बुधवार, २७ जुलै, २०१६

एक उद्योगपती - अशोक खाडे


४५ वर्षापूर्वी एक अस्पृश्य म्हणून सांगलीतील ज्या पेड गावाने १०-१२ वर्षाच्या बबलूला विहिरीवर पाणी भरू दिलं नाही, मंदिरात कधी प्रवेश करू दिला नाही त्याच गावात जेव्हा बबलू आपल्या आलिशान बीएमडब्लू गाडीतून ४५०० लोकांना रोजगार देणारा ५५० कोटींची उलाढाल करणारा एक उद्योगपती अशोक खाडे म्हणून परतला तेव्हा मात्र गावाने त्याच्यासाठी पायघड्या अंथरल्या.

दास ऑफशोअर इन्जिनिअरिन्ग कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अशोक खाडेंची कहाणी कुठल्याही हिंदी चित्रपटातील नायकाला शोभेशी आहे. बालपण खूप हलाखीचे गेले. ५ भावंडानी उपाशी पोटी झोपणे काय असते हा अनुभव त्यांनी बालपणीच घेतला. १९७२ मधील दुष्काळा मध्ये एका कुटुंबाने त्यांना २ वेळच्या जेवणासाठी दत्तक घेतले होते. शिक्षणाची आवड होती. डॉक्टर बनायचे स्वप्नं होते. परंतु परिस्थितीने त्यांना माझगाव डॉकमद्धे नोकरी करणं भाग पाडलं. नोकरी करता करताच त्यांनी मेकानिकल इन्जिनेअरिन्गची पदवी मिळवली. १९९२ मद्धे ४ मुलीना मागे सोडून त्यांच्या काकांचे निधन झाले तेव्हा त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. आपल्या १७ वर्षाच्या नोकरीतील अनुभवाने आणि १९९१ साली सुरु झालेल्या जागतिकीकरणाने त्यांना व्यवसायात पदार्पण करायची प्रेरणा मिळाली, आणि पहिलीच ऑर्डर त्यांना माझगाव डॉक मधूनच मिळाली. त्यावेळी तिथे चेअरमन पदी असलेले क्याप्टन पी वी नायर त्यांच्याकडे सल्लागार म्हणून काम करतात.

१९९३ ते २०११ पर्यंत त्यांनी प्रचंड झेप घेतली. ओ एन जीसी, ब्रिटीश ग्यास अशा नामवंत कंपन्यांसाठी ते भर समुद्रात प्रकल्प बांधणीचे काम करतात. दास ग्रुपच्या आज इन्जिनिअरिन्ग, डेअरी, अग्रो प्रोडक्ट्स, रस्ते बांधणी, उड्डाण पूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत ७ कंपन्या आहेत. ५०० हेक्टर जागेवर द्राक्ष आणि उसाचे मळे आहेत. मुंबईतील पहिला स्कायवॉक वांद्रे येथे त्यांनी बांधला. सायन, घाटकोपरचे स्काय वॉकहि त्यांनीच बांधलेले आहेत. आज एक मराठी उद्योगपती दुबईच्या शेखचा भागीदार आहे हि तमाम मराठी जनांना अभिमानस्पद गोष्ट आहे.न्यूयॉर्क टाईम्सने तसेच येथील इंग्रजी दैनिकानीही त्यांच्या कर्तृत्वाची दाखल घेतली, पण एकाही प्रमुख मराठी दैनिकाने मात्र त्यांच्या कार्याची दाखल घेतली नाही हि खेदाची गोष्ट आहे. आपण मात्र त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करूया.

तात्पर्य - कधी कधी संधी ह्या तुमच्या सभोवतालीच असतात. त्या हेरून त्यांचं सोनं करणं मात्र तुमच्या हाती असतं.




By - Unknown Author  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल