सोमवार, ३१ जुलै, २०१७

मुंबई आणि मराठी माणुस…



हा लेख मी कुठल्याही पक्षावर दोषारोपण करण्यासाठी लिहिलेला नाही. हे फक्त वेळॊ-वेळी माझ्या मनात येणारे विचार आहेत.
कालचीच गोष्ट आहे मार्केटला शॉपींग करायला गेलो होतो. रस्त्याने जातांना सगळ्या दुकानांच्या पाट्यांकडे नजर गेली. “राज ठाकरे की जय “! असं मोठ्यांदा ओरडावंसं वाटलं. सगळ्या पाट्या ’मराठी’  मधे लिहिलेल्या होत्या. माझा ’मराठी प्रेमी”  उर अभिमानाने भरून आला. जय हो!  सगळ्या दुकानांच्या पाट्या मराठी मधे- अजून काय पाहीजे? चक्क एका झटक्यात एक धमकी दिली तर सगळ्या पाट्या मराठी मधे केल्या बघा सगळ्या .
पण हा आनंद फारच कमी काळ टिकला.   सगळ्या दुकानांच्या वरची नावं जरी देवनागरी मधे होती, तरी दुकानांचे मालक मात्र सगळे  हिंदी आणि गुजराथी वगैरे   आहेत हे प्रकर्षाने जाणवले . औषधालाही   पण एकही   दुकान मराठी माणसाचे  दिसले नाही जवळपास अर्धा  किमी च्या मुख्य रस्त्यावर .
एक पाटी   लावलेली पाहिली ’कला केंद्र मालाड ’मधे,- लिहिलं होतं, “दो शर्ट पे लेपटोप बेग फ्री”, तसेच दुसऱ्या  एका दुकानावर वाचले की  इथे ’पेंट पीस मिळेल’, तसेच एका बाजूला बोर्ड लागलेला दिसला, की “होल बाजूमे आहे.” -मला वाटतं हॉल बाजुला आहे लिहायचं असावं.
तर या अशा पाट्या वाचणे म्हणजे  निव्वळ मनोरंजन जरी होत असलं तरीही हे सगळं पाहिल्यावर  खूप वाईट झाले.  मराठी अस्मिता म्हणजे नेमकं काय?? मराठी अस्मिता म्हणजे नेमकं काय अपेक्षित असतं? हे सगळं पाहिलं की  मला प्रश्न पडतो, खरंच आपण काय मिळवलं हो मराठी पाट्या लावून? कसली मराठी अस्मिता जपली आपण??  जर सगळ्या दुकानांचे मालक मराठेतर असतील तर ह्या देवनागरी मध्ये लावलेल्या पाट्यांना काय अर्थ आहे?? हा  प्रश्न मेंदू कुरतडतोय , आणि मी  उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय कालपासून.
मुंबईतल्या इतर भागात मराठी पाट्या जरी असल्या , तरीही   माटुंगा भागात  मात्र दुकानांची नावं तामीळ मधे लिहिलेली दिसतात. जैन ज्वेलर्सचे पण नांव तामीळ मधे वाचून मला आश्चर्यच वाटले.  एका रांगेतल्या सगळ्याच दुकानांची नावं तामीळ मधे आहेत.  दक्षिण भारतात पाट्या पण त्यांच्या मातृभाषेत आणि दुकानांचे मालक पण स्थानिक दक्षिण भारतीय भाषिकच आहेत पण  आपल्याकडे तसे  का नाही  याचा विचार व्हायला हवा. असो.

मराठी लोकांची मुंबई असं आपण म्हणतो.पण खरंच  तसं आहे का? मुंबई मराठी लोकांची  आहे?

कदाचित वाचून वाईट वाटेल पण मुंबई मराठी माणसांची राहिलेली नाही. पूर्वीचे दिवस आठवतात का? साधारण जेंव्हा शिवसेना तयार झाली ते दिवस? ‘१९५५’ चं साल असेल .. तेंव्हा मराठी माणसांची टक्केवारी मुंबई मधे ६० टक्क्यांच्या वर होती  ( ज्या ६० टक्क्यांच्या जोरावर मुंबई सहीत संयुक्त महाराष्ट्र झाला )ती आज दुर्दैवाने १५ टक्यावर घसरलेली आहे .
ह्या ६० टक्क्यांमधे कोण होतं? माथाडी कामगार, मिल मजूर आणि इतर दुकानदार .. मुंबई पोर्ट ट्रस्ट वर हजारो गोदी कामगार काम करायचे . परदेशातून येणाऱ्या जहाजांची वर्दळ खूप जास्त होती. माथाडी कामगार म्हणजे गरीब कोंकणी मराठी माणूस मर मर काम करून दोन वेळची भाताची सोय करायचा.
रहाण्यासाठी  जागा, अर्थातच जवळपासच्या चाळींमध्ये! एका खोलीत  आपला संसार थाटायचा. लाल बाग, परळ सुतळी बाजार, लोहार चाळ भागातही अशा अनेक   चाळी होत्या.    नंतर कोणाचं डॊकं चाललं ते माहीत नाही, पण मुंबई पोर्ट   पोर्ट उरणला    (जवाहरल पोर्ट) नेणे हे मराठी माणसाच्या  पोटावर पाय देणारे ठरले. सगळा माथाडी कामगार वर्ग  मुंबईतून  उरणला तडीपार  झाला. मराठी माणसाचा टक्का घसरणे सुरु झाले मुंबईतले. “मला तर वाटतं की ही एक सोची समझी साजीश होती मराठी लोकांचे मुंबईतले वर्चस्व कमी  करण्यासाठी ? ”
सगळ्या कापड गिरण्या पण चांगल्या  जोरात सुरु होत्या. मुंबईचे दमट हवामान कापड उद्योगास पोषक म्हणून इथे चांगल्या क्वालीटीचे सुती कापड तयार केले जायचे. कोहिनूर, सेंच्युरी, डॉन वगैरे असंख्य मिल्स इथे सुरु होत्या . काही मिल मालकांनी तर कामगारांसाठी चाळी पण बांधल्या होत्या .  तेंव्हा  हा सगळा  कामगार वर्ग  लाल बाग, परळ , दादर, या भागात चाळींमध्ये रहात होता.. कुठल्याही जागी  पहा, तरी मराठी नावं  दिसायची – राणे, पवार, पाटील , ओक, जोशी ,भालेराव,  चितळे, परब, चव्हाण, केळकर,   प्रत्येक घराच्या पाटीवर.
कापड मील मालकांना पण भरपूर नफा मिळायचा . कित्येक मालक करोड पती झाले केवळ याच धंद्यावर. वर्षातून कमीत कमी एकदा तरी कामगारांना बोनस मिळायचा- आणि जास्तीत जास्त तीन वेळा.  या मिल मधे काम करणारा कामगार वर्ग परळ, लालबाग, प्रभादेवी , वरळी या भागात चाळीं मधे रहायचा. बऱ्याच मील मालकांनी तर मिलच्या आवारात पण चाळी बांधल्या होत्या कामगारांसाठी. नंतर तो ऐतिहासिक संप झाला, आणि     या सगळ्या  फायद्यातील मिल्स  लवकरच  एका पाठोपाठ  सगळ्या   बंद पडल्या- (की जमिनींचे सोन्या सारखे वाढलेले भाव बघून मालकांनी  कामगार नेत्यांच्या संगनमताने बंद पाडल्या  ?हा  प्रश्न अजूनही मला छळतो.)  मिल कामगार,   जे मुंबईला  चाळीत रहात होते, त्यांनी चाळीतली घरं विकून लवकरच सबर्ब मधे घरं घेणं सुरु केले,  तर काही लोकांनी  चाळीतली  घरं विकून गावाकडे परत जाणे पसंत केले.
काही  चाळी तर  रिडेव्हलेपमेंटच्या नावाखाली बिल्डर्स लॉबी ने ताब्यात  घेतल्या, आणि मग त्या चाळीत रहाणारा मराठी माणूस विरार, डोंबीवली , कल्याण , ठाणे या भागात स्थलांतरीत झाला. थोडक्यात सांगायचे तर या सगळ्यांचा परिणाम म्हणजे  मुंबईतला ’मराठी टक्का’ कमी होणे हाच झाला. त्यांची चाळीतली घरं कवडीमोलाने व्यापारी वर्गाने विकत घेतली,  बऱ्याच घरात तर गोडाउन्स उघडले गेले. सुतळी बाजार, नागदेवी क्रॉस लेन, धोबी तलाव, इत्यादी भागातल्या घरांमधे ऑफिसेस, दुकानं उघडली गेली . हार प्रकार बऱ्याच ठिकाणी दिसून येतो.
बंद पडलेल्या मिलच्या जागांवर सुरु झालेले शॉपिंग मॉल्स, किंवा बॉलींग ऍलीज वगैरे सुरु झालेल्या आहेत.  काही ठिकाणी हाय एंड हाउसींग प्रोजेक्ट्स सुरु करण्यात आलेले आहेत – ज्या मधे फ्लॅट्सच्या   किमती करोडॊंच्या घरात आहेत.  नुकताच एका जुन्या चाळींच्या जागेवर बांधलेल्या  अशा एका मोठ्या कॉम्प्लेक्स मधे जावे लागले एका माणसाला भेटण्यासाठी . मोठी १९ मजली टॉवर,    तिथे खाली लॉबी मधे  त्या बिल्डींग मधे रहात  असलेल्या लोकांच्या नावाची पाटी वाचली, तेंव्हा लक्षात आलं, की त्यामधे एकही मराठी नाव नाही! कुठे गेला मराठी माणूस  मुंबईतला??  मला तर कोणीच सापडत नाही, तुम्हाला जर कोणी  सापडला तर मला जरूर कळवा.
जर मला अजून पंधरा वीस  वर्षानी  पुण्यावर लेख लिहायची वेळ आली तर तो पण साधारण याच प्रकारचा असेल असे वाटते. पुण्यातली परिस्थिती पण काही फार वेगळी नाही-  तेंव्हा आत्ताच सावध हो  पुणेकरा….





By - Internet Posted on 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल