सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२

राजकारण हा शक्याशक्यतांचा विलक्षण खेळ आहेच. पण, मुख्य म्हणजे तो मनाचा खेळ आहे. करोडो माणसांवर अधिराज्य गाजवण्यासाठी हा 'माइंडगेम' कळावा लागतो.

 राजकारण हा शक्याशक्यतांचा विलक्षण खेळ आहेच. पण, मुख्य म्हणजे तो मनाचा खेळ आहे. करोडो माणसांवर अधिराज्य गाजवण्यासाठी हा 'माइंडगेम' कळावा लागतो. 


केवळ चांगले आणि उदात्त असून चालत नाही आणि फक्त आकडेमोडीच्या खेळी करूनही भागत नाही. त्यासाठी लोकांना आकृष्ट करून घेता यायला हवे. संमोहित करता यायला हवे. अगदी मोठ्या हुकुमशहाला सुद्धा लोकांचे मन जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतातच. करोडो लोक तुमच्या विरोधात गेले, तर केवळ छळाने वा बळाने फार काळ राज्य करता येत नाही. त्यामुळे जनाधार आपल्यासोबत असला पाहिजे, असाच प्रयत्न हुकुमशहांनाही करावा लागतो. लोकसंख्या जेवढी महाकाय, तिथे आणखी कस लागतो. पण, नस सापडली तर महाकाय लोकसंख्या अशा प्रयोगांसाठी अधिक उपयुक्त ठरते. 

हिटलर क्रूरकर्मा ठरला आणि आत्महत्येपर्यंत पोहोचला हे खरे, पण लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले म्हणूनच तो सर्वेसर्वा होऊ शकला. त्यासाठी डॉ. जोसेफ गोबेल्ससारखा संवादविद्येचा, भाषाशास्त्राचा अभ्यासक त्याच्या दिमतीला होताच. लोकांच्या मनावर राज्य करण्याचे शास्त्र हिटलर आणि गोबेल्स यांना समजले होते. 

ज्या अमानुष पद्धतीने त्यांनी ज्यूंचे शिरकाण केले, त्याच दुर्दैवी पद्धतीने हिटलरला आणि गोबेल्सच्या संपूर्ण कुटुंबाला मरावे लागले, हा नंतरचा भाग. पण, मुद्दा असा की, लोकांच्या मनावर राज्य करणे हे मानसशास्त्र आहे. विलक्षण कला आहे. 

आपल्याकडे हे गांधींना अवगत होते. गांधींनी त्यावर पुष्कळ काम करत, आपली अशी शैली विकसित केली होती. लोकांना कसे जोडून ठेवायचे, कसे सोबत घ्यायचे, हे गांधीजींना पुरते उमगले होते. म्हणून तर वयाच्या पंचेचाळीशीनंतर भारतात येऊन अल्पावधीत ते देशाचे सर्वोच्च नेते झाले. गांधींनी लोकांना शब्दशः वेडे करून टाकले होते, असे गारूड गांधी नावाचे होते. गांधी आणि हिटलर हे दोघेही तसे समकालीन. दोघांच्या दिशा पूर्ण वेगळ्या, पण 'माइंडगेम'च्या संदर्भाने दोघांचाही विचार करणे अपरिहार्य. 

आता हा मानसशास्त्रीय खेळ भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला कळला आहे, असे दिसते. मुळात ते सत्तेत कसे आले आणि आजही त्यांनी आपले गारूड टिकवण्यात कसे यश मिळवले, या प्रश्नांची उत्तरेही त्यात आहेत.  

पण, परवाच्या उदाहरणाने त्यांनी हे सिद्ध केले की, या विषयातले ते अक्षरशः बाप आहेत! 

महाविकास आघाडी सरकार पाडणे हा आकड्यांचा आणि केंद्रीय सत्तेचा खेळ होता. 
पण, हे सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याविषयीच्या सहानुभूतीची प्रचंड लाट येणार आणि देवेंद्र खलनायक ठरणार, भाजप व्हिलन ठरणार, याचा सगळ्यात आधी अंदाज महाशक्तीला आला होता. भावनिक लाटा तयार करण्यात महाशक्ती जशी वाकबगार आहे, त्याच आणि तशाच भावनिक लाटेवर शिवसेना नावाचा पक्ष उभा आहे, हे त्यांना ठाऊक होते. शिवसेना फोडणे म्हणजे नव्या सुनामीला निमंत्रण आहे आणि हे आपल्यावरच उलटू शकते, याचा त्यांना नीट अंदाज होता. करोडो जिव्हांनी गर्जणा-या जनसागराची ताकद काय असते, याचाही अभ्यास त्यांनी केला होता. 

त्यात, लोकांना 'ट्रॅजिक हिरो' आवडतात. ते त्यांच्या मनात घर करतात. आपल्याकडे नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल किंवा अगदी सावरकर यांच्याविषयी जी व्यापक जनभावना आहे, त्यालाही हा संदर्भ आहे. पराभूत नायक अधिक भिडतो, त्याच्या हरण्याची जखम ओली राहाते. मग, जेताच खलनायक होऊन जातो. इथे, उद्धव ठाकरे या शोकांतिकेचे भव्य नायक ठरले असते. शेक्सपिअरच्या कोणत्याही नायकापेक्षा भव्य. आणि, क्षणार्धात देवेंद्रांसह भाजप हे या पटकथेचे खलनायक. 

एक तर नक्कीच की देवेंद्रांच्या भक्त वा समर्थकांनाही उद्धव यांच्याविषयी भयंकर संताप वगैरे नाही. लाट व्हावी, अशी विरोधी भावना नाही. पण, उद्धव यांच्या समर्थकांच्या मनात मात्र देवेंद्रांविषयी प्रचंड संताप ठासून भरला आहे. त्यात एकाच पक्षाचे वा विचाराचे लोक आहेत असे नव्हे. त्याशिवाय असा एक मोठा वर्ग आहे. तो तसा अराजकीय आहे. पण, उद्धव यांच्याविषयी त्याच्या मनात एक भला माणूस, सज्जन माणूस अशी खूप उंच प्रतिमा तयार झाली आहे. 

या मुख्यमंत्री पदाने उद्धव यांना काय मिळाले असेल, तर ही जनमानसातली भव्य प्रतिमा. जी कोणत्याही ठाकरे यांची नव्हती. मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव यांचीही नव्हती. 

उद्धव यांचे सरकार पाडून, देवेंद्र मुख्यमंत्री झाल्याचा सर्वाधिक फायदा झाला असता, तो उद्धव ठाकरे यांना. त्यामुळे देवेंद्र मुख्यमंत्री होणार नाहीत, हे चाणक्यांनी ठरवणे स्वाभाविकच. शिवसेना बंडखोरालाच मुख्यमंत्री करणे ही तर एकदमच स्मार्ट खेळी. देवेंद्रांनी सरकारमध्ये सामील न होणे हेही साहजिक. तरीही, त्यांना उत्तरदायी ठरवण्यासाठी मंत्रिमंडळात सहभागी व्हायला सांगणे यातही काही विशेष नाही. 

पण...
हा 'पण' महत्त्वाचा. 
देवेंद्रांना मुद्दाम 'उपमुख्यमंत्री' व्हायला सांगणे, तेही जाहीरपणे- ट्विटरवरून वगैरे सांगणे, देवेंद्रांच्या डोळ्यात अश्रू येणे हे उगाच नाही. देवेंद्रांचे 'डिमोशन' करायचे, तर त्यांना फोनवर वा थेट तसा आदेश देता आला असता. पण, त्यांचे 'ह्यूमिलेशन' सगळ्या लोकांना दिसेल, त्यांची नाचक्की नीटपणे सर्वत्र पोहोचेल, अशी व्यवस्था केली गेली. पक्षश्रेष्ठींना देवेंद्रांचा तेजोभंग करायचा असता, तर तो थंडपणेही करता आला असता. सगळ्या जगासमोर देवेंद्रांचा रडवेला चेहरा दाखवायचा आणि त्यानंतर शोकव्याकुळता निर्माण करायची, संतापाची लहर निर्माण होऊ द्यायची, हास्यविनोद आणि निंदा-नालस्तीला पूर येऊ द्यायचा, हा संहितेचा भाग आहे. 

त्यामुळे झाले असे की, अगोदरच्या सिझनच्या शोकांतिकेचा प्रभाव ओसरला. उद्धव ठाकरे नावाच्या 'ट्रॅजिक हिरो'ला लगेच काव्यगत न्यायही मिळाला. 'इथेच फेडावे लागते', 'कर्मा इज बिच' वगैरे देवेंद्रांना उद्देशून लोकांनी न्याय झाल्याचे जाहीर करून टाकले. उद्धव गेले, यापेक्षा देवेंद्र 'उपमुख्यमंत्री' झाले या आनंदात उद्धवसमर्थक आणि बहुसंख्य लोक तरंगत राहिले. शोकांतिकेचा संदर्भ बदलत गेला. आपल्या नायकाविषयीच्या सहानुभूतीचा, विरोधकांबद्दलच्या संतापाचा लाव्हाच निघून गेला. जे चाहते पुढे धुमसत राहिले असते, त्यांना 'आउटलेट' मिळाला. 

दुसरीकडे, देवेंद्रांच्या समर्थकांनाच काय अनेक विरोधकांनाही, त्यांचा असा तेजोभंग आवडला नाही. त्यांच्या मूठभर चाहत्यांसाठी का असेना, ते 'ट्रॅजिक हिरो' ठरले. एका नायकाची भव्यता कमी करून, त्याच्यासमोर दुसरा एक नायक उभा झाला. अजिंक्य पण अवमानित असा भव्य नायक. स्टोरीतला खलनायकच हद्दपार झाला. जो होता, त्याला अवमानित करून सूड घेतला गेला होता! 

संपूर्ण नाटक संपले, तेव्हा प्रेक्षक थक्क होते. भांबावलेले होते. पण, भारावलेले वगैरे नव्हते. ते कुल होते. कोणतीच लाट अशी उरलेली नव्हती. याचा अर्थ सहानुभूती, संताप अशा भावना उरल्या नाहीत, असे नाही. पण, ती लाट नव्हती!  

देवेंद्रांचा जाहीर तेजोभंग हा संहितेचा भाग होता. 
लाटा तयार करणे आणि थोपवणे यावर प्रभुत्व असलेल्यांनी तयार केलेली ही 'वेब सिरिज' होती! 

- *संजय आवटे*














by - internet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल