मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

ओझर



ओझर..… मिग ओझर अशी नावे कालांतराने अंगवळणी करून घेणारे या गावाच्या नावात अनेक रहस्य दडलेली आहेत. ही रहस्ये अन् त्या गावचा इतिहास हा कायम त्याबरोबर आख्यायिका बनून राहतो. या आख्यायिका जाणून घेणे त्यावर सतत विचार मंथन होणे ही अभ्यासकांसाठी एक गरज होऊन जाते. ओझरकडे पाहताना बाणगंगेच्या तिरावर वसलेलं हे गाव ओझर का म्हटले गेले असेलहा प्रश्न सतावतोपण एक आख्यायिका त्याचा उलगडा करते अन् शक्य शक्यतांना पंख फुटतात. ओझर हे गाव तळ्यावर वसले आहेअसे म्हटले जाते. तळ्याभवती एखादे गाव वसू शकते पण,तळ्यावर कसे वसेलमात्र हाच या आख्यायिकेचा गाभा आहे. ओझरमध्ये पूर्वी प्रत्येक घरात आड होती. आता काही वाड्यामध्ये अशी आड आजही पहायला मिळते. ओझरमध्ये पाणी लगेच लागतेअसे म्हटले जाते. गावाच्या जमिनीखाली पाण्याचा मुबलक साठा असल्याने हे गाव तळ्यावर वसल्याची आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. म्हणजेच अनेक झऱ्यांचे गाव म्हणजे ओझर कामात्र याबाबत फक्त कयासच लावता येईल. ओझरचे तांबटांचे ओझर कसे झाले याबाबतही एक आख्यायिका आहे. तांबट गल्लीतील नरेंद्र तांबट सांगतात,‘तांब्याच्या वस्तू बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेले ओझर या गावाजवळून एकदा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जात होत्या. त्यांनी तांब्याच्या वस्तू बनविताना होणारा ठकठक असा आवाज ऐकला. तो मोठ्या प्रमाणात असल्याने नेमका कसला आवाज आहे. हे पाहण्यासाठी त्या गावात आल्या. तेव्हा त्यांनी तांबटांचे ओझर’ असा नामोल्लेख केला. असे माझ्या वाडवडिलांपासून सांगितली जात आहे.’ या घटनेची कुठे नोंद नसली तरी तांबटांचा मोठा व्यवसाय येथे चालत असल्याने गावाला ‘तांबटांचे ओझर’ असे नाव पडले असावे. इंग्रजांच्या दफ्तरी ओझर तांबट’ अशी नोंद आहे. ही नोंद आजही प्रशासकीय कामकाजातही वापरली जाते. तर ओझरमध्ये एचएएल दाखल झाल्यानंतर मिग -२१ हे लढाऊ विमानाची निर्मिती होऊ लागल्यापासून आंतरराष्ट्रीय नकाशावर गेलेले ओझर ओझर मिग’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ओझरच्या नावाप्रमाणेच ओझरची सफर रोचक आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकपासून २० किलोमीटरवर ओझर हे गाव रामशेजवर उगम पावणारी व जानोरी गावापासून पुढे वाहत येणाऱ्या बाणगंगा नदीच्या तिरावर वसले आहे. बाणगंगा पुढे कोठूरेजवळ गोदावरीला मिळते. सीतामातेला तहान लागल्याने रामप्रभूने जमिनीवर मारलेल्या बाणामुळे नदी अवतरली म्हणून तिला बाणगंगा म्हटले जाते,अशी आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. मात्र बाणगंगा नेहमीच भरभरून वाहते असे नाही. अनेकदा ती कोरडीच असते. यामागेही एक आख्यायिका आहे. बाणगंगेच्या किनारी साधुंचा जथा रहायला आला. हे साधु सोमवती अमावास्येच्या प्रतीक्षेत तपाला बसले. मात्र सोमवती अमावास्या येईना. त्यामुळे त्यांनी बाणगंगेला शाप दिला की, ‘तू वर्षभरही कोरडीच राहशील.’ पुढे हे साधू नाशिकला गोदावरीच्या किनारी येऊन राहिले. सहा महिन्यांनी सोमवती अमावास्या आली अन् आनंदीत झालेल्या साधुंनी गोदेला येथे कुंभमेळा भरेलअसा आशीर्वाद दिला अन् तेव्हापासून नाशिकला गोदातिरी कुंभमेळा भरू लागलाअशी आख्यायिका नदी बाणगंगा कोरडी असण्यामागे सांगितली जाते. तर ओझर परिसरातून राम,सीता व लक्ष्मण गेल्याने दाखले पुराणात असल्याचे विठ्ठलराव चौधरीधनंजय पगारभरत कावळे सांगतात. गावात प्रवेश करताना महामार्गावरच डाव्या हाताला खंडोबाचे मंदिर व त्यासमोरील उंच दीपमाळ आपले स्वागत करते. हे मंदिर नव्याने बांधलेले आहे. खंडोबाचे जुने मंदिर मंदिरासमोरच महामार्गापलीकडे आहे. खंडेरायाचे नवीन मंदिर बांधले असले तरी ग्रामस्थांनी जुने मंदिरही तेवढ्याच भक्तीभावाने जपले आहे. येथील खंडेरायाची मूर्तीआदिमाया म्हाळसादेवीअश्वाच्या टापाखाली मल्लासुराला चेंगरल्याची मुद्रा असे प्रसन्न करणारे दर्शन येथे लाभते. मंदिराजवळच सहा पुराणपुरुषांच्या समाधी आहेततर पुढच्या बाजूला अश्वांच्या सहा समाधी आहेत. देवाला जे अश्व सोडण्यात येतात त्यांच्या या समाधी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. खंडेरायाची ही दोन्ही मंदिरे पूर्वीच्या वेसकोट रचनेनुसार गावाबाहेर आहेत. मारूती वेशीसमोरच्या बाणगंगेवरील पूल ओलांडला कीजुने खंडेरायाचे मंदिर आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी या सहा दिवसांत शंकराने मार्तण्डभैरव अवतारात मल्लासूर अन् मणिसूर या राक्षसांशी युद्ध केले होते. यात मल्लासुराचा वध झाला व मणिसुराने शरणागती पत्करली. तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीचा होता. यालाच स्कंधषष्ठी’ असेही म्हणतातअशीही आख्यायिका प्रचलित असल्याचे धनंजय पगार सांगतात. म्हणूनच ओझरचा रक्षणकर्ता अन् ‘सत्वाचा मल्हारी’ म्हणून ओझरच्या खंडेरायाची ओळख आहे. मात्र ओझरमध्ये खंडोबा मंदिर कसे निर्माण झाले यामागेही एक आख्यायिका आहे. असे म्हणतात कीखंडेराव व बानुबाई जेजुरीतून चंदनपुरी (ता. मालेगाव) येथे जाण्यासाठी निघाले. या प्रवासादरम्यान ते ओझर येथे मुक्कामी राहिले अन् नंतर चंदनपुरीत गेले. त्यामुळे येथे खंडोबाचे मंदिर अवतरले.
ग्रामदैवत असलेल्या खंडेरायाची चंपाषष्ठीला होणारी यात्रला वांगेसटीची यात्राही म्हणतात. बाराबलुतेदारी पद्धतीने वसलेल्या या गावात प्रत्येक समाजाच्या गाड्यांचा मानपान परंपरेनुसार ठरलेला आहे. यातून गावात एकोप्याचे दर्शनही घडते. द्वादश मल्हाररथ ओढण्याची २५० वर्षे जुनी परंपरा आजही यात्रेत रंग भरते. मल्लरथाच्या सोंटग्यावर कसरती करणारे मल्लसजविलेले गाडे डोळ्यांचे पारणे फेडतात. गावातील मारूती वेस चौक तालीम व राणाप्रताप चौक तालीम आता नाहीत. मात्र रथावरील फिरत्या चाकावरच्या शारीरिक कसरती करण्याची परंपरा आजही कायम आहे. कुस्त्यांची दंगल ही अनुभवण्यासारखी असते. चंपाषष्ठीला दुपारच्या सुमारास पगारवाड्यातून बारागाडा ओढणाऱ्या मानाच्या घोड्याला मारुती वेशीतून बाणगंगा नदीत स्नानासाठी आणले जाते. येथे खंडेराव महाराजांच्या पारंपरिक चांदीच्या प्रतिमा पालखीत ठेवण्यात येतात अन् गावातून मिरवणूक काढीत सर्व गाडे एकत्र व्हायला सुरूवात होते. मल्हाररथ आजही घोडा (अश्व) ओढतो. खंडेरायाचा अश्वाबाबतही एक आख्यायिका आहे. बारागाडे म्हणजेच द्वादश मल्हारमल्ल रथ ओढण्यासाठी यात्रेच्या आदल्या दिवशी हा घोडा आपोआप मंदिरासमोर यायचा. मात्र आता शहरीकरणामुळे या अश्वाची जबाबदारी एखाद्या व्यक्तीकडे सोपवली जातेअसे ग्रामस्थ सांगतात. सध्याच्या अश्वाने जेजुरी गड एका दमात चढला म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याने पेशव्यांच्या अश्वाचा वारसदार असलेल्या अश्वाला हरविल्याचे ग्रामस्थ कौतुकाने सांगतात. यात्रेच्या दिवशी अश्व मिरवणूक काढली जाते. तेव्हा आख्खं गाव भंडाऱ्याने पिवळे होते. मंदिराजवळील नमाजपठणाची दिवाल पाहिली की गावात हिंदू-मुस्लिम एकोप्याचेही दर्शन घडते. कालांतराने गावाने आपला विस्तार वाढविला अन् वेशीकोटातून गाव बाहेरही वसले. त्यामुळे पूर्वी वेशीबाहेर असलेली ही मंदिरे आता गावातच मोडतात. खंडेरायाची दोन्ही मंदिरे पाहून जुन्या खंडेराय मंदिराकडून बाणगंगेवरील पूल ओलांडला कीबाणगंगेच्या तिरावर सजलेली मंदिरांची रांगोळी अनुभवायला मिळते. हाताला दगडी बांधणी व दगडी कोटामधील रंगरंगोटी केलेले सुंदर असे नागेश्वर महादेव मंदिर दिसते. तर उजव्या हाताला मारूती मंदिर आहे. या मंदिराला पाहुणा मारूती म्हटले जाते. यामागेही एक आख्यायिका आहे. बाणगंगेत वाहून आलेल्या हनुमानाच्या मूर्तीला ग्रामस्थांनी वेशीबाहेर वसविले. तेव्हापासून गावात बाहेरून पाहुणा म्हणून येणाऱ्या लोकांना हे गावा धार्जिण अन् भरभराटीचे ठरतेअसेही ग्रामस्थ सांगतात. या मारूती मंदिरावरून मंदिरासमोरील वेशीला मारूती वेस नाव पडले आहे. ही वेस आताआतापर्यंत होती मात्र ती पडल्याने आता वेशीची जागा लोखंडी कमानीने घेतली आहे. ओझर गावाला चार वेशी होत्या अन् भक्कम कोटात गाव वसले होते. मारूती वेसराजवाड्यातील वेसबाजार वेसअन् आणखी एक वेस गावाचे वैभव होते. यातील आता एकही वेस शिल्लक नाही मात्र त्यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. ओझर अहिल्याबाई होळकरांच्या संस्थानचा एक भाग होते. सरदार दाभाडे अन् देशपांडे यांनी गावाभवती भक्कम कोट उभारले असावेतअसे विठ्ठलराव चौधरी सांगतात. पूर्वी पेंढाऱ्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी वेसकोटाची गरज पडे. त्यांचे दोन मोठाले वाडे गावात होतेमात्र आता ते जमीनदोस्त होऊन तेथे नव्याने इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र या वाड्यांची साक्ष म्हणून परिसराला पडलेले सरकार वाडा हे नाव आजही तसेच आहे. म्हणून हा परिसर सरकारवाडा म्हणूनच ओळखला जातो. पेशवाईची साक्ष देणारे अनेक वाडे आजही गावात आहेत. तसेच माजी आमदार बापू उपाध्ये वाड्यातील काळाराम मंदिर देखणे आहे. तर गोराराम मंदिर लढ्ढा याच्या वाड्यात आहे. याशिवाय विठ्ठल मंदिरमुरलीधर मंदिरकणसरा देवी मंदिरकालिका मंदिरमारूती मंदिर आदी मंदिरे गावात आहेत. गावापासून दोन किलोमीटरवर असलेले महादेव मठ मंदिर व त्यासमोर गोसावी समाजाच्या अनेक समाधी पाहण्यासारख्या आहेत. दुष्काळ पडल्यास पावसासाठी या मंदिरातील गाभारा पाण्याने भरला जातो. पिंड पाण्यात बुडविल्यास पाऊस पडतोअशी आख्यायिका सांगितली जाते.
गावात चार बारव होत्या. त्यातील एक बारव पंचवड गणेश मंदिरात तर दुसरी दुर्गामाता मंदिरात आहे. दोन बारव बुजल्या आहेत. तर दोनचा वापर होतो आहे. बारवेतून चांदवड रंगमहालात भुयार जाते. तसेच भट्टडांच्या हवेलीबाहेर असलेल्या भुयारांच्या दरवाज्यातून दूर्गामाता मंदिरातील बारवेत जाता येतेअसे म्हणतात. ही भुयारे बंद करण्यात आली आहेत. अशी अनेक भुयारे गावात होतीअसे ग्रामस्थ सांगतात.
ओझरमध्ये तांबट गल्लीत तांबटांचा मोठा व्यवसाय चालत असे. मात्र कालांतराने हा व्यवसाय मागे पडला. आता गावात तांबट व्यवसाय करणारे नरेंद्र तांबट हे गावातील एकमेव कुटुंब उरले आहे. तांबट गल्ली आता शांत झाली आहे. मात्र आजही ती ठकठक मंद स्वरात ऐकू येते. ओझरमधील तांबट हे कंसारा तांबट असूनते २५० वर्षांपूर्वी गुजरातमधून स्थलांतरीत झाले होते. तेव्हापासून ते ओझरमध्येच आहेतअसे तांबट सांगतात. तर खंडित झालेली रावण दहनाची परंपरा ओझरकरांनी पुन्हा सुरू केली आहे. जव्हारच्या राजाचे दिवाण भाऊराव चिपळूणकरांची मोठी मुलगी स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी. तर त्यांची दुसरी मुलगी त्यांनी ओझरमध्ये दिली होती. तांबट गल्लीतील कालिका मंदिरात झालेल्या या लग्नाला स्वातंत्र्यवीर सावरकर व शीघ्र कवी बळवंत पारख उपस्थित होतेअसाही ओझरबाबतचा एक संदर्भ हाती येतो. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांच्या ‘माझा बाप अन् आम्ही’ या पुस्तकातही त्यांच्या वडिलांच्या ओझरच्या आठवणी वाचायला मिळतात. तसेच ओझर गायक रंगनाथ जाधवकवी हरेंद्र जाधवचळवळीत आंबेडकरांबरोबर सक्रीय असणारे के. बी. जाधव व एन. टी. जाधव याचे गाव म्हणूनही ओळखले जाते. इंग्रजांनी १९०७-८ मध्ये ओझर तांबटमध्ये ७,८३२ रूपये खर्च करून बाणगंगेवर कॅनल ब्रीज बांधल्याची नोंद नाशिक गॅझेटियरमध्ये मिळते.
ओझर गाव हद्दीत मिग विमानाचा कारखानाएअरफोर्स स्टेशन अशी नावाजलेली ठिकाणे गावचे महत्त्व वाढवितात. ओझर गाव अनेक आख्यायिकांनी अन् ऐतिहासिक संदर्भांने गजबजलेले गाव आहे. सरकारवाडाकाळाराम मंदिर,गोराराम मंदिरमंदिरांची नदीकाठची रांगोळीतांबट गल्लीवाडे संस्कृती अशा अनेक गोष्टी ओझर हे लहानसं नाशिक असल्यासारखचं दर्शन देतात. शहरीकरणांशी एकरूप होत असलेले ओझर वेगळे ठरते ते त्यांचे ऐतिहासिक अन् पारंपरिक ओळख असलेल्या खंडेरायाच्या यात्रेच्या माध्यमातून. त्यामुळे आजही ओझर मल्हारमय झाल्याचे पहायला मिळते.













http://duravlelyavata.blogspot.in/2017/04/blog-post_53.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल