गुरुवार, २१ जुलै, २०१६

ड्रॅगमफ्रुटने दिला दुष्काळात आधार


ड्रॅगमफ्रुटने दिला दुष्काळात आधार
-
Tuesday, October 09, 2012 AT 02:15 AM (IST)
Tags: agro special

पिलीव (जि. सोलापूर) येथील आनंदराव जाधव यांनी कमी पाण्यात, कमी खर्चात, हलक्‍या मुरमाड जमिनीत राज्यासाठी नव्या अशा ड्रॅगन फ्रूट फळपिकाची दोन एकरांवर लागवड केली आहे. चार वर्षांच्या अनुभवातून त्यांनी हे पीक यशस्वी करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. यंदाच्या दुष्काळातही त्यांना या पिकाने चांगला आधार दिला आहे. - भारत नागणे

सोलापूर जिल्हा रब्बी ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. अलीकडे वाढत्या सिंचन सुविधांमुळे साखरेचा जिल्हा म्हणून त्याची नवी ओळख तयार झाली आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती व बदलत्या प्रतिकूल हवामानामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना विविध पिकांचे नियोजन करणे अडचणीचे होत आहे. तरीही उत्पन्नवाढीचे स्रोत म्हणून शेतकरी पीक फेरपालटाबरोबरच नवनवीन फळपिकांचे प्रयोग करू लागले आहेत. पिलीव (जि. सोलापूर) येथील आनंदराव जाधव यांचे नाव त्यामध्ये घेता येईल. कमी पाण्यात, कमी खर्चात तेही हलक्‍या मुरमाड जमिनीत राज्यासाठी नव्या असलेल्या ड्रॅगन फ्रूट फळपिकाची त्यांनी दोन एकरांवर लागवड केली आहे. यंदाचे त्यांचे लागवडीचे चौथे वर्ष आहे.

नेहमी शेतीत विविध प्रयोग करून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचा जाधव यांचा प्रयत्न असतो. त्यांची पूर्वी सुमारे 18 एकर डाळिंब बाग होती; मात्र तेलकट डाग रोगामुळे ती काढून टाकावी लागली. त्यानंतर कमी खर्चात, कमी मजुरीत; मात्र चांगला पैसा देईल अशा पिकाच्या शोधात जाधव होते.

बंगळूरमध्ये लागला ड्रॅगन फ्रूटचा शोध !
2006मध्ये बंगळूर येथे जाधव यांचा मुलगा वीरधवल हा ऍग्री एम.टेक. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. तेथे एके दिवशी एका दुकानात ड्रॅगनफ्रूट फळ त्यांच्या नजरेस पडले. त्या वेळी त्यांनी कुतूहलापोटी 300 रुपये प्रति किलो दराने खाण्यासाठी हे फळ विकत घेतले. त्यानंतर त्यांची या फळाविषयी जिज्ञासा वाढत केली. दरम्यान, त्यांचा विजयकुमारन हा श्रीलंकेतील एक मित्र पीएच.डी. करण्यासाठी भारतात आला होता. त्याच्या मदतीने या फळाची इंटरनेटवरून अधिक माहिती घेतली. त्यानंतर लागवड करण्याच्या हेतूने श्रीलंकेतून या फळरोपांच्या काही फांद्या मिळाल्या. त्यानंतर पिलीव येथील कुसमोड शिवारातील दोन एकर क्षेत्रावर 2007मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा धाडसी निर्णय जाधव यांनी घेतला.

असे केले लागवड नियोजन -
पाण्याचा निचरा होणाऱ्या मुरमाड व हलक्‍या दोन एकर जमिनीमध्ये 14 बाय 7 फूट अंतरावर लागवड केली.
अर्थात, लागवड करण्यापूर्वी जाधव यांनी त्याची पुरेशी रोपे तयार करून घेतली. हे पीक निवडुंगाच्या प्रकारातील असल्याने त्याला आधार देण्यासाठी एकरी 400 याप्रमाणे दोन एकरांत सिमेंटचे 800 खांब उभे केले. त्यानंतर मातीचे भोद तयार करून खांबाच्या जवळ ड्रॅगन फ्रूटच्या एकावेळी चार बाजूस चार रोपांची लागवड केली. लागवड करतेवेळी प्रत्येकी एक पाटी शेणखत, सुपर फॉस्फेट, पोटॅश, युरिया, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत आदींची एक किलोप्रमाणे खतांची मात्रा देण्यात आली. पाणी कमी असल्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे रोज चार तास पाणी दिले.

ड्रॅगन फ्रूटचा बहर जून ते नोव्हेंबर असा सुमारे सहा महिने असतो. फळांचा बहर धरण्यासाठी वर्षातून एक वेळ प्रति झाड 20 ग्रॅम सुपर फॉस्फेट, 200 ग्रॅम पोटॅश, 100 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्र करून दिले. फळ बहराच्या काळात कीडनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या पंधरा दिवसांतून एकदा कराव्या लागल्या. लागवडीच्या पहिल्या वर्षी बागेतून प्रति फळ सुमारे 250 ग्रॅम वजनाची फळे मिळाली. शेतात नवे पीक व नवी फळे पाहून परिसरात सर्वत्र आश्‍चर्य व कुतूहल व्यक्त होत होते. उत्पादनही फार आले नाही, त्यामुळे जाधव यांनी ही फळे लोकांना खाण्यासाठी वाटली. पहिली दोन वर्षे प्रयोगात गेल्यानंतर मागील वर्षी दोन एकर बागेतून सुमारे 18 टन उत्पादन मिळाले. बंगळूर व पुणे येथील मार्केटमध्ये चांगला दर मिळाला. सुमारे साडेआठ लाख रुपयांचे उत्पादन दोन एकर क्षेत्रातून मिळाले. या वर्षी जानेवारीपासून ते जुलैपर्यंत जाधव यांना दुष्काळाने चांगलेच झगडावयाला लावले.

पाणीच नसल्याने बाग सोडून देण्याचे जाधव यांनी ठरवले. ठिबक सिंचन केले होते. जाधव म्हणाले, की पाऊस नसल्याने विहिरींमध्ये पाणी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पाणी देणे बंद केल्याने बागेचे थोडेफार नुकसान झाले; मात्र झाडे वाळून गेली नाहीत. जुलैनंतर मात्र पावसामुळे पाणी थोडे उपलब्ध होऊ लागले.

सध्या कॅनॉलला पाणी आले आहे, त्यामधून बागेला पाणी देणे सुरू आहे. त्यातून बहर फुलू लागला. अशा स्थितीत आतापर्यंत दीड टनांपर्यंत माल मिळाला आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत अजून काही माल बाजारात जाऊ शकेल. यंदा फळांच्या आकारानुसार किलोला 50 ते 150 रुपये दर मिळाला आहे. बाजारपेठेत मागणी चांगली आहे. दुष्काळी परिस्थितीतही आतापर्यंत या पिकातून सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

शेतकऱ्यांचा फायदा करणारे पीक
ड्रॅगन फ्रूट फळपिकाविषयी अधिक माहिती देताना आनंद जाधव यांनी सांगितले, की अनेक वर्षे सलग फळ देणारे हे पीक आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी झाडे कायमची जळून जात नाहीत. फळांचा आकार कमी होईल; मात्र बाग वाया जाणार नाही. या पिकाला रोगराई वा किडींचा धोकाही तसा कमी आहे. फार फवारण्या कराव्या लागत नाहीत.

साधले मार्केटिंग -
जाधव यांनी बाजारात फारसे पाहावयास न मिळणाऱ्या या ड्रॅगन फ्रूटच्या विक्रीचे अचूक तंत्र हेरले. त्यांनी सुरवातीस पुणे येथील मार्केटचा अंदाज घेतला. येथे त्यांना किलोला शंभर रुपयांच्या आसपास दर मिळाला. त्यानंतर अधिक दर मिळावा म्हणून बंगळूर, मुंबई, बेळगाव येथे विक्रीसाठी फळे पाठवण्यास सुरवात केली.

फळांचा आकार व गुणवत्ता, रंग यानुसार किलोला 50 रुपयांपासून ते 150, 175 ते 200 रुपयांपर्यंत दर मिळतो असे जाधव म्हणाले. बंगळूर व मुंबई येथील मॉलमध्ये ते विक्री करतात. तेथे किलोला 150 रुपयांपर्यंतही दर त्यांना मिळाला आहे. बाजारपेठेत या फळाला मागणी चांगली असल्याचे ते म्हणतात.
जाधव यांना लागवडीसाठी सुरवातीस एक लाख रुपये खर्च आला. त्यानंतर दर वर्षी शेणखतासाठी दहा हजार रुपये, कीडनाशके, तणनाशकांसाठी 15 हजार रुपये मोजावे लागले. फळ काढणीसाठी एका तोड्याला सहा महिला मजूर लागतात. यासाठी 100 रुपयांप्रमाणे दर आठवड्याला सहाशे रुपये मजुरी दिली जाते. फळांची मार्केटपर्यंत वाहतूक करावी लागली. यासाठी दहा किलो वजनाच्या एका बॉक्‍साठी 30 रुपये याप्रमाणे पुणे येथील मार्केटसाठी वाहतूक खर्च द्यावा लागला. उत्पन्नाच्या मानाने पिकासाठी येणारा खर्च तसा कमी आहे, त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांना परवडू शकते, असे जाधव म्हणाले.

ड्रॅगन फ्रूट देईल कोरडवाहू उत्पादकांना दिशा
जाधव यांचा मुलगा वीरधवल या फळाविषयी म्हणाले, की चीन, मलेशिया, श्रीलंका, थायलंड या देशांतील शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट पिकाने उभारी दिली आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पिकातून नवी दिशा मिळण्यास मदत होईल. कळी लागल्यापासून एक महिन्यामध्ये फळ येते. ते वरून गुलाबी रंगाचे आहे. फळाच्या सालींवर पाकळ्या असतात. साल गुलाबी व पाकळ्याही गुलाबी असतात. गोल आकाराच्या या फळाचा काप घेतला तर ते पेरूसारखे दिसते. आतला गर पांढरा आहे. हे फळ 250 ग्रॅम वजनापासून ते एक किलो वजनापर्यंतही मिळते. प्रति झाड 30 ते 35 किलो, तर एकरी 15 ते 18 टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते. फळांचा अधिकाधिक वापर होण्याच्या दृष्टीने सध्या अभ्यास करत आहे.

ड्रॅगन फ्रूटच्या प्रसारासाठी सांगलीच्या कृषी विभागाचा पुढाकार
कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट वरदान ठरू शकेल या हेतूने जत (जि. सांगली) येथील मंडल कृषी अधिकारी एस. एस. माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाधव यांच्या या प्रयोगाची दखल घेतली आहे. पिलीव येथे जाधव यांच्या पिकाची पाहणी केली आहे. कृषी विभागाच्या आत्मा योजनेतून जत भागातील निवडक शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी 50 टक्के अनुदान देण्याचा प्रस्ताव कृषी संचालकांकडे पाठवण्यात आल्याचे श्री. माळी यांनी सांगितले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनीही जाधव यांच्या या प्रयोगाची पाहणी करून त्यांचे कौतुक केले आहे. 



by - Agrowon 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल