शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

‘रद्दी वीक’



आईसक्रीम तसे वर्षभर विकले जात असले तरी उन्हाळ्याच्या मोसमात त्याची मागणी वाढलेली असल्यामुळे विक्री भरपूर होते. रद्दीवाल्यांसाठीही हा हंगाम सुगीचा असतो. या काळात बाजारात असलेल्या रद्दीवाल्यांच्या संख्येत थोडीशी वाढ होते. मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे किंमतही वाढते. गेल्या महिन्यात ७ रुपये किलो भावाने विकली जाणारी रद्दी आता सुमारे ८ रुपये किलो भावाने विकली जात आहे. लवकरच पुढील शैक्षणिक वर्षांला सुरुवात होणार आहे आणि त्या वेळी वह्णाा, पुस्तके यांची नव्याने गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रद्दीचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. वर्षभराचा हिशेब पाहिला तरी दिवसाकाठी एकटय़ा मुंबईतूनच सुमारे ३०० टन रद्दी विकली जाते.
या उलाढालीविषयी माहिती देताना मशीद बंदरमध्ये कागदाचा व्यवसाय करणाऱ्या रमतालाल शहा यांनी सांगितले. रद्दी विकत घेणाऱ्यांची एक साखळी आहे. घरांतून फेरीवाला रद्दी घेतो, तिथून ती रद्दी छोटय़ा दुकानदाराकडे पोहोचते, छोटा दुकानदार सब-डीलकरकडे आणि सब-डीलरकडून घाऊकविक्रेता रद्दी विकत घेतो. हा गोळा झालेला कागद विविध व्यवसायांना पुरविला जातो. पिशव्या तयार करणे, फळांसाठी पॅकिंग आणि रिसायकलिंगसाठी या रद्दीचा वापर करण्यात येतो. स्थानिक रद्दीवाला ८ रुपये प्रतिकिलो या दराने रद्दी विकत घेत असेल तर पेपरमिलकडे रद्दी पोहोचेपर्यंत रद्दीचा भाव सुमारे ८.५० रुपये प्रतिकिलो एवढा झालेला असतो. या साखळीतील प्रत्येक रद्दीवाला किलोमागे केवळ १० पैशाच्या ‘मार्जिन’ने हा व्यवसाय करतो. 
ते पुढे म्हणाले की, पूर्वी केवळ मशीद बंदर येथे ही बाजारपेठ होती. मुंबईतील रद्दी येथे येत असे आणि इथून पुढे ती कागदाच्या गिरण्यांमध्ये पोहोचविली जात असे. रमतालाल सुट्टीच्या दिवशी एका आठवडय़ात भायखळा ते दादर आणि दुसऱ्या आठवडय़ात दादर ते चिंचपोकळी असा भाग पिंजून काढायचे. प्रत्येक रद्दीवाल्याकडे किती रद्दी येते हे पाहून घाऊक रद्दीवाल्यांशी संपर्क साधायचे. आता मात्र अंधेरी, दादर, घाटकोपर, मुलुंड अशा सर्व ठिकाणी घाऊक रद्दी घेणारे आणि विकणारे आहेत. कागदाच्या गिरण्यांना दररोज अमूक एक किलो रद्दी पुरविण्याचे कंत्राट घाऊक रद्दीवाल्यांनी केलेले असते. त्यामुळे या व्यवसायात रद्दी विकली जाईल की नाही, हा प्रश्न सहसा उद्भवत नाही. कारण या साखळीतील एका घटकाकडील रद्दी विकत घेण्यास दुसरा घटक सदैव तयार असतो. कागदाची मागणी न संपणारी आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षांत या धंद्यात थोडीशी मंदी आली होती. त्यावेळी डॉलरचा भाव उतरला होता. त्यामुळे परदेशातील कागदाचा दरही कमी झाला होता. त्या कागदाचा दर्जा भारतातील कागदापेक्षा चांगला असल्यामुळे कागद गिरण्यांनी कागद आयात करणे पसंत केले होते. त्यावेळी कित्येक जण रद्दीच्या व्यवसायातून बाहेर पडल्याचे शहा यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. 
लाकडापासून कागद तयार होतो. त्यानंतर चार वेळा त्याचे ‘रिसायकलिंग’ करण्यात येते. पार चोथा झालेल्या कागदाचा वापर शेवटी खत तयार करण्यासाठी होतो. 
शहा यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. ‘रद्दीवाले’ हा शब्द काहीसा ‘डाऊन मार्केट’ वाटत असला तरी एकेकाळी या व्यवसायाला किराणा मालाच्या व्यवसायापेक्षा वरचे स्थान होते. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर रद्दी विकणारा स्वत:चे वाहन खरेदी करू शकत असे. रमतालाल यांची चौथी पिढी मात्र या व्यवसायाबाबत फारशी उत्सुक नाही. रमतालाल म्हणतात की, या व्यवसायासाठी ठिकठिकाणी फिरावे लागते. दुसरीकडे, एका जागी बसून शेअर बाजारातील उलाढाल करता येते आणि दिवसाला किमान पाचशे रुपये सहज कमावता येतात. त्यामुळे त्यांची मुले रद्दीपेक्षा शेअर बाजाराकडे जास्त आकृष्ट झाली आहेत.
प्लास्टिकचाही या धंद्यावर थोडा परिणाम झाला आहे. पिशव्या तयार करण्यासाठी किंवा पॅकिंगसाठी प्लास्टिकचा वापर व्हायला लागल्यापासून रद्दीची मागणी थोडीशी कमी झाली आहे, असे ते कबूल करतात. पण या धंद्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी अजूनही प्लास्टिकच्या व्यवसायात जायचे ठरविलेले नाही. त्यांच्या मते रद्दीच्या धंद्याला मरण नाही. कागदाची मागणी सतत राहणार आहे. त्यामुळे रद्दी विकत कोण घेणार, हा प्रश्न उद्भवणार नाही. रद्दीमध्येही ‘चोरी’ करणारे काही व्यापारी असतात. कागदाबरोबर पुठ्ठा देऊन वजन वाढविणारे किंवा इतर सामान देऊन भेसळ करणारे काही व्यापारी असतात. त्यांचा अपवाद वगळला तर रद्दी हा पांढरपेशा आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवून देणार व्यवसाय आहे, असे रमतालाल यांचे मत आहे.















सुनील डिंगणकर - 
by - Losatta 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल