मंगळवार, ११ जुलै, २०१७

जमिनीमध्ये असावेत पुरेसे सेंद्रिय घटक



हिरवळीची पिके पेरताना व नांगरून टाकताना फॉस्फेटयुक्त खते द्यावीत किंवा हिरवळीचे पीक गाडल्यानंतर घेण्यात येणाऱ्या पिकांच्या स्फुरदाची खतमात्रा हिरवळीच्या खतात द्यावी. कडधान्यवर्गीय गवत उदा. टाकळा, तरवड, बरबडा, फुलोऱ्यास सुरवात होत असताना शेतात गाडल्यास त्यापासूनही जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविता येते. 
डॉ. अशोक कडलग, सौ. स्वाती वनारसे 

शेतजमिनीच्या संवर्धनात सेंद्रिय भागाचे विशिष्ट स्थान आहे. सेंद्रिय पदार्थ हे जमिनीतील महत्त्वाचा घटक आहेत. पिकांची मुळे, पालापाचोळा, भरखते वगैरे सडून त्यापासून सेंद्रिय पदार्थांची वाढ जमिनीत होते. हे सेंद्रिय पदार्थ जमिनीत तयार होत असताना सूक्ष्म कृमी-जंतूंचे कार्य फार महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे भरखतांचे किंवा सेंद्रिय घटकांचे विघटन होते. 

जमिनीतील सेंद्रिय भागाचे एकूण सेंद्रिय घटक आणि ह्यूमस असे दोन प्रकार आहेत. या घटकापैकी रापलेला भाग (ह्यूमस) हा तंतुमय पदार्थ, प्रथिने व तंतू यांच्या मिश्रणाचा बनलेला असून, त्यास एक प्रकारचा गडद रंग असतो. सेंद्रिय घटकांमुळेच जमिनीच्या प्राकृतिक व रासायनिक गुणधर्मावर परिणाम होतात. 
ह्यूमसचा परिणाम 
1) जमिनीस गडद रंगछटा प्राप्त होते. 
2) जमिनीची जलधारक व संग्राहक शक्ती वाढते. 
3) हलक्या जमिनीत मातीचे कण एकमेकांना जोडण्यास मदत होते, त्यामुळे जमिनीस चांगली घडण प्राप्त होते. 
4) भारी जमिनीत पोकळी वाढविली जाते. या सेंद्रिय भागामुळे जमिनी चांगल्या वाफश्यावर येतात. त्यामुळे निचऱ्यास मदत होते. 
5) मुक्त चुना असलेल्या जमिनीची घडण चांगली राहते व सेंद्रिय भागाचे विघटन जलद होत नाही. 
6) सेंद्रिय घटकांमुळे जमिनीत पोकळी तयार होते व त्यायोगे हवा, पाणी योग्य प्रमाणात राहते. 
7) जमिनीची सर्वसाधारण सुपीकता वाढते. 

जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण 
सर्वसाधारणपणे उष्ण कटिबंधातील कमी पावसाळी भागात सेंद्रिय भागाचे प्रमाण कमी असते. त्या अनुषंगाने ह्यूमसचेदेखील प्रमाण कमी असते. उष्ण हवामान सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण सुमारे एक टक्क्याच्या आसपास असते; परंतु जास्त पावसाळी भागात हे प्रमाण मात्र एक ते तीन टक्क्यांपर्यंत असते. सेंद्रिय भागाचे जमिनीतील प्रमाण मुख्यतः हवामान व नैसर्गिक वनस्पती यावर अवलंबून असते. उष्ण हवामानाच्या भागात सेंद्रिय घटकांच्या विघटनाची क्रिया प्रगत असते, त्यामुळे सेंद्रिय घटकांची नेहमी घट होत जाते. परंतु आर्द्र व मध्यम- उष्ण भागात मात्र अशी घट होत नाही. उलट काही प्रमाणात वाढच होते. आपली अधिकतर शेती उष्ण कटिबंधात व कमी पावसाळी भागात असल्याने आपल्या जमिनीवर भरखते देण्याची अत्यंत जरुरी आहे. नाही तर जमिनीची उत्पादनक्षमता कमी होईल.

...अशी करा जमिनीतील सेंद्रिय घटकांची वाढ 
उष्ण हवेमुळे व कमी पावसामुळे अधिक तर क्षेत्रातील सेंद्रिय भागाचे भस्मीकरण जलदगतीने होते. सेंद्रिय भागाचे विघटन व भस्मीकरण होणे ही बाब महत्त्वाची आहे. पण उष्ण हवेत ही प्रक्रिया फार जलद होते. त्यामुळे सेंद्रिय घटकांचे तयार होण्याच्या क्रियेत व भस्मीकरणाच्या क्रियेत समतोलपणाच राहत नाही. हा समतोलपणा आणण्यासाठी सेंद्रिय खते किंवा भरखते अधिक प्रमाणात जमिनीस पुरविली पाहिजेत. ही भरखते एकदाच पुष्कळ प्रमाणात दिली तर काम भागेल असे नाही. तर ती नियमितपणे प्रत्येक पिकास देणे योग्य ठरेल. सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढविता येणे तरी फार अवघड आहे. कारण हवामान बदलणे आपल्या हातातील गोष्ट नाही; परंतु त्याचा समतोल राखणे आपल्या हातची गोष्ट आहे. त्यासाठी कंपोस्ट खत, शेणखत, पालापाचोळा वगैरेंचा वापर करावा. तसेच धैंचा, ताग, शेवरी, बरबडा तसेच पार्थेनियम (फुलोऱ्यापूर्वी) वगैरे हिरवळीच्या खतांची पिके घेऊन ती फुलावर येताच जमिनीत गाडावीत. हिरवळीची पिके पेरताना व नांगरून टाकताना फॉस्फेटयुक्त खते द्यावीत किंवा हिरवळीचे पीक गाडल्यानंतर घेण्यात येणाऱ्या पिकांच्या स्फुरदाची खतमात्रा हिरवळीच्या खतात द्यावी. कडधान्यवर्गीय गवते उदा. टाकळा, तरवड, बरबडा, फुलोऱ्यास सुरवात होत असताना अथवा पार्थेनियम फुलोऱ्यापूर्वी शेतात गाडल्यास त्यापासूनही जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविता येते. 

सेंद्रिय आच्छादन फायदेशीर 
सुबाभूळ अथवा गिरिपुष्प यासारखी झाडेसुद्धा बांधावर लावावीत. या झाडांची एक मीटरवर वारंवार छाटणी करून त्यांच्या कोवळ्या फांद्या शेतात नुसत्या पसरल्या तरीही त्यांचा फायदा होतो. पहिला फायदा जमिनीवर आच्छादन करता येते. त्यामुळे पावसाच्या थेंबाने होणारी मातीची धूप थांबविता येते, तसेच जमिनीत जास्त पाणी मुरविता येते. बाष्पीभवनाद्वारे उडून जाणाऱ्या पाण्याचे संवर्धन करता येते. तसेच या फांद्यांचे कर्ब ः नत्र गुणोत्तर कमी असल्यामुळे त्याचे दीड ते दोन महिन्यांत भस्मीकरण होऊन पुढील पिकास अन्नद्रव्यांचा चांगला पुरवठा होतो. रासायनिक खताची मात्रा कमी करता येते. भस्मीकरणाची क्रिया सावकाश करण्यासाठी जमिनीस पालापाचोळ्याचा थोडा जास्त थर राहू द्यावा, यालाच सेंद्रिय आच्छादन असे म्हणतात. 
एकंदरीत जमिनीतील सेंद्रिय घटक हे पीक उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे व त्याची घट वरचेवर भरून काढणे अत्यावश्यक आहे. ज्या शेतीमध्ये जमिनीतील सेंद्रिय भागाचे प्रमाण कमी होत जाते ती शेती किफायतशीर तर नाहीच, परंतु ती अशास्त्रीय शेती होय. 

सेंद्रिय दुय्यम/अपशिष्ट अन्नघटकांचे प्रमाण 
प्रत्येक सेंद्रिय व अपशिष्ट पदार्थांचे रासायनिक विश्लेषण वेगवेगळे असते. त्यामुळे पदार्थांची निवड करताना त्यातील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाला महत्त्व येते. ज्या पदार्थांत जास्त अन्नद्रव्ये असतात तो पदार्थ जमिनीस दिल्यावर व तो कुजल्यानंतर पिकांना उपलब्ध होऊ शकणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाणही जास्त असते. निरनिराळ्या सेंद्रिय पदार्थांतील पिकांचे भागातील व त्यापासून तयार होणाऱ्या संख्येत खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण काय असते याची विस्तृत माहिती तक्ता क्रमांक 1 मध्ये दिली आहे. 

निरनिराळी सेंद्रिय भरखते व जोर खतातील सरासरी अन्नघटकांचे शेकडा प्रमाण 
क्र. +सेंद्रिय खताचे नाव +नत्र +स्फुरद +पालाश 
1. +शेणखत +0.56 +0.35 +0.78 
2. +गावखत +0.77 +0.44 +0.38 
3. +शहरी कंपोस्ट +1.19 +0.49 +0.92 
4. +भुईमूग पेंड +6.96 +1.22 +0.94 
5. +करडई पेंड +5.01 + 1.63 +0.63 
6. एरंडीची पेंड +4.55 +1.72 +0.70 
7. +खोबऱ्याची पेंड +3.00 +2.00 +1.50 
8. +सरकीची पेंड +7.00 +3.00 +2.00 
9. +करंज पेंड +4.00 +1.00 +1.00 
10. +जवस पेंड +5.50 +1.50 +1.20 
11. +नीम पेंड +5.00 +1.00 +1.50 
12. +तीळ पेंड +6.00 +2.00 +1.20 
13. +मोहाची पेंड +2.50 +0.80 +1.80 
14. +रक्ताचे खत +11.14 +0.86 +0.54 
15. +मासळीचे खत +6.00 +5.20 +1.36 
16. +हाडांचे खत +3.88 +21.56 +-- 
17. +जनावरांचे मांसाचे खत +8.50 +7.80 +-- 
18. +चामड्याचे खत +9.30 +7.50 +-- 
19. +मांसाचे खत +5 ते 6 +11 ते 13. +-- 
20. +शिंगांचे खत +10 ते 15 +1.0 +-- 
21 +प्रेसमड +1 ते 1.5 +4.5 +2 ते 7 

भविष्यकाळात शेतीकरिता उपलब्ध होणारे सेंद्रिय स्रोत 
अ.नं. +स्रोत +वर्ष 
+ 2000 +2010 +2025 
अ +उत्पन्न करणारे घटक 
1 +लोकसंख्या (दशलक्ष) +1000 +1110 +1300 
2 +जनावरांची संख्या (दशलक्ष) +498 +537 +596 
ब +अन्नद्रव्ये पुरविण्यासाठी उपयोगात येऊ शकणारे स्रोत 
1 +मानवी सुके मलमूत्र (दशलक्ष टन/वर्ष) +13 +15 +17 
2 +जनावरांचे सुके शेणखत (दशलक्ष टन) +113 +119 +128 
3 +पिकांचे अवशेष (दशलक्ष टन/वर्ष) +99 +112 +162 
क +प्रभावीपणे अन्नांश पुरविणारे स्रोत नत्र, स्फुरद व पालाश (N %& P2O5 %& K2O) (दशलक्ष टन/वर्ष) 
1 +मानवी विष्ठा +2 +2.24 +2.60 
2 +जनावरांचे शेण +6.64 +7.00 +7.54 
3 +पिकांचे अवशेष +6.21 +7.10 +20.27 

प्रभावीपणे अन्नांश पुरविणारे टाकाऊ जैविक पदार्थ 
अ.नं. +टाकाऊ जैविक पदार्थ +उपलब्धता (दशलक्ष टन प्रति वर्षे) +एकूण नत्र %% स्फुरद %% पालाश (दशलक्ष टन प्रति वर्षे) 
1. +शेणखत +279.8 +6.88 
2. +पिकांचे अवशेष +273.3 +7.15 
3. +जंगलातील पालापाचोळा +18.7 +0.24 
4. +ग्रामीण कंपोस्ट +285.0 +3.71 
5. +शहरी टाकाऊ पदार्थ +14.0 +0.29 
6. +मळी +3.2 +0.17 

सेंद्रिय घटकांचे फायदे 
सेंद्रिय पदार्थांच्या वापरामुळे जमिनीच्या गुणधर्मात होणारी सुधारणा व त्यामुळे होणारी उत्पादनातील वाढ 
सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्याने जमिनीच्या गुणधर्मात होणारी सुधारणा ही जमिनीचा प्रकार व सेंद्रिय पदार्थांचे स्वरूप यावर अवलंबून असते. पण सेंद्रिय पदार्थ वापरामुळे जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक सुधारणे, पाण्याचा निचरा वाढणे, जलधारणा शक्ती वाढणे, आकार घनता कमी होणे, सच्छिद्रता व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढणे, जमिनीचा सामू संतुलित राहणे, जमिनीतील ह्यूमसचे प्रमाण वाढणे असे किती तरी फायदे होतात. 
1) जमिनीतील मातीचे कण एकमेकांना चिकटून राहतात. त्यामुळे जमिनीची संरचना सुधारते, ठिसूळ जमिनीत चिकटपणा निर्माण होतो. जमिनीची जलधारणा आणि अन्नद्रव्य संग्राहकशक्ती वाढते. 
2) भारी जमिनीत हवेची पोकळी वाढते. सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनी चांगल्या वाफश्यावर येतात. त्यामुळे पाण्याचा चांगला निचरा होण्यास मदत होते. 
3) सेंद्रिय भाग चिकणमातीच्या क्रियाशील कणासारखा असतो. त्यामुळे त्यास आम्ल किंवा अल्क घट्ट चिकटतात. म्हणूनच हा भाग पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी उपयोगी पडतो. 
4) जमिनीतील जिवाणूंना सेंद्रिय पदार्थांतून अन्नाचा पुरवठा होतो. सेंद्रिय पदार्थ हळूहळू कुजतात. त्यामुळे पिकांना हळूहळू अन्न मिळत जाते. 
5) सेंद्रिय पदार्थांमुळे वनस्पतींना पोषणद्रव्ये विद्राव्य स्थितीत उपलब्ध होतात. उदाहरणार्थ, हवेतील नत्र वनस्पती घेऊ शकत नाही. वनस्पतींच्या मुळांवरील गाठींतील जिवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून जमिनीमध्ये सोडून देतात आणि मग वनस्पतींची मुळे ते शोषून घेतात व पिकांची वाढ होते. 
6) गंधकाची उपलब्धता पिकास जिवाणूच्या प्रक्रियेमुळे वाढते. 

















संपर्क - डॉ. कडलग : 9422227493
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

by - Agrowon

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल