एमबीए अभ्यासक्रमातील मार्केटिंग म्हणजेच विपणन व्यवस्थापन या विद्याशाखेचा अभ्यासक्रम, अध्ययन आणि करिअर संधी याबद्दलची
एमबीए अभ्यासक्रमातील मार्केटिंग म्हणजेच विपणन व्यवस्थापन या विद्याशाखेचा अभ्यासक्रम, अध्ययन आणि करिअर संधी याबद्दलची सविस्तर माहिती-
एम.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षी घेता येणाऱ्या स्पेशलायझेशनमध्ये विपणन व्यवस्थापन किंवा मार्केटिंग मॅनेजमेन्ट हा एक पर्याय आहे. मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन करून पुढे उत्तम करिअर करता येते. या पर्यायामध्ये समाविष्ट असलेले काही महत्त्वाचे विषय खालीलप्रमाणे आहेत –
१) मार्केटिंग मॅनेजमेन्ट : हा विषय मार्केटिंगच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे. यामध्ये मार्केटिंगची मूळ संकल्पना, तसेच मार्केटिंग मॅनेजमेन्टच्या मूलभूत तत्त्वांबरोबरच प्रॉडक्ट डेव्हलपमेन्ट तसेच वस्तू जीवनचक्र (प्रॉडक्ट लाइफ सायकल), नवीन वस्तूंची बाजारपेठेमध्ये चाचणी घेणे (टेस्ट मार्केटिंग) इत्यादी अनेक संकल्पनांचा समावेश होतो. सर्वसाधारणपणे हा विषय एम.बी.ए.च्या पहिल्या वर्षीच शिकविला जातो. ज्यांना मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन करायचे आहे, त्यांनी हा विषय काळजीपूर्वक व मुळापासून समजून घेतला पाहिजे.
२) मार्केटिंग रिसर्च : मार्केटिंगमधला एक प्रमुख विषय म्हणजे मार्केटिंग रिसर्च किंवा विपणन संशोधन. संशोधनाचे महत्त्व हे सर्वच क्षेत्रामध्ये आहे. मार्केटिंगसुद्धा याला अपवाद नाही. मार्केटिंगमध्ये संशोधनाचा उपयोग, प्रामुख्याने ग्राहकांच्या आवडीनिवडी शोधून काढणे, स्पर्धकांच्या प्रॉडक्टविषयी माहिती घेणे, वस्तू व सेवा वितरित करताना वापरल्या जाणाऱ्या वितरणाच्या साखळीसंबंधी (डिस्ट्रिब्युशन चॅनल्स) धोरण ठरवणे, किमतीविषयक धोरण ठरवणे, जाहिरातींचे माध्यम ठरविणे आदी अनेक ठिकाणी होतो. या विषयामध्ये, वेगवेगळ्या विभागांमध्ये संशोधन कसे करावे, यामध्ये माहिती गोळा करण्याचे कोणकोणते मार्ग आहेत, तसेच माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नावली (क्वेश्चनरी) कशी तयार करावी आणि गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन केले जाते. संशोधन केल्यानंतर आणि त्यामधून निष्कर्ष काढल्यानंतर संस्थेच्या धोरणामध्ये योग्य ते बदल कसे करावेत यासंबंधीसुद्धा मार्गदर्शन केले जाते. याचबरोबर आंतरराष्ट्रीय विपणन संशोधन (इन्टरनॅशनल मार्केटिंग रिसर्च) कसे करावे याचीही माहिती मिळते. या ठिकाणी असे म्हणता येईल की, विपणन संशोधन असे की, ज्यामध्ये बाजारपेठांचे संशोधन (मार्केट रिसर्च) याचाही समावेश होतो, हा एक महत्त्वाचा विषय आहे. एम.बी.ए. अभ्यासक्रम पूर्ण करताना विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लहान-लहान संशोधन प्रकल्प पूर्ण केले तर त्यांना या विषयाची पूर्ण कल्पना येऊ शकेल आणि त्याचा फायदा पुढील करिअरमध्ये होईल.
३) ग्राहकांची वर्तणूक (कन्झ्युमर बिहेव्हिअर) : यशस्वी मार्केटिंग व्यवस्थापकाला ग्राहकाचे मानसशास्त्र (कन्झ्युमर सायकॉलॉजी) या महत्त्वाच्या विषयाचे पूर्ण ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी ग्राहकांची निर्णयप्रक्रिया कशी आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत आणि त्या कशा बदलतात, त्यांच्या खरेदीमागे कोणत्या प्रेरणा (मोटिव्ह्स) आहेत इत्यादी गोष्टींची सखोल माहिती करून घेणे हेसुद्धा तितकेच आवश्यक आहे.
आधुनिक जगातील मार्केटिंग हे ग्राहक केंद्रित (कन्झ्युमर ओरिएन्टेड) असल्यामुळे ग्राहकांचे समाधान हे मार्केटिंग मॅनेजरचे सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे. यादृष्टीने हा विषय महत्त्वाचा ठरतो. या विषयासाठी तयारी करताना विद्यार्थ्यांनी आपल्या भोवतालच्या परिस्थितीकडे जर डोळसपणे पाहिले आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्केटिंगच्या धोरणांचा अभ्यास केला तसेच ग्राहकांच्या आवडीनिवडीविषयीची निरीक्षणे नोंदवून ठेवली तर त्यांचा भविष्यात चांगला उपयोग होतो.
४) विक्री व्यवस्थापन (सेल्स मॅनेजमेन्ट) : विपणन व विक्री या दोन वेगळ्या गोष्टी असल्यामुळे विक्री व्यवस्थापनाचे वेगळेपण कसे आहे आणि ते प्रभावीपणे कसे करावे, याचे मार्गदर्शन या विषयात मिळते. त्याचप्रमाणे वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कशा पद्धतीने वितरणविषयक धोरणे आखावीत याचेही मार्गदर्शन मिळते. विपणनाचा एक उद्देश म्हणजे प्रभावीपणे विक्री करणे, असा असल्यामुळे विक्री व्यवस्थापनाची मुलभूत तत्त्वे समजावून घेणे महत्त्वाचे आहे.
५) सव्र्हिसेस मॅनेजमेन्ट : आजच्या युगामध्ये सेवा क्षेत्र (सव्र्हिस सेक्टर) वाढत असल्यामुळे सेवांचे मार्केटिंग कसे करावे, हे समजून घेणे आवश्यक आहे. एखाद्या वस्तूचे मार्केटिंग करणे आणि आपण देत असलेल्या सेवांचे मार्केटिंग करणे यामध्ये फरक आहे. एखादी वस्तू ही ग्राहकांना प्रत्यक्ष बघता येते, पण सेवा या दिसत नसल्यामुळे (इन्टॅन्जिबल) त्यांचे मार्केटिंग तुलनेने अवघड आहे. सेवा क्षेत्रामध्ये बँकिंग, इन्शुरन्स, कन्सल्टन्सी इत्यादी अनेक क्षेत्रांचा समावेश असल्यामुळे व या सर्व क्षेत्रांमध्ये स्पर्धा दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे प्रशिक्षित मार्केटिंग मॅनेजरची नितांत गरज आहे. या दृष्टीने या विषयाचे महत्त्व आहे.
६) आंतरराष्ट्रीय विपणन व्यवस्थापन (इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेन्ट) : आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये संपूर्ण जगच ही एक बाजारपेठ झाली आहे. यादृष्टीने एखाद्या वस्तूचे किंवा सेवेचे जागतिक बाजारपेठेमध्ये विपणन करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्या दूर करण्यासाठी कोणत्या तंत्रांचा वापर केला पाहिजे याची माहिती या विषयात मिळते. जगातील विविध देशांमधील कायदे तसेच सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती याचा अभ्यास करण्याची संधी या विषयात मिळते. या विषयाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी जगातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थेचा तसेच देशांतर्गत परिस्थितीचा अभ्यास स्वत:हून करणे आवश्यक आहे.
वरील विषयांव्यतिरिक्त मार्केटिंग मॅनेजमेन्ट या स्पेशलायझेशनमध्ये मार्केटिंग कम्युनिकेशन, आयात-निर्यातविषयक कायदे व पद्धती, रिटेल मार्केटिंग, मार्केटिंगविषयक कायदे, इंटरनेट मार्केटिंग इत्यादी अनेक विषयांचा समावेश होतो.
मार्केटिंगचा अभ्यास करताना, प्रत्यक्ष व्यवहारात या तत्त्वांचा वापर कसा होतो हे पाहिले पाहिजे. त्या दृष्टीने कंपन्यांच्या केस स्टडीज, यशस्वी मार्केटिंग मॅनेजरच्या मुलाखती, कंपन्यांना भेटी इत्यादींचा वापर करता येईल.
मार्केटिंगमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र पहिल्या दिवसापासून मॅनेजरची नोकरी मिळेतच, असे नाही. कित्येक वेळा सुरुवातीला काही दिवस उमेदवारी करून नंतर बढतीची संधी मिळते. मात्र यासाठी मेहनत करण्याची शारीरिक व मानसिक तयारी ठेवली पाहिजे.
by - Loksatta
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा