शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

पाणथळ जपू या....जागतिक पाणथळ दिन



दरवर्षी २ फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. जैविक वैविध्याला जिवंत ठेवण्यात आणि ते वाढविण्यात पाणथळांची भूमिका अत्यंत मोलाची असते. उत्तर महाराष्ट्रातही अनेक पाणथळ ठिकाणे आहेत. या ठिकाणांचे मूल्य जाणून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम करणे गरजेचे आहे.

पाणथळ जागांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने २ फेब्रुवारी १९७१ रोजी इराण येथील 'रामसर' या ठिकाणी जगातील काही देश एकत्र आले आणि त्यांनी 'रामसर करार' केला. 'रामसर करार' अंतर्गत सध्या १६८ देश एकत्र येवून २१७७ पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत. यंदा साजऱ्या होणाऱ्या 'जागतिक पाणथळ' दिवसाची संकल्पना आहे 'पाणथळी प्रदेश आणि कृषी'. पाण्याच्या उपलब्धतेवर 'शेती' चे भविष्य अवलंबून असते. 'शेती आणि पाणथळी' यांचा संबंध पुरातन आहे. पुराच्या गाळाने समृद्ध झालेल्या नदी खोऱ्यांमध्येच 'कृषी संस्कृती' उदयास आली आणि फोफावली. अजूनही जागतिक स्तरावर' शेती आणि शेतीपूरक व्यवसायच अर्थार्जनाचा मुख्य स्रोत आहेत. बागायती असो अगर कोरडवाहू शेती तिला पाण्याची आवश्यकता असतेच.

'पाणथळ जागा' म्हणजे नदी, समुद्राची खाडी, मिठागरे, नैसर्गिक आणि मानवनिर्मित तलाव. या सर्व पाणथळींचा 'शेती' बरोबर अनन्यसाधारण संबंध आहे. पाणथळ जागांमुळे शेती आणि शेती पुरक व्यवसायातूनच मानवाने अन्नधान्याची उपलब्धता साधून घेतली आहे. पाणथळीमधूनच शेतीसाठी 'पाणी' उपलब्ध होत असते. त्याच पाण्यातून मत्स्यव्यवसाय होतो. पाणथळीच्या काठावरील दलदलीतील जैववैविध्य, पाणवनस्पती शेतीसाठी सेंद्रीय खत ही मिळवून देतात.


जागतिक स्तरावर बहुसंख्य कुटुंबे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेले जमीन, पाणी, वनस्पती आणि प्राणी हे मोठ्या प्रमाणावर पाणथळीवर अवलंबून आहेत. 'पाणथळ' जागांमुळेच शेती, पशुपालन, मत्स्यपालन व इतर शेतीपूरक व्यवसायांची भरभराट झाली आहे. पाणथळींमुळेच अन्न, पाणी, इंधन यांचा अव्याहतपणे पुरवठा शेतीच्या माध्यमातूनच होतो आहे. पाण्याचे नैसर्गिकरित्या शुध्दीकरण करणे, पाण्याची गुणवत्ता शुद्ध राखणे, पर्यावरणाचे संतुलन राखणे, मानवनिर्मित मलनिस्सारण करणे असे अप्रत्यक्ष - प्रत्यक्ष फायदे आपणास पाणथळ जागांपासून मिळतात. जमिनीची सुपीकता वाढविणे, नैसर्गिकरित्या शेतजमिनीतील सेंद्रीय घटकांचे संतुलन राखणे आदी महत्त्वाची अप्रत्यक्ष मदत पाणथळ जागा आपणास करत असतात. पाण्याच्या उपलब्धतेवरच किती तरी सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळे नदीच्या किंवा एखाद्या सरोवराच्या काठावर उदयास आली आहेत. नद्या, सरोवर, तळी, कुंड यांना धार्मिक स्थळी महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. शेतीच्या अविवेकी किंवा अतिवापरामुळे बहुसंख्य 'पाणथळ जागा' धोक्यात आल्या आहेत. शेतीसाठी पाण्याचा अनिर्बंध वापर, रासायनिक खते, किटकनाशके यामुळे बऱ्याच 'पाणथळ' जागा दूषित होत आहेत. काही ठिकाणी तर चक्क 'पाणथळ' जागा भराव टाकून निवासी वापर, शेतीसाठी जागा उपलब्ध करून घेण्यासाठी बुजवल्या जात आहेत.


आपला देशदेखील 'रामसर कराराचा' सभासद असल्यामुळे भारतातील २७ 'पाणथळ' जागांचा 'रामसर पाणथळ' जागांमध्ये समावेश झाला आहे. महाराष्ट्रात अद्याप एकही पाणथळ जागा 'रामसर' दर्जा प्राप्त करू शकलेली नाही. मात्र महाराष्ट्र सरकार नांदूरमध्यमेश्वर (नाशिक), जायकवाडी धरण (औरंगाबाद), नवेगाव बांध (गोंदिया) या 'पाणथळ' जागांना 'रामसर' दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. उत्तर महाराष्ट्रातही कितीतरी पाणथळ जागा अस्तित्वात आहेत. गोदावरी, तापी, गिरणा, नर्मदा या मोठया नद्या उत्तर महाराष्ट्राला समृद्ध करतात. त्यांच्या काठी कृषी संस्कृती उत्तमरीत्या नांदत आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, चणकापूर, गिरणा, नांदूरमध्यमेश्वर इ. मानवनिर्मित पाणथळी उल्लेखनीय आहेत. या मानवनिर्मित पाणथळीमुळे शेती समृद्ध होवून ग्रामीण भाग संपन्न झाला आहे. त्याचबरोबर या पाणथळ जागांमधील जैवविविधता देखिल उल्लेखनीय आहे.

नांदूरमध्यमेश्वरसारख्या 'पाणथळी' जागेवर स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांचा मोठा वावर असतो. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण, वाघूर धरण, मेहरुण तलाव इ. पाणथळ जागा महत्त्वपूर्ण आहेत. पाणलोट क्षेत्रातील जंगलाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्याने हतनूरसारख्या धरणात गाळाचे प्रमाण देखील प्रचंड आहे. मात्र याच गाळाने तेथील जैवविविधतेला जपले आहे. त्यामुळेच हतनूर धरण हे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांसाठी महत्त्वाच्या अधिवासाची भूमिका निभावत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कसदार जमिनीवरील शेती समृद्ध होण्याचे कारणच नर्मदा, तापी, पांझरा, बोरी या प्रमुख नद्या त्यावरील उकाई, सरदार सरोवर, प्रकाशा आणि सारंगखेडा येथिल बॅरेजेस आहेत. यामुळेच सातपुड्याच्या पायथ्याशी असणारी जैवविविधता जोपासली जात आहे. धुळ्यातील नकाणे, डेडरगाव, सोनवद, निमडाले यासारख्या 'पाणथळ' जागाच शेती, पिण्याचे पाणी यांची शाश्वती देतात आणि स्थानिक स्थालांतरित पक्षांना थारा देवून जैवविविधता जोपासत असतात. जायकवाडी प्रकल्प मराठवाड्यात असला तरी त्याचा पाणपसारा अहमदनगरच्या नेवासा, शेवगाव तालुक्यांपर्यंत पसरलेला आहे. नगर जिल्ह्यातील साखरेचे अर्थकारण बहुतांश याच पाणथळ प्रदेशावर अवलंबून आहे. त्याचबरोबरीन नगर जिल्ह्यातील भंडारदरा, सारखे जुने प्रकल्प पश्चिम घाटातील जैववैविध्य सांभाळण्यास मदत करतात. शेती आणि पाणथळ जागा हे दोन्ही घटक एकमेकांना पुरकच आहेत. शेतीचा शाश्वत विकास करावयाचा असल्यास, 'पाणथळ' जागेचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.










by - Maharashtra Times
विनोद पाटील
(लेखक खान्देश निसर्ग संवर्धन संस्थेचे सचिव आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल