इस्राईल म्हटले की आपल्याला प्रथम आठवते ती त्यांची जगप्रसिद्ध गुप्तहेर संघटना, मोसाद! मग त्यांची लष्करी सज्जता, प्रत्येक नागरिकाला असलेली लष्करी प्रशिक्षणाची सक्ती, दुसऱ्या महायुद्धात ज्यूंचा छळ करणाऱ्या जर्मनीतील लष्करी अधिकाऱ्यांना युद्धानंतर जगभरातून शोधून काढून आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर आणण्याची इस्राईलची विजिगीषू वृत्ती.. बहुतेकांच्या सांगण्यात इस्राईल म्हणजे असाच युद्धाशी किंवा त्यासंबंधीच्या विविध कथांशी जोडला गेलेला देश असतो!
मात्र या सगळ्याच्या पलीकडेही त्या देशात आणखी काहीतरी आहे. त्यांच्या वाणिज्य मंत्रालयाने इस्राईलची राजधानी तेल अवीव येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेनिमित्ताने हे ‘आणखी काहीतरी’ काय आहे ते दिसले. इस्राईल काय आहे ते या पाच दिवसांच्या दौऱ्यात फार खोलात जाऊन शोधता नाही आले, तरी वरवर का होईना, पाहता आले. प्रत्येक इस्राइलीने त्याचे वैयक्तिक आयुष्य आपल्या देशाबरोबर जोडले आहे. इस्राईलच्या सगळ्या प्रगतीचे रहस्य त्यात आहे, असे या काही दिवसांच्या भेटीतही अगदी स्पष्टपणे जाणवले.
इस्राईलच्या लढय़ाला दोन हजारांपेक्षा अधिक वर्षांचा इतिहास आहे. मात्र त्यांचे स्वातंत्र्य अवघे ६० ते ६२ वर्षांचे. बिनचूक सांगायचे तर १४ मे १९४८ ला इस्राईल नावाचा देश अस्तित्वात आला. या ६० वर्षांत इस्राईलने फार मोठी झेप घेतली. सतत युद्धाच्या छायेत असताना, देशाचे अस्तित्व नष्टच करण्यासाठी सभोवतालची सर्व राष्ट्रे टपलेली असताना, पाण्याचे, अन्नधान्य उत्पादनाचे दुर्भिक्ष असताना अशी प्रगती करणे, ही खरोखरीच कौतुकाची व भारतासह जगातील अन्य देशांनी अनुसरावी, अशीच बाब आहे. आपली समस्या काय आहे, ते ओळखून अथक परिश्रमाने त्यावर मात करून इस्राईलने ही प्रगती केली. त्यामागे तेथील प्रत्येक नागरिकाची देशाप्रती असलेली जागृत कर्तव्यभावना आहे.
*समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी
समुद्राच्या मचूळ, खारट पाण्यापासून थेट पिण्याचे पाणी निर्माण करणारे तंत्रज्ञान त्यांनी प्रगत केले आहे. व्हाइट वॉटर नावाचा त्यांचा मोठा प्लान्ट पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. एखादा साखर कारखाना असतो, तसा हा प्लान्ट आहे. अवाढव्य यंत्रसामग्री, रासायनिक मिश्रणाचे भले मोठे सिलेंडर, मोठमोठे वॉटर बेड या सगळ्यातून पाणी जाते-येते. नंतर त्यावर पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी योग्य असलेली काही द्रव्ये मिसळून मग पिण्याचे पाणी तयार होते. काही दशलक्ष लीटर पाणी रोज या प्लान्टमध्ये तयार होते.
त्या कंपनीच्या सर्वेसर्वा असलेल्या सरव्यस्थापकांनी स्वत: फिरून सगळा प्लान्ट दाखवला. त्यावेळी आम्हाला डोक्यावर घालण्यासाठी म्हणून हेल्मेट दिली होती. पाहणी झाल्यानंतर कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांचे लेक्चर होते. ते ऐकताना सर्वानी आपापली हेल्मेट काढून खुर्चीजवळ काढून ठेवली. लेक्चर संपले व सगळे आपले हेल्मेट तसेच ठेवून निघाले. त्या सरव्यवस्थापकांनी स्वत: फिरून सर्व हेल्मेट एका मोठय़ा ट्रॉलीत जमा केली व ती ट्रॉली त्यांनी स्वत:च ढकलून जागेवर नेऊन ठेवली. कोणीतरी हेल्पर येईल, मग तो ती ट्रॉली नेईल, आपण इतक्या मोठय़ा अधिकार पदावरचे, असले काम कसे करायचे, असे काहीही त्यांच्या चेहऱ्यावर दिसले नाही. अगदी सहजतेने त्यांनी हे काम केले.
इतक्या सगळ्या प्रक्रियेतून तयार झालेले पाणी चांगलेच महागडे असणार, मग ते सर्वसामान्यांना कसे परवडणार, असे त्यांना विचारले. त्यावेळी त्यांनी पाण्यावरची प्रक्रिया सुरू असताना तेच पाणी वापरून विजेची निर्मितीही होत असल्याची माहिती दिली. त्या विजेवरच तो सगळा प्लान्ट चालत होता. त्यासाठी त्यांना वेगळा खर्च करण्याची गरज नव्हती. कच्चा माल म्हणजे समुद्राचे पाणी तर फुकटच उपलब्ध होत होते. शिवाय ही प्रक्रिया सुरू असताना जे पाणी पिण्यायोग्य राहात नाही, ते पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाते. त्याचे वेगळे उत्पन्न कंपनीला मिळते.
*सांडपाण्याचे शुद्धीकरण
सांडपाणी प्रक्रिया उद्योगातही त्यांनी अशीच प्रगती केली आहे. काळेशार, घाणेरडे वास मारणारे पाणी त्याच्यातील सर्व अनावश्यक भाग (त्यात तेल, ग्रीस, कचरा असे सर्व काही आले.) यांत्रिक प्रक्रियेने काढण्यात येतो. बऱ्यापैकी शुद्ध झालेले हे पाणी मग जमिनीत साठवले जाते. शेतीला पूरक असे खनिज त्यात मिसळवले जाते व शेतीसाठी म्हणून ते पाणी विकले जाते. या सर्व गोष्टी यंत्राद्वारे होतात. त्यासाठीचे वीजपंप जमिनीच्या वर दिसतात. पाण्याचे पाइप, टाक्या हे सर्व जमिनीखाली असते. त्यावर देखरेखही यंत्राद्वारेच ठेवली जाते. वापरलेल्या एकूण पाण्यापैकी ७५ टक्के पाण्याचा ते पुनर्वापर करतात. येत्या काही वर्षांत हे प्रमाण ९५ टक्के करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीचे संशोधन त्यांच्या प्रयोगशाळांमध्ये कायम सुरू असते.
*कचरा व्यवस्थापन
कचऱ्याच्या व्यवस्थापनात तर इस्राईलने क्रांतीच केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या खासगी कंपन्यांचे मोठेमोठे कारखाने आहेत. सर्व कचरा तेथे जमा होत असतो. त्यावरही वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. कचरा डम्प करून तयार झालेले मोठे डोंगरच या कंपन्यांच्या सभोवती आहेत. तो त्यांचा कच्चा माल. कचरा आला की प्रथम त्यावर वाऱ्याची प्रक्रिया केली जाते. म्हणजे एका मोठा फिरत्या पॅनेलवरून कचरा हवेच्या झोतासमोर जातो. त्यात त्यातील प्लॅस्टिक, कागद किंवा दोऱ्यांचे तुकडे म्हणजे उडून जाण्यासारखे जे काही आहे ते सर्व उडून एका मोठय़ा ड्रममध्ये पडते. शिल्लक कचऱ्यावर मग पाण्याची प्रक्रिया होते. त्यात कचऱ्यामधील जड वस्तूंवरची सगळी घाण निघून जाते. हा कचरा मग डम्प केला जातो.
जमिनीचा भराव करण्यासाठी म्हणून या कचऱ्याचा वापर करण्यात येतो. आपल्याकडे जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी एखाद्या ठिकाणची माती उकरून तिथे खड्डा केला जातो, मग ती माती दुसऱ्या ठिकाणी आणून तिथे भराव टाकला जातो. इस्राईलमध्ये त्यासाठी या कचऱ्याचा वापर करतात. जमा झालेल्या एकूण कचऱ्यापैकी सुमारे ७५ टक्के कचरा असा लॅन्डफिल्डसाठी उपलब्ध करून दिला जातो. म्हणजे त्याची विक्री होते. कंपनीच्या उत्पन्नाचा तो प्रमुख भाग असतो. तो असा वापरात येण्यापूर्वी त्याची कुजून कुजून जवळपास माती झालेली असते. त्यामुळे जमिनीसाठी हा कचरा उपयुक्त ठरतो.
उर्वरित कचरा म्हणजे प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा रिकाम्या बाटल्या यांपासून कितीतरी शोभेच्या वस्तू तयार करण्यात येतात. कचऱ्याचा कोणताही भाग वाया जाऊ द्यायचा नाही, असा जणू चंगच त्यांनी बांधला आहे की काय, अशी शंका येते. खुच्र्यावर टाकण्यासाठीच्या फोमच्या गाद्यासुद्धा कचऱ्यातून तयार झालेल्या आहेत, यावर प्रथमदर्शनी विश्वास बसत नाही, पण त्या वस्तू तयार होताना प्रत्यक्ष बघितले की विश्वास ठेवावाच लागतो. हे कारखाने पाहण्यासाठी खुले ठेवले आहेत. मुलांसाठी तेथे खेळणी होती, तीसुद्धा अशीच टाकाऊ वस्तूंपासून तयार झालेली होती.
कचरा व्यवस्थापनाचे आणखी एक नवे तंत्र म्हणजे कंपोस्ट खत. कुजवलेला कचरा मातीसदृश झाला की त्यावर पुन्हा अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. त्यात खते मिसळली जातात. नंतर ही माती शेतीसाठी खत म्हणून विकण्यात येते. हा कंपनीच्या प्रमुख उत्पन्नाचा भाग आहे.
*शेती
इस्राईलची शेती म्हणजे संशोधनाचा विषय आहे. आपल्याकडे शेतीला धो धो पाणी दिले जाते. अलीकडे विजेचे येणे-जाणे काही खरे नसते. त्यामुळे काहींनी पंपाचे बटण सुरू ठेवून झोपून घेण्याचा उपाय शोधला. वीज आली की पंप सुरू होतो व पाणी शेतातून अक्षरश: वाहून जाते. पाण्याचा असा अपव्यय आपल्याला परवडणारा नाही, हे लक्षात घेऊन इस्राईलने ड्रीप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन शोधून काढले आहे. लागेल तितकेच पाणी हे त्याचे सूत्र आहे. पाणी अजिबात वाया जाऊ द्यायचेच नाही, असे हे तंत्र आहे.
शेतजमिनीत साधारण १ ते २ फुटांवर चर खोदलेले आहे. त्यातून पाणी वाहून नेणाऱ्या नळ्या नेलेल्या आहेत. (पाइप म्हणताच येणार नाही, इतक्या त्या लहान असतात.) या चरांच्या बरोबर कडेला शेती किंवा रोपे असतात. रोप असेल त्या ठिकाणी नळीला छिद्र असते. त्यातून पाणी येते व थेट मुळांनाच पोहचते. तेही रोपाला आवश्यक असेल तेवढेच. त्याच्या वेळा आहेत. रोपाच्या भोवतालचा सगळा भाग बरोबर पाण्याने भिजलेला राहतो.
सर्व प्रकारच्या शेतीला याच पद्धतीने पाणी देण्यात येते. अनेकविध फळभाज्या, पालेभाज्या तसेच धान्याचेही उत्पादन घेतले जाते. शेतीतही त्यांनी पेरणीत, मशागतीत, लागवडीत सतत संशोधन करून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले आहे. त्याचा वापर करून उत्पादन वाढवले आहे. यंत्राद्वारेच बहुतेक कामे केली जातात. पाणी प्रक्रिया उद्योगांना भेट हे दौऱ्याचे मुख्य प्रयोजन असल्याने शेतांना भेट देण्याला विशेष वाव नव्हता.
*सामुदायिक शेती
किबुटस् म्हणजे काही जणांनी एकत्र येऊन समुदायाने राहणे. संघर्षांच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी लढत राहण्याच्या इस्राइलींच्या ईष्र्येतून व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या पद्धतीचा जन्म झाला. यात वैयक्तिक संपत्ती करता येत नाही. सगळे अधिकार पंच मंडळीकडे असतात. ७०० ते ८०० कुटुंबे असलेली किबुटस् आहेत. शेतीशिवाय अन्य कामेही त्यांच्याकडून होत असतात. इरिगेशनच्या सगळ्या नळ्यांचे उत्पादनच एका किबुटस्कडून करून घेण्यात येत होते. सगळ्यांना समान अधिकार, कोणालाही विशेष अधिकार नाहीत, हे या पद्धतीचे वैशिष्टय़ आहे. म्हणजे कामानुसार तुम्हाला कंपनीकडून वेतन जास्त-कमी मिळते, पण ते तसे मिळत असले तरी किबुटस् पद्धतीनुसार ते सगळे पंच मंडळीकडेच जमा करावे लागते. जेवण एकत्र, राहणे एकत्र, काम करणे एकत्र- अशी ही पद्धत काही वर्षांपूर्वी इस्राईलची एक ओळख होती. मात्र आता सळसळत्या रक्ताच्या नव्या पिढीला ही पद्धत मान्य नाही. त्यामुळे ते यातून बाहेर पडू लागले आहेत.
नवी पिढी, नवे वारे
इस्राईलची नवी पिढी म्हणजे देशांतर्गत असलेले लष्करच आहे. आमच्या गाडीच्या ड्रायव्हरने आम्हाला अभिमानाने सांगितले की एक लाख इस्राईली हे जगातील १० लाख नागरिकांच्या बरोबरीचे आहेत. आमचा प्रत्येक मुलगा म्हणजे जनरलच आहे, असे तो सांगत होता. एकतर या पिढीला सक्तीचे लष्करी शिक्षण आहे. महाविद्यालयीन शिक्षणातच त्याची तरतूद केली आहे. नंतरही पुढे वर्षांतून किमान एक महिना तरी लष्कराला द्यावा लागतोच. अशा प्रकारच्या शिक्षणातून येणारी शिस्त ही तेथे दिसतेच. रस्त्यावरून कोणीही वाटेल तशी गाडी चालवत नाहीत. मोठय़ा रस्त्यावर वेगाची मर्यादा दिलेली असते. ती मोडली की सेन्सरमुळे वाहतूक विभागाला त्याची माहिती कळते व अचानक तुमच्या गाडीपुढे पोलिसाची गाडी येते. लगेचच दंड वगैरे प्रकार सुरू होतो. मात्र असे सहसा होतच नाही. कारण नियमांचे पालन होतेच.
अत्याधुनिक शिक्षण, संशोधन यात नवी पिढी गर्क आहे. त्यासाठी विद्यापीठे आहेत. दर्जेदार प्राध्यापक आहेत. पाणी प्रक्रिया, कचरा प्रक्रिया याचेच उद्योग तेथे असंख्य आहेत. त्यात बरीचशी तरुण मुलेमुली संशोधक, व्यवस्थापक म्हणून काम करताना दिसली. त्याशिवाय अन्य उद्योगही आहेत. तेथेही नोक ऱ्या असाव्यात. सगळ्या इस्राईलची लोकसंख्या आहे, साधारण ७० लाख. क्षेत्रफळही फार मोठे नाही. महाराष्ट्रापेक्षाही बरेच कमी आहे. सधन वर्गाचीच संख्या जास्त आहे. त्यामुळेच युरोपातील समाजात असतो, तो मोकळेपणा धार्मिकदृष्टय़ा कट्टर असूनही इस्राईली समाजात आहे. सुटीच्या वेळी निवांतपणे समुद्राच्या बीचवर बहुतेकजण पहुडलेले असतात. तसेच रस्त्यांवरच्या बाजारपेठांमध्येही मुक्तपणे फिरत असतात. त्यांची भाषा हिब्रू. परस्परांशी बोलताना ते आवर्जून याच भाषेत संवाद साधताना दिसतात. इतर वेळी मात्र त्यांनी इंग्रजी अंगवळणी पाडून घेतले आहे.
*तांत्रिक प्रगती
इस्राईलची लोकसंख्या आहे, फक्त ७० लाख. साहजिकच कामांच्या तुलनेत तेथे मनुष्यबळ कमी आहे. मात्र ती त्रुटी त्यांनी यंत्रांनी भरून काढली आहे. एका जलशुद्धीकरण कंपनीत चर्चा सुरू असताना सहज म्हणून कामगारांच्या संख्येबाबत विचारले. मोठा कारखाना फक्त ५० जण चालवत होते. रात्रीच्या वेळेस तर फक्त दोघे जण कंपनीचे सगळे काम पाहतात. म्हणजे काय करतात, तर ते फक्त स्क्रिन बघत असतात. त्यावर कंपनीत जे काही सुरू आहे ते सर्व दिसत असते. काही अडचण आली तर संगणकाद्वारेच ती तातडीने सोडवली जाते. ५० कामगारांमध्येसुद्धा १० जण केमिकल इंजिनीअरच होते. म्हणजे जलशुद्धीकरणासाठी लागणाऱ्या रसायनांचे प्रमाण एकदा निश्चित केले की त्यांचे काम संपले. त्यानंतर त्यांनी फक्त लक्ष ठेवायचे.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व त्यात सातत्याने संशोधन, हा आधुनिक इस्राईलच्या प्रगतीचा पाया आहे. रस्तेसुद्धा तेथे यंत्राद्वारेच झाडले जातात. पहाटे पहाटे येऊन गाडय़ा ते काम करून जातात. त्या गाडय़ाही केवळ एकेक व्यक्ती चालवत असते. कंपनीत कोणी फक्त बसले आहे, गप्पा मारताहेत किंवा हे कोण कंपनीत आले, काय चालले आहे म्हणून गर्दी झाली, असे चित्र दिसले नाही. एका कंपनीच्या बाहेर रस्त्यावर थोडे ऑईल सांडले. तर लगेचच तेथे बारीक वाळू टाकणारी गाडी आली. रस्त्यावर टाकलेली ती वाळू परत उचलली गेली. असे तीनचार वेळा केले गेले. अवघ्या काही मिनिटात रस्ता परत आहे तसा झाला.
*पाणीवापर
इस्राईलच्या सगळ्या दौऱ्यात अगदी जाणवलेली बाब म्हणजे पाण्याचा वापर. तेथे पाणी अतिशय काळजीपूर्वकपणे वापरले जाते. जवळपास प्रत्येक रस्त्यावर दोन्ही बाजूंना व मध्यभागीही छान झाडे लावलेली होती. त्यातही अनेक प्रकार होते. काही ठिकाणी मोठी उंच झाडे होती तर काही ठिकाणी छान रंगीबेरंगी फुलांचा ताटवा फुललेला होता. एकदा गाडी थांबली होती त्यावेळी जवळ जाऊन बघितले तर या झाडांच्या खालूनही पाण्याच्या छोटया नळ्या गेलेल्या.
पुरेसे पाणी आहे, मात्र त्याचा अपव्यय केला तर ते कमी पडेल, याची त्यांना जाणीव आहे. त्यातूनच त्यांनी हवे तेवढे व तितकेच पाणी वापरायचे, अशी सवयच लावून घेतली असावी. डिसेंबर ते मार्च हा तिथला पावसाचा हंगाम. दिसायला चार महिने, मात्र पावसाची वार्षिक सरासरी आहे अवघी १४२ .२ मिलीमीटर. त्याच्याही ६० ते ७० टक्के पाऊस पडतो. त्यामुळे पाणी जपून वापरणे, हे प्रत्येक इस्राईलीने आपल्या अंगी बाणवले आहे.
*देशप्रेम
इस्राईल ही ख्रिस्ताची जन्मभूमी आहे. तसेच जगातील ज्यू, ख्रिश्चन व मुस्लिम अशा तीन प्रमुख धर्मासाठींची ती पवित्र भूमी आहे. जगभर विखुरलेल्या ज्यूंना सन १९४८ मध्ये इस्राईल ही त्यांची स्वत:ची भूमी मिळाली. त्यामुळे विविध देशांमधून ते इस्राईलमधे आले व तेथील नागरिक झाले. (मुंबईतूनही बरेच नागरिक तेथे जाऊन त्या देशाचे अधिकृत नागरिक झाले आहेत.) मात्र त्यापूर्वी तेथे असणाऱ्या अरबांचा व यांचा कायमचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच इस्राईलला सतत जागृत राहावे लागते. त्यातूनच त्यांनी आपली नवी पिढी देशाप्रती, देशाच्या संरक्षणाप्रती सतत दक्ष असेल, अशी घडवली आहे. स्वत:पेक्षा देश मोठा आहे, हे त्यांच्या अगदी साध्यासाध्या वागण्यातूनही जाणवते. आठवडयाचे पाच दिवस काम, शनिवार-रविवार सुटी. त्या दिवशी मौजमजा, अशी युरोपीय जीवनशैली त्यांनी स्वीकारलेली आहे. देशाला प्रगतिपथावर न्यायचे आहे, हे काही ते प्रत्येक वेळी बोलून दाखवत नाहीत, मात्र त्यांच्या साध्यासाध्या कृतीमधूनही ते दिसत राहते.
लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या त्या हेल्मेट उचलणाऱ्या अधिकाऱ्याला चिडवायचेच म्हणून अगदी सहज विचारल्यासारखे विचारले की ‘तुम्ही स्वत: हेल्मेट उचलता हे काही ठीक दिसत नाही.’ तर त्यांनी उत्तर दिले, ‘का त्यात काय झाले, ही फक्त माझीच नाही तर माझ्या देशाची संस्कृती आहे. कोणीतरी येईल व ते काम करेल, म्हणून वेळ वाया का घालवायचा?’
गरीब इस्राईली असेलही, तसा तो दिसला मात्र नाही. रस्त्यांवरही पानाची, स्नॅक्सची वगैरे दुकाने फारशी कोठे दिसली नाहीत. तेल अवीवच्या अगदी गल्लीबोळातून एका रात्री फिरलो. काही माणसे घराबाहेर बसलेली दिसत होती. मात्र कुठेही अस्वच्छता नव्हती. बोळही चांगले स्वच्छ व कडेला असणारी दुकानेही एका रांगेत, नीट आखून ठेवल्यासारखी.
*भारतीयांबाबत आकर्षण
भारत व भारतीयांबाबत इस्राईलमध्ये चांगलेच आकर्षण आहे. तेल अवीवमधील एका जुन्या बाजारात थोडी भटकंती झाली. जवळपास प्रत्येक विक्रेता ‘ओह, इंडिया, कम कम, राज कपूर, अमिताभ बच्चन’ असे मोठय़ाने ओरडत बोलवत होता. भारतीय कलाकारांची ती लोकप्रियता पाहून आश्चर्य वाटले. एकाने तर ‘इचक दाना, बीचक दाना’ असे म्हणत थक्कच केले. आमच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणजे इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक होते. शिवाय लष्करातला मेजर पदाचा हुद्दाही त्यांच्याकडे होता. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी इस्राईलचा दोन हजार वर्षांचा इतिहासच आमच्यापुढे उभा केला. त्यांनी भारत व इस्राईल यांची तुलनाही केली. भारताला इस्राईलची मैत्री जवळची आहे, कारण भारतीय सैनिकही लढाऊ वृत्तीचा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतालाही शेजाऱ्यांचा त्रास आहे व इस्राईलही तोच त्रास जन्मापासून सहन करत आहे, त्या अर्थाने आपण समदु:खी आहोत, असा तर्क त्यांनी मांडला. इस्राईलने सामथ्र्यसंपन्न होऊन शिवाय भौतिक प्रगतीही करून घेतली आहे. त्यांची व आपली तुलना करता येणार नाही. कारण आपल्या समस्या वेगळ्या आहेत व त्यांच्या वेगळ्या. मुख्य समस्या आहे ती लोकसंख्येची. पण त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखे बरेच आहे.
-----------------------------
By - Internet
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा