बड्या कंपन्यांची मार्केट विस्ताराची गरज ओळखून हजारो गावांचा डाटाबेस प्रदीप लोखंडे यांनी उभा केला आहे. व्यवसायाच्या या आगळ्यावेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून गावागावांतून त्यांचं नेटवर्क तयार झालं आहे. या नेटवर्कच्या आधारावर ‘बिझनेस’ आणि ‘आयडॉलॉजी’ यांचा मेळ त्यांनी साधला आहे.
भारत हा १२० कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात उद्योग करू पाहणा-या, उद्योग वाढवू पाहणा-या बड्या देशी-विदेशी कंपन्यांना हा आकडा मोह घालतो. तथापि, भारत हा विशाल देश आहे, लक्षावधी खेड्यापाड्यापर्यंत तो पसरलेला आहे. इथल्या लोकसंख्येचं स्वरूपही आर्थिक-सामाजिकदृष्ट्या विषम आहे. अशा स्थितीत आपलं उत्पादन घेऊन भारतात खोलवर कसं पोहोचायचं हा मोठा प्रश्न या कंपन्यांना भेडसावतो. त्यासाठी जी सर्वांगीण माहिती हवी, डाटा हवा, तो कसा मिळवायचा? हे सर्व स्वत: करायचं तर त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागणार. बड्या उद्योगांची ही कळीची समस्या ओळखून कल्पकतेने स्वत:चं करिअर व व्यवसाय उभा करणा-या व्यक्तीचं नाव आहे प्रदीप लोखंडे. महाराष्ट्रातल्या ग्रमीण भागाचा विस्तृत डाटाबेस हेच त्यांच्या व्यवसायाचं भांडवल! अथक परिश्रमांतून त्यांनी हजारो गावांची माहिती गोळा केली. त्यात आणखी हजारो गावांची भर ते घालताहेत. महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातल्या इतर राज्यांचाही ते डाटाबेस गोळा करताहेत, तो अद्ययावत ठेवताहेत. ‘हिन्दुस्तान लिव्हर’पासून ‘एशियन पेन्टस’पर्यंत आणि ‘टाटा टी’ पासून ‘पारले’पर्यंत अनेक बडे उद्योग आज त्यांचे क्लाएंट आहेत. एके काळी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगलेला हा माणूस आज मर्सिडीज गाडीमधून फिरतो. स्वत: व्यवस्थापनशास्त्राचं शिक्षण न घेतलेला हा माणूस आज देशातल्या प्रतिष्ठित व्यवस्थापन महाविद्यालयांतून लेक्चर्स देतो. एकंदरीत, स्वत:च कल्पकतेतून प्रदीप लोखंडे यांनी यशस्वी करिअर घडवलंय.
पण प्रदीप लोखंडे यांची ओळख इथेच थांबत नाही. ‘बिझनेस’ आणि ‘आयडॉलॉजी’ यांचा मेळ घालत त्यांनी एक आगळं मॉडेल निर्माण केलं, ज्यातून ग्रामीण तरुणांना करिअरच्या वाटा मिळताहेत, गावांतल्या विद्यार्थ्यांना संगणक हाताळता येताहेत, त्यांचं ज्ञानसंवर्धन होतंय. हे सारं कसं घडतं याची ही कहाणी.
सातारा जिल्ह्यातल वाई तालुक्यातील एक छोटंसं खेडं प्रदीप लोखंडे यांचं गाव. तिथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी नोकरी करतच १९८१ मध्ये वाडिया कॉलेजमधून कॉमर्सची पदवी प्राप्त केली. एकूण शिक्षणकाळात त्यांची ऍकेडेमिक प्रगती फार चांगली नसली तरी डोक्यात बिझनेस-मार्केटिंगचे विचार मात्र सुरू होते. त्यातूनच त्यांना मार्केटिंगचा डिप्लोमा करावा असं वाटलं. पुण्यातल्या एका नामांकित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी प्रवेशासाठी प्रयत्न केले; परंतु त्यांचं एकूण राहणीमान, ग्रामीण भाषा पाहून ‘मार्केटिंग तुम्हारे बस की बात नहीं है’ असं म्हणून त्यांना तिथून पिटाळण्यात आलं. पण मुळातच जिद्दी असलेल्या लोखंडे यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. संस्थाचालकांना वारंवार विनंती केल्यानंतर कुठे त्यांना त्या संस्थेत प्रवेश मिळाला. पुढे त्यातूनच त्यांची ‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’ कंपनीत निवड झाली. काम करण्यासाठी युनिट मिळालं मध्य प्रदेश. कंपनीच्या कामानिमित्ताने शहरांबरोबरच ग्रामीण भागही त्यांनी अक्षरश: पिंजून काढला. पुढे नोकरी सोडली. छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. त्यात यशापयश पचवलं. काही कंपन्यांसाठी प्रमोशनची कामंही त्यांनी केली; पण त्यांना त्यातून म्हणावं इतकं समाधान मिळत नव्हतं. व्यवसायाचं स्वत:चं काहीतरी वेगळं मॉडेल आपण शोधलं पाहिजे, याच विचारात असताना त्यांनी सिटी बँकेच्या अध्यक्षांचं भाषण मुंबईत ऐकलं. त्याने ते भारावून गेले. त्यांनी भाषणात सांगितलं, ‘‘खेड्यांकडे चला, तिथे काम करण्यासाठी खूप पोटेन्शियल आहे.’’ बस्स! लोखंडे यांनी हेच वाक्य आपल्या व्यवसायाची दिशा निश्चिठत करण्यासाठी प्रमाण मानलं. नवं काही तरी शोधण्याची आंतरिक ओढ होतीच. थोडाफार नोकरी-व्यवसायाचा अनुभव गाठीशी होता. ग्रामीण भागात व्यवसायाचं स्वत:चं वेगळं मॉडेल का असावं या प्रश्नावर त्यांनी बराच काळ विचार केला, बरीच चाचपणी केली.
मोठ्या प्रमाणात उत्पादन करणा-या राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांना एक समस्या नेहमीच भेडसावत असते, ती म्हणजे बाजारपेठ उपलब्ध होणं. रोजच्या गरजेच्या जीवनोपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी व्यापक मार्केट ग्रामीण भागात उपलब्ध असूनही वेळ, मनुष्यबळाच्या अभावी या कंपन्यांना आपल्या उत्पादनांचं प्रमोशन करण्यासाठी स्वतंत्रपणे नेटवर्क उभं करणं शक्य नसतं. त्यामुळे या कंपन्या या मोठ्या मार्केटला मुकतात व त्यात त्यांचं आर्थिक नुकसान होतं. या कंपन्यांची ही निकड प्रदीप लोखंडे यांनी अचूक हेरली व त्यातूनच त्यांना आपल्या व्यवसायाची वाट मिळाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जायचं, गावांची संपूर्ण माहिती मिळवायची, त्याचा डाटाबेस तयार करायचा आणि मार्केटच्या शोधात असणा-या कंपन्यांना पुरवायचा. एवढंच नाही, तर या कंपन्यांच्या उत्पादनांबद्दल प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ग्रामीण भागात नेटवर्कच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करायची. अशा स्वरूपाचं व्यवसायाचं कल्पक असं आगळंवेगळं मॉडेल त्यांनी शोधलं. हे मॉडेल यशस्वीपणे राबवायचं तर गावांची संपूर्ण माहिती असणं आवश्यक होतं. गावांच्या प्रत्यक्ष संपर्कात गेल्याशिवाय आपल्याला गावांची माहिती मिळणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी गावोगावची भटकंती सुरू केली.
एके काळी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने विमानातून प्रवास करणारे लोखंडे चक्क छकड्यांतून, एसटी-बसमधून तर कधी पायी गावोगाव फिरू लागले. शहरात नोकरी-व्यवसायात स्थिरावलेला माणूस त्यावर पाणी सोडून ग्रामीण भागात आपला काही व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतो, हे लोकांच्या दृष्टीने ‘खूळ’ होतं. लोकांनी त्यांना अनेक ‘व्यावहारिक’ सल्ले दिले, पण लोखंडे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. कारण आपण काय करत आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना होती. तोपर्यंत त्यांचं ‘बिझनेस माइंड’ ब-यापैकी सेट झालं होतं. एखादी गोष्ट करायचीच हे मनाशी पक्कं केल्यावर सर्व शक्ती त्याच्या दिशेने लावायची, हे तत्त्व ते पाळत आल्यामुळे त्यांनी भविष्यात उभ्या राहणा-या संकटांचा फार विचार न करता कामाची दिशा निश्चितत केली. भारतातल्या चार हजारपेक्षा जास्त गावांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. तेथील ग्रामवासीयांशी ते बोलले. त्यांची जीवनशैली समजून घेतली. गावातल्या निर्णयप्रकियेतल्या महत्त्वाच्या लोकांना ते भेटले. त्यातून गावाची आर्थिक स्थिती, बाजारहाट, दुकानदार- लोकांच्या नित्याच्या गरजा समजावून घेतल्या. लोकांशी प्रत्यक्ष संवादातून त्यांना गावाविषयी बरीच माहिती मिळाली. इंडियातला भारत समजून घेण्यासाठी त्यांना या माहितीचा खूप उपयोग झाला. त्यातून ते आपल्या व्यवसायाच्या मॉडेलला निश्चिणत अशी दिशा देऊ शकले. गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोस्टमास्तर, शाळेचे मुख्याध्यापक, ग्रंथालयं आदींना पत्रं पाठवून गावाचं नाव, तालुका, जिल्हा, गावाची लोकसंख्या, बाजाराचा दिवस, बाजाराचं स्वरूप, बाजाराला येणा-या लोकांची संख्या, दुकानं, शाळा, गावातल्या प्रमुख व्यक्ती, टीव्ही संच, दूरध्वनी, इतर चॅनेल्स, तिथे उपलब्ध असणा-या जीवनोपोगी वस्तू-उत्पादनं आदींची सविस्तर माहिती व आकडेवारी गोळा करण्यास त्यांनी सुरुवात केली. हजारो पत्रांनी यासाठी गावोगावी पाठविली. फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा तोच प्रयत्न केला. तरीही म्हणावा एवढा प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली. या लोकांना त्यांनी या पत्राबरोबर दिवाळीच्या शुभेच्छा देणारं पत्रही पाठवलं. ही युक्ती कामी आली. लोकांनी ब-यापैकी प्रतिसाद देऊन त्यांना माहिती पाठवली. पुढेही त्यांनी तसाच पयत्न सुरू ठेवला. त्यातून त्यांनी महाराष्ट्रातल्या तब्बल ६ हजार ३०० गावांच्या विस्तृत माहिती व आकडेवारीचा डाटाबेस तयार केला. १९९३ ते १९९६ ही तीन वर्षं त्यांनी अहोरात्र कष्ट घेत माहिती गोळा करण्यासाठी खर्ची घातली. हा काळ त्यांच्यासाठी नक्कीच खडतर असा होता. नोकरी-व्यवसायातून मिळवलेले सगळेच पैसे त्यांनी या कामी खर्च केल्याने त्यांच्या घरात आर्थिक ओढाताण सुरू झाली. पण त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना या काळात मोलाची साथ दिली. गावोगावी पाठवायची हजारो पत्रं त्यांच्या पत्नी व वडिलांनी लिहिली. जमा झालेली सर्व माहिती त्यांच्या पत्नीने संगणकावर नोंदवली. या माध्यमातून आपल्याला पुढे नक्की काय साधायचं आहे याची ‘लाइन’ पक्की असल्यामुळे पेशन्स ठेवत कामात सातत्य ठेवलं. त्यातून एक विस्तृत डाटाबेस त्यांच्याकडे तयार झाला.
चहा, बिस्किटं, डिटर्जंट, साबण, टूथपेस्ट, पावडर, क्रीम, खोबरेल तेल आदी नित्याची गरजेची उत्पादनं विकणा-या राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी हा डाटाबेस खूपच उपयुक्त होता. ग्रामीण भागातलं व्यापक मार्केट काबीज करण्यासाठी अशी माहिती या कंपन्यांना हवीच होती. या माहितीचा लोखंडे यांनी खुबीने वापर केला. ‘माझ्याकडे ६ हजार ३०० गावांची अद्ययावत विस्तृत अशी माहिती आणि आकडेवारी आहे,’ असं सांगणारी पत्रं त्यांनी विविध कंपन्यांना पाठवली. त्यांचं हे मॉडेल ब-याच कंपन्यांच्या पचनी पडलं. त्यातूनच त्याची उपयुक्तता पटल्याने त्यांना पहिली वर्क ऑर्डर मिळाली ‘टाटा टी’ची तीही तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांची. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. आज ‘हिन्दुस्तान लिव्हर’, ‘पी ऍण्ड जी’, ‘टाटा टी’, ‘एशियन पेन्टस्’, ‘लाइफबॉय’, पेप्सोडेन्ट’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘ओनिडा’, ‘एल ऍन्ड टी’, ‘आय.सी.आय.सी.आय.’, ‘हच’, ‘किसान’, ‘क्रॉम्प्टन ग्रीव्हस’, ‘रसना’ अशा नामांकित कंपन्या त्यांच्या क्लाएंट आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, आंध्र प्रदेश अशा नऊ राज्यांतल्या तब्बल ४९ हजारहून अधिक गावांशी त्यांचं भक्कम नेटवर्क तयार झालं आहे. या राज्यांतल्या २८ हजारांहून अधिक गावांशी त्यांचा संपर्क झाला असून १ कोटी ३० लाखांहून अधिक ग्रामवासी त्यांच्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जोडले गेले आहेत. ही त्यांची मोठी व्यावसायिक अचीव्हमेंट आहे.
ग्रामीण तरुणांना जोडलं
एकीकडे ग्रामीण भागाला आपल्या व्यवसायाचा-करिअरचा आधार बनवत असताना विकासापासून कोसो दूर असलेल्या ग्रामीण भागाचं मागासलेपणही त्यांच्यातल्या कार्यकर्त्यानं टिपलं होतं. आपल्या व्यवसायाशी ग्रामीण तरुणांना जोडून घेतलं तर त्यांनाही रोजगाराची दिशा मिळू शकेल, या विचारातून त्यांनी २००० साली ‘रूरल रिलेशन्स’ या संस्थेची स्थापना केली.
महाराष्ट्रात तब्बल ४३००० हजार गावं आहेत. सर्वच गावांमध्ये जाऊन काम करणं शक्य नव्हतं. त्यामुळे ज्या गावात खरंच गरज आहे अशा गावांत ‘रूरल रिलेशन्स’ मार्फत काम करण्याचं त्यांनी ठरवलं. अशा गावांची माहिती त्यांनी जमा केली. त्यातून त्यांच्या लक्षात आलं, की गावांत शिक्षित-अर्धशिक्षित असे अनेक बेरोजगार युवक आहेत. परिस्थितीअभावी किंवा माहितीच कमतरतेमुळे त्यांचे रोजगारासाठी किंवा शिक्षणासाठी शहरांकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. अशा युवकांना आपल्या व्यवसायाचा भाग बनवत ग्रामीण भागात ‘व्हिलेज डेव्हलपर्स’ म्हणून काम करण्यास तयार केलं, त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं. गावांची माहिती गोळा करणं, त्यांच्याशी व्यवसायाच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांची गावोगावच्या बाजारांतून माहिती देणं, लीड जनरेट करणं, त्यांच्या उत्पादनांची प्रात्यक्षिकं सादर करणं, लोकांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करणं, अशा स्वरूपाची कामं करण्यासाठी त्यांनी ‘व्हिलेज डेव्हलपर्स’चा योग्य प्रकारे उपयोग करून घेतला.
इथे काम करत असताना अजून एक गोष्ट लक्षात त्यांच्या आली, की ग्रामीण भागातल्या सर्वच बाजारपेठांमध्ये साधारणपणे अस्सल उत्पादनासारखी दिसणारी, त्यासारखीच किंवा नावांत साम्य असणारी अनेक उत्पादनं मोठ्या प्रमाणात येतात. लोकांच्या अडाणीपणाचा फायदा घेत ही उत्पादनं त्यांच्या माथी मारली जाऊन त्यांची मोठी फसवणूक होते. ‘व्हिलेज डेव्हलपर्स’च्या माध्यमातून रोजच्या वापरातील साध्या साध्या वस्तूंपासून ते खतं-बी-बियाणं खरेदी करताना काय काळजी घ्यावी म्हणजे त्यांची नकली मालापासून फसवणूक होणार नाही, हे त्यांनी लोकांना समजावून सांगितलं. त्यांच्या संस्थेशी व्यवसायाच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या काही राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांची अस्सल उत्पादनं या ‘व्हिलेज डेव्हलपर्स’च्या माध्यमातून त्यांनी गावागावांत उपलब्ध करून दिली. कधी कंपन्यांच्या माध्यमातून तर कधी ‘रूरल रिलेशन्स’च्या माध्यमातून. काम करण्याच्या बदल्यात या ‘व्हिलेज डेव्हलपर्स’ना दरमहा ४ ते ५ हजार रुपये मानधन मिळू लागलं. ‘गावातल्या तरुणांना गावातच काम’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली. त्याचा परिणाम असा झाला, की तरुणांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध झाला व तिथेच राहिल्यामुळे त्यांना इतर काही कामधंदा करत घरच्या शेतीकामातही हातभार लावता येऊ लागला. चांगल्या कंपन्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे व त्या कंपनीने त्यांना उत्तम व्यावसायिक प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांच्यातील ग्रामिणतेचा, मागासलेपणाचा न्यूनगंड जाऊन त्यांच्यात आत्मविश्वाणस निर्माण झाला व त्यातूनच स्वत:ची व कुटुंबाची प्रगती ते आज साधू शकले आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रासह नऊ राज्यांमध्ये अशा ३ हजारांपेक्षा जास्त तरुणांना या संकल्पनेतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध झाला आहे.
हे काम करत असताना त्यांनी एक तत्त्व मात्र कायम जपलं आहे, ते म्हणजे कुठल्याही प्रकारे कुठल्याही कंपनीचं कुठलंही उत्पादन आपल्या ‘व्हिलेज डेव्हलपर्स’नी विकायचं नाही. आणि कंपन्यांनाही त्यांनी हे ठामपणे सांगितलं आहे, की ‘आमची संस्था ही ‘रूरल रिलेशन्स’वर उभी राहिली आहे. त्यामुळे तुमचं काम करतानाही आम्ही आमची सामाजिकता जपणार आहोत.’ तमुळे ग्रामीण भागात लोकांमध्ये या संस्थेविषयी विश्वाास निर्माण होण्यास हातभार लागला. संस्थेमार्फत ग्रामीण भागात संपर्काचं एक भक्कम जाळं उभं राहिलं आहे. ‘रूरल रिलेशन्स’ मार्फत व्यवसायाबरोबरच ग्रामीण भागासाठी राबवले जाणारे विविध उपक्रम असोत किंवा जनजागृतीचा कोणताही संदेश ग्रामवासीयांपर्यंत पोहोचवण्याचं काम असो, हे तरुण ‘व्हिलेज डेव्हलपर्स’ आज त्यासाठी महत्त्वाचं माध्यम बनले आहेत. नव्या काळाशी, नव्या माध्यमांशी, आजच्या गतिमान युगाशी ही तरुण मंडळी जोडली जावीत म्हणून लोखंडे यांनी त्यांना मोबाइल, ई-मेल, इंटरनेटची सोय करून दिली आहे.
अनिवासी गाववासी’ चळवळ
ग्रामीण भागात ‘रूरल रिलेशन्स’च्या माध्यमातून काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं, की संगणकासारखं प्रगत माध्यम अद्याप गावागावांमध्ये पोहोचलेलं नाही. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणकापासून कोसो दूर आहेत. २०००-२००१ च्या दरम्यानचा हा काळ असेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक हाताळणं तर सोडाच, पण संगणक कसा असतो, कसा दिसतो हेही माहीत नव्हतं. अशा परिस्थितीत गावातील शिक्षक फळ्यावर संगणकाचं चित्र काढून विद्यार्थ्यांना संगणकाची माहिती देत होते. शहरांमध्ये प्रत्येक मुलाच्या समोर एक संगणक, तर ग्रामीण भागातल्या २०० मुलांसाठी मिळून एकसुद्धा संगणक नसावा, ही विषमता प्रदीप लोखंडे यांना सतावत होती. हे चित्र बदलल्याशिवाय शहरातील व ग्रामीण भागातील मुलांमध्ये निर्माण झालेली ज्ञानाची दरी कधीच सांधली जाणार नाही, ही परिस्थिती त्यांना जाणवली. ग्रामीण भागातल्या संगणक नसलेल्या माध्यमिक शाळांची एक यादी त्यांनी तयार केली. या शाळांना संगणक मिळावेत म्हणून त्यांनी त्या शाळेतीलच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री, पंतप्रधान तसंच काही उद्योगपतींना पत्रं लिहायला लावली; पण या पत्रांना संबंधितांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. लोखंडे यांनी याची कारणं शोधली तेव्हा काही उद्योगपतींनी त्यांना सांगितलं, की अशी मदतीची शेकडो पत्रं आम्हाला दररोज येत असतात. त्यात कोण गरजू आहे हे ठरवणं अवघड असतं व एवढ्या लोकांना प्रतिसाद देणंही शक्य नसतं. त्यावर लोखंडे यांनी संगणक नसलेल्या शाळांची यादी त्यांना दिली व त्या शाळांना संगणक देण्याचं आवाहन केलं. त्यातून काही संगणक मिळाले, ते त्यांनी शाळांपर्यंत पोहोचवले. अशा प्रकारे वैयक्तिक प्रयत्नांतून त्यांनी ‘रूरल रिलेशन्स’च्या माध्यमातून ५४० गावांमधील शाळांमध्ये ६०० संगणक मिळवून दिले, पण त्यातूनही सर्वच शाळांची संगणकाची गरज भागू शकत नव्हती.
उर्वरित गरजू शाळांची संगणकांची गरज भागवायची असेल तर काही तरी नावीन्यपूर्ण कल्पना राबवली पाहिजे, या विचारातून २००१ साली ‘एनआरव्ही’ या कल्पनेचा जन्म झाला. ‘एनआरव्ही’ म्हणजे ‘नॉन-रेसिडेन्ट व्हिलेजर्स- अनिवासी गाववासी’ चळवळ. गावातून नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने शहरात आलेले व नंतर शहरवासी झालेले लोक म्हणजे ‘अनिवासी गाववासी’. आपल्या गावासाठी काही तरी काम करावं अशी इच्छा यातील कित्येकांच्या मनात असते, परंतु दररोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत असं काम करायला उसंत मिळणं कठीणच. या लोकांची ही अडचण अचूक हेरून प्रदीप लोखंडे यांनी अशा ‘अनिवासी गाववासीं’पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला. ‘तुम्ही मागे वळून बघा व तुमच्या गावासाठी काही तरी करा’ असा साधा विचार त्यांनी या चळवळीतून मांडला. गावातील माध्यमिक शाळेत शिकणार्यार विद्यार्थ्यांनाच त्यांनी अशा लोकांची यादी करायला सांगितलं. त्यांचे शहरातील पत्ते मिळवून विद्यार्थ्यांनाच या लोकांना पत्रं पाठवायला सांगितली. ‘तुमच्याकडील जुन्या व्हर्जनचा संगणक फेकून न देता तो तुम्ही आम्हाला द्या. आम्ही तो ग्रामीण भागातल्या गरजू शाळांपर्यंत पोहोचवू,’ असं आवाहन त्यांनी या माध्यमातून केलं. काही लोकांना ते प्रत्यक्ष जाऊन भेटले. लोकांना ही संकल्पना मुळातूनच खूप आवडली. त्यामुळे त्यांनी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला व त्यांच्या वापरात नसलेले संगणक, संगणकाचे सुटे भाग उपलब्ध करून दिले. घरोघर फिरून त्यांनी हे सर्व गोळा केलं व त्यातून चांगल्या स्थितीतील संगणक शाळांपर्यंत पोहोचवले. संगणक कसा हाताळायचा याचं प्रशिक्षण विद्यार्थी व शिक्षकांना दिलं. फळ्यावर, पुस्तकात संगणकाचं फक्त चित्र पाहणारी मुलं सुरुवातीला भीतभीतच प्रत्यक्ष संगणक हाताळू लागली.
त्यांच्या या चळवळीला देशातूनच नव्हे तर परदेशांतूनही प्रतिसाद मिळाला. त्यातूनच त्यांनी आतापर्यंत ३६५० हून अधिक शाळांना संगणक मिळवून दिले. त्याही व्यतिरिक्त या उपक्रमानं प्रेरित होऊन अनेकांनी स्वतंत्रपणे शाळांना संगणक भेट दिले- तो आकडा आहे तब्बल २५ हजारांहून अधिक. त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळेच आज ग्रामीण भागातल्या अनेक गावांतली मुलांची एक पिढी संगणक साक्षर होण्यास मदत झाली आहे. स्पर्धेच्या नव्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी अशा उपक्रमांतून ते प्रयत्न करत आहेत.
२००७ साली त्यांच्या असं लक्षात आलं की आता मुलांना जुना संगणक देऊन उपयोग नाही. त्यामुळे त्यांनी या चळवळीच्या माध्यमातून आता जुना संगणक घ्यायचा नाही, नवीन संगणक कुणी दिला तरच तो घ्यायचा असं ठरवलं. मूळ संकल्पनेत हा बदल करत त्यांनी हे काम अविरतपणे सुरू ठेवलं आहे.
२००७ साली त्यांच्या असं लक्षात आलं की आता मुलांना जुना संगणक देऊन उपयोग नाही. त्यामुळे त्यांनी या चळवळीच्या माध्यमातून आता जुना संगणक घ्यायचा नाही, नवीन संगणक कुणी दिला तरच तो घ्यायचा असं ठरवलं. मूळ संकल्पनेत हा बदल करत त्यांनी हे काम अविरतपणे सुरू ठेवलं आहे.
‘ग्यान की लायब्ररी’
संगणक शिक्षणाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठीही प्रदीप लोखंडे प्रयत्नशील आहेत. त्यांनी ‘रूरल रिलेशन्स’च्या माध्यमातून ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या पुस्तकाच्या दोन हजार प्रती ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये पोहोचविल्या. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ते पुस्तक वाचून त्यांना काय वाटलं, हे त्यांनी विद्यार्थ्यांना पत्र लिहून कळविण्यास सांगितलं. त्यातून तब्बल बत्तीस हजार मुलांनी त्यांना पत्रं लिहिली. लोखंडे यांनी स्वत: या सर्व मुलांच्या पत्रांना उत्तरं लिहिली. याचा परिणाम असा झाला, की ही सर्व बत्तीस हजार मुलं लोखंडे यांच्याशी कायमची जोडली गेली.
मुलांच्या या अशा प्रतिसादामुळेच त्यांच्यासाठी चांगलं वाचनालय असावं, याची निकड त्यांना जाणवली. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून ‘ग्यान की लायब्ररी’ हा नवा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, जी पुस्तकं त्यांना तिथे वाचायला मिळत नाही ती मिळावीत, वाचनामुळे त्यांच्या विचारांमध्ये-दृष्टिकोनामध्ये फरक पडावा आणि आजच्या जगाशी एकरूप होण्यासाठी त्यांना मदत व्हावी, असे उद्देश ठेवून या वाचनालयाचं काम त्यांनी सुरू केलं आहे. ज्या गावाची लोकसंख्या १० हजारांच्या आत आहे, ज्या शाळेत किमान २०० विद्यार्थी आहेत, जिथे मोठं ग्रंथालय नाही अशा शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यास त्यांनी प्राधान्य दिलं आहे. तिथल्या मुलांच्या डोक्यात येणार्या कोणत्याही विषयावरचं किमान एक तरी पुस्तक त्या वाचनालयात असावं, असा प्रयत्न त्यांनी केला आहे. एखाद्या शाळेत अशी ‘ग्यान की लायब्ररी’ सुरू करायची असेल तर त्या शाळेतीलच ८-१० मुलांना त्यांच्या संस्थेकडे पत्र पाठवायला सांगितलं जातं. त्यांना वाचनालयाची आवश्यकता का आहे, हे त्यांच्याच शब्दांत यावं अशी अपेक्षा त्यामागे असते. त्यातून निवडलेल्या शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येतो. हा उपक्रमसुद्धा पूर्णपणे लोकसहभागातून सुरू आहे. त्याची पद्धतही खूप पारदर्शी आहे. देणगीदाराकडून या वाचनालयासाठी पाच हजार रुपये देणगी मागताना देणगीचा धनादेश सरळ त्या प्रकाशकाच्या किंवा ग्रंथविक्रेत्याच्या नावाने घेतला जातो. तेवढ्या रकमेची जवळजवळ १७० पुस्तकं यादीसहित त्या शाळेलाच पाठवली जातात. पुस्तकं मिळाल्यावर त्या शाळेचे मुख्याध्यापक त्या देणगीदाराला शाळेच्या लेटरहेडवर पत्र लिहून कळवतात, की ‘तुम्ही दिलेल्या देणगीतून ही ही पुस्तकं आमच्या ‘ग्यान की लायब्ररी’ला मिळाली’. त्यानंतर विद्यार्थीही काही पुस्तकं वाचून त्या देणगीदाराला पत्र लिहून पुस्तकांचा अभिप्राय कळवितात. त्यामुळे त्या देणगीदाराला आपली देणगी सार्थकी लागल्याचं समाधान मिळतं. या सर्व शाळांतल्या वाचनालयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच शाळेतील एक छोटीशी मुलगी ‘ग्यान की मॉनिटर’ म्हणून त्या वाचनालयाचं व्यवस्थापन सांभाळत आहे. त्यात त्यांनी अजून एक गोष्ट जाणीवपूर्वक केली आहे, ती म्हणजे त्यांनी त्या शाळेतील मुलांना आवाहन केलं, की तुमच्या वाढदिवसाला गोळ्या-बिस्किटं न वाटता त्या पैशांतून तुम्ही एखादं पुस्तक- मग ते ५ रुपयांचं असो, १० रुपयांचं असो किंवा ५० रुपयांचं असो- तुमच्या वाचनालयाला भेट द्या. मुलांनीही या कल्पनेला चांगला प्रतिसाद दिला. यातून त्या वाचनालयाची व्याप्तीही वाढत आहे व मुलांचं सामाजिक भानही. केवळ वाचनालय सुरू करून ते थांबले नाहीत तर या शाळांच्या ते सतत संपर्कात राहतात. यातून त्यांच्यातील वीण अधिकच घट्ट होत आहे.
त्यांच्याच वाई तालुक्यातील एका शाळेतून सुरू केलेल्या या उपक्रमाला आज समाजाच्या सर्व स्तरांतून मदतीचे हात लाभत आहेत. त्यामुळेच लोकसहभागातून त्यांनी गेल्या ४०० दिवसांत ‘दिवसाला एक’ याप्रमाणे ४०० शाळांमध्ये ‘ग्यान की लायब्ररी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या शाळांतील १ लाख ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा मिळत आहे. या उपक्रमाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्या-मुंबईपासून भंडा-यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व भागांत हा उपक्रम सुरू आहे. या वर्षी ‘दिवसाला किमान दोन’ वाचनालयं सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ई-मेल्स, पत्रं, एसएमएस, वैयक्तिक संपर्क, प्रसारमाध्यमं आदी माध्यमांतून ते लोकांना आवाहन करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात चार हजार शाळांमध्ये अशा प्रकारची वाचनालयं उभारण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांचा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारं खुली करणारा व वाचनसंस्कृतीला वाढावा देणारा आहे.
त्यांच्याच वाई तालुक्यातील एका शाळेतून सुरू केलेल्या या उपक्रमाला आज समाजाच्या सर्व स्तरांतून मदतीचे हात लाभत आहेत. त्यामुळेच लोकसहभागातून त्यांनी गेल्या ४०० दिवसांत ‘दिवसाला एक’ याप्रमाणे ४०० शाळांमध्ये ‘ग्यान की लायब्ररी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या शाळांतील १ लाख ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा मिळत आहे. या उपक्रमाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्या-मुंबईपासून भंडा-यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व भागांत हा उपक्रम सुरू आहे. या वर्षी ‘दिवसाला किमान दोन’ वाचनालयं सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ई-मेल्स, पत्रं, एसएमएस, वैयक्तिक संपर्क, प्रसारमाध्यमं आदी माध्यमांतून ते लोकांना आवाहन करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात चार हजार शाळांमध्ये अशा प्रकारची वाचनालयं उभारण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांचा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारं खुली करणारा व वाचनसंस्कृतीला वाढावा देणारा आहे.
हे सगळं करत असताना त्यांना कित्येक वेळा लोकांकडचा नकारही पचवावा लागला आहे, मनस्तापही सहन करावा लागला आहे; पण त्यांनी ना ध्यास सोडला, ना प्रयत्न सोडले. त्यांची ‘रूरल रिलेशन्स’ ही मुळातच एक ‘प्रोफेशनल संस्था’ आहे, ती ‘एनजीओ’ नाही. ती कुणावर अवलंबून नाही. म्हणजे अमुक एक फंड आला तरच ते काम करायचं, असं अजिबात होत नाही. त्यामुळे त्यांच्या डोक्यात असलेल्या कल्पना त्यांना मूर्त स्वरूपात आणता येतात. त्यात त्यांनी लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळविला आहे. गावातील सगळ्या लोकांना एकत्र आणून परिणामकारक काम उभं करण्याचा एक चांगला मेळ लोखंडे यांनी साधला आहे. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक नामवंत कंपन्यांबरोबर काम करत असताना त्यांनी ‘बिझनेस’ आणि ‘आयडॉलॉजी’ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधल्या आहेत. व्यवसायामध्ये या दोन गोष्टींचा कधीच मेळ साधला जात नाही असं म्हटलं जातं, पण त्यांनी ते प्रयत्नपूर्वक सिद्ध करून दाखवलं आहे. ही त्यांची मोठी अचीव्हमेंट आहे.
आज त्यांच्याकडे तब्बल २८००० गावांची अद्ययावत माहिती आहे. ती त्यांनी पोस्टकार्डावरून, आंतरदेशीय पत्रांवरून मिळवली आहे, जतन केली आहे व अपग्रेड केली आहे. गावोगावची एवढी प्रचंड अद्ययावत माहिती आपल्या शासनाकडेही असेल की नाही याबाबत शंका आहे. त्यांच्या कल्पकतेचं वेगळेपण त्यांनी व्यवसायाच्या निमित्ताने सुरू केलेल्या ‘रूरल रिलेशन्स’च्या वेबसाइटवरूनही सहज जाणवतं. अतिशय नावीन्यपूर्णता त्यांनी त्यात आणली आहे. ग्रामीण भागातील जनजीवन दाखविणारे अनेक व्हिडिओज आणि छायाचित्रं त्यावर दिली आहेत. त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती त्यावर त्यांनी विस्ताराने दिली आहे.
एकीकडे ग्रामीण भागात व्यवसायाच्या बरोबरीने असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवत असताना आपलं आगळं-वेगळं मॉडेल ते ‘आयआयएम’, ‘आयएमडीआर’, ‘सिम्बायोसिस’, ‘सेंट झेव्हियर्ससारख्या अनेक नामांकित मॅनेजमेंट संस्थांतून शिकवत आहेत. जागतिक स्तरावर मान्यता मिळवलेले मार्केटिंग गुरू फिलिप कोटलर यांनी त्यांच्या मार्केटिंग संदर्भातल्या मार्गदर्शक पुस्तकात प्रदीप लोखंडे यांनी व्यवसायाच्या निमित्ताने ग्रामीण भागात उभ्या केलेल्या आगळ्या-वेगळ्या मॉडेलचा ‘केसस्टडी’ म्हणून समावेश केला आहे. ही नक्कीच नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. इंटरनेटच्या आजच्या गतिमान युगातही लोखंडे यांनी पोस्टकार्डावर पत्र लिहिणं सोडलेलं नाही. दिवसाला त्यांना किमान १५०-२०० पत्रं सहज येत असतात. त्यांच्या या उपक्रमांतून साह्य मिळालेल्या मुलांची कृतज्ञता व्यक्त करणारी १८ हजारांहून अधिक पत्रं लोखंडे यांना आली आहेत व तो ओघ आजही सुरूच आहे. ही सर्व पत्रं न्याहाळताना लोखंडे नकळतपणे त्या पत्रांतील अक्षरांमध्ये त्या मुलांच्या चेहर्या वरील अवर्णनीय आनंद वाचत असतात. आपण निमित्तमात्र असलेलं काम बर्याुच प्रमाणात सार्थकी लागल्याचं समाधान त्यांना यातून मिळतं.
ग्रामीण भागातून शहरात येऊन व्यवसायात स्थिरावलेले प्रदीप लोखंडे हेही तशा अर्थानं ‘अनिवासी गाववासी’च. ज्या मातीतून आपण आलो, ज्या मातीच्या बळावर आपण घडलो त्या मातीसाठी काही तरी काम करून ‘गिव्हिंग बॅक’ची भावना जोपासण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भारताचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी असे अनेक ‘अनिवासी गाववासी’ निर्माण होणं गरजेचं आहे.
-महेंद्र मुंजाळ
मोबाइल: ९८५०५९८४८७
mahendra.munjal@uniquefeatures.in
मोबाइल: ९८५०५९८४८७
mahendra.munjal@uniquefeatures.in
प्रदीप लोखंडे
पुणे- ४११०१३
मोबाइल : ९८२३०१४१५०
pradeep@ruralrelations.com
वेबसाइट : www.ruralrelations.com
पुणे- ४११०१३
मोबाइल : ९८२३०१४१५०
pradeep@ruralrelations.com
वेबसाइट : www.ruralrelations.com
by - http://uniquefeatures.in
कर्ज! कर्ज !! कर्ज !!!
उत्तर द्याहटवाआपण एक प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त खाजगी कर्ज कंपनी शोधत आहात जो संपूर्ण आयुष्यासाठी कर्ज प्रदान करतो. आम्ही सर्व प्रकारचे कर्जे अतिशय वेगवान आणि सोप्या पद्धतीने, वैयक्तिक कर्ज, कार कर्ज, तारण कर्ज, विद्यार्थी कर्ज, व्यवसाय कर्ज, गुंतवणूक कर्ज, कर्ज एकत्रीकरण आणि बरेच काही देत आहोत. बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी आपल्याला नाकारले आहे का? आपल्याला एकत्रीकरण कर्ज किंवा तारण गरजेची आहे का? आपल्या सर्व आर्थिक समस्यांना भूतकाळातील एक गोष्ट बनवण्यासाठी आम्ही येथे आहोत असे आणखी दिसत नाही. आम्ही 2% च्या दराने आर्थिक सहाय्य आवश्यक असलेल्या व्यक्तींसाठी आणि कंपन्यांना निधी देतो. आवश्यक सामाजिक सुरक्षा क्रमांक आवश्यक नाही क्रेडिट तपासणी आवश्यक, 100% हमी. मी तुम्हाला या माध्यमाचा उपयोग करून सांगू इच्छितो की आम्ही विश्वसनीय आणि सहायक मदत देतो आणि आम्हाला तुम्हाला कर्ज देण्यास आनंदच होईल.
मग आम्हाला एक ईमेल पाठवा: (victoriaemmanuelloan@gmail.com) कर्जाकरता अर्ज करण्यासाठी