औरंगाबाद महामार्गालगतचे पिंपळस रामाचे हे गाव नाशिकपासून ३७ किलोमीटर अंतरावर आहे. महामार्गाच्या डाव्या हाताला के. के. वाघ कॉलेज लागले की, गावात जाणारा कॉलेजसमोर रस्त्याने पिंपळस गावात प्रवेश करता येतो. आत जाताना उजवीकडे छोटेखानी दगडी मंदिर अन् डावीकडे हनुमान मंदिर आपले स्वागत करते. हनुमान मंदिर नव्याने बांधलेले आहे. गावात प्रवेश केल्यावर गावाच्या मधोमध पिंपळपार लागतो. त्याशेजारी आणखी एक मोठे हनुमान मंदिर आहे. पिंपळपार हा पिंपळसचा केंद्रबिंदू आहे. गावात पूर्वी पिंपळाची खूप झाडे असल्याने गावाला पिंपळस असे नाव पडले असावे, असे मनोहर कुलकर्णी, लक्ष्मण मत्सागर, रामभाऊ पूरकर, सुखदेव सुरवाडे, लहानु तामणे हे ज्येष्ठ नागरिक सांगतात. तसेच गावाला पिंपळस रामाचे असेही म्हटले जाते. या मागे एक अख्यायिकाही सांगितली जाते. श्रीराम नाशिकमध्ये वनवासासाठी असताना सीतेला हव्या असलेल्या सोनेरी हरणाचा पाठलाग करीत ते नांदूरमध्यमेश्वरपर्यंत गेले होते. सोनेरी हरणाच्या रूपातील मारीच राक्षसाचा वध करून ते पुन्हा नाशिककडे परतत असताना पिंपळस येथील पिंपळाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते. म्हणून पिंपळस गावाला पिंपळस रामाचे असे नाव देण्यात आले, अशी अख्यायिकाही ग्रामस्थ सांगतात. पिंपळपारासमोरच श्रीरामाचे शंभरवर्षाहून अधिक जुने मंदिर आहे. लाकूड व मातीत बांधलेले दुमजली मंदिरात राम, लक्ष्मण अन् सीतेच्या प्रतिमा आहेत. गावात दरवर्षी रामनवमीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सवात पूर्वी बोहाडे व्हायचे; मात्र आता ही परंपरा मागे पडली आहे. ४० वर्षांपूर्वी बोहाड्यांची परंपरा गावात बंद झाली. मात्र गावातील छबू शिरसाट यांनी त्यांच्या वंशपरंपरेनुसार चालत आलेला नरसिंहाचा मुखवटा देव्हाऱ्यात भक्तीभावाने जपला आहे. गावातील बोहाड्यांची या मुखवट्याच्या परंपरा उरल्यासुरल्या पाऊलखुणेतूनच शिल्लक असल्याचे दिसते. मात्र बोहाड्याच्या अनेक आठवणी आजही ग्रामस्थांच्या आठवणींमध्ये ताज्या आहेत. अन् नवीन पिढी या सोहळ्यास मुकल्याचे दु:खही त्यांच्या चेह-यावर पहायला मिळते. गावात राममंदिर, हनुमान मंदिराशिवाय विठ्ठल-रुख्मिणी, खंडेराव, दुर्गा देवी, दत्त, मोहटा देवी, सावता, गणपती, चाणखन बाबा, शिवचे अशी अनेक मंदिरे व श्री जनार्दन स्वामी आश्रमही आहे.
गोदेचा काठ अन् बाणगंगा नदीच्या सहवासात वसलेले पिंपळस हे मल्हारदादा बरवे यांच्या डुबेरे, कोठूरे, पांढूर्ली व पिंपळस या जहागिरीतील एक गाव आहे. मल्हारदादा बरवे यांना अनंत, रामाजी व विठ्ठल ही तीन मुले. यातील अनंत बरवे यांचा मुलगा भिकाजी यांच्या वंशातील पुढील गोपाळराव मल्हार बरवे यांची पिढी पिंपळसला स्थिरावली. हे घराणे कोठुरे घराण्याची एक शाखा आहे. पिंपळस येथे गोपाळराव मल्हार (पिढी क्र.९) यांचे कुटुंब जिजीसाहेब त्यांच्या मुलांसह राहात असत. पुढे त्या नातवंडांसह नाशिक येथे दिल्ली दरवाज्याजवळील वडिलोपार्जित वाड्यात राहत होत्या. त्यांना सरकारकडून बाराशे रूपये दरसाल पोलिटिकल पेन्शन मिळत असे. त्यांनी पिंपळस येथे मोठा वाडा व देवालये बांधली,असा उल्लेख दिनकर बरवे यांच्या बरवे कुलवृत्तांतात आहे. पिंपळस येथील वाड्यात आजही बरवे कुटुंबीय राहतात. वाड्याशेजारी बरवे कुटुंबीयांचे गणपती मंदिर आहे. बरवे वाडा आता बराचसा पडला आहे. मात्र वाड्याची भव्यता आजही अनुभवता येते. उरलेले अवशेष, नक्षीकामातील लाकडी खांब, दरवाजे बरवे वाड्याचे वैभव अजूनही कायम असल्याचे दाखवून देतो, अशी माहिती पिंपळस येथील बरवे कुटुंबीयांपैकी एक असलेले पुष्कर बरवे यांनी दिली. पूर्वी गावाला वेशीही होत्या; मात्र कालांतराने त्या नष्ट झाल्या.
गावातील पेशवेकालीन बांधणीची घरे अन् इतिहास दाखविणा-या अनेक पाऊलखुणा पाहताना पिंपळस अनेक उलाढालींचे केंद्रस्थान असेल, असे वाटायला लागते. गावाचा फेरफटका झाल्यावर पुन्हा के. के. वाघ कॉलेजसमोरील नाशिक-औरंगाबाद महामार्ग ओलांडून गोदा आणि बाणगंगेच्या संगमाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागावे. गावापासून तीन किलोमीटर शेतातून नागमोडी रस्त्याने गेल्यावर आपण गोदावरी-बाणगंगेच्या संगमावर पोहचतो. तुडूंब भरलेले गोदावरी व बाणगंगेचे नदीपात्र, निसर्गरम्य परिसर अन् संगमावरील दगडी बांधणीचे महादेव मंदिर नयनरम्य आहे. मंदिराबाहेर शंकराची दगडी मूर्ती आहे तर मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. हे मंदिर अहिल्याबाईंनी बांधल्याचे ग्रामस्थ सांगतात. येथून पुन्हा नाशिक-औरंगाबाद महामार्गावर यायचे व औरंगाबादकडे दोन किलोमीटर रसुलपूरकडे गेल्यावर उजव्या हाताला वीटभट्ट्या दिसायला लागल्या की, डाव्या हाताच्या दाट झाडींमध्ये दडलेली बारव पहायला मिळते. महामार्गापासून बारवेच्या दिशेने थोडे आत गेल्यावर विटा व दगडी बांधणीची ‘कटक बारव’ आजही जिंवत असल्याचे पाहून समाधान वाटते. पूर्वी गावाला पाणी पुरवठा करणारा कटक बारव हा मुख्य स्त्रोत होता. बारवेचे नाव कटक बारव का आहे हे मात्र उलगडत नाही. बारवेच्या तोडांवर साती आसरा देव मांडलेले आहेत. ही बारव कोठूर व रसूलपूरच्या सीमेवरच आहे. या बारवेकडून पुन्हा महामार्गावर आल्यावर उजव्या हाताला बैलगाड्यांसारखे पण गुडक्या इतक्या उंचीचे सात-आठ गाडे जोडलेल्या स्थितीत रसुलपूरच्या दिशेने महामार्गाच्या कडेला ठेवलेले होते. प्रत्येक बैलगाडीवर बांबूची टोकरी व खण, नारळांचा नेवेद्य ठेवण्यात आला होता. याबाबत ग्रामस्थांनी दिलेली माहिती मनोरंजक आहे. हे गाडे लक्ष्मीबाईचा गाडा म्हणून दोनशे अडीचशे वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. कोकणातील कोणत्यातरी गावातून हे गाडे निघतात. ते गाव हे गाडे वाजत गाजत पुढील गावाच्या सीमेवर ठेवते. लक्ष्मीला नैवेद्य दाखविला जातो अन् गाडे तेथेच ठेवून ग्रामस्थ घरी परतात. ज्या गावाच्या सीमेवर हे गाडे ठेवले आहेत. ते ग्रामस्थ ते गाडे वाजत गाजत गावात आणतात त्यांची पूजा अर्चा करून पुन्हा वाजत गाजते पुढील गावाच्या सीमेवर सोडले जातात. अशा पद्धतीने दरमजल करीत हजारो गावांचा प्रवास करीत हे गाडे पुढे पुढे जातात. मात्र हे गाडे कोणत्या गावावरून येतात अन् पुढे कुठे स्थिरावतात हे मात्र कोणालाही माहिती नाही. मात्र वर्षातील विशिष्ट तारखेला हे गाडे गावाच्या सीमेवर आलेले असतात,अशी माहिती पुष्कर बरवे व छबू शिरसाट कुटुंबियांनी दिली. ही अनोखी परंपरा अज्ञात असली तरी पाऊस पडावा, कोप होऊ नये, गावावरील इडापिडा टळावी म्हणून अनेक वर्षांपासून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. इतिहासाच्या पाऊलखुणा, अनोखी परंपरा, बोहाड्याच्या आठवणी अन् रामाच्या सहवासामुळे पावन झालेले पिंपळस रामाचे हे अनोख्या ग्रामसंस्कृतीमुळे रामाचे पिंपळस म्हणून ओळखले जाते.
- http://duravlelyavata.blogspot.in/2017/04/blog-post.html

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा