शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

अंबेजोगाई ते दिल्ली प्रमोदजी महाजन यांचा प्रेरणादायी प्रवास…



अंबेजोगाई ते दिल्ली हा प्रवास इतका सोपा नाहीये आणि नव्हता, पण स्वकर्तुत्वाने ह्या माणसाने देशांच्या राजकारणात भावी पंतप्रधान म्हणून नाव कमावले होते. हे नाव होते प्रमोद महाजन आज त्यांची जयंती तर आज खासरे वर बघूया प्रमोद महाजन विषयी काही खासरे माहिती…

डावा हात वर करून भाषण करायची त्यांची लकब वेगळीच होती. नुसती विरोधकांवर टीका करणारी भाषणे न करता, विरोधकांच्या मर्मावर घाला घालणारी आणि लोकांना सोप्या भाषेत स्वतःचे म्हणणे पटवून देणारी भाषणे देणारा नेता म्हणजे प्रमोद महाजन हे आहे. महाराष्ट्रातील सेना भाजप युतीचे ते शिल्पकार होते. भाजपचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते तर प्रमोद्जीना भावी पंतप्रधान ह्या स्वरुपात पाहत असत.



प्रमोद हे व्यंकटेश देवीदास महाजन आणि प्रभादेवी यांचे द्वितीय चिरंजीव होते. त्यांचा जन्म मेहबूबनगर (आंध्र प्रदेश) येथे झाला. महाजन कुटुंब त्यांच्या महाजन गल्ली उस्मानाबाद येथून अंबाजोगाईला मंगळवार पेठेत भाड्याच्या घरात स्थलांतरित झाले. त्यांचे बालपण अंबाजोगाईत गेले. २१ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे शिक्षण योगेश्वरी विद्यालय आणि महाविद्यालय आणि रानडे पत्रकारिता या संस्थांत झाले. त्यांनी भौतिकशास्त्र आणि पत्रकारितेमध्ये पदवी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. नाटकांच्या सामायिक आवडीमुळे परिचय झालेल्या रेखा हमीने यांच्याशी ११ मार्च, इ.स. १९७२ रोजी त्यांचे लग्न झाले.




खोलेश्वर महाविद्यालयात इंग्लिशच्या अध्यापनाचे काम इ.स. १९७१ पासून १९७४ पर्यंत केले. आणीबाणीच्या काळात प्रमोद महाजन सक्रिय राजकारणात उतरले. प्रमोद महाजन यांनी इ.स. १९९६ मधील १३ दिवसांच्या वाजपेयी शासनामध्ये संरक्षणमंत्रिपद सांभाळले. १९९८ साली परत सत्ता आल्यावर ते प्रधानमंत्र्याचे सल्लागार तसेच केंद्रीय मंत्री होते.



प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता. जनसंघाच्या मिणमिणत्या पणतीपासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम मुंडे-महाजन या जोडगोळीने केले. २१मे १९७८ रोजी गोपीनाथ मुंडे यांनी प्रमोदजी यांची बहीण प्रज्ञा महाजन सोबत लग्न केले आणि मैत्रीचे रुपांतर नात्यात झाले.



लाल कृष्ण अडवाणी यांची सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा या रथयात्रेचे सारथी तेच होते त्यांची हि कल्पना होती. तसेच मुरली मनोहर जोशी यांची एकता यात्रा त्याचे प्रमुख प्रमोद महाजन होते. अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रमोद महाजन विषयी सांगितले होते कि, “जरी प्रमोद महाजन बीजेपीमध्ये नसते तरीहि ते, भारतातील असंख्य सामान्य युवकांना प्रेरणास्थान राहिले असते.”
प्रमोद महाजन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन













by - http://khaasre.com/pramod-mahajan-short-bio/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल