शुक्रवार, ८ जुलै, २०१६

यशाच्या वाटचालीसाठी रॉनी स्क्रूवाला यांचा मोलाचा सल्ला...


मिडिया उद्यमी रॉनी स्क्रूवाला यांनी आपले पुस्तक ‘ड्रीम विथ युअर आईज ओपन अॅण्ड आन्त्राप्रेन्यूअर जर्नी’ मध्ये नमूद केले आहे की, ‘जर अपयश हे उभरत्या उद्यमींच्या रस्त्यातील सगळ्यात मोठी अडचण असेल तर मैदानात ठामपणे उभे राहण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती हीच आपली सगळ्यात मोठी गुणवत्ता आहे.’
रॉनी यांनी दोन दशकाहून अधिक आपल्या जीवनातील अनुभवाने घेतलेले धडे, भले ते दात साफ करण्याच्या ब्रशचे निर्मिती असो किंवा केबल टीव्हीचा व्यवसाय असो किंवा प्रसारण साहित्य आणि सिनेमाच्या स्टुडीओ संबंधित काम असो, सगळ्यांना एकाच पुस्तकाच्या रुपात एक मनोरंजक आणि माहितीपूर्णरुपात जगासमोर सादर केले आहे. त्यांचा विशाल मिडिया समूह यूटीव्ही डिजिटल साहित्य आणि खेळांच्या उत्पादनाच्या क्षेत्रात  सक्रीय आहे.
यूटीव्ही बऱ्याच कालावधीपासून सिनेमाच्या निर्माण प्रक्रियेत सक्रीय आहे. सन १९९७ नंतर त्यांच्या कंपनीने दिल के झरोखे में, लक्ष्य, स्वदेश, रंग दे बसंती, द नेमसेक, देव डी, पीपली लाइव्ह, पान सिंह तोमर, नो वन किल्ड जेसिका, डेली बेली, रावडी राठोड, बर्फी, कोय पो चे व सत्याग्रह सारखे सफल व प्रसिद्ध सिनेमांचे निर्माण केले आहे.



आता आपल्या ‘सेकंड इनिंग’ मध्ये रॉनी हे भारतात व्यावसायिकतेला एका नव्या रुपात कब्बडी आणि फुटबॉल सारख्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे लक्ष्य आपल्या ‘स्वदेश फाउन्डेशन’ च्या अंतर्गत येणाऱ्या पाच वर्षात देशभरातल्या गावात राहणाऱ्या दहा लाखाहून अधिक लोकांना चांगले आणि सशक्त जीवन देण्याच्या प्रयत्नात आहेत.
हे पुस्तक फक्त ‘मी हे करून दाखविले’ च्या संदर्भात नसून ‘हे करू शकतो’ या घोषवाक्यावर आधारित आहे. देशातील सगळ्या तसेच विशेषकरून उभरत्या व्यावसायिकांसाठी आवश्यक पठनीय १८५ पानांचे आहे. या पुस्तकात १३ अध्यायात १० प्रमुख मुद्धे आपल्यासाठी विशेष सादर केले आहे.
(१) बाहेरचे असणे लाभदायक ठरते :-
कोणत्याही व्यवसायात बाहेरून प्रवेश करण्यात आपले स्वतःचे काही फायदे असतात. जसे आपण नव्या व्यवसायाचा विचार हा पूर्णपणे नवीन दृष्टीकोनातून करतो. नवीन असल्यामुळे आपल्या जिज्ञासा आपल्याला निरखून पारखून करण्यास प्रेरित करतात ज्याबद्दल त्या क्षेत्रातले प्राथमिक लोक त्याचा विचार करण्यापासून दूर असतात. रॉनी सांगतात की, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला अशा समूहाची स्थापना करण्याची गरज आहे जी आपल्या पुर्णत्वेसाठी आपल्याला आव्हान देण्यास सक्षम असेल. मुंबई मधील एका पारशी कुटुंबात जन्म झालेले रॉनी परंपरागत कुटुंबातील आणि स्टुडीओचा बोलबाला असलेल्या प्रसिद्ध बॉलीवूड उद्योगात पाय रोवण्यात यशस्वी झाले.
(२) डोळे झाकून गर्दीत न चालणे :-
डोळे उघडे ठेवून आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याचे निरीक्षण करणे म्हणजेच जगातल्या प्रचाराचे पालन करून गर्दीत मानखाली घालण्याच्या मानसिकतेपासून दूर राहणे. रॉनी मिश्कीलपणे सांगतात की, ‘जेव्हा आपण कुणाचा पाठपुरावा करित असतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा फक्त पाठमोरा भाग दिसतो’. युटीव्ही ने नूतन साहित्य आणि प्रारूपच्या नीतीचा अवलंब करून दैनिक धारावाहिक शांती, तरुणांसाठी ‘बिंदास’ व मुलांसाठी ‘हंगामा’ चॅनेल प्रसारित केले. हे फक्त यामुळे संभव होवू शकते कारण त्यांनी ग्राहकांची नस पकडून त्यांच्यासमोर काहीतरी नवीन सादरीकरणाच्या इच्छाशक्तीने दमदार पाऊल उचलले. उदाहरण म्हणजे रॉनी यांनी भारतातील मुलांमध्ये ‘कार्टून नेटवर्क’ चे वेड बघितले. मग काय, त्यांना जाणवले की या क्षेत्रात स्थानिक साहित्य आणि चांगल्या ब्रांडच्या जोडीने बाजारात उडी घेण्याची हीच योग्य वेळ आहे. ते सांगतात की, ‘प्रत्येक दिवस हा आम्हाला गोष्टींना नव्या रुपात बघण्याची व विचार करण्याची संधी देतो’.
(३) आपल्या असफलतेचे योग्य मुल्यांकन करणे :-
आपण आपल्या अपयशावर ताबा मिळवण्यासाठी त्याचे वैचारिक मुल्यांकन करणे, तसेच त्याचे परत निरीक्षण करून त्याचा केंद्रबिंदू शोधून काढणे महत्त्वाचे आहे. रॉनी या पुस्तकाच्या एका अध्यायात लिहितात की, ‘अपयश हे एक पूर्णविराम नसून एक अल्पविराम आहे.’ ते सल्ला देतात की, ‘अपयशी होणे अपरिहार्य आहे, याला आनंदाने सामोरे जा.’ उद्यमींनी अतिशय वाईट काळाची कल्पना करून त्याच्यातून बाहेर येण्याची धमक अंगीकारायला हवी. आपले मित्र आणि शुभचिंतक आपल्या या अपयशाच्या काळात अधिक मूल्यवान दृष्टीकोनातून आपल्या मदतीला येवू शकतात. अपयशाची गाठ पडल्यावर संस्थापकांना त्याचा स्वीकार करून नव्या उमेदीने स्वतःशी संवाद साधून त्यातून मार्ग काढून पुढे वाटचाल केली पाहिजे’.
याशिवाय आपण अपयशात केलेल्या चुकांचा पाठपुरावा न करता सावधानता बाळगली पाहिजे. रॉनी यांना अतिशय कटू अनुभव आला जेव्हा त्यांचे होम शॉपिंग नेटवर्कचे काम त्यांच्या उमेदीपेक्षा फोल ठरले. रॉनी सांगतात की, ‘अपयशाला एका अडचणीच्या रुपात बघितले जाते पण तीच आपल्याला नवीन खजिण्याचा मार्ग दाखवीत असते’.
रॉनी सांगतात की, ‘अपयशाची अनिवार्य रुपात होणाऱ्या चकमकीची चर्चा ही बोलकी असली पाहिजे तिची मुस्कटदाबी होता कामा नये’. मी आधीच सांगितले होते की, ‘नकारात्मक दृष्टीकोन ठेवणारे तसेच आपल्या स्वप्नांची अवहेलना करणाऱ्यांपासून नेहमी सावध राहावे’. ते सांगतात की, ‘तुमचा समूह हा अयशस्वी आणि अपयशाशिवाय कधीच विकसित होवू शकत नाही. अपयश हे यशापेक्षा अधिक रोचक आणि शिक्षाप्रद आहे’.
(४) स्टार्टअप साठी संवाद आणि संस्कृतीची गरज आहे :-
संवाद आणि संस्कृती कोणत्याही स्टार्टअपच्या यशाला अनिवार्य आहे. रॉनी सांगतात की, ‘संस्कृती ही यशस्वी प्रयत्नांची संजीवनी आहे आणि उत्तम संवाद हा कोणत्याही कंपनीच्या संस्कृतीला मजबुती प्रदान करतो’. संस्थापकांना शिष्टाचार, संपूर्णता, आकर्षण, स्पष्टता यांच्या सोबतीने दुस-याशी संवाद साधता आला पाहिजे. त्या दिवसात दूरदर्शनने यूटीव्हीचा एक कार्यक्रम रद्द केला त्यावेळेस रॉनी यांनी आपल्या टीम बरोबर स्पष्ट व थेट संवाद साधला आणि त्यांच्या सहयोगानेच उशिरा वेतन मिळूनही कोणत्याही किंतु शिवाय सहयोगी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले.
आपल्या कार्यालयात तडक भडक व दिखाऊपणापेक्षा सजीवता, संपर्क, आणि उर्जेचा एक भाव असला पाहिजे.  टाउन हॉल आणि कार्यालयातील लोकांबरोबर बसून संवाद साधून संस्कृतीच्या निर्माण आणि त्याच्या सुदृढीकारणासाठी एक महत्वपूर्ण भूमिका घेऊ शकतात. यामध्ये संस्थापकाने काय संवाद साधला यापेक्षा तो कोणत्या भावनेने साधला हे महत्वाचे असते. हास्य व बुद्धिमत्तेच्या भावनेचा संवाद अधिक महत्वपूर्ण ठरू शकतो. रॉनी वर्षाअखेरीस आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना एक इमेल लिहितात ज्यात येणाऱ्या वर्षाचे प्रेरणादायक स्वरुपाचे निर्णय घेऊन त्याचे समालोचन करण्यावर एक प्रकाश टाकला जातो.
(५) नव्या प्रचाराची ओळख :-
संस्थापकांना नव्या प्रणालीच्या अनुभवासाठी ‘वळणाच्या जवळपास बघण्याचा’ दृष्टीकोन असण्याव्यातिरिक्त जे त्यांच्या धैर्याचे खच्चीकरण करण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्याकडे सुद्धा एक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. नित्य नव्या विश्लेषणाद्वारे तुम्ही नव्या संधी शोधू शकतात कारण जोखमीच्या व चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या पावलांना ओळखणे अधिक कठीण आहे. रॉनी सांगतात की, ‘आपल्या यशाच्या मार्गावर अडथळे आणणाऱ्यांना चिन्हित करणे हे कोणत्याही व्यवसायाचा एक कठीण पैलू असतो’. याव्यतिरिक्त तोटा किंवा नुकसानी मध्ये घट करणे, तयार योजनेची अंमलबजावणी करून मार्ग बदलने हे सुद्धा अवघड आहे व हे रॉनी आपल्या ‘जोकर और डान्स पे चान्स’ सारख्या काही फ्लॉप सिनेमाद्वारे समजू शकले. ते मान्य करतात की या सिनेमाच्या निर्मितीच्या मध्ये सगळे आलबेल दिसत असून त्यांची इच्छा असूनही ते थांबवू शकत नव्हते.
(६) संधीने दार ठोठावल्यावर दार नक्की उघडा :-
संधीला ओळखून तिला बळकावण्याव्यतिरिक्त भारतात विशाल प्रमाणात असंघटीत बाजारातील शक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करा. रॉनी सांगतात की, ‘वर्तमानात तुम्हाला आधीपेक्षा अधिक जोमाने एका मोठ्या चित्राला दुसऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने, लवकर व उत्तम प्रकारे प्रसारित करण्याची गरज आहे’. वास्तविक त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभी एका परदेशी दौऱ्यादरम्यान योगायोगाने टूथब्रश बनविणारी मशिनरी बघून भारतात मिळणाऱ्या एका मोठ्या संधीचा मागोवा घेत ब्रिटनहून मशिनरी आयात करून याच्या निर्मितीत एक भक्कम पाऊल ठेवले.
(७) बदलासाठी मोठ्या मार्गाचा अवलंब करा :-
अनेक छोट्या संधींना पाठीमागे टाकून जीवनात बदल घडविण्यासाठी मोठ्या बिंदूंना ओळखणे. रॉनी सांगतात की, एका निश्चित स्तरापर्यंत जाण्यासाठी त्या संस्थेच्या संस्थापकांना एक आवश्यक दृष्टी व वेगाचे प्रदर्शन करणे गरजेचे आहे. उदाहरणादाखल त्यांनी भारतात केबल टीव्हीच्या एका संधीचा फायदा घेऊन डेमोच्याद्वारे बाजारात त्या दृष्टीने शिक्षित करण्याव्यतिरिक्त घरोघरी जाऊन लोकांना त्याबद्दल माहिती दिली. हॉटेलच्या शृंखलेला उपभोक्त्यांच्या रुपात स्वतःला साकारले. तसेच त्यांनी झी टीव्हीला साहित्य उपलब्ध करवून या उपग्रहाच्या लहरींवर स्थान मिळविले आणि नंतर विजय माल्ल्यांच्या स्वामित्व असलेल्या विजय टीव्हीचे हक्क मिळविण्यात यशस्वी झाले.
(८) सकारात्मक विचारधारा ठेवणे :-
सदैव सकारात्मक विचारसरणी अंगीकारणे, पण जग नेहमी एका उमेदीवर चालत नाही. रॉनी सांगतात की, ‘जे लोक स्वतःच्या लक्षावर ध्यान केंद्रित करून आपले सर्वस्व पणाला लावतात तेच यशाचे खरे मानकरी असतात’. याशिवाय त्यांचे मानणे आहे की कोणत्याही कौटुंबिक आर्थिक परिस्थितीचे रडगाणे गाणे किंवा उच्च शिक्षण व पर्याप्त पैशांची कमतरता असण्याची बतावणी चालत नाही. ते दर्शवितात की, ‘स्वतः मधील विश्वासाची भावना असमानतेच्या खुणा पुसण्याच्या मानसिकतेत परिवर्तन घडवितात’. मोठ्या शहरांच्या तुलनेत छोट्या शहरांच्या संस्थापकांना संधीच्या कमतरतेवर पश्चातापाची वेळ ही नाहीच्या बरोबर असते कारण तो एक ग्रामीण भारतच आहे जिथे येणाऱ्या दिवसात संधीचे वारे वाहणार आहे, मग ते डिजिटल मिडिया किंवा आयटीचे क्षेत्र असो.
रोनी सांगतात की, भविष्य उजळण्याची वाट बघू नका पण दृढ विश्वासाने ती मिळवण्याचा प्रयत्न करा. ते ही गोष्ट आपला सिनेमा ‘रंग दे बसंती’ च्या आठवणींना उजाळा देत सांगतात की जिला अनेक टीकाकारांनी ‘तुक्का’ ठरविण्याची कोणतीही कसर ठेवली नाही. या सिनेमाचे प्रदर्शन पण अनेक वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. विशेषकरून यांना देशाच्या सैन्य प्रमुखांची मान्यता मिळवायची होती आणि नशिबाने ती मिळाली.
(९) विकासाच्या ध्येयाने वेडे न बनणे:
संस्थापकांना गुंतवणूकदारांचे लक्ष व घटनाक्रमावर ध्यान केंद्रित करण्याव्यतिरिक्त व्यावसायिक रणनीती, टीम ब्रांडच्या स्तरावर ध्यान केंद्रित करणे गरजेचे आहे. कोणत्याही व्यवसायाच्या संक्रमनाच्या काळात हितचिंतकांच्या हिताचा विचार करून संस्थापकांना आपले जहाज मध्यावर सोडण्यापेक्षा दुसऱ्यांना सुपूर्त करण्याचा विचार अधिक हितकारी आहे. भारत, अमेरिका, कॅनडा जपान सहित अनेक देशांत आपली गुंतवणूक व मोठ्या कंपन्यांच्या आपल्या अनुभवाच्या आधारे रॉनीचे मानणे आहे की जरी गुंतवणूक व्यावसायिकांसाठी नवीन मार्ग खुले करीत असले तरी हे सुनिश्चित करणे व्यावसायिकांचे काम आहे की कोणत्याही गुंतवणूकदारांबरोबर कोणत्याही स्तरावर धोका होता कामा नये.
(१०) तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ नका :-
रॉनी सांगतात की, ‘जे ध्येय तुम्ही निश्चित केले आहे त्यावर तुम्ही ठाम रहा कठीण वेळेला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कठीण परिस्थिती तुम्ही कशा पद्धतीने हाताळता हे तुमच्यातल्या चपळतेवर निर्भर आहे. ते गंमतीत सांगतात की त्यांना कितीतरी वेळेस ‘कैट ऑफ २० लाइव्स’ च्या खिताबांनी नावाजले आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांचे परतणे यशस्वी झाले. ते सांगतात की, ‘आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा व प्रत्येक क्षण त्यासाठीच जगा’. व्यावसायिकतेच्या या प्रवासाच्या डोहात प्रत्येकजण पोहू शकतो, इथे तुमची पार्श्वभूमी किंवा शैक्षणिक योग्यता विचारात घेतली जात नाही. पण यशासाठी हा एक किंवा दोन वर्षाचा प्रवास नसून लांबचा प्रवास करावा लागतो. ‘उद्यमीता एक सहल नसून एक यात्रा आहे’. उद्यमशिलतेमध्ये संस्थापक एकापेक्षा अधिक डाव खेळू शकतो. ते कब्बडी आणि ग्रामीण व्यवसायाच्या आपल्या अनुभवाचे उदाहरण देतांना सांगतात की, ‘एक यशस्वी संस्थापक स्वतःला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो, मात्र त्याच्यातील जिज्ञासा, संशोधक वृत्ती जागरूक असणे गरजेचे आहे.
रॉनी सांगतात की, ‘सफलता, महत्वकांक्षा, भूक, ध्येय आणि क्षमता ही अंतर्मनामधून येते’. कुणाप्रती लक्ष केंद्रित करणे, प्राथमिकता, सहानुभूती आणि इमानदारी एखाद्या व्यावसायिकाच्या अनुभवला दृढ बनविते. शेवटी ते सांगतात की, ‘आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे स्वप्न बघा आणि जेव्हा त्याची पूर्तता होईल तेव्हा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघण्याची सवय लावा’.
याशिवाय या पुस्तकाच्या समर्थनाची एक पूर्ण शृंखला आहे जिचे काही नमुने खाली दिले आहेत.
‘मला पूर्ण विश्वास आहे की हे पुस्तक भारताच्या तरुण पिढीच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांना प्रोत्साहित करेल व याच पद्धतीने ते करोडो भारतीयांना चांगल्या जीवनाची पूर्तता करण्यासाठी नवीन योजनेच्या शोधासाठी आपली उर्जा समर्पित करू शकतील’. ( नरेंद्र मोदी, पंतप्रधान )
‘माझे मानणे आहे की रॉनीमध्ये महान नेतृत्वाचे सगळे गुण उपलब्ध आहेत मग ते आशावाद आणि जिज्ञासा यांच्या भावनेला आत्मसात करण्याचे असो, जोखमेचे काम असो किवा नेहमी उत्कृष्ट करण्याच्या पाठपुराव्याचा असो’.(बॉब आयगर, द वाल्ट डिस्ने कंपनी )
‘मला उमेद आहे की रॉनीची गोष्ट आयुष्यात पुढे जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या उद्यामिंसाठी एक मोठा संकेत ठरू शकेल’. (जेम्स मर्डोक, २१ वी सेन्चुरी फॉक्स )
‘व्यावसायिक दृष्टीकोन, रचनात्मक आणि साहसापेक्षा अधिक काय करायचे व काय नाही करायचे हे ओळखून एखाद्या व्यवसायातून बाहेर निघून दुसरीकडे प्रवेशासाठी जाणे व कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी आहे’. (किशोर बियाणी, फ्युचर ग्रुप)
चांगला व्यावसायिक व्यक्तिगत यशाचा अनुभव करतो. महान उद्यमी आपल्या यशाला अधिक पटीने वाढवून आपल्या बरोबर दुसऱ्यांना पण पुढे जाण्यासाठी मदत करतो. रॉनी एक महान उद्यमी आहेत’. (आनंद महिंद्रा, महिंद्रा समूह)
‘हे एक असे पुस्तक आहे ज्याची प्रेरणा एका उभरत्या राष्ट्राला गरजेची आहे’. (नंदन निलकेणी, सह-संस्थापक इंफोसिस)







अनुवाद : किरण ठाकरे











*To Become Successful in Life*... आयुष्यात यशस्वी होण्यासाठी

*To Become Successful in Life*..
. 
 आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 26......परफेक्ट गुरूमंत्र*
 DEVELOP ........... SELF-CONFIDENCE (आत्मविश्वास विकास) 
1. Empower smiling. चेहऱ्यावर हास्य असू द्या 
2. Relax yourself. आरामशीर / तणावमुक्त रहा
3. Have a clear understanding. आपले विचारात सुस्पष्टता असू द्या 
4. Avoid misconceived thoughts. गैरसमज / चुकीचे समज टाळा 
5 .Prompt decision - making. तात्काळ निर्णयक्षमता 
6. Avoid inferiority complex. न्यूनगंड बाळगू नका 
7. Believe yourself. स्वतःवर विश्वास ठेवा 
8. Be inspirational. प्रेरणादायी रहा 
9. Develop challenging attitude. आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा 
10. Be a positive thinker. सकारात्मक विचार ठेवा 
11. Have self – encouragement. स्वयंप्रेरित रहा 
12. Avoid procrastination. चालढकल (दिरंगाई) टाळा 
13. Learn lessons from others. इतरांकडून प्रेरणा घ्या 
14. Don't lose your spirit. हिंमत / धीर सोडू नका 
15. Think about time-use. वेळेचे काटेकोर नियोजन करा 
16. Be smart at all costs. नेहमी चाणाक्ष रहा 
17. Be a goal setter. ध्येय निश्चित करा 
18. Be punctual. तत्पर रहा 
19. Focus Involvement. कामावर लक्ष केंद्रित करा 
20. Possess mental alertness. मानसिकरित्या तत्पर रहा 
21. Sharpen your intelligence. आपली बुद्धीमत्ता अधिक तीक्ष्ण करा 
22. Try to be intellectual. बुद्धीमान बनण्याचा प्रयत्न करा 
23. Be co-operative. सहकार्याची भावना बाळगा 
24. Avoid fearful feelings. मनातील भीतीची भावना टाळा 
25. Strengthen your will power. आपली इच्छाशक्ती प्रबळ असू द्या 
26. Never bother about failure. कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका. - 



Thank You धन्यवाद

स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे.


विचार सतत वाहतात, पण त्यांचे सामथ्र्य कमी होत नाही.. ते नदीप्रमाणे असतात.. एक एक विचार येत गेला, नाहीसा होत गेला.. पण सत्ता चालली ती विचारांचीच.. मनुष्याला या विचारांपासूनच प्रेरणा मिळत आली आहे. विचारांच्या सामर्थ्यांची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही..
– आचार्यविनोबा भावे


विचारांचं सामथ्र्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. सामान्यपणे आपलं आपल्या विचारांकडे लक्ष नसतं; किंबहुना विचारांच्या बाबतीत जेवढी सजगता असायला हवी तेवढी आपल्यामध्ये नसते. एखादी चांगली गोष्ट करताना मनात येणारा पहिला सृजनशील विचार पकडून ठेवता आला पाहिजे, तशी सवयच लावून घ्यायला हवी व तात्काळ कृतीच्या अंमलबजावणीची रूपरेषा ठरवली गेली पाहिजे. मनात येणाऱ्या पहिल्या विचारालाच नकारात्मक विचारांचे मळभ लाभले की कार्यसिद्धीला ग्रहण लागलंच म्हणून समजा. पाणी ज्याप्रमाणे उताराकडे वाहतं तसे बहुसंख्य वेळेला माणूस नकारात्मक विचार करताना दिसतो. बहुतेक वेळेला खालील प्रकारचे विचार कार्यप्रवण होण्यामध्ये आणि चांगल्या विचारांना प्रत्यक्षात सिद्ध होण्यामध्ये अडसर ठरतात. उदाहरणार्थ,
* मी केल्याने काय फरक पडणार आहे?
* मला जमण्यासारखं नाही ते.
* मीच का म्हणून करू?
* योग्य वेळ आल्यावर करू, आत्ताच काही घाई नाही.
* लोक काय म्हणतील, हसणार तर नाहीत ना?
* पण योजना असफल झाली तर?
* करायला हरकत नाही, पण मला नशीब कधीच साथ देत नाही.
पहिल्या विचारावर कार्यप्रवण होण्यामध्ये जरा काळ गेला की असे असंख्य विचार अडचणींचे डोंगर उभे करतात आणि चांगल्या विचाराची हत्या होते. थोर व्यक्तींच्या चरित्राचं परिशीलन केलं असता असं लक्षात येतं की, प्रतिकूल परिस्थितीतही केवळ सकारात्मक विचारांची साथ न सोडल्यामुळे ते असामान्य कार्य करू शकले.

स्व-प्रतिमाग, विधायक विचार   
स्वत:बद्दल व्यक्तीचं चांगलं मत असणं हे सृजनात्मक विचारांच्या जोपासनेसाठी, आत्मविश्वास निर्मितीसाठी व सुदृढ मानसिक स्वास्थ्यासाठी अग्रक्रमाची गोष्ट ठरत ‘स्व’ची ओळख होणं ही या प्रक्रियेतील महत्त्वाचा व सुरुवातीचा टप्पा आहे. सकारात्मक विचार करण्याची सवय लागली की आपोआपच स्वत:विषयी आदर निर्माण होतो व सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होते. चांगली स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी स्वत:चं चिकित्सक अवलोकन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरच सकारात्मक विचारांचा पाया म्हणून ओळखली जाणारी सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सकारात्मक स्व-प्रतिमा असणारे व्यक्ती स्वत:बद्दल जागृत असतात. स्वत:च्या गुण-दोषांबद्दल त्यांना जाणीव असते. स्वत:बद्दल चांगली भावना योग्य निर्णय घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासाठी महत्त्वाची आहे.
स्वत:ला स्वीकारणं
बऱ्याच वेळा व्यक्ती स्वत:च्या रंग, रूप, उंची यानुसार स्वत:चं मूल्यमापन करतो. वर्ण काळा असेल, उंची कमी असेल तर स्वत:बद्दल नकारात्मक विचार निर्माण होतात. क्वचित प्रसंगी आलेल्या अपयशाने खचून न जाता अपयशाच्या कारणांचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाची अद्वितीय कलाकृती असते, त्यामुळे इतरांशी तुलना करून स्वत:ला कमी लेखण्यापेक्षा स्वत:मध्ये सातत्याने सुधार कसा होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्वत:शी संवाद साधणं
स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत:ला स्वत:मध्ये असणाऱ्या गुण-दोषांसहित स्वीकारणं म्हणजेच सकारात्मक स्व-प्रतिमा निवडण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल होय. इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून स्वत:ची किमत करू नये. कारण आपणच स्वत:ला चांगले ओळखू शकतो.
सकारात्मक स्व-सूचना
आधुनिक मानसशास्त्राने असे सिद्ध केले आहे की सकारात्मक स्व-सूचनांचा व्यक्तिमत्त्व विकासात चांगला परिणाम दिसून येतो. हे एक प्रकारचे सकारात्मक विचारांचे प्रशिक्षणच आहे. नियोजन करताना, निर्णय घेताना, कार्याची   अंमलबजावणी करीत असताना सकारात्मक स्व-सूचनांचा निश्चित फायदा होतो. स्वत:मध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून ही स्व-सूचनांचा उपयोग करता येतो. उदाहरणार्थ,
* मी प्रत्येक काम आत्मविश्वासाने करीत आहे.
* माझी एकाग्रता वाढली आहे.
* माझा सर्वाशी सुसंवाद आहे.
* माझे जीवन अर्थपूर्ण व ध्येयनिष्ठ आहे.
* मी सकारात्मक आहे.
* स्वत:ला स्वीकारणे.
बऱ्याच वेळेला आपण जसे नाहीत तसे इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो; परंतु यातून येणारी निराशा फार मोठी असते. तसेच यामध्ये आपण स्वत:लाच एक प्रकारे फसवत असतो. त्यामुळे आपण जसे आहोत तसे प्रदर्शित होणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने स्वत:वरचा विश्वास व आदर वाढतो.
नावीन्यत
जीवन जगत असताना नावीन्याचा सातत्याने पाठपुरावा केला तर सर्जनशीलतेचा विकास होण्यास हातभार लागतो. दैनंदिन कृती करताना एखादी समस्या सोडवताना यामध्ये आणखी काय नवीन करता येईल, याचा विचार केला तर अनेक मार्ग अजून सुचू शकतील. अगदी बोलतानाही अचूक, समर्पक अथवा नेहमी वापरतो त्यापेक्षा वेगळ्या शब्दांचा शोध घेतला तर भाषाही समृद्ध होईल. नावीन्य ही मनाची ओढ असली तरीही प्रत्यक्षात कृती करताना व्यक्ती नवीन मार्ग अवलंबायला तसा धजावत नाही. सकारात्मक विचारांमुळे या विचारसरणीमध्ये निश्चित बदल होऊ  शकतो. नव्या दृष्टिकोनातून विचार केला म्हणूनच आईनस्टाईन, बिल गेट्स, जेम्स वॅट, एडिसन, गौतम बुद्ध, जगदीशचंद्र बोस यांसारख्या महान व्यक्ती ज्ञानाच्या कक्षांची क्षितिजे विस्तारण्यात यशस्वी झाल्या.
इतरांसाठी चांगल्या गोष्टी करणे    
स्वत:साठी तर सगळेच जगतात; परंतु जो इतरांसाठी काही तरी चांगले करतो त्याला सकारात्मक ऊर्जेचे दालन खुले होते, स्वत:मध्ये आत्मप्रतिष्ठा निर्माण होते. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांचा विचार केला तरच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास साध्य होऊ  शकेल.
आनंदी राहणे
जीवनातील विसंगतींना अनुसरून थोडासा विनोद करणे, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, उत्तम कलाकृती, नाटके, साहित्य यांचे रसग्रहण करणे, थोडक्यात समग्रपणे जीवन जगणे यातूनच आनंदी वृत्ती तयार होते, जी जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते.
स्वत:च्या क्षमतांचा पूर्णपणे उपयोग करायचा असेल तर स्वत:ची ओळख होणे व सकारात्मक विचारांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचारसरणी असणारी सृजनशील माणसे समाजात आपले योगदान प्रभावीपणे देऊ  शकतात. चला तर मग, सकारात्मक विचारांच्या माध्यमातून स्वत:ची प्रतिमा उंचावण्याचा निर्धार करून राष्ट्र निर्माणाच्या कार्यास सिद्ध होऊ या.






प्रा. प्रवीण काळे
by- Loksatta



बुधवार, १५ जून, २०१६

सकारात्मक विचारसरणी...

एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले. ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. . . . जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते .. आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!









- by - what's app

पैसा ... पैसा ....

श्रीमंतीची गुरूकिल्ली पैसा हे एक साधन आहे. एखादे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे असेल तर , विविध साधने उपयोगी पडतात. त्यात पैसा या साधनाला आज अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. पैसा असेल तरच अनेक गरजा पूर्ण होतात. पैसा नसेल तर आपल्या अत्यावश्यक गरजा देखील पूर्ण होऊ शकत नाही. पैसा हा देव तर नाही , पण देवा इतकेचं महत्व पैश्याला प्राप्त झाले आहे. म्हणूनच म्हणतात कि, देव गरीबाचा नाही. म्हणजे जो श्रीमंत असेल तो अनेक तीर्थक्षेत्राला जावू शकतो.असो. श्रीमंत व्हावे ही तसी साधू संत सोडले तर सर्वांची इच्छा असते. तसे काही संतांजवळ कोटीने रुपये आढळतात हा अपवाद वेगळा. पण सामान्य माणसाला पैश्याची नितांत गरज असते. पैसा प्रचंड प्रमाणात मिळावा ही सर्वांची इच्छा असते. परंतु कृती इच्छेला धरून केली जात नाही. आज जास्त प्रमाणात पैसे मिळू शकतील असे व्यवसाय म्हणजे , जमिनीचे व्यवहार होय., सोने खरेदी , दामदुप्पट ठेव योजना , बचत , शेअरबाजार गुंतवणूक . वैगरे पर्याय सांगितले जातात. यात जमीन खरेदीसाठी एकाचं वेळेला खूप मोठी रक्कम लागते. तेव्हाच जमीन खरेदी होऊ शकते. म्हणजेच पैसा जास्त असेल तरच पैसा मिळतो. आणि एक गोष्ट लक्ष्यात घ्या कि, कमी पैश्याने जास्त पैसे मिळवता येत नाही. सोने खरेदीतही बऱ्यापैकी परतावा मिळू शकतो. परंतु ही खरेदी बँके कडून असावी कि, ज्या मुळे मोड, घटीचा प्रश्न येत नाही. किवा पेपर गोल्ड चा पर्याय स्वीकारावा. आणि यानंतर विषय येतो तो दामदुप्पट योजनेचा. जो कोणी आठ , नऊ वर्षाने पैसे दुप्पट देतो तो त्याचं पैशाचे चारपट केल्याशिवाय राहत नाही.आणि बँक दरवर्ष १०% ,११% प्रमाणे व्याज देते.पण इकडे महागाई वाढीचा दर ११.६०% आहे. मग बँकेत पैसे ९ वर्षानंतर दुप्पट होवून महागाई वाढल्याने फायदा होत नाही.आज एक लाखाला एक गुंठा मिळतो.पण ९ वर्षाने बँकेत २ लाख झाले पण त्यावेळी एका गुंठ्याला ५ लाख लागतील.याचाही विचार आवश्यक ज्याला आपला पैसा कामाला लावता येत नाही असे लोक दुपटीच्या योजनेत पैसे गुंतवतात. “ कामाला ” हा शब्द यासाठी वापरला कि ,मनुष्य अगोदर पैसे मिळवण्यासाठी स्वता काम करतो. काही लोक आयुष्यभर कामच करतात. काही थोडे लोक मिळवलेल्या पैश्यालाच कामाला लावतात. पैशानेच मोठे व्यापार करतात. नंतरचा विषय येतो तो सामन्यांची बचत . असी बचत दरमहा थोडी थोडी केली जाते. या अशा बचतीतून त्यांच्या भविष्यातील गरजा अल्पप्रमाणात पूर्ण होतीलही पण अशा बचतीतून खूप पैसा निर्माण झाला असे होत नाही. आणि शेअर मार्केटचा पर्याय पैसा वाढविण्यासाठी सांगितला जातो. याही पर्यायाचा आपण विचार करू. शेअर मार्केट विषयी सामान्य लोकांमध्ये काही गैर समाजही असतात. भारतात तर बहुसंख्य लोक यापासून अलिप्त आहे . “ हा विषय आपला नाहीच ” इथपर्यंत त्यांची मानसीकता तयार झाली आहे. शेअर मार्केटमध्ये अनेक लोक संपले, डूबले ,काहींनी आत्महत्या केल्या. असे बोलले जाते. असे होतेही . पण त्याची कारणे अभ्यासली का ? मार्केट मध्ये अनेक सुविधा उपलब्ध असतात. आपल्या पैशाच्या चारपट मार्जीन् देतात. फिव्हचर ऑप्शन वापरतात. याच ठिकाणी लोक लालची पडतात. व संपतात. काही लोक असा पैसा मार्केट मध्ये टाकतात कि, ज्या पैशाची दोन चार महिन्यांनी लग्नासाठी , शिक्षणासाठी गरज आहे आणि मार्केट खाली आलेच तर त्यांना लॉस घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. ज्या पैशाची आपल्याला पाच ,दहा वर्ष गरजच नाही . असा पैसा गुंतवला तर नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कधीकधी मार्केट खाली आल्यावर लोक घाबरतात. अशा वेळी गुंतवणुकीची संधी प्राप्त होते हे लक्ष्यात घेतले पाहिजे. पैसा गुंतवताना कंपन्यांची पूर्ण माहिती घेवूनच त्यात पैसा अडकवला पाहिजे. या ठिकाणी नशीब उपयोगाचे नाही. त्याला अभ्यासाची गरज असते. बाजाराला जुगार समजू नये. तो एक बिजनेस आहे. हे समजूनच गुंतवणूक करावी. आणि आपली गुंतवणूक किती ? एका वर्षात किती परतावा हवा ? हे अगोदर ठरवून घ्यावे. विनाकारण लालचेत पडू नये. आणि लोक नेहमी LIC, सारख्यांनच्या खरेदीकडे लक्ष्य ठेवून आपली खरेदी करतात. परंतु हे प्रत्येकाला शक्य नाही. त्यांच्या जवळ पंचवीस वर्ष पैसा अडकवण्याची तयारी असते. इतके भांडवल त्यांच्या जवळ असते. आपल्याजवळ भांडवल किती ? किती दिवस आपण पोजिशन सांभाळू शकतो ? याचा विचार हवा. मार्केट मध्ये दरमहा थोडीफार गुंतवणूक करत गेल्यास दहा पाच वर्षात नक्कीच फायदा मिळेल. जसे आपण पॉलिसीत पंधरा वीस वर्ष पैसे काढू शकत नाही तसे यात सतत शेअर्स खरेदी करत गेले तर वीस वर्षात नक्कीच पैसे पंचवीस पट झालेले असतील. घोडा का अडला ?, पाने का सडली ? ,भाकरी का करपली ?, या तीन प्रश्नांचे उत्तर एकच आहे. ते म्हणजे न फिरवल्यामुळे . तसे शेअर्स देखील एकदा घेऊन त्याकडे लक्ष्याच दिले नाही तर जास्त फायदा मिळू शकत नाही. त्यासाठी नफ्यात असलेले शेअर्स विकावे व कमी किमतीचे शेअर्स घ्यावे . असा सतत बदल केल्यास नक्कीच फायद्याचे प्रमाण वाढेल. या पद्धतीने थोड्याच कालावधीत आपल्याजवळ चांगला पैसा उभा राहू शकतो. मार्केट मध्ये कमोडिटी व एग्रो कमोडिटी हा ही एक नफा कमविण्याचा चांगला पर्याय आहे. परंतु यात जोखीम आहे. पण गुजराथीत म्हण आहे. “ हिम्मतणी किम्मत ” आता थोडी हिंमत असल्याशिवाय फायदा मिळू शकत नाही. योग्य अभ्यास , सराव, यातून ह्या गोष्ठी सहज शक्य होतात. NCDEX मध्ये गव्हू ,सोयाबीन सारखा शेतीमाल विकत घेवू शकतो. आपण ग्रामीण भागात राहत असल्याने व शेती करत असल्याने शेतीमालाच्या भावाचे चढ उतरीचे ज्ञान आपल्याला असते. त्या ज्ञानाचा फायदा आपण घेवू शकतो.
 
 
 
 
 
by-fb

जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय...

(हा लेख सोशल मेडीया वरून घेतलेला आहे पण, त्यात थोडी आवश्यक भर घालून आणि एडीट करून मी हा तयार केलेला हा लेख आहे. हा लेख सोशल मेडीया वर ज्याने कुणी सर्वप्रथम किहून टाकला त्याला मनापासून धन्यवाद!) 
 

 जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय. मला सर्वांचंच म्हणणं पटतं. आणि त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय. तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत. जगाचं असंच असतं!! आता हेच बघा ना! * मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही. * श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबरचा धंदा करत असणार! त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब राब राबतोय, पण झालो का श्रीमंत? तो श्रीमंत झाला कारण निश्चीत बेईमानी केली असणार त्याने! त्याशिवाय तो श्रीमंत होऊच शकणार नाही. * पैशाच्या मागे दिवसरात्र धावू लागला की म्हणतात पैशाची हाव सुटली आहे. याला माणूसकी उरली नाही आहे. * पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात महत्वाकांक्षा नाही. संसार आणि पोराबाळांची शिक्षणं कशी करणार देव जाणे? याला स्वतःचा संसार समजत नाही का? * नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडीचुंबक म्हणतात. दानशूर कर्णाची उदाहरणे दिली जातात. * जीवनात चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच त्याला उधळ्या म्हणतात. भविष्यासाठी पैसा साठवून ठेवा म्हणतात. * समजा वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं का कधी आयुष्यात? * आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात की, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं? * जास्त भाविक असला तर लोक म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव! अंगी माणूसकी पाहिजे, नुसती देवपूजा करून काय उपयोग? * मंदीरात नाही गेला, देवपूजा नाही केली तर नास्तिक म्हणतात. देवधर्माचं थोडंतरी केलं पाहिजे असे म्हणतात. * तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, म्हणतात: अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. * दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक? कुठल्या चक्कीचा आटा खातोय कुणास ठाऊक? * मनुष्य तब्येतीने बारीक असला तर काडी पहेलवान आणि एकपाचर्या म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात की तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं. बारिक माणसांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते असे टोकले जाते. याची तब्येत काही सुधरत नाही, असे म्हणतात. * मनुष्य तब्येतीने जाड असला की हत्ती म्हणतात. एवढी जाड तब्येत असली तर विविध रोग होतात असे म्हणतात. जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ जाड माणसांमुळेच पडतो असे टोकतात. त्याचे खाणे काढतात. * परफेक्ट फीगर आणि सिक्स पॅक अॅब्ज असले तरीही काही ना काही टिका होतेच. आपल्याला थोडेच माॅडेलिंग करायचे आहे अशी टिका होते. जिम मध्ये जाऊन काय करणार, एवढी बाॅडी बनवून काय करणार, शेवटी मरायचेच आहे असे म्हणतात. * पोट सुटले असेल तरीही नावे ठेवणार! * पोट प्रमाणबद्ध असेल तरी म्हणणार की "अरे थोडे पोट सुटले की ती सुखी संसाराची निशाणी असते" सपाट पोट ठेऊन आपल्याला कुठे माॅडेलिंग करायचं आहे? * सहज कोणाला मदत केली तर म्हणतात यामागे काहीतरी हेतू असणार! * नाही मदत केली तर म्हणणार, यांचेकडे साधी माणूसकी नाही! * सरळ स्वभावाचा असेल, दानशुर असेल, सत्य बोलत असेल तर म्हणतात अंगात थोडातरी स्वार्थ हवा होता. भोळा सांब आहे, असे म्हणतात. "आलाय मोठा राजा हरिश्चंद्राचा अवतार!"अशी दूषणे दिली जातात. * स्वार्थी असलाच तर म्हणतात सरळ स्वभाव हवा. दानशूर लोकांची उदाहरणे दिली जातात. म्हणतात की स्वार्थाचा पैसा काय कामाचा? "माणसाने दानशुर कर्ण असले पाहिजे" अशी उदाहरणे दिली जातात. भले असे म्हणणारे लोक स्वतः मात्र गरिब भिकार्याला एक पैसासुद्धा देतात की नाही हा संशोधनाचा विषय ठरेल. * खेळकर आणि गमतीदार स्वभाव असला तर म्हणतात हा आचरट आहे. याला परिस्थितीचं गांभीर्य नाही. दोन पोरांचा बाप झाला याला शोभतं का असं? * गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे. जीवन मस्त मजेत जगलं पाहिजे. हा फारच गंभीर असतो बुवा! * तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला, नाहीतर झाला नसता! *अयशस्वी झालात तर म्हणणार आमचं ऐकलं नाही ना! मग भोगा आता आपल्या कर्माची फळं! *अभ्यासात हुशार नसेल तर म्हणतात की याचे पुढे कसे होईल कुणास ठाऊक? याला आई वडील त्याच्यासाठी घेत असलेल्या कष्टांची जराही पर्वा नाही. *चांगले मार्क पडले तर म्हणतात की या मार्कांचा शिक्षणाचा व्यवहारात काही उपयोग नाही. याचे कडे माणुसकी नाही. याने घोकमपट्टी केली असेल. * सौंदर्य आणि देखणे व्यक्तिमत्व असले तर म्हणणार, नुसते देखणेपण काय कामाचे? बुद्धी तर हवी ना! सुंदर व्यक्तींना उगाचच शहानिशा न करता केवळ "सुंदर व्यक्ती आहे म्हणून निर्बुद्धच असेल" असे म्हणून हिणवले जाते. * बुद्धी असली तर म्हणणार, नुसती बुद्धी असून काय उपयोग? थोडे सौंदर्य आणि देखणे व्यक्तिमत्व असायला हवे होते? त्याशिवाय काय उपयोग? पर्सनॅलिटी असायला हवी, नुसती हुशारी असून काय उपयोग? अहो, लोकांचं काय घेऊन बसलात? अहो, काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची लोकांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं? लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत. जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं? मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय... फिदीफिदी हसतील ते हसू देत की ! बोटं मोडीत बसतील ते बसू देत की ! आपण का शरमून जायचं ? कशासाठी वरमून जायचं ? कशासाठी भयाने ग्रासून जायचं ? फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं ? आपलं जीवन आपण ठरवायचं! कसं जगायचं? कण्हत कण्हत, की गाणं म्हणत? आपलं आपणच ठरवायचं.....

नक्की विचार करा आणि कामाचा दर्जेदार वेळ वाचवा.

एका बेकार माणसाने मायक्रोसॉफ्ट कडे सफाई कामगार या पदासाठी अर्ज केला होता. एच आर मॅनेजर ने इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याची ट्रायल घेतली आणि त्याला पास केले. मॅनेजर म्हणाले "तू स्विपर म्हणून सिलेक्त झालास. तुझा इमेल आयडी दे मी त्यावर तुझे नियुक्ती पत्र पाठवतो" हे ऐकून उमेदवार म्हणाला, "साहेब मी एक सफाई कामगार आहे माझ्याकडे इमेल आयडी नाही आणि कॉम्पुटर पण नाही" "अरेरे... तुझा इमेल ऍड्रेस नाही याचा आमच्याकडे अर्थ असा होतो की तू अस्तित्वातच नाहीस. त्यामुळे मग तुला ही नोकरी मिळणार नाही" त्यानंतर तो बेकार माणूस निराश होऊन निघून गेला. खिशात फक्त १० डॉलर शिल्लक होते. त्याला काय करायचे सुचेना. मग त्याला एक युक्ती सुचली. त्याने शेतकऱ्याकडे जाऊन एक क्रेट टोमॅटो विकत घेतले. नंतर दारोदार जाऊन त्याने ते सर्व टोमॅटो विकले. त्याच्यातून त्याला भरपूर नफा झाला. फक्त दोन तासांत त्याचे पैसे दुप्पट झाले. आता त्याला पैसे कमावण्याचा मार्ग मिळाला होता. टोमॅटो सोबत तो आता इतर भाज्या आणि फळेही विकू लागला. असे करून थोड्याच दिवसांत त्याच्याकडे खूप पैसे जमा झाले. त्याला काम रोज सकाळी लवकर सुरु करून रात्री उशिरा संपवायची सवय लागली. त्याने थोड्याच दिवसांत एक टेम्पो घेतला. नंतर ट्रक आणि नंतर खास बनवलेल्या डिलिव्हरी व्हॅन आल्या. पुढील ५ वर्षांनी तो यु एस मधला सर्वात मोठा फूड रिटेलर म्हणून नावारूपाला आला. आता तो त्याच्या कुटुंबाचे भविष्य निर्वाह प्लॅनिंगचा विचार करू लागला. त्याने इन्शुरन्स ब्रोकरला बोलावले आणि प्लान चेक केले. ब्रोकरने माहिती विचारून घेतली आणि "तुमचा इमेल आयडी दया मी तुम्हाला वर्किंग पाठवतो" म्हणाला. हा म्हणाला "माझ्याकडे इमेल आयडी नाही" इन्शुरन्स ब्रोकर म्हणाला "साहेब तुमच्याकडे इमेल आयडी नाही आणि तरीही तुम्ही एव्हडे मोठे साम्राज्य निर्माण केलेय, नुसती कल्पना करा, जर तुमच्याकडे इमेल आयडी असता तर तुम्ही कोण असतात?" माणसाने थोडा विचार केला आणि म्हणाला "माझ्याकडे जर इमेल आयडी असता तर मी कोण असतो माहीत आहे का? मी मायक्रोसॉफ्ट मध्ये स्विपर म्हणून कामाला असतो" मित्रांनो, इंटरनेट, इमेल, बी बी एम, व्हाट्स ऍप या गोष्टी आपल्या जीवनामध्ये कशावरचाही उपाय नाहीत फेसबुक, इंटरनेट, इमेल, बी बी एम यापैकी तुम्ही कशावरही नसाल तरीही तुम्ही खूप मेहनत करून, सचोटीने काम करून, थोडे जास्त कष्ट करून यशस्वी होऊ शकता. फेसबुक, व्हाट्स ऍप यांच्यावर जास्त वेळ वाया घालवू नका. Good morning, Good afternoon, Good night , happy birthday... म्हणून सकाळ, दुपार आणि रात्र चांगली जात नसते. ती आपली संस्कृतीही नाही. आपण काम केले तरच हे सर्व चांगले जाईल. आपले काम सोडून व्हाट्स ऍप वर अनेक तरुण तरुणी वेळ वाया घालवतांना दिसतात. आपला कामाचा दर्जेदार वेळ या गोष्टीत वाया जात असेल तर नक्की विचार करा आणि त्यासाठी जाणारा वेळ वाचवा. या गोष्टींसाठी ठराविक वेळ ठरवा.






-By social media

माझ्याबद्दल