सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२

समाजाकडून मिळाली होती अवहेलना.. गणपत पाटलांच्या खडतर प्रवासाची संघर्षमय कहाणी...

 समाजाकडून मिळाली होती अवहेलना.. गणपत पाटलांच्या खडतर प्रवासाची संघर्षमय कहाणी



मराठी सृष्टीत लावणीप्रधान चित्रपट असले की नाच्याच्या भूमिकेसाठी गणपत पाटील यांचेच नाव प्राधान्याने घेतले जायचे. ढोलकीच्या थापेबरोबरच आत्ता गं बया! हे शब्द कानावर पडले की हा नाच्या नायिकेच्या तोडीसतोड वाटायचा. मराठी चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गणपत पाटील या नटश्रेष्ठाचे आयुष्य मात्र अवहेलनाच सोसणारे ठरले. २३ मार्च २००८ साली गणपत पाटील यांनी या जगाचा निरोप घेतला. १९२० साली कोल्हापूर येथील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या गणपत पाटलांना आई आणि सहा भावंडांची चिंता वाटू लागली.


त्यासाठी आईला हातभार लागावा म्हणून मोलमजुरी करणे, भाजी विकणे अशी मिळेल ती कामं करु लागले. कोल्हापूरला मेळावे भरत असत त्यात रामायणातील सीतेची भूमिका त्यांनी साकारली होती. पुढे कॉलेजकुमारी या नाटकातून काम केल्याने त्यांना कॉलेजकुमारी म्हणूनही ओळख मिळाली. त्यानंतर बाल ध्रुव या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मात्र इथे मुबलक पैसा मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी वेगळ्या कामांकडे आपला मार्ग वळवला. पुढे राजा गोसावी यांच्यासोबत ओळख झाली आणि त्यांनी मास्टर विनायक यांच्या शालिनी सिनेटोन मधून सुतारकाम, रंगभूषाकार अशी कामे केली. बलिदान आणि वंदेमातरम यासारख्या चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला.


हे पाहून चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी मिठभाकर चित्रपटात प्रथमच खलनायकाची भूमिका त्यांना देऊ केली. जयप्रकाश दानवे यांचे ऐका हो ऐका हे नाटक त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारे ठरले. या नाटकात त्यांनी प्रथमच नाच्याची भूमिका साकारली. पुढे अशाच धाटणीच्या भूमिकांमुळे गणपत पाटील यांना प्रसिद्धी मिळू लागली. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र या भूमिका त्यांना त्रासदायक ठरल्या. खूप वर्षांपूर्वी गणपत पाटील यांनी दुरदर्शनला दिलेल्या मुलाखतीतून आपल्या आयुष्यातला अंधारमय कोपरा उलगडण्याचा प्रयत्न केला होता. गणपत पाटील यांना चार अपत्ये दोन मुली आणि दोन मुलं. मुलींची लग्न जुळवत असताना अनेक अडचणी आल्या. या माणसाला मुलगी कशी काय होऊ शकते? आम्हाला समाजात तोंड दाखवायचे आहे.

तुमच्या मुलीशी लग्न करून आमची पत, अब्रू सगळंच जाईल हे सांगताना मात्र त्यांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली होती. २००६ साली वयाच्या ८६ व्या वर्षी नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटात त्यांनी काम केले होते. हा त्यांचा अभिनित केलेला अखेरचा चित्रपट ठरला होता. २३ मार्च २००८ साली प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूर येथील दवाखान्यात दाखल केले होते इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिनेसृष्टीत तब्ब्ल ६२ चित्रपट आणि १७ नाटकांमधील त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका अजरामर ठरली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने चित्रभूषण तर झी मराठीने जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. संपूर्ण आयुष्य संघर्षमय प्रवासात घालविणारा असा अवलिया कलाकार मराठी सृष्टीला पुन्हा भेटणे शक्य नाही.


















Varun Shukla March 25, 2022 मराठी तडका Leave a comment 6,946 Views

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल