पंकजा मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.एस.सी. एमबीए(3 सेमिस्टर) झालेले आहे पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. संघर्ष आणि गोपीनाथ मुंडे असे समीकरण महाराष्ट्राला मागील अनेक वर्षांपासून ज्ञात आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत कन्या पंकजा मुंडे याही अतिशय संघर्ष करत यशाकडे वाटचाल करताना दिसत आहेत.
गोपीनाथराव आणि पत्नी प्रज्ञा यांच्या पंकजा या जेष्ठ कन्या. पंकजांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी परळी वैजीनाथ येथे झाला. गोपीनाथराव आणि पत्नी प्रज्ञा यांना मुलगा झाल्यास त्याचे नाव पंकज आणि मुलगी झाल्यास पंकजा ठेवू असे मामा प्रमोद महाजन यांनी फार पूर्वीच ठरवले होते. हे नाव ठेवण्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे त्यावेळेस भाजपाला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. त्यानुसार गोपीनाथरावांना मुलगी झाली व तिचे नाव पंकजा ठेवण्यात आले.
पंकजा या जेष्ठ दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत. पंकजा यांचे मार्च 1999 मध्ये डॉ चारुदत्त उर्फ अमित पालवे यांच्याशी लग्न झाले. डॉ अमित यांचे कुटुंबीय मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहे पण तर पुढे पुण्यात स्थायिक झालेले आहेत. पंकजा आणि अमित यांना एक मुलगा आहे. पंकजा यांच्या मुलाचे नाव आर्यमान असून तो 13 वर्षाचा आहे. पंकजा यांच्या परिवारामध्ये त्यांच्या 2 छोट्या बहिणी व आई आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ आहेत.
शिक्षण
पंकजा यांचे शिक्षण बी.एस.सी. एमबीए झालेले आहे. पण त्यांनी एमबीए च्या तिसऱ्या सेमिस्टर पर्यंतच आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पंकजा यांचे प्राथमिक शिक्षण परळी येथेच झाले. सहाव्या वर्गापर्यंत पंकजा आपल्या मैत्रीणीबरोबर रिक्षाने शाळेत ये जा करत होत्या. पुढे त्यांनी हट्ट करून वडील गोपीनाथरावांना सायकल मागितली. सायकल मिळाल्यानंतर मग त्यानी सायकलवर शाळेत जाण्यास सुरुवात केली.
पुढे चालून त्यांना औरंगाबाद येथे उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आले. पण तिथे काही त्यांचे मन रमले नाही. औरंगाबाद ला आल्यानंतर पंकजा 2 महिने एका वसतिगृहात राहिल्या. 2 महिन्यातच पंकजा औरंगाबाद सोडून परळीला परतल्या व त्यांनी तिथेच पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला व आपले पुढील शिक्षण पूर्ण केले.
राजकिय कारकीर्द
पंकजा पालवेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात इ.स. 2009 साली झाली. पंकजा यांनी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली. पंकजा 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. पंकजा यांचा राजकारणातील प्रवास तसा खूप खडतर राहिला आहे. त्यांनी नेहमीच संघर्ष करत आपली वाटचाल केली आहे. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे दिवंगत नेते व त्यांचे वडील गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांच्या प्रचारासाठी पंकजा निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जवळपास 300 गावांमध्ये सभा आणि 400 गावांना भेटी दिल्या होत्या.
दुष्काळी परिस्थितीत आघाडी सरकारने बीड चे दुष्काळी जिल्ह्यात समावेश केला नाही म्हणून खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पेट्रोलचे दर लिटरमागे साडेसात रुपये वाढवल्याच्या निषेधार्थ परळी शहरात आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी बैलगाडीतून तहसील कार्यालयात मोर्चा नेला होता. पुढे पंकजा यांना परभणी महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची धुरा ही देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी नेहमी मराठवाड्याच्या विविध प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवला आहे. आज पंकजा भाजप सरकारमध्ये एक महत्वाच्या मंत्री आहेत. सोबतच त्या एक पॉवरफुल नेत्या म्हणून उदयाला आल्या आहेत. त्यांची ताकद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना पक्षातूनच विरोध होतोय असे वक्तव्य त्यांचे मामा व भाजपशी संबंधित प्रकाश महाजन यांनी नुकताच केला आहे. पंकजा यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावाही केला होता.
पंकजा यांची राजकीय कार्यकिर्द बऱ्याच वादानीही चर्चेत राहिली. पंकजा यांनी शाळाकरिता खरेदी केलेली चिक्की आरोग्याला घातक असल्याचं सिद्ध झाले होते. त्यांनी चिक्कीचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या मार्जितल्या संस्थांना दिल्याचा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केला होता. दुष्काळग्रस्त लातूर शहरात रेल्वेदारे पाणी पोहचल्यावर लगेच पंकजा यांनी तिथे चाललेल्या कालव्याच्या कामाजवळ जाऊन सेल्फी काढला होता. यावर जनतेतून तीव्र रोष जाहीर झाला होता. पंकजानी जलयुक्त शिवार या महाराष्ट्र सरकारच्या योजनेच्या यशाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून जलसंवर्धन व रोजगार हमी योजना या खात्यांचे मंत्रिपद काढून घेतले. त्यांच्याकडे त्यांनतर महिला आणि बालकल्याण या एकाच खात्याचा भार ठेवण्यात आला.
सामाजिक कार्य
पंकजा या राजकीय कामाव्यतिरिक्त सामाजिक कार्यामध्ये ही अग्रेसर असतात. त्यांनी वैद्यनाथ सर्वांगीण विकास संस्थेमार्फत विविध शाळा महाविद्यालये औद्योगिक शिक्षण संस्था अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आहेत. महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता बचत गट स्थापन करून त्या माध्यमातून त्यांनी महिलांना रोजगार व अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. भटक्या विमुक्त व इतर मागास समाजातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना सतत साहाय्य त्या करत असतात. बीड जिल्ह्यामध्ये उसतोड कामगारांचे प्रमाण खूप जास्त आहे. उसतोड कामगारांच्या उन्नतीसाठीही त्या नेहेमीच प्रयत्नशील असतात.
स्त्रीभ्रूण हत्याला आळा घालवण्यासाठी व मुलींचा जन्मदर वाढवा यासाठी त्या समाजात नेहमी प्रबोधन करत असतात. स्त्रीभ्रूण हत्येस पायबंद बसवण्यासाठी आमदार पंकजा मुंडे यांनी लेक वाचवा राष्ट्र वाचवा या योजनेला सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील स्त्री जन्माचे गुणोत्तर प्रमाण कमी झाले आहे, त्यासाठी आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी मराठवाड्यात माझी कन्या भाग्यश्री ही योजना वैद्यनाथ सर्वांगीण विकास संस्थेच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यासोबतच त्यांनी मराठवाड्यातील मंदीरांमध्ये स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जागर मोहीम ही राबवली आहे.
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारस म्हणून त्यांची जेष्ठ कन्या तथा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेतले जाते. त्यांनी ते सार्थही केले आहे. राजकारणात हार-जित होतंच असते. पण आज पंकजा मुंडे राज्यातील बहुजन नेत्यातील सर्वात पावरफुल नेत्या म्हणून उदयाला आल्या आहेत. त्यांना मानणारा वर्ग सर्व भागात असून ओबीसी व दलित समाजाला त्या आपल्या नेत्या वाटतात.
by -http://khaasre.com/minister-pankaja-munde-biography/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा