शेअर्स खरेदी करण्यापूर्वी समजून घ्या समभागांचे विभाजन आणि एकत्रीकरण
शेअरबाजारात नोंदणी केलेल्या प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची संख्या ठरलेली असते त्याचा उल्लेख कंपनीच्या मसुद्यात (Articles of incorporation) केलेला असतो.
ही संख्या त्या कंपनीच्या समभागांचे दर्शनीमूल्य (Face value) किती आहे यावर अवलंबून असते. समजा एखाद्या कंपनीचे भाग भांडवल १० कोटी रुपये असेल आणि ते रु. १०/- च्या एका भागात असेल, तर त्याच्या समभागांची संख्या १ कोटी होईल.
- कंपनीच्या मसुद्यात कंपनीचे भाग भांडवल १० कोटी असून ते १० रुपयाचा १ समभाग याप्रमाणे १ कोटी समभागात विभागले आहे असा उल्लेख असेल. याप्रमाणे ते र.५/- मध्ये असल्यास समभागांची संख्या २ कोटी होईल तर रु.२/- असल्यास हीच संख्या ५ कोटी होईल.
- आर्थिक उदारीकरणापूर्वी बहुतेक कंपन्यांचे दर्शनी मूल्य हे रु.१० किंवा १०० होते. नवीन मार्गदर्शक तत्वाप्रमाणे ही अट काढून टाकली असून फक्त ते पूर्ण अंकात असावे असे म्हटले आहे. त्यामुळेच आता रु. १,२, ५, १० असे वेगळे दर्शनीमूल्य असलेले शेअर्स बाजारात आहेत.
- हे शेअर्स यापूर्वी असलेल्या शेअर्सचे विभाजन करून निर्माण झाले आहेत. तर नव्यानेच बाजारात आलेल्या कंपन्या त्यांना अपेक्षित असलेल्या दर्शनी मूल्याचे समभाग बाजारात आणत आहेत.
- अस्तित्वात असलेल्या शेअर्सचे दर्शनीमूल्य कंपनीचे संचालक मंडळ ठराव करून कमी / जास्त करू शकतात. यामुळे शेअर्सच्या संख्येत वाढ / घट होऊ शकते. यासाठी शेअर्सचे मूल्य विभागणी (Splitting) करून कमी / एकत्रीकरण (Consolidation) करून जास्त करावे लागेल.
- शेअरच्या बाजारभावातही त्याप्रमाणे प्रमाणशीर पद्धतीने घट / वाढ होईल. दर्शनीमूल्य कमी होऊन शेअरच्या संख्येत वाढ झाली की त्याप्रमाणात बाजारभाव कमी होईल, तर दर्शनीमूल्य वाढून शेअर्सच्या संख्येत घट झाल्यास त्याचे बाजारभाव त्या प्रमाणात वाढेल.
- शेअर्सचे विभाजन किंवा एकत्रिकरणाचा कंपनीच्या बाजारमूल्यावर (Market value) सहसा कोणताही परिणाम होत नाही. तरीही अनेक कंपन्या शेअर विभाजन करण्याचा निर्णय घेतात कारण अशा शेअर्सच्या बाजारभावात खूप मोठी वाढ झालेली असते किंवा त्याचे भाव तशाच प्रकारच्या दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत सर्वोच्च पातळीवर असतात. त्यामुळेच अनेक लोक इच्छा असूनही ते शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय झटकन घेऊ शकत नाहीत.
- विभाजनामुळे प्रमाणशीर पद्धतीने भाव खाली आल्यास अनेकांना हे शेअर्स आपल्या आवाक्यात आले असे वाटतात. शेअर्सच्या संख्येत वाढ झाल्याने उलाढाल योग्य शेअर्स अधिक प्रमाणात उपलब्ध होतात मागणी वाढल्याने लवकरच त्यात वाढ होऊ शकते.
- एचडीएफसी (HDFC) बँकेच्या संचालक मंडळाने २२ मे २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रु. २/- दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या शेअर्सचे रु. १/- च्या दोन समभागांमध्ये विभाजन करायचे ठरवले आहे. अशाचप्रकारे रु. २/- एवढे दर्शनी मूल्य असणाऱ्या बँकांची नावे, या १८ जून २०१९ चा राष्ट्रीय शेअरबाजारातील बंद भाव, गेल्या ५२ आठवड्यातील सर्वात कमी व सर्वाधिक भाव खालीलप्रमाणे-
अ.क्र. | बँकेचे नाव | बंद भाव | ५२ आठवड्यातील किमान आणि कमाल भाव |
१ | आयसीआयसीआय बँक | ४२२ | (३७३ – ४५६) |
२ | बँक ऑफ बडोदा | ११६ | (१०५ – १२८) |
३ | ॲक्सिस बँक | ७७६ | (७००-८५५) |
४ | फेडरल बँक | १०५ | (०९५ – ११७) |
५. | येस बँक (Yes bank) | १०९ | (१०७ -४०४) |
६. | एचडीएफसी बँक | २४१७ | (१८९५ – २४७०) |
- इतर बँकांच्या तुलनेत, एचडीएफसी बँकेचा चालू बाजारभाव आणि ५२ आठवड्यातील किमान- कमाल भाव यात असलेली तफावत लक्षात येईल. ७ मे २०१९ रोजी बँकेने, २२ मे २०१९ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत रु.२/- च्या एका शेअर्सची विभागणी,रु.१/- च्या दोन भागात करण्याविषयी विचारविनिमय केला जाईल असे जाहीर केले.
- त्याप्रमाणे संचालक मंडळाने या दिवशी झालेल्या बैठकीत विभागणी प्रस्ताव मान्य केला आहे. त्याआधी बँकेचा आजवरचा सर्वोच्च भाव रु. २३६७/- होता. या विभागणीस रीतसर मान्यता मिळाल्यावर तांत्रिकदृष्ट्या चालू बाजारभावाच्या निम्मा (म्हणजेच रु. १२०९/-) एक रुपयात विभागणी केल्यानंतराचा भाव राहू शकतो. परंतू तो जास्त राहील या अपेक्षेने शेअरचा भाव वाढत आहे. यामुळे या शेअर्सचा बाजारभाव रु. २४७०/- ची विक्रमी पातळी गाठून खाली आला आहे.
- विभाजनानंतर भाव रु. १२५०/- च्या आसपास राहिला तरी रु. २४७०/- च्या तुलनेत तो अनेकांना ते शेअर खरेदी करायला प्रोत्साहित करू शकेल. व्यवहार होऊ शकणाऱ्या शेअर्सच्या संख्येत वाढ होईल. सातत्याने चांगले त्रैमासिक निकाल देणाऱ्या या बँकेच्या शेअरच्या मागणीत होणाऱ्या वाढीमुळे अल्पकाळात तो रु. १५००/- पर्यंत जाऊ शकतो.
- त्यामुळे आता खरेदी करणाऱ्या धारकाना अल्पकाळात २०% हमखास उतारा मिळण्याची शक्यता आहे. मात्र शेअरचे विभाजन करण्याचा निर्णय घेणाऱ्या सर्वच कंपन्यांच्या बाबतीत तंतोतंत असेच घडेल असे नाही. तर त्या कंपनीचा भाव तश्याच प्रकारच्या इतर कंपन्यांच्या भावाहून खूप अधिक असून कंपनीच्या निकालाची कामगिरी चढतीच असावी लागते आणि सर्वसाधारण बाजारही सुस्थितीत असावा लागतो.
- समभाग एकत्रीकरणाची प्रक्रिया बरोबर याच्या उलट आहे. या कंपन्यांचा बाजारभाव तुलनात्मक दृष्टीने कमी आहे असे संचालक मंडळास वाटत असते. त्यामुळे त्याच्या बाजारभावात वाढ होण्यासाठी त्याचे दर्शनीमूल्य, भागाचे एकत्रीकरण करून पूर्ण केले जाते. यामुळे बाजारातील उलाढालयोग्य शेअर्सची संख्या कमी होऊन, मोठ्या सट्टेबाजीच्या प्रमाणात घट होते.
- शेअर्सचे विभाजन /एकत्रीकरण यामुळे बाजारमूल्यावर काहीही फरक पडत नाही. यासाठी संचालक मंडळाचा ठराव, सर्वसाधारण सभेची मान्यता आणि त्याप्रमाणे घटनेत दुरुस्ती करून घेऊनच यासंबंधीची तारीख निश्चित केली जाते.
- या तारखेस असलेल्या सभासदांच्या शेअरची संख्या वाढते / कमी होते. बाजारात नोंदणी केलेल्या प्रत्येक कंपनीच्या शेअर्सचा एक आंतरराष्ट्रीय ओळख क्रमांक असतो त्यास ISIN असे म्हणतात. आपल्या डिपॉसीटरीकडून येणाऱ्या खाते उताऱ्यावर (Holding statement) तो दिलेला असतो.
- विभाजन किंवा एकत्रीकरण यामुळे निर्माण होणाऱ्या नवीन शेअर्ससाठी तो नव्याने मिळवावा लागतो. जुने शेअर्स खात्यातून वगळून त्याऐवजी नवीन शेअर्स इलेक्ट्रॉनिक रुपात खात्यात जमा केले जातात. ज्याच्याकडे कागदी स्वरूपात शेअर प्रमाणपत्र आहे त्यांचे जुने प्रमाणपत्र रद्द करून नवीन प्रमाणपत्र पाठवण्यात येते आणि ही प्रक्रिया पूर्ण होते.
– उदय पिंगळे
(या लेखामध्ये उल्लेख केलेल्या बँकांची नावे, त्यांच्या शेअर्सचा बंद बाजारभाव आणि मागील ५२ आठवड्यातील कमी अधिक भाव यांचा विषय समजावा यासाठी केवळ संदर्भ म्हणून घेतला असून एचडीएफसी बँकेच्या शेअर्स मध्ये २०% भाववाढ होईल हा केवळ अंदाज व्यक्त केला आहे. यातील कोणत्याही शेअर्सची शिफारस केलेली नाही.)
शेअर्स खरेदीचं सूत्र
गुंतवणूकदारांचे विविध प्रकार आपण यापूर्वी पाहिले आहेत यात गुंतवणूक कालावधीनुसार रोजच्या रोज व्यवहार करणारे ते डे ट्रेडर्स, मध्यम कालावधी साठी गुंतवणूक करणारे त्यांना पोझिशनल ट्रेडर्स, तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्याना लॉन्ग टर्म ट्रेडर्स असे संबोधण्यात येते.
आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूकदार व्यवहार करीत असतात. डे ट्रेडिंग विषयी माहीती आणि त्यावरील श्री. नितीन पोताडे यांनी शोधलेल्या एका पद्धतीची माहीती देणाऱ्या लेखाची माहिती यापूर्वी आपण घेतलेली आहे.
त्यांच्या पोझिशनल ट्रेडर्सना त्याचे व्यवहार अधिक किफायतशीर कसे बनतील, यावर मार्गदर्शन करणारा मूळ इंग्लिशमधील लेख मला पाठवला होता. जो मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणुकदारांना त्यांची गुंतवणूक अधिक फायदेशीर करून देईल.
- या पद्धतीचे महत्वाचे फायदे असे–
- ही गुंतवणूक भावनारहित (Emotionless) होते. त्यामुळे भाव वर खाली गेले तरी आनंदच मिळतो.
- यासाठी बाजाराचा कल (Trend)ओळखण्याची गरज नाही.
- ज्या समभागांचे भाव त्याच्या आधीच्या दिवसाच्या सर्वोच्च भावाहून अधिक (Gap up) किंवा आधीच्या दिवसाच्या किमान भावाहून कमी (Gap Down) दराने उघडतात तेव्हा अधिक फायदा होतो.
- ज्या काळात बाजारभाव मोठया प्रमाणात खालीवर होतात (Volatile market) ही पद्धत अतिशय उपयोगी आहे.
- समभागात केलेली कोणतीही गुंतवणूक अधिक फायदेशीर होण्यासाठी त्याच्या किमतीपेक्षा त्याचे आंतरिक मूल्य ओळखता येणे यासाठी अभ्यास करणे जरुरीचे आहे.
- बाजारातील किमतीत होणाऱ्या फरकाने गडबडून घाबरून चुकीचा निर्णय घेतल्याने अपेक्षित परिणाम मिळत नाही. तेव्हा अवास्तव अपेक्षा न करता विवेक बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे.
- यासाठी योग्य शेअर्स मध्ये निरंतर गुंतवणूक करण्याची (SIP) आणि निरंतर गुंतवणूक मोकळी करण्याचा (SWP) एकत्रित पर्याय सुचवला आहे.
- बहुतेकांचा असा अनुभव आहे की आपण ज्या शेअर मध्ये गुंतवणूक केली त्याचा भाव आपण खरेदी केल्यावर नेमका खाली आला आणि विक्री केल्यावर वाढला. यामुळे नाही म्हटलं तरी आपला निर्णय चुकला तर नसेल ना? अशी शंका येवून निराशा येते. यासाठी स्थिरचित्त राहणे महत्वाचे आहे.
- आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे याची खात्री आणि ठाम विश्वास आपल्याला असेल तरच आपली गुंतवणूक अधिक फायदेशीर होईल. यासाठी-
- आपण कोणते समभाग व त्यात गुंतवणूक किती रकमेची करायची हे प्रथम निश्चित करावे.
- यांतील ५०% रकमेची एकदम गुंतवणूक करावी.
- आधी खरेदी केलेल्या शेअर्सच्या संख्येच्या ५% शेअरची खरेदी करण्याची ऑर्डरच्या शेवटच्या (येथे मूळ खरेदी किमतीच्या) ५% खालील भावाने टाकावी. त्याचबरोबर-
- आधी खरेदी केलेल्या शेअर्सच्या संख्येच्या ५% शेअरची विक्री करण्याची ऑर्डर शेवटच्या (येथे मूळ खरेदी किमतीच्या) ५% अधिक भावाने टाकावी. याप्रमाणे आपली खरेदी आणि विक्री यांची सूचना लिमिट ऑर्डर तसेच आफ्टर मार्केट ऑर्डर या प्रकारांनी देता येईल. त्यासाठी सतत लक्ष ठेवून संगणकावर बाजारभाव पहात बसण्याची आवश्यकता नाही.
- याचा फायदा असा की या शेअर्सचे भाव खाली येत असतील (मंदी) तर जास्त किंमत मोजून घेतलेले सर्व शेअर्स अंगावर पडत नाहीत. शिवाय भावात सातत्याने बऱ्यापैकी फरक पडत असेल तर खरेदी आणि विक्रीतून होणाऱ्या नफ्याने सरासरी किंमत खाली येते. याचा एकच तोटा असा की भाव वर जात असतील (तेजी) तर फायदा कमी होईल. कसं ते उदाहरणासह पाहुयात.
- समजा आपण ‘अबक’ ही कंपनी आपण निवडली असून त्याचा भाव रु. २०० शेअर आणि २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करायची आपली तयारी आहे.तर-
- आपल्या संभाव्य गुंतवणुकीच्या ५०% म्हणजेच रु. १ लाख गुंतवणूक केली की सदर कंपनीचे रु १ लाख ÷ रु. २००= ५०० शेअर येतील.
- यानंतर रोज ५०० शेअर्सच्या ५% म्हणजेच २५ शेअर्स मूळ खरेदी भावाच्या ५% कमी म्हणजे रु. १९० ने खरेदीसाठी तर ५% अधिक म्हणजे रु. २१० ने विक्री करण्यासाठी ठेवायचे आहेत.
- जर खरेदीची ऑर्डर रु. १९० ने पूर्ण झाली तर अजून २५ शेअर्स रु. १८० ने खरेदी करण्यासाठी आणि रु. २०० ने विक्रीसाठी ठेवायचे आहेत (शेवटच्या खरेदीच्या रु. १९० च्या ५% कमी अधिक भावाने).
- जर विक्रीची ऑर्डर रु. २१० ने पूर्ण झाली तर अजून २५ शेअर्स रु. २०० ने खरेदी करण्यासाठी आणि रु. २२० ने विक्री करण्यासाठी ठेवायचे आहेत (शेवटच्या विक्रीच्या रु. २१० च्या ५% कमी अधिक भावाने).
- या प्रकारे ऑर्डर सातत्याने टाकत राहिल्याने आपल्याकडे शेअर्स जमा होत राहून सतत थोडेफार पैसे मिळत राहतील. बाजारामध्ये होणाऱ्या चढ उतार याचा फायदा घेता येईल.
- कितीही संयमित गुंतवणूकदार असेल तरी भाव खाली आला तर तो थोडा निराश होतो. त्याला यापुढे भाव खाली आला ही खरेदीची संधी आहे या दृष्टीने त्याकडे पाहिले जाईल. त्यामुळे एकूण गुंतवणुकीबद्दलचा दृष्टिकोनच बदलून गेल्याने गुंतवणुकीचा आनंद घेता येईल. अशा प्रकारचे धोरण पूर्ण पैशाची गुंतवणूक होईपर्यंत किंवा पूर्ण पैसे मोकळे करून घेण्यासाठीही करता येईल.
- सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्सचे गेल्या ५२ आठवड्यातील सर्वात जास्त आणि सर्वात कमी भाव यावर नजर टाकली असता भावातील फरक किती मोठा आहे ते समजेल.
- आपण जे शेअर्स घेण्याचे ठरवले आहे त्या कंपनीच्या कमी जास्त भावातील मर्यादा आपल्याला नीट समजली, तर थोडेसे तारतम्य वापरून भावातील फरकामुळे आपला फायदाच होईल. त्यातून त्याच कंपनीचे शेअर घेतले तर एकूण शेअर्सची संख्या वाढेल आणि पर्यायाने एकूण नफ्यातही वृद्धी होईल. यासाठी शांत संयमित धोरणाची गरज असून त्यासाठी अशा प्रकारे व्यवहार करण्याची जास्त गरज आहे.
(याबद्दल अधिक माहिती नितिन पोताडे यांच्या यू ट्यूब चॅनेल वर मिळू शकेल. तसेच खालील लिंकमधील मोबाईल नंबरवर त्यांना आपला मेल आयडी कळवून या पध्दतीवरील पीपीटी फाईल मागवावी.)
नितीन पोताडे यांच्याशी संपर्क साधण्याबाबतची माहिती खालील लिंकवरील लेखाच्या शेवटी दिलेली आहे –
(यात उल्लेख असलेले श्री नितीन पोताडे हे माझे मित्र असून त्यांची ही पद्धत मध्यम व दीर्घकालीन गुंतवणूकदारांना उपयुक्त होईल असे वाटल्याने हा लेख लिहिला असून त्यांना दाखवून तो संमत करून घेतला आहे. आमच्यात कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत. ही गुंतवणूक धोकादायक प्रकारात मोडत असल्याने आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून याबाबत आपले धोरण स्वतःच्या जबाबदारीवर ठरवावे.)
– उदय पिंगळे
भांडवल बाजारातील शेअर, इंडेक्स, एफएनओ, करन्सी, कमोडिटी यांच्या व्यवहारासदर्भात ओपन पोझिशन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग यासारखे शब्द ऐकायला मिळतात. हे म्हणजे नक्की काय आहे? ते जाणून घेऊयात.
- आपल्याला माहीत आहेच की शेअरबाजार, वस्तुबाजार, विदेशी चलनबाजार हे भांडवल बाजाराचे घटक आहेत. या बाजारामध्ये तेथे खरेदी/ विक्री केली जाऊ शकेल अशा सर्वांचे, रोखीचे /हजर (Cash) आणि भावी व्यवहार (Derivetives) केले जातात. यात खरेदीदार विक्रेते या दोघांचा सामावेश होतो. यामध्ये विशिष्ठ भावात केलेल्या खरेदीची नंतर विक्री करता येते किंवा आधी केलेल्या विक्रीची विहित काळात खरेदी करून देता येते.
- जेव्हा बाजारात कार्यरत गुंतवणूकदार व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडे आधी खरेदी केलेली भांडवली मालमत्ता असते तेव्हा त्यांची (खुली स्थिती) ओपन पोझिशन आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून पूर्णपणे नव्याने खरेदी किंवा विक्रीसाठी शेअर्स, वस्तू, निर्देशांक किंवा चलन यांची ऑर्डर टाकली जाते.
- ही ऑर्डर मार्केट ऑर्डर असेल तर लगेच स्वीकारली जाते किंवा लिमिट ऑर्डर असेल तर अपेक्षित भाव आल्यावर पूर्ण होते.
- या सर्वच ऑर्डर्स जोपर्यंत त्याच्या विरुद्ध ऑर्डर केल्या जाऊन जुळून पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या सर्व पोजिशन ओपन आहेत असे म्हणतात. उदा एखाद्या गुंतवणूकदाराकडे L & T या कंपनीचे १०० शेअर्स आहेत. ही व्यक्ती जोपर्यंत ते शेअर्स विकत नाही तोपर्यंत ही पोझिशन ओपनच राहाते. अशाप्रकारे अनेक पोझिशन ओपन राहू शकतात.
- ओपन पोझिशन आहे याचा अर्थ असा की संबंधित गुंतवणूकदाराने भांडवल बाजारात गुंतवणूक करून त्याच्याशी संबंधित असलेला धोका मान्य केला आहे. अल्पकालीन गुंतवणूकदार जसे डे ट्रेडर, पोझिसशनल ट्रेडर आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार यांच्या ओपन पोझिशन या सेकंदाच्या काही भागाहून कमी ते कित्येक वर्षे एवढ्या कालावधीपैकी कितीही कमी अधिक काळ असू शकतात.
- या ओपन पोझिशन त्याच्या विरुद्ध ट्रेड केला की क्लोज होतात यालाच (बंद स्थिती) क्लोज पोझिशन असे म्हणतात. खरेदी केलेली मालमत्ता विकून अथवा आधी विकलेली मालमत्ता खरेदी करून देऊन ओपन पोझिशन क्लोज होऊ शकते. क्लोज पोझिशन ही अनेक कारणासाठी केली जाऊ शकते. त्यातील सर्वात महत्वाचे कारणे खालीप्रमाणे-
- अपेक्षित उतारा मिळतो आहे असे वाटल्याने.
- काही अडचणींवर मात करण्यासाठी असलेली पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी.
- जास्त पैसे नसल्याने डे ट्रेडिंगमध्ये नाईलाजाने कापण्यासाठी.
- संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी स्टॉप लॉसचा वापर केल्याने.
- बाजाराच्या नियमानुसार मालमत्ता अगर पैसे वेळेत न देऊ शकल्याने रिव्हर्स झालेले सौदे.
- शेअरबाजारात व्यवहार करण्यासाठी ऑर्डर देण्याच्या विविध पद्धतीमध्ये आपणास कव्हर ऑर्डर व ब्रकेट ऑर्डर यांची माहिती यापूर्वीच मिळवली आहे. कव्हर ऑर्डर टाकून आपला संभाव्य तोटा मर्यादित ठेवू शकतो, तर ब्रकेट ऑर्डरमुळे मर्यादित तोटा आणि अपेक्षित फायदा मिळवता येतो. या पद्धतीने एका विशिष्ठ भावास ऑर्डर आपोआप टाकली जाईल अशी व्यवस्था आहे.
- त्याप्रमाणे काही मोठे गुंतवणूकदार संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या ऑर्डर विशिष्ट संगणक प्रणालीच्या साहाय्याने करतात. कोणत्या भावास कोणते शेअर्स घ्यायचे किंवा कोणत्या भावास विक्री करायची याचे स्वतंत्र तंत्र विकसित करून, त्याप्रमाणे खरेदी विक्रीची ऑर्डर टाकली जाईल याची व्यवस्था करतात. यास अल्गोरिदमीक ट्रेडिंग असे म्हणतात.
- यामुळे फंड व्यवस्थापन अचूक आणि सुलभ होते. ही पद्धत विकसित करण्यासाठी खुला भाव, बंद भाव, विशिष्ट वेळेतील सरासरी भाव, बदलता सरासरी भाव, उलाढाल, मागील सर्वोत्तम भाव, किमान भाव, मागील ५२ आठवड्यातील भाव या सर्वांचा वापर करण्यात येतो.
- ही पूर्ण संगणकीय प्रणाली असल्याने तिची योग्य ती सुरक्षा राखली न गेल्यास त्याचे हॅकिंग होऊन मोठा घोटाळाही होण्याचा धोका असल्याने, विद्यमान पद्धत निर्दोष होऊन गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये, यासाठी भांडवल बाजार नियामक उपाय योजत आहे.
– उदय पिंगळे
- शेअर्सच्या भावासंदर्भात प्रामुख्याने साधी बदलती सरासरी किंमत म्हणजेच सिंपल मुव्हिंग एव्हरेज (SMA) हा शब्दप्रयोग वारंवार बोलण्यात येतो. शेअर्सचा भाव किंवा बाजाराची दिशा दाखवणारी ही सोपी किंमत असून याद्वारे ट्रेडर्स बाजार किंवा विशिष्ठ शेअरच्या भावाचा अंदाज बांधू शकतात.
- संख्याची सरासरी म्हणजे काय? हे आपल्याला माहीत आहेच. दिलेल्या पाच विविध संख्याची सरासरी आपण त्या पाच संख्याची बेरीज करून येणाऱ्या संख्येस पाचने भागून काढतो. याच प्रमाणे शेअरचा किंवा इंडेक्सचा रोजचा खुलता भाव, बंद भाव, विशिष्ठ वेळेचा भाव किंवा दिवसभराच्या भावाची सरासरी अशा वेगवेगळ्या किंमती विचारात घेऊन आपण वेगवेगळ्या सरासरी काढू शकतो.
- अशी सरासरी काढताना पुढील दिवसाचा भाव विचारत घेऊन जर मागील १५ दिवसांची सरासरी काढायची असेल तर आधीच्या अंशस्थानातील सर्वात जुनी किंमत गाळली जाते आणि नवी किंमत विचारात घेतली जाते. त्यामुळे येणाऱ्या किमतीत थोडाफार फरक पडू शकतो. असा फरक पडतो म्हणूनच याला बदलती सरासरी म्हणतात, अशा तऱ्हेने SMA काढता येतो.
- moneycontrol.com किंवा त्याच्या अँपमध्ये कोणत्याही इंडेक्सवर क्लीक केले असता त्यावर त्या निर्देशांकाचा३०,५०,१५०, २००दिवसांचा SMA उपलब्ध असतो त्यावरून विविध काळातील सरासरी भाव कळल्याने त्यावरून अंदाज बांधणे ट्रेडर्सना सोपे जाते.
- येथे कोणत्याही शेअरला क्लीक केले तर जे पेज येते. त्यावर खाली ‘स्टॉक अलर्ट’ या शीर्षकाखाली, जर या कालावधीतील भावापेक्षा काही फरक असल्यास त्याचे नोटीफिकेशन येते. ट्रेडर्स कडून सर्वसाधारणपणे बंद भाव काढून मिळालेला सरासरी भाव विचारात घेतला जातो.
- या प्रकारच्या किमती विचारात घेऊन आपण त्याचा चक्राकार आलेख (Chart) बनवला तर एका दृष्टिक्षेपात सहज नजर टाकून अंदाज बांधता येणे शक्य आहे. यासाठी किती दिवसांच्या भावाची सरासरी घेऊन अंदाज बांधायचा हे ट्रेडरच्या कौशल्याचे काम आहे. असे अल्पकालीन अंदाज बांधताना आणखी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्यायेथे एकाच किमतीला सर्वत्र सारखेच प्राधान्य दिले असल्याने काहींच्या मते त्यातून काढलेले निष्कर्ष मर्यादित स्वरूपाचे आहेत.
- असे असूनही तांत्रिक विश्लेषकांच्या मते या किंमती उपयोगी असून नजीकच्या कालखंडातील बाजाराचा अथवा शेअरच्या भावाचा अंदाज बांधण्यासाठी कमी कालखंडातील ३० ते ५० दिवसांचा SMA तर थोडया दिर्घकाळाच्या किंमतीचा अंदाज बांधण्यासाठी जास्त कालखंडातील १५० ते २०० दिवसांचा SMA उपयुक्त आहे. सर्वसाधारणपणे SMA वाढतोय, याचा अर्थ भाव वाढण्याची शक्यता आहे, तर कमी होतोय याचा अर्थ भाव कमी होण्याची शक्यता आहे. तरीही असा अंदाज बांधण्यापूर्वी अन्य काही कारण असण्याचीही शक्यता असते. त्याचाही शोध घ्यावा. अशा प्रकारे सरासरी मिळवताना खालील गोष्टी विचारात घ्याव्यात.
- सरासरीचा कालावधी: हा कालावधी काही मिनिटे, तास, दिवस ,आठवडे असू शकतो.
- हे अंदाज बांधण्याचे साधन आहे, असे होईलच असे नाही.
- एकाच वेळी अनेक लोकांकडून त्यावर उपाय योजले गेल्याने अल्पकाळात फरक पडू शकतो.
- अचानक भाव मोठ्या प्रमाणात वाढला किंवा कमी झाला तर एकूण किमतीत बऱ्यापैकी फरक पडतो.
- दीर्घकालीन गुंतवणुकीच्या हेतूने गुंतवणूकदार याच पद्धतीचा उपयोग करून, जर मार्केट वाढण्याची शक्यता असेल तर एखाद्या शेअर्समधील आपली गुंतवणूक वाढवू शकतात किंवा मार्केट कमी होण्याची शक्यता असल्यास आपल्याकडील होल्डिंग विकून कमी भावात खरेदी करू शकतात.अशाप्रकारे प्राथमिक अंदाज आणि गुंतवणूक निर्णय दोन्हींसाठी ही पद्धत उपयोगी होऊ शकते.
– उदय पिंगळे
शेअर्ससंदर्भात आवर्जून वाचावेत असे अर्थसाक्षरचे अजून काही लेख:-
बोनस शेअर्स आणि करदेयता, शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक, शेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचे, शेअर बाजार : डर के आगे जीत है !!!, भारतीय स्टॉक एक्सचेंज- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?, ऍसेट अलोकेशन – शेयर बाजाराच्या उतार चढावावर मात करा, एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन्स- ईसॉप(Employees stock option plans), शेअर्सची पुनर्खरेदी (Shares buybacks)
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
(Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा.)
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
शेअर पुनर्खरेदीच्या (buybacks/ repurchases) अनेक बातम्या आपण वाचतो अलीकडेच एल अँड टी या कंपनीने त्यांचे शेअर ₹ 1500/ शेअर या भावाने खरेदी करण्याचे जाहीर केल्याचे आपण वाचले असेलच. या पार्श्वभूमीवर शेअर्सची पुनर्खरेदी म्हणजे काय? आणि ती कशी केली जाते, याची माहिती करून घेऊयात. एखाद्या कंपनीने स्वतः चे शेअर्स धारकांकडून विकत घेणे म्हणजे शेअर्सची पुनर्खरेदी होय. ही खरेदी सर्वसाधारणपणे बाजारभावाहून अधिक किमतीने केली जाते. यासाठी कंपनीच्या राखीव निधीमध्ये (reserves) असलेली रक्कम वापरली जाते, क्वचित कर्जही घेतले जाते. खरेदी केलेले शेअर्स रद्द (cancelled) केले जातात, त्यामुळे बाजारात उपलब्ध शेअर्सची संख्या कमी होते. शेअर्सची संख्या कमी झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्या सर्व गुणोत्तरात सुधारणा होते.
शेअर खरेदी केल्यामुळे अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात.
१. ज्या धारकांना शेअर्सचे भाव कमी (underprice)आहेत असे वाटत असते त्यांना शेअर योग्य भावास ( fair value) विकण्याची संधी मिळते.
२.कंपनीकडे मोठया प्रमाणात राखीव निधी उपलब्ध असतो त्याचा योग्य विनियोग होतो.
३.प्रतिशेअर उत्पन्न (eps) वाढते
४.विविध रेशोमध्ये झालेल्या वाढीचा भविष्यात फायदा होत रहातो.
५.प्रमोटर्सची टक्केवारी वाढण्यासाठी.
६.कंपनीवर कोणी ताबा (tackovers) मिळवू नये म्हणून.
७.जास्तीचे पैसे शेअरहोल्डरना मिळावेत म्हणून.
८.विविध धारकांचा निश्चित आकृतिबंध (holders frameworks) तयार होण्यासाठी.
९.बाजार मंदीत (bear market)असताना शेअर्सचे भाव खाली येत असतील तर त्याचा अटकाव होण्यासाठी.
१०.भागभांडवलापासून अधिकाधिक लाभ होण्यासाठी.
कंपनीला स्वतःच्या शेअर्सची पुनर्खरेदी करायची असेल तर चार प्रकारे करता येते.
१.टेंडर ऑफर
२.ओपन मार्केट ऑफर
३. विक्री अयोग्य संचाची शेअर खरेदी
४. कंपनीने कर्मचारी आणि त्यांच्या ट्रस्टला दिलेल्या शेअर्सची खरेदी
१. टेंडर ऑफर : यात सर्व पात्र धारकांना विशिष्ठ मुदतीत, कंपनीने ठरवलेल्या भावाने, ठराविक शेअर्स खरेदी करण्याचा प्रस्ताव दिलेला असतो. धारकास दिलेल्या मुदतीत प्रस्तावित शेअर किंवा त्यापेक्षा कमीजास्त शेअर पुनर्खरेदीसाठी देण्याचा पर्याय असतो हे पूर्णतः ऐच्छिक असते.पूर्ण शेअर्सहून अधिक शेअर्स विक्रीसाठी धारकांनी दिल्यास प्रमाणित पद्धतीने अधिक शेअर घेतले जातात. जर शेअरहोल्डरची इच्छा नसेल तर कंपनीकडे खरेदी प्रस्ताव न देण्याचा त्याच्याकडे पर्याय असतो. त्याचप्रमाणे शेअर देण्याची इच्छा आहे परंतू कंपनीकडून प्रस्तावच आला नाही तरी साध्या कागदावर आवश्यक माहिती देऊन तो कंपनीस आपला प्रस्ताव देऊ शकतो.
२. ओपन मार्केट ऑफर : यामध्ये कंपनी शेअरबाजारातून ठराविक मुदतीत ठरलेल्या भावाने किंवा उपलब्ध असल्यास त्याहून कमी भावाने थेट शेअर खरेदी करते. यामध्ये ज्याप्रमाणे इतर लोक शेअरबाजारात खरेदी करतात त्याचप्रमाणे बीड टाकून कंपनीच्यावतीने खरेदी केली जाते.
३. विक्री अयोग्य संचातील (odd lot holder) शेअर्सची खरेदी : शेअरबाजारात शेअर्सची खरेदीविक्री ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केली जात असल्याने ज्या लोकांकडे कागदी प्रमाणपत्र (physical certificates) स्वरूपात शेअर प्रमाणपत्र आहेत ते सर्वच धारक हे विक्री अयोग्य संच धारक ठरतात जर टेंडर पद्धतीने शेअर खरेदी करण्याचे ठरले तर अशा धारकांना सदर प्रस्ताव द्यावा लागतो. काही कंपन्या फक्त अशाच लोकांना त्यांच्या सोईसाठी वेगळा प्रस्ताव देऊ शकतात.
४. कंपनी कर्मचारी त्यांचा ट्रस्ट यांना दिलेले शेअर्स : अनेक कंपन्या वेळोवेळी त्याचे कर्मचारी किंवा त्यांचा कल्याणनिधीस शेअर्स देत असतात. हे शेअर्स ठराविक मुदतीनंतर विकता येतात. असे विक्रीयोग्य शेअर्सचा टेंडर ऑफरमध्ये विचारात घेतले जातात.
- सेबीच्या नियमानुसार शेअर खरेदी करण्यापूर्वी संचालक मंडळास तसा प्रस्ताव मंजूर करावा लागतो. यात शेअर खरेदी का?,किती?, कशी?, कोणत्या भावाने करणार? हे जाहीर करावे लागते.
- 10% हून अधिक शेअर्सची खरेदी करायची असल्यास सर्व भागधारकांची मंजुरी घ्यावी लागते.
- 25% हून अधिक शेअर्स खरेदी करता येत नाहीत. याप्रमाणे शेअर खरेदी निर्णय झाल्यास त्यास योग्य ती प्रसिद्धी द्यावी लागते यासाठी मर्चन्ट बँकरची निवड करावी लागते.
- ठराविक रक्कम हमी रक्कम म्हणून वेगळ्या खात्यात ठेवावी लागते. जर टेंडर ऑफर असेल तर मुदतीपूर्वी सर्व घारकांना खरेदी सुरुवात करण्यापूर्वी मागणी प्रस्ताव पोहोचणे जरुरीचे आहे. यासाठी गंगाजळीत असलेली रक्कम वापरणार की कर्ज घेणार? ते ठरवावे लागते.
- त्याचप्रमाणे तक्रार निवारण व्यवस्था करावी लागते. सर्वसाधारणपणे ही खरेदी करताना एकूण खरेदीच्या 15% शेअर हे छोट्या धारकांकडून (ज्यांच्या शेअरचे बाजारमूल्य 2 लाख रुपयांहून कमी आहे) खरेदी करण्याचे बंधन आहे. अशी खरेदी झाल्यावर त्याआधी मान्य केलेले व बोनस याव्यतिरिक्त 1 वर्ष कोणतेही नवे शेअर्स ईश्शु करता येत नाहीत.
- अशा तऱ्हेने खरेदी करण्याचे ठरवणे आणि त्याची पूर्तता न करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी संबंधीताना दंड आणि कैद अथवा दोन्ही अशा शिक्षा होऊ शकतात. चांगल्या कंपन्यांच्या बाबतीत शेअर खरेदी करण्याचे ठरवल्याने भावात वाढ होते आणि तो खरेदी किमतीचे जवळपास जातो.
- खरेदी मुदत संपली की घट होऊन काही कालावधीने प्रस्तावित खरेदी किमतीहून अधिक भाववाढ होते. असे असले तरीही या विपरीत काही उदाहरणे आहेत ज्यात शेअर्सची किंमत कधीच ऑफर प्राईजच्या जवळपासही कित्येक वर्षे गेली नाही तर काहींचा भाव एवढा वाढला की तो ऑफर किंमतीहून सदैव जास्तच राहिला आणि कधीही खाली आला नाही.
- तेव्हा आपला फायदा शेअर खरेदी देकार देण्यात आहे की न देण्यात आहे याचा अंदाज बांधून योग्य तो निर्णय घ्यावा.
( Image courtsey- https://bit.ly/2oUjkln )
©उदय पिंगळे
- शेअर्सच्या भावासंदर्भात प्रामुख्याने साधी बदलती सरासरी किंमत म्हणजेच सिंपल मुव्हिंग एव्हरेज (SMA) हा शब्दप्रयोग वारंवार बोलण्यात येतो. शेअर्सचा भाव किंवा बाजाराची दिशा दाखवणारी ही सोपी किंमत असून याद्वारे ट्रेडर्स बाजार किंवा विशिष्ठ शेअरच्या भावाचा अंदाज बांधू शकतात.
- संख्याची सरासरी म्हणजे काय? हे आपल्याला माहीत आहेच. दिलेल्या पाच विविध संख्याची सरासरी आपण त्या पाच संख्याची बेरीज करून येणाऱ्या संख्येस पाचने भागून काढतो. याच प्रमाणे शेअरचा किंवा इंडेक्सचा रोजचा खुलता भाव, बंद भाव, विशिष्ठ वेळेचा भाव किंवा दिवसभराच्या भावाची सरासरी अशा वेगवेगळ्या किंमती विचारात घेऊन आपण वेगवेगळ्या सरासरी काढू शकतो.
- अशी सरासरी काढताना पुढील दिवसाचा भाव विचारत घेऊन जर मागील १५ दिवसांची सरासरी काढायची असेल तर आधीच्या अंशस्थानातील सर्वात जुनी किंमत गाळली जाते आणि नवी किंमत विचारात घेतली जाते. त्यामुळे येणाऱ्या किमतीत थोडाफार फरक पडू शकतो. असा फरक पडतो म्हणूनच याला बदलती सरासरी म्हणतात, अशा तऱ्हेने SMA काढता येतो.
- moneycontrol.com किंवा त्याच्या अँपमध्ये कोणत्याही इंडेक्सवर क्लीक केले असता त्यावर त्या निर्देशांकाचा३०,५०,१५०, २००दिवसांचा SMA उपलब्ध असतो त्यावरून विविध काळातील सरासरी भाव कळल्याने त्यावरून अंदाज बांधणे ट्रेडर्सना सोपे जाते.
- येथे कोणत्याही शेअरला क्लीक केले तर जे पेज येते. त्यावर खाली ‘स्टॉक अलर्ट’ या शीर्षकाखाली, जर या कालावधीतील भावापेक्षा काही फरक असल्यास त्याचे नोटीफिकेशन येते. ट्रेडर्स कडून सर्वसाधारणपणे बंद भाव काढून मिळालेला सरासरी भाव विचारात घेतला जातो.
- या प्रकारच्या किमती विचारात घेऊन आपण त्याचा चक्राकार आलेख (Chart) बनवला तर एका दृष्टिक्षेपात सहज नजर टाकून अंदाज बांधता येणे शक्य आहे. यासाठी किती दिवसांच्या भावाची सरासरी घेऊन अंदाज बांधायचा हे ट्रेडरच्या कौशल्याचे काम आहे. असे अल्पकालीन अंदाज बांधताना आणखी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्यायेथे एकाच किमतीला सर्वत्र सारखेच प्राधान्य दिले असल्याने काहींच्या मते त्यातून काढलेले निष्कर्ष मर्यादित स्वरूपाचे आहेत.
- असे असूनही तांत्रिक विश्लेषकांच्या मते या किंमती उपयोगी असून नजीकच्या कालखंडातील बाजाराचा अथवा शेअरच्या भावाचा अंदाज बांधण्यासाठी कमी कालखंडातील ३० ते ५० दिवसांचा SMA तर थोडया दिर्घकाळाच्या किंमतीचा अंदाज बांधण्यासाठी जास्त कालखंडातील १५० ते २०० दिवसांचा SMA उपयुक्त आहे. सर्वसाधारणपणे SMA वाढतोय, याचा अर्थ भाव वाढण्याची शक्यता आहे, तर कमी होतोय याचा अर्थ भाव कमी होण्याची शक्यता आहे. तरीही असा अंदाज बांधण्यापूर्वी अन्य काही कारण असण्याचीही शक्यता असते. त्याचाही शोध घ्यावा. अशा प्रकारे सरासरी मिळवताना खालील गोष्टी विचारात घ्याव्यात.
- सरासरीचा कालावधी: हा कालावधी काही मिनिटे, तास, दिवस ,आठवडे असू शकतो.
- हे अंदाज बांधण्याचे साधन आहे, असे होईलच असे नाही.
- एकाच वेळी अनेक लोकांकडून त्यावर उपाय योजले गेल्याने अल्पकाळात फरक पडू शकतो.
- अचानक भाव मोठ्या प्रमाणात वाढला किंवा कमी झाला तर एकूण किमतीत बऱ्यापैकी फरक पडतो.
- दीर्घकालीन गुंतवणुकीच्या हेतूने गुंतवणूकदार याच पद्धतीचा उपयोग करून, जर मार्केट वाढण्याची शक्यता असेल तर एखाद्या शेअर्समधील आपली गुंतवणूक वाढवू शकतात किंवा मार्केट कमी होण्याची शक्यता असल्यास आपल्याकडील होल्डिंग विकून कमी भावात खरेदी करू शकतात.अशाप्रकारे प्राथमिक अंदाज आणि गुंतवणूक निर्णय दोन्हींसाठी ही पद्धत उपयोगी होऊ शकते.
– उदय पिंगळे
शेअर्ससंदर्भात आवर्जून वाचावेत असे अर्थसाक्षरचे अजून काही लेख:-
बोनस शेअर्स आणि करदेयता, शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक, शेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचे, शेअर बाजार : डर के आगे जीत है !!!, भारतीय स्टॉक एक्सचेंज- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?, ऍसेट अलोकेशन – शेयर बाजाराच्या उतार चढावावर मात करा, एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन्स- ईसॉप(Employees stock option plans), शेअर्सची पुनर्खरेदी (Shares buybacks)
(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)
(Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा.)
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक
ही मी सुदर्शन केमिकल्स (पुणे) मध्ये नोकरीला असतानाची गोष्ट….तेंव्हा मी कंपनीतील सर्व कर्मचारी व अधिका-यांच्या पगारावर भराव्या लागणा-या आयकराचे हिशोब ठेवण्याचे काम करीत असे. सहाजिकच, भरावा लागणारा टॅक्स वाचविणेकरिता करावयाच्या गुंतवणुकीकरिता असे अधिकारी नेहमीच माझा सल्ला विचारीत असत.
तो 1999 सालचा मार्च महिना होता. मी आमच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे कर्मचा-यांच्या गुंतवणुकीचे अंतिम तपशील घ्यायला सुरवात केली होती. आजही ‘टॅक्स वाचवणे म्हणजे NSC, PPF आणि LIC मघ्ये गुंतवणुक करणे’ या पलिकडे काही पर्याय असतात याची जाणिवही बहुतेकांना नसते, तेव्हा तर ती नव्हतीच नव्हती. माझ्या मते या अशा करबचती करिता असलेला त्यावेळचा (व आजचाही) सर्वोत्तम पर्याय निःसंशयपणे ELSS हा आहे, मात्र त्यात गुंतवणुक करणारा अक्षरशः एकही अधिकारी मला सापडला नव्हता….काही नवख्या वाचकांसाठी येथे सांगणे अप्रस्तुत ठरणार नाही की ELSS म्हणजे ‘Equity Linked Savings Scheme’ होय, टॅक्स वाचविण्यासाठीच्या या प्रकारांत केलेली सर्वच्या सर्व, म्हणजे 100% गुंतवणुक ही या योजनेच्या नावात सुचविल्याप्रमाणेच शेअर्स मधे वर्ग करण्यात येते… तेंव्हा ‘कोठारी पायोनियर’ ह्या भारतातील पहिल्या खासगी म्युच्यअल फडाने (आजचा फ्रॅकलीन टेंम्पल्ट्न म्युचुअल फंड) आपल्या ‘टॅक्सशिल्ड-99′ या ELSS योजनेअंतर्गत नव्याने युनिटस विकायला काढले होते. या नव्या ELSS च्या बरोबरीनेच याच फंडाची ‘कोठारी पायोनियर पेंन्शन फंड’ नावाची एक दुसरी करबचत योजनाही आधीपासुन बाजारात होती. ही त्याकाळची कर वाचविण्याकरिता उपलब्ध असलेली एकमेव ‘संतुलीत (Balanced) योजना होती, ज्यातील जमा रक्कमेचा थोडासा भाग (ELSS मधे गुंतविला जातो तसा) शेअर्स मध्ये, व उर्वरित सर्व भाग शेअर बाजाराशी निगडित नसलेल्या रोख्यांमधे गुंतविला जाणार होता.
माझा एक जवळचा सहकारी देवेंद्र याला टॅक्स वाचविणेकरिता रु.10,000 गुंतवावे लागणार होते. मी त्याच्याशी या बाबत चर्चा करताना ‘कुठ्ल्याही परिस्थितीत त्याने NSC, PPF, LIC अशा ‘पारंपारिक’ योजनांत पैसे गुंतवु नये’ असा मित्रत्वाचा आग्रह केला. मग उरल्या वर सांगितलेल्या दोन योजना… मी त्या दोन्ही योजना त्याला समजावुन सांगितल्या. नेमाने व्याजदर व परताव्याची हमी देणा-या सरकारी योजनांत निष्ठेने पैसे गुंतविणारा हा माझा मध्यमवर्गीय मित्र या दोन्ही योजना शेअर बाजाराशी निगडित आहेत आणि व्याजाचीच काय पण मुद्दलाची ही हमी त्यात दिली जात नाही हे ऐकुन भलताच नाराज झाला होता. शेवटी हजार शंका कुशंका काढुन देवेंद्र साहेबांनी ‘त्यातल्या त्यात कमी धोका असलेली’ योजना पेंन्शन फंड’ मध्ये पैसे ‘टाकायचे’ असे ठरवुन माझ्याकडुन त्या योजनेचा फोर्म घेतला. झाले..मी तेथुन उठलो आणि याच कामासाठी शेजारीच असलेल्या त्याच्या बॉसच्या केबिनमधे डोकावलो. आमचे व्ही. पी., श्री. क्षीरसागर साहेब कामात बीझी दिसत होते…”सर, आपल्या टॅक्सचे काय करुया??” मी दबकतच विचारले. “सांग तुच,… काय करतोस??” -साहेब ..”सर आपल्या P.F/LIC मधेच संपते लिमीट, जेमतेम 8/9 हजार गुंतवले की झाले’ -मी. ” बर, मग करुन टाक,.. चेक देतो” – माझ्याकडे बघण्याचेही कष्ट न घेता, साहेब….. माझे म्युचुअल फंडाचे घोडे पुढे दामटवण्याचा प्रयत्न करीत मी साहेबांनासुद्धा ‘टॅक्सशिल्ड वि. पेंन्शन फंड’ ही कथा सांगावयास सुरवात केलीच होती तोच, “ए बाबा… मला नको सांगु रे ह्या टेक्नीकल गोष्टी.. मी जरा कामात आहे…तुला जे हवंय ते कर , फक्त टेक्स वाचतोय ना ते बघ. हा घे चेक… आणखी सह्या कुठे ते सांग ” असे एका ‘दमात’ म्हणुन साहेबांनी घाईघाईत फॉर्मवर सही केली आणि ताबड्तोब चेक देउन मला जवळजवळ केबीन मधुन हाकललेच..मी मात्र जणु मलाच मिळालेला तो कोरा धनादेश असावा ईतक्या आनंदाने तो ELSS म्हणजेच ‘टॅक्सशिल्ड 99’ मध्ये गुंतवला.
कालांतराने मी कंपनीतुन राजिनामा दिला, श्री. क्षीरसागर साहेबांनीही स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरु केला आहे, मात्र दुर्दैवाने माझा मित्र देवेंद्र एका अपघातात हे जग सोडुन निघुन गेला आहे. अगदी अलिकडे जुन्या कागदपत्रांची विल्हेवाट लावताना माझ्या ह्या आठवणींना उजाळा देणारी काही कागदपत्रे सापडली, आणि ती पहाता क्षणीच ठरवले, की ही गोष्ट आपणा वाचकांबरोबर शेअर केलीच पहिजे. सांगावयाची महत्वाची बाब म्हणजे माझ्या ह्या दोन्ही गुंतवणुकदारांचे फोलियोज अगदी आजमितीसही चालु आहेत. दरम्यानच्य काळांत योजनांची नावे काय ती फक्त बदलली आहेत
तुलनेने अधिक सुरक्षित अशा ‘फ्रॅकलीन ईंडिया पेंन्शन फंड’ (ग्रोथ प्लॅन) मध्ये गुंतविलेल्या रु.10,000 च्या गुंतवणुकीचे आजचे मुल्य रु61,944.23 आहे. (खरेदी दि 19/03/99, खरेदीच्यावेळी NAV रु.13.27, दि 04 /07/14 रोजीची NAV रु. 82.20)…त्याचवेळी सर्वस्वी शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबुन असणा-या, आणि म्हणुनच सर्वसामान्यपणे धोकादायक समजल्या जाणा-या फ्रॅकलीन ईंडिया टॅक्सशिल्ड’ (ग्रोथ प्लॅन) मध्ये गुंतविलेल्या रु. 10,000 च्या गुंतवणुकीचे आजचे मुल्य तब्बल रु 3,32,394.70एवढे आहे.!! (खरेदी दि.31/03/99, योजनेच्या सुरवातीची NAV रु.10.00, दि.04/07/2014 रोजीची NAV रु.332.3947)… होय, ही आकडेवारी अधिकृत आणि बिनचुक आहे.
नोकरी आणि बाकीच्या व्यावसयिक अनुभवांतुन उच्चशिक्षित आणि उच्चऊत्पन्न गटांतील किमान काही शेकडा गुंतवणुकदारांचे अनुभव गाठीशी बांधल्यानंतर माझी अशी बालंबाल खात्री झालेली आहे, की विक्रम व वेताळ या आपल्या सुप्रसिद्ध कथांतील राजा विक्रमादित्याच्या मानगुटीवर बसणा-या त्या वेताळा एवढेच जुनाट, असे एक ‘धोका न पत्करण्याचे भुत’ तुमच्या माझ्या , बहुतेकांच्या मानगुटीवर पीढीजात बसलेले आहे.
मी अशा ‘पापभीरु’ गुंतवणुकदारांबरोबर नेहमी करीत असलेले एक प्रात्यक्षिक आपल्याबरोबर शेअर करतो. मी त्यांना सागतो की कागदाच्या एका बाजुला आपल्या आयुष्यातील असे प्रसंग लिहा, की ज्यात आपण धोका पत्करलात. त्या प्रसंगासमोरच अशा धोकादायक निर्णयामुळॅ झालेला फायदा/तोटाही तेथेच समोर लिहा. आता त्याच कागदावर दुस-या बाजुस असे प्रसंग लिहा, ज्यात आपण धोका पत्करायचे टाळलेत. पुन्हा फायदा/तोटा आलाच. तोही लिहा. आणि शेवटी, अगदी ढोबळ मानाने का होईना, ताळेबंद मांडा. माझा अनुभव सांगतो की ‘बहुतेकदा आपल्या धोका पत्करल्यामुळे झालेल्या नुकसानापेक्षा धोका न पत्करल्यामुळे झालेले नुकसान जास्त असते’ असे दिसून येते.
माझ्या दृढ परिचयातील एक सदगृह्स्थ 25 वर्षांपुर्वी त्यांना “एका मल्टीनॅशनल कंपनीत मिळालेली नोकरीची संधी केवळ पुण्याबाहेर जावे लागेल या भीतीपोटी नाकारली, नाहीतर आजच्या सदाशिवपेठी नोकरीपेक्षा किमान 15/20 पट पगार मिळाला असता” अशी खंत कायम व्यक्त करतात. दुसरीकडे ‘अरे, अमक्या तमक्या मोक्याच्या जागी मिळत होता प्लॉट 1967 साली… जरा आणखी जोर लावुन 500 रु. उभे करतो ना …तर आज नुसत्या भाड्यावर जगतो रे…” ही चित्तरकथा आपण एकापेक्षा जास्त वेळा ऐकलेली नाही काय ?? मी ‘धोका न पत्करण्याचीही किंमत चुकवावी लागते’ असे जे म्हणतो ते म्हणजे हेच ते.
खरे तर धोका ही जीवनातील एक अपरिहार्यता आहे ही वस्तुस्थिती मान्य न करता उलट सदैव धोका टाळण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एक प्रकारे स्वतःची आत्मवंचनाच करुन घेणे आहे. कारण ते वर संगितल्या प्रमाणे नुकसानकारक असतेच आणि याही पेक्षा असा बचावात्मक पवित्रा घेणे म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसुन शेवटी ‘धोका न पत्करण्याचा धोका पत्करणे’ हेच होय.
अनेकदा ‘धोका’ म्हणजे काय’ याविषयीच्या आपल्या कल्पनाच अस्पष्ट आणि विपर्यस्त असतात. ब्लूमबर्ग चे प्रख्यात स्तंभलेखक बॅरी रिथॉल्ट्झ यांनी या बाबत सुरेख विवेचन केले आहे. त्यांच्या मते एखाद्या घटने वा प्रक्रिये मागील धोका निश्चित करताना नेहमीच वस्तुस्थितीपेक्षा अशा प्रसंगातील नाट्यमयता, ग्लॅमर अशा गोष्टींना महत्व असते. रिथॉल्ट्झ यांनी विचारलेल्या ‘मानवी मृत्युस सर्वाधिक कारणीभुत ठरणारा जीव कोणता??’ या प्रश्नाचे उत्तर देतांना बहुतकांनी शार्क, सिंह, वाघ… अशी उत्तरे दिली पण या प्रश्नाचे खरे उत्तर असलेला ‘डास’ कोणालाही आठवला नाही. अगदी अलिकडील गायब झालेल्या फ्लाईट MH 370 बाबत उठलेला गदारोळ बॅरी साहेबांच्या युक्तीवादाचीच पुष्टी करतो.त्यांनी या सार्याचा संबंध गुंतवणुकीशी अतिशय सहजपणाने लावला आहे. ते म्हणतात ‘We fear the things that happen relatively rare .. market crash is such a thing !!!
अनेक वर्षापुर्वी एका क्रिडा समालोचकाने अॅलन बॉर्डर आणि सर व्हीव्ह रिचर्ड्स यांची तुलना करताना संगितले होते की खरेतर दोघेही तितकेच धोकादायक आहेत, फक्त व्हीव्ह अधिक घोकादायक वाटतो, कारण तो प्रतिस्पर्ध्यावर वीजेसारखा कोसळतो, उलट बॉर्डर समोरची गोलंदाजी वाळवीने एखादे झाड कणाकणाने पोखरावे तशी पोखरतो…..गुंतवणुकीच्या बाबतीत चांगले वाईट, योग्य अयोग्य ठरवताना आपलेही असेच होत असते, कधीतरी क्वचित होणारा ‘क्रॅश’ आपल्या नशीबी येवुन आपली अर्थिक वाताहत वाताहत झाली तर?? या भीतीने आपण त्या वाटेलाच जात नाही. मात्र नेमक्या त्याचवेळी ‘उगीच भानगड नको…धोका न घेतलेलाच बरा’ या भावनेने आपण अपारदर्शी, नियमबाह्य भीशी वा चिट्स, फसवी आश्वासने देणार्या, अधिक परतावा देणार्या पण मुळात मुद्दलच जोखीमीत टाकणार्या गुंतवणुक योजना, अनावश्यक महागड्या विमा योजना, अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह असलेल्या पतपेढ्यांसारख्या संस्था, अशा अनेक वित्तपिपासु जळवा-गोचिडांना आपल्या अंगाला लावुन घेतलेले असते. बॅरी साहेब यांचा उल्लेख ‘गुंतवणुकीतील कोलेस्ट्रॉल’ असा करतात, ज्याचा सततच्या धोक्यामुळे झालेले सर्वसामान्य गुंतवणुकदारांचे नुकसान हे प्रत्यक्ष बाजाराने दिलेल्या धोक्यामुळे झालेल्या हानीपेक्षा जास्त असते.
घराच्या बाहेर आणि घरांत कोठेही, कोणत्याही शस्त्राने वा अस्त्राने, कोणा मानवाकडुनही आणि पशूकडुनही, दिवसा वा रात्रीपैकी कधीही मृत्यु येणार नाही असा ’फुलप्रुफ’ वर मिळवुन मृत्युवर सकृतदर्शनी विजय मिळविलेला राजा हिरण्यकश्यपू असो, किंवा तक्षक दंशाच्या भीतीने सातमजली एकखांबी महालात रहाणारा राजा परिक्षित, शेवटी मारले गेलेच, या गोष्टीच ऐनवेळी आपल्या सुरक्षिततेच्या कल्पना कशा तकलादु ठरतात याचे द्योतक आहेत. गुंतवणुक विश्वातही धोका न पत्करण्याचीही किंमत, आणि अनेकदा अवास्तव किंमत मोजावी लागते. धोका कमी-जास्त प्रमाणांत का होईना, पण स्विकारण्यास पर्याय नाही, हेच खरे तर सत्य आहे. .आणि एकदा हे वास्तव मान्य करुन ‘शुन्य धोका’ विचारसरणीला तिलांजली दिली की मग ‘थोडासा धोका-अधिक लाभ’ या ट्प्यावर आपण येवुन पोहोचतो…… जो आर्थिक समृद्धीचा खर्या अर्थाने राजमार्ग आहे.
अर्थातच प्रत्येक लेखाप्रमाणेच येथेही मी स्पष्ट करतो की या विवेचनाचा उद्देश बाजारातील सहभागाविषयी सामान्यांच्या मनांतील भीती, गैरसमज दुर करणे हाच आहे, आणि मी कोठेही सट्टेबाजी वा अतिरकी ट्रेडिंगचा पुरस्कार करत नाही. कधीही धोका न पत्करणे हे अयोग्य आहे याचा अर्थ उठसुठ धोकेदायक हालचाली करणे असा अजिबात नव्हे. असा ‘खतरोंसे खेलनेका शौक…’ वगैरे फक्त चित्रपटांत छान असते हे ध्यानांत ठेवावयास हवे.
अलिकडच्याच ‘झिरो डार्क थर्टी‘ या ओसामा बिन लादेन वरील गाजलेल्या हॉलिवुड्पटात एक दृष्य आहे, गुप्तहेर संघटना CIA चे वरिष्ठ अधिकारी ओसामाला मारण्याची योजना बनवत असतात. एका विशिष्ट ठिकाणी ‘तो’ लपला आहे अशी त्यांची अटकळ असते, मात्र तेथील नागरी वस्ती लक्षांत घेता खात्री झाल्याशिवाय अंतिम हल्ला करण्याचा धोका नको अशी CIA प्रमुखांची इच्छा असते. ते अधिकार्यांना या बाबत खोदुन खोदुन, पुन्हा पुन्हा विचारतात तेंव्हा शेवटी त्यांचे डेप्युटी उद्गारतात “We don’t deal in certainty, we deal in probability”
खरे आहे. मी ही माझ्या प्रत्येक नवीन क्लायंट्ला आवर्जुन सांगतो तेच आपणास ही सांगेन की, ‘रिस्क’ नकोच ही मानसिकता बदलुन ‘रिस्क’ कधी आणि किती घ्यायची यावर साकल्याने विचार करणेच शेवटी अधिक श्रेयस्कर ठरते. धन्यवाद.
किमान काही शेकडा गुंतवणुकदारांचे अनुभव गाठीशी बांधल्यानंतर माझी अशी बालंबाल खात्री झालेली आहे, की विक्रम व वेताळ या आपल्या सुप्रसिद्ध कथांतील राजा विक्रमादित्याच्या मानगुटीवर बसणा-या त्या वेताळा एवढेच जुनाट, असे एक ‘धोका न पत्करण्याचे भुत’ तुमच्या माझ्या , बहुतेकांच्या मानगुटीवर पीढीजात बसलेले आहे.
एका बाजुला आपल्या आयुष्यातील असे प्रसंग लिहा, की ज्यात आपण धोका पत्करलात. त्या प्रसंगासमोरच अशा धोकादायक निर्णयामुळॅ झालेला फायदा/तोटाही तेथेच समोर लिहा. आता दुस-या बाजुस असे प्रसंग लिहा ज्यात आपण धोका पत्करायचे टाळलेत. पुन्हा फायदा/तोटा आलाच, तोही लिहा. आणि शेवटी अगदी ढोबळ मानाने का होईना, ताळेबंद मांडा…..‘बहुतेकदा आपल्या धोका पत्करल्यामुळे झालेल्या नुकसानापेक्षा धोका न पत्करल्यामुळे झालेले नुकसान जास्त असते’ असे दिसून येते.
कधीतरी क्वचित होणारा ‘क्रॅश’ आपल्या नशीबी येवुन आपली अर्थिक वाताहत वाताहत झाली तर?? या भीतीने आपण त्या वाटेलाच जात नाही. मात्र नेमक्या त्याचवेळी अपारदर्शी, नियमबाह्य भीशी वा चिट्स, फसवी आश्वासने देणार्या, अधिक परतावा देणार्या पण मुळात मुद्दलच जोखीमीत टाकणार्या गुंतवणुक योजना, अनावश्यक महागड्या विमा योजना, अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह असलेल्या पतपेढ्यांसारख्या संस्था, अशा अनेक वित्तपिपासु जळवा-गोचिडांना आपल्या अंगाला लावुन घेतलेले असते.
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Thanks :- https://arthasakshar.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा