बुधवार, ९ एप्रिल, २०१४

घरच्या घरी बनवा सेंद्रिय खते

रासायनिक खतांच्या वापराने उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादन क्षमता टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्त्व मोठे आहे. सेंद्रिय खते तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ शेतक-यांना सहज उपलब्ध असल्याने या प्रकारची खते तयार करणे शेतक-यांना आर्थिकदृष्टय़ा फायद्याचे ठरत आहे.

सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पिकाच्या वाढीस आवश्यक असणा-या सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. याबरोबरच मातीच्या कणांची घडण बदलून जमिनीचा पोतही सुधारतो. जमिनीत हवा खेळती राहते व जमिनीचे तापमान कमी राहते. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत व कार्यक्षमतेत वाढ झाल्याने अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेतही वाढ होते. सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची जलधारण शक्ती व निचरा शक्ती सुधारते. सेंद्रिय खतांचे विघटन होऊन पिकांच्या वाढीस आवश्यक असलेली पोषणद्रव्ये उपलब्ध होत असतात. जमिनीच्या नैसर्गिक, रासायनिक व जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे.

सेंद्रिय खतांमध्ये प्रामुख्याने हिरवळीची खते, शेणखत, कम्पोस्ट खत, मासळीचे खत, नारळाची पेंड, पक्ष्यांची विष्टा, भुईमूग पेंड, करंज पेंड, कडुलिंब पेंड, तिळाची पेंड, उंडीची पेंड, गोबरगॅसची मळी, गांडूळखत आदींचा समावेश होतो. सेंद्रिय खते ही घरच्या घरी तयार करता येत असल्याने त्यांचा खर्च अत्यंत कमी असतो. आपल्या घराजवळील व परिसरातील टाकाऊ पदार्थापासून सेंद्रिय खते तयार करता येतात. ताग, घेवडा, बरसीम, मूग, चवळी, गिरीपुष्प आदी पिकांपासून हिरवळीची खते तयार करता येतात. गिरीपुष्पाचा पाला शेतात हेक्टरी 10  टन घातल्यास भाताचे उत्पादन शिफारस केलेल्या रासायनिक खतांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाएवढेच मिळते. हिरवळीची खते तयार करताना झाडांचा पाला शेतात कुजवणे आवश्यक आहे. पाला कुजण्याची प्रक्रिया लवकर होत असल्याने ही अन्नद्रव्ये पिकाला लगेच उपलब्ध होतात. हिरवळीच्या खतासाठी लागणारी पिके शेतक ऱ्यांना सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने हिरवळीची खते खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर ठरतात. 

सेंद्रिय खतांमध्ये सहजरीत्या तयार करता येणारे खत म्हणजे कंपोस्ट खत म्हणता येईल. कंपोस्ट खतासाठी झाडांचा पालापाचोळा, टाकाऊ गवत, गोठय़ातील काडीकचरा, जनावरांचे मलमूत्र, टाकाऊ मासळीचे अवशेष, शेतातील तण, पिकाची धसकटे, भुसा, पेंढा, कोंडा आदी निसर्गात सहजरीत्या उपलब्ध होणा-या पदार्थाचा वापर करता येतो. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आपल्या परसबागेत आवश्यक त्या आकाराचा खड्डा तयार करावा. हा खड्डा शक्यतो उंच जागी असावा. खड्डय़ाची खोली 3 फूट, रुंदी 6 फूट आणि लांबी आवश्यकतेनुसार ठेवावी. खड्डय़ाचा तळ व सर्व बाजू ठोकून टणक कराव्यात. कंपोस्ट खताची निर्मिती करताना खड्डय़ात प्रथम सहा त आठ इंची जाडीचा बारीक केलेल्या पदार्थाचा आणि त्यावर शेणकाल्याचा थर द्यावा. असे आलटून-पालटून थर रचून खड्डा भरावा. शेणकाल्यामध्ये प्रतिटन सेंद्रिय पदार्थास अर्धा किलो ग्रॅम या प्रमाणात कंपोस्ट जिवाणू मिसळावेत. खड्डा भरताना जनावरांचे मलमूत्र आणि पाणी यांचे मिश्रण करून शेण व कचरा यांच्या प्रत्येक थरावर शिंपडावे. त्याचप्रमाणे अर्धा किलो युरिया किंवा एक किलो अमोनियम सल्फेट, दोन किलो सुपर फॉस्फेट तसेच सेंद्रिय पदार्थाच्या सहा टक्के प्रमाणात चुना हे सर्व पदार्थ सेंद्रिय पदार्थाच्या थरावर पसरून टाकावेत. अशा प्रकारे थरावर थर देऊन जमिनीवर साधारण एक ते दीड फू ट उंची गेल्यावर खड्डा भरणे बंद करावे. नंतर तो खड्डा ओल्या मातीने सर्व बाजूने लिंपून घ्यावा. चार ते पाच महिन्यांनी या ठिकाणी चांगले कंपोस्ट खत तयार होते. खड्डय़ातील थर सोळा दिवसांनी, एक महिन्यांनी व दोन महिन्यांनी खाली-वर केल्यास कुजण्याची क्रिया जलद होते. या प्रक्रियेमध्ये दर वेळेस पाणी शिंपडून खड्डा लिपून घ्यावा. अशा खड्डय़ातून सुमारे अडीच ते तीन क्विंटल कंपोस्ट खत तयार होते. 

सेंद्रिय खतातील महत्त्वाचा घटक असलेलीगांडूळ खत निर्मिती ही आता सर्वत्र के ली जाते. टाकाऊ सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी गांडुळांचा उपयोग केला असता गांडूळ सेंद्रिय पदार्थाचे तुकडे गिळून त्याचे पचन करून कणीदार मातीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतात. गांडूळ खतासाठीसुद्धा कंपोस्ट खताप्रमाणेच पिकांचे अवशेष जनावरे, पक्षी व प्राण्यांपासून मिळणारी उपउत्पादने, हिरवी पिके, घरातील केरकचरा, झाडांचा पालापाचोळा, इतर कुजणारे टाकाऊ पदार्थ यांचा वापर केला जातो. गांडूळ खतनिर्मितीसाठी साधारणत: 2.5 ते 3.0 मीटर लांबीचे व 90 सें.मी. रुंदीच्या सेंद्रिय पदार्थाचे ढीग तयार करावेत. प्रथम जमिनीवर पाणी शिंपडून जमीन ओली करावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यांसारखे लवकर न कुजणा-या पदार्थाचा 3 ते 5 सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर पुरेसे पाणी शिंपडावे. या स्तरावर 3 ते 5 सें.मी. जाडीचा अर्धवट कु जलेला मातीचा थर रचावा. या थराचा उपयोग गांडुळांना तात्पुरते निवासस्थान म्हणून असो. साधारणत: 100 किलो ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून खत तयार करण्यासाठी त्यावर 7 हजार प्रौढ गांडूळ सोडणे गरजेचे आहेत.दुस-या थरावर सर्व प्रकारच्या टाकाऊ पदार्थाचा वापर करावा. संपूर्ण ढिगाची उंची 60 सें.मी.पेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कुजणा-या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 टक्के पाणी असावे. गांडूळ खत तयार करण्यासाठी निवा-याची व्यवस्था करावी. हे खत दोन ते अडीच महिन्यांत तयार होते. आयसेनिया फटीडा आणि युड्रिलस युजिनी या जातीच्या एका जोडीपासून तीन महिन्यांनंतर 60 गांडुळांची निर्मिती होते. या गांडुळांचा उपयोग सेंद्रिय खतनिर्मितीसाठी करतात. गांडूळ खत तयार झाल्यावर चाळून गांडूळ बाजूला करून खत वापरावे.

दै. प्रहार यांचे सौजन्याने ...

शनिवार, ५ एप्रिल, २०१४

सेंद्रिय शेती जनजागृति अभियान

आपला आहार आरोग्यदायी आहे का?

रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशके इत्यादी रसायनांचा शेतीत अर्निबध वापर होत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडून त्या नापीक होत आहेत. भूजलही दूषित होत आहे. युरिया खतातील नाइट्रेटचे अंश भूजलातून पेयजलात पोहोचतात. नाइट्रेटमुळे मानवी रक्ताची प्राणवायूची वहनक्षमता घटते. हृदयविकाराचे हेसुद्धा एक कारण आहे. प्रत्येक पिकाचा एक विशिष्ट हंगाम असतो. इतर हंगामात ती पिकविल्यास रोग आणि किडींचा प्रभाव वाढतो. त्यामुळे कीटकनाशकांचा वापरही वाढतो. म्हणजे, बिगरहंगामी पिके घेणे व त्यांचे सेवन करणे आरोग्यदृष्टय़ा अपायकारकच. केळी, आंबा आणि इतर फळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर सर्वत्र आणि सर्रास होत आहे. अर्धी-कच्ची, अपक्व फळे कृत्रिमरीत्या पिकवून बाजारात आणली जातात. यामुळे केळीसारख्या सर्वाना सहज उपलब्ध असणाऱ्या फळाबाबतही आरोग्याच्या दृष्टीने शंका वाटत आहे. आंब्याची कथाही काही वेगळी नाही.

 गूळ देखणा दिसावा म्हणून घातक रसायने वापरली जातात. ती न वापरता गूळ केल्यास तो काळपट, लालसर असेल, चमकदार नसेल. असा गूळ ग्राहक पसंत करणार नाहीत, ही उत्पादकाची समजूत असते. ग्राहकांना यातले काहीच माहीत नसते. अमेरिकेत बंदी असलेले (कर्करोगकारक) भेंडीपावडर नावाने शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले रसायन आता वापरात आलेय. धान्य साठविताना गोदामांमध्ये कीटकनाशकांचा वापर केला जातो. योग्य ती काळजी न घेतल्यास तेथेही प्रदूषण संभवते. कर्करोग, हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात हे आजार ग्रामीण भागात श्रमजीवींमध्येसुद्धा वाढत आहेत. हे आजार जंतुसंसर्गाचे नव्हे, तर आपल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आहेत.

निरोगी जीवनासाठी पर्यावरणस्नेही शेती आणि जीवनशैलीच माणसाला तारेल. आरोग्यदायी सेंद्रिय शेती त्यासाठीचे एक पाऊल आहे. मात्र आज त्याही क्षेत्राचे बाजारीकरण व्हायला लागले आहे, ही चिंतेची बाब आहे. सेंद्रिय शेतीची लोकचळवळ करण्यास शहरी ग्राहकांनी हातभार लावावा. शेतकरी कुटुंबांच्या थेट संपर्कात ते यावेत. शेतकऱ्यांचे ते मित्र बनावेत. भरमसाट नफा आकारणारी मधली कडी बाद व्हावी. शहरी जागृत ग्राहकांनी याकामी पुढाकार घेतल्यास चित्र नक्कीच बदलेल.

दै. लोकसत्ता यांचे सौजन्याने ...

सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेंद्रिय शेती म्हणजे जिवंत पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्रास समजुन घेउन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती होय. सिक्कीमने २०१५ पर्यंत संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे ध्येय त्या सरकारने हाती घेतले आहे.
सेंद्रीय शेतीची तत्त्वे
आरोग्‍याचे तत्त्व
सेंद्रिय शेतीने टिकाव धरावयास हवा व माती,धान्याची रोपे,पशु,पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्राचे आरोग्य वाढविणे हा त्यातील अविभाज्य व परिणामकारक घटक हवा.
पर्यावरणीय तत्त्व
सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून व अनुरूप हवी. त्यातील जीवसृष्टीला धरून चालणारी हवी.
निष्पक्षतेचे तत्त्व
सेंद्रिय शेती ही निसर्गचक्रातील परस्परांच्या संबंधात कोणत्याही एका बाजूस कलणारी नसावी. निष्‍पक्षतेची खात्री देणारी असावी.
संगोपनाचे तत्त्व
यात अंतर्भूत असलेल्या सर्व घटकांचे संगोपन सुयोग्यरित्या व्हावयास हवे.त्याने या पिढीतील व पुढच्या पिढीतील सर्वांचे आरोग्य व कल्याण योग्य रितीने राखल्या जाईल.
वैशिष्ट्ये स्थानिक गोष्टी व पुनर्वापर करण्याजोग्या वस्तुंचा वापर
  • मातीचा आरोग्य स्तर कायम ठेवण्यास मदत.
  • पिके व आजुबाजूस असणाऱ्या वनस्पती यांच्यामधील पोषक तत्त्वांचा व सभोवतालच्याच सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर.
  • निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी,अनैसर्गिक वस्तु,निसर्गाशी अनोळखी जीवांचा (कीटकनाशके,रासायनिक पदार्थ,जीएमओ इत्यादी)
  • उत्पादनात वैविध्य
  • शेतीवर अवलंबून् असणाऱ्या जीवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देते.पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका.
  • अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत.
  • आर्थिक उत्पनात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन.
  • एकमेकाशी निगडीत पद्धती
विविध टप्पे
शेतातील मातीचे संवर्धन व पोषण:रसायनांचा वापर बंद.सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करणे.मागे घेतलेल्या पिकांचे उरलेल्या पाने ,बुंधे, फांद्या इत्यादीचा वापर.पिक क्रमचक्र व पिकांत विविधता आणणे.अधिक नांगरणी टाळणे व शेतातील मातीस ओल्या किंवा हिरव्या गवताखाली झाकणे.
  • "'तापमान अनुकुलन'":शेताच्या मातीचे तापमान योग्य राखणे व शेतीच्या बांधांवर वनस्पती लावणे जेणे करून जास्त उष्णता निर्माण होणार नाही'
  • पावसाचे पाण्याचा व सौर उर्जेचा जास्तीत जास्त उपयोग:पाझर तलाव,शेत तळे तयार करणे,उताराच्या शेतीवर पायरी पद्धत.सारख्या उंचीचे बांध घालणे.सौर उर्जेचा वापर.जास्तीत जास्त हिरवळ तयार करणे.
  • नैसर्गिक साखळी,निसर्गचक्राचे पालन: जैववैविध्याची निर्मिती.कीटकनाशक न वापरणे.शेतीचे क्षेत्र,माती, हवामान यास अनुकुल असे पिक घेणे.जैविक नत्राचे स्थिरीकरण(ग्लिरिसिडिया वृक्षांची लागवड)
  • प्राण्यांचे एकीकरण: पाळीव जनावरांच्या शेण व मूत्राचा वापर,पशु-उत्पादन.सौर उर्जा, बायोगॅस इत्यादीचा वापर करणे
  • स्वावलंबन:स्वतःस लागणाऱ्या बियाण्यांचे उत्पादन.शेणखत, गांडूळ खत ,द्रव खते,वनस्पती अर्क इत्यादीचे स्वतःच उत्पादन करणे.
किटक प्रबंधन  
योग्य निवड  
  • रोगमुक्त बियाण्यांचा वापर करणे.,प्रतिरोधी बियाण्यांचा वापर,जैव विविधतेचे पालन
  • पिक रोटेशन  
  • सापळा पिकांचा वापर करणे
शेतकी उपाय  
जैविक उपाय  
  • किटकभक्षक(परजीवी) जैविकांचा वापर,यजमान किटकांचा वापर
वनस्पतीजन्य किटकनाशकांचा वापर   
अनेक वनस्पती ह्या किटनाशक असतात.यातील कडुनिंब सर्वात प्रभावी असते.याचे अर्काचा वापर हा किटनियंत्रणात एक महत्वाचा घटक आहे.याने सुमारे २०० किटकांचा उपद्रव नियंत्रणात येतो.
गोमूत्र  
१:२० प्रमाणात वापर केल्याने किट नियंत्रण होते व पिकांची वाढपण नीट होते.
आंबवलेले दह्याचे पाणी   
दशपर्णी अर्क  
नीमास्त्र  
ब्रम्हास्त्र  
आग्नेयास्त्र  

शुक्रवार, ४ एप्रिल, २०१४

श्री गणपतीची आरती



।। श्री गणपतीची आरती ।।

 सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । 
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।। 

जय देव जय देव जय मंगलमूर्ति । दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० । 

रत्‍नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । 
हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ।। २ ।।

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । 
दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।।

- समर्थ रामदासस्वामी

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

तमाम सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

बोन्सायचे प्रकार...

बोन्साय ही निसर्गाची एक उत्कृष्ट लहान प्रतिकृती आहे. बोन्सायला आकार देण्याआधी निवडलेले झाड निसर्गात कसे वाढते याचे निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बोन्सायचे मूलभूत सहा प्रकार आहेत. या मूलभूत (स्टाइल) प्रकारावरून अनेक प्रकार पडतात.

1) औपचारिक / अनौपचारिक उभे - सर्वसाधारणपणे निसर्गात वाढणारे वृक्ष सरळ उभ्या बुंध्याचे व चारही बाजूंनी फांद्यांचा समतोल असणारे असतात, याला औपचारिक असे म्हटले जाते; तसेच ज्या झाडांचा बुंधा वाकडा आहे, त्यांस अनौपचारिक म्हटले जाते. या पद्धतीकरिता गोल कुंडी वापरावी.

2) तिरकस उभे - आपण एखाद्या उघड्या रानात किंवा समुद्रकाठी गेलो, तर आपल्याला सगळी झाडे वाऱ्यामुळे एका बाजूला झुकलेली दिसतात. या स्थितीला लक्षात घेऊनच या पद्धतीचा उगम झाला. या पद्धतीचे बोन्साय अंडाकृती कुंडीत चांगले दिसते. रोपटे लावतानाच तिरपे लावावे.

3) जुळे खोड / बहू खोडे - या पद्धतीत वृक्षाला एक मुख्य खोड नसून, मुळापासूनच दोन खोडे किंवा बहू खोडे असतात. पण बहू खोडे असलेल्या वृक्षांना समतोल न देता नैसर्गिक; पण त्या दृष्टीने तीन, पाच, सात किंवा नऊ अशी खोडे असतात.

4) उतरती पद्धत - एखाद्या डोंगराळ ठिकाणी आपण गेलो, तर अशा प्रकारची झाडे हमखास आढळतात. झाडांचे मूळ फांद्यांच्या पातळीपेक्षा वरती व पाहताच एखादा झरा वाहत असल्याचा भास होतो, यालाच उतरती पद्धत म्हणतात. ही अतिशय वेगळी पण तेवढीच देखणी पद्धत आहे. या पद्धतीला मात्र कुंडी उंच वापरतात, उथळ नको. जुनिपर्स या पद्धतीसाठी उत्तम आहे. 

5) जंगल - एका पसरट कुंडीत अनेक झाडे लावली जातात. बहुखोडेप्रमाणे झाडांची संख्या तीन, पाच, सात अथवा नऊ असावी. झाडे ओळीत नसून पुढे-मागे लावण्यात येतात. सर्वांत उंच व जुने झाड मध्यभागी असावे व त्याच्या बाजूला इतर लहानशी झाडे असावीत. हे पाहताच एक जंगल आहे असा भास होतो. एकाच जातीची झाडे किंवा दोन-तीन वेगवेगळ्या जातीची झाडे एकत्र करता येतात.

6) खडकावरील बोन्साय - नदीकाठी जी झाडे वाढतात ती वरच्यावर पाहिले, तर त्यांचा शेंडा सर्वसाधारणपणे वृक्षाप्रमाणे दिसतो; पण जेव्हा आपण त्यांच्या मुळांकडे पाहतो, तेव्हा मुळांचे विलक्षण चित्र डोळ्यांसमोर येते. नदीच्या प्रवाहामुळे माती वाहून जाते व केवळ खडकाचा आधार असलेले हे वृक्ष आहेत हे आपल्याला दिसते. मुळे उघडी करून दगडावर मांडणी जरी आकर्षक दिसत असली, तरी प्रत्यक्ष ते करणे अवघड आहे. एखाद्या झाडाची मुळे उघडी करताना जर काळजी घेतली नाही, तर इजेमुळे ते झाड दगावू शकते. बागेसाठी पाम लॅंडस्केपिंगमध्ये पाम गटातील विविध प्रजातींचा वापर करण्यात येतो. पामचा वृक्ष त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लोकप्रिय आहे. याचे खोड स्वच्छ, सरळ, उंच वाढणारे असते. खोडाच्या टोकाला पाने डेरेदार रचनेत येतात. अनेकदा खोड खाली जाड, गोल आकाराचे व टोकाला निमुळते होणारे असते. पाने नाजूक किंवा अवाढव्य असल्याने आपल्याला हवी ती प्रजात निवडून तिचा लॅंडस्केपिंग करताना हवा तसा वापर करता येतो. पामचा वापर "ऍव्हेन्यू'करिता करावयाचा असल्यास रॉयल पाम, बॉटल पाम, फिशटेल पाम, अरेका पाम इ. लावण्यात येतात. हे पाम उंच व सरळ वाढतात व यांचे खोड रस्त्याला एकप्रकारे वेगळे स्वरूप प्रदान करतात. लॉनच्या कडेला लावण्यासाठीदेखील पामचा वापर करता येतो. पामची पाने दाट नसल्याने त्यातून सूर्यप्रकाश खाली झिरपतो व यामुळेच लॉनमध्ये लावण्यासाठीदेखील पामचा वापर करता येतो. शिवाय, या पामच्या खोडाभोवती फुलझाडे व शोभिवंत पानांच्या वनस्पतीही लावता येतात, यामुळे मोठी लॉन आकर्षक करता येते.

बागेमध्ये अनेकदा लॉन लावताना ती समतल न लावता उंच-सखल लावण्यात येते. अशा ठिकाणी उंचवट्यावर बुटके, जाड-गोल खोडाचे पाम लावून तो परिसर उठावदार करता येतो. अशा ठिकाणी दोन ते तीन पाम एकत्र लावण्यात येतात. मोठ्या रॉकरीमध्येही पाम लावण्यात येतात. पाम ही वनस्पती अत्यंत सावकाश वाढणारी आहे. हिची लागवड आउटडोअर व इनडोअर अशा दोन्ही ठिकाणी करता येते. काही पाम अगदी 60 ते 90 सेंटिमीटर उंच वाढणारे असतात. असे पाम छोट्या कुंडीत लावून टेबलवर ठेवता येतात. बहुतेक पाम तीन ते पाच फूट उंच वाढेपर्यंत दिवाणखान्यात, पॅसेजमध्ये, टेरेस गार्डन, बाल्कनी किंवा ऑफिसमध्ये ठेवण्यात येतात. मोठे झाल्यावर हेच पाम बागेमध्ये लावता येतात. पामला जेव्हा फुले व फळे येतात, तेव्हा ते बागेच्या सौंदर्यात भर टाकतात. पाम सदाहरित असल्याने बाग वर्षभर हिरवीगार दिसते. याची पाने एकदम कधीही सुकत नाहीत की पिवळी पडत नाहीत. हळूहळू एक-एक पान सुकत जाते, त्यामुळे ही वनस्पती बागेत कचरा अजिबात तयार करत नाही. सुकलेली पाने हाताने काढून टाकावी लागतात व यामुळेदेखील इनडोअर प्लॅंटकरिता पाम अत्यंत उपयुक्त आहे. अनेकदा लॅंडस्केपिंग करताना इमारत व व्यक्तींची सुरक्षितता जपणे आवश्‍यक ठरते.

 http://agri-plaza.blogspot.in यांच्या सौजन्याने...

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

राशीनुसार परफ्यूम वापरा आणि अडचणींवर मात करा




जर राशीनुसार परफ्यूम अथवा डियो वापरले तर राशी स्वामी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतो.

राशीनुसार परफ्यूम वापरल्याने आपले नशीब उजळून निघते.

आपल्या दिवसाचीही सुरवात चांगली होते. आणि हो आपल्या कामात कुठल्याही अडचणी न येते ते पूर्ण होते.

* मेष- या राशीच्या लोकांनी मोगर्‍याचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.

* वृषभ- या राशीच्या लोकांनी चमेलीचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.

* मिथुन- या राशीच्या लोकांनी लेवेंडरचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.

* कर्क- या राशीच्या लोकांनी लेवेंडरचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.

* सिंह- या राशीच्या लोकांनी गोड सुगंध अथवा चॉकलेट फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा. 

* कन्या- या राशीच्या लोकांनी बदामाचा सुगंध असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा. 

* तुळ- या राशी स्वामी शुक्र देव आहे. त्यानुसार या राशीच्या लोकांनी चॉकलेट आणि चमेलीचा सुगंध असलेला परफ्युम वापरावा. 

* वृश्चिक- गुलाबाचा सुगंध असलेला परफ्युम या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतो. 

* धनु- या राशीच्या लोकांनी चंदनाचा सुगंध असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा. 

* मकर- या राशीच्या लोकांनी एनर्जेटीक सुगंध असलेला परफ्युम वापरावा. उदा. लेमन फ्लेवर. 

* कुंभ- ताजगी देणार्‍या सुगंध असलेला परफ्यूम या राशीचे लोक वापरू शकता. उदा. एक्वा फ्लेवर मीन- कस्तुरीचा सुगंध असलेला परफ्युम या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल.

http://marathi.webdunia.com यांचे सौजन्याने....

माझ्याबद्दल