बुधवार, २७ जुलै, २०१६

एक उद्योगपती - अशोक खाडे


४५ वर्षापूर्वी एक अस्पृश्य म्हणून सांगलीतील ज्या पेड गावाने १०-१२ वर्षाच्या बबलूला विहिरीवर पाणी भरू दिलं नाही, मंदिरात कधी प्रवेश करू दिला नाही त्याच गावात जेव्हा बबलू आपल्या आलिशान बीएमडब्लू गाडीतून ४५०० लोकांना रोजगार देणारा ५५० कोटींची उलाढाल करणारा एक उद्योगपती अशोक खाडे म्हणून परतला तेव्हा मात्र गावाने त्याच्यासाठी पायघड्या अंथरल्या.

दास ऑफशोअर इन्जिनिअरिन्ग कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अशोक खाडेंची कहाणी कुठल्याही हिंदी चित्रपटातील नायकाला शोभेशी आहे. बालपण खूप हलाखीचे गेले. ५ भावंडानी उपाशी पोटी झोपणे काय असते हा अनुभव त्यांनी बालपणीच घेतला. १९७२ मधील दुष्काळा मध्ये एका कुटुंबाने त्यांना २ वेळच्या जेवणासाठी दत्तक घेतले होते. शिक्षणाची आवड होती. डॉक्टर बनायचे स्वप्नं होते. परंतु परिस्थितीने त्यांना माझगाव डॉकमद्धे नोकरी करणं भाग पाडलं. नोकरी करता करताच त्यांनी मेकानिकल इन्जिनेअरिन्गची पदवी मिळवली. १९९२ मद्धे ४ मुलीना मागे सोडून त्यांच्या काकांचे निधन झाले तेव्हा त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. आपल्या १७ वर्षाच्या नोकरीतील अनुभवाने आणि १९९१ साली सुरु झालेल्या जागतिकीकरणाने त्यांना व्यवसायात पदार्पण करायची प्रेरणा मिळाली, आणि पहिलीच ऑर्डर त्यांना माझगाव डॉक मधूनच मिळाली. त्यावेळी तिथे चेअरमन पदी असलेले क्याप्टन पी वी नायर त्यांच्याकडे सल्लागार म्हणून काम करतात.

१९९३ ते २०११ पर्यंत त्यांनी प्रचंड झेप घेतली. ओ एन जीसी, ब्रिटीश ग्यास अशा नामवंत कंपन्यांसाठी ते भर समुद्रात प्रकल्प बांधणीचे काम करतात. दास ग्रुपच्या आज इन्जिनिअरिन्ग, डेअरी, अग्रो प्रोडक्ट्स, रस्ते बांधणी, उड्डाण पूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत ७ कंपन्या आहेत. ५०० हेक्टर जागेवर द्राक्ष आणि उसाचे मळे आहेत. मुंबईतील पहिला स्कायवॉक वांद्रे येथे त्यांनी बांधला. सायन, घाटकोपरचे स्काय वॉकहि त्यांनीच बांधलेले आहेत. आज एक मराठी उद्योगपती दुबईच्या शेखचा भागीदार आहे हि तमाम मराठी जनांना अभिमानस्पद गोष्ट आहे.न्यूयॉर्क टाईम्सने तसेच येथील इंग्रजी दैनिकानीही त्यांच्या कर्तृत्वाची दाखल घेतली, पण एकाही प्रमुख मराठी दैनिकाने मात्र त्यांच्या कार्याची दाखल घेतली नाही हि खेदाची गोष्ट आहे. आपण मात्र त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करूया.

तात्पर्य - कधी कधी संधी ह्या तुमच्या सभोवतालीच असतात. त्या हेरून त्यांचं सोनं करणं मात्र तुमच्या हाती असतं.




By - Unknown Author  

मंगळवार, २६ जुलै, २०१६

कोरफडीची यशस्वी शेती


शेती करुन 'तो' झाला करोडपती


सरकारी नोकरी मिळाल्यानंतर माणूस आत्मसंतुष्ट होतो. आयुष्यभरासाठी आर्थिक सुरक्षितता मिळाल्याची त्याची भावना असते. 'त्याच्याकडे'ही सरकारी नोकरी होती. पण त्यात तो समाधानी नव्हता. त्याची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची होती. त्याला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करायचे होते. एकदा त्याने दिल्लीत भरलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट दिली आणि ही भेट त्याच्या आयुष्याला एक वेगळे वळण देऊन गेली. ही गोष्ट आहे राजस्थानच्या हरीश धनदेवची

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर हरीशने त्याच्या १२० एकर शेतजमिनीत कोरफड आणि अन्य पिकांची शेती सुरु केली. आता शेतीमधून हरीशला वर्षाला दीड ते दोन कोटी रुपयांची कमाई होते. जैसलमेरपासून ४५ कि.मी. अंतरावर दहीसर येथे हरीशने स्वत:ची कंपनी सुरु केली आहे. थारच्या जमिनीत मोठया प्रमाणात लागवड केली जाणारी कोरफड पतांजली फुड प्रोडक्टसला पाठवली जाते. पंतांजलीमध्ये त्यापासून कोरफडीचा ज्यूस बनवला जातो

थारच्या वाळवंटात पिकवल्या जाणा-या कोरफडीचा दर्जा उत्तम असल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कोरफडीला मोठी मागणी आहे. धनदेवने जो धोका पत्करला आज त्याचा त्याला फायदा होत आहे. तो जैसलमेर महापालिकेत ज्यूनियर इंजिनीयरपदावर नोकरीला होता. धनदेवकडे जमीन आणि पाणी होते पण काय करावे हे त्याला माहित नव्हते

मागच्यावर्षी त्याने कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर त्याला कोरफड, आमला आणि गुंडाची शेती करण्याची कल्पना मिळाली. वाळवंटात बाजरी, गहू, मूंग ही पिके घेतली जातात. ब्राझील, हॉंगकॉंग आणि अमेरिकेत कोरफडीला मोठी मागणी आहे. सुरुवातीला हरीशने ८० हजार रोपटी लावली होती. आता त्याने ही संख्या वाढवून सात लाख केली आहे.

·         Daily Lokmat - First Published :12-July-2016 : 13:14:10

कोरफड लागवड कशी करतात, त्यावर करावयाच्या प्रक्रियेविषयी माहिती कोठे मिळेल?
दत्तात्रेय मोरे, नाशिक
कोरफड ही औषधी वनस्पती असून, बाजारपेठेच्या मागणीवरच उत्पन्नाची हमी असते. म्हणून स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करून लागवड करणे योग्य होईल. कोरफडीची शेती करताना अनेक शेतकरी कंपन्यांशी करार पद्धतीने शेती करतात; मात्र हा करार करताना लागवडीनंतर फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्‍यतो बाजारपेठ व प्रक्रिया उद्योजकांशी बोलूनच लागवड करावी. हे पीक हलक्‍या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते. लागवडीसाठी जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. शक्‍य असल्यास हेक्‍टरी 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीच्या मगदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा 60 ते 75 सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत. कोरफडीची अभिवृद्धी मुनव्यांपासून करतात. पावसाळा सुरू होताच लागवड पूर्ण करावी. या पिकास माती परीक्षणानुसार प्रति हेक्‍टरी 20 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश द्यावे. पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. लागवड केलेल्या वाफ्यात किंवा वरंब्यावर पानांच्या वजनामुळे कोरफड कोलमडू नये म्हणून वेळोवेळी गरजेनुसार मातीचा आधार द्यावा. पिकाच्या वाढीच्या काळात एक-दोन खुरपण्या कराव्यात. पूर्ण वाढ झालेल्या पानांची कापणी लागवडीनंतर दोन वर्षांपासून पाच वर्षांपर्यंत करता येते. लागवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. कोरफड प्रक्रियेतून सरबत, ज्यूस बनविता येते.

याची सविस्तर माहिती
प्रा. व्ही. पी. कड (9623042073),
उद्यानविद्या विभाग, राहुरी
यांच्याकडे मिळू शकेल.
- 02426 - 243292
प्रमुख, औषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
By - Agrowon



सेवानिवृत्त प्राचार्यांनी केली कोरफडीची यशस्वी शेती

जालना जिल्ह्यातील सेवानिवृत्त महाविद्यालयीन प्राचार्य राम भाले गेल्या दहा वर्षांपासून कोरफडीची शेती करीत आहेत. औरंगाबाद, नाशिक, मुंबई येथे आपले खात्रीशीर खरेदीदार असल्याचे ते म्हणतात. अद्याप तरी त्यांना विक्रीमध्ये फसवणुकीचा अनुभव आलेला नाही. कमी खर्चात व श्रमांत हे पीक चांगले उत्पादन व उत्पन्नही देते असा त्यांचा अनुभव आहे. मात्र, शेतकऱ्यांनी या शेतीत उतरताना खात्रीशीर व्यापारी असल्याची खात्री करणे, तसेच खरेदीसंबंधीच्या सर्व गोष्टी तपासणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 
तुकाराम शिंदे 

शेतीत विविध प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न अनेक शेतकरी सातत्याने करताना दिसतात. जालना जिल्ह्यातील राळा (ता. बदनापूर) येथील राम भाले महाविद्यालयात प्राध्यापक व त्यानंतर प्राचार्य म्हणून 12 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. पूर्वीपासूनच शेतीत रस होता; मात्र नोकरीमुळे त्याकडे लक्ष देता येत नव्हते. सेवानिवृत्तीनंतर मात्र त्यांनी शेतीला वाहून घेतले.
 

त्यांनी कारले, मोसंबी, ऊस, बीजोत्पादन असे विविध पीक प्रकार हाताळले. पारंपरिक पिकांत खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ जमत नसल्याने कमी खर्चात उत्पन्न देणारे पीक घेण्याचा प्रयत्न ते सतत करत. त्यांनी आतापर्यंत कारली, वांगी, टरबूज, खरबूज, कपाशी आदी पिकांचे बीजोत्पादन केले. ऊस, मोसंबी, डाळिंब या पिकांची लागवड करून उत्पादन घेतले; परंतु परिस्थितीनुरूप उत्पादन खर्च वाढत गेला. वाढता खर्च व नफ्याचे घटते प्रमाण लक्षात घेऊन कोरफड लागवडीचा निर्णय दहा वर्षांपूर्वी घेतला. सध्या या पिकाची लागवड आपले सहा एकर व भावाचे चार एकर अशी दहा एकरांत असून, दरवर्षी कमी खर्चात चांगले उत्पादन व उत्पन्न होत असल्याने हे पीक फायदेशीर ठरले असल्याचे भाले यांनी सांगितले.
 

कोरफड शेतीचे व्यवस्थापन 
लागवडीआधी शेतात एकरी वीस गाड्या शेणखत व लेंडी खत एकत्रित करून टाकले जाते. मशागत करून दोन फूट अंतराच्या सऱ्या तयार केल्या जातात. कोरफडीची लागवड जुलै- ऑगस्टच्या दरम्यान होते. साधारण पुढील जुलैमध्ये पीक म्हणजे पाने काढणीस तयार होतात. पानांची दुसरी कापणी ही त्यानंतर सहा महिन्यांनी होते. 

सुमारे चार ते पाच वर्षांनी हे पीक पुन्हा लावावे लागते, तोपर्यंत पानांची कापणी ठरावीक काळाने करीत उत्पादन व उत्पन्न घेता येते. खतांमध्ये गांडूळ खत व निंबोळी खताचा वापर होतो. कोरफड ही औषधी वनस्पती असल्याने त्यात रासायनिक खतांचा वापर करण्यात येत नाही, त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.
 

कोरफडीवर किडी- रोगांचा प्रादुर्भावही फारसा होत नसल्याने कीडनाशकांच्या फवारणीची गरज पडली नाही; परंतु प्रतिबंधक म्हणून एक लिटर गोमूत्र शंभर लिटर पाण्यात वापरून फवारणी करण्यात येते.
 

कोरफडीचे उत्पादन चांगले मिळावे म्हणून पाण्याचे नियोजन चांगले केले आहे. त्यासाठी सहा एकरांवर ठिबक सिंचनाचा वापर करून आवश्‍यकतेनुसार पाणी देण्यात आले. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता निर्माण होत असल्याने ठिबक सिंचनाचा चांगला फायदा होतो. तुषार सिंचन असेल तर अधिक फायदेशीर, असे भाले म्हणतात. उन्हाळ्यात पाणी कमी पडून या वनस्पतीची पाने सुकली तरी पावसाळ्यात पुन्हा पिकाला जोम मिळतो. या पिकासाठी पाण्याची उपलब्धता असल्यास अधिक फायदेशीर ठरते.
 

कोरफडीच्या पानांची उंची दोन ते अडीच फुटांपर्यंत वाढते. कोरफडीच्या एका गड्ड्याला पंधरापर्यंत पाने मिळतात; परंतु यातील पाच ते सहा पाने काढणीयोग्य असल्याने या पानांचा वापर विक्रीसाठी होतो. बाजारात मागणीनुसार पानांची काढणी व पुरवठा करावा लागतो. गड्ड्याची वरची पाने वाढत असतात. तसे पाहायला गेल्यास पानांना मागणी वर्षभर राहत असल्याने पानांतील गर जसजसा वाढतो तसतशी पाने काढावी लागतात. अनेक पिकांमध्ये उत्पादन एकाच वेळी काढावे लागत असल्याने त्या वेळी जो बाजारभाव असेल तो घ्यावा लागतो; परंतु या पिकात मागणीनुसार पानांची काढणी होत असल्याने फायदा होऊ शकतो. भाले यांनी मध्य प्रदेशातील संग्रामपूर येथून रोपे आणली आहेत.
 

कोरफडीचे उत्पादन 
कोरफडीचे वर्षाचे एकूण उत्पादन हे मातीच्या प्रकारानुसार अवलंबून राहते. वर्षाला सुमारे दोन कापण्या गृहीत धरल्या तर एकूण उत्पादन हे हलक्‍या जमिनीत एकरी 15 टन, तर भारी जमिनीत ते 20 टन मिळते. एक कापणी ऑगस्टच्या दरम्यान, तर एक जानेवारीच्या दरम्यान केली जाते; मात्र मागणीनुसार त्यात बदलही केला जातो. दर कोरफडीच्या पानांना पाच हजार रुपये प्रति टन म्हणजे किलोला पाच रुपये भाव मिळतो. जमिनीच्या प्रकारानुसार जे उत्पादन येते व जसा भाव व मागणी असते त्याप्रमाणे एकरी 40 हजार ते 60 हजार रुपये उत्पन्न हाती येते. या पिकासाठी सुरवातीचा खर्च सोडता निव्वळ दहा हजार रुपये मशागत व अन्य खर्च होतो, त्यामुळे भाले काही वर्षांपासून या पिकाचे नियमित उत्पादन घेत आहेत. कमी मेहनत व कमी खर्चात हे उत्पादन व उत्पन्न मिळत असल्याने इतर पिकांच्या तुलनेत ते किफायतशीर असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरफड पिकातील धोके काय आहेत? 
अलीकडील काही वर्षांपूर्वी कोरफड पिकात काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार घडले होते, त्यामुळे हे पीक लावावे की नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था आहे. याबाबत भाले म्हणाले, की शेतकऱ्यांनी हे पीक घेताना काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यात परप्रांतीय व्यापारी हे खरेदीदार असतील तर अत्यंत सावध राहावे, कारण पैसे बुडण्याचा अनुभव मला व माझ्या सहकाऱ्यांनाही मिळाला होता. शक्‍यतो स्थानिक खरेदीदार पाहावेत, तसेच त्यांच्याशी काही वर्षे विश्‍वासाचे चांगले संबंध असायला हवेत. पेमेंट घेताना शक्‍यतो डीडीद्वारे घ्यावे. व्यापारी हे खात्रीशीर असावेत. लागवड करण्यापूर्वी मार्केटिंग, खरेदीदार यांची चौकशी वा अभ्यास हवा. 

आपल्या कोरफडीच्या विक्रीबाबत भाले म्हणाले, की औरंगाबाद, नाशिक येथील कंपन्यांना व मुंबईच्या एका व्यापाऱ्याला मी कोरफडीची पाने विकतो. त्यांच्यासोबत काही वर्षांपासून मी खरेदी- विक्री व्यवहार करतो आहे. माझी फसवणूक त्यांच्याकडून अद्याप तरी झालेली नाही. कोरफडीच्या शेतीतून अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. त्याची पाने विकली जाऊ शकतात, त्याचबरोबर त्याची रोपे विकणे शक्‍य आहे. रोपांच्या वयानुसार प्रति रोप दोन ते चार रुपये असा दर मिळू शकतो. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोरफडीपासून ज्यूस तयार केला जातो. सध्या अनेक ठिकाणी हा ज्यूस काढला जातो. तो आरोग्यवर्धक असल्याने त्याला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. सध्या मी देखील ज्यूसप्रक्रिया व्यवसायात उतरण्याचे ठरवले आहे. औरंगाबाद येथील मित्राच्या कंपनीमार्फत कोरफडीचा ज्यूस काढून घेतला जातो. तेथेच तो सहा ते सात महिने शीतगृहात ठेवला आहे. मुंबईच्या दोन कंपन्यांसोबत विक्रीसाठी चर्चा सुरू असून, त्यांनी नमुने मागवले आहेत.
 

माझ्या अनुभवाबाबत विचाराल तर कोरफडीच्या पानांना उन्हाळ्यात जास्त म्हणजे आठ रुपये प्रति किलोपर्यंत भाव मिळू शकतो. पुणे- मुंबई भागात तो दहा रुपयांपर्यंतही मिळू शकतो; मात्र सरासरी तो पाच रुपये मिळतो. मात्र, शेतकऱ्यांनी खरेदी- विक्रीच्या सर्व प्रक्रियेची खात्री, चौकशी करूनच या शेतीत यावे, असेही भाले यांनी सांगितले.
 

संपर्क पत्ता -
 
प्रा. राम भाले,
 
भाग्यनगर, जुना जालना
 
मो. 9822744332
 
मो. 8275344599


-
Tuesday, November 13, 2012 AT 02:15 AM (IST)
Agrowon -


माझ्याबद्दल