गुरुवार, २१ जुलै, २०१६

ड्रॅगन फ्रूट फळाविषयी ....


मूळ मेक्‍सिको देशातील ड्रॅगनफ्रूट या फळपिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशियाई देश आदी ठिकाणी केली जाते. कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स, इंडोनेशिया आदी देशांत या फळपिकाची लागवड होते. हवाई बेटे, इस्राईल, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस आदी ठिकाणीही त्याची लागवड आढळून येते. 

आशियाई देशांतील ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्र
भूषण तायडे, योगेश म्हेत्रे, संदीप विधाते

ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्‍वासक फळपीक होऊ शकते. मूलतः मध्य अमेरिकेपासून ते थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बांगला देश आदी ठिकाणी ते यशस्वीरीत्या व्यापारी पीक म्हणून घेतले जाते. आता ते भारतातही येऊन पोचले आहे. काही प्रमुख आशियाई देशांत त्याची लागवड कशा प्रकारे केली जाते, याबाबत काही महत्त्वाची माहिती येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस (Hylocereus) ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून लाल रंग आतील गर पांढरा, वरून लाल रंग आतील गर लाल व वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा अशा तीन तीन प्रकारांत हे फळ येते. ड्रॅगनफ्रूटला आशियाई देशांत पिताहाया किंवा पिताया (pitahaya किंवा pitaya) या नावानेही संबोधले जाते.

मूळ फळ मेक्‍सिकोचे
हे फळ मूळचे मेक्‍सिकोचे असल्याचे मानले जाते. तेथून ते मध्य अमेरिका व जगभरातील अन्य देशांत प्रसारीत झाले. हे पीक जगभरात उष्णप्रदेशीय देशांमध्ये घेतले जाते. याची वेल छत्रीसारखी दिसते. याला वाढीसाठी द्राक्षांप्रमाणे आधाराची गरज असते. साधारणतः या वेलीची आयुष्यमर्यादा 15 ते 20 वर्षे एवढी असते. वाढीसाठी व आधारासाठी स्तंभ (पोल) व गोल कड्या यांची निवड महत्त्वाची आहे. मूलतः पोषक जमीन, नियंत्रित व नियमितपणे खते दिल्यास त्यापासून योग्य उत्पादन घेता येते.

ड्रॅगन फ्रूट पिकाची ठळक वैशिष्ट्ये
- किमान पाणी देणे आवश्‍यक
- किमान देखभालही गरजेची
- भारतीय हवामान पोषक
- 2 ते 3 वर्षांत आर्थिक गुंतवणूकीचा परतावा होऊ शकतो.
- "कंटिंग्ज' पासून लागवड केली जाते.
- स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी

उपयोग - 
- "ड्रॅगन फळ' मधुमेह नियंत्रित करते.
- शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
- संधिवात रोखण्यास मदत करते.
- दमा रोखण्यास मदत होते.
- यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.

लागवड पद्धत
जमीन- या फळपिकासाठी जमीन योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम व जमिनीचा सामू 6.1 ते 7.5 च्या दरम्यान असावा.

जमिनीची पूर्वमशागत- नांगरणी मध्यम खोल व तणमुक्त करावी. जमिनीची नीट उभी-आडवी नांगरट करून कुळवाच्या आडव्या-उभ्या दोन पाळ्या देऊन, धसकटे, तण वेचून जमीन स्वच्छ व भुसभुशीत करून घ्यावी.

लागवडीची पद्धत - 
ड्रॅगन फ्रूट ची लागवड सामान्य पद्धतीने म्हणजेच "कंटिंग्ज्‌' (cuttings)द्वारे केली जाते. हे मातृवनस्पतीपासून मिळतात. कटिंगची लांबी साधारणतः 20 सें.मी. पर्यंत असावी. कटिंग्सची निवड करताना ती रोग व कीडमुक्त असावी. पॉटमध्ये माती- शेणखत- वाळू यांचे 2ः1ः1 किंवा शेणखत -माती- वाळू यांचे 1ः2ः1 प्रमाण घेवून कटिंग्ज लावाव्यात व हे पॉट सावलीमध्ये ठेवावेत.

लागवडीचे अंतर - 
दोन झाडांतील व ओळींतील अंतर 2 बाय 2 मीटर असावे. लागवडीसाठी 60 बाय 60 बाय 60 सेंमी. आकाराचे खड्डे घेऊन ते माती, शेणखत व 100 ग्रॅम फॉस्फेटने (प्रति खड्डा) भरून घ्यावेत.

वनस्पती घनता
एका एकरामध्ये जवळपास 1700 रोपे घेता येतात.

वाढ व आकारासाठी बांधणी - 
ड्रॅगन फ्रूटची योग्य वाढ आणि विकास करण्यासाटी ठोस किंवा लाकडी स्तंभाची उभारणी करणे आवश्‍यक असते. मजबूत व पक्‍क्‍या स्तंभासाठी "आरसीसी सिमेंट क्रॉंक्रीट पोल' उभारले जातात. अपरिपक्व खोड स्तंभाना बांधावे व बाजूंची (लॅटरल) खोडे ही मर्यादित ठेवून मुख्य 2 ते 3 खोडांची वाढ करावी.

खत व्यवस्थापन
फळाच्या वाढीसाठी शेणखत किंवा सेंद्रीय खत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. प्रत्येक वनस्पतीला किंवा वेलीला 10 ते 15 किलो शेणखत किंवा सेंद्रिय खत द्यावे. त्यानंतर दरवर्षी सेंद्रिय खतांमध्ये 2 किलोने वाढ करावी. ड्रॅगन फ्रूट फळाला सेंद्रीय खतांप्रमाणेच रासायनिक खतांची सुद्धा आवश्‍यकता असते. बाह्यवृद्धीसाठी व रोपाच्या वाढीसाठी पोटॅश, फॉस्फेट व युरिया यांची गरज भासते.

पाणीव्यवस्थापन - 
ड्रॅगन फ्रूटला इतर फळांच्या तुलनेत कमी पाणी आवश्‍यक आहे. मात्र, लागवडीच्या काळात, फुलोरा व विकास टप्प्यात तसेच कोरड्या, उष्ण हवामानाच्या वेळी पाण्याच्या वारंवार पाळ्या देणे आवश्‍यक आहेत. पाण्याच्या योग्य वापरासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो.

पीक संरक्षण
या पिकात प्रमुख असे कीड-रोग अद्याप आढळलेले नाहीत. मात्र काही देशांमध्ये बुरशीजन्य रोग आढळले आहेत. अतिवृष्टीत फळगळ होऊ शकते किंवा फळकूज होऊ शकते. अति पाणीदिले गेल्याने फळ लवकर पक्‍वतेत येऊन ते वेलीवरून गळूही शकते. पक्षांचाही या फळांना त्रास होऊ शकतो. खोडांवर जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन फळांवर तपकिरी डाग येऊ शकतात.

फळ काढणी - 
लागवडीच्या एक वर्षांनंतर फळधारणा सुरू होते. यात मे ते जूनमध्ये फुलधारणेला सुरवात होते व ऑगस्ट ते डिसेंबर या काळात फळधारणा होते. साधारणतः फुलधारणेच्या एका महिन्यानंतर फळ तोडणीसाठी किंवा काढणीसाठी तयार होते. अपरिपक्व फळाचा रंग हिरवा असतो व जेव्हा फळ काढणीला येते तेव्हा त्याचा रंग लाल होतो.

उत्पादन - 
फळाचे उत्पादन हेक्‍टरी 10 टन अपेक्षित आहे. प्रत्येक फळ 300 ते 600 ग्रॅम वजनापर्यंत जाऊ शकते. योग्य व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन व त्याची गुणवत्ता वाढवल्यास व दर चांगले मिळाल्यास ड्रॅगनफ्रूट हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे फळपीक ठरेल यात शंका नाही.

मलेशिया, श्रीलंकेतील लागवड

मलेशिया, थायलंड, श्रीलंका, बांगलादेश आदी देशांत स्वतंत्र व मिश्रशेती पद्धतीतही याची लागवड केली जाते.

हवामान व जमीन-
जमीन योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम असावी. जमिनीचा सामू 6.1 ते 7.5 दरम्यान असावा. या पिकासाठी तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस असावे लागते. वार्षिक पर्जन्यमान 500 ते 1500 मिलिमीटर व याचबरोबर एकाडएक कोरडे व आर्द्रयुक्त हवामान आवश्‍यक असते. या पिकाला चांगला सूर्यप्रकाश मानवतो. मात्र दीर्घकाळ सूर्यप्रकाश या पिकासाठी अनुकूल नसतो. अशावेळी त्याला संरक्षित आच्छादन देण्याची गरज असते. ड्रॅगनफ्रूट हे पीक कमी प्रतिच्या जमिनीला व तापमानातील चढउताराला सहन करू शकते. मात्र कोरडे पाण्याचा निचरा होणारी जमीन अनुकूल असते. सेंद्रीय घटकांचा समावेश असलेली 10 ते 30 टक्के वालुकामय जमीन पिकाच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. वालुकामय जमिनीतही हे पीक येऊ शकते.

लागवड पद्धत - 
मलेशियातील "सेलांगर' या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटचे एकात्मिक शेती या पद्धतीत उत्पादन घेण्यात येते. यासाठी लागवडीकरिता मांडव पद्धतीचा वापर करण्यात येतो. एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंतचे अंतर 1 फूट व दोन ओळींतील अंतर सहा फूट म्हणजेच 1 x 6 फूट ठेवले जाते. या पद्धतीचा वापर करण्यामागचा हेतू की यामुळे वेलीला वर्षभर आधाराची गरज असते.

खते - 
पिकाला दोन्ही पद्धतीने म्हणजेच जमिनीतून खते तसेच पानांवर फवारणी (फोलीअर स्प्रे) या पद्धतीने खते दिली जातात. नत्र, स्फुरद, पालाश आदी खते प्रत्येकी दोन आठवड्यांत वाढीच्या अवस्थेनुसार 10 ते 20 ग्रॅम प्रतिवेल याप्रमाणे दिली जातात. त्याचबरोबर प्रत्येकी दोन आठवड्यांनंतर "फोलीअर स्प्रे'सुद्धा घेतला जातो.

मिश्रपीक
ड्रॅगन फ्रूट सोबत अननसासारखी पिकेही घेतली जातात.

टीप- संबंधित लेख हा भारतातील कृषी विद्यापीठे वा संशोधन संस्थांच्या शिफारसींवर आधारलेला नाही. तर आशियाई देशांत उदा. श्रीलंका, मलेशिया आदी देशांत ड्रॅगनफ्रूटची ज्या पद्धतीने लागवड होते त्यातील माहितीवर आधारलेला दिशादर्शक लेख आहे. 



by- Agrowon
संपर्क - भूषण तायडे- 9766808324  (लेखक के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथे कार्यरत आहेत.) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल