गुरुवार, २१ जुलै, २०१६

कमी पाण्यात उत्पन्न देणारे ड्रॅगन फळ


‘कोरडवाहू जिल्हा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बदलत्या हवामानानुसार कमी पाण्यात येणार्‍या डाळिंब व बोरी यासारखी फळपिके घेऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, रोग, कीड व वाढलेल्या मजुरीमुळे ही पिके आता मागे पडत असून, अनेक शेतकरी पर्यायी पिकांचा शोध घेत आहेत. सगळीकडे पाण्याचा दुष्काळ असताना पिलीव (ता. माळशिरस) येथील आनंदराव जाधव या शेतकर्‍याने ‘ड्रॅगन फ्रूट‘ नावाच्या विदेशी ङ्गळ पिकाची केलेली लागवड त्यांना दुष्काळात वरदान ठरली आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणार्‍या व खायला चविष्ट असणार्‍या या पिकाविषयी संशोधन व त्यासाठी बाजारपेठ वाढविण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे.
पारंपरिक पिकांशिवाय विशिष्ट वनस्पतीसुद्धा शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळवून देतात. आपल्याकडील माळरानात किंवा वाळवंटी प्रदेशात आढळणार्‍या ‘निवडूंग’ या वनस्पतीच्या कुळातील ‘ड्रॅगन फ्रूट’ नावाची वनस्पती आता थायलंडचे प्रमुख ङ्गळपीक बनले आहे. चीन व श्रीलंकेतही हे पीक घेतले जाते. थायलंड व भारतातील हवामानात खूपच ङ्गरक आहे. तरीही उष्ण व कोरड्या हवामान असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍याला गेल्या तीन-चार वर्षांपासून ‘ड्रॅगन फ्रूट’ हे फळ चांगले साथ देत आहे. माळशिरस तालुका वगळता अन्य ठिकाणी या ङ्गळपिकाची ङ्गारशी माहिती नाही. हे ङ्गळ लोकप्रिय झाल्यास शेतकर्‍यांना चांगल्या प्रकारे त्याची लागवड करता येईल व उत्पन्न वाढविण्यासाठी एक चांगला स्रोत तयार होईल.
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आनंदराव जाधव यांना कोळमवाडी शिवारात सुमारे ५० एकर शेती आहे. त्यांनी १५ ते १६ एकर क्षेत्रावर ऊस, तर १७ एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे. या पिकांसाठी सतत मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च भागविण्यासाठी त्यांना कमी पाणी, कमी मजूर व कमी खर्चात ताजा पैसा मिळणारे पीक हवे होते. जाधव यांचा मुलगा वीरधवल हा बेंगळुरू येथे २००७ साली ‘फ्रूट प्रोसेसर’ मध्ये एम. टेक. करत असताना त्यावेळी काही विदेशी मित्रांसोबत ङ्गिरायला गेल्यावर तेथील मॉल व रस्त्यांवरील ङ्गळांच्या दुकानात ‘ड्रॅगन फ्रूट’ हे ङ्गळ दिसले. कुतूहल म्हणून त्यांनी हे आगळेवेगळे फळ ४५० रुपये प्रतिकिलो या भावाने विकत घेतले. या ङ्गळावरच त्यांचा श्रीलंकेतील मित्र पीएच. डी. करत होता. या फळाविषयी त्याच्याकडून व इंटरनेटवरून अधिक माहिती जाणून घेतल्यानंतर वीरधवल यांनी वडिलांशी चर्चा करून ‘ड्रॅगन फ्रूट’ लागवडीचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, त्यांनी बाजारपेठेचा अंदाज घेतला. मुंबई व बेंगळुरू येथील पंचतारांकित हॉटेल, मॉल व या शहरांतीलच विदेशी पर्यटकांची वर्दळ असणार्‍या प्रमुख रस्त्यावरील ङ्गळांच्या दुकानात ‘ड्रॅगन फ्रूट’ ला मागणी असल्याची खात्री केली. या फळाला स्वतःच बाजारपेठ मिळवावी लागणार, अशी मनाची तयारी करूनच जाधव यांनी उत्पन्नाला हातभार लावणार्‍या ‘ड्रॅगन फ्रूट’ची २ एकर क्षेत्रावर लागवड केली.

अशी केली ‘ड्रॅगन फ्रूट’ची लागवड
‘ड्रॅगन फ्रूट’च्या लागवडीसाठी आनंदराव जाधव यांनी सर्वप्रथम ही रोपे कोणाकडे मिळतील, याचा शोध घेतला. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील प्रधान यांच्याकडून ‘ड्रॅगन फ्रूट’ची चार रोपे त्यांनी आणली व ङ्गळबागेच्या अनुभवाच्या जोरावर या चार रोपांपासून सुमारे एक हजार रोपे तयार केली. यासाठी त्यांना सुमारे एक वर्ष लागले. लागवडीसाठी त्यांनी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मुरमाड माळरानाची जमीन निवडली. यात त्यांनी दोन एकरवर ७ फूट बाय १४ फूट अंतरावर सिमेंटचे खांब उभे करून घेतले. पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक भोद हा सुमारे तीन फूट उंचीचा करून घेतला. लागवडीपूर्वी प्रत्येक सिमेंटच्या खांबाभोवती एक पाटीभर ९० टक्के चांगले कुजलेले शेणखत घातले. त्यानंतर त्यांनी एका तारेचा मांडव केला. त्यासाठी एकाच ओळीतील प्रत्येक खांबावरून लोखंडी तार ओढली. त्यांनी प्रत्येक पोलच्या कोपर्‍यात एक याप्रमाणे प्लॅस्टिक पिशवीत तयार केलेल्या चार रोपांची लागवड केली. सन २००९ च्या जानेवारी महिन्यात लागवड पूर्ण झाली. ठिबक सिंचन संचाद्वारे त्याला पाणी देण्याची व्यवस्था केली.

एक वर्षातच फळधारणा
लागवडीनंतर त्यांनी सुपर ङ्गॉस्ङ्गेट, पोटॅश, मायक्रोन्यूट्रियंट व सिलिकॉन एकत्र करून त्याची अल्प प्रमाणात पहिली मात्रा दिली. पुन्हा एकदा ठिबकने चार तास पाणी दिले. एक महिन्याने खुरपण केल्यावर रोपांची वाढ चांगली होऊ लागली. वाढलेल्या रोपांना खांबाला सुतळीने बांधून रोपे तारेवर चढविली. आधारासाठी खांबाच्या शेवटच्या टोकाला चौकोनी रिंग तयार करून त्यावर रोपे सोडली. रिंग व तारेच्या आधाराने तेथे ‘ड्रॅगन फ्रूट’ चांगलेच पसरले. पानाच्या डोळ्यातूनच दुसरा डोळा ङ्गुटून त्याचा ङ्गुटवा वाढला. एक वर्षातच ङ्गळधारणा सुरू झाली.

फळांचा बहार सहा महिने
आनंदराव जाधव सांगतात की, ‘ड्रॅगन फ्रूट’ चा बहार जून ते नोव्हेंबरपर्यंत म्हणजे सहा महिने असतो. या काळात बहरावर बहर येतो. एकाच पानाला सुमारे तीन ते पाच कळ्या निघतात. कळीचे फूल व ङ्गुलातून ङ्गळ अशी क्रिया घडते. ङ्गळांचा बहार धरण्यासाठी वर्षातून एकच वेळा प्रतिझाड २०० ग्रॅम सुपर ङ्गॉस्ङ्गेट, २०० ग्रॅम पोटॅश, १०० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य व ५० ग्रॅम सिलिकॉन एकत्र करून द्यावे लागते. ङ्गळ बहराच्या काळात बुरशीजन्य व कीडनाशक औषधांच्या प्रतिबंधात्मक ङ्गवारण्या दर पंधरा दिवसांतून एकदा कराव्या लागतात. बाकी वर्षभर खते व ङ्गवारण्या द्याव्या लागत नाहीत.
‘ड्रॅगन फ्रूट’ च्या रोग व किडीबद्दल वीरधवल जाधव म्हणाले की, ‘ड्रॅगन फ्रूट’वर डाळिंबावरील ‘तेल्या’ सारखा रोग येतो. त्यामुळे त्याची पाने सडतात. उन्हाळ्यातच या रोगाचा प्रादूर्भाव होत असल्याची माहिती इंटरनेटवर मिळाली; पण आमच्या बागेत गेल्या तीन वर्षांत एकदाही अशा रोगामुळे नुकसान झाले नाही.

ठिबकद्वारे चार तासच पाणी
जाधव यांच्याकडे सुमारे ५० एकर बागायती क्षेत्र आहे. त्यामुळे त्यांना कायमच पाण्याचा ताण सहन करावा लागतो. त्यांनी सांगितले की, ‘ड्रॅगन फ्रूट’ ला आम्ही ठिबकद्वारे केवळ चारच तास पाणी देतो. एवढे पाणी दिल्यावर सुमारे एक किलो वजनाचे एक फळ मिळते. पाणी कमी असेल तर ङ्गळांना वजन कमी मिळते. यावेळी पावसाने ताण दिला. विहिरी व बोअर आटले, कॅनॉललाही पाणी आले नाही. अशा परिस्थितीत सुमारे चार ते पाच महिने ‘ड्रॅगन फ्रूट’ ला एकदाही पाणी देता आले नाही. अशा दुष्काळी परिस्थितीत जाधव यांना ‘ड्रॅगन फ्रूट’ वरदानच ठरले आहे. ‘ड्रॅगन फ्रूट’ ची बाग पाण्यावाचून जळून गेली नाही. पाणीच नसल्यामुळे केवळ दोनशे ते अडीचशे ग्रॅम वजनाची फळे मिळाली असल्याचे ते म्हणाले. पाणी नसेल तरीही ‘ड्रॅगन फ्रूट’ चा बहार धरता येतो, असा अनुभव जाधव यांना आला. ही झाडे हवेतून पाणी उपलब्ध करत असतील, असा अंदाज व्यक्त करून खरेतर यावर संशोधन व्हायला पाहिजे, असे ते सांगतात.

दोन एकरातून १८ टन उत्पादन
जाधव यांना दोन एकर ‘ड्रॅगन फ्रूट’ च्या बागेतून गतवर्षी सुमारे १८ टन उत्पादन मिळाले. ते मुंबई व बेंगळुरूच्या मॉल व ङ्गळांच्या दुकानात विकून सुमारे ८ लाख रुपये उत्पन्न मिळालेे. प्रतिकिलो २०० ते २५० रुपयेे भाव मिळाला. वाहतुकीसाठी सुमारे अडीच लाख रुपये; तर खते, औषधे व मजुरीवर एकरी सुमारे ५० हजार रुपये खर्च झाला. दोन एकरात साडेतीन लाख रुपये खर्च वजा जाता त्यांना सुमारे ४ लाख ५० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.

जतच्या कृषी अधिकार्‍यांची शिफारस
कमी पाण्यात येणार्‍या व शेतकर्‍यांना जास्त नङ्गा मिळवून देणार्‍या ‘ड्रॅगन फ्रूट’ या फळपिकाची लागवड करण्याची शिङ्गारस सांगली जिल्ह्यातील जत येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केली असल्याचे जत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मुकुंद जाधवर यांनी सांगितले. जाधवर व मंडळ कृषी अधिकारी एस.एस. माळी यांनी आनंदराव जाधव यांच्या ‘ड्रॅगन फ्रूट’ च्या बागेला वेळोवेळी भेटी देऊन अभ्यासही केला आहे. ‘ड्रॅगन फ्रूट’ च्या लागवडीबाबत राज्यांतर्गत शेतकर्‍यांसाठी ‘आत्मा’ योजनेतून तीन दिवसांचे शिबीरही देण्यात येणार असल्याचे जाधवर यांनी सांगितले.


‘ड्रॅगन फ्रूट’ विषयी संशोधन करणार
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांत अद्याप ‘ड्रॅगन फ्रूट’ विषयी संशोधन झालेले नाही. एखाद्या नवीन ङ्गळाची लोकांना जोपर्यंत आवड निर्माण होत नाही, तोपर्यंत त्याला बाजारपेठ उपलब्ध होत नसते. अशावेळी बाजारपेठेचा अंदाज घेऊनच एखाद्या नवीन पिकाची लागवड करणे योग्य ठरेल. आम्ही ‘ड्रॅगन फ्रूट’ चे पीक घेणार्‍या शेतकर्‍याच्या शेतावर जाऊन नक्कीच त्याविषयी अभ्यास करू. विदेशातील वातावरण व आपल्याकडील वातावरण वेगळे असले तरी बहुतांश पिके कोणत्याही वातावरणात येतात; पण त्याचे उत्पादन कमी-जास्त होते, चवीतही ङ्गरक पडतो.
- डॉ. श्रीमंत रणपिसे, उद्यानविद्या विभागप्रमुख, महात्मा ङ्गुले कृषी विद्यापीठ, राहुरी
**
‘ड्रॅगन फ्रूट’ विषयी…
या वनस्पतीच्या पानालाच हे ङ्गळ लागते. कळी लागल्यापासून एक महिन्यात हे ङ्गळ पक्व झाल्यावर ते गुलाब पुष्पासारखे दिसते. ङ्गळाच्या सालीवरच पाकळ्या असतात. साल गुलाबी व पाकळ्याही गुलाबी व त्यांना हिरवी छटा असते. अंडाकृती आकाराच्या या फळाचा काप घेतला तर ते पेरूसारखे दिसते. आतला गर पांढरा व त्यात सब्जासारख्या बारीक काळ्या रंगाच्या बिया आहेत. आंबूस व थोडेसे गोड चव असलेले हे ङ्गळ गंधहीन आहे. हे ङ्गळ सुमारे एक किलो वजनाचे होते. प्रतिझाड सुमारे ३० ते ३५ किलो, तर एकरी सुमारे १५ ते १८ टन उत्पादन मिळत असल्याचे आनंदराव जाधव यांनी सांगितले.
‘ड्रॅगन फ्रूट’ खायचे कसे?
नवीन माणसाला हे ङ्गळ कसे खायचे, ते माहीत नसते. या फळाची साल काढून गराच्या चकत्या करून हे ङ्गळ खाता येते किंवा केळाची साल अर्धवट सोलून केळ जसे खातो तसेही ते खाता येते. कात्री किंवा चाकूच्या साहाय्याने ङ्गळावर उभे चार काप केले तर साल अर्धवट सोलता येते. अशावेळी ते ङ्गळ आईस्क्रीमसारखेच दिसते. हे फळ ङ्ग्रीजमध्ये थंड करून खाल्ल्यास ङ्गारच छान लागते.
संपर्क :
आनंदराव जाधव,
पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर
मो. नं. ९६८९८१६१७६
***
एकरी १० ते १५ टनांपर्यंत उत्पादन
‘ड्रॅगन फ्रूट’ ही वनस्पती मध्यम पाऊस असणार्‍या कोरड्या हवामानात वाढते. अतिपाऊस व अतिथंड हवामानात तिची वाढ होत नाही. एका वर्षातून पाच ते सहा वेळा फळांचा बहार येतो व एकरी १० ते १५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. सोलापूर जिल्हा हा कोरडवाहू असल्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी या वनस्पतीची लागवड करायला हरकत नाही. कृषी विद्यापीठांनी याबाबत अधिक संशोधन करण्याची गरज आहे. अतिपाऊस व पाण्यामुळे फळकुज होऊ शकते. त्याचप्रमाणे झेंटोमोनस कॉम्पेट्रिस या बुरशीमुळे ही वनस्पती ‘मर’ रोगाला बळी पडते. या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची फुले रात्री उमलतात म्हणून तिचे परागसिंचन वटवाघूळ व पतंग यांच्यामार्फत होते. फुले रात्री उमलत असल्याने या वनस्पतीला ‘मून फ्लॉवर’ किंवा ‘क्वीन ऑफ नाईट’ असेही म्हणतात.
- प्रा. ए. एस. चंदनशिवे, वनस्पतीशास्त्र विभाग, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर, जि. सोलापूर
मो. नं. ९४२३७५१३५५
‘ड्रॅगन फ्रूट’ ला मोठा वाव
कमी पाण्यात पिकणार्‍या ‘ड्रॅगन फ्रूट’ विषयी परदेशी भाजीपाला व ङ्गळपिके विषयातील प्रयोगशील शेतकरी व मुंबईस्थित निसर्ग निर्माण संस्थेचे संचालक मकरंद चुरी व तांत्रिक संचालक अंजली चुरी यांनी सांगितले की, ‘ड्रॅगन फ्रूट’ हे निवडूंंग (कॅक्ट्स) वर्गातील ङ्गळपीक असून ते मुख्यतः व्हिएतनाम देशात उत्पादित होत असले तरी या फळपिकाची लागवड थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे. ‘ड्रॅगन फ्रूट’ चे तीन प्रकार आहेत.
वरून गुलाबी, पिवळा आणि वरून गुलाबी व आतून पांढरा गर असे हे तीन प्रकार आहेत. यातील वरून गुलाबी दिसणार्‍या ङ्गळाचा गरही गुलाबी, तर पिवळ्या रंगातील ङ्गळाचा गर पांढरा असतो. ‘ड्रॅगन फ्रूट’ आपल्याकडील हवामानातही चांगले येत असल्यामुळे त्याची चवही चांगलीच आहे.
या ङ्गळाला मुंबई, दिल्ली, कोलकाता व गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये चांगली मागणी आहे. आपल्या इथल्या आणि परदेशातील ‘ड्रॅगन फ्रूट’ च्या चवीत ङ्गारसा ङ्गरक नाही; मात्र आपल्याकडील ङ्गळांचा आकार थोडा कमी आहे. आर्द्रता जास्त असेल तर ङ्गळांचा आकार आणि वजनही चांगले मिळते. तरीही आपल्याकडील ‘ड्रॅगन फ्रूट’ चे ङ्गळ सुमारे १००० ग्रॅम वजनाचे असते.
शेतकर्‍यांनी ‘ड्रॅगन फ्रूट’ च्या लागवडीपूर्वी त्याची शास्त्रीय माहिती घ्यावी. बाजारपेठेतील मागणी व त्याच्या दराचा सखोल अभ्यास करून मगच त्याची लागवड करावी. ‘ड्रॅगन फ्रूट’ बाबत आम्ही शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत आहोत. शासनाच्या ‘आत्मा’ योजनेतून आम्ही आजपर्यंत सुमारे ५०० हून अधिक शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. ‘ड्रॅगन फ्रूट’ ची लागवड व त्याच्या स्ट्रक्चरसाठी शासनाने शेतकर्‍यांना सबसिडी मिळणे गरजेचे आहे, अशी माहिती परदेशी भाजीपाला व ङ्गळपिके विषयातील प्रयोगशील शेतकरी व मुंबईस्थित निसर्ग निर्माण संस्थेचे संचालक मकरंद चुरी व तांत्रिक संचालक अंजली चुरी यांनी दिली.
संपर्क : मकरंद चुरी
निसर्ग निर्माण ऍग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि.
१४, अजय शॉपिंग सेंटर,
टी. एच. कटारिया मार्ग,
माटुंगा, मुंबई
दूरध्वनी क्र.०२२-२४३०१४७/२४३६०१९३/२४३८०७५०
——-
- मोहन काळे, सोलापूर (http://www.adhunikkisan.com/…/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-…/)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल