शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

घ्या मार्केटचा आढावा...



उद्योगधंद्याच्या क्षेत्रात कोणतीही व्यावसायिक योजना आखताना मार्केट रिसर्च अर्थात बाजारपेठेचे सर्वेक्षण करणे आवश्यक झाले आहे. मार्केट रिसर्च म्हणजे बाजारपेठ आणि ग्राहक यांच्याबाबतची माहिती गोळा करणे होय. आपल्या उत्पादनाच्या पॅकेजिंग आणि जाहिरातीविषयी निर्णय घेण्यासाठी प्रत्येक कंपनीला या मार्केट रिसर्चची मदत होत असते. यात ग्राहकांची आवडनिवड आणि प्राधान्यक्रम याबाबतची माहिती गोळा केली जाते. सतत बदलत राहणाऱ्या बाजारातील ट्रेंड्स, स्थान, गरजा या मुद्द्यांच्या आधारे मार्केट रिसर्चचा अभ्यास केला जातो. ग्राहकांचे विश्लेषण, जोखीम विश्लेषण (रिस्क अ‍ॅनालिसिस), उत्पादनाबाबतचे संशोधन आणि जाहिरातीचे संशोधन आदी पद्धतींच्या आधारे मार्केट रिसर्च केला जातो.

बाजारपेठेचे सर्वेक्षण करून मिळवलेल्या या माहितीआधारे मार्केट रिसर्च अ‍ॅनालिस्टला (बाजार संशोधन विश्लेषक) आपल्या कंपनीच्या उत्पादनाच्या वा सेवेच्या संभाव्य विक्रीचा आकडा नमूद करता येतो. भूतकाळातील विक्रीच्या आकड्यांआधारे भविष्यकाळातील संभाव्य विक्रीचे विश्लेषण केले जाते. स्पर्धक कंपन्यांची माहिती मिळवणे, विविध उत्पादनांच्या किंमती, त्यांची विक्री आणि मार्केटिंग-डिस्ट्रिब्युशनच्या पद्धती आदी माहिती हे संशोधक गोळा करतात. टेलिफोन कॉल्स, इंटरनेट सर्व्हे किंवा प्रत्यक्ष मुलाखत घेऊन ही माहिती मिळवली जाते. काहीवेळा सर्वेक्षणासाठी ग्राहकांच्या प्रत्यक्ष मुलाखती, समूह चर्चा, किंवा शॉपिंग मॉल्स/ इतर सार्वजनिक ठिकाणी स्टॉल्स टाकून ग्राहकांशी संवाद साधून ही माहिती गोळा केली जाते. विविध महापालिका/ महामंडळे, सरकारी एजन्सी, राजकीय उमेदवार आणि सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्यासाठी असे मार्केट सर्व्हे केले जातात. अशा सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचा फायदा या संघटना/संस्था/व्यक्ती यांना विविध योजना आखताना आणि बजेटची तयारी करण्यासाठी होतो. अर्थशास्त्रज्ञ, स्टॅटिस्टिशियन, मार्केट रिसर्च अ‍ॅनालिस्ट आणि डेटा यूझर्स यांच्याशी चर्चा करूनच असे बाजारपेठेशी निगडीत सर्वेक्षण केले जातात. सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या टीमला हाताळण्याचे काम मार्केट रिसर्च मॅनेजर करतो नवीन उत्पादन बाजारात दाखल करण्यापूर्वी कंपनीत होणारे ग्रूप डिस्कशन व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी याच मार्केट रिसर्च मॅनेजरवर असते. विशेष सॉफ्टवेअरच्या आधारे ही सगळी कामे केली जातात. बाजार सर्वेक्षण, समूह चर्चा या सगळ्याचे निष्कर्ष सरतेशेवटी प्रॉडक्ट मॅनेजर किंवा मार्केटिंग मॅनेजरपुढे सादर केले जातात.

प्रवेश

या क्षेत्रात एन्ट्री लेव्हलवर (प्रवेश करताना) मान्यताप्राप्त विद्यापीठाची अंडरग्रॅज्युएट डिग्री असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे. पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावर तुम्हाला एमबीए करता येईल. या क्षेत्राचे प्रशिक्षण देणारे डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेसही उपलब्ध आहेत.

करिअरच्या संधी

या क्षेत्राचे प्रशिक्षण घेतलेले उमेदवार प्रोफेशनल, सायंटिफिक आणि टेक्निकल सर्व्हेइंग फर्म, टेक्निकल कन्सल्टिंग फर्म, रिसर्च अँड डेव्हलपमेंट फर्म आदी ठिकाणी नोकरी करू शकतात. राज्य सरकारी संस्था, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि वेब सर्च पोर्टल्स आदी ठिकाणीही मार्केटिंग रिसर्चचा अभ्यास केलेल्या तरुणांना कामाच्या संधी मिळतात. स्वत:चा व्यवसाय किंवा मार्केट रिसर्च कंपनीत काम करण्याचा पर्यायही आहे.









































- सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर
(लेखिका करिअर मार्गदर्शक आहेत.)
by - Maharashtra Times

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल