप्रमाणे आपण ज्या कंपनीत पैसे गुंतवतो त्यातील प्रत्येक कंपनीची भरभराट होईलच असे नाही. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स किंवा अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांच्यासारख्यांची उदाहरणे अपवादात्मक असतात. आपली गुंतवणूक ही केवळ एकाच स्टॉकपुरती मर्यादित असू नये. विविध सेक्टरच्या आघाडीच्या व अनेक वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचे समभाग विकत घेणे व्यवहार्य ठरते.

इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवलेच असेल तर इक्विटी म्युच्युअल फंडांचा आधार घेणे कमी जोखमीचे ठरते. यातील अनेक फंड असे आहेत की बाजारातील चढउतारांचा त्यांच्या एनएव्हीवर (नेट असेट व्हॅल्यू) टोकाचा परिणाम होत नाही. जगभरातील धनाढ्य व्यक्तींवर नजर टाकली तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर समभाग असल्याचे दिसून येईल. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीचे धोरण राखल्यास इक्विटीच्या माध्यमातून संपत्तीनिर्मिती करणे अशक्य नाही.




(स्रोत - टाइम्स न्यूज नेटवर्क)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल